Menu

Study Circle

30 सप्टेंबर २०१७

अमेरिकेच्या आरोग्य मंत्रीपदासाठी दोन भारतीयांची नावे

      अमेरिकेच्या आरोग्य मंत्री टॉम प्राइस यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला आहे. टॉमच्या राजीनाम्यानंतर त्या पदासाठी दोन भारतीय लोकांच्या नावाची चर्चा होत आहे. एका यात्रेसाठी महागडे विमान वापरल्याचा आरोप टॉमवर करण्यात आला होता. यामुळेच टॉमने पदाचा राजीनामा दिला आहे. 

    सध्या सुरू असणाऱ्या घटनांमुळे मी आरोग्य विभागाकडे लक्ष देऊ शकले नाही याबद्दल खेद आहे, असे प्राइस यांनी म्हटले आहे. तसेच खाजगी कामाठी विमानांचा वापर केल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे.  

      प्राइसच्या राजीनाम्यानंतर पदासाठी सीमा वर्मा आणि बॉबी जिंदल या दोन भारतीयांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. सीमा वर्मा सेंटर्स फॉर मेडिकेयर ॲण्ड मेडिकेड सर्विसेजच्या सर्वोच्च स्थानावर आहे. तर बॉबी जिंदाल राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत ट्रंपच्या बाजूने होते.

मासे विकणाऱ्याचा मुलगा भारताचा कर्णधार

     पुढील महिन्यात प्रारंभ होत असलेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांनी बेताच्या आर्थिक परिस्थितीवर मात केली आणि परिस्थितीवर मात करून आता जागतिक पातळीवर खेळण्यास सज्ज झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार अमरजितसिंग खियाम होय. मूळचा इम्फाळचा असलेल्या अमरजितने आई आणि वडील मत्स्यविक्रीचा व्यवसाय करता आणि फावल्या वेळेत शेती; पण त्यांनी कधीही अमरजितवर परिस्थितीचे सावट पडू दिले नाही आणि फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरणा दिली. 

    मणिपूरच्या थोऊबाल जिल्ह्यातील मामांगा हे अमरजितचे गाव. इम्पाळपासून ते 25 किलोमीटरवर असून, अमरजितचे वडील चंद्रामनीसिंग आणि आई आशानग्बी रोज इम्फाळ येथे मासे विक्रीसाठी येतात.

    ‘त्यांनी कधीही मला शेती किंवा व्यवसायात मदत कर, असे म्हटले नाही. उलट फुटबॉलपटू होण्यास प्रोत्साहनच दिले. त्यांच्यामुळेच मी  इथपर्यंत येऊ शकतो, असे अमरजितने म्हटले आहे. शाळेत असल्यापासूनच फुटबॉलचे वेड असलेल्या अमरजितने चंदीगड येथील एका अ‍ॅकॅडमीत प्रवेश घेतला. या अ‍ॅकॅडमीनेच अमरजितच्या खाणे, पिणे राहण्यासह शिक्षणाचीही जबाबदारी घेतली. 2015 साली गोव्यातील एका स्पर्धेदरम्यान निवड समितीची नजरेत अमरजित आला आणि तेव्हापासून तो गोव्यातील अ. भा. फुटबॉल महासंघाच्या अ‍ॅकॅडमीत सराव करतो आहे. 

२९ सप्टेंबर २०१७

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील बळींची संख्या 22

    मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी सेवेच्या इतिहासात शुक्रवार "काळ दिवस' ठरला. पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर सकाळी पावणेअकरा वाजता चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा जीव गेला, तर 35 जण जखमी झाले.

   चेंगराचेंगरीनंतरचे दृश्‍य मानवी भावना थिजवून टाकणारे होते. निष्प्राण झालेल्या 22 जणांची कलेवरे आणि असह्य वेदनेने विव्हळणारे जखमी प्रवासी हे दृश्‍य काळजाला खरे पाडणारे होते. दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांचे आक्रोश अश्रूंच्या रूपात ओघळत होते. नेमके काय घडले? कसे घडले, हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच उरले नव्हते. बचावल्याने सुटकेचा निःश्‍वास सोडावा की मृत्युमुखी पडलेल्या आपल्या सहप्रवाशांबद्दल दुःख व्यक्त करावे, याचा सारासार विचार करण्याची शक्तीच ते काही काळ गमावून बसले होते. ज्या पुलाशी त्यांचे वर्षानुवर्षांचे नाते होते, त्याच पुलावर काळाने झडप घातली होती.

२८ सप्टेंबर २०१७

यंदाचा ‘गानसम्राज्ञी’ पुरस्कार श्रीमती पुष्पा पागधरे यांना जाहीर

      राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांना मुंबई येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

    प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची शिफारस केली आहे. या पुरस्काराचे स्वरुप रु.५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. 

'प्लेबॉय'चे संस्थापक ह्यूग हेफनर यांचं निधन

     लॉस अँजिलोस- प्रसिद्ध अॅडल्ट मॅगझिन 'प्लेबॉय'चे संस्थापक ह्यूग हेफनर यांचं निधन झालं आहे. 91 वर्षीय ह्यू हफनर यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. ह्यूग हेफनर यांनी 1960च्या दशकात सेक्स आणि लैगिक विषयांबद्दलच्या पारंपरिक विचारांची असणारी चौकट मोडून काढली. त्यांच्या पुरूषांसाठी तयार केलेल्या खास मासिकातून त्यांनी या नव्या जीवनशैलीबद्दल सांगायला सुरूवात केली. याच मासिकाच्या बळावर त्यांनी स्वतःचं एक व्यवसाय साम्राज्य तयार केलं होतं. ह्यूग हेफनर हे हेफ या नावानेही ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून हफनर आजारी असल्याने ते प्रसारमाध्यमांपासून दूर होते. ऑगस्टमध्ये प्लेबॉयच्या झालेल्या वार्षीक कार्यक्रमातही ह्यूग हेफनर गैरहजर होते. रेड स्मोकिंग जॅकेट आणि हातात पाईप अशी ही हफनर यांची ओळख होती.

२७ सप्टेंबर २०१७

सर्वात शक्‍तीशाली महिलांमध्‍ये चंदा कोचर, शिखा शर्मा

      फॉर्च्यून या प्रसिध्‍द मासिकाने सर्वात शक्‍तीशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अमेरिकाबाहेरील आयसीआयसीआय बँकेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना स्‍थान दिले आहे. तसेच शिखा शर्मा यांनाही अव्‍वल स्‍थान देण्‍यात आले आहे. तर अमेरिकेच्‍या यादीत इंद्रा नुयी यांना दुसरे स्‍थान देण्‍यात आले आहे. 

  अमेरिकेबाहेर असलेल्‍या व्‍यवसाय क्षेत्रातील सर्वांत शक्‍तीशाली महिलांच्‍या यादीत बॅनको सॅनटॅनडर ग्रुपच्या कार्यकारी अध्यक्ष अॅना बॉटिन यांनी पहिले स्‍थान पटकावले आहे. तर चंदा कोचर यांना पाचवे तर शिखा शर्मा यांना २१ वे स्‍थान देण्‍यात आले आहे. 

     आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर या मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांनी भारतातील सर्वांत मोठ्या खासगी बँकेचे नेतृत्व केले आहे.

देशाच्या मंगळयानाने पूर्ण केली तीन वर्षे!

      भारताची मंगळयान मोहीम ही अनेक अर्थाने जगातील ‘एकमेवाद्वितीय’ मोहीम ठरलेली आहे. अवघ्या सहा महिन्यांसाठी बनवले गेलेल्या मंगळयानाने आता आपली तीन वर्षे पूर्ण केली आहेत. तुलनेने अत्यंत कमी खर्चात बनवलेले हे यान भारताच्या ‘इस्रो’ने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळाकडे यशस्वीरीत्या पाठवून जगाला थक्क केले होते. 

   भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’च्या या ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ने जगभरात नावलौकिक मिळवला. या यानाने आयुष्य 180 दिवसांचे होते, मात्र त्याची निर्मिती इतकी सरस आहे की जूनमध्येच या यानाने पृथ्वीवरील एक हजार दिवस पूर्ण केले आहेत. या यानामध्ये अद्याप 15 किलो इंधन बाकी असल्याने ते आगामी पाच वर्षे मंगळाच्या कक्षेत कार्यरत राहील, असे ‘इस्रो’च्या संशोधकांनी म्हटले आहे. या यानाकडून महत्त्वाचा डाटाही संस्थेला मिळत असून यानाचे सर्व घटक उत्तमप्रकारे काम करीत आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 5 नोव्हेंबर 2013 मध्ये या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. 24 सप्टेंबर 2014 मध्ये ते मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावले. या मोहिमेसाठी 450 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

२६ सप्टेंबर २०१७

लक्ष्मणनला सुवर्ण

      सेनादलाच्या गोविंदन लक्ष्मणन याने राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेतील पुरुषांच्या ५००० मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावल.

      नुकत्याच झालेल्या आशियाई इनडोएर गेम्समधील तीन हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पटकावणाऱ्या लक्ष्मणनने ५००० मी. शर्यतीत १४ मिनिटे व ४.२१ सेकंद वेळ नोंदविली. त्यापाठोपाठ रेल्वेच्या अभिषेक पालने १४ मिनिटे व ८.३८ सेकंद वेळ नोंदवीत रौप्य मिळविले, तर सेनादलाच्याच मान सिंगने ब्राँझपदक मिळविले. लक्ष्मणनला वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदविण्यात मात्र अपयश आले. लक्ष्मणनने लंडन जागतिक स्पर्धेत १३ मिनिटे व ३५.६९ सेकंद वेळ नोंदविली होती.
      महिलांच्या ५००० मी. धावण्याच्या शर्यतीत रेल्वेच्या एल. सूर्याने सुवर्णपदक पटकावले. सूर्याने १६ मिनिटे व २.८५ सेकंद वेळ नोंदविली. रेल्वेच्या चित्रा यादवने रौप्य आणि ‘ऑल इंडिया पोलिस’च्या संगीता नाईकने ब्राँझपदक मिळविले.

 

     पुरुषांच्या गोळाफेकमध्ये सेनादलाच्या तेजिंदर पाल तूरने बाजी मारली. तेजिंदरने १८.८६ मीटर कामगिरी नोंदविली. त्यापाठोपाठ ओएनजीसीच्या ओम प्रकाश सिंगने रौप्य आणि रेल्वेच्या जसदीप सिंगने ब्राँझपदक मिळविले. तसेच, महिलांच्या हातोडा फेकमध्ये रेल्वेच्या सरिता पी. हिने सुवर्ण मिळविले. तिने ६०.५४ मीटर कामगिरी नोंदविली. रेल्वेच्या गुंजन सिंगने रौप्य आणि हरियाणाच्या ज्योतीने ब्राँझपदक मिळविले.

पतंजलि’च्या बाळकृष्णांना 'अच्छे दिन', कोट्यधीशांच्या यादीत

     श्रीमंत भारतीयांच्या यादीत आता योगगुरु रामदेव बाबा यांचे सहकारी, ‘पतंजलि’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या नावाची देखील भर पडली आहे. त्यानंतर नुकताच बाजारात आयपीओ आणलेले डी-मार्टचे राधाकिशन दमानी यांनी देखील टॉप 10 मध्ये बाजी मारली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पहिले स्थान कायम राखले आहे. 

    चीनच्या हुरन या संस्थेच्या अहवालानुसार, भारतातील टॉप टेन श्रीमंतांच्या बाळकृष्णन यांचा समावेश करण्यात आला आहे. ते या आधी 25 व्या स्थानावर होते. ते भारतातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीत 8 व्या स्थानावर पोचले आहेत. त्यांची संपत्ती 70 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. 

      मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले बाळकृष्ण यांच्या 'पतंजलि'ची उलाढाल देखील 10 हजार 561 कोटींवर पोचली आहे. तसेच डी-मार्टचे राधाकिशन दमानी यांना देखील डी-मार्टच्या शेअर बाजारातील प्रवेशाने मालामाल केले आहे. तर रिलायन्स .'जिओ'मुळे मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर टिकून राहण्यास यशस्वी झाले आहेत. अंबानी यांची संपत्ती 58 टक्क्यांनी वधारून 2570 अब्जांवर पोचली आहे. अंबानी यांची संपत्ती येमेन या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीपेक्षा 50 टक्के अधिक आहे.

२५ सप्टेंबर २०१७

भारत-22 ईटीएफ

    प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमधील 22 महत्वाच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करणारा "भारत-22" ईटीएफ बाजारात एंट्री घेण्यास सज्ज झाला आहे. लवकरच केंद्र सरकारकडून भारत-22ची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या योजनेतून जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करून निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्याचा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.

      "भारत-22" या ईटीएफचे आयसीआयसीआय प्रुडेंशिअल असेट मॅनेजमेंट कंपनीकडून व्यवस्थापन केले जाणार आहे. "भारत-22" मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने हमी घेतलेल्या ऍक्‍सिस बॅंक, एलअँडटी, आयटीसी या कंपन्यांचा समावेश आहे. ईटीएफमध्ये प्राप्त झालेला निधी निर्धारित केलेल्या 22 शेअर्समध्ये गुंतवला जाईल. ईटीएफसाठी मुंबई शेअर बाजारातील भारत-22 निर्देशांक हा बेंचमार्क असून गेल्याच महिन्यात तो सुरू झाला आहे. भारत-22 ईटीएफ ही किमान जोखीम आणि चांगला परतावा देणारी योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीबाबत सखोल अभ्यास आणि संशोधन करण्यात आल्याचे आयसीआयसीआय प्रुडेंशिअल एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस. नरेन यांनी सांगितले. भारत-22 मध्ये उद्योग, ऊर्जा, युटीलीटीज, वित्त, एफएमसीजी आणि बेसिक मटेरिअल्स या सहा क्षेत्रात नियोजनबद्ध गुंतवणूक केली जाणार आहे. लाजकॅपला प्राधान्य असून मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही काही प्रमाणात गुंतवणूक केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भारत-22 ही किमान खर्च असलेली ही एक योजना असेल, असा विश्‍वास नरेन यांनी व्यक्त केला.

     बीएसई भारत-22 निर्देशांकाने सेन्सेक्‍सच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या वित्तीय समावेशन, डिजिटल आणि कॅशलेस इकॉनॉमी, जीएसटी आणि पायाभूत सेवांमधील सुधारणांमुळे "भारत-22" ईटीएफमधील कंपन्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल. सध्या बहुतांश शेअर्स आकर्षक किंमतींवर आहेत. भारत-22 च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल.

'मिस व्हीलचेअर वर्ल्ड'

    गेल्या काही वर्षांत भारतीय सुंदरींनी जगावर अधिराज्य गाजवले आहे. यात आता कदाचित आणखी एका विश्वसुंदरीची भर पडू शकते. बेंगळुरूची राजलक्ष्मी पोलंडमध्ये होणाऱ्या 'मिस व्हीलचेअर वर्ल्ड' मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. ३१ वर्षीय राजलक्ष्मी व्यवसायाने डेंटिस्ट आहे. २०१४ मध्ये तिने 'मिस व्हीलचेअर इंडिया'चा किताब जिंकला होता.

    बीडीएसची परीक्षा पूर्ण केल्यानंतर २००७ मध्ये चेन्नईत एका राष्ट्रीय परीषदेत संशोधन प्रकल्प सादर करायला जात असताना राजलक्ष्मीच्या गाडीला अपघात झाला. यात तिच्या मणक्याला दुखापत होऊन तिच्या पायाला अर्धांगवायू झाला. या घटनेचा जबर धक्का तिला बसला. पण त्यातून बाहेर येत तिने मानसशास्त्र आणि फॅशनमधली आपली आवड जोपासली. तिला मिस व्हीलचेअर स्पर्धेबद्दल कळलं तेव्हा तिने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. २०१४ साली तिचं हे स्वप्न पूर्ण झालं. आता लवकरच ती या स्पर्धेच्या निमित्ताने जग जिंकायला निघणार आहे.

सर्वांत लठ्ठ इमानचा अखेर मृत्यू

   जगातील सर्वांत लठ्ठ महिला असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदचा अबू धाबी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अबू धाबीतील बुर्जील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. अति वजनामुळे  इमानला बऱ्याच व्याधींना अडचणींना  सामोरे जावे लागत होते. तिच्या किडनीवर विपरीत परीणाम  झाला होता. याच कारणामुळे अखेर तिचा  मृत्यू झाला. त्याच्यावर जवळपास २० डॉक्टर उपचार करत होते. 

     इमानने वजन कमी करण्यासाठी भारतातही उपचार घेतले होते. तिला त्यासाठी विशेष विमानाने भारतात मुंबईत आणण्यात आले  होते. त्याच्यावर डॉ. लकडावाला  यांनी उपचार केले. एमानच्या मृत्यूविषयी डॉ.लाकडावाला म्हणाले, 'हे खूप वाईट झाले. तिच्या आत्म्याला शांती लाभो.' ज्यावेळी इमान भारतात आली होती. त्यावेळी तिचे वजन ५०० किलो होते.  डॉ. लकडावाला  यांनी उपचार केल्यानंतर तिचे वजन २०० किलोपर्यंत कमी झाले असल्याचा दावा करण्यात आला होता.

२४ सप्टेंबर २०१७

महाराष्ट्राला चार सुवर्णपदके

   महाराष्ट्राच्या प्रणिता सोमन आणि पूजा डानोळे यांनी राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळवली. बावधनजवळ ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १८ वर्षांखालील मुलींच्या गटातील ‘टाइम ट्रायल’ प्रकारात महाराष्ट्राच्या प्रणिता सोमन हिने ४.५ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत २० मिनिटे ४६.३६८ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राचीच प्रियांका करंडेने (२२ मि. २२.६७६ से.) रौप्यपदक, तर केरळच्या लिडिया मोल एम. सनीने (२३ मि. २६.७२५ से.) ब्राँझपदकाची कमाई केली. यानंतर प्रणिताने क्रॉस कंट्री स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली. तिने १३.५ किलोमीटरचे अंतर १ तास ६ मिनिटे ५७.६९७ सेकंदांत पूर्ण करून अव्वल क्रमांक मिळवला. केरळच्या प्रिती बी. के. आण अहिरा संतोष यांनी अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझपदक मिळवले. यानंतर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या पूजा डानोळेने साडेचार किलोमीटर अंतराची शर्यत २२ मिनिटे ०१.९२७ सेकंदांत पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले, तर मानसी कमलाकरने (२४ मि. २७.५२१ से.) रौप्यपदक आणि केरळच्या अंगिता मनोज एम.ने (२५ मि. २४.१६२ से.) ब्राँझपदक मिळवले. स्पर्धेतील १८ वर्षांखालील मुलांच्या क्रॉस कंट्रीत महाराष्ट्राच्या विवेक वायकरने १८ किलोमीटरचे अंतर ४९ मिनिटे ५७.६११ सेकंदांत पूर्ण करून रौप्यपदक मिळवले. यानंतर पूजाने १४ वर्षांखालील मुलींच्या क्रॉस कंट्रीतही (२० मि. २४.००१ से.) सुवर्णपदक मिळवले.

ज्येष्‍ठ साहित्यिक पत्रकार अरुण साधू यांचे निधन

      ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचे मुंबईत निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. 

    साधू यांनी पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्‍दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

     साधू यांची यापूर्वी अँजिओप्लास्टी झाली असून, त्यांच्यावर हृदयविकारासंदर्भात उपचारही सुरू होते. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची हृदयक्रिया बाधित झाली होती.

     वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्रास वाढत गेल्याने रविवारी सकाळी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचं पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.

अरुण साधू हे सहा वर्षे पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. त्यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

२3 सप्टेंबर २०१७

एक सुवर्णपदक, दोन रौप्य

    भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी स्लोव्हेनिया ज्युनियर आणि कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकाची कमाई केली. सांघिक स्पर्धेत भारत अ संघाने चायनीज तैपेईला नमवून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या बाजूने भारत ब संघानेही उपांत्य फेरीचा अडथळा पार केला. त्यामुळे अंतिम फेरीत भारतीयांमध्ये रंगली. यात भारत ब संघातील स्नेहित सुरावज्जुला, पार्थ विरमनी आणि अनुकर्मा जैन यांनी भारत अ संघातील जीत चंद्रा, मानव ठक्कर आणि मनुष शहा या त्रिकुटावर ३-२ने मात केली आणि सुवर्णपदक जिंकले. यानंतर १२ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत मुंबईच्या दिया चितळेने कोरियाच्या खेळाडूवर ३-१ने मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिला चायनीज तैपेईच्या खेळाडूकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला.

२२ सप्टेंबर २०१७

जायकवाडी तब्‍बल ९ वर्षानंतर तुडूंब; १८ दरवाजे खुले

    आशिया खंडातील ऐतिहासिक व एकमेव मातीचे जायकवाडी धरण तब्‍बल ९ वर्षांनी भरले आहे. नाथ सागरात सव्‍वा लाख क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून १० हजारांचा विसर्ग सोडण्यात आला आहे. 

    जायकवाडी धरण ९५ टक्‍के भरले आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणत सुरू आहे. त्यामुळे कधीकाळी रेल्‍वेने पाणीपुरवठा करण्यात आलेल्या मराठवाड्याची तहान यंदा भागणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी सुखावला आहे. यंदा निसर्गाने भरभरून दिल्याची भावना मराठवाडा वासीयांतून व्यक्‍त होत आहे. 

     धरणाचे २७ पैकी १८ दरवाजे खुले करण्यात आले आहेत. १ ते ९ पर्यंतचे दरवाजे आणीबाणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. तर १० ते २७ क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्‍यक अभियंता अशोक चव्‍हाण यांनी दिली. पाण्याची आवक व पाणलोट क्षेत्रातील पावसाचा विचार करून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

धूमकेतूसारख्या जोड लघुग्रहाचा शोध

    'नासा’च्या हबल या अंतराळ दुर्बिणीने धूमकेतूसारखी वैशिष्ट्ये असणार्‍या जोड लघुग्रहाचा शोध लावला आहे. लघुग्रहांची मोठी संख्या असलेल्या ‘अ‍ॅस्टरॉईड बेल्ट’ मध्येच हे दोन्ही लघुग्रह आहेत. हे दोन्ही लघुग्रह एकमेकांभोवती फिरत आहेत. त्यांच्याभोवती धुमकेतूसारखेच धुळीचे वलय आणि शेपूटही आहे हे विशेष!

     या विचित्र खगोलास संशोधकांनी ‘2006 व्ही डब्ल्यू 139, 288 पी’ असे नाव दिले आहे. यापूर्वी जोड ग्रह किंवा जोड तारे (बायनरी स्टार्स) आढळून आले होते, पण आता यानिमित्ताने प्रथमच जोड लघुग्रह दिसून आले आहेत. चार अब्ज वर्षांपेक्षाही पूूर्वी ज्यावेळी आपली सौरमालिका निर्माण झाली त्यावेळेपासूनचे जे सर्वात प्राचीन घटक आहेत त्यामध्ये धूमकेतू आणि लघुग्रहांचा समावेश होतो. लघुग्रह म्हणजे निव्वळ निष्क्रिय असे सूर्याभोवती फिरणारे दगड असतात. धूमकेतू हे बर्फ, खडक आणि विविध संयुगांचे मिश्रण असलेले खगोल आहेत. त्यांचा व्यास अनेक मैलांचा असू शकतो. ते सक्रियही असतात हे विशेष. त्यांच्यावरील बर्फाची वाफ होऊन अशा धूमकेतूंभोवती धूळ, वायू यांचे एक वातावरणही निर्माण होत असते. आता जो लघुग्रह आढळला आहे त्यामध्ये लघुग्रह आणि धूमकेतू अशा दोन्हीची वैशिष्ट्ये दिसून येत आहेत. हा सुरुवातीला एकच लघुग्रह असावा व वेगवान प्रदक्षिणेमुळे तो जेमतेम पाच हजार वर्षांपूर्वीच दुभंगून त्याचे दोन भाग झाले.

२१ सप्टेंबर २०१७

महान उद्योगपतींच्या यादीत तीन भारतीय

    फोब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या १०० महान उद्योगपतींच्या यादीत तीन भारतीय उद्योगपतींना स्थान मिळाले आहे. भारतीय उद्योग जगतासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. तीन भारतीयांमध्ये टाटा उद्योग समुहाचे माजी संचालक रतन टाटा, आरसेलर मित्तल या जगातील सगळ्यात मोठ्या स्टील कंपनीचे सीईओ आणि संचालक लक्ष्मी मित्तल, खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.


    आश्चर्याची बाब म्हणजे भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा यात यादीत समावेश नाही. श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत कायम आघाडीवर असणारे मुकेश अंबानी महान उद्योगपतींच्या यादीत मात्र स्थान मिळवू शकलेले नाहीत. फोब्सच्या या यादीमुळे जगातील उद्योग क्षेत्रात भारतीय उद्योगपतींनाही महत्वाचे स्थान आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे

ज्येष्‍ठ अभिनेत्री शकिला यांचे निधन

    ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्‍क्यानंतर त्यांना वांद्रे येथील रुग्‍णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे बेड उपलब्‍ध नसल्यामुळे त्यांना जुहू येथील आरोग्य निधी रुग्‍णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. 

    १९५०-६० च्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले अभिनेते गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ आणि ‘आरपार’ या चित्रपटांमुळे शकिला प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ‘अलिबाबा और ४० चोर’, ‘हातिम ताई’, ‘आर पार’, ‘श्रीमान सत्यवादी’, ‘चायना टाउन’ यासारख्या ५० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘आर पार’ चित्रपटातील त्यांचे ‘बाबुजी धीरे चलना’ गाणे ५० च्या दशकात खूप प्रसिद्ध झाले. आजही हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग असल्याचे पाहायला मिळते. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उस्तादो के उस्ताद’ या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या.

२० सप्टेंबर २०१७

कोयना धरणाचे ६ दरवाजे उघडले

      कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात प्रंचड वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठवण क्षमता जवळपास संपुष्टात आल्याने बुधवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने वर उचलून त्यातून प्रतीसेकंद  ९२९७  क्युसेस तर पायथा विजगृहातून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेस असे एकूण ११३९७ क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. 

    मुळातच पूर्वेकडील भागात संततधार पाऊस पडत असल्याने कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यातच आता धरणातून पाणी सोडल्याने कोयना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

    १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या या धरणात सध्या एकूण १०४.१७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यातच धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणात प्रतीसेकंद ३५७३४ क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठवण क्षमता लक्षात घेता बुधवारी सकाळी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे धरण व्यवस्थापनाने कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी सांगितले. धरणात येणाऱ्या व जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्याचपटीत कमी जास्त प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.

मॅक्सिकोतील शक्तिशाली भूकंपात ११९ जणांचा मृत्यू

    मॅक्सिको देशाची राजधानी असलेलेया मॅक्सिको सिटीत शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपात ११९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मॅक्सिकोमध्ये १९८५ सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. 

     या भूकंपानंतर मॅक्सिकोमधील लोक घाबरून रस्त्यावर सैरावैरा पळत आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनी भूकंपाच्या दुर्घटनेत मोठे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. या भूकंपात जवळपास २७ हून अधिक इमारती कोसळल्याची माहिती मिळते आहे. ढिगा-याखाली अनेक लोक दबल्याची भीतीही मॅक्सिकोच्या महापौरांनी व्यक्त केली आहे.

१९ सप्टेंबर २०१७

महाराष्ट्राच्या संजीवनीला रौप्यपदक

     महाराष्ट्राची सुवर्णकन्या संजीवनी जाधव हिला आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा अश्‍गबात (तुर्कमेनिस्तान) येथे सुरू आहे. पूर्णिमा हेम्ब्रमने महिलांच्या पेन्टॅथलॉनमध्ये बाजी मारीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 

      नाशिककर संजीवनीने सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्यानेच शर्यत सुरू केली. पहिल्या किलोमीटरमध्ये ती पाच हजार मीटरची माजी आशियाई विजेती संयुक्त अरब अमिरातची आलिया महंमद हिच्या मागे होती. दुसरा किलोमीटर ६ मिनिटे २७.७१ सेकंदात संपली त्या वेळी संजीवनी आघाडीवर होती. शेवटच्या टप्यात दोघींनी वेग वाढविला. त्यात आलियाने बाजी मारली.

     तिने ९ मिनिटे २५.०३ सेकंदात सुवर्णपदक जिंकले. संजीवनीला ९ मिनिटे २६.३४ सेकंद वेळ लागली. गेल्या तीन महिन्यात हे तिचे तिसरे आंतरराष्ट्रीय पदक होय. भुवनेश्‍वर येथे आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत तिने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले होते, तर गेल्या महिन्यात तायपई सिटी येथे विश्‍व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत तिने दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. आजच्या कामगिरीमुळे तिला सुवर्णपदकासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

       पेन्टॅथलॉनमध्ये आशियाई ब्राँझपदक विजेत्या पूर्णिमा हेम्ब्रमने ४०६२ गुण मिळवीत सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या तीन हजार मीटर शर्यतीत आशियाई स्पर्धेतील दुहेरी सुवर्णपदक विजेत्या जी. लक्ष्मणनने अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक फेरीत प्रथम स्थान मिळविताना त्याने ८ मिनिटे ५०.८१ सेकंदात शर्यत पूर्ण केली. चारशे मीटर शर्यतीत अमोल जेकबने प्राथमिक फेरीत प्रथम स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या गोळाफेकीत तेजिदरपाल सिंगने १९.२६ मीटर अंतरावर गोळाफेकीत रौप्यपदक निश्‍चित केले. माजी आशियाई विजेत्या ओमप्रकाश कऱ्हानाला (१८.८०) पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

जगाला अणुयुद्धापासून वाचवणारे पेत्रोव्ह यांचे निधन

    अमेरिकेशी अणुयुद्ध टाळण्यात मोलाची भूमिका बजावणारे रशियन लष्करी अधिकारी स्तानिस्लाव पेत्रोव्ह यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. पेत्रोव्ह यांच्यावर ‘द मॅन हू सेव्हड द वर्ल्ड’ हा माहितीपट काढण्यात आला होता, तो खूप गाजला. तेव्हापासून त्यांना जगाला वाचविणारा माणूस अशी ख्याती मिळाली. 

      सप्टेंबर 1983 मध्ये पेत्रोव्ह मॉस्कोच्या एका गुप्‍त लष्करी तळावर असताना एक असा भोंगा (अलार्म) वाजला, ज्याचा अर्थ होता अमेरिकेने रशियावर आंतरखंडीय क्षेपणास्त्र सोडले आहे. पेत्रोव्ह यांनी तो चुकून वाजला, असा निष्कर्ष काढून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यंत्रणेत काहीतरी बिघाड झाल्याचे त्यांनी वरिष्ठांना कळविले. या घटनेची पुढे चौकशी झाली आणि पेत्रोव्ह यांचा अंदाज खरा ठरला होता. भोंगा खरंच चुकून वाजला होता. पेत्रोव्ह यांचे हे कर्तृत्व, सोव्हिएत युनियन 1991 मध्ये बरखास्त झाले, तेव्हाच  उजेडात आले.

१८ सप्टेंबर २०१७

चीनकडे विनाचालक लढाऊ हेलिकॉप्टर

      युद्ध क्षमता वाढविण्यासाठी चीनने आता विनाचालक लढाऊ हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. ‘ए. व्ही. 500 डब्ल्यू’ नामक हे हेलिकॉप्टर आता विक्रीसाठी चीनकडून प्रदर्शनात मांडले गेेले आहे. 

   चीन सरकारच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्प ऑफ चायना या सरकारी कंपनीने या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. कोणत्याही दुर्गम भागात हे हेलिकॉप्टरचा वापर केला जाऊ शकतो. तसेच तब्बल आठ तास हवेत राहण्याची यामध्ये क्षमता आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यात आली होती. तसेच यामध्ये अ‍ॅटोमेटिक बॉम्ब टाकण्याची क्षमताही विकसित करण्यात आली आहे

१७ सप्टेंबर २०१७

अर्जनसिंग यांचे निधन

      भारत-पाकिस्तानमधील १९६५ च्या युद्धात भारतीय हवाई दलाचे नेतृत्व करणारे मार्शल ऑफ द एअरफोर्स अर्जनसिंग (वय ९८) यांचे  वाजता निधन झाले. शनिवारी सकाळी हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

     हवाई दलामधील सर्वोच्च पदावर म्हणजेच, फाइव्ह स्टार रॅंकवर गेलेले ते एकमेव अधिकारी आहेत. हे पद लष्करातील फिल्ड मार्शलच्या दर्जाचे आहे. देशाच्या लष्करी इतिहासात अर्जनसिंग हे प्रेरणास्थान होते. हवाई दलाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास सरकारची परवानगी नसतानाही भारत-पाक युद्धात अत्यंत कौशल्याने आणि धाडसाने अर्जनसिंग यांनी हवाई दलाचे नेतृत्व केले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जनसिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  

      १५ एप्रिल १९१९ रोजी पंजाब प्रांतातील ल्यालपूर येथे अर्जनसिंग यांचा जन्म झाला. वयाच्या ४४ व्या वर्षी ते भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले होते. त्या वेळीच त्यांनी १९६५ मध्ये युद्धात हवाई दलाचे नेतृत्व केले. आपल्या अलौकिक नेतृत्वाने त्यांनी अखनूरमध्ये पाकिस्तानची दाणादाण उडविली होती. यासाठी त्यांना ‘पद्मविभूषण’ने गौरविण्यात आले. १९६४ ते १९६९ या काळात ते हवाईदल प्रमुख होते.  

    तिन्ही सैन्यदलांचा विचार करता तर फाइव्ह स्टार रॅंक मिळवणारे देशाचे तिसरे अधिकारी होते. त्यांच्याशिवाय फिल्ड मार्शल असलेले सॅम माणेकशॉ आणि के. एम. करिअप्पा यांना फाईव्ह स्टार रॅंकने गौरविले होते.

  निवृत्तीनंतर सरकारने अर्जनसिंग यांची १९७१ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. नंतर ते व्हॅटिकनमध्ये राजदूत होते

१५ सप्टेंबर २०१७

रुग्ण, तृतीयपंथीयांनाही पेन्शन

     संजय गांधी निराधार पेन्शन योजना यापूर्वी फक्त विधवा, निराधार वृद्ध महिलांना मिळत होती. या योजनेची व्याप्ती वाढविली असून आता अपंग, अस्थिव्यंग, एड्स, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात अशा दुर्धर आजारी रुग्ण, शरीरविक्रय करणार्‍या महिला आणि तृतीयपंथीयांनाही मासिक 600 प्रमाणे वर्षाला 7,200 रुपयांचे पेन्शन मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे.

   ज्यांचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी आहे, अशांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

   आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांनादेखील याचा लाभ देण्याची तरतूद केली आहे, परंतु उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळे तो लाभ त्यांना दिला जाऊ शकत नाही. तसेच इयत्ता 8 ते 12 वी पर्यंतच्या अर्धवट शाळा सोडलेल्या शालाबाह्य मुला-मुलींनादेखील या पेन्शन योजनेत सामावून घेतले आहे. परंतु, या योजनेची माहिती लोकांपर्यंत न गेल्यामुळे लाभार्थींची संख्या मर्यादित आहे.

    याचे लाभधारक तहसीलदार कार्यालयात अर्ज भरू शकतात. विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्थांनी यामध्ये पुढाकार घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोचवावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

योजनेचे स्वरूप -

*   समाजातील आर्थिक दुर्बल, वंचित आणि निराधार व्यक्तीला आर्थिक साहाय्य म्हणून मासिक पेन्शन योजना आहे.

*   विधवा, घटस्फोटित, परितक्त्या महिलांसह अत्याचार पीडित महिला, अल्पवयीन मुली, अपंग, अस्थिव्यंग व्यक्ती, एड्सग्रस्त, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात दुर्धर आजारी रुग्ण, शरीरविक्रय करणार्‍या महिला, तृतीयपंथीयांना घेता येणार लाभ.

*   दारिद्य्ररेषेखालील (पिवळे रेशन कार्डधारक) तसेच वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेली व्यक्तीच योजनेसाठी पात्र.

*   ज्या घरातील 2 व्यक्ती निराधार, आर्थिक दुर्बल आहेत, त्यांनाही एकत्र पेन्शन देण्याची तरतूद आहे.

‘केसिनी-ह्युजेन्स’ अवकाशयान ‘शनी’वर आदळणार

       नासा, इसा आणि आयसा यांनी संयुक्तरित्या पृथ्वीवरून सोडलेले ‘केसिनी-ह्युजेन्स’ हे अवकाशयान 13 वर्षे शनीचा अभ्यास केल्यानंतर इंधन संपल्यामुळे शुक्रवार, 15 सप्टेंबरला शनी ग्रहावर आदळणार आहे, अशी माहिती नासा एज्युकेशनचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

     अमेरिकेची नासा, युरोपची इसा आणि इटलीची आयसा या देशांच्या संयुक्त अभियानाद्वारे 3.26 अब्ज डॉलर खर्चून 15 ऑक्टोबर 1997 ला ‘केसिनी-ह्युजेन्स’ हे अवकाशयान शनीच्या अभ्यासासाठी सोडण्यात आले होते. हे यान 2004 मध्ये शनी ग्रहावर पोहोचले. यानाने शनीच्या 300 फेर्‍या पूर्ण केल्या आणि शनी आणि त्याच्या कडीची अगदी जवळून छायाचित्रे घेतली. शनीच्या कडीतून 22 आठवडे फेर्‍या मारल्या. शनीचा मोठा चंद्र ‘टायटन’वर 2700 किलोमीटर जवळ गेले. त्याच्या 127 फेर्‍या मारल्या आणि तेथे तरल स्वरुपात मिथेन असल्याचा महत्त्वाचा पुरावा या यानाने दिला.

     तसेच शनीचा दुसरा उपग्रह ‘इनसेलाड्स’वर समुद्र असून तेथे ‘हायड्रो थर्मल’ गतिविधी सुरू असल्याचे मोठे संशोधन केले. तेथे जीवन असण्याचीसुद्धा शक्यता यानामुळेच सांगितली जाते. आजपर्यंतची ही सर्वाधिक काळाची आणि यशस्वी मोहीम मानली जाते. मात्र, अवकाश यानाचे इंधन संपल्यामुळे ही मोहीम संपवावी लागत आहे. ‘शनी’वर उडी घेण्यापूर्वी हे यान शनीच्या 5 फेर्‍या मारेल. 1510 किलोमीटर अंतरावर यानाची काही यंत्रे बंद होतील. यानाचा एन्टेना पृथ्वीकडे केला जाईल आणि शेवटचा संदेश 83 मिनिटांनी ऑस्ट्रेलिया येथील ‘कॅनबेरा डीप स्पेस’ या ठिकाणावर पोहोचेल. आतापर्यंतची सर्वात अधिक यशस्वी आणि जास्त काळ चाललेली ही यशस्वी मोहीम असल्याचे नासाने म्हटले आहे.

राजर्षि शाहू सहकारी बँक तीन पुरस्कारांनी सन्मानित

     बँकिंग फ्रंटिअर्स यांच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट काम करणार्‍या बँकांना फ्रंटिअर्स इन को-ऑप. बँकिंग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार येथील राजर्षि शाहू सहकारी बँकेस 2016-17 साठीचे बेस्ट एनपीए मॅनेजमेंट वार्ड, बेस्ट ग्रीन इनिशिएटीव्ह पेपरलेस वार्ड, बेस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह एनर्जी वार्ड अशा एकूण 3 पुरस्कारांनी सन्मानित केले.

      हे तीनही पुरस्कार जयपूर (राजस्थान) येथे नुकतेच प्रदान केले. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्र. दि. शिंदे, उपाध्यक्ष सुधाकरराव पन्हाळे, संचालक बाळासाहेब जगताप, शिवाजीराव वाडकर, शांताराम धनकवडे, दिलीप शिंदे, पद्माकर पवार, अभय मोहिते, सचिन पन्हाळे, सुदाम झेंडे, सतीश नाईक, संचालिका कमल व्यवहारे, मंगला जाधव, कुसुम अडसुळे, स्वीकृत तज्ज्ञ संचालक बाळासाहेब अमराळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पासलकर उपस्थित होते.

   बँकेचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले, की गेली 15 वर्षे अतिशय चांगले नियोजन करून आमच्या बँकेने ‘नेट एनपीए’चे प्रमाण शून्य टक्के राखले आहे, तर ‘ग्रॉस एनपीए’ हादेखील गेली सलग 3 वर्षे 3 टक्क्यांच्या आत असून, मार्च 2017 ला स्टँडर्ड कर्जवितरणाचे प्रमाण 97.25 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये बँकेस निव्वळ नफा रु. 8 कोटी 25 लाख झाला असून, सभासदांना 13 टक्के लाभांशवाटप केले आहे.

विद्या प्रतिष्ठानला राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ, महाविद्यालय, शासकीय महाविद्यालय, तंत्रशिक्षण देणार्‍या संस्था व जिल्हाधिकारी स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेऊन त्याची स्वच्छता अशा 5 विभागातून हे पुरस्कार देण्याचे घोषित केले होते.

    बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सुमारे 40 हजार महाविद्यालयांमधून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयास द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याने विद्या प्रतिष्ठानच्या नावलौकीकात या निमित्ताने भर पडली.

     नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन महाविद्यालयाला गौरविण्यात आले. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी संस्थेच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.

    महाविद्यालय विभागामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने बाजी मारत थेट दुसर्‍या स्थानावर झेप घेत हा सन्मान पटकाविला. देशभरातून सुमारे चाळीस हजार महाविद्यालयांनी प्रारंभी यात सहभाग नोंदविला. त्या नंतर साडेतीन हजार महाविद्यालयांनी यात ऑनलाईन सहभाग घेतला. त्यातून शासनस्तरावर 174 महाविद्यालयांची अंतिम यादी तयार केली होती.

       विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने देशभरातील या 174 महाविद्यालयांची यादी तयार करुन अंतिम 10 महाविद्यालयांची निवड केली. यातून विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास दुसर्‍या क्रमांकाचे गुण मिळाल्याने त्यांना गौरविण्यात आले. 

स्वच्छतेचे उपाय, सांडपाण्याचा केला जाणारा पुर्नवापर, पाण्याचा पुरेसा पुरवठा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत घेतली जाणारी काळजी असे निकष लावले होते. या समितीने तटस्थ पाहणी करत आपला अहवाल सादर केला, त्या अहवालावरुन महाविद्यालयास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्यासह उपाध्यक्ष अँड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव द. रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त अँड. नीलीमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार कर्नल (निवृत्त) श्रीश कंभोज यांचे मार्गदर्शन व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी नमूद केले.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत धेंडे यांचे निधन

     आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत गणपत धेंडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.  अनेक दिवसांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यासाठीचे उपचार त्यांच्यावर सुरु होते. एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे ते वडील होते.

     सासवड येथील पारगाव मेमाणे हे धेंडे यांचे मूळ गाव. 1954 मध्ये नोकरीनिमित्त ते पुण्यात आले. रेल्वे प्रशासनात पोलिस म्हणून ते 2 वर्षे नोकरीस होते. त्यानंतर खडकी येथील दारुगोळा कारखान्यात काम करण्यासाठी रुजू झाले. येथील उत्कृष्ट कामासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले होते. सासवड, येरवडा व नागपूर चाळ परीसरामध्ये त्यांनी आंबेडकर चळवळ रुजविण्यासाठी आणि 1956 च्या धर्मांतर चळवळीमध्ये मोठे योगदान दिले होते.

१४ सप्टेंबर २०१७

भारतात 'बुलेट ट्रेन' युगाची सुरवात

      आजपासून आधुनिक भारताची पायाभरणीस सुरवात झाली असून, ही बुलेट ट्रेन युगाची सुरवात आहे. या प्रकल्पामुळे भारताला एक विकासाची दिशा मिळणार आहे. बुलेट ट्रेनमुळे रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होणार.

    भारत आणि जपान यांच्या मैत्रीतून प्रत्यक्षात उतरलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हस्ते पार पडले. शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. बुलेट ट्रेन ही पर्यावरणाला पूरक आणि इंधनातही बचत होणार .

      मोदी म्हणाले, ''जपानच्या पंतप्रधानांचे आणि भारताच्या चांगल्या मित्राचे स्वागत करणाऱ्या गुजरातवासियांचे आभार. भारतात शिंजो अबे यांचे मन:पूर्वक स्वागत आहे. हा न्यू इंडिया आहे, याच्या स्वप्नांचे विस्तार असमित आहे. आपण स्वप्न पूर्ण होण्यासाठी मोठे पाऊल ठेवत आहोत. देशातील सव्वाशे कोटी नागरिकांना मी शुभेच्छा देत आहे. वेगवान प्रगती, गती आणि तंत्रत्रान यामुळे विकास वाढीस लागणार आहे. जपानने दाखवून दिले आहे, की ते भारताचे चांगले मित्र आहेत. या दोन्ही देशातील संबंधामुळे वाढ होणार आहे. अबे यांनी वैयक्तिकरित्या लक्ष देऊन बुलेट ट्रेनचा प्रकल्प पुढे नेला. अमेरिकेतही रेल्वेमुळे आर्थिक प्रगतीला सुरवात झाली. अबे यांनीही सांगितले, की दुसऱ्या महायुद्धानंतर 1964 मध्ये जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरु झाली. यामुळे आर्थिक प्रगती झाली. तांत्रिक प्रगती गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झाली. हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहे. उत्पादकता वाढली तरच प्रगती होणार आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून, यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढे रेल्वेसाठी केले नव्हते.  ''

      अहमदाबादमध्ये कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी गेले तर भाव करतो. कर्ज घ्यायला गेले तरी दहा बँकांमध्ये चौकशी करून हिशोब करतो आणि निर्णय घेतो. पण, भारताला जपानासारखा मित्र मिळाला आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी 88 हजार कोटींचे 50 वर्षांसाठी कर्ज दिले असून, त्यावर 0.01 टक्के एवढे नाममात्र व्याज ठेवले आहे. बुलेट ट्रेन कधी आणणार असे म्हणत होते, आता अहमदाबादमध्येच असा प्रश्न उपस्थित करत आहेत. या हायस्पीड रेल्वेमुळे 500 किमी दूरीवर असलेले नागरिक एकत्र येऊ शकतील. मुंबई-अहमदाबादमधील अंतर दोन तासांवर येणार आहे. बुलेट ट्रेनमुळे मोठी इंधन बचत होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबीविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो. देशातील सामान्य नागरिक याचा उपयोग करेल, तेव्हाच तंत्रज्ञानाचा वापर करेल. बुलेट ट्रेनसाठी अधिकाधिक सामुग्री भारतातून वापरली जाईल. नव्या तंत्रज्ञानामुळे मेक इन इंडिया प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे. वडोदरामध्ये हायस्पीड रेल्वेसाठी विद्यापीठ सुरु करण्यात येईल.

१३ सप्टेंबर २०१७

जपानचे पंतप्रधान भारत दौर्यावर

     जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे 2 दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत आहेत. अ‍ॅबे गुजरातला भेट देणार असून, तेथे बुलेट ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. भारत-जपान वार्षिक शिखर संमेलनाचे आयोजन अहमदाबादमध्ये केले असून, या संमेलनादरम्यान उभय देशांत महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शिंजो अ‍ॅबे यांच्यासोबत 8 किमी अंतराचा रोड शो करणार आहेत. अ‍ॅबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहराचे सुशोभिकरण केले आहे. साबरमती नदीचा समोरील भाग आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. चौका-चौकात मोदी आणि अ‍ॅबे यांचे एकत्र बॅनर्स उभे केले आहेत. तर एक बॅनरवर ’वेलकम टू इंडिया’ असे लिहिण्यात आले आणि खाली त्याचे जपानी भाषेत भाषांतर केले आहे.

    जपान हा अलिकडच्या काळात भारताचा विश्वासू जोडीदार बनला आहे. गेल्याच वर्षी दोन्ही देशांमध्ये अणुकरार झाला असून, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानकडून अतिशय कमी व्याजात भारताला कर्ज देण्यात आले आहे. 

विषारी वनस्पती : जाईंट होगवीड

     ब्रिटनच्या लँकेशायरमध्ये एका नदीकाठी अत्यंत विषारी वनस्पती आढळली आहे. या वनस्पतीला स्पर्श होताच हाताला फोड येतात. ‘जाईंट होगवीड’ नावाची ही वनस्पती सफेद आणि हिरव्या रंगाची आहे.

    या वनस्पतीचा शोध ब्रिटनमध्ये सर्वप्रथम 19 व्या शतकात घेण्यात आला होता. त्याची केवळ पुस्तकांमध्येच नोंद होती. आता काही दिवसांपूर्वी ही वनस्पती नदीकाठी आढळून आली. 11 वर्षांच्या एका मुलाने तिला सहज स्पर्श केल्यावर त्याच्या हातावर फोड उठले व त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. शहरातील काही लोकांनी म्हटले आहे की, अशी वनस्पती त्यांच्या घराच्या आसपासही आहे. आता या वनस्पतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

      सूर्यप्रकाशात ही वनस्पती त्वचेच्या संपर्कात येताच एक घातक रसायन सोडते. त्यामुळे त्वचेवर फोड येतात. अशावेळी साबणाने हात धुवून तत्काळ डॉक्टरांना दाखवावे, असा सल्ला ब्रिटिश तज्ज्ञांनी दिला आहे.

’मिशन 24’

     मुंबईत धारावीनंतर दुसर्‍या क्रमांकाची मोठी झोपडपट्टी म्हणून उभ्या राहिलेल्या देवनार, शिवाजीनगर झोपडपट्टीला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर रस्त्यावर उतरला आहे. मुंबई महापालिकेच्या सहकार्याने अपनालय आणि मुंबई फर्स्ट या संस्थांच्यावतीने येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत असून हा प्रकल्प पालिकेला देण्यासाठी सचिन पालिका मुख्यालयात आला होता. या प्रकल्पात देवनार परिसरात 2 वर्षांत पालिकेच्या शाळा, दवाखाने, शौचालये, सांडपाणी व्यवस्था, कचर्‍याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

      पालिका, मुंबई फर्स्ट आणि अपनालय संस्थेच्यावतीने देवनारच्या शिवाजी नगर झोपडपट्टीत विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन 24’ सुरू करण्यात आले. या मिशनचा क्रिकेटपटू व खासदार सचिन तेंडुलकर व पालिका आयुक्त अजय मेहता यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला. ‘देवनार हा मोठ्या झोपडपट्टीचा भाग आहे. या भागात मी गेलो आहे. तेथे खूप भयानक स्थिती आहे. देवनार डम्पिग ग्राऊंड म्हणजे 10 मजल्याची कचर्‍याची इमारत आहे. जी तुमच्याकडे आ वासून पाहातेय,’ असे सचिनने यावेळी बोलताना सांगितले.

       देवनार भागात फिरताना मला ज्या गोष्टी खटकल्या त्यावर काही तरी तोडगा काढावा म्हणून मी प्रयत्न करत आहे, असे सचिनने सांगितले. स्वच्छता दूत म्हणून मला जे काही करता येईल, ते करायचे आहे. मुंबईत अनेक भागात लोक आपल्या घराच्या खिडक्यामधून कचरा टाकतात. यासाठी बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे कठीण काम असले तरी, अशक्य काहीच वाटत नाही. आपल्याला सगळ्यांना स्वच्छतेचे अ‍ॅम्बेसेडर व्हायचे आहे, असे आवाहन सचिनने मुंबईकरांना केले आहे.

      स्वच्छता राखणे ही ठराविक लोकांची नाही, तर ती प्रत्येकाची, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. दुसर्‍यांकडे बोट दाखवू नका. स्वच्छतेसाठी स्वतः मेहनत करा, मग दुसर्‍यांना उपदेश करा.

- सचिन तेंडुलकर

प्रसिध्द शिल्पकार विठोबा पांचाळ यांचे निधन

    राष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार व प्रकाशचित्रकार विठोबा पांचाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. विठोबा यांनी जवळपास 15 वर्षे महाराष्ट्र फाऊंडेशनसारख्या दर्जेदार संस्थेसाठी प्रकाशचित्रणाचे काम केले होते. शिवाय त्यांनी बनवलेले कॉम्रेड डांगे यांच्या शिल्पाचे अनावरण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्ली येथील संसद भवनात करण्यात आले होते.

    तसेच 4 महिन्यांपूर्वीच कोकणातील केशवसुत स्मारक येथे त्यांनी केशवसुतांच्या तुतारी या कवितेवर आधारित केलेल्या शिल्पाचे अनावरण केले होते. प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांनीही ज्यांच्याबद्दल मृत्यूपत्रात लिहून ठेवले होते की, मी गेल्यानंतर जर माझे फोटो प्रकाशित करायचे झाले तर ते केवळ विठोबा पांचाळ यांनी काढलेले प्रकाशित करण्यात यावेत.

१२ सप्टेंबर २०१७

100 रुपयांचे नाणे येणार

   आर्थिक व्यवहार आणखी सुलभ करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. 200 रुपयांची नवीन नोट आणल्यानंतर आता केंद्र सरकारने 100 रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने 100 आणि 5 रुपयांचे नवे नाणे आणण्याचा निर्णय घेतला आहे.

    यातील 100 रुपयाच्या नाण्याचे वजन 35 ग्रॅम तर 5 रुपयाच्या नाण्याचे वजन 5 ग्रॅम असेल. नाण्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के कॉपर, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक या धातूंचा वापर करण्यात येईल. सध्या बाजारात 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी चलनात आहेत. आगामी काळात यात 100 रुपयाच्या नाण्याची भर पडणार आहे.

    एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी 1972 मध्ये ‘द्रविड मुन्नेतत्र कळघम’ (द्रमुक) या पक्षातून फुटून अ. भा. अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) या पक्षाची स्थापना केली होती. एमजीआर यांनी 1977, 1980 तसेच 1984 मध्ये मुख्यमंत्रिपद भूषवले होते. 1989 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता.

    काही दिवसांपूर्वी आरबीआयने 200 रुपयाची नोट चलनात आणली होती. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर 500 आणि 1000 रुपयाची नोट चलनातून बाद झाली आणि त्याऐवजी 500 आणि 2000 रुपयाची नोट चलनात आली होती.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडूनही तलाकला ’तलाक’

    अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक पद्धतीला घटनाबाह्य तसेच बेकायदेशीर असल्याचे घोषीत केल्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे विवाहाच्या वेळीच काझी व धर्मगुरुंच्या साक्षीने वर व वधू पक्षांमध्ये विवाह संपुष्टात आणण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तलाकचा आधार घेतला जाणार नाही असा समझोता घडवून आणला जाईल, असे बोर्डाने जाहीर केले आहे.

    भोपाळ येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची एक महत्वपूर्ण बैठक झाली. यात हा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने तलाकबाबत दिलेल्या निर्णयाचे बोर्ड स्वागत करत असून लवकरच तलाकविरोधात व शरीयतसंदर्भात जनजागृती करण्याबाबत मोहीम सुरु केली जाईल, असेही बोर्डाने यावेळी स्पष्ट केले.

     यासंदर्भात एका समितीची स्थापना करण्याचाही बोर्डाने निर्णय घेतला आहे. याचबरोबर तलाकबाबत संवेदनशिलता वाढण्यासाठी जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे. विवाह संपुष्टात आणण्याची वेळ आलीच तर कोणत्याही परिस्थितीत त्यासाठी तलाकचा आधार घेतला जाणार नाही यावर वर आणि वधू पक्षांमध्ये विवाहावेळीच सहमतीवर भर दिला जाणार असल्याचे बोर्डाच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

   सर्वोच्च न्यायालयाने तलाकला घटनाबाह्य तसेच बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यामुळे तलाक पद्धती आता स्विकारली जाणार नाही. यामुळे तलाकचा वापर टाळणे हेच योग्य ठरेल. यासाठी काझी आणि धर्मगुरुंची मदत घेतली जाईल, असेही बोर्डाने म्हटले आहे. 

    सुन्नी मुस्लिमांतील हनफी पंथात तलाकची पद्धत सुरु आहे. पती-पत्नीत काडीमोड घेण्यासाठी तलाक ही योग्य पद्धत नाही, असे बोर्डाचे सुरुवातीपासूनच म्हणणे आहे. या पद्धतीचा अवलंब करु नये यासाठी अनेकदा बोर्डाने प्रयत्न केले आहेत. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांचे विचार बदलणे गरजेचे आहे, असेही बोर्डाने म्हटले आहे.

    बोर्डाच्या या मोहिमेस आगामी काही दिवसांमध्ये प्रारंभ केला जाईल. तलाकबाबत कायदा तयार करण्यासंदर्भात बोर्डाचा काय पवित्रा असेल, असे विचारले असता याबाबत आताच काही सांगता येणार नाही. तशी वेळ आल्यावर मात्र निर्णय घेतला जाईल, असे बोर्डाचे एक सदस्य कमाल फारुकी यांनी सांगितले. 

११ सप्टेंबर २०१७

अभिजित कटके यांना ‘भारत केसरी’

     पुण्याच्या अभिजित कटके याने ‘भारत केसरी’ किताब पटकावला. कर्नाटकातील जमखंडीत ही स्पर्धा पार पडली. अभिजितने 5 लढती जिंकल्या. त्याने अनुक्रमे दिल्लीचा भीमसिंग (7-3), हरियानाचा अनिल कुमार (7-5), हवाई दलाचा सतीश फडतरे (10-0), उत्तर प्रदेशचा अमित कुमार (8-4) यांना हरविले. निर्णायक फेरीत त्याने ‘कर्नाटक केसरी’ शिवय्याला 10-2 असे हरविले.

     चांदीची गदा आणि 51 हजार रुपये असे इनाम त्याला मिळाले. अभिजित शिवरामदादा तालमीत भरत मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ‘माईल स्टोन’

     देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच बुलेट ट्रेनचा प्रकल्प उभारला जात आहे. मुंबई ते अहमदाबाद या शहरांना जोडणारा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ 14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे राष्ट्राध्यक्ष शिंजो आंबे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

         देशातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भाजप सरकारने हाती घेतला आहे. या माध्यमातून रेल्वेच्या गतीला अधिक वेग देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देशातील रेल्वे प्रशासनात होत असलेल्या नवीन सुधारणांमध्ये बुलेट ट्रेन हा माईल स्टोन (मैलाचा दगड) ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे.

*   भारतातील या पहिल्या बुलेट ट्रेनची क्षमता 750 प्रवाशांना घेऊन जाण्याची असणार आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद या दोन्ही शहरातील 7 तासांचा प्रवास केवळ 3 तासांचा होणार आहे.

*   या योजनेसाठी 1.10 लाख कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी जपानकडून काहीअंशी आर्थिक मदत केली जाणार आहे.

*   हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2023 पर्यंत आराखडा निश्चित केला आहे. परंतु, अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार ही योजना 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करत आहे.

*   या रेल्वे मार्गावर एकूण 12 स्थानक असणार आहे. या ठिकाणी केवळ 163 सेकंदच ही रेल्वे थांबणार आहे. मुंबई ते बोईसर आणि बीकेसी या दरम्यान 21 किलोमीटरचा बोगदा असणार आहे. यातील 7 किलोमीटरचा मार्ग हा समुद्राच्या पाण्याखालून जाणारा आहे.

*   हा सर्व प्रकल्प 20 किलोमीटर उंचीवरील रेल्वे ट्रॅकवर उभारला जाणार आहे. ज्यामुळे कमीत कमी भूमी संपादन करण्यावर भर दिला जाणार आहे.

*   जपान सरकारशी 2015 मध्ये करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये जपानचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी ज्या बुलेट ट्रेनमधून प्रवास केला होता, त्या बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान भारतात उभारण्यात येणार्‍या बुलेट ट्रेनमध्ये वापरले जाणार आहे. 

आधार-सिमकार्ड लिंक सक्तीची

       केंद्र सरकारने आधारकार्ड मोबाईल सिमकार्डशी लिंक करण्यासाठी कालावधी निश्चित केला आहे. फेब्रुवारी 2018 पर्यंत ग्राहकांना सिमकार्ड आधारकार्डशी लिंक करावे लागेल, अन्यथा सिमकार्ड बंद केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2017 मध्ये पडताळणीसाठी आधारकार्डशी सिमकार्ड लिंक करण्याचे आदेश सरकारला दिले होते.

      बनावट ओळखपत्रावर घेतलेले क्रमांक दहशतवादी किंवा इतर गुन्ह्यांसाठी वापरण्यात येतात. आता मोबाईल क्रमांक बँकिंगशी जोडल्याने गैरप्रकार होण्याचाही धोका आहे. त्यामुळे सर्व क्रमांकांची पडताळणी व्हावी, अशी याचिका लोकनीती फौंडेशन या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता.

      देशात फेब्रुवारी 2016 पर्यंत जवळपास 105 कोटी मोबाईल ग्राहक होते. दूरसंचार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यापैकी 5 कोटी सिमकार्ड कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने पडताळणी प्रक्रिया एका वर्षाच्या आत करण्याचे आश्वासन दिले हाते. त्यानंतर आता सरकारने पडताळणी प्रक्रियेसाठी कालावधी निश्चित केला आहे.

१० सप्टेंबर २०१७

जागतिक कॅडेट कुस्तीत अंशूनेही जिंकले सुवर्ण

     अथेन्सला सुरू असलेल्या या स्पर्धेत अंशूने 60 किलो गटात अंतिम फेरीत प्रवेश करीत सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या होत्या. तिने गतस्पर्धेत ब्राँझ जिंकले होते; पण तिची लढत जपानच्या नाओमी रुईकेविरुद्ध होती. अंशूने पहिल्याच फेरीत गुण घेतला आणि त्यानंतर वर्चस्व कधीही गमावले नाही. तिने हुशारीने निर्णायक लढतीत 2-0 असा विजय मिळविला.

    जपानच्या महिला कुस्तीगीरांना हरवणे या जन्मात शक्य नाही, हे ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या साक्षी मलिकचे वक्तव्य नवोदित कुस्तीगीर अंशूने खोटे ठरविले. तिने जपानच्या स्पर्धकास हरवून जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

    अंशूची सुरुवातच जबरदस्त होती. तिने पहिल्याच फेरीत रुमानियाच्या अमिना रोक्साना हिला 30 सेकंदातच चीतपट केले. त्यानंतर तिने रशियाच्या नास्तासला पारोखिना हिला 6-3, तर उपांत्य फेरीत हंगेरीच्या एरिका बॉगनर हिला 8-0 असे पराजित केले होते.

     सिमरन, मनिषा आणि मिनाक्षी यांनी ब्राँझ जिंकले. सिमरनने अमेरिकेच्या कॅटलीन न वॉकर हिला 3 मिनिटांतच 10-0 असे हरवत ब्राँझपदक जिंकले. गतविजेत्या मनीषाचे सुवर्णपदक हुकले, पण तिने 46 किलो गटात ब्राँझ जिंकले. तिने या महत्त्वाच्या लढतीत स्पेनच्या ना मारिया टॉरेस हिला 3-2 असे नमवले. मिनाक्षीने मारियाना ड्रॅगुतान हिला 6-2 असे हरवून 52 किलो गटातील ब्राँझपदक पटकावले. करुणाला मात्र 70 किलो गटात ब्राँझपदकाच्या लढतीत पोलंडच्या व्हिक्टोरिया चोलुजविरुद्ध हार पत्करावी लागली.

डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते इंडोनेशियात सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

    आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे केले. सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर झाले.

    त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. लहाने यांनी विस्ताराने मांडणी केली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड, माजी महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजी भोसले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

     वैद्यकशास्त्रावर मराठीत अनेक पुस्तके आली असली, तरी अद्यापही तिथे संधी आहेत. त्याचप्रमाणे, अवयवदानासारख्या चळवळीची आज आवश्यकता आहे. आरोग्यावरची आपली तरतूद अनेक छोट्या आणि विकसनशील देशांपेक्षा कमी आहे. ती तरतूद वाढवली पाहिजे. सार्वजनिक आरोग्य अधिक सशक्त झाले पाहिजे, असेही त्यांनी मांडले.

    स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड म्हणाले, भाषा बाजारपेठेत उभी राहिल्याशिवाय मोठी होत नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न मराठी भाषेला अधिक व्यावहारिक आणि लोकाभिमुख करण्याचा आहे. त्याच भूमिकेतून हे संमेलन ’आरोग्य’ या विषयाभोवती गुंफले आहे. मराठी ज्ञानभाषा झाली नाही, तर इंग्रजीशरणता ही आपली अगतिकता ठरणार आहे.

    संजय आवटे म्हणाले, विश्व साहित्य संमेलनाने धारणाही वैश्विक करायला हव्यात. कारण, अभिव्यक्तीची माध्यमे वाढत असताना विचार आक्रसला जातोय. गौरी लंकेश यांची हत्या आणि डॉ. मेधा खोले यांनी दाखल केलेला एफआयआर ही याची ठळक उदाहरणे आहेत. मराठी माणूस व्यापक झाल्याशिवाय भाषा समृद्ध होणार नाही. 21 व्या शतकातील प्रगती आणि त्याचवेळी मध्ययुगीन मानसिकता हे दुभंगलेपण हे आपल्यासमोरचे आव्हान आहे.

    सामाजिक संदर्भात काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आणि ’मी’ विस्तारला पाहिजे, असे जीवन सोनावणे म्हणाले.

    दुपारच्या सत्रात वैद्यक साहित्यावर परिसंवाद झाला. पत्रकार संतोष आंधळे, प्रा डॉ वासंती वैद्य, सरल कुलकर्णी, डॉ. अरुणा पाटील, सुमन मुठे यांनी त्यामध्ये भाग घेतला. याच संमेलनात निलेश गायकवाड यांनी लिहिलेल्या ’आकाशपंख’, ’थरार उड्डाणाचा’, ’माझे अंदमान’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे, डॉ. शुभा साठे यांच्या ’त्या तिघी’, तसेच सुमन मुठे यांच्या ’सहकार चळवळीतील महिला’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.  अरुंधती सुभाष यांनी सूत्रसंचालन केले.

९ सप्टेंबर २०१७

’DSK डेव्हलपर्स’च्या एमडी व सीईओ पदी शिरीष कुलकर्णी

     डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि.च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कंपनीच्यावतीने मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराला कळविण्यात आली आहे.

     कंपनीचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक असलेले डी. एस. कुलकर्णी पदावरून पायउतार झाले असून, त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची निवड केली आहे. या नियुक्तीनंतर त्यांच्याकडे कार्यकारी अधिकार सोपविण्यात आले. शिरीष कुलकर्णी हे सिम्बॉयोसिस कॉलेजमधून बी. कॉम. झालेले असून, त्यांना रिअल इस्टेटसह औद्योगिक क्षेत्राचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. डी. एस. कुलकर्णी हे या पुढे अ-कार्यकारी रूपात संचालक मंडळाचे व कंपनीचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील.

      दरम्यान, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सच्या एनसीडींच्या विश्वस्तांच्यावतीने (डिबेंचर ट्रस्टी) सुचविण्यात आलेल्या शशांक बी. मुखर्जी यांच्या नावाला संचालक म्हणून नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली.

ब्रिक्स : जागतिक राजकारणाची फेररचना

    ब्रिक्स परिषदेत ज्याप्रमाणे जागतिक राजकारणाच्या फेररचनेची सुरुवात झाली आहे, त्याचप्रमाणे भारत-चीन यांच्या द्विपक्षीय संबंधांतदेखील आश्वासक बदलाची सुरुवात झाली आहे. त्यापैकी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिषदेत पाकिस्तानातून भारतविरोधी कार्यरत असणार्‍या दहशतवादी संघटनांचा थेट उल्लेख केला. हे भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्यातील सर्वात मोठे यश आहे.

    पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद, चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका आणि डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन यांच्या प्रमुख उपस्थितीत 9वी ब्रिक्स शिखर परिषद चीनमधील शियामिन या शहरात नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात संवाद होणे, ही निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. म्हणूनच त्याची दखल घेणे हे भारत-चीन आणि एकंदरीतच बदललेल्या आंतरराष्ट्रीय संदर्भात अपरिहार्य आहे.

     आजमितीला ब्रिक्समध्ये भारतासहित ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे आणि ही संघटना जगातील 40 टक्के लोकसंख्येचे म्हणजेच सुमारे 3.6 अब्ज लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये अमेरिका आणि युरोपकेंद्रित आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बळी ठरलेले अथवा अमेरिकाकेंद्रित आंतरराष्ट्रीय व्यवस्था मान्य नसणारे तसेच जागतिक राजकारणात शक्तिशाली म्हणून उदयास आलेल्या देशांचा समावेश आहे.

    ब्रिक्सची पहिली औपचारिक शिखर परिषद पार पडली ती 16 जून 2009 रोजी रशियात आणि तीदेखील 2008 च्या अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर. हा निव्वळ एक योगायोग नव्हता तर अमेरिकेच्या पश्चात निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासंबंधीच्या दिशेने तो एक सामूहिक प्रयत्न होता. विशेष म्हणजे जगावरचा अमेरिकेचा प्रभाव कमी होत असल्याची चर्चा चालू झाली ती या काळातच. गमतीची गोष्ट म्हणजे ‘ब्रिक’ या शब्दाचा शोध जिम ओ नेल यांनी लावला तो 2001 मध्ये म्हणजेच अमेरिकेत ज्या वर्षी दहशतवादी हल्ला झाला त्या वर्षी. नंतर ब्राझील, भारत, चीन व रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची यासंबंधीची प्राथमिक चर्चा हीदेखील अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 2006 मध्ये पार पडली. यामुळेच ब्रिक्सकडे केवळ 5 देशांची एक संघटना म्हणून न पाहता, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पुनर्मांडणीचे एक व्यासपीठ म्हणून पाहिले जाते. त्यासाठी अमेरिका व भारताचे राजकारण समजून घेतले पाहिजे.

     अफगाणिस्तान आणि इराक येथील लष्करी अपयशामुळे जागतिक वर्चस्वाला बसलेला हादरा आणि या हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेली आर्थिक समस्या यामुळे अमेरिकेने आपले लक्ष आशिया खंडाकडे वळवले आहे. त्यातून जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन्स आणि थायलंड या जुन्या मित्रदेशांबरोबर नव्याने संबंध प्रस्थापित केले जात आहेत. याचा मूलभूत उद्देश हा चीनच्या वर्चस्वाला शह देणे हा आहे.

    भारत हा अमेरिकेच्या आशियाविषयक धोरणांत अतिशय महत्त्वाचा देश असून भारताच्या सहकार्यावरच अमेरिकेच्या आशिया खंडातील विस्ताराचे यशापयश अवलंबून आहे. भारताचे आशिया खंडातील भौगोलिक स्थान, नेत्रदीपक आर्थिक कामगिरी, स्थिर लोकशाही, तसेच चीनबरोबर असणारे तणावपूर्ण संबंध याचा फायदा अमेरिकेला आपले हित साधण्यासाठी करायचा आहे. परंतु एकंदरीतच अमेरिकेची आशियातील राजकारणाची सद्यःस्थिती पाहता अमेरिकेला जेवढी भारताची आवश्यकता आहे तेवढी भारताला अमेरिकेची आवश्यकता नाही. तेव्हा इतिहासाची पाने भूगोलाच्या स्वभावानुसार बदलत असून अमेरिकाप्रणीत आंतरराष्ट्रीय रचनेला भारताने स्वतःच्या राष्ट्रीय हितातून पाहावे. निव्वळ चीनला विरोध म्हणून या रचनेला भारताने आलिंगन देऊ नये. भारताची ही भूमिका निश्चितच आशियातील भारताच्या वर्चस्वाला तसेच ब्रिक्सच्या विस्ताराला पूरक ठरेल.

ब्रिक्स परिषदेत ‘ब्रिक्स’ -

     उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत भागीदारी या शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये 70 मुद्द्यांचा समावेश होता. त्यात आर्थिक, सामाजिक, राजकीय, सामरिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक या प्रमुख मुद्द्यांचा अंतर्भाव होता. शांतता, सुरक्षा, सहकार्य आणि विकास या चतुःसूत्रीवर ब्रिक्सचा विस्तार करण्याचे सहभागी राष्ट्रांनी ठरवले आहे. तसेच आर्थिक विकासास हातभार लावणे, न्याय्य आणि समानतेवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे, आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक शांतता व सुव्यवस्था राखणे या ध्येयांचा समावेश केला आहे. जागतिक राजकारणात अशा गोष्टींवर फार विश्वास ठेवणे धोकादायक असले तरी आश्वासक सुरुवात म्हणून याकडे पाहिलेच पाहिजे. अमेरिकेच्या अनुपस्थितीत अशा मुद्द्यांची चर्चा होणे यातच जागतिक राजकारणाच्या फेररचनेची बीजे रोवली आहेत आणि या फेररचनेचे नेतृत्व करण्यास ब्रिक्स सक्षम आहे हे आंतरराष्ट्रीय समुदायावर बिंबवण्यात नरेंद्र मोदी, शी जिनपिंग, व्लादिमीर पुतीन, जेकब झुमा आणि मायकेल थेमेर हे नेते यशस्वी ठरले.

  भारत-चीन नव्याने यांच्यातील डोकलामच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला सुसंवाद म्हणून 9 व्या ब्रिक्स परिषदेची नोंद घेतली जाईल. या परिषदेत ज्याप्रमाणे जागतिक राजकारणाच्या फेररचनेची सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे भारत-चीन यांच्या द्विपक्षीय संबंधातदेखील आश्वासक बदलाची सुरुवात झाली आहे. त्यापैकी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिषदेत पाकिस्तानातून भारतविरोधी कार्यरत असणार्‍या दहशतवादी संघटनांचा थेट उल्लेख केला. हे भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्यातील सर्वात मोठे यश आहे. जागतिक दहशतवादावर दुटप्पी भूमिका घेणार्‍या अमेरिकेवरच दहशतवादाचा भस्मासुर कसा उलटला याचा अनुभव जगाने 9/11 च्या हल्ल्याने घेतला. अलीकडच्या काळापर्यंत पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादावर चीन अशीच दुटप्पी भूमिका घेत होता. परंतु पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीनुसार चीनने दहशतवादावर आपली भूमिका बदललेली आहे आणि त्यासाठी ब्रिक्स परिषदेची निवड करून भारताच्या उपस्थितीत पाकिस्तानला योग्य तो संदेश पोहोचवला आहे.

   पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादावर भारत-अमेरिकेपेक्षा भारत-चीन हे समीकरण ही जागतिक दहशतवादाविरोधी लढ्याची आश्वासक सुरुवात ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने झाली, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तसेच परिषदेचेदेखील यशच म्हणता येईल.

    दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत-चीन यांनी भविष्यात डोकलामसारखी परिस्थिती निर्माण न करण्याचा केलेला निर्धार. खरे तर या निर्धारामुळे 1954 च्या नेहरू आणि चाऊ येन लाय यांच्यातील पंचशील कराराची आठवण झाली आणि 21 व्या शतकातदेखील याचे महत्त्व किती आहे हे दुसर्‍या शब्दात दोन्ही नेत्यांनी मान्य केले आहे. इंचभर जमिनीसाठी आपल्या 70.8 अब्ज अमेरिकन डॉलर व्यापाराची आहुती देणे हे व्यवहार्य नाही ही नेहरू, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव यांची भूमिका शी जिनपिंग यांना पटवून देण्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरले. ‘पाकिस्तान-चीन आर्थिक मार्गिका’ याभारत-चीन संबंधातील आणखी एका महत्त्वाच्या विषयावर दोन्ही देशांनी ब्रिक्स परिषदेत मौन पाळले असले तरी हे एक प्रकारचे भारताचे राजनैतिक यशच म्हणावे लागेल. ब्रिक्सचे संपूर्ण भवितव्य हे भारत-चीन यांच्या संबंधावर अवलंबून आहे याची पक्की जाण असणार्‍या शी जिनपिंग यांनी डोकलाम आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादासंदर्भात भारताला अनुकूल अशी भूमिका घेऊन जागतिक राजकारणाच्या फेररचनेत ब्रिक्सचे महत्त्व आणि ब्रिक्समध्ये भारताचे महत्त्व अधोरेखित केले.

    मोदी यांनीदेखील शहरीकरण, पायाभूत सुविधा, संशोधन, पर्यटन, ऊर्जा आणि पर्यावरण यासारख्या अपारंपरिक म्हणजेच लष्करीविरहित मुद्द्यांकडे लक्ष वेधून ब्रिक्स आणि भारत-चीन संबंध कसे अधिकाधिक लोकाभिमुख करता येतील यावर प्रामुख्याने भर दिला आहे. भारत-पाकिस्तान संबंधांमुळे ज्या पद्धतीने सार्कची वाताहत झाली त्याचाच पुढचा अध्याय ब्रिक्समध्ये लिहिला गेला असता. सुदैवाने हा धोका टळला आहे. त्याचे श्रेय हे निश्चितच मोदी आणि जिनपिंग यांना दिले पाहिजे.

     जागतिक लोकसंख्येत 36.41 टक्के वाटा असणारे भारत आणि चीन, प्रसंगी स्वतःमधील मतभेद बाजूला ठेवून बदललेल्या जगाचे नेतृत्व करण्यास आम्ही तयार आहोत, हा संदेश जागतिक समुदायापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले आहेत. जागतिक राजकारणाच्या फेररचनेची याहून आश्वासक सुरुवात ती कोणती, तीदेखील ब्रिक्सच्या व्यासपीठावरून.

- रोहन चौधरी, लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधक विद्यार्थी आहेत

८ सप्टेंबर २०१७

1993 खटल्याचा दुसरा टप्पा

    मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील दुसर्‍या टप्प्याचा निकाल तब्बल 24 वर्षांनी लागला. आरोपी फिरोज खान व ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या या दोघांना विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेम व करीमुल्ला खान या दोघांना जन्मठेपेची तर रियाज अहमद सिद्दिकीला 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

   अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला खान यांना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी टाडा तसेच भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल व शस्त्रास्त्रे कायद्यांतर्गत न्यायाधीश जी. ए. सानप यांनी शिक्षा ठोठावली. कय्युमवरील आरोप सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत. त्याची 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली आहे.

    सर्व आरोपींना मिळून 26 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या स्फोटांत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना नुकसान भरपाई म्हणून ही दंडाची रक्कम देण्यात येणार आहे.

मुख्य आरोपी, त्यांची स्फोटातील भूमिका -

      ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या : दाऊद आणि टायगर मेमनचा खास समजल्या जाणाजया ताहीरने बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचा बदला घेण्याचे दाऊद व मेमनच्या मनावर बिंबवले. बॉम्बस्फोटासंदर्भात दुबईत घेण्यात आलेल्या बैठकीत ताहीर उपस्थित होता. भारतात बेकायदा शस्त्रास्त्रांचा कारखाना सुरू करण्यासाठी त्याने पैशांची जमवाजमव केली होती.

फिरोज अब्दुल रशीद खान : मुस्तफा डोसा व त्याचा भाऊ मोहम्मद डोसाचा अतिशय जवळचा. आरडीएक्स, शस्त्रे व स्फोटके दिघी व शेखाडी बंदरावर उतरवण्यापूर्वी मुस्तफाने फिरोजला दुबईहून भारतात पाठवून तेथील कस्टम व पोलीस अधिकार्‍यांना सामान उतरवण्याची वार व वेळ कळवली. अधिकार्‍यांना त्यासाठी लाचही दिली. दुबईत झालेल्या बैठकीतही उपस्थित होता.

करीमुल्ला शेख : करीमुल्ला शेखने त्याच्या मित्राला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठविले. त्यानंतर त्याला मुंबईत शस्त्रे आणि आरडीएक्स आणण्यासाठी मदत केली. मुख्य सूत्रधार व फरारी आरोपी टायगर मेमनबरोबर खानने काम केले आहे.

मुस्तफा डोसा : बॉम्बस्फोटांसाठी चार पथके होती. त्यातील एकाचा मुस्तफा डोसा प्रमुख होता. शस्त्रे, आरडीएक्स, एके-56, हँड ग्रेनेड, डिटोनेटर्स इत्यादींचे स्मगलिंग केले. डोसाने टायगर मेमन व छोटा शकीलच्या मदतीने पाकिस्तान व भारतात तरुणांना शस्त्र चालविण्याचे व स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. पनवेल व दुबईत झालेल्या बैठकांना तो उपस्थित होता.

अबू सालेम : जानेवारी 1993 मध्ये अबू सालेम एका फरार आरोपीसह गुजरातमध्ये भरूचला गेला. तेथून त्याने शस्त्रे, 100 हँड ग्रेनेड आणि काही बंदुकीच्या गोळ्या घेतल्या. मारुती व्हॅनमधून हे सर्व सामान मुंबईत आणले. त्यातील काही शस्त्रे आणि स्फोटके त्याने अभिनेता संजय दत्तच्या घरी ठेवली व दोन दिवसांनी परत घेतली.

रियाझ सिद्दिकी : भरूचवरून मुंबईत सर्व शस्त्रे, स्फोटके पाठवण्यासाठी सालेमला पांढर्‍या मारुती व्हॅनची व्यवस्था करून दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सातवे

    टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकाविला आहे तर, पारंपरिक विद्यापीठांच्या क्रमवारीत ते बनारस हिंदू विद्यापीठ व जाधवपूर विद्यापीठासोबत देशात संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील पहिल्या 6 संस्थांमध्ये बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (आयआयएस्सी) आणि 5 आयआयटी यांचा समावेश आहे.

    ‘टाइम्स हायर एज्युकेशन’ यांच्या वतीने जगभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन केले जाते. त्यानुसार पहिल्या 1000 विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. त्यात प्रामुख्याने अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार, आंतरराष्ट्रीय भान असे निकष पाहिले जातात. हे मानांकन जगभरात प्रतिष्ठेचे मानले जाते. या संस्थेने 2018 साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशातील इतर उच्चशिक्षण संस्था व विद्यापीठांच्या तुलनेत मोठी प्रगती साधली आहे.

      गेल्याच वर्षी ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ने (एनआयआरएफ) जाहीर केलेल्या क्रमवारीत विद्यापीठाचा देशात दहावा क्रमांक आला होता. जाहीर झालेल्या याच मूल्यांकनात देशातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 2016 मध्ये तिसरा, तर 2017 मध्ये दुसरा क्रमांक आला होता. त्यात सुधारणा होऊन आता 2018 साठी विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण मूल्यांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला गेल्या वर्षी 27.5 गुण होते. त्यात वाढ होऊन यावर्षी 30.6 गुण मिळाले आहेत. तसेच, अध्यापन (टिचिंग), उद्योगांसोबतची मिळकत, सायटेशन या निकषांमध्येही विद्यापीठाने या वर्षी प्रगती साधली आहे. अध्यापन, उद्योगांसोबतचे करार आणि सायटेशन या निकषांवरील कामगिरीत विद्यापीठाची सुधारणा.

     देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (आयआयएस्सी) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, रुरकी या 5 ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांचा समावेश आहे. सातव्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह कानपूर, मद्रास, रूरकेला येथील आयआयटी, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, इंडियन स्कूल ऑफ माइन्स यांचा समावेश आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डी. एस. कुलकर्णी यांचा राजीनामा

    प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आहे.  त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची या पदावर नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालकपदी शशांक बी. मुखर्जी यांचीही नेमणूक केली आहे.

     डीएसके समूहातील  डीएसकेडीएल या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पुण्यात झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे मुंबई स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला अधिकृतरित्या कळविण्यात आले. डी. एस. कुलकर्णी अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीत कार्यरत राहणार आहेत. बँकिंग क्षेत्रात 44 वर्षांचा अनुभव असलेल्या शशांक मुखर्जी यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली. त्यासाठी कंपनीच्या वित्त समितीचीही पुनर्रचना करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे.

    कंपनीच्या अध्यक्ष व मुख्य वित्त अधिकारी हेमंती कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने हे पत्र मुंबई स्टॉक एक्स्चेंजला पाठविले आहे. गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे न दिल्याने तसेच कर्मचार्‍यांचे वेतन थकल्याने डीएसके उद्योगसमूह वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

७ सप्टेंबर २०१७

म्यानमारमधील शांतीसाठी सहकार्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    म्यानमारमधील सध्याच्या अशांत परिस्थितीबाबत भारत सर्व काही जाणून आहे. शेजारील राष्ट्र म्हणून दोन्ही देशांनी जमीन आणि सागरी सुरक्षेसाठी परस्पर सहकार्य केले पाहिजे. म्यानमारमध्ये शांती नांदावी, यासाठी भारताचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या म्यानमार दौर्‍यावेळी दिली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर ऑग सॅन स्यू यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारशी भारताचे संबंध भक्कम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले.

      पंतप्रधान मोदी म्हणाले, म्यानमारमधील स्वागताने मी खूप आनंदीत झालो आहे. हा माझ्या घरातीलच कार्यक्रम असल्याचे मला वाटते. म्यानमार हा भारताचा शेजारील देश आहे. यामुळे मित्र राष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. म्यानमारसोबतचे संबंध अधिक भक्कम केले जातील. शेजारील राष्ट्राच्या सुरक्षेसाठीही आम्ही विशेष महत्त्व देत आलो आहोत. त्यामुळे म्यानमारसोबत जमीन व समुद्रातील सुरक्षा यंत्रणा उभारणीवर भर दिला जाणार आहे. सुरक्षा आणि अंतर्गत शांतता यावर भारताकडून म्यानमारला सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. तसेच म्यानमारच्या नागरिकांना निशुल्क व्हिसा दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

’विराट’चा आणखी एक नवा विक्रम

    श्रीलंकेविरूद्ध झालेल्या टी-20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने 82 धावांची खेळी करताना आपल्या नावावर आणखीन एक नवा विक्रम नोंदवला. 1016 धावा करत कोहलीने याबाबतीत न्यूझीलंडच्या ब्रेडॅान मॅक्युलमला मागे टाकले.

      टी-20 मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत मात्र, कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ब्रेडॅान मॅक्युलम (2140 धावा, 71 सामने) आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर श्रीलंकेच्या दिलशानचा (1889 धावा, 80 सामने) नंबर लागतो. कोहली सध्या (1830 धावा) तिसर्‍या स्थानावर असला तरी त्याने फक्त 50 सामन्यांत या धावा जमवल्या आहेत. त्यामुळे कोहली लवकरच सर्वाधिक धावांच्या बाबतीतही अग्रस्थानी पोहचू शकतो.

६ सप्टेंबर २०१७

'ऍटलास मॉथ'

जगातील सर्वांत मोठ्या पतंगांपैकी एक
        जगातील सर्वांत मोठ्या पतंगांपैकी एक असलेले "ऍटलास मॉथ' उद्धर (ता. सुधागड) येथे आढळले. तुषार केळकर यांच्या घरासमोरील झाडावर हा पतंग काही काळ विसावला होता.

     "ऍटलास मॉथ'चा रंग बदामी- तपकिरी व किंचित लालसर असतो. पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात, त्यामुळेच त्याला "ऍटलास पतंग' म्हणतात. याच्या पंखांची लांबी साधारणपणे 11 ते 12 इंच (25 सें.मी.) असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट अवस्थेतच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असल्याने तोंड आणि पचनसंस्थेची गरज भासत नाही. या अल्प कालावधीतच प्रणय करून आपला वारसा (अंडी घालून) मागे ठेवून हे पतंग मरतात.

      अशा नैसर्गिक आश्‍चर्याने भरलेला हा जीव प्रामुख्याने दक्षिण- पूर्व आशियात आढळतो. महाराष्ट्रात भीमाशंकर आणि बोरिवली राष्ट्रीय उद्यान; तसेच इतर काही जंगलांमध्ये "ऍटलास मॉथ' सापडतो.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

      ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची अनोळखी मारेकऱयांनी गोळ्या घालून हत्या केली. 

    लंकेश यांच्या घरी राजराजेश्वरी नगर येथे हा प्रकार घडला.लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार मारेकरी असल्याची माहितीदेखील येते आहे.गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. लंकेश पत्रिके या साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. शिवाय, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा हिरीरीने सहभाग असे. 

५ सप्टेंबर २०१७

ले.जनरल झा

    भारतीय लष्करी अकादमीचे (आयएमए) 48 वे प्रमुख (कमांडंट) म्हणून लेफ्टनंट जनरल संजय कुमार झा यांनी सूत्रे हाती घेतली.

     ले.जनरल झा यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि "आयएमए'चे माजी विद्यार्थी आहेत. 13 डिसेंबर 1980 रोजी 17 व्या शीख रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. राष्ट्रीय रायफल्स बटॅलियन, आसाम रायफल्स आणि ईशान्येकडील माउंटन विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

     उत्कृष्ट कामगिरी व सवेबद्दल झा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

एकाच लढतीत 16 विश्वविक्रम

    पाचव्या आणि शेवटच्या वन-डेत टीम इंडियाने श्रीलंकेचा 6 विकेटने फडशा पाडत 5 लढतींची मालिका 5-0 ने जिंकली. या लढतीत तब्बल 16 विश्वविक्रमांची नोंद झाली. त्यासंदर्भातील ही रोचक आकडेवारी...

*   भारतीय संघाने पाच किंवा त्यापेक्षा जास्त वन-डे लढतीत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईटवॉश देण्याचीही सहावी वेळ आहे. सर्वाधिक व्हाईटवॉश देण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर जमा झाला. 6 पैकी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 3, धोनीच्या नेतृत्वाखाली 2 आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 1 व्हाईटवॉश टीम इंडियाने दिला आहे.

*   मायदेशातील द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेवर पहिल्यांदाच व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. 5 किंवा त्यापेक्षा जास्त लढतीत लंकेला व्हाईटवॉश मिळण्याची ही एकूण तिसरी वेळ आहे.

*   विराट कोहलीने कारकिर्दीतील 30 वे शतक साजरे केले आणि सर्वाधिक शतके ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले.

*   या वर्षातील विराटची सरासरी. 1000 धावा पूर्ण करताना ही सरासरी राखणारा विराट वन-डेतील एकमेव फलंदाज आहे. एकाच वर्षात 1000 धावा ठोकण्याची विराटची ही पाचवी वेळ आहे.

*   गेल्या वर्षभरात विराटने धावांचा पाठलाग करताना 843 धावा ठोकल्या असून 10 वेळा टीम इंडियाने विजय साजरा केला आहे. यात त्याने 4 शतके आणि 4 अर्धशतके ठोकली.

*   5 लढतींच्या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला 3 वेळा व्हाईटवॉश देणारा विराट पहिलाच कर्णधार ठरला आहे.

*   जसप्रित बुमराहने या मालिकेत 15 विकेट घेतल्या. भारत-लंकेदरम्यान 5 लढतींच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाजही तो ठरला आहे.

*   यजमानांना कसोटी आणि वन-डेतही व्हाईटवॉश देणारा भारत जगातील पहिलाच संघ ठरला. लंकेला घरच्या मैदानावर दोन मालिकेत व्हाईटवॉश देण्याची कामगिरी करणाराही भारत पहिलाच.

*   भारतीय संघाने या मालिकेत दोन ‘रिस्ट स्पिनर्स’ खेळवले. भारताच्या 922 लढतीच्या वन-डे इतिहासात पहिल्यांदाच अशा फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

*   भुवनेश्वरकुमारने या लढतीत 5 विकेट घेतल्या. 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट मिळवण्याची भुवनेश्वर कुमारची ही पहिलीच वेळ ठरली. या मालिकेत 3 सामने खेळूनही भुवनेश्वरला एकही विकेट मिळवता आली नव्हती. मात्र, ही कमतरता त्याने अखेरच्या सामन्यात भरून काढली.

*   सलग 2 वन-डेत शतक ठोकण्याची कामगिरी विराटने पाचव्यांदा केली. द. आफ्रिकेच्या ए. बी. डिविलियर्सने अशी कामगिरी 6 वेळा केली आहे.

*   श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीचे हे आठवे शतक ठरले. यासोबत विराटने सचिनच्या श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या शतकांशी बरोबरी केली. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. (ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतके)

*   वयाच्या 28 व्या वर्षीच विराटने वन-डे कारकिर्दीतील शतकाची तिशी पूर्ण केली.

४ सप्टेंबर २०१७

निर्मला सीतारामन संरक्षणमंत्री

    भाजप प्रवक्‍त्या व केंद्रीय मंत्री म्हणून काम करणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या त्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. तसेच, पूर्णवेळ संरक्षणमंत्रिपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला असतील.

    केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार 13 मंत्र्यांच्या शपथविधीने आज झाला. यात निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान या राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. तर अश्‍विनीकुमार चौबे, शिवप्रताप शुक्‍ला, चौधरी वीरेंद्रकुमार, हरदीपसिंग पुरी, अल्फॉन्स कन्नननाथन, अनंतकुमार हेगडे, राजकुमार उर्फ आर. के. सिंह, गजेंद्रसिंह शेखावत आणि सत्यपाल सिंह यांचा राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील बहुतेक सर्व मंत्री या समारंभाला उपस्थित होते. उमा भारती या मात्र अनुपस्थित होत्या.

      निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाचे संरक्षण मंत्रालय येणे ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. 2014 पर्यंत भाजप प्रवक्‍त्या म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्या कणखर बाण्याच्या सीतारामन आता सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा मंत्रिमंडळ संरक्षण समितीच्या (सीसीपीए) सदस्य असतील. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रेल्वेतून अपेक्षेप्रमाणे नारळ मिळाला असून, अरुण जेटलींकडील संरक्षण मंत्रालयाचा भार सीतारामन यांच्या बढतीने हलका झाला आहे. आता ते अर्थमंत्री म्हणून आर्थिक वर्ष फेररचनेच्या मोदींच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. प्रभू यांची गच्छंती व जेटलींकडील संरक्षण मंत्रालयाचा भार कमी करणे याबाबत भाकीत करणारे वृत्त "सकाळ'ने यापूर्वीच दिले होते.

        ज्या इतर तीन राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली, त्यांत धर्मेंद्र प्रधान (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू), मुख्तार अब्बास नक्वी (अल्पसंख्याक विकास) व पीयूष गोयल (रेल्वे) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून निवडून आलेले गोयल यापूर्वी राज्यमंत्र्यांपेक्षा "सीईओ'च्या भूमिकेतच वावरत असल्याची चर्चा बाबूशाहीत होती. मात्र, ग्रामीण भारतात वीज पोचविणे व प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यांच्या कथित यशामुळे त्यांची "बढती'ची प्रतीक्षा संपल्याचे मानले जाते.

        स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर हे मंत्रालय सांभाळणाऱ्या 58 वर्षीय सीतारामन या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. त्यातही पूर्णवेळ संरक्षणमंत्री असलेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. चीन व पाकिस्तानबरोबरची तणातणी वाढल्याच्या काळात त्यांच्याकडे हे पद देऊन मोदींनी आणखी एक धक्का दिल्याचे मानले जाते. भाजप प्रवक्‍त्या असताना इंग्रजीसह दाक्षिणात्य भाषांवरील प्रभुत्व सीतारामन यांच्या उपयोगी पडत असे. एकाच विषयावर त्या किमान पाच भाषांतून बोलत असत. त्यांना उद्योग भवनातून थेट रायसीना हिल्सवर मिळालेली बढती ही प्रचंड मोठी ठरली आहे. प्रकाशझोतात येण्याचे टाळून वाणिज्य व उद्योग खात्यात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या सीतारामन यांनी "मेक इन इंडिया' व "स्टार्ट अप इंडिया'चा डंका अगदी अलीकडच्या चीनमधील ब्रिक्‍स उद्योगमंत्री परिषदेपर्यंत देशविदेशांत वाजविला आहे. याबाबत विरोधकांच्या काही गैरमजुती आहेत; पण त्या लवकरच दूर होतील, असा टोला त्यांनी आनंद शर्मा यांना भर राज्यसभेत लगावला होता.

      आंध्रातील ग्रामीण भागातून आलेल्या सीतारामन या दिल्लीच्या वादग्रस्त "जेएनयू'चेही प्रॉडक्‍ट मानल्या जातात. निवडणुकीच्या राजकारणापेक्षा त्या अरुण जेटली यांच्या "बुद्धिवादी' पंथाच्या व म्हणूनच जेटलींशी विशेष स्नेहभाव असलेल्या आहेत.

      अर्थखात्याची सुप्त आस बाळगणारे गोयल यांना रेल्वे खाते मिळाले आहे. त्यांच्याप्रमाणेच भाजपमध्ये वडिलांचा वारसा चालविणारे धर्मेंद्र प्रधान यांना आहे त्याच पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयात बढती व राजीव रूडींकडील कौशल्य विकास मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे. गोयल यांच्याकडील ऊर्जा खाते माजी गृहसचिव आर. के. सिंह यांच्याकडे व खाण खाते नरेंद्र तोमर यांच्याकडे आले आहे.

      सुरेश प्रभू यांचे रेल्वे खाते मोदींनी अपेक्षेप्रमाणे बदलले आहे. रेल्वे भवनाच्या पाच मजल्यांवर ठाण मांडून बसलेली अजस्र बाबूशाही सुधारणा व पारदर्शकतेचा आग्रह धरणारा मंत्री कसा धुडकावते याचे हे उत्तम उदाहरण मानले जाते. रोडकरी असलेले नितीन गडकरी यांच्याकडे गंगा स्वच्छता हे खाते दिले आहे. गंगेची सफाई व गंगेतून जलवाहतूक सुरू करणे हा प्रचंड मोठा व अतिरिक्त व्याप गडकरींच्या खांद्यावर आला आहे.

'मिसेस इंडिया अर्थ'मध्ये झळकणार प्रा. डॉ. मोनिका मुंदडा

      मिसेस इंडिया अर्थ 2017-18 स्पर्धेसाठी येथील प्रा. डॉ. मोनिका मुंदडा पात्र ठरल्या आहेत. न्यू दिल्ली येथे सहा ऑक्‍टोबरला आयटीसी वेलकम हॉटेल येथे याची अंतीम स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रा. डॉ. श्रीमती मुंदडा यांनी जिल्ह्यातून प्रथम बहुमान पटकावला आहे. यूट्यूब या संकेतस्थळावर त्यांचा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. सोशल मिडियावर त्यांचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

    विवाहित महिलांसाठी मिसेस इंडिया अर्थ ही अनोखी स्पर्धा आहे. केवळ सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्व, गुणवत्ता आणि संस्कृती आदी या प्राधान्यक्रमाने येतात. प्रा. डॉ. मुंदडा यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे. अमळनेर त्यांचे सासर असून, येथील प्रताप महाविद्यालयात त्या संगणक विभागात व्याख्यात्या आहेत. लग्नानंतर त्यांनी बामू विद्यापीठातून त्यांनी एम. फिल. केले असून, पीएचडीही केली आहे. स्पर्धेसाठी त्यांनी संस्थेकडे ऑनलाइन छायाचित्र व अर्ज केला होता. दूरध्वनीवर त्यांची मुलाखत झाली असून, त्या पात्रही ठरल्या आहेत. त्यांचे वडील भिकमचंद मल औरंगाबाद येथे उद्योजक, तर पती प्रशांत राजू मुंदडा येथे कपड्यांचे ख्यातनाम व्यापारी आहेत.

3 सप्टेंबर २०१७

उत्तर कोरियाकडून सहावी अणुचाचणी...

      अमेरिका आणि उर्वरित जागतिक शक्तींच्या धमक्‍यांना भीक न घालणाऱ्या उत्तर कोरियाने सहावी अणु चाचणी घेत हायड्रोजन बॉंबचा स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर जमिनीमध्ये निर्माण झालेली कंपने पाहता हा आतापर्यंतचा सर्वांत शक्तीशाली स्फोट असल्याचे मानले जात आहे. या चाचणीनंतर चीनसह जगभरातील देशांनी उत्तर कोरियाविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.

     चाचणीमुळे अमेरिकेच्या भूमीवर परिणामकारक क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने उत्तर कोरियाने एक पाऊल पुढे टाकले आहे. उत्तर कोरियाने गेल्या वर्षी केलेल्या पाचव्या अणु चाचणीवेळी केलेल्या स्फोटापेक्षा पाच ते सहा पट मोठा आजचा स्फोट होता. या हायड्रोजन बॉंबची क्षमता 50 ते 60 किलोटन असण्याचा अंदाज आहे. उत्तर कोरियाने त्यांच्या सरकारी वाहिनीवर ही चाचणी यशस्वी झाल्याचे प्रसिद्ध केले. "या दोन टप्प्याच्या थर्मोन्यूक्‍लिअर शस्त्रामध्ये अकल्पित ताकद' असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

        नव्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासाठी तयार केलेल्या हायड्रोजन बॉंबची ही चाचणी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या उपस्थितीतच झाल्याचा दावाही या वाहिनीने केला आहे.

      उत्तर कोरियाने चाचणी घेतलेल्या हॅमगॉंग प्रांतामध्ये दुपारी साडे बाराच्या सुमारास 5.7 रिश्‍टर तीव्रतेचा कृत्रिम भूकंप झाल्याचे दक्षिण कोरियाच्या हवामान विभागाने सांगितले. या चाचणीनंतर उत्तर कोरियाचा एकमेव मित्रदेश असलेल्या चीननेही तीव्र नाराजी व्यक्त केली असून कट्टर शत्रू असलेल्या दक्षिण कोरियाने सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली असून अमेरिकेबरोबर याबाबत चर्चा सुरु केली आहे. आजचा स्फोट हा हायड्रोजन बॉंबचा असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला असला तरी तज्ज्ञांनी तसा निर्वाळा अद्याप दिलेला नाही.

      या चाचणीनंतर कोणताही किरणोत्सर्ग झाला नाही. मात्र, उत्तर कोरियाच्या अत्यंत गोपनीय अणु कार्यक्रमाची माहिती मिळविणे अत्यंत अवघड असल्याने या चाचणीची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न होत आहे.

सुरेश प्रभूंचा राजीनामा; पियुष गोयल रेल्वेमंत्री

     मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाचा कार्यक्रम दिल्लीत पार पडल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, कॅबिनेटमंत्रीपदी बढती मिळालेल्या पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रीपद देण्यात आले आहे.

    राष्ट्रपती भवनामध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.सुरेश प्रभूंच्या कामगिरीवर स्वत: मोदी नाराज होते. नुकतेच दोन अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रभू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मोदींकडे दिला होता. त्यावेळी हा राजीनामा मोदींनी स्वीकारला नव्हता. नव्या चेहऱ्यांना मंत्री करण्यात आल्यानंतर प्रभू यांनी आपला राजीनामा दिला.

२ सप्टेंबर २०१७

शिरीष पै यांचे मुंबईत निधन

       ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै (वय 88) यांचे  वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. शिरीष पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. 

     शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. 

शिरीष पै यांचा परिचय... 

 • जन्म : 15 नोव्हेंबर 1929 
 • शिक्षण : बी.ए. एल. एल. बी. 
 • कवितासंग्रह - कस्तुरी, एकतारी, आईची गाणी, एका पावसाळ्यात, ध्रुवा, गायवाट, हायकू, ऋतुचित्र, विराग. 
 • कथासंग्रह - चैत्रपालवी, सुखस्वप्न, मयूरपंख, मंगळसूत्र, हापूसचे आंबे, खडकचाफा, कांचनबहार, संधि प्रकाश, लव्हली, लग्न, जुनून, ह्रदयरंग, प्रणयगंध. 
 • कादंबरी - माझे नाव आराम, लालन बैरागीण, हेही दिवस जातील. 
 • ललितलेखसंग्रह - आतला आवाज, आजचा दिवस. 
 • व्यक्तिचित्र - पपा, प्रियजन, वडिलांच्या सेवेसी. 
 • नाटक - हा खेळ सावल्यांचा, कळी एकदा फुलली होती, झपाटलेली. 
 • वृत्तपत्रलेखन - पुस्तक परीक्षणे, मुलाखती, वाड्‌मयीन, अग्रलेख. 
 • संपादन - 'नवयुग' साप्ताहिक (1956 ते 1960), दैनिक 'मराठा' वाड्‌मयीन पुरवणी (1961 ते 1969), दैनिक 'मराठा' (1969 ते 1976). 
 • सन्मान - 'एका पावसाळ्यात' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचे 'केशवसुत' पारितोषिक, 'हायकू' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक

कोकणच्या गड-किल्ल्यांना जगाच्या नकाशावर स्थान

     कोकणच्या इतिहासाचे साक्षीदार आणि वास्तुकलेचे वैभव असलेले गड आणि जलदुर्ग जगाच्या नकाशावर येणार आहेत. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय "एअरबीएनबी' कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे पर्यटनवाढीबरोबरच स्थानिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये कोकणासह राज्यातील 350 हून अधिक गड- किल्ल्यांचा विकास होणार आहे. 

      काही मोजके गड, सागरी किल्ले सोडले, तर इतिहासाच्या या ठेव्याकडे गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष झाले; मात्र महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) हा ठेवा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यासाठी "एअरबीएनबी' कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी गड- किल्ल्यांची ख्याती जगभर पोचवणार आहे. देशाचा इतिहास सांगणारे, हे भांडार जागतिक स्तरावर खुले होईल. एअरबीएनबी कंपनी जगभरातील विविध देशांमधील ऐतिहासिक किल्ले, तसेच महत्त्वाचा ठेवा असलेल्या वास्तू ऑनलाइन पद्धतीने पर्यटकांसाठी उपलब्ध करून देते. स्थानिक प्रशासनाबरोबर करार करून पर्यटनवाढीसाठीही प्रयत्न करते. 

       पर्यटनवाढीबरोबरच "बेड आणि ब्रेकफास्ट'द्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. स्थानिक रहिवाशांना त्यासाठी "एमटीडीसी'कडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. एमटीडीसीशी जोडल्या गेलेल्यांना पहिल्या टप्प्यात "एअरबीएनबी' कंपनी प्रशिक्षण देणार आहे. 

१ सप्टेंबर २०१७

सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त

     केंद्र सरकारने  प्रशासकीय सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करताना विविध विभागांमध्ये सुमारे 17 अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या. निवडणूक आयुक्तपदी माजी प्रशासक सुनील अरोरा, महालेखा नियंत्रक (कॅग) म्हणून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची, तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदी अनिता करवाल यांची नियुक्ती करण्यात आली.

     कायदा मंत्रालयाने अरोरा यांच्या नियुक्तीची माहिती दिली. नसीम झैदी जुलैमध्ये निवृत्त झाल्यानंतर निवडणूक आयुक्तांचे पद रिक्त होते. अचल कुमार जोती हे मुख्य निवडणूक आयुक्त असून, ओम प्रकाश रावत हे अन्य निवडणूक आयुक्त आहेत. अरोरा यांनी यापूर्वी माहिती आणि नभोवाणी सचिव तसेच कौशल्य विकास मंत्रालयातही सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी अर्थ, वस्त्रोद्योग आणि नियोजन मंडळासारख्या मंत्रालये अणि विभागातही सेवा बजावली आहे.

     महर्षी यांचा गृह सचिवपदाचा कार्यकाळ आजच संपत होता. त्यांची आता नवे कॅग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, अन्य नियुक्‍त्यांमध्ये अर्थ सेवा विभागाच्या सचिवपदी वरिष्ठ प्रशासक राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच निवृत्त झालेल्या अंजुली छिब दुग्गल यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. राजेश कुमार चतुर्वेदी यांच्या जागी अनिता करवाल यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राजेश कुमार आता राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळतील. प्रदीप कुमार त्रिपाठी हे मनुष्यबळ मंत्रालयातील नवे आस्थापना अधिकारी आणि अतिरिक्त सचिव असतील. अवजड उद्योग विभागाच्या सचिवपदी अशा राम सिहाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या कॅबिनेट सचिवालयात सचिव (समन्वय) म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या जागी वाणिज्य मंत्रालयातील अतिरिक्त सचिव इंदरजित सिंह यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी एन. बैजंद्रकुमार यांची नियुक्ती झाली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रामेश्‍वर प्रसाद गुप्ता हे निती आयोगाचे अतिरिक्त सचिव असतील. ते सध्या नॅशनल वक्‍फ विकास महामंडळ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सत्यजीत राजन हे पर्यटन विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहतील. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अली रझा रिझवी हे माहिती आणि नभोवाणी मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागारपदाची जबाबदारी सांभाळतील.

ओटिस गिब्सन दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक

      दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून ओटिस गिब्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज गिब्सन सध्या विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने गिब्सन यांना करार अर्धवट सोडण्यास परवानगी दिली आहे. गिब्सन यापूर्वी २०१९० ते २०१४ कालावधीत विंडीजचे प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडीजने २०१२ मध्ये टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. गेली चार वर्षे रसेल डोमिंगो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक होते. मात्र, त्यांनी आपला करार वाढविण्यास नकार दिल्यामुळे दक्षिण आफ्रिका नव्या प्रशिक्षकाच्या शोधात होते.