Menu

Study Circle

३१ ऑक्टोबर २०१७

भारताच्या हीना सिध्दूला कॉमनवेल्थ शूटिंगमध्ये सुवर्ण

      भारताची शूटर हीना सिध्दूने ब्रिसबेन येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ शूटिंग स्पर्धेमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिने ६२६.२ गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याच स्पर्धेत पुरुषांच्या १० मी. एअर रायफल प्रकारात दीपक कुमारला कांस्य पदक मिळवले. 

     हीना सिध्दूने काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या  फेडरेशन विश्वचषक शूटींग स्पर्धेत जितू राय बरोबर १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात देखील सुवर्णपदक मिळवले होते.

३० ऑक्टोबर २०१७

कॅटेलोनिया झाला नवा देश

      प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर कॅटेलोनिया स्पेनपासून स्वतंत्र होऊन वेगळा देश झाला आहे. कॅटेलोनियाच्या संसदेत मतदान झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. स्वतंत्र होण्याच्या बाजूने 70, तर विरोधात फक्त 10 मते पडली. विशेष म्हणजे कॅटेलोनियावर नियंत्रण कायम ठेवण्यासाठी स्पेनच्या संसदेतही शुक्रवारीच मतदान होणार होते. मात्र, त्याआधीच कॅटेलोनियाच्या संसदेने स्वतंत्र होण्यावर शिक्कामोर्तब केले. 75 लाख लोकसंख्या असलेल्या कॅटेलोनियाची राजधानी बार्सिलोना आहे. या ठिकाणी संसदेच्या बाहेर हजारो नागरिक जमा झाले होते. बाहेर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रिनवर स्वतंत्र होण्याचा प्रस्ताव पास होताच तुफानी जल्लोष करण्यात आला. 

      कॅटेलोनियात 2015 साली झालेल्या निवडणुकांमध्ये स्वतंत्रतावाद्यांचा विजय झाला होता. त्यानंतर जनमत घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले. स्पेनच्या सरकारने जनमत चाचणी फेटाळून लावल्याने गेल्या दोन वर्षांपासून येथे मोठा तणाव होता. स्पेनच्या पोलिसांनी कॅटेलोनियातील अनेक अधिकार्‍यांना तुरुंगातही डांबले होते. जनमत चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. 90 टक्के लोकांचा स्वतंत्र होण्याकडे कल आहे, असे घोषित करण्यात आले. स्पेनच्या न्यायालयाने मात्र ही जनमत चाचणी अवैध घोषित केली होती.

सोमालियाच्या राजधानीत बॉम्बस्फोट

     सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये किमान 14 लोकांच्या मृत्यू झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मोगादिशूमध्ये झालेल्या एका मोठ्या बाँबस्फोटात तब्बल 350 लोक मारले गेले होते.

    राजधानीत एका हॉटेल परिसरातील कारमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. यानंतर  वीस मिनिटांनी तिथल्या जुन्या संसद भवनाजवळ आणखी एक बॉम्बस्फोट झाला.
या स्फोटांमध्ये किमान 14 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. हा बॉम्बस्फोट इतका शक्तिशाली होता की, त्यानं भव्य दरवाजा पूर्ण उखडला गेला.

२९ ऑक्टोबर २०१७

विराटच्या विक्रमी ९ हजार धावा

      भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी खणखणीत शतके ठोकली असून या दोघांच्या द्विशतकी भागिदारीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडपुढे विजयासाठी ३३८ धावांचे आव्हान ठेवले आहे. विराट कोहलीने या सामन्यात ३२व्या शतकाबरोबरच वन-डेत वैयक्तिक ९ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी किमया करणारा तो सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी डावांत विराटने ९ हजार धावा पूर्ण करून नवा विक्रम नोंदवला आहे.

    विराटने ३७व्या षटकात ग्रँडहोमला चौकार ठोकून ९ हजार धावांचा टप्पा ओलांडला. विराट आपल्या कारकीर्दीतील २०२वा वन-डे सामना खेळत असून १९४ डावांमध्ये त्याने ९ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

    कोहलीआधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्यावर्षी ९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन या दिग्गज फलंदाजांची नावे या यादीत असून त्यात आता विराटही विराजमान झाला आहे.

अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाला ‘अ’ प्लस दर्जा

       प्रताप महाविद्यालयाला ‘नॅक’ समिती बंगळुरूने अ प्लस दर्जा प्रदान केला असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत हा दर्जा मिळवणारे ते पहिले महाविद्यालय ठरले आहे. महाविद्यालयाला गतवैभव प्राप्त झाले असून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, शैक्षणिक साधने , विद्याथ्र्यांना पुरवल्या जाणा:या सुविधा आदींबाबत महाविद्यालय अग्रेसर ठरले आहे. याच मुद्यांवर आधारित नॅक समितीने 28 व 29 सप्टेंबर रोजी तिस:या फेरीच्या मूल्यांकनासाठी पाहणी केली होती . भारत सरकारच्या ‘नॅक’ या बंगळुरू स्थीत स्वायत्त संस्थेमार्फत महाविद्यालयांचे मूल्यांकन केले जाते. या समितीत ओरिसातील बेहरामपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी . एस. साहू, थिरुअनंतपुरमच्या अकॅडमीक स्टाफ कॉलेजचे संचालक डॉ. सुधीर एस. व्ही. , बिहार येथील मुजफ्फरपूरच्या एम. एम. डी. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. ममता राणी यांचा समावेश होता. समितीने प्रतापला 4 पैकी सीजीपीए 3.52 गुण दिल्याने प्रतापला ‘अ’ प्लस दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे . या यशासाठी कार्याध्यक्ष गोविंद मुंदडा, विनोद पाटील , संचालक डॉ . बी. एस. पाटील, बजरंग अग्रवाल, डॉ संदेश गुजराथी, मोहन सातपुते, जोतेंद्र जैन, कल्याण पाटील, चिटणीस प्रा . पराग पाटील, प्राचार्या डॉ. ज्योती राणे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. जयेश गुजराथी यांचे सहकार्य लाभले. या यशामुळे सर्वस्तरातून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘अ ’ प्लस दर्जा मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्रतापला संशोधन व गुणवत्ता वाढीसाठी अधिक अनुदान मिळणार आहे . तसेच जादाच्या कोर्सेसला ही मान्यता मिळेल, त्यामुळे अनेक विद्याथ्र्यांची सोय होणार आहे.

२८ ऑक्टोबर २०१७

सिंधू उपांत्य फेरीत

       भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीतून उपांत्य फेरी गाठली.

     उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चीनच्या युफेइ चेनवर २१-१४, २१-१४ अशी मात केली. ४१ मिनिटे ही लढत चालली. जागतिक क्रमवारीत सिंधू दुसऱ्या, तर चेन दहाव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी या दोघी चार वेळा आमनेसामने आल्या होत्या. त्यात दोघींनीही प्रत्येकी दोनदा बाजी मारली होती. नुकत्याच झालेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेत चेनने सिंधूला हरविले होते. ‘त्या’ पराभवाचे उट्टे काढून सिंधू उपांत्य फेरी गाठण्यासाठी उत्सुक होती. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला सिंधूने ११-६ अशी आघाडी मिळविली होती. ब्रेकनंतर चेनने झुंज दिली. मात्र, अखेरपर्यंत आघाडी कायम राखत सिंधूने पहिल्या गेममध्ये बाजी मारली.

    दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला चेनने ६-५ अशी निसटती आघाडी मिळविली होती. त्या वेळी सलग चार पॉइंट घेत सिंधूने आघाडी घेतली. त्यानंतर अखेरपर्यंत आघाडी कायम राखत सिंधूने विजयावर शिक्कामोर्तब केले.

२७ ऑक्टोबर २०१७

वय वर्षे अकरा,वजन 190 किलो!

       अकरा वर्षांचा मुलगा आणि वजन तब्बल 190 किलो! इंडोनेशियात सध्या हे चित्र पाहायला मिळत आहे. हा जगातील सर्वात लठ्ठ मुलगा आहे. त्याचे नाव आयरा सोमांत्री. पाच माणसांचे जेवण तो एकटाच फस्त करतो. त्याच्या खाण्या-पिण्यावरील खर्चामुळे आता त्याचे आई-वडील कंगाल झाले आहेत!

      बेसुमार वजनामुळे आयराला बसून उठण्यात आणि चालण्यातही अडचण येते. त्यामुळे बराच काळ तो एकाच जागी बसलेला किंवा निजलेला असतो. घरात त्याची देखभाल करण्यासाठी दोन-तीनजण आजूबाजूला असतात. त्याची भूकही मोठीच आहे आणि जेवण देण्यास थोडा जरी वेळ लागला तरी तो ओरडू लागतो. तो केवळ दिवसाच पाच माणसांचे जेवण जेवतो, असे नाही. अनेक वेळा रात्रीही त्याला भूक लागते आणि त्यावेळीही तो काहीबाही खात असतो. मात्र, आता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या हालचाली वाढवण्यात आल्या असून, त्याच्या आहारावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. बेसुमार खाणे व अनियंत्रित वजनाने त्याच्या जीवाला धोका आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर त्याचे कुटुंबीयही आता त्याला व्यायाम करण्यास आणि कमी खाण्यास प्रोत्साहित करीत आहेत.

अधिकारी ब्रदर्सचे गौतम अधिकारी यांचे निधन

      टीव्ही क्षेत्रातील दिग्गज आणि 'अधिकारी ब्रदर्स'चे गौतम अधिकारी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गौतम अधिकारी हे टीव्ही क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे निधन झाले.गौतम अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रवी आणि मुलगी उर्वी आहेत.

      गौतम अधिकारी यांनी मराठी टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शनामध्ये रेकॉर्ड केला. सर्वाधिक एपिसोड्सचं दिग्दर्शन करण्याचा विक्रम गौतम अधिकारी यांनी रचला आहे.  यामुळे त्यांचं नावदेखील ‘लिम्का बुक’मध्ये नोदवलं गेले. शिवाय, मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या हिंदीतील सब टीव्ही या चॅनेलची स्थापना गौतम आणि त्यांचे भाऊ मार्कंड अधिकारी यांनी केली.

२६ ऑक्टोबर २०१७

नागरिकत्व मिळवणारा जगातील पहिला रोबो

      एका रोबोला नागरिकत्व बहाल करणारा सौदी अरेबिया जगातील पहिला देश ठरला आहे. ‘सोफीया दी हयुमनोईड’ असे या रोबोचे नाव असून ब्रिटीश अभिनेत्री ऑड्रे हेपबर्नसारखे रुप देण्यात आले आहे. रोबो तंत्रज्ञानात जास्ती जास्त गुंतवणुक केली जावी यासाठी नागरिकत्व देण्यात आल्याचे सौदीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. हाँगकाँग येथील हानसन रॉबोटिकने हा रोबो तयार केला असून मानवासारखे रोबो तयार करण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. 

     ‘सोफीया’ ला पहिल्यांदा एका टीव्ही शोमधून लोकांसमोर सादर करण्यात आले. यावेळी सोफियाने हसून आणि रडून देखील दाखवले. ‘मला माणसांसमवेत काम करायचेअसल्याने भावना व्यक्त करणे अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे मी विश्वास जिंकू शकेन, असे सोफियाने म्हटले आहे. 

     आपल्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर  करून मानवी आयुष्य सुखद करणार असल्याचेही सांगून सोफियाने मने जिंकली. रोबो आता मानवाला गुलाम बनवू शकतील का? असा प्रश्नही सोफिला विचारण्यात आला. ‘तुम्ही हॉलीवूड चित्रपट खूप बघता’ असे मिश्कील उत्तर सोफीयाने दिले.

जगातील पहिले तरंगते शहर

      सध्याच्या काळात लोकांच्या करमणुकीसाठी अनेक साधने निर्माण झालेली आहेत. सहलीसाठीही अनेक मार्ग व त्यामधील सुखसोयी लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. आता जर तुम्हाला एकाच जागी राहायचा कंटाळा आला असेल व जगभर प्रवास करण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी ‘फ्लोटिंग सिटी’ हा अगदी योग्य पर्याय आहे. फ्लोरिडातील ‘फ्रीडम शिप इंटरनॅशनल’ या कंपनीने असं जहाज बनविण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कंपनीने संगणकाच्या मदतीने त्याचे संकल्पचित्रही तयार केले आहे.

      हे फ्रीडम शिप पंचवीस मजली असून, त्यात कॅसिनो, आर्ट गॅलरी, पार्क, शॉपिंग सेंटर, हॉस्पिटल, शाळा असं सगळं काही आहे. येथे पन्नास हजार लोक कायमस्वरूपी राहू शकतील. त्याशिवाय, वीस हजार खलाशी, तीस हजार व्हिसिटर्स आणि दहा हजार पाहुणे येथे राहू शकतील. यात सौर ऊर्जा व पवन ऊर्जेचा उपयोग केला जाईल. जहाजाच्या छतावर विमानतळसुद्धा असेल. एकावेळी 40 प्रवाशांना घेऊन खासगी आणि व्यावसायिक विमाने येथून उड्डाण करू शकतील. हे जहाज अमेरिकेच्या समुद्रातून प्रवासाला सुरवात करेल आणि जगभर प्रवास करून दोन वर्षांनी परतेल. कंपनीचे संचालक रॉजर गूच म्हणाले, फ्रीडम शिप हे ‘पहिले तरंगते शहर’ आणि आजपर्यंतचे सर्वांत मोठे जहाज असेल. यासाठी अंदाजे 10 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे.

२५ ऑक्टोबर २०१७

जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा प्रकल्प 'उजनी'वर

    सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांसाठी वरदान असलेल्या उजनी धरणावर सुमारे एक हजार मेगावॅट क्षमतेचा जगातील सर्वात मोठा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. चेन्नईमधील टेकफेडरल या कंपनीने हे आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.

   भीमा नदीवर उजनी गावात हे दगडी धरण आहे. सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त गावांतील शेतीला या धरणातून पाणी दिले जाते. या धरणातील पाणी सोलापूर महानगरपालिकेसह उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, करमाळा, इंदापूर, बारामती या सहा नगरपालिका आणि 39 गावांना पिण्यासाठी दिले जाते. तसेच आदिनाथ-भाळवणी, मकाई-भिलारवाडी, विठ्ठलराव शिंदे, कर्मयोगी-बिजवडी या साखर कारखान्यांसह बारामती, लोणी-देवकर, टेंभुर्णी या एमआयडीसी व इतर खासगी कंपन्यांना पाणी उपलब्ध करून दिले जाते.

      शिवाय पक्षी पर्यटन, जलवाहतूक व स्थानिक मच्छीमार मासेमारीसाठी या धरणाचा वापर करतात. मात्र, क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या या धरणातील पाण्याची बाष्पीभवनाव्दारे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यावर उपाय म्हणून या धरणावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची संकल्पना टेकफेडरल या कंपनीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मांडली आहे. या प्रकल्पामध्ये टेकफेडरल ही कंपनीच ६३०० कोटी रुपयांची (शंभर टक्के) गुंतवणुक करणार आहे. त्यातून एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती, पुढील २५ वर्षे ५ हजार व्यक्तींना नोकर्‍या व सौरपॅनलच्या आच्छादनामुळे प्रतिवर्षी एक टीएमसी पाणी बचत होणार आहे.

     इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर जमीन संपादन करावी लागेल. मात्र, टेकफेडरलने धरणावर प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविल्यामुळे जमीन आणि मोबदला याची मोठी बचत होणार आहे. चार महिन्यांत १०० मेगावॅट यानुसार तीन वर्षांत एक हजार मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प उभा राहू शकतो, असा दावाही या कंपनीने केला आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात या कंपनीने तीन रुपये २५ पैसे युनिट या दराने वीज खरेदीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. 

    तामिळनाडूमध्ये हा दर ३ रुपये ४७ पैसे, कर्नाटक ५ रुपये, आंध्र प्रदेश ५ रुपये १२ पैसे तर महाराष्ट्रात सध्या ३ रुपये ७१ पैसे दराने वीज खरेदी केली जात असल्याचे या कंपनीने सरकारच्या निदर्शनास आणले आहे. मंत्रालयात याबाबत टेकफेडरल या कंपनीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले आहे. त्यामुळे धरणाला बाधा न पोहोचता तसेच मासेमारी व पर्यटनाला अडथळा न आणण्याच्या अटीवर शासन उजनीवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यास परवानगी देण्याच्या विचारात असल्याचे समजते.

ज्येष्ठ उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांचे निधन

     ज्येष्ठ उद्योगपती आणि शिरूरचे माजी नगराध्यक्ष रसिकलाल धारीवाल (वय ७८) यांचे प्रदीर्घ आजाराने  निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शोभा, मुलगा आणि शिरूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाश आणि चार मुली असा परिवार आहे. 

     १ मार्च १९३९ रोजी त्यांचा शिरूर येथे जन्म झाला. धारिवाल कुटुंब दीडशे वर्षांपूर्वी शिरूर येथे स्थायिक झाले. उद्योगव्यवसायात उत्तुंग यश मिळविताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांना सढळ हाताने मदत करणारे दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती. 

       माणिकचंद उद्योगसमुहाचे अध्यक्ष म्हणून त्यांची देश- परदेशात ओळख होती. माणिकचंद गुटख्यासोबत त्यांनी अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. सुमारे ५० देशांत त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होता. रसिकलाल यांच्या लहानपणीच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. आईने मोठ्या हिमतीने त्यांना वाढविले. त्यांच्या वडीलांची शेकडो एकर जमीन होती. मात्र, कमाल जमीन धारणा कायद्यात सर्व जमीन गेली. मात्र, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी स्वत:चे उद्योग साम्राज्य उभारले. सुरूवातीला स्टेशनरीचे दुकान टाकून त्यांनी व्यवसायाला सुरूवात केली. कोणतेही काम करायचे ते एक नंबर व्हावे, असा त्यांचा सुरूवातीपासूनचा आग्रह असे. त्यामुळे सहा महिन्यांतच शिरूर येथे प्रथम क्रमांकाचे दुकान झाले. त्यानंतर त्यांनी तंबाखुच्या व्यवसायाला सुरूवात केली. ते सायकलवरून सर्वत्र फिरत असत. यातूनच माणिकचंद पानमसाला, गुटखा ही उत्पादने सुरू झाली. ‘उंचे लोग, उंची पसंद’ या घोषवाक्याने त्यांच्या पानमसाल्याने माणिकचंद उद्योगसमुहाचे भविष्यच बदलून गेले. त्यांचा व्यवसाय परदेशातही विस्तारला. त्यानंतर त्यांनी आॅक्सीरिच मिनरल वॉटर, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेससारख्या अनेक उद्योगांची पायाभरणी केली.

जेष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे निधन

     ठुमरी गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. गिरिजा देवी यांना कोलकातातील बी. एम. बिर्ला नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

     गिरिजा देवी बनारस आणि सेनिया घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. ठुमरी गायन प्रकारावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळेच 'ठुमरीची राणी' अशीही त्यांची ओळख झाली होती.

    गिरिजा देवी यांना १९७२मध्ये पद्मश्री, १९८९मध्ये पद्मभूषण आणि १९८९मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच संगीत नाटक अकादमी फेलोशीपही मिळाली होती.

२४ ऑक्टोबर २०१७

रोनाल्‍डो सर्वोत्तम फुटबॉलपटू

     अर्जेंटीनाच्या लिओनेल मेसीला मागे टाकत पोर्तुगालच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने वर्ष २०१७ मधील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. ३२ वर्षीय रोनाल्डोने ‘फिफा प्लेअर ऑफ द इयर’ या पुरस्कारावर पाचव्यांदा आपली मोहोर उमटवली आहे.  

   गेल्या सत्रात रिअल माद्रिद क्लब संघाने ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद  पटकावले. रोनाल्डोने माद्रीदकडून खेळताना ४८ सामन्यात ४४ गोल केले. 

      रोनाल्डोला या वर्षी मेसी आणि नेमारचे तगडे आव्हान होते. मात्र या दोघांनाही मागे टाकत त्याने सलग दुसर्‍या वर्षी सर्वोत्‍तम फुटबॉलपटूचा पुरस्‍कार पटकावला.

दिनेश उपाध्याय

      आपल्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये व्हावी, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी कोणताही विक्रम करण्याचा अट्टाहास करणारेही अनेक आहेत. आता मुंबईचेच रहिवासी असलेल्या दिनेश उपाध्याय यांनी तोंडात २२ पेटत्या मेणबत्त्या धरून नवीन विक्रम रचला. त्यामुळे त्यांच्या नावाचा समावेश गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे. अर्थात या प्रकाराची नक्‍कल अन्य कुणी करू नये, हे धोकादायक आहे, असे स्वतः त्यांनीच बजावून सांगितले आहे!
      दिनेश व्यवसायाने शिक्षक आहेत आणि याआधी ८९ विश्‍वविक्रम आपल्या नावे जमा असल्याचं ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या नावे ५७ लिम्का बुक ऑफ रेकॉर्डदेखील असल्याचा दावा त्यांनी केला. तोंडात २२ पेटत्या मेणबत्त्या पकडून त्यांनी सगळ्यांना आश्‍चर्यचकीत करून सोडलं. दिनेश यांनी आपला व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला आहे. पण त्याचबरोबर हा धोकादायक स्टंट न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. दिनेश यांना ‘मॅक्सी माऊथ’ या टोपणनावानंही ओळखलं जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून ते योग करत आहे. योगविद्येमुळेच आपण अनेक विश्‍वविक्रम सहज करू शकतो, असं ते सांगतात. यापूर्वी दिनेश यांनी एका मिनिटांत ७४ द्राक्षं खाण्याचा विक्रम केला होता!

२३ ऑक्टोबर २०१७

जलवाहतुकीत ‘रो-रो’ महत्त्वाकांक्षी योजना

     गुजरातमधील महत्त्वाकांक्षी ‘रो-रो’ योजनेचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जलवाहतुकीसाठी असणारी ही योजना देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी योजना असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केले. 

     मोदी यांनी भावनगर जिल्ह्यात घोघा-भरूच आणि दाहेज दरम्यान 615 कोटी रुपयांची ‘रोल ऑन, रोल ऑफ’ (रो-रो) या नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. नव्या संकल्पाबरोबर एक अनमोल भेट घोघाच्या भूमीवरून संपूर्ण भारताला मिळत आहे. हा फक्‍त भारतच नव्हे तर दक्षिण आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

     ते म्हणाले, जी वस्तू रस्ते मार्गाने नेण्यासाठी दीड रुपये खर्च येत होता. तेच साहित्य जल मार्गाने नेण्यासाठी फक्‍त 20 ते 25 पैसे खर्च येईल. विचार करा यामुळे देशाचे किती पेट्रोल आणि डिझेल वाचेल. पर्यावरणाचे नाव पुढे करत ‘रो-रो’ सेवेत अडथळा आणण्यात आले. पण, हा प्रकल्प जनतेच्या हितासाठी नेटाने सुरू केला. 

इस्रो डिसेंबरमध्ये सोडणार ३१ उपग्रह

    समुद्रावरील दिशादर्शक उपग्रह (IRNSS-1H) च्या अयशस्‍वी प्रक्षेपणानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्‍था इस्रो आपल्या आगामी मोहिमेसाठी सज्‍ज आहे. भारताच्या कार्टोसॅट २ सह परदेशातील ३० लघुउपग्रहांचा या मोहिमेत समावेश असणार आहे. डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.

   इस्रो डिसेंबरमधील आपल्या उपग्रह प्रक्षेपण मोहिमेत व्यस्‍त आहे. आमच्या पुढे डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात 'कार्टोसॅट'सह इतर देशांच्या ३० लघुउपग्रहांच्या प्रक्षेपणाचे आव्‍हान आहे, असे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. के सिवन यांनी सांगितले. 

       गत वर्षी तीन स्‍वयंचलित घड्याळे तसेच इतर माहिती पुरवण्याची व्यवस्‍था असलेला समुद्रावरील दिशादर्शक उपग्रह IRNSS-1A ने काम करणे थांबवले आहे. त्याच्या जागी दुसरा उपग्रह लवकरच प्रक्षेपित केला जाईल. हे दोन्‍ही उपग्रह श्रीहरीकोटा येथील पहिल्या लाँच पॅडवरून सोडण्यात येतील. दुसरे लाँच पॅड हे तीन जीएसएलव्‍ही रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी व्यस्‍त आहे.

दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे मुंबईत निधन

      'लीडर', "हम हिंदुस्थानी' आदी चित्रपटांचे दिग्दर्शक राम मुखर्जी (वय 84) यांचे निधन झाले. रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आले; परंतु उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कृष्णा, मलगा राजा, मुलगी व अभिनेत्री राणी मुखर्जी असा परिवार आहे.

   त्यांनी 60 च्या दशकात बनवलेले "लीडर' आणि "हम हिंदुस्थानी' हे चित्रपट चांगलेच चर्चेत आले होते. मुखर्जी यांनी दिलीपकुमार, वैजयंती माला यांना घेऊन "लीडर' बनवला, तर राणी मुखर्जीला इंडस्ट्रीत ब्रेक देणारा "राजा की आयेगी बारात' हा चित्रपट ही त्यांची निर्मिती होती. फिल्मालय स्टुडियोजच्या संस्थापकांपैकी राम मुखर्जी हे एक होते. त्यांनी हिंदीतच नव्हे, तर बंगाली भाषेतही चित्रपटांची निर्मिती केली होती. राणी मुखर्जीचा पहिला बंगाली चित्रपट "बाईर फुल' याची निर्मितीही राम मुखर्जी यांनीच केली होती.

२२ ऑक्टोबर २०१७

मुगुरुझा वर्षातली सर्वोत्तम टेनिसपटू

     स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाची महिला टेनिस संघटनेने (डब्ल्यूटीए) वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. मुगुरुझाने वर्षअखेरीस क्रमवारीत अग्रस्थान मिळविले तर त्याआधी विम्बल्डन स्पर्धाही तिने जिंकली आहे. अग्रमानांकन मिळविणे व विम्बल्डन स्पर्धा जिंकणे असा पराक्रम करणार्‍या अरांत्झा सांचेझ व्हिकारिओन नंतर मुगुरुझा ही स्पेनची दुसरी महिला टेनिसपटू आहे. 

    सेरेना व व्हीनस या विल्यम्स भगिनींवर ग्रँडस्लॅम स्पर्धेत मात करणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. २०१६ मध्‍ये तिने फ्रेंच ओपन स्पर्धेत सेरेनाला हरवून जेतेपद पटकावले. 

    ‘डब्ल्यूटीएचे अग्रस्थान मिळाल्याने एक स्वप्न साकार झाल्‍याचे मुगुरुझाने व्यक्त केले. हे स्पप्न साकार करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली असून या खेळाची तीव्र आवड व पेम यामुळेच ही मजल मारता आली आहे. या दरम्यान चांगल्या क्षणांबरोबर काही कठीण क्षणांचाही मुकाबला करावा लागल्‍याचेही तिने बहुमान स्‍विकारतान म्‍हटले. 

   मार्टिन हिंगीस व चॅन युंग जॅन यांची डब्ल्यूटीएची वर्षातील सर्वोत्तम दुहेरीची जोडी म्हणून निवड करण्यात आली. अमेरिकन ओपनसह या जोडीने वर्षभरात ९ अजिंक्‍ययपदे पटकावली आहेत. 

२१ ऑक्टोबर २०१७

जॉर्ज साँडर्स यांना ‘बुकर पुरस्कार’

     अमेरिकी लेखक जॉर्ज साँडर्स (५८) यांना आपल्या ‘लिंकन इन द बार्को’ कादंबरीसाठी प्रख्यात ‘मॅन बुकर पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार मिळविणारे ते दुसरे अमेरिकी लेखक आहेत. पुरस्कार प्रदान सोहळा लंडनमध्ये पार पडला.

    या पुस्तकामध्ये अब्राहम लिंकन यांच्या अकरा वर्षीय मुलाच्या मृत्यूची कहाणी आहे. ‘हे सर्जनशील लेखन असून, ही कादंबरी विनोदी, बुद्धीवादी आणि हेलावून टाकणारीही आहे’, असे मत परीक्षकांच्या समितीमधील लोला यंग यांनी व्यक्त केले. साँडर्स म्हणाले, ‘हा पुरस्कार म्हणजे बहुमान आहे. आयुष्यभर आपल्या कामातून त्याचा सन्मान करण्याचा मी प्रयत्न करीन.’ आपल्या छोटेखानी भाषणामध्ये साँडर्स यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणांचाही उल्लेख केला.
    या पुरस्कारासाठी साँडर्स यांच्यासह तीन अमेरिकी आणि तीन ब्रिटिश लेखकांना नामांकन मिळाले होते. त्यामध्ये साँडर्स यांनी बाजी मारली. साँडर्स यांनी आतापर्यंत विविध लेखनप्रकार हाताळले आहेत. लघुकथा, निबंध, विस्तृत दंतकथा आणि मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. २००९ मध्ये त्यांना ‘अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट् स अँड लेटर्स’चे अॅकॅडमी अॅवॉर्ड मिळाले आहे.

      हा पुरस्कार १९६९ पासून देण्यात येतो. मात्र, केवळ कॉमनवेल्थ स्टेट्समधील लेखकांसाठीच तो खुला होता. २०१४ मध्ये मात्र इतर इंग्रजीभाषक देशांतील लेखकांसाठी तो खुला करण्यात आला. गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळविणारे पॉल बीटी हे पहिले अमेरिकी लेखक ठरले. त्यांना ‘द सेलआउट’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला.

२० ऑक्टोबर २०१७

सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांचा राजीनामा

     सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी आज, पदाचा राजीनामा दिला आहे.  एका बड्या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर  रणजित कुमार यांनी एका वृत्तवाहिनला प्रतिक्रिया देत, वैयक्तिक कारणांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. पदावर राहिल्यानंतर कुटुंबातील काही महत्त्वाच्या गोष्टींना वेळ देता येत नसल्याचे कारण स्वतः रजणित कुमार यांनी दिले आहे. 


     इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सध्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे सॉलिसिटर जनरल पदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. सद्या मेहता सरकारचे काही खटले हताळत आहे. त्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. तसेच मोदी सरकारला आपले कायदे पंडित बदलण्याची इच्छा असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे रणजित कुमार यांच्या राजीनाम्याच्या घटनेला अनेक पदर असल्याचे स्पष्ट होत आहे.  


      रणजित कुमार यांची जून २०१४ मध्ये सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली होती. गुजरात सरकारचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच सुप्रीम कोर्टात अनेक खटल्यांमध्ये त्यांनी बाजू मांडली होती. त्यात सोहराबुद्दीन शेख खटला देशभर गाजला होता. बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणात  कुमार यांनी बेंगळुरू कोर्टात जयललिता यांची बाजू मांडली होती.

तुषार परब

     डोंबिवली शहरातील स्टार कॉलनीत राहणाºया तुषार परब या तरुणाने २८ सप्टेंबरला हिमालयाच्या पर्वतरांगांत अल्ट्रा रनिंगमध्ये विक्रम केला आहे. १८ तास ५० मिनिटांत त्याने ९२ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार ४०० ते ३ हजार ३०० मीटर उंचीवर सलग अल्ट्रा रनिंग त्याने केले आहे.
    तुषार याने गढवालमधील उत्तर काशी जिल्ह्यातील भटवाडी, बारसू, दयारा, दारवा, दोडीताल, माँझी या विभागांतून १८ तास ५० मिनिटे अल्ट्रा रनिंग केले आहे. डेहराडून ते मसुरीपर्यंत हा रन तुषारने पार केला. तुषारने गढवालच्या बाराहात पर्वतरांगांत विक्रम केला. हा भाग हिमालयाच्या पर्वतरांगांत येतो.
     तुषारने मायक्रोबायोलॉजी या विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तर ‘वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन’ विषयातून ८५ टक्के गुण मिळवून पदवी मिळवली आहे. २०११ पासून तुषार गिर्यारोहणाचे अनेक धाडसी उपक्रम करत आला आहे. शाळेत असताना त्याला मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची आवड होती. गढवालमधील एका मॅरेथॉन स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. तेव्हापासून त्याच्या धाडसाला आणि साहसाला गढवालमधील हिमालयाची पर्वतश्रेणी खुणावत होती. ही पर्वतश्रेणी सर करण्याचा त्याचा मानस होता. गिरीविराज हायकर्स संस्थेतर्फे गिर्यारोहण क्षेत्रात त्याचे येणे झाले. गढवालमध्ये तो यापूर्वी २० पेक्षा जास्त वेळा गेला आहे. तुषारने २४ तासांत १२० किलोमीटर अल्ट्रा रनिंग करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. त्याला ते लक्ष्य गाठता आले नाही. १८ तास ५० मिनिटांत त्याने केवळ ९२ किलोमीटर अंतर कापले आहे. पर्वतरांगांत धुके दाट असल्याने पुढे जाता आले नाही.

१९ ऑक्टोबर २०१७

राहिल पिरजा

     कल्याणच्या राहिल अब्दुल रज्जाक पिरजादे या तरुणाने आॅस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्ड विद्यापीठात व्हाइस चॅन्सलरचा किताब पटकावला. परदेशी उच्च शिक्षणातील सुयशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
     राहिल हा कल्याणच्या भानुसागर टॉकीज परिसरात राहतो. त्याला शिक्षणाची आवड आहे. त्याचे शालेय शिक्षण के. सी. गांधी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले. त्यानंतर, त्याने शेलू येथील जे. बी. आचार्य इंजिनीअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर, त्याला परदेशी शिक्षणासाठी जाण्याची इच्छा होती. त्यास त्याचे वडील अब्दुल रज्जाक पिरजादे यांनी संमती दिली. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी व्हावे, असा मानस कायम मनी ठेवणाºया अब्दुल रज्जाक यांनी राहिलची आॅस्ट्रेलियात शिक्षणाची व्यवस्था केली. त्याच्या शिक्षण व राहण्याचा खर्च एक लाखाच्या आसपास आहे. सगळा शिक्षणाचा भार आईवडिलांवर न टाकता तेथे पार्टटाइम जॉब करून स्वत: पैसे कमावून शिक्षण घ्यायचे, असा चंग त्याने मनाशी बांधला. त्याच्या या मेहनतीला यश आले. क्वीन्सलॅण्ड विद्यापीठात त्याने प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल या विषयात प्रावीण्य मिळवले.
     क्वीन्सलॅण्ड विद्यापीठात या प्रकारचे शिक्षण घेणारे सहा हजार विद्यार्थी आहेत. त्यातून १५ विद्यार्थ्यांना व्हाइस चॅन्सलर किताबासाठी निवडले गेले. त्यापैकी राहिल हा एक आहे. 

रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक

      भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांना तीन महिन्यांसाठी बीसीसीआयने 1 कोटी 20 लाख रुपयांएवढं मानधन देऊ केलं होतं. परंतु आता बीसीसीआय रवी शास्त्रींना वर्षाकाठी 7 कोटींहून अधिक मानधन देत असल्याचं वृत्त CricInfo या वेबसाइटनं दिलं आहे.

     विशेष म्हणजे रवी शास्त्रींना मिळणारं हे मानधन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मानधनापेक्षाही जास्त आहे. विराट कोहली वर्षभरात 6 कोटी 50 लाख रुपये कमवतो. शास्त्रींनंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना वर्षाकाठी 3 कोटी 57 लाख रुपयांहून अधिक मानधन मिळतं.

       शास्त्री यांनी यंदा जुलैमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून पुनरागमन केलं होतं. त्यांना 18 जुलै ते 16 ऑक्टोबर या कालावधीसाठी 1 कोटी 20 लाख 87 हजार 187 रुपयांचे मानधन देण्यात आलं असून, बीसीसीआयने आपल्या संकेतस्थळावरही याची माहिती दिली होती. तसंच भारताबाहेर झालेल्या स्पर्धांचे एकूण मानधन स्वरुपात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 57 लाख 88 हजार 373 रुपयांचे मानधनही देण्यात आले होते. बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक या नात्यानं रवी शास्त्री यांना वर्षाला 7 कोटींहून अधिकचं पॅकेज मिळतंय. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी इतक्याच मानधनाची मागणी केली होती. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं शास्त्रींना वर्षाकाठी 7 कोटींचं पॅकेज देण्याचं ठरवल्याची माहिती समोर आली आहे. शास्त्रींना जास्तीत जास्त साडेसात कोटींपर्यंत मानधन देण्यात येईल, त्यापेक्षा अधिक नसेल, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं स्पष्ट केलं होतं.

१८ ऑक्टोबर २०१७

ब्रिटनमधील सर्वात तरुण कोट्यधीश भारतीय!

      एके काळी ज्या ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले तिथेच आता अनेक भारतीय वंशाचे नागरिक वेगवेगळ्या क्षेत्रात राज्य गाजवत आहेत. आता भारतीय वंशाचा 19 वर्षीय अक्षय रूपारेलिया हा ब्रिटनमध्ये सर्वात तरुण कोट्यधीश ठरला आहे. अक्षय हा एक ऑनलाईन इस्टेट कंपनी चालवतो. ‘डोअरस्टेप डॉट को डॉट यूके’ या अक्षयच्या कंपनीचा  16 महिन्यांत 18 मोठ्या ऑनलाईन कंपन्यांमध्ये समावेश झाला  आहे. तसेच वर्षभरात 1 कोटी 20 लाख रुपयांचे कंपनी मूल्य आहे. 

      अक्षय अभ्यास करण्यासोबतच हा व्यवसायदेखील सांभाळतो. या व्यवसायासाठी त्याने नातेवाईकांकडून सात हजार पौंड उधार घेतले होते. आता त्याच्या कंपनीमध्ये सुमारे 12 लोकं  काम करतात. अक्षयला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे अर्थशास्त्र आणि गणित शिकवण्याचीही ऑफर देण्यात आली होती. मात्र, अक्षय  त्याच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे. अक्षयचे  वडील केअर वर्कर्स आहेत तर त्याची आई बधिर मुलांच्या शाळेत सहायक शिक्षिका म्हणून काम करते.

व्हिएतनाममध्ये सात किलो वजनाच्या बाळाचा जन्म

       व्हिएतनाममध्ये एका महिलेने तब्बल 7.1 किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला आहे. दक्षिण आशियातील कोणत्याही देशात यापूर्वी इतक्या वजनाच्या बाळाचा जन्म झाला नव्हता. 

    त्रान वान कुआन असे या बाळाच्या पित्याचे नाव आहे. त्याने सांगितले, बाळाचे वजन 7.1 किलो आहे, असे डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी आमचा त्यावर विश्‍वासच बसला नाही. प्रसूतीपूर्वी डॉक्टरांनी म्हटले होते की, बाळाचे वजन पाच किलो असू शकते. व्हिएतनाममध्येच 2008 मध्ये एका महिलेने सात किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला होता. आता तिचा विक्रम या मुलाने मोडला आहे. या दाम्पत्याचे हे दुसरे अपत्य आहे. 2013 मध्ये याच महिलेने 4.2 किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला होता. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बुकनुसार जगातील सर्वात वजनदार नवजात बाळ 10.2 किलो वजनाचे होते. इटलीत अवर्सा येथे सन 1955 मध्ये त्याचा जन्म झाला होता.

१७ ऑक्टोबर २०१७

तोंडाने सोफा, सायकल पेलणारा माणूस!

      काही लोकांची क्षमता, शक्ती अनोखीच असते. स्विडनमधील 33 वर्षांचा टॉमी नावाचा माणूसही असाच अनोखा आहे. हा माणूस वजनदार सोफा, सायकल किंवा टेबल आपल्या तोंडाने उचलून पेलू शकतो. अर्थात हे कौशल्य त्याच्या दीर्घकालीन मेहनतीचे फळ आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने असा स्टंट करण्यास सुरुवात केली होती.

      आपल्या या कौशल्यामुळे तो अर्थातच सोशल मीडियात अतिशय लोकप्रिय आहे. कोणतीही वजनदार वस्तू उचलत असताना तो या कृतीचा व्हिडीओ बनवतो आणि तो सोशल मीडियात शेअर करतो. इन्स्टाग्रामवर त्याच्या अशा व्हिडीओ व फोटोंना हजारो लाईक्स मिळतात. केवळ वस्तू उचलणेच नव्हे तर त्यांचे संतुलन साधून उभे राहणे ही कलाही त्याला अवगत आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी खेळता खेळता त्याने पार्कमधील खुर्ची तोंडाने उचलली होती. त्यावेळेपासून त्याला असे स्टंट करण्याचा छंदच जडला. आता तर तो आपल्या चिमुरड्या मुलीला खुर्चीत बसवून ती तोंडाने उचलतो!

पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या

     जगात खळबळ माजवणाऱ्या पनामा पेपर्समध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या महिला पत्रकार डॅफनी कॅरुआना गलिजिया यांची कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली.

      माल्टामध्ये शोधपत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅफनी यांच्या गाडीमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.आपल्या घरातून दक्षिण माल्टा येथे निघाल्या होत्या त्यावेळी ही घटना घडली.

     भ्रष्टाचाराचे अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करणारा ब्लॉग डॅफिनी चालवत होत्या.  त्यांना वन वुमन विकिलीक्स म्हणून ओळखले जात होते.

    हॅफिनी यांच्या हत्येची कोणत्याही गटाने किंवा संघटनेने जबाबदारी घेतली नाही. तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार गेल्या काही दिवसांपासून त्यांना हल्ल्याची भिती वाटत होती. त्यांनी याबाबत १५ दिवसांपुर्वी पोलिसांत तक्रारसुद्धा दिली होती.

१६ ऑक्टोबर २०१७

सोमालियाच्या राजधानीत बॉम्बस्फोट

      सोमालियाची राजधानी असलेल्या मोगदिशू शहरात झालेल्या शक्‍तिशाली बॉम्बस्फोटात 231 जण ठार झाले आणि 200 पेक्षा जास्त जण जखमी झाले. आफ्रिकेतील आजवरचा हा सर्वात मोठा स्फोट आहे. 

    शहरातील गर्दीच्या चौकात एका ट्रकमध्ये हा स्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढली. महत्त्वाची मंत्रालये आणि हॉटेल्स असलेल्या ठिकाणी हा स्फोट झाला. ‘अल कायदा’शी संंंबंधित असलेली शहाब संघटना या स्फोटामागे असावी, अशी माहिती सरकारी प्रवक्त्याने दिली.

     अध्यक्ष महम्मद अब्दुल्ला फरमाजो यांनी या हल्ल्याची निंदा केली असून देशाच्या शत्रूंना आम्ही सोडणार नाही, असे म्हटले आहे.नागरिकांनी पुढे येऊन जखमींना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या घटनेनंतर सोमालियात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

शांघाय ओपनमध्ये शरापोव्हा ‘चॅम्पियन’

   तियानजिन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेच्‍या अंतिम लढतीत रशियाच्या ३० वर्षीय मारिया शरापोव्हाने बेलारुसच्या अर्याना सॅबेलिनेकाला पराभूत करत एकेरीचे विजेतेपद पटकावले. बंदी कालावधीनंतर टेनिस क्षेत्रात पुनरागमन करणार्‍या शरापोव्हाचे हे पहिलेवाहिले जेतेपद आहे. 

  अंतिम लढतीत  पाचवेळ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविणाऱया शरापोव्हाने बेलारुसच्या बिगरमानांकित अर्याना सॅबेलिनेकाला ७-५, ७-६ असे पराभूत केले. या सामन्यात शानदार खेळाचे प्रदर्शन करताना शरापोव्हाने बेलारुसच्या नवोदित अर्यानाला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. ३० वर्षीय शरापोव्हाने १५ महिन्यांच्या बंदीनंतर एप्रिलमध्ये टेनिसकोर्टवर पुनरागमन केले होते. 

     पुनरागमनानंतर पहिलेवाहिले जेतेपद मिळवणार्‍या शरापोव्हाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी जेतेपदाला गवसणी घातली. शरापोव्हाने यापूर्वी म्हणजे २०१५ च्या मे महिन्यात इटालियन खुली महिलांची टेनिस स्पर्धा जिंकली होती.

१५ ऑक्टोबर २०१७

तीन सेकंदात होणार माणसाची ओळख

     अवघ्या तीन सेकंदात माणसाची ओळख करून देणारी जगातील सर्वांत शक्‍तीशाली  फेस रिक्गनिशन’ यंत्रणा चीनने विकसित केली आहे. शंघाय येथील एका सुरक्षा पुरवणार्‍या कंपनीने ही यंत्रणा तयार केली असून देशातील 1.3 अब्ज लोकांची ‘ओळख’ यामुळे चीनकडे तयार होईल. ही यंत्रणा 90 टक्के सुरक्षित असल्याचा दावाही चीनने केला आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास देशातील एकूण एक नागरिकाची ओळख असणारा प्रचंड डेटाबेस चीनकडे तयार होणार आहे.

   2015 पासून या यंत्रणेवर काम सुरु आहे. कॅमेरा  आणि क्‍लाऊड नेटवर्कचे जाळे यासाठी देशभर तयार केले जाईल. सध्या चीन सरकारतर्फेही अशीच योजना सुरु असली तरी त्याचे प्रमाण छोट्या पातळीवर आहे. नव्या यंत्रणेत चीनमधील सर्वच नागरिकांची ओळख तयार केली जाणार असून 13 ट्रेराबाईट्स इतका डेटा त्यासाठी लागणार आहे. देशातील सुरक्षा व्यवस्था आणखी भक्‍कम करण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी नागरिकांचा जो डेटा गोळा होईल त्याचा उपयोग व्यवसायिक वापरासाठी करण्यासही बंदी घातली जाणार आहे. 

१४ ऑक्टोबर २०१७

‘एसजेएकेदार जाधव, स्मृती मानधनाएम’ पुरस्कार

    भारतीय फलंदाज केदार जाधव याच्यासह सांगलीची सुकन्या क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेकडून (एसजेएएम) वर्षाचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय ‘क्रिकेटपटू’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. भारताच्या वरिष्ठ हॉकी संघामध्ये स्थान मिळवणारा पुण्याचा गोलकीपर आकाश चिकटे, नाशिकचा ग्रँडमास्टर विदीत गुजराती या दोघांनाही वर्षातील सर्वोत्तम स्पोर्टसमनचा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. 23 ऑक्टोबरला हा पुरस्कार सोहळा बॉम्बे जिमखाना, मुंबई येथे पार पडणार आहे. मलेशिया येथे भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्या संघामध्ये चिकटे हा होता आणि गुजराती (22) याने 2700 यलो पॉईंट मिळवत चमक दाखवली. विश्‍वनाथन आनंद, पेंटाला हरिकृष्णा आणि कृष्णन शशीकिरण यानंतर इतक्या पॉईंटची कमाई करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

१3 ऑक्टोबर २०१७

सुरक्षित शहरात मुंबई ४५ व्या स्थानी

    प्रचंड गजबलेल्या आणि पायाभूत सुविधांचा वनवा असलेली मुंबई जगातील सर्वाधिक सुरक्षित ६० शहरांमध्ये ४५ व्या स्थानावर आहे. दि इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्सी युनिटने केलेल्या पाहणीत देशाची राजधानी दिल्‍ली ४३ व्या क्रमांकावरआहे. वैयक्‍तिक आणि आरोग्य सुरक्षा यांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या पाहणीत जपानचे टोकियो शहर अव्वल स्थानी राहिले. सिंगापूर दुसर्‍या आणि जपानचेच ओसाका शहर अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. 

   ‘सेफ सिटी इंडेक्स’ मध्ये ६० शहरांना एकूण ४९ वेगवेगळे पॅरामिटर लावण्यात आले. त्यात डिजिटल सुरक्षा, पायाभूत सुरक्षा यांचाही प्रामुख्याने समावेश होता. ही शहरे त्या त्या देशातील आर्थिक केंद्र असून छोटया गावातून रोजगारासाठी मोठया प्रमाणावर लोक येथे येतात. अशा शहरांची निवड पाहणीसाठी करण्यात आली. आर्थिक विकासात योगदान देतांना या शहरांती पायाभूत सुविधाही चांगल्या असणे आवश्यक असते, यादृष्टीने ही पाहणी करण्यात आली. अशा शहरांना दहशतवादी हल्ल्यांचा देखील मोठा धोका असतो. त्यामुळै नागरिकांच्या वैयक्‍तिक सुरक्षेला मोठया प्रमाणावर प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे पाहणीत म्हणले आहे. सेफ सिटी इंडेक्समध्ये पाकमधील कराची शहर सर्वात खाली म्हणजे ६० व्या स्थानावर आहे. या शहरातील एकूणच सुरेक्षबाबत पाहणीत तीव्र चिंता व्यक्‍त केली गेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरक्षित शहरांची यादी प्रसिद्ध केली जाते. 

४ अब्ज 

शहरमध्ये राहणार्‍या लोकांची जगभरातील संख्या ४ अब्जहून अधिक आहे. 

१५ कोटी 

शहरात स्थाईक होणार्‍या लोकांची संख्या गेल्या दोन वर्षांत १५ कोटींनी वाढली आहे.

१२ ऑक्टोबर २०१७

व्हिएतनाममध्ये झालेल्या भूस्खलनात 37 लोकांचा मृत्यू

      उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून झालेल्या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40हून अधिक लोक बेपत्ता झालेत. परंतु बेपत्ता लोकांबद्दल अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पुरामुळे व्हिएतनामचा उत्तर प्रांत प्रभावित झाला आहे.

     व्हिएतनाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्य राबवत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 1000हून जास्त घरं नेस्तनाबूत झालीत. तसेच 6 प्रांत पूर्णतः प्रभावित झालीत. उत्तर आणि मध्य क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती उद्भवली आहे.

आशिष नेहराची निवृत्ती

        भारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहराने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध होणारा ट्‌वेंटी-२० सामना हा नेहराचा शेवटचा सामना असेल.

      हैदराबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेहरा म्हणाला, "घरच्या मैदानावर निवृत्त होण्यासारखी दुसरी मोठी संधी मिळू शकत नाही! निवृत्तीसंदर्भात मी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चा केली होती.'' निवृत्तीनंतर 'आयपीएल'मध्येही खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. 

       नेहराने भारताकडून १७ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २६ टी-२० सामने खेळले आहेत. २००३ साली इग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने २३ धावांत ६ बळी घेतले होते, त्याची ही खेळी सर्व भारतीयांसाठी यादगार होती.

       १९९९ साली त्याने श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये पदार्पण केले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५७, कसोटीत ४४ तर टी-२० मध्ये ३४ विकेट त्याने घेतल्या आहेत. 

११ ऑक्टोबर २०१७

अनुपम खेर 'एफटीआयआय'चे नवे अध्यक्ष

     ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  अभिनेते गजेंद्र चौहान यांना 2015मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यावरून मोठा विरोध झाला होता. त्यांना हटवण्यासाठी या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.

    खेर मावळते अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. चौहान यांची 9 जून 2015 रोजी या पदावर नेमणूक करण्यात आली होती. या नियुक्तीला विरोध करत विद्यार्थ्यांनी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ आंदोलन केले होते.

वीरधवल खाडेला दुसरे सुवर्ण

     तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर आपली पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळणार्‍या कोल्हापूरचा गोल्डनबॉय वीरधवल खाडे याने आपल्या नावलौकीकाला साजेशी कामगिरी केली. भोपाळ येथे सुरु असलेल्या 73 व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्याने सलग दुसरे सुवर्ण पदक पटकाविले. रविवारी त्याने 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक मिळविले होते.

    पाठोपाठ कामगिरीत सातत्य राखत झालेल्या 50 मीटर बटर फ्लाय प्रकारात दुसर्‍या सुवर्ण पदकावर कब्जा केला. या पदकांमुळे वीरधवलच्या राष्ट्रीय पदकांची संख्या 158 इतकी झाली आहे.  50 मीटर बटरफ्लाय ही आपली दुसरी इव्हेंट खेळणार्‍या वीरधवलने 24.78 इतकी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकाविला. 24.80 इतकी वेळ नोंदवत एस.पी. नायर याने द्वितीय तर 24.91 इतकी वेळ नोंदवत अन्शुल कोठारी याने तृतीय क्रमांक पटकाविला. तत्पूर्वी रविवारी झालेल्या 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 23.1 इतकी वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकाविले आहे. अन्शुल कोठारीने 23.3 इतकी वेळ नोंदवत रौप्य तर अरोन डिसुझाने 23.6 इतकी वेळ नोंदवत कांस्य पदक मिळविले. गुडघ्याचे लिगामेंट तुटल्याने दोन वर्षांची विश्रांतीनंतर पुढील वर्षी होणार्‍या एशियन व कॉमनवेल्थ गेम्सची तयारी म्हणून वीरधवल या स्पर्धेत उतरला आहे.

१० ऑक्टोबर २०१७

कॅलिफोर्नियात भीषण आग

      उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जंगलाला लागलेल्‍या भीषण आगीमध्ये दहा जण ठार झाले आहेत. या आगीत सुमारे दीड हजार इमारती जळून खाक झाल्‍या आहेत. तर, २० हजार लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रविवारी रात्री लागलेल्‍या या आगीत ७३ हजार पेक्षा जास्‍त एकर जंगल नष्‍ट झाले असल्‍याचे कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि फायर प्रोटेक्शन विभागाचे उपसंचालक जेनेट अप्टन यांनी सांगितले. 

      या परिसरात असणाऱ्या हिल्‍टन हॉटेलला प्रथम आग लागली. त्‍यानंतर ही आग पसरत जावून ती जवळच असलेल्‍या जंगलाला लागली. आग एवढी भयाणक होती की, रविवारी रात्री आणि सोमवारी दिवभर उत्‍तर कॅलिफोर्निया शहराचा संपूर्ण परिसर धुराच्या खाईत लोटला होता.

महाराष्ट्राला चार ब्राँझ

     71 व्या सीनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तिसर्‍या दिवशी चार ब्राँझपदकांची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये युगा बिरनाळेने 2 मिनिटे 31.24 सेकंद वेळ देत ब्राँझ पटकाविले. या गटात सावित्री मोंडालने सुवर्ण, तर कर्नाटकच्या सुवर्णा भास्करने रौप्य जिंकले. महाराष्ट्राला वैयक्तिक आणखी एक ब्राँझ मिळाले ते तृषा कारखानीसमुळे. तिने 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1 मिनिट 04.83 सेकंद वेळ देत ही कामगिरी केली. हरयाणाच्या दिव्या सतिजाने सुवर्ण जिंकले.

    महिलांच्या 4 बाद 50 मीटर मिश्र रिलेचा सर्व उपस्थितांनी भरपूर आनंद घेतला. त्यात महाराष्ट्राच्या साहील पवार, साध्वी धुरी, युगा बिरनाळे व वीरधवल खाडे यांनी ब्राँझ जिंकले. त्यांनी 1 मिनिट 44.42 सेकंद अशी वेळ दिली. रेल्वेच्या अरन डिसुझा, विराज प्रभू, अवंतिका चव्हाण, अदिती धुमटकर यांनी सुवर्ण पटकाविले. महिलांच्या 4 बाय 200 मीटर फ्रीस्टाइल रिलेत आकांक्षा बुचडे, युगा बिरनाळे, रुतुजा तळेगावकर, साध्वी धुरी यांनी 9 मिनिटे 26.4 सेकंद वेळ देत ब्राँझ जिंकले.

     ऑलिम्पियन जलतरणपटू सजन प्रकाशने या स्पर्धेत 4 सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने स्पर्धेतल्या चौथ्या सुवर्णपदकाची कमाई करताना 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात 53.83 सेकंद अशी सर्वोत्तम वेळ दिली. 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सजन प्रकाश, रेल्वेचा सौरभ सांगवेकर यांच्यात चांगलीच चुरस रंगली. स्पर्धाविक्रम नावावर असलेल्या सौरभला मागे टाकत सजनने 3 मिनिटे 58.53 सेकंदांसह सुवर्ण जिंकले. सौरभने 4 मिनिटे व 0.31 सेकंद अशी वेळ देत रौप्य पटकाविले.

९ ऑक्टोबर २०१७

राष्ट्रीय स्पर्धेत वीरधवलला सुवर्णपदक

      प्रतिनिधी क्रीडानगरी कोल्हापूरचा गोल्डनबॉय असा नावलौकिक असणार्‍या वीरधवल खाडे याने आपल्या कारकिर्दीस साजेशी कामगिरी करत भोपाळ येथे सुरू असणार्‍या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या पदकाबरोबरच आजपर्यंतच्या त्याच्या अवघ्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 157 राष्ट्रीय पदकांची नोंद त्याच्या नावावर झाली आहे. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर पुढील वर्षी होणार्‍या एशियन व कॉमनवेल्थ गेम्सची तयारी म्हणून वीरधवल या स्पर्धेत उतरला आहे.

    अवघ्या 6 महिन्यांच्या सरावानंतर वीरधवलने 50 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 23.1 इतकी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. अन्शुल कोठारीने 23.3 इतकी वेळ नोंदवत रौप्य, तर अरोन डिसुझाने 23.6 इतकी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळविले.

अमेरिकेच्या रिचर्ड ए. थॅलर यांना अर्थशास्त्रातील नोबेल

   द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा  केली.  अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड ए. थॅलर यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्थशास्त्रातील हे ४९वे नोबेल आहे.

    रिचर्ड यांनी व्यवहारवादी अर्थशास्त्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. 

    नोबेल पुरस्कार देण्याची सुरुवात १९०१पासून करण्यात आली. त्यावेळी पाच क्षेत्रातील व्यक्तींना किंवा संस्थांना हे पुरस्कार दिले जात होते. त्यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र यांचा समावेश होता. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात झाली.

८ ऑक्टोबर २०१७

मोहन जोशी यांना विष्णूदास भावे गौरव पदक जाहीर

    मराठी रंगभूमीसह सिने, टीव्हीसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी यंदाचा अत्यंत मानाचा असा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी दिनी 5 नोव्हेंबरला पुस्कार प्रदान केली जाईल. संस्थेचे अध्यक्ष शरद कराळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समिती सांगली शाखेच्यावतीने रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणार्‍या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात येते.

    यंदाचा पुरस्कार रंगभूमीसह चित्रपट आणि मालिकांमध्ये चरित्र भूमिकांसह खलनायक म्हणून गाजलेले प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांना दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व 25 हजार रूपये असे आहे.

     1959 मध्ये बालगंधर्वांना प्रथम पुरस्कार दिला होता. त्यानंतर आजपर्यंत आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावाळकर, अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले. यंदाचे 51 वे वर्ष आहे.

    अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह जनार्धन ताम्हणकर, कोषाध्यक्ष मेधाताई केळकर, सदस्य जगदीश कराळे, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, विलास गुप्ते, भास्कर ताम्हणकर, बीना साखरपे आदी उपस्थित होते.

     यावेळी खास ई सकाळशी बोलताना मोहन जोशी म्हणाले, विष्णूदास भावे पुरस्कार हा अत्यंत मानाचा मानला जातो. अशा पुरस्कारासाठी निवड होण्याची आपली नक्की कुवत आहे की नाही असे मला वाटत राहते. पण हा पुरस्कार हा अल्टिमेट मानला जातो. या पुरस्कारासाठी माझी निवड होणे म्हणजे आजवरच्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते. मी माझ्या सर्व प्रेक्षकांचा, भावे आयोजकांचा आणि हितचिंतकांचा आभारी आहे.

७ ऑक्टोबर २०१७

ICAN संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार

     जगातील अण्विक शस्त्रे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या  "इंटरनॅशनल कँपेन टू अबॉलिश न्यूक्लियर वेपन्स" संघटनेला २०१७मधील शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 'द नॉर्वेजियन नोबेल समिती'ने या पुरस्काराची घोषणा केली. 

     आयसीएएन ही संघटना २००७मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे स्थापन झाली होती. या संघटनेचे मुख्यालय जिनीव्हा येथे आहे.

     'आयसीएएन'ने अण्वस्त्रविरोधात जनजागृतीबद्दल हा  सन्मान केला जात असल्याचे नोबेल  समितीने म्हटले आहे. अण्विक अथवा अन्य शस्त्रांविरोधात काम करणाऱ्या १९ संस्थांना आतापर्यंत शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. 

६ ऑक्टोबर २०१७

स्वच्छ पर्यटन स्थळांना स्वच्छता पुरस्कार देणार

     पर्यटन स्थळांवर पर्यटकांकडून खाऊची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या टाकण्याचे प्रकार होतात. देशातील पर्यटन स्थळांवर स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आपल्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळ स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकार्‍यांवर राहणार आहे. त्यासाठी विविध योजना, सामाजिक कार्यक्रम, लोकसहभागाची मदत घेण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत.

    प्रत्येक राज्यातील दोन पर्यटन स्थळांना स्वच्छ आणि सुंदर पर्यटन स्थळाचा पुरस्कार देण्याचेही केंद्र सरकारने ठरविले आहे. राज्यातील सर्व पर्यटन स्थळे स्वच्छता अभियानाला जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र बर्‍याच वेळा राज्यातील एक-दोन प्रमुख पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा दिसतो. पर्यटकांनी राज्यातील बहुतांश सर्व पर्यटन स्थळे पाहावीत, त्यांना या ठिकाणी सर्व सोयीसुविधा देण्यासोबतच स्वच्छतेचा आनंद मिळवा, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. ‘स्वच्छ भारत‘ योजनेअंतर्गत ही निवड होणार असून, 6 राज्यांतील सर्व जिल्हाधिकार्‍यांना यासाठी केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयासोबत केंद्रीय पर्यावरण खात्याने एकत्रित पत्र पाठविले आहे.

     आंतरराष्ट्रीय पर्यटकांना पर्यटन स्थळाच्या महत्त्वासोबतच स्वच्छताही आवडत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. देशविदेशातील बरीच ठिकाणे केवळ स्वच्छ असल्यानेच पर्यटन स्थळे बनली आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर ही पद्धत राज्यातील पर्यटन स्थळांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगला बनसोडे यांना सर्जनशील कलेसाठीचा पुरस्कार

     भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा सर्जनशील कलेसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर (सातारा) यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाणार आहे.

    केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. यंदा सर्जनशील कलेसाठी मंगला बनसोडे यांचा गौरव केला जाणार आहे. तमाशासारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा सन्मान या पुरस्काराच्या निमित्ताने होत असल्याने अखेर सरकार दरबारी लोककलावंतांची दखल घेतली गेल्याची भावना लोककलावंत व्यक्त करत आहेत.

ब्रिटिश लेखक कॅशुओ इशिग्युरो यांना साहित्याचे नोबेल

     जगातील सर्वोच्च आणि सर्वाधीक सन्मानाचे समजले जाणारे नोबेल पुरस्कार गेले तीन दिवस जाहीर होत आहेत. वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज साहित्याचे नोबेल जाहीर केले. यंदाचे साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दलचे नोबेल ब्रिटिश लेखक कॅशुओ इशिग्युरो यांना जाहीर झाले आहे.

      इशिग्युरो यांचा जन्म जपानमध्ये नागासाकी येथे झाला. त्यांचे कुटुंब 1960 मध्ये इंग्लंडला स्थायिक झाले. अँन आर्टिस्ट आँफ द फ्लोटिंग वर्ल्ड, द रिमेन्स आँफ द डे, व्हेन वुई वेअर आँर्फन्स, नेव्हर लेट मी गो ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.

      2016 मध्ये साहित्याचे नोबेल गायक, गीतकार बाब डिलन यांना जाहीर करुन नोबेल समितीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे यावर्षी हा सन्मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डिलन यांनी अमेरिकन गीतप्रकारामध्ये दिलेल्या योगदानाची नोंद घेत त्यांचा सन्मान केला जात असल्याचे नोबेल समितीने गेल्या वर्षी म्हटले होते.

     27 नोव्हेंबर 1895 रोजी आल्फ्रेड नोबेलने पॅरिसमध्ये त्याच्या शेवटच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली. त्यामध्ये आपण मिळवलेल्या संपत्तीमधून वैद्यकशास्त्र,  साहित्य, रसायनशास्त्र, शांतता आणि पदार्थविज्ञान या क्षेत्रात योगदान देणार्‍या लोकांचा सन्मान करावा असे त्याने लिहून ठेवले होते.

       1901 पासून हे सन्मान देण्यास सुरुवात झाली. आजवर पदार्थविज्ञानाचे 110, रसायनशास्त्राचे 108, वैद्यकशास्त्राचे 107, साहित्याचे 109, शांततेचे 97, अर्थशास्त्राचे 48 नोबेल देण्यात आहेत. यावर्षी जेफ्री सी हाँल, मायकल रोशबॅश, मायकल यंग यांना वैद्यकशास्त्राचे, रेइनर वेईस, बेरी बॅरिश व किप थाँर्न यांना पदार्थविज्ञानाचे तर जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅक, रिचर्ड हेंडरसन यांना रसायनशास्त्राचे नोबेल देण्यात आले.

      रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साली नोबेल पुरस्काराने सन्मानित केले. नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले नागरिक होते. त्याचबरोबर हरगोविंद खुराणा, सी. व्ही. रमण, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, व्ही.एस नायपॉल, सुब्रमण्यन चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन या भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांना नोबेल मिळाले तर भारताशी संबंधित असणार्या रोनाल्ड रॉस, रुडयार्ड किपलिंग आणि दलाई लामा यांचाही नोबेलने सन्मान केलेला आहे.

आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध, पाकिस्तानच्या लष्करानेच दिली कबुली

      गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वतः पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असे पाकिस्तान लष्कराने म्हटले आहे. यासोबतच बंदी घातलेल्या जमात-उद-दावाने पाठिंबा दिलेला राजकीय पक्ष मिल्ली मुस्लिम लीग निवडणूक लढण्यासाठी स्वतंत्र आहे असेही पाकिस्तान लष्कराने स्पष्ट केले.

     मिल्ली मुस्लिम लीगला मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या जमात-उद-दावाने पाठिंबा दिला असून गेल्या महिन्यात पोटनिवडणूक लढण्यासाठी त्यांना परवानगी नाकारली होती. निवडणूक आयोगाने मिल्ली मुस्लिम लीग राजकीय पक्ष असल्याचे अमान्य करत निवडणूक लढण्याची परवानगी दिली नव्हती.

     पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. अमेरिकेच्या संसदेत याबाबत विचारलेल्या प्रश्नाला अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस आणि अमेरिकेच्या परराष्ट्र संबंधातील जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी उत्तर दिले. त्यात त्यांनी आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असून त्यांचे परराष्ट्र धोरण आहे. ते पाकिस्तान सरकारला जुमानत नाहीत असे स्पष्ट केले होते.

     अमेरिकेच्या दाव्यासंबंधी आयएसआयचे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, ’संबंध असणे आणि पाठिंबा असणे यामध्ये फरक आहे. दहशतवाद्यांशी संबंध नसलेल्या एका गुप्तचर यंत्रणेचे नाव सांगा. संबंध सकारात्मकदेखील असू शकतात आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी कुठेही पाठिंबा असल्याचा उल्लेख केलेला नाही’.

      रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना भारताच्या कारवायांमुळे पाकिस्तानची पूर्वेकडील सीमारेषा असुरक्षित असल्याचा दावा केला आहे. भारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे 222 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हा आकडा आत्तापर्यंत झालेल्या कोणत्याही वर्षातील उच्चांक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. ’पण आम्ही दिलेल्या उत्तरामुळे भारतालाही किंमत चुकवावी लागली आहे. पण जर भारत संयमाने वागला नाही तर आम्ही उत्तर देत राहू’, असा इशारा त्यांनी दिला आहे.

     ’आम्ही शांतताप्रिय देश असून आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. पण आम्ही आमचे रक्षण करु शकतो आणि त्यासाठी सक्षम आहोत’, असे आसिफ गफूर बोलले आहेत. ’युद्ध हा पर्याय नसून ते होऊ नये यासाठी आम्ही सर्व पायर्‍यांवर चर्चा करत आहोत’, असे आसिफ गफूर यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्दे -

*   आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असे पाकिस्तान लष्कराने म्हटले आहे.

*   पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते.

*   भारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे 222 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा आयएसआयचे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांचा दावा.

५ ऑक्टोबर २०१७

सौम्या स्वामिनाथन यांची ’डब्ल्यूएचओ’वर निवड

   इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) डॉ. सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (डब्ल्यूएचओ) होणार्‍या कार्यक्रम विभागाच्या उपमहासंचालकपदी नुकतीच निवड केली. बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. स्वामिनाथन 30 वर्षांपासून क्षय आणि एचआयव्हीवर संशोधन कार्यक्रम राबवतात.

४ ऑक्टोबर २०१७

कोविंद यांच्या उपस्थितीत भारत-जिबुतीमध्ये करार

     भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित भारत व जिबुती या दोन देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी जिबुतीचे अध्यक्ष ओमर गुलेह ही उपस्थित होते.

    जिबुती आणि इथिओपिया या दोन देशांच्या 4 दिवसांच्या दौर्‍यासाठी कोविंद यांचे आगमन झाले. राष्ट्रपती झाल्यानंतरचा गोविंद यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. कोविंद यांचे अध्यक्षीय निवासस्थानी गुल्लेह यांनी समारंभपूर्वक स्वागत केले. त्यानंतर कोविंद आणि गुलेह यांच्यात शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी ऑपरेशन राहतच्या काळात जिबुतीने केलेल्या सहकार्याबद्दल कोविंद यांनी गुलेह यांचे आभार मानले.

     2015 मध्ये युद्धग्रस्त येमेनमधून भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी जिबुतीकडून मदत देण्यात मिळाली होती. जिबुतीने आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा गटात (आयएसए) सहभागी होण्याची विनंती कोविंद यांनी केली. जिबुतीला भेट देणारे कोविंद हे पहिलेच भारतीय नेते आहेत. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जिबुतीमध्ये चीनने आपला पहिला देशाबाहेरील लष्करी तळ उभारला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोविंद यांच्या जिबुती दौर्‍याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

'द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस'ने २०१७मधील रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा  केली.  यंदा तिघा शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. जॅक्स डुबोचेट, जोचिम  फ्रँक आणि रिचर्ड हेंडरसन  या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समितीने सांगितले. डुबोचेट हे स्वीडनचे, फ्रँक अमेरिकेचे तर हेंडरसन हे ब्रिटनचे नागरिक आहेत.

    नोबेल पुरस्काराच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकाच शास्त्रज्ञाला रसायनशास्त्रातील कामगिरीसाठी दोन वेळा नोबेल पुरस्कार दिला गेला आहे. बिटिश शास्त्रज्ञ यांना फ्रेड्रिक सॅगर यांना १९५८ आणि १९८०मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.

ज्येष्ठ रॉकगायक टॉम पेटी यांचे निधन

     ज्येष्ठ रॉकगायक टॉम पेटी (वय, ६६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १० वर्षांचे असताना त्यांनी प्रसिद्ध अभिनेते एल्व्हिस प्रिस्ले यांची भेट घेतली होती. यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी मडक्रच या पहिल्या बँडची निर्मिती केली. टॉम पेटी यांच्या रॉक गायनामुळे जगभरात त्‍यांचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. 

    टॉम यांना राहत्‍या घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्‍यानंतर तात्‍काळ त्‍यांना उपचारासाठी यूसीएलए मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्‍यांचा मृत्‍यू झाला. 

3 ऑक्टोबर २०१७

‘जैविक घड्याळाच्या’ संशोधनाला नोबेल

     सजीवांमधील नियमनाचे जैविक घड्याळ नेमके असते तरी कसे आणि त्याचे कार्य,  यावर संशोधन करणार्‍या अमेरिकेच्या जेफ्री सी. हॉल, मायकेल रोसबाश आणि मायकल यंग या तिघांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 108 व्या पुरस्काराची घोषणा कारोलिन्स्का इन्स्ट्यिूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून करण्यात आली.

    मानचिन्ह तसेच 1.1 दशलक्ष डॉलर (सुमारे 7 कोटी 26 लाख रुपये) रक्‍कम या तीन शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात येणार आहे. याचबरोबर 2017 वर्षातील नोबेल पुरस्कारांच्या घोषणेलाही प्रारंभ झाला आहे. साहित्याचे नोबेल 5 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. गेल्या वर्षी हे नोबेल संगीतकार, गीतकार बॉल डिलन यांना प्रदान करण्यात आले होते. 

   पृथ्वी, प्राणी आणि मनुष्य यांच्यात अंतर्गत ‘घड्याळ’ कार्यरत असते. त्याचे कार्य पृथ्वीच्या फिरण्याशी संबंधित आहे. या घड्याळरूपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्या-पिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्‍तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये बदल झाल्यास त्याचा सजीवांवर परिणाम होतो. हे जैविक घड्याळ वेगवेगळ्या दिवसांतील वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. घड्याळाचे नियम व्यवस्थित होण्यासाठी झोपेचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे या संशोधनात अधोरेखित करण्यात आले आहे.

विजय सरदेसाई

    दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात तब्बल २७ वर्षांपूर्वी शिक्षण घेणा-या गोव्याच्या एका विद्यार्थ्याने आपण मंत्री बनूनच या महाविद्यालयात येणार असा पण केला होता. त्या काळी या महाविद्यालयात विद्यार्थी चळवळीमध्येही हा विद्यार्थी सक्रीय होता. कालांतराने बीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर ही पदवी त्याने घेतली. हा विद्यार्थी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई होत. 

      १९८९ च्या सुमारास विजय यांना त्यांच्या वडिलांनी कृषी शिक्षणासाठी दापोलीला पाठवले. गोव्यात त्या काळीही कृषी अभ्यासक्रमाची सोय नव्हती. सरदेसाई म्हणतात की, ‘मनाविरुध्द मी कृषी शिक्षणासाठी गेलो होतो’. घरात राजकारणाचा वारसा नसला तरी विजय यांचा पिंड राजकारण्याचा. दापोलीच्या विद्यापीठात त्यांनी त्या काळी विद्यार्थी संघटनेसाठीही राजकारण केले. 

२ ऑक्टोबर २०१७

गोळीबारात अमेरिकेत ५० ठार

     लासवेगास येथे रविवारी रात्री म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका माथेफिरून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पन्‍नास जण ठार झाले, तर १०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. मँडेले बे रिसॉर्ट आणि कसिनोजवळ हा प्रकार घडला आहे.

     ख्यातनाम गायक जॅस अल्डेन याच्या म्युझिक कॉन्सर्टला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीवर अचानक झालेल्या गोळीबारामुळे कॉन्सर्टच्या ठिकाणी पळापळ सुरू झाली. गोळीबारात २० जण जागीच ठार झाले. घटनेची माहिती कळताच स्वॉट पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी केलेल्या कारवाईत गोळीबार करणाऱ्या एका संशयित माथेफिरूला पोलिसांनी ठार केले आहे. त्याच्यासोबत गोळीबार करणारी आणखी कोणी व्यक्ती असण्याची शक्यता लासवेगास पोलिसांनी फेटाळून लावली आहे. अद्याप गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

     जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे. 'द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूट'ने २०१७च्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची  घोषणा केली.यंदाचा वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जेफ्री सी.हॉल,मायकल  रोसबॅश आणि मायकल डब्ल्यू.यंग या तिघांना जाहीर झाला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन

     प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील  दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी मराठे यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हजर केलं होतं. 
    'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी'  ही वेगळ्या वळणाची दीर्घ कथा लिहून ते प्रकाशात आले. चिपळूणला भरणाऱ्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. 

     ह.मो. मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला.  हमो या टोपण नावाने ते ओळखले जात होते. वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव येतो. हमोंना त्यांच्या भावाने वयाच्या 10-12 व्या वर्षी शाळेत घातले.     एम.ए.पर्यंत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे 1956 साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या 1969 साली प्रसिद्ध झालेल्या ह्णनिष्पर्ण वृक्षावर भर दुपारीह्ण या कादंबरीने. ही कादंबरी पुढे1972 साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.

१ ऑक्टोबर २०१७

ज्येष्ठ नाट्य समीक्षक रमेश उदारे यांचे निधन

     ज्येष्ठ पत्रकार, नाट्य समीक्षक व लेखक रमेश उदारे (वय 67) यांचे त्यांच्या टिळकनगर येथील घरी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून उदारे काम करत होते. ते अनेक वर्तमानपत्रांमध्ये नाट्य समीक्षण करत असत. 25 वर्षे ते हे काम करत होते. नाट्य संमेलन, साहित्य, नाट्यविषयक कार्यक्रमांना ते उपस्थित राहयचे. नाट्यविषयक, व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकांची निर्मितीही त्यांनी केली आहे. नाट्य समीक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या वि. स. खांडेकर नाट्य समीक्षा पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. "पावलो पावली', "मंतरलेली माणसे', "आठवणींची पाऊलवाट', "लग्नकल्लोळ', "फ फजितीचा', "साहित्य सहवास', लग्न गोंधळ, "फिल्मी चक्कर', "ऋणानुबंध', "निंबोणीच्या झाडामागे' ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.