Menu

Study Circle

३१ मे २०१७

भारत-जर्मनी यांच्यात आठ करार

     भारत-जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशातील संबंधांच्या फलश्रुतीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी मोदी यांनी व्यापार, कौशल्य विकास, सायबर सुरक्षा व दहशतवाद अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली.

      चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी मर्केल यांच्या उपस्थितीत सांगितले की, दोन्ही देशातील संबंध वेगाने वाढत असून त्यांची दिशा सकारात्मक व स्पष्ट आहे. भारत जर्मनीला सक्षम भागीदार देश मानतो.

     दोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात सायबर गुन्हेगारी, विकास कार्यक्रम, शाश्वत शहर विकास, कौशल्य विकास, रेल्वे सुरक्षा यांचा समावेश आहे. शाश्वत विकासासाठी भारत-जर्मन कें द्राची स्थापनाही केली जाणार आहे. मर्केल यांनी सांगितले की, भारत हा विश्वासू भागीदार आहे हे सिद्ध झाले आहे, दोन्ही देशांचे सहकार्य वाढत आहे.

     दहशतवादाबाबत मोदी यांनी सांगितले की, मानवतावादी शक्तींनी या आव्हानाविरोधात एकजूट केली पाहिजे. भारत व जर्मनी यांच्यात द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांची दिशा निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यात आज चौथ्या फेरीची आंतरसरकारी चर्चा झाली. मोदी यांचे लष्करी सलामीत स्वागत करण्यात आले. त्यांचे मर्केल व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

     मोदी यांनी त्यांच्या शिष्टमंडळाचा परिचय मर्केल यांना करून दिला. यावेळी दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली, मोदी हे सध्या दोन दिवसांच्या जर्मनी भेटीवर आहेत. गेली दोन वर्षे उभय देशात आंतरसरकारी पातळीवर चर्चा होत आहे. आजच्या चर्चेच्या फेरीत विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन, व्यापार मंत्री निर्मला सीतारामन, ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्र राज्य मंत्री एम.जे. अकबर उपस्थित होते. यापूर्वीची चर्चा ऑक्टोबर २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती. युरोपीय समुदायात जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारतात जर्मनीच्या १६०० कंपन्या असून ६०० संयुक्त प्रकल्प आहेत. मर्केल व मोदी यांची इंडो-जर्मन बिझीनेस शिखर बैठकीत व्यापार उद्योगधुरिणांशी चर्चा झाली. भारताच्या दृष्टीने जर्मनीशी आर्थिक हितसंबंध दृढ करणे महत्त्वाचे आहे.

प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक आणि माजी मंत्री दसरी नारायण राव यांचे निधन

      टॉलिवूडचे दिग्दर्शक आणि यूपीएच्या काळातील माजी केंद्रीय मंत्री दसरी नारायण राव  निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. दसरी राव यांना आठवड्याभरापूर्वी हैदराबादच्या केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. तीन दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

       राष्ट्रीय पुरस्कार विजेते दसरी यांनी साधारणपणे १२५ सिनेमांचे दिग्दर्शन केले. यासाठी त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही आले होते. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आत्मचरित्र बनवण्याची घोषणा त्यांनी केली होती. फक्त तेलगू सिनेसृष्टीमध्येच त्यांनी आपले नाणे खणखणीत वाजवले असे नाही तर राजकारणातही ते सक्रीय होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री होते. ते कोळसा मंत्रालयात राज्यमंत्री होते. कोळसा घोटाळा प्रकरणात त्यांच्या नावाचाही समावेश होता.

       आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दसरी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करणारे ट्विट केले. ते म्हणाले की, तेलगू समाज आणि सिनेमाचा एक आधारस्तंभ कोसळला आहे.

३० मे २०१७

प्रधानमंत्री पीक विमा योजना

        केंद्र सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत पिकाच्या विम्यासाठी शेतकर्‍यांना भराव्या लागणार्‍या हप्त्याची रक्कम अतिशय कमी करण्यात येणार असून यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक संकटांमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीपासून बचाव करू शकणार आहेत. या पावसाळ्यात सुरू होणार्‍या खरीप हंगामापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. सध्या भारतामधील केवळ 23 टक्के पिकांचे विमे उतरवले जात असून या योजनेअंतर्गत हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. सध्या या विम्यांचे हप्ते भरण्यासाठी सरकारला अंदाजे 2300 कोटी रुपये खर्च येत असून नव्या योजनेनुसार हप्त्यातील वाढलेला सरकारी वाटा आणि 50% पीकविमा पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यास केंद्र शासनास एकूण 8000 कोटी रुपये वार्षिक खर्च येण्याची शक्यता आहे.

        या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये एकच विमा कंपनी असणार असून इतर खाजगी विमा कंपन्या अ‍ॅग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडियाशी संलग्न करण्यात येणार आहेत. हा विमा केवळ उत्पन्नातील घट एवढ्यापुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, तसेच चक्रीवादळे, भूस्खलन, बिगरमोसमी पाऊस इ. स्थानिक पातळीवरील आपत्तींपासूनच्या संरक्षणासाठीही हा विमा उपलब्ध करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही विमा योजना सर्व शेतकर्‍यांसाठी खुली आहे, मात्र कोणावरही बंधनकारक नाही.

*   1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना केंद्र शासनाने देशातील पहिली पीकविमा योजना सुरू केली.

*   1999 साली एन.डी.ए. सरकारने राष्ट्रीय कृषी विमा योजना लागू केली. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा काढण्यात येत असला, तरी या योजनेत सर्व पिकांचा समावेश केला नव्हता.

*   2004 नंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस शासनाने काही बदलांसह ही योजना चालू ठेवली होती.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्ट्ये -

*   नैसर्गिक आपत्ती, किटक आणि रोगराई यामुळे पिकांना नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार देणे.

*   नवीन व आधुनिक शेतीपद्धतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करणे.

*   शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकर्‍यांचे उत्पन्न स्थिर करणे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची योजनेची ठळक वैशिष्ट्ये -

*   अत्यंत कमी प्रिमियम (विम्याची संरक्षित रक्कम)

*   या योजनेअंतर्गत भरणा करण्यात येणारा प्रिमियम दर शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी अत्यंत कमी ठेवला आहे.

*   याअंतर्गत सुमारे 90 टक्क्यांपेक्षा जास्त भार शासनाकडून उचलला जाईल.

*   अन्नधान्य, डाळी, तेलबिया आदी पिकांसाठी प्रत्येक हंगामावरील एकच दर असेल. यापूर्वीची एकाच हंगामासाठी जिल्हावार आणि पीकवार दरातील भिन्नता आणि तफावत आता दूर केली आहे.

*   पूर्ण विमा संरक्षण मिळेल व दावा केलेली रक्कम पूर्ण मिळेल. (कमी होणार नाही.)

विमा लाभ मिळण्यास पात्र परिस्थिती -

*   शेतात पाणी साठणे, पूर येणे अशा आपत्तींना स्थानिक संकट मानण्यात येईल. प्रभावित शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करून भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाईल.

*   पीक काढण्याच्या दिवसापर्यंत जर पीक शेतातच असेल आणि त्या दरम्यान आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस आल्यास शेतकर्‍यांना दावा रक्कम मिळेल.

*   अपवाद - मानवनिर्मित आपत्ती उदा. आग लागणे, चोरी होणे यांचा या योजनेत अंतर्भाव नाही.

*   सर्वेक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर - या योजनेमध्ये उपग्रह तंत्रज्ञाचा उपयोग करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पिकांच्या नुकसानीचे आकलन तात्काळ होऊन दावा रक्कम लवकर मिळू शकेल. शेतकर्‍यांनाही ऑनलाईन घरी बसून हे नुकसान पाहता येईल.

*   प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना यांची जागा घेणार आहे.

पारदर्शक बेडकांच्या नव्या प्रजातीचा शोध

      पारदर्शक त्वचा असलेल्या बेडकांच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीमधील बेडकांचे धडकणारे हृदयही स्पष्टपणे दिसते हे विशेष. ही प्रजाती आधीच अस्तित्वाच्या संकटात सापडली असावी, असे संशोधकांना वाटते.

      या बेडकाला हायलीनोबॅट्राचूम याकू असे नाव देण्यात आले आहे. विषुववृत्तीय प्रदेशात ही प्रजाती सापडली. बेडकाच्या पाठीवर हिरवे ठिपके आहेत. त्याचे प्रजननाबाबतचे वर्तन हे त्याला अन्य बेडकांपासून वेगळे करते. या बेडकांमध्ये नर बेडूक हा अंड्यांची रखवाली करतो. ही अंडी एखाद्या झाडाच्या पानाखाली चिकटलेली असतात. जोपर्यंत ही अंडी फूटून पिले बाहेर येत नाहीत तोपर्यंत नर त्यांची देखभाल करतो. अन्य पारदर्शक बेडकांमध्ये छातीत धडकणारे हृदय स्पष्टपणे दिसत नाही, पण यामध्ये ते दिसून येते. विशेष म्हणजे त्याचे तांबडे रक्तही दिसून येते.

२९ मे २०१७

लवकरच धावणार नदीखालून मेट्रो

      भारतात लवकरच नदीखालून धावणारी मेट्रो दिसणार आहे. विशेष म्हणजे देशातील अशा प्रकारचा हा पाहिलाच प्रोजेक्ट असणार आहे. कोलकातामध्ये ही मेट्रो धावताना दिसणार आहे. हुगली नदीखाली सुरु असलेल्या बोगद्याचे काम पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. याच मार्गावर नदीखालून धावणारी मेट्रो पाहायला मिळणार आहे.

       हावडा आणि महाकरन मेट्रो स्टेशनचे प्रवासी एका मिनिटासाठी नदीखालून प्रवास करतील. या बोगद्यात मेट्रोचा वेग ताशी 80 किमी असेल. या मार्गावर मेट्रो 10.6 किमीचा प्रवास बोगद्यातून करणार असून, नदीखाली बांधण्यात आलेल्या बोगद्याची लांबी 520 मीटर इतकी आहे.

       नदीच्या खाली तयार केलेल्या या बोगद्यासाठी 60 कोटी खर्च केले आहेत. तर पूर्व-पश्‍चिम मेट्रो प्रोजेक्टसाठी एकूण 9,000 कोटींची गुंतवणूक केली आहे.

        रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, बोगद्याचे काम गतवर्षी एप्रिल महिन्यात सुरु केले होते आणि ते लवकरच पूर्ण होईल. पूर्व-पश्‍चिम मेट्रो 2019 पर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न आहे. अधिकार्‍याने सांगितल्यानंतर तात्काळ सेवेसाठी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी पर्यायी मार्ग म्हणून मेट्रोचा वापर करता येऊ शकतो.

जीएसएलव्ही एमके-3च्या उड्डाणासाठी इस्रो सज्ज

        भारताच्या भूमीतून भारतीयाला अवकाशात नेऊ शकणारे भारतीय रॉकेट असे वर्णन केल्या जाणार्‍या जीएसएलव्ही एमके-3 या रॉकेटच्या उड्डाणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सज्ज असल्याचे या संस्थेचे संचालक किरणकुमार यांनी सांगितले. पुढील आठवड्यात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.

        जीएसएलव्ही एमके-3 हे भारताने आतापर्यंत तयार केलेले सर्वांत अवजड रॉकेट असून, सर्वांत अवजड उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. याद्वारे अवजड उपग्रह प्रक्षेपणाच्या अब्जावधी डॉलरच्या बाजारात प्रवेश करण्यास इस्रो सिद्ध आहे, असे किरणकुमार यांनी सांगितले. या रॉकेटची पुढील आठवड्यात होणारी चाचणी यशस्वी झाल्यास पुढील दशकभरात याच रॉकेटद्वारे भारतीय अवकाशवीर अवकाशात जाऊ शकेल, असा विश्‍वास किरणकुमार यांनी व्यक्त केला.

         पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत 8 टनांपर्यंतचा पेलोड वाहून नेण्याची जीएसएलव्ही एमके-3ची क्षमता आहे. भारतीय अवकाशवीराला अवकाशात नेण्यासाठी ही क्षमता पुरेशी आहे, मात्र यासाठी 3 ते 4 अब्ज डॉलरचा निधी आवश्यक असून, केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास 2 ते 3 जणांना अवकाशात पाठविण्याचा इस्रोचा आराखडा तयार आहे. या आराखड्यावर अंमलबजावणी झाल्यास मानवाला अवकाशात नेऊ शकणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतर केवळ चौथा देश असेल. भारतातर्फे अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती एक महिला असू शकते, असे सूतोवाचही किरणकुमार यांनी केले.

          जीएसएलव्ही एमके-3 हे रॉकेट भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी शून्यातून तयार केले असल्याने या हत्तीला पहिल्याच प्रयत्नात माणसाळण्याचा इस्रोचा प्रयत्न असेल. नव्या रॉकेटच्या पहिल्या उड्डाणात अनेकदा इस्रोला अपयश आले आहे. भारताचे पीएसएलव्ही हे 1993 च्या पहिल्या उड्डाणात अयशस्वी ठरले होते. त्यानंतर मात्र या रॉकेटने सलग 38 यशस्वी उड्डाणे केली आहेत. जीएसएलव्ही एमके-1चेही पहिले उड्डाण अयशस्वी झाले होते. ही परंपरा यंदा मोडली जाण्याची आशा आहे.

जीएसएलव्ही एमके-3 ची वैशिष्ट्ये -

*   वजन (जंबो जेट विमानाच्या 5 पट) : 640 टन

*   वजन वर्गातील उपग्रह नेण्याची क्षमता : 4 टन

*   उंची : 43 मीटर

*   रॉकेटचा निर्मिती खर्च : 300 कोटी

तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजीत भारताच्या भवानीदेवीला सुवर्ण

        भारताच्या सी.ए. भवानीदेवी हिने आइसलँड येथील रेकजाविक येथे झालेल्या तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत सी.ए. भवानीदेवी हिने ग्रेट ब्रिटनच्या सारा जेन हॅम्पसन हिचा 15-13 असा पराभव केला. चेन्नईच्या या महिला खेळाडूने उपांत्य फेरीत ब्रिटनची एक अन्य खेळाडू जेसिका कोरबी हिला 15-11 अशा फरकाने नमवले होते. त्याचबरोबर भवानीदेवी ही आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.

       रेकजाविक येथून भवानीदेवी हिने म्हटले, मी या स्पर्धेत तिसर्‍यांदा खेळत होते. गतवर्षी मी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली होते. आता मी पहिले पदक जिंकले आहे. हे जागतिक पातळीवरील स्पर्धेतीलही पहिले पदक आहे. मी आशियाई आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही पदक जिंकले आहे. उपांत्यपूर्व फेरीनंतर स्पर्धा जास्त कठीण होती आणि उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत ब्रिटिश खेळाडूंनी कडवी झुंज दिली असल्याचेही तिने सांगितले.

‘आधार’ने भारताला मिळवून दिले पहिले स्थान

        बायोमॅट्रिक तंत्रज्ञानात सुधारणेबरोबरच त्याच्या अंमलबजावणीत भारत जगात अव्वल ठरला आहे. भारतात आपली सत्यता पडताळण्यासाठी डोळ्यांचा वापर करण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत तिप्पट असल्याचे ‘एचसबीसी’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारतात हे प्रमाण ९ टक्के तर इतर देशांत ते तीन टक्क्यांवर आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पाश्चात्य देशांच्या तुलनेत आशिया आणि पश्चिम अाशियातील देश आघाडीवर आहेत. कारण तंत्रज्ञानाबाबत त्यांची समज चांगली आहे आणि याबाबत ते अत्यंत सकारात्मक असतात, असेही या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल ११ देशांतील १२,०१९ लोकांच्या प्रतिक्रियेवरून तयार करण्यात आला आहे. यामध्ये कॅनाडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, भारत, मेक्सिको, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. सरकारही तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणात प्रसार करताना दिसत असल्याचे यात म्हटले आहे.

       भारत सरकारने २००९ मध्ये ‘आधार’ योजना सुरू केली होती. हा जगातील सर्वांत मोठा बायोमॅट्रिक संग्रहण कार्यक्रम होता. बोटांच्या ठशांचे तंत्रज्ञान वापरण्यामध्ये चीन (४० टक्के) आघाडीवर आहे. त्यानंतर भारताचा (३१ टक्के) व संयुक्त अरब अमिरातचा (२५ टक्के) क्रमांक लागतो. बायोमॅट्रिक तंत्रज्ञानात ओळख पटवण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरातील विविध अवयवांच्या डाटाचा उपयोग केला जातो. यामध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि रक्ताच्या डीएनएचा समावेश होतो.

        सरकारने आपल्या विविध योजना अंमलात आणण्यासाठी ‘आधार’ अनिवार्य केले आहे

अणू प्रकल्पांना स्वदेशी ऊर्जा

        देशातील एकूण वीजनिर्मितीत अणुवीजनिर्मितीचा वाटा तीन टक्‍क्‍यांहूनही कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या दहा अणुभट्ट्या उभारण्याचा सरकारचा निर्णय हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.

     मोठ्या क्षमतेच्या स्वदेशी दहा अणुभट्ट्या बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे; परंतु या अणुभट्ट्यांच्या निर्मितीचा कालावधी व वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही, म्हणजे हा निर्णय तूर्तासतरी सैद्धांतिक म्हणावा लागेल; पण हे योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे हे निश्‍चित. सध्या देशात 22 अणुवीज केंद्रे कार्यान्वित असून, त्यातून एकूण 6780 मेगावॉट वीजनिर्मिती होते. ही वीजनिर्मिती देशांतर्गत एकूण वीजनिर्मितीच्या तीन टक्‍क्‍यांहूनही कमी आहे. या दृष्टीने दहा अणुभट्ट्या बांधण्याचा हा निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे देशात हजारो कोटींचा मॅन्युफॅक्‍चरिंग व्यवसाय वाढून हजारो रोजगारही निर्माण होईल हे वेगळेच. एवढ्या मोठ्या प्रमाणात अणुभट्ट्या बांधण्याचा असा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.

      भारत-अमेरिका अणुकराराला सुरवात होऊन 12 वर्षे पूर्ण होत आहेत; परंतु या बहुचर्चित कराराची फलश्रुती काय झाली? वीजनिर्मिती करणाऱ्या अणुभट्ट्यांच्या आयातीच्या बाबतीत कुठलेच करार, मग ते "जैतापूर' असो अथवा "मिठीवर्दी' किंवा इतरत्र बांधण्याच्या अमेरिकी प्रकल्पासंबंधी असो, अद्यापही पूर्णत्वाला गेलेले नाहीत. कारण ते वीजदर व अणुअपघात नुकसान दायित्व अशा मुद्यांवर अडकलेले दिसतात. अणुकराराचा एकमात्र मोठा फायदा झाला, तो नैसर्गिक युरेनियमच्या आयातासंबंधी. नैसर्गिक युरेनियम इंधनाची आयात सुलभ झाल्यामुळे आपले "दाबित जड पाण्यावर' चालणारे अनुवीज प्रकल्प 80 टक्के किंवा अधिक इतक्‍या क्षमतेने वीज उत्पादन करत आहेत. ताज्या निर्णयाच्या मागे इंधन आयातीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण हे नवीन प्रकल्प नैसर्गिक युरेनियम इंधनच वापरतील.
     या निर्णयाप्रत जाण्याचा आणखी एक हेतू सामरिक दृष्टिकोनातून पाहावा लागेल. काही वर्षांपूर्वी अणुपुरवठादार गटाने (एनएसजी) मान्यता दिल्यामुळे "भारत-अमेरिका 123 करार' अस्तित्वात आला (ऑगस्ट 2008); परंतु भारताला या गटाचे सदस्यत्व अजूनही मिळालेले नाही. अणुपुरवठादार गटाचे सदस्य होणासाठी पुरवठादार देशांकडून एकमताने मंजुरी मिळणे आवश्‍यक आहे. सद्यःस्थितीत केवळ चीनच्या आडमुठेपणामुळे भारताला या गटात प्रवेश मिळत नाही. भारताने रशियावर दबाब आणून चीनला अनुकूल करणे शक्‍य आहे. कारण रशियाने चीनला फास्ट ब्रीडर अणुभट्टी बांधण्यात;तसेच इतर सामरिक बाबतीतही साह्य केलेले आहे. भारताने रशियाबरोबर "कुडनकुलम' प्रकल्पातील 1 ते 4 अणुभट्ट्यांचा करार पूर्वीच केला असून, कुडनकुलम 1 व 2' वीजनिर्मितीही करत आहेत. आता रशियाला "कुडनकुलम' 5 व 6'चा करार पूर्णत्वास न्यावयाचा आहे; परंतु भारताने त्याबद्दल उदासीनता दर्शवून रशियाला चिंतित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने सध्या घेतलेला स्वदेशी अणुभट्ट्यांचा निर्णय रशियाला अस्वस्थ करत असेल, ज्यामुळे रशिया भारताला अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळवून देण्यास निकराचे प्रयत्न करील, अशी आशा करता येते. पंतप्रधानांच्या येत्या आठवड्यातील रशिया दौऱ्यात यासंबंधी काही निश्‍चित आश्‍वासन मिळे असे वाटते.

    आता थोडेसे नवीन अणुभट्ट्यांबद्दल. 700 मेगावॉटच्या या अणुभट्ट्यांना पूर्वी विकसित केलेल्या 220 मेगावॉट (नरोरा, काक्रापार) अणुभट्ट्यांची सुधारित व वाढीव आवृत्ती म्हणता येईल. यांची संरचना पूर्ण विकसित होण्याआधी भारताने 540 मेगावॉटच्या दोन अणुभट्ट्या "तारापूर 3 व 4' या शतकाच्या सुरवातीस बांधल्या असून, त्या सुरक्षितरीत्या कार्यान्वित आहेत;तसेच 700 मेगावॉटच्यासुद्धा चार अणुभट्ट्यांचे बांधकाम सध्या काक्रपार (2) व राजस्थान (3) येथे जोरात सुरू आहे. आधी सांगितल्याप्रमाणे या अणुभट्ट्या PHWR अर्थात "दाबित जड पाणी'' व नैसर्गिक युरेनियम इंधन या सूत्रावर बांधल्या जाणार आहेत. PHWR चे तंत्रज्ञान आपल्याला गेल्या 35-40 वर्षांपासून अवगत आहे. या मोठ्या क्षमतेच्या अणुभट्ट्यांत सुरक्षिततेवर अधिक जोर दिला असून, त्यात पुढील अतिरिक्त व्यवस्थांचा समावेश असेल. उदा. मुख्य शीतनक प्रणालीच्या रीडरना अपघातीस्थितीत एकमेकांपासून वेगळे ठेवणे, क्षीणन ऊर्जेच्या निवारणासाठी (Decay heat removal) नैसर्गिकरीत्या (passive) कार्यान्वित प्रणालीची व्यवस्था, अणुभट्टीच्या बंदिस्त इमारतीच्या भिंतीला आतून बसवलेला पोलादी पत्र्याचा पदर इ. या अतिरिक्त व्यवस्थांचा समावेश केल्याने अपघाती स्थितीचा सामना करणे अधिक सोपे होईल.

     सुमारे दीडेक वर्षापूर्वी एका लेखात जैतापूर येथे प्रस्तावित "अरेव्हा' अणुभट्ट्यांच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याची घाऊ करू नये, असे मी सुचवले होते. कारण फ्रान्समधील फ्रामॉंव्हिल येथे या प्रकारच्या अणुभट्टीच्या बांधकामादरम्यान काही त्रुटी आढळल्या होत्या व फ्रेंच आण्विक सुरक्षिततेच्या प्रमुखांनी या अणुभट्टीचे बांधकाम बराच काळ स्थगित केले होते. जैतापूर येथे राज्य सरकारने प्रचंड विरोधाला तोंड देऊन व भरघोस मोबदला देऊन अधिग्रहित केलेली प्रकल्पाची जागा गेली चार वर्षे पडून आहे. यास्तव तिथे लवकरात लवकर 700 मेगावॉटच्या किमान दोन अणुभट्ट्या बांधाव्यात, असे सुचवले होते. सध्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयात त्याचा काहीतरी सहभाग असावा असे वाटते.

    याव्यतिरिक्त देशी बनावटीच्या "द्रुतगती न्यूट्रॉनवर आधारित इंधनजनक'' अणुभट्ट्या लवकर विकसित करून त्याही बांधाव्यात, अशा प्रकाराची 500 मेगावॉट क्षमतेची पहिली अणुभट्टी कल्पक्कम येथे बांधलेली असून, ती लवकरच कार्यान्वित होईल. या प्रकारच्या अणुभट्ट्यांना प्राधान्य देऊन देशातील प्रचंड थोरियम साठ्याचा वापराचा मार्ग अधिक सुकर होईल व त्याचबरोबर डॉ. होमी भाभांचे स्वप्न पूर्ण होण्यास हातभार लागेल

२८ मे २०१७

CBSE चा बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर; दिल्लीतील रक्षा गोपाल 99.6 टक्‍क्‍यांसह प्रथम

       नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. CBSE च्या http://cbseresults.nic.in/class12npy/class12th17.htm या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

       या परिक्षेत नोएडा येथील अमिटी इंटरनॅशनल शाळेतील रक्षा गोपाल नावाची विद्यार्थीनी 99.6 टक्‍क्‍यांसह सर्वप्रथम आली आहे. तर 99.4 टक्‍क्‍यांसह चंदीगढ येथील भूमी सावंतने दुसऱ्या क्रमांकावर आली असून चंदिगढमधील आदित्य जैनने 99.2 टक्‍क्‍यांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या निकालात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाले असून 82 टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे. मागील वर्षी हे प्रमाण 83.05 टक्के होते.

      यंदा देशभरातून CBSE च्या परिक्षेला 10 लाख 98 हजार 891 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6 लाख 28 हजार 865 मुले होते. एकूण 3 हजार 503 परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा केवळ ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला आहे.

कर्बरचा ऐतिहासिक पराभव

         जर्मनीची एंजेलिक कर्बर रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव स्वीकारणारी पहिली अव्वल मानांकित महिला खेळाडू ठरली आहे तर चाकूहल्ल्यातून बचावल्यानंतर पुनरागमन करताना पेत्रा क्विटोव्हाने शानदार सलामी दिली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कर्बरला रशियाच्या इकटेरिना मकारोव्हाविरुद्ध ६-२, ६-२ ने पराभव स्वीकारावा लागला. ओपन युगात प्रथमच अव्वल मानांकित महिला खेळाडूला रोला गॅरोवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फ्रेंच ओपनमध्ये झटपट गाशा गुंडाळणाऱ्या अव्वल मानांकित खेळाडूंमध्ये जस्टिन हेनिन (२००४) व सेरेना विलियम्स (२०१४) यांचा समावेश आहे.

        कर्बरने गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियन ओपन व यूएस ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते तर विम्बल्डनमध्ये ती उपविजेती होती, पण रोला गॅरोच्या लाल मातीवर मकारोव्हाविरुद्ध मात्र तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्बरने पहिल्या सेटमध्ये केवळ चार विनर लगावले आणि १२ टाळण्याजोग्या चुका केल्या. दुसऱ्या सेटमध्ये मकारोव्हाने सुरुवातीलाच ३-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर कर्बरने काही चांगले फटके मारत सूर गवसल्याचे संकेत दिले. त्यानंतर मकारोव्हा सामना जिंकण्यासाठी सर्व्हिस करीत असताना कर्बरला सातवेळा ब्रेक पॉर्इंटची संधी मिळाली, पण त्यावर तिला गुण नोंदविता आला नाही. महिला विभागात सेरेना विलियम्सन, मारिया शारापोव्हा आणि व्हिक्टोरिया अजारेंका यांच्यासारख्या अव्वल खेळाडू सहभागी न झाल्यामुुळे आणि कर्बर पहिल्याच फेरीत गारद झाल्यामुळे अन्य खेळाडूंना जेतेपद पटकावण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

        या खेळाडूंमध्ये दोनदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या क्वितोव्हाचाही समावेश आहे. क्वितोव्हाने अमेरिकेच्या ज्युलिया बोसरपचा ६-३, ६-२ ने पराभव केला. क्वितोव्हावर डिसेंबर महिन्यात चेक प्रजासत्ताकमधील तिच्या निवासस्थानी एका दरोडेखोराने चाकूने हल्ला केला होता. त्यावेळी तिला गंभीर दुखापत झाली होती. आज पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर २७ वर्षीय क्वितोव्हाच्या डोळ्यात अश्रू तराळले. क्वितोव्हा हल्ल्यामध्ये हाताला झालेल्या दुखापतीबाबत बोलताना म्हणाली,‘मी आज विजय मिळविला असला तरी मला माहिती आहे की मी यापूर्वीच जिंकलेली आहे.’ आॅलिम्पिक चॅम्पियन मोनिका पुइग दुहेरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. प्युतेरिकाच्या या खेळाडूने ३१ व्या मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीची झुंज ६-३, ३-६, ६-२ ने मोडून काढली. ३० व्या मानांकित स्वित्झर्लंडच्या टिमिया बासिनस्कीने स्पेनच्या सारा सोरिबेसचा ६-१, ६-२ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या मेडिसन बें्रगलने जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जचा तीन तास रंगलेल्या लढतीत १-६, ६-३, १३-११ ने पराभव केला.

       पुरुष विभागात १९ व्या मानांकित स्पेनच्या अल्बर्ट रामोसने रोमानियाच्या मारियस कोपिलचा ६-७, ६-१, ६-४, ६-२ ने पराभव केला. लक्समबर्गच्या २६ व्या मानांकित जाइल्स मुलर व अर्जेंटिनाचा बिगरमानांकित होरासियो जेबालोस हे खेळाडूही दुसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरले.

२७ मे २०१७

केपीएस गिल यांचे निधन

       पंजाबचे माजी पोलिस महासंचालक कंवर पाल सिंग गिल (वय, 82) यांचे निधन झाले. गिल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादम्यानच गंगाराम रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

      गिल भारतीय पोलीस सेवेतून 1995 मध्ये निवृत्त झाले. उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 1989 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. इंडियन हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. गिल इंस्टीट्युट फॉर कॉन्फिक्ट मॅनेजमेंटचेही ते अध्यक्ष होते.

         पंजाबमधील खालिस्तानी चळवळीचा दहशतवाद मोडून काढण्यात केपीएस गिल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यामुळे पंजाबचा शेर, खालिस्तानी दहशतवाद्यांचा कर्दनकाळ, अशी ओळख गिल यांची ओळख होती.

     1988 ते 1990 दरम्यान पंजाब पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजावली होती. गिल यांची 1991 मध्ये पुन्हा पंजाबचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती केली होती. 

जगातील सर्वात उंच झोका

        अमेरिकेच्या कोलेरॅडो प्रांतातील ग्लेनवू स्प्रिंगमधील अ‍ॅडव्हेंचर पार्कात हा झोका आहे. तसे अनेक झोके या पार्कमध्ये आहेत. पण येथील सर्वात प्रसिद्ध असा झोका आहे, ज्याची उंची तब्बल 1300 फूट आहे. एका डोंगरावर असलेला जगातील हा सर्वात उंच झोका दूरवरून नजरेस पडतो.

       हवा आणि वायूच्या दबावामुळे ताशी 80 किलोमीटरच्या गतीने हा झोका चालतो. त्याच्या आवर्तनातून 115 अंशाचा कोन तयार होतो. या झोक्यावर एकावेळी अनेक लोक झुलण्याची मजा घेऊ शकतात. या पार्कच्या मालकाचे नाव स्टीव बेकले असे आहे. ते म्हणतात की, ज्यावेळी तुम्ही या 1300 फूट झोक्यावर झुलत असता तेव्हा खाली 1 फुटावरचा नजारा पाहून साहजिकच कुणाचेही डोळे फिरू शकतात.

श्रीलंकेतील पूरबळींची संख्या 55वर

     मुसळधार पावसाने श्रीलंकेला जोरदार तडाखा दिला असून, पूर आणि भूस्खलनामुळे गेलेल्या बळींची संख्या 55 वर पोचली आहे.

   श्रीलंकेच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून, पुराचा फटका सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना बसला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे 55 जण मृत्युमुखी पडले असल्याचे सांगण्यात आले. अनेक नद्यांची पाणीपातळी वेगाने वाढत असून, त्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आला आहे.

       पूरस्थितीचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत पोचविण्यासाठी श्रीलंकेच्या हवाई दलासह नौदलाची मदत घेतली जात आहे. श्रीलंकेत मागील वर्षी पूर आणि भूस्खलनामुळे शंभर जण मृत्युमुखी पडले होते.

आयटीएफ टेनिस स्पर्धेत अंकिता उपांत्यपूर्व फेरीत

    भारताच्या अंकिता रैनाने आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने दुसऱ्या फेरीत चीनच्या जिंग-जिंग ल्यू हिचे आव्हान ६-२, ५-७, ६-३ असे परतावून लावले. जागतिक क्रमवारीत अंकिताचा ३२१वा, तर ल्यू हिचा २९७वा क्रमांक आहे. ल्यू हिला सहावे मानांकन होते. 

     अंकिताने यंदाच्या मोसमात प्रथमच पहिल्या तीनशे जणींमधील प्रतिस्पर्ध्याला हरविले. दोन तासांहून जास्त वेळ चाललेल्या लढतीत तिची तंदुरुस्ती महत्त्वाची ठरली. आता तिच्यासमोर तृतीय मानांकित चीनच्या फॅंगझोऊ लियू हिचे आव्हान असेल. लियू १३९व्या स्थानावर असल्यामुळे अंकिताचा कस लागेल.

२६ मे २०१७

सुपरक्रॉसमध्ये युवराज विजेता

        पुण्याचा उदयोन्मुख रायडर युवराजसिंह कोंडे-देशमुख याने कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात पहिला क्रमांक मिळविला. बेळगावमध्ये ही स्पर्धा पार पडली. 

          युवराजने मार्च महिन्यात मलेशियात झालेल्या आशियाई मोटोक्रॉस स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला होता. तो मूळचा खेडशिवापूरचा आहे. १२ वर्षांचा युवराज यानंतर आशियाई मालिकेतील तिसऱ्या फेरीत सहभागी होईल. ही स्पर्धा फिलिपिन्समध्ये ११ जून रोजी होईल. युवराज अजमेरा आय-लॅंड रेसिंग ॲकॅडमीत रुस्तम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

13 वर्षांनंतर झकरबर्गला मिळाली डीग्री

        फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याला तब्बल 13 वर्षांनी डिग्री मिळाली आहे.हार्वर्ड विद्यापीठामध्ये 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी देऊन झकरबर्गचा सन्मान करण्यात आला.
       2012 साली डॉक्टर ऑफ लॉसाठी प्रवेश घेतल्यानंतर दोन वर्षामध्ये झकरबर्गने कॉलेज सोडलं होतं. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर काम करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ फेसबुकला विकसित करण्यासाठी काम केलं होतं.  'डॉक्टर ऑफ लॉ'ची डिग्री मिळवण्याचं वचन मार्क झकरबर्ग यांने त्याच्या आईला दिलं होतं त्याचीच पूर्तता करण्यासाठी तो पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळला होता. ‘आई, मी तुला नेहमी सांगायचो मी कधीतरी या विद्यापीठात येईन आणि पदवी घेईन. आज ते स्वप्न पूर्ण झालं’ असं म्हणत त्याने हार्वर्डमधल्या दीक्षांत सोहळ्याचा फोटो शेअर केला. हार्वर्डमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्याने या विद्यापीठातले अनेक किस्से सांगितले.  ज्या हॉस्टेलमध्ये तो राहत होते तेथून फेसबुक लाईव्ह करून त्यांचा अनुभव शेअर केला. 
        हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात जुकर्सबर्ग त्यांनी तीस मिनीट भाषण केलं. 'हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा माझी निवड करण्यात आली तेव्हा मला फार आनंद झाला होता. माझी निवड झाली आहे या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. पण माझी हार्वर्डमध्ये निवड होणं माझ्या आई-वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट होती', असं जुकर्सबर्ग समारोपाच्या भाषणात म्हणाला.

२५ मे २०१७

स्पर्धापरीक्षा -'स्टॅंड अप इंडिया' योजना

       भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 5 एप्रिल 2016 रोजी नोएडा येथून 'स्टार्ट अप इंडिया' या योजनेची आणि योजनेसाठीच्या संकेतस्थळाची सुरुवात केली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील व्यक्ती आणि महिलांमध्ये उद्योजकतेचा विकास व्हावा, यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली असून अशा उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

या योजनेतील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे : 

  • नवीन उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल उभारणीकरिता 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
  • 'रुपे डेबिटकार्ड' (RuPay Debit Card) चा वापर करून खात्यात जमा झालेल्या कर्जाच्या रकमेचा वापर करण्यात येऊ शकतो.
  • 'सिडबी' अर्थात स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया ( Small Industries Development Bank of India ) अंतर्गत पुनर्वित्तपुरवठ्याची सोय निर्माण करण्यात आली असून यासाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी पुरविण्यात येणार आहे. 
  • दिलेल्या कर्जावरील जोखीम कमी व्हावी, यासाठी "नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी' ( National Credit Guarantee Trustee Company ) अंतर्गत 5000 कोटी रुपयांचा निधी निर्माण करण्यात येणार आहे. 
  • नोंदणी आणि संलग्न सेवा सहजरीत्या प्राप्त व्हाव्यात, यासाठी स्टॅंड अप इंडिया संकेतस्थळाचीही सुरुवात करण्यात आली आहे.

गैरकृषी क्षेत्रातील उद्योगांसाठी विशिष्ट वर्गाला संस्थात्मक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक शेड्युल्ड बॅंक शाखेतून किमान अशा दोन उद्योगांसाठी कर्जवाटप करण्यात यावे, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिडबी आणि नाबार्ड बॅंकेची कार्यालये 'स्टँट अप कनेक्ट' केंद्रे म्हणून कार्य करतील. प्रधानमंत्री जनधन योजना आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यांच्याद्वारे सुरु केलेल्या आर्थिक समावेशनाचे पुढील पाऊल म्हणून स्टार्ट अप इंडिया आणि स्टँड अप इंडिया या योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. 

पल्सार ब्राऊन ड्वॉर्फसच्या विश्वातील श्रीनिवास कुलकर्णी

        आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्रज्ञ प्रा. श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांना त्यांच्या खगोलशास्त्रातील अमुल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहिर झाला. १० लाख अमेरिकन डॉलरचा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 

         कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे जन्मलेल्या प्रा. कुलकर्णी यांच्या नावावर खगोल विज्ञानातील अनेक मूलभूत स्वरूपाचे शोध नोंदले गेलेले आहेत. मिल्की वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूलद्रव्यांचे स्वरूप काय, याचा शोध घेण्याबरोबरच प्रा. कुलकर्णींनी ‘पल्सार’ म्हणजेच स्पंदन पावणाऱ्या ताऱ्यांचा, ब्राऊन ड्वार्फस्चा, अवकाशातील गॅमा किरणांच्या विस्फोटांचा विशेष अभ्यास व संशोधन केलेले आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक क्षमतेच्या टेलिस्कोपकडून गोळा केल्या जाणाऱ्या अवकाशातील सिग्नल्सचा शोध घेऊन त्यांचे विश्लेषण करण्यासाठीची उपकरणे विकसित करण्यासाठीसुद्धा प्रा. कुलकर्णी ख्यातनाम आहेत. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या एकमताच्या शिफारसीमुळे लंडनमधील रॉयल सोसायटीने त्यांना २००१ मध्ये मानाची फेलोशिप प्रदान केली आहे. प्रा. कुलकर्णी यांच्या या कर्तृत्वाबद्दल चालू पिढीतील कोल्हापूरवासीय मात्र काहीसे अनभिज्ञ आहेत. नाही म्हणायला रॉयल सोसायटीची फेलोशिप जाहीर झाल्यानंतर प्रा. कुलकर्णी भारतात आले तेव्हा कुरुंदवाडमध्ये म्हणजे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचा एक छोटेखानी सत्कार झालेला होता, पण तो तेवढाच. त्यानंतर पुन्हा प्रा. कुलकर्णी यांची कोणत्याही जाहीर कार्यक्रमासाठी कोल्हापूरला फेरी झाली नाही, ना कधी शिवाजी विद्यापीठानेही त्यांना आवर्जून आमंत्रित केले. कुलकर्णी आजही कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि प्लॅनेटरी सायन्सचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधनाचे काम सुरूच आहे. जगभरातील अनेक संशोधन संस्थांशी आणि विद्यापीठांशी त्यांची नाळ कायमची जुळलेली आहे. नासाच्या एक्झोप्लॅनेट सायन्स सेंटरचे तसेच ‘कॅल्टेक’ आॅप्टिकल आॅब्झर्व्हेटरीजचे संचालकपदही त्यांनी भूषविलेले आहे.

         १९५० च्या दशकात कुरुंदवाडमध्ये डॉ. रामचंद्र कुलकर्णी नावाचे स्त्रीरोग तज्ज्ञ काम करीत होते. तीन मुलींच्या पाठोपाठ १९५६ साली त्यांना जो मुलगा झाला तो म्हणजे श्रीनिवास. प्रा. कुलकर्णी यांच्या जन्माविषयीची अशी काही माहिती सांगितली तरी त्यांची झटकन काही ओळख सामान्य माणसाला पटेल अशी शक्यता नाही. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि कन्नड, इंग्रजी व मराठी भाषेतील लेखिका सुधा मूर्ती यांचेही लहानपण काही काळ कुरुंदवाडमध्ये गेले. श्रीनिवास हे त्यांचे सख्खे भाऊ!

          श्रीनिवास यांचा जन्म कुरुंदवाडमध्ये झाला असला तरी त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मात्र कर्नाटकातील हुबळी येथे झाले. पदार्थ विज्ञान हा विषय घेऊन दिल्लीतील आयआयटीमधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर खगोल विज्ञानात डॉक्टरेट करण्यासाठी श्रीनिवास यांनी अमेरिका गाठली ती कायमचीच. गंमत अशी की, ज्या ‘कॅल्टेक’मध्ये त्यांना पीएच.डी.साठी प्रवेश मिळू शकला नव्हता त्याच ‘कॅल्टेक’मध्ये म्हणजे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये कालांतराने श्रीनिवास अ‍ॅस्ट्रॉनॉमी डिपार्टमेंटचे चेअरमन बनले. तत्पूर्वी १९८३ मध्ये बर्कले येथून कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या फाईन अ‍ॅस्ट्रॉनॉमी डिपार्टमेंटमधून त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली होती. दिल्लीमध्ये आयआयटीत असताना त्यांनी जो संशोधन प्रकल्प प्रयोगासाठी निवडला होता त्याचाच फायदा त्यांना बर्कलेत डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळताना झाला. खरं तर अमेरिकेत त्यांनी आपल्या पल्सार, ब्राऊन ड्वार्फस्च्या विश्वातील कुलकर्णी अभ्यासक्रमासाठी परिश्रम घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खगोल विज्ञानाची फारशी पार्श्वभूमी नव्हती, पण जे समजणार नाही ते कितीही प्राथमिक स्वरूपाचे असले तरी त्याबाबत विचारणा करून समजावून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. अल्पावधीतच त्यांची आकलन क्षमता आणि तीव्र बुद्धिमत्ता याची जाणीव त्यांच्या मार्गदर्शकांना व सहकाऱ्यांना झाली. त्यांनी सर्वप्रथम ‘मिल्की वे’ या आकाशगंगेतील हायड्रोजन वायूचे स्वरूप आणि विभागणी यावर काम सुरू केले. यासाठी पोर्टो रिको येथे असलेल्या एका मोठ्या रेडिओ टेलिस्कोपमधून केल्या जाणाऱ्या निरीक्षणांचा उपयोग कुलकर्णी यांना करून घ्यावा लागला. अशाच अभ्यासासाठी पोर्टो रिकोला कुलकर्णी एकदा गेले असताना त्यांना अवकाशातून येणाऱ्या रेडिओ सिग्नल्सपैकी विशिष्ट रेडिओ सिग्नल्सचा मूळ स्रोत कोठे आणि कसा असू शकेल याबाबत विचारणा करण्यात आली. कुलकर्णी यांनी मन:पूर्वक हा शोध घेतला आणि हा मूळ स्रोत म्हणजे एक स्पंदन पावणारा तारा (पल्सार) असल्याचे स्पष्ट झाले. कुलकर्णी यांच्या नावावर १९८२ मध्ये या पल्सारचा शोध नोंदला गेला.

          सूर्यापेक्षा कितीतरी पट मोठा तारा विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो, त्याच्यामधील आण्विक इंधन संपुष्टात येऊ लागते आणि त्याच्या केंद्रभागाचे रूपांतर न्यूट्रॉन स्टारमध्ये होऊ लागते तेव्हा या ताऱ्याचा बाह्य भाग विस्फोटांसह नाहीसा व्हायला लागतो. अशा स्थितीत असणाऱ्या ताऱ्याला सुपर नोव्हा असे संबोधण्यात येते. एखाद्या ताऱ्याचा केंद्रभाग न्यूट्रॉन स्टार बनतो म्हणजे त्याचा फक्त न्यूट्रॉनने बनलेला भाग शिल्लक राहतो. उदा. सूर्याच्या वजनाच्या दीडपट वजन आणि केवळ दहा किलोमीटरचा व्यास असे रूप एखाद्या ताऱ्याने धारण केले असेल तर त्याला न्यूट्रॉन स्टार म्हणून ओळखण्यात येते. अशा ताऱ्याचे चुंबकीय क्षेत्र हे खूपच प्रभावी असते आणि तारा स्वत:भोवती वेगाने फिरत असताना त्यातून सतत ऊर्जा बाहेर फेकली जाते. असा न्यूट्रॉन तारा तरुण असतो तेव्हा त्याच्याकडून बाहेर फेकल्या जाणाऱ्या ऊर्जेत काही रेडिओ तरंगांचाही समावेश असतो. हा रेडिओ तरंगांचा झोत नेमकेपणाने पकडता आला व अभ्यासता आला तर त्यातून अवकाशातील न्यूट्रॉन स्टार किंवा पल्सार यांचा शोध लागू शकतो. अवकाशातील अशा पल्सारचा पहिल्यांदा शोध १९६७ मध्ये लागला होता आणि श्रीनिवास कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘पीएसआर १९३७+२१’ या नावाने ओळखला जाणारा पल्सार शोधला तो १९८२ मध्ये. असा तारा १.६ मिली सेकंदात स्वत:भोवती गिरक्या घेत असतो म्हणजे सूर्यापेक्षा अधिक वस्तूमान असणारा तारा दर सेकंदाला स्वत:भोवती ६२५ गिरक्या घेत असतो. यापेक्षा जास्त वेगाने गिरक्या या ताऱ्याला सहन होत नाहीत. हळूहळू या गिरक्यांचा वेग कमी होत जातो.

          एकदा असा काही शोध नावावर लागल्यानंतर कुलकर्णींनी पल्सारवरच अधिक काम सुरू केले. त्यांनी पल्सारच्या चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास केला. पल्सारची निर्मिती खगोलीय प्रणालींमध्ये कशा पद्धतीने होत जाते याविषयी खूपशी नवी माहिती जगासमोर आणली. यानंतर कुलकर्णींच्या नावावर शोध जमा झाला तो ब्राऊन ड्वार्फस् म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवकाशातील एका वेगळ्या गोष्टीचा. अवकाशातील ब्राऊन ड्वार्फचे वस्तुमान तो तारा बनण्यासाठी पुरेसे नसते आणि ग्रह म्हणून त्याची घडण व्हायची तर त्यासाठी ते वस्तुमान खूपच जास्त असते. तारे काय किंंवा ब्राऊन ड्वार्फस् काय यांची घडण ही इंटर स्टेलर क्लाऊडस्च्या टकरावातून होत असते. कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वात प्रथम नि:संदिग्धपणे ब्राऊन डॉर्फचे अस्तित्व जगासमोर आणले. त्यांनी शोधलेल्या पहिल्या ब्राऊन ड्वार्फस्चे नाव ‘ग्लिज २२९ बी’. पृथ्वीपासून १९ प्रकाशवर्ष दूर असलेल्या एका ताऱ्याच्या जोडीने हा ब्राऊन डॉर्फ अवकाशात भ्रमण करीत असल्याचे कुलकर्णींना आढळले. माऊंट पालोमर येथील ६० इंची टेलिस्कोपमधून या ब्राऊन ड्वार्फस्च्या अस्तित्वाचा माग मिळाल्यानंतर त्यांनी २०० इंची टेलिस्कोपच्या माध्यमातून पाठपुरावा करीत या ब्राऊन ड्वार्फस्चे अस्तित्व सिद्ध केले. पुढे हबल स्पेस टेलिस्कोपमुळे त्याच्याविषयीची आणखी माहिती मिळत गेली. यानंतर कुलकर्णींनी अवकाशातील गॅमा रे विस्फोटांचा पद्धतशीर अभ्यास सुरू केला. या अभ्यासात मोठी मदत झाली ती डच-इटालियन कृत्रिम उपग्रह बेप्पो एस.ए.एक्स. याच्या प्रक्षेपणानंतर. त्याच्या मदतीने जीआरबी ९७०२२८ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गॅमा रे विस्फोटाबाबतचा शोध कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९७ मध्ये घेतला. श्रीनिवास कुलकर्णींच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील अशा योगदानामुळे जगभरातील अनेक सन्मान त्यांना मिळत गेले. त्यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले. त्यांना मिळालेल्या सन्मानांमध्ये रॉयल सोसायटीच्या फेलोशिपखेरीज हेन्री बुकर फेलोशिप, आल्फ्रेड पी स्लोन फेलोशिप, एनएसएफ प्रेसिडेंशियल यंग इन्व्हेस्टिगेटर अवॉर्ड, वेणूबापू मेमोरियल अवॉर्ड, एनएसएफ अ‍ॅलन वॉटरमन प्राईज, हेलन बी वॉर्नर प्राईज, अमेरिकन अकॅडमी आॅफ आर्ट अँड सायन्सची फेलोशिप अशा अनेक सन्मानांचा समावेश आहे. त्यात आता डॅन डेव्हिड पुरस्काराची भर पडली आहे.

२४ मे २०१७

दुखापत होऊनही सार्थकचे विजेतेपद

    पुण्याच्या सार्थक चव्हाणने पायाला दुखापतीमुळे बॅंडेज बांधलेले असतानाही कर्नाटक आमंत्रित सुपरक्रॉस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. 

      बेळगावमध्ये ‘ज्युनियर ३’ (७ ते १२ वर्षे) गटात त्याने पहिला क्रमांक मिळविला, तर ‘ज्युनियर २’ (१२ ते १५ गट) गटात दुसरा क्रमांक मिळविला. सार्थक दहा वर्षांचा आहे. त्याचे वडील व प्रशिक्षक श्रीकांत यांनी सांगितले, की दहा दिवसांपूर्वी साताऱ्यात सराव करताना डबल जम्प घेताना सार्थक पडला. त्याच्या उजव्या पायाची तीन बोटे फ्रॅक्‍चर झाली होती. बॅंडेज चार आठवडे घालण्याची गरज होती. दुखापत झालेल्या पायाने ब्रेक मारायचा नसल्यामुळे डॉक्‍टरांनी काळजी घेण्याचा सल्ला देत स्पर्धेसाठी परवागनी दिली. सार्थकने डाव्या पायात नेहमीचा चार नंबरचा, तर फ्रॅक्‍चरमुळे उजव्या पायात दहा नंबरचा बूट घातला. त्याने दोन्ही गटांत कावासाकी केएक्‍स ६५ ही बाईक चालविली. शर्यत पूर्ण करायची आणि स्पर्धात्मक अनुभव घ्यायचा हाच माफक उद्देश होता; मात्र शर्यत सुरू झाल्यानंतर त्याने जिद्दीने रायडिंग करत सहा रायडरमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.’ सार्थक रोझरी कॅम्पमध्ये सहावीत शिकतो. ‘ज्युनियर २’ गटात युवराज कोंडेदेशमुख जिंकला.

राज्यांचा करमणूक कर 'GST'मध्ये समाविष्ट

      करमणूक, केबल आणि डीटीएच यांच्यावरील कराचा वस्तू व सेवा (जीएसटी) कररचनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे राज्यांकडून आकारण्यात येणारा करमणूक कर जीएसटीत समाविष्ट होणार आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. यापुढे करमणूक कराऐवजी जीएसटी आकारण्यात येणार असून, स्थानिक स्वराज संस्थांकडून आकारण्यात येणारा करही लागू असेल.

        करमणूक कार्यक्रम आणि चित्रपटगृहातील चित्रपटांच्या खेळांवर 1 जुलैपासून 28 टक्के जीएसटी लागू होईल. सध्या राज्ये शंभर टक्‍क्‍यांपर्यंत करमणूक कर आकारतात. जीएसटीमध्ये करमणूक कर समाविष्ट केल्याने राज्यांना करमणूक कर आकारता येणार नाही. याचवेळी स्थानिक स्वराज संस्थांकडून आकारण्यात येत असलेला करमणूक कर कायम राहील. यामुळे करमणूक सेवेला जीएसटीअंतर्गत कमी कर भरावा लागेल.

      जीएसटी परिषदेने केबल टीव्ही आणि डीटीएच सेवेसाठी 18 टक्के कर निश्‍चित केला आहे. सध्या या सेवांवर राज्यांकडून 10 ते 30 टक्के करमणूक कर आकारण्यात येत असून, याशिवाय15 टक्के सेवाकर भरावा लागतो. सर्कस, नाट्यगृहे, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य आणि नाटकासाठी 18 टक्के कर जीएसटीअंतर्गत असेल.

२3 मे २०१७

मँचेस्टरमधील बॉम्बस्फोट

     मॅंचेस्टरमध्ये झालेला हा हल्ला अनपेक्षित निश्‍चितच नाही. 'इसिस'ने युरोपमध्ये आपले जाळे पसरले असून दहशतवादी हल्ले करण्यास सज्ज आहेत, असा इशारा युरो पोलिसांनी गेल्याच वर्षी दिला होता. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हल्ले केले जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले होते. यामुळेच काल झालेला हल्ला अनपेक्षित म्हणता येणार नाही. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमीच असला तरी यामुळे युरोपीय आणि विकसित देशांना यामुळे एक संदेश मिळाला आहे.

       भारत आणि इतर दक्षिण आशियाई देश अनेक वर्षे दहशतवाला तोंड देत असताना त्यांना समजावून घेणे आता युरोपसाठी आवश्‍यक आहे. दहशतवाद संपविण्याबाबत जगभर चर्चा होत असली, तरी तो संपण्याऐवजी पसरत आहे, याचा विचार होणे आवश्‍यक आहे.

        आगामी काळात युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याची 'इसिस'ची योजना असल्याचे युरो पोलिसांनी 2016 मध्ये दिलेल्या अहवालात सांगितले होते. 'इसिस'विरोधात जे देश कारवाई करत आहेत, त्यांना लक्ष्य केले जात आहे. फ्रान्स आणि ब्रिटन हे प्रमुख लक्ष्य असतील, असेही अहवालात म्हटले होते. इराक आणि सीरियामध्ये 'इसिस' कमजोर पडत चालली असल्याने या संघटनेत सहभागी झालेले युरोपमधील युवक मायदेशी परतत असल्याने धोका आणखी वाढला आहे. अशा मूलतत्ववादी युवकांची संख्या हजारोंमध्ये आहे. हे लोक हल्ले करण्यासाठी कारबॉंबचा वापर करु शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

        'इसिस'मध्ये रासायनिक हल्ला करण्याची क्षमता असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. इराक आणि सीरियामध्ये दहशतवादी सैनिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना प्रामुख्याने लक्ष्य करत असतात. युरोपात मात्र ते आपली रणनीती बदलून हल्ला करण्यास सोप्या अशा सार्वजनिक ठिकाणी स्फोट घडवत सामान्य नागरिकांना लक्ष्य करू शकतात. या सर्व शक्‍यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागणार आहे

‘जेम्स बॉण्ड’ अभिनेते रॉजर मूर यांचे निधन

        सात वेळा जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रॉजर मूर यांचे कर्करोगाने मंगळवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षांचे होते. रॉजर यांच्या कुटुंबियांनी मूर यांच्या ट्विटरवरून ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली. ‘आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की आमच्या वडिलांचं निधन झालं.’

      स्वित्झर्लंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत होता. रॉजर यांनी ‘दि स्पाय हू लव्ह मी’ आणि ‘लिव अॅण्ड लेट डाय’ या सुपरहिट बॉण्ड सिनेमांमध्ये काम केले होते. ते बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारे तिसरे अभिनेते आहेत. त्यांनी १९७३ पासून १९८५ पर्यंत जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा साकारली होती.

       रॉजरने जेम्स बॉण्ड सिनेमांशिवाय ‘दि सेंट’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. आतही त्यांच्या या मालिकेतील व्यक्तिरेखेची आठवण त्यांचे चाहते करतात

२२ मे २०१७

अभिषेक, गुरिंदरवीरला सुवर्ण

   भारताच्या धावपटूंनी दुसऱ्या आशियाई युवा मैदानी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि दोन ब्राँझ अशी एकूण पाच पदकांची कामगिरी केली. अभिषेक मॅथ्यू याने ८०० मीटर आणि गुरिंदरवीर सिंगने शंभर मीटर शर्यतीत सुवर्ण, तर सीमाने तीन हजार मीटर, तर अक्षय नैन याने ४०० मीटर शर्यतीत ब्राँझपदकाची कामगिरी केली. मुलांच्या गोळाफेक प्रकारात मोहित रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

    या स्पर्धेत अभिषेक मॅथ्यू भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता ठरला. त्याने ८०० मीटर शर्यतीत १ मिनीट ५४.९९१ सेकंद अशी सरस वेळ दिली. याआधी दोन वर्षांपूर्वी दोहा येथे बिआंत सिंगने या प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या शर्यतीत अभिषेकने श्रीलंकेच्या हर्षा दिसनायका मुदियानसेला याचे कडवे आव्हान अवघ्या शतांश २ सेकंदाने मागे टाकले. हर्षाने १ मिनिट ५४.९९३ सेकंद अशी वेळ दिली. अभिषेकपाठोपाठ दिवसाच्या अखेरच्या शर्यतीत गुरिंदरवीर सिंगने शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकताना वेगवान धावपटूच्या किताबासह सुवर्णपदक जिंकले. त्याने १०.७७ सेकंद अशी वेळी दिली. मलेशियाचा महंमद अईदेल सा ॲडन रौप्य, तर कोरियाचा सुनजाए चोई ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. 

        हिमाचल प्रदेशासारख्या डोंगरी भागातून आलेल्या सीमाने आशियाई स्पर्धेत भारताची लांब पल्ल्याच्या शर्यतीमधील पदकाची परंपरा  कायम राखली. यापूर्वी १९८० मध्ये सुमन रावत हिने लांब पल्ल्याच्या शर्यतीत असेच वर्चस्व राखले होते. सीमाने आज ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत १० मिनिट ५.२७ सेकंद अशी वेळ देत ब्राँझपदकाची कमाई केली. सीमाने आंतरराष्ट्रीय पदकाची कमाई केली असली, तरी तिला स्वतःचीच वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी साधता आली नाही. हैदराबाद येथे युवा राष्ट्रीय स्पर्धेत तिने ९ मिनिट ५६.२७ सेकंद अशी सरस वेळ दिली होती. कोरियाच्या चोई एल ग्याँग हिने १० मिनिट ९६ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक, तर व्हिएतनामच्या दोआन थु हॅंग हिने १० मिनिट २.१८ सेकंद वेळेसह ब्राँझपदक जिंकले. 

    मुलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचा अक्षय ४८.४९ सेकंद वेळेसह ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. इंडोनेशियाच्या इफान अनुग्रह सेटिआवान याने ४७.४७ सेकंद अशा राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकली. मलेशियाचा महंमद सुहैमी रौप्यपदकाचा मानकरी ठरला. भारताला पाचवे पदक मोहितने गोळाफेक प्रकारात मिळवून दिले. त्याने १८.८२ मीटर अशी गोळाफेक करताना ही कामगिरी केली. तैवानचा पो एन यंग १९.४० मीटर कामगिरीसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. जपानच्या कांटा मात्सुडा याने ब्राँझपदक मिळविले.

एव्हरेस्ट सर केलेल्या भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यु

      "माऊंट एव्हरेस्ट' सर केल्यानंतर परतताना सुमारे 200 मीटर उंचीवरुन खाली पडलेल्या 27 वर्षीय भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

      उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील रवी कुमार हा 8,200 मीटर इतक्‍या उंचीवर असताना हा अपघात घडल्याचे येथील पर्यटन विभागाचे संचालक असलेल्या दिनेश भट्टाचार्य यांनी सांगितले. हा अपघात झालेल्या भागास बाल्कनी असे नाव आहे. एव्हरेस्टच्या अंतिम चढाईस प्रारंभ करण्यापूर्वीचे हे शेवटचे विश्रांती स्थळ आहे.

     कुमार याने गेल्या शनिवारी दुपारी 1.28 च्या सुमारास एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळविले होते. कुमार याचा मार्गदर्शक लाक्‍पा वोंग्या शेर्पा यालादेखील हिमदंश झाल्याचे आढळून आले आहे. एव्हरेस्टवरुन खाली उतरताना कुमार व शेर्पाची चुकामूक झाल्याचे निष्पन्न झाले होते.

     1953 मध्ये एव्हरेस्ट पहिल्यांदाच यशस्वीरित्या सर करण्यात आल्यानंतर या शिखरावर पोहोचण्याच्या प्रयत्नांत आत्तापर्यंत सुमारे 300 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील 200 पेक्षा अधिक मृतदेह हे अजूनही एव्हरेस्टवरच असल्याचे मानले जात आहे.

२१ मे २०१७

गोल्डन ग्रांप्री स्पर्धेत जस्टिन गॅटलिन विजेता

     अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिन याने गोल्डन ग्रॅंड प्रिक्‍स स्पर्धेत शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला. त्याने १०.२८ सेकंद अशी सरस वेळ दिली. 

        अंतिम शर्यतीत गॅटलिनला जपानच्या धावपटूंकडून तगडे आव्हान मिळाले. त्याने जपानच्या असाका केंब्रिज याला केवळ शतांश तीन सेकंदाने मागे टाकले. स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत कॅनडाच्या ॲरॉन ब्राऊन याने २०.६२ सेकंद वेळ देत बाजी मारली. महिलांची शंभर मीटर शर्यत बल्गेरियाच्या इव्हेट लालोवा कॉलिओ हिने जिंकली. तिने ११.४० सेकंद वेळ देताना अमेरिकेच्या तवाना मिडोज हिला शतांश चार सेकंदाने मागे टाकले. ब्राँझपदक विजेता तिआना बाटोलेटा हिने लांब उडीतील जगज्जेतेपदाला साजेशी कामगिरी करताना ६.७९ मीटरच्या उडीसह सुवर्णपदक जिंकले.

बॅंकॉकमध्ये रुग्णालयात बॉम्बस्फोट

    शहरामध्ये असलेल्या फ्रामगुटस्कलाओ या रुग्णालमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 24 जण जखमी झाले आहेत.

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रामगुटस्कलाओ या रुग्णालयामध्ये लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱयांवर उपचार केले जातात. लष्करातील अधिकाऱयांवर उपचारासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. रुग्णालयात  बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये 24 जण जखमी झाले आहेत.

  रुग्णालयात तपासणीदरम्यान बॉम्ब तयार करण्याच्या वस्तू आढळून आल्या आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

२० मे २०१७

तेजस रेल्वे 22 मेपासून ट्रॅकवर

        मोठ्या प्रतिक्षेनंतर आता भारतीय रेल्वेची नवीन ट्रेन तेजस धावण्यासाठी तयार झाली आहे. या रेल्वेचा प्रवास 22 मे रोजी सुरू होणार आहे. पहिली रेल्वे मुंबई आणि गोवा या मार्गावरून धावणार आहे. अनेक नवी वैशिष्ट्ये आणि सुविधायुक्त असलेल्या या रेल्वेचे तिकीट दरही राजधानी आणि शताब्दीपेक्षा जास्त आहेत. विमानातील सोयीसुविधा या रेल्वेत पुरवण्यात आल्या आहेत. प्रत्येक आसनामागे एलसीडी स्क्रीन, स्मार्ट स्वच्छतागृह, वायफाय आदी सुविधा या रेल्वेत प्रवाशांना मिळणार आहेत. प्रवाशांना मनोरजंनाचे कार्यक्रम पाहता येतील. रेल्वेत वायफाय सुविधाही असेल. इतकंच नव्हे तर विमानात गरजेवेळी बटन दाबताच जशा एअर होस्टेस येतात. त्याचपद्धतीने रेल्वेत अटेंडेंटला बोलावण्यासाठी कॉल बेलची सुविधा देण्यात आली आहे.

         अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असलेल्या या रेल्वेची पाहणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. या रेल्वेत अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येणार असल्यामुळे याचे तिकीट दर जास्त असल्याचे ते म्हणाले. रेल्वे अधिकार्‍यांनी या रेल्वेच्या तिकीट दराबाबत अभ्यास केला जात असून लवकरच त्याची घोषणा केली जाईल, असे सांगितले.

         नावाप्रमाणेच ही रेल्वे सुमारे 200 किमी इतक्या वेगाने धावू शकते. परंतु, भारतीय रेल्वे रूळ इतका वेग सहन करू शकत नसल्यामुळे ती कमाल 130 किमी इतक्या वेगाने धावू शकेल. रेल्वे रूळांत योग्य बदल केल्यास 200 किमी वेगाने रेल्वे धावू शकते.

         भारतातील ही पहिलीच अशी रेल्वे आहे की, जिचे दरवाजे मेट्रो सारखे स्लायडिंग पद्धतीचे असतील. याचे नियंत्रण गार्डकडे असेल. त्यामुळे प्रवाशांसाठी ही अत्यंत सुरक्षित पद्धत ठरेल. यामुळे रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवाशाला चढता येणार नाही व रेल्वे थांबल्याशिवाय उतरता येणार नाही. अशा प्रकारच्या दरवाजांमुळे रेल्वेतून चढताना व उतरताना होणार्‍या अपघातावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल.

         रेल्वेच्या स्वच्छतागृहात टचलेस नळ आणि बायो व्हॅक्यूम यंत्रणा आहे. रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरांबरोबर पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टिम लावण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशाला पुढील स्थानक कोणते आहे, याची माहिती समजेल. रेल्वेत एलईडी लायटिंगबरोबर डेस्टिनेशन बोर्डही लावण्यात आले आहेत.

शिक्षण, आरोग्यसेवा करमुक्त

       शिक्षण आणि आरोग्यसेवांवर वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) न लावण्याचा निर्णय घेऊन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला. मात्र, त्याचबरोबर दूरसंचार, विमा, बँकिंग सेवा तथा बिझनेस क्लास विमान प्रवासावर अधिक कर लावण्यात आला असून, या सेवा महागणार आहेत.

      1 जुलै 2017 पासून लागू होणार्‍या जीएसटी प्रणालीतहत बहुतांश वस्तूंसह सेवाक्षेत्रासाठीचे कर दर निश्‍चित केले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच करप्रणालीत व्यापक बदल करून भारतीय अर्थव्यवस्थेने एक राष्ट्र, एक कर या नवपर्वात पदार्पण करण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. श्रीनगर येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी सेवाक्षेत्रांसाठीही जीएसटी दर निश्‍चित केले.

        दूरसंचार, विमान, हॉटेल आणि रेस्टॉरन्टसह विविध सेवांसाठी 5,12,18 आणि 28 टक्के अशा चार श्रेणीत कर लावण्यात येणार आहेत. दोन दिवसांच्या बैठकीनंतर जेटली यांनी वस्तू व सेवाकर प्रणालीतहत जीएसटी परिषदेने कोणत्या वस्तू व कोणकोणत्या सेवांसाठी कशाप्रकारे करांचे दर ठरविले, याची तपशीलवार माहिती दिली. लॉटरीवर कोणताही कर नसेल. जीएसटीचा महागाईवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही जेटली यांनी केला.

*   बिगर-वातानुकलीत रेस्टॉरन्टमधील भोजन बिलावर 12 टक्के जीएसटी लागेल. मद्य परवाना असलेल्या वातानुकुलीत रेस्टॉरन्टमध्ये हा कर 18 टक्के असेल. तसेच पंचातारांकित हॉटेलात 28 टक्के जीएसटी असेल.

*   50 लाख किंवा त्यापेक्षा कमी उलाढाल असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये 5 टक्के दराने कर लागेल. धुलाई यासारख्या ठेकेदारीच्या कामांसाठी 12 टक्के कर लागेल, असे जेटली यांनी सांगितले.

*   वाहतूक सेवेवर 5 टक्के कर लागेल. ओला, उबर यासारख्या टॅक्सी समूहांना हा दर लागू असेल. बिगर-वातानुुकूलित रेल्वे प्रवासही करातून वगळला आहे.

*   वातानुकूलित प्रवास तिकिटांवर 5 टक्के कर आकारला जाईल. विमान प्रवासासाठी इकॉनॉमी श्रेणीसाठी तसेच वाहतूक सेवेसाठी 5 टक्के कर लागेल.

*   मेट्रो, उपनगरीय रेल्वे प्रवास आणि धार्मिक यात्रेला (हज यात्रेसह) जीएसटीतून सूट दिली आहे, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सांगितले.

*   इकॉनॉमी श्रेणीतील विमान प्रवासावर 5 टक्के, तर बिझनेस श्रेणीसाठी 12 टक्के जीएसटी लागेल, असे त्यांनी सांगितले.

*   दररोज 1000 रुपयांपर्यंत प्रशुल्क श्रेणीतील हॉटेल्स आणि लॉजला जीएसटीतून सूट असेल. तसेच दरदिवस 1000 ते 2000 रुपये प्रशुल्क श्रेणीतील हॉटेल्स आणि लॉजसाठी 12 टक्के कर असेल. याचप्रमाणे 2500 ते 5,000 रुपये प्रशुल्काच्या हॉटेलसाठी 18 टक्के कर असेल.

*   करमणूक कर सेवाकरात विलीन केला आहे. सिनेगृहसेवा, अश्‍वशर्यतीवरील पैज किंवा जुगारावर 28 टक्के कर लागेल. सिनेगृहांसाठी प्रस्तावित कर दर सध्याच्या दराच्या तुलनेत 40 ते 55 टक्के कमी आहे. त्यामुळे चित्रपटांची तिकिटे स्वस्त होऊ शकतील. त्यावर अतिरिक्त शुल्क लावण्याचा अधिकार राज्यांकडे असेल.

१९ मे २०१७

डॅन डेव्हिड पुरस्कार

       भारतीय शास्त्रज्ञ, महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड केली. 10 लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असून तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशनच्यावतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. कुलकर्णी यांच्याअगोदर तीन भारतीयांना या पुरस्काराने गौरविले आहे. त्यात लेखक अमिताव घोष, संगीतकार जुबिन मेहता आणि रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव यांचा समावेश आहे.

       श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत खगोलभौतिकीचे प्रोफेसर आहेत. पॅलोमर ट्रॅन्शेंट फॅक्टरीचे संस्थापक आणि संचालक म्हणून ते ओळखले जातात. अवकाशात रात्रीच्या वेळी होणार्‍या बदलाच्या सिद्धांताचा शोध घेण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेल्या सर्व्हेक्षणाची जगाने दखल घेतली. यातून आकाशातील क्षणिक घटनांची विस्ताराने मिळण्यास मदत झाली. हा पुरस्कार येत्या 21 मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

      भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीन श्रेणीत डॅन डेव्हिड पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विज्ञान, मानवता आणि नागरी समाजात आपल्या कार्याच्या माध्यमातून अतुलनीय योगदान देणार्‍या व्यक्तीला दिला जातो. 

आयसीसी रँकिंगमध्ये भारत अव्वल

       इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी)च्या क्रमावारीत भारताने प्रथम स्थान कायम राखले आहे. कसोटी सामन्यासाठी आयसीसीने क्रमवारी जाहिर केली, त्यामध्ये भारत अव्वल स्थानावर कायम आहे.

       या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका द्वितीय स्थानावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये केवळ 6 पॉइंट्सचा फरक आहे. 9 पॉइंट्सच्या फरकाने ऑस्ट्रेलिया तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय संघाकडे सध्या 123 पॉइंट्स असून दक्षिण आफ्रिका 117 पॉइंट्सने द्वितीय स्थानावर आहे. जाहिर झालेल्या या रँकिंगनुसार ऑस्ट्रेलियाने तिसरे स्थान कायम राखले असले तरी 108 पॉइंट्सवरून 100 पॉइंट्सवर घसरले आहे.

        न्यूझीलंडच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाल्याने चौथ्या क्रमांकावरील इंग्लंड पाठोपाठ न्यूझीलंडने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. 93 पॉइंट्ससह पाकिस्तानला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. सर्व संघांची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया (-8), इंग्लंड (-2), पाकिस्तान (-4), झिंब्वाबे (-5) या संघांची कामगिरी घसरली आहे. झिंब्वाबेच्या संघ आयसीसीच्या क्रमवारीत शेवटच्या स्थानावर असून त्यांना शून्य पॉइंट्स मिळाले आहेत.

वनस्पतींच्या 1,730 नवीन प्रजाती

       गेल्या वर्षभरात वनस्पतींच्या 1,700 हून अधिक प्रजातींचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. यातील अनेक प्रजातींचा अन्न, औषधे यांसाठी वापर होऊ शकतो, असे याबाबतच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, नव्याने शोध लागलेल्या या प्रजातींमधील काही प्रजाती आधीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

        इंग्लंडमधील द रॉयल बोटॅनिक गार्डन या संस्थेने आपला स्टेट ऑफ वर्ल्ड प्लँट्स अहवाल नुकताच जाहीर केला. त्यानुसार, 2016 मध्ये एकूण 1,730 नवीन वनस्पतींच्या प्रजातींचा शोध लागला. यामधील 11 प्रजाती ब्राझीलमधील मानिहोत या झुडपाच्या आहेत. या रोपाचे कॅसाव्हा हे पिष्टमय मूळ मोठ्या प्रमाणावर अन्न म्हणून वापरले जाते. या भागातील लाखो लोकांच्या अन्नात याचा समावेश असतो.

        दक्षिण आफ्रिकेत आढळणार्‍या रेडबुश किंवा रूइबोस नावाने ओळखल्या जाणार्‍या रोपाच्या 7 नवीन प्रजातीही संशोधकांना आढळल्या आहेत. मात्र यातील 6 प्रजाती अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. त्याशिवाय, सौंदर्यप्रसाधने आणि औषध उद्योगामध्ये वापरल्या जाणार्‍या कोरफडीच्याही काही प्रजाती गेल्या वर्षभरात नव्याने आढळून आल्या. त्याखेरीज आले, व्हॅनिला, ऊस या पिकांच्याही आजवर ज्ञात नसलेल्या प्रजाती नव्याने आढळल्या आहेत. प्रजातींच्या जैविक रचनेबद्दल अधिक जाणून घेण्याच्या उद्देशाने सुमारे 200 प्रजातींचे जनुकीय नकाशे तयार केले आहेत. यामध्ये अननस, स्ट्रॉबेरी, कॉफी, चॉकलेट, यांसारख्या खाद्य-पेयांच्या प्रजातींचा समावेश आहे.

१८ मे २०१७

अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

        ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना छातीत दुखू लागल्याने अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

         मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अभिनयाच्या बळावर मोठा नावलौकिक मिळविला होता. चित्रपटातील आई म्हणून त्यांची ओळख होती. विशेषतः अभिनेता सलमान खानची आई म्हणून त्यांनी अनेक चित्रपट केले. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबतचे के दिल अभी भरा नही हे त्यांचे अखेरचे नाटक ठरले. मैने प्यार किया, हम आपके है कौन, जिस देस मे गंगा रहती है यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शक्ती योजना

        सर्व वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी शक्ती (स्किम फॉर हार्नेसिंग अँड अलोकेटिंग ऑफ कोयला ट्रान्सपरन्टली इन इंडिया) या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने मान्यता दिली.

        करचोरीच्या माध्यमातून काळ्या पैशाची निर्मिती थांबविण्यासाठी जी-20 देशांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहुपक्षीय कराराची सूचना केली होती. त्यातून साकारलेल्या करसंबंधी आंतरराष्ट्रीय कराराला मान्यता देण्यावरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.

        पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी दिली. प्रत्येक वीज प्रकल्पाला पुरेसा आणि पारदर्शक पद्धतीने कोळसा मिळावा, तसेच भविष्यात सुरू होणार्‍या केंद्रांसाठीही कोळशाच्या उपलब्धतेची हमी असावी, यासाठी हे धोरण आणले असल्याचे सांगताना ऊर्जामंत्री गोयल यांनी यूपीए सरकारच्या काळातील कोळसा धोरणावर टीका केली.

          करचोरीच्या माध्यमातून काळ्या पैशाची निर्मिती थांबविण्यासाठी जी-20 देशांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहुपक्षीय कराराची सूचना केली होती. त्यातून साकारलेल्या करसंबंधी आंतरराष्ट्रीय कराराला मान्यता देण्यावरही मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. भांडवली नफ्यावरील कर (कॅपिटल गेन टॅक्स) चुकविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करणार्‍या कंपन्यांना यामुळे चाप बसणार असल्याचा दावा गोयल यांनी केला.

           दरम्यान, सर्व गरोदर आणि स्तनदा मातांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबरला केलेल्या घोषणेलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने  औपचारिक मंजुरी दिली. हे अर्थसाहाय्य तीन टप्प्यांत दिले जाणार असून, गरोदर आणि स्तनदा मातांच्या थेट बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र, ही मदत पहिल्या अपत्यासाठीच मिळणार आहे.

स्वतंत्र ओबीसी विभागाची स्थापना

        इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला असून, त्याला विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, असे नाव दिले आहे. सध्या या विभागाची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.

        या नवीन विभागाकडे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील अनेक विषय हस्तांतरित केले असून, त्या संबंधीची अधिसूचनाही काढली आहे. त्यानुसार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत यंत्रणा व महामंडळे ही नवीन विभागाकडे वर्ग केली आहेत. या प्रवर्गांच्या कल्याणकारी योजनांसाठी समन्वय साधण्याचे कामही हा विभाग करेल. इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेली अनुदाने या विभागाला मिळतील. चारही प्रवर्गांसाठी असलेली वसतिगृहे, आश्रमशाळा, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन, तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळा/निवासीशाळा, या प्रवर्गांसाठीच्या सहकारी गृहनिर्माण योजना, आंतरजातीय विवाह योजना, केंद्र व राज्य शासनाची शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, विद्यावेतन आणिव्यावसायिक प्रशिक्षण योजना ही कामे नवीन विभागामार्फत चालतील. चारही प्रवर्गांसाठी स्वयंसेवी आणि अशासकीय संस्थांना अर्थसहाय्य आणि अनुदान देणे, या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे ही कामेही नवीन विभागामार्फत चालतील.

            या विभागासाठी पदनिर्मिती व आकृतीबंधास मंजुरी दिली असून लवकरच पूर्णवेळ अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तोपर्यंत विभागाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सामाजिक न्याय विभागातील 3 सहसचिव, 5 अवर सचिव आणि 6 कक्ष अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. नवीन विभागाच्या अखत्यारितील सर्व विषयांच्या फाईली आम्ही त्यांच्याकडे पाठवून दिल्या आहेत, असे सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन

     केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री अनिल माधव दवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवे यांना नवी दिल्लीतील एस्म हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्यांनी एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्‍वास घेतला.

      नर्मदा नदीच्या बचावासाठी अनिल माधव दवे यांनी खूप काम केले आहे. त्यांनी पर्यावरणाच्या जतनीकरणासाठी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरही पुस्तक लिहिले होते.

१७ मे २०१७

कौशल्य विकास कार्यक्रम

        समुद्रकिनारा लाभलेल्या महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांसह देशातील 80 जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याबाबत जहाजबांधणी मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयांमध्ये सामंजस्य करार झाला. परिवहन भवन येथे केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया व उभय मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित होते.

       देशातील सागरी किनार्‍यालगतच्या जिल्ह्यांतील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच बंदरे व जहाजबांधणी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ मिळावे, या उद्देशाने गडकरी यांच्या मंत्रालयातर्फे कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून हा जहाजबांधणी मंत्रालयाचा सागरमाला प्रकल्प व दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण करार झाला.

       जहाजबांधणी मंत्रालयाने देशाच्या विविध राज्यांत यापूर्वी हा कौशल्य विकास प्रकल्प पथदर्शी स्वरूपात राबविला. राज्यातील 7 जिल्ह्यांना 780 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. यात मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. मुंबई आणि रायगड या 2 जिल्ह्यांमध्ये नवा प्रकल्प प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.

एटीएसला मिळणार नवे मुख्यालय

       10 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाची अर्थात एटीएसची कायमस्वरूपी मुख्यालयाची शोधाशोध थांबणार आहे. नवे अत्याधुनिक मुख्यालय उभारण्याकरिता चिंचपोकळी येथील पोलिस खात्याच्याच मध्य प्रादेशिक विभागाच्या जागेची निवड झाली आहे. या जागेवर पोलिस खात्यासाठीच उभारण्यात येणार्‍या 25 मजली टोलेजंग इमारतीतील 8 मजले एटीएससाठी राखीव असतील.

         या इमारतीचा आराखडा मुंबई पोलिस आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर विविध परवानग्यांसाठी हा प्रस्ताव पुढे सरकारकडे जाईल. दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपाडा या ठिकाणी सध्या अतिरिक्त पोलिस आयुक्त, झोन 2चे पोलिस उपायुक्त आणि एटीएस प्रमुख बसतात. दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी 2004 मध्ये एटीएसची स्थापना केली. त्यावेळी नागपाडा दक्षिण प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील जागा एटीएसला मुख्यालयासाठी दिली होती. एटीएसच्या कामाचा आवाका वाढत गेल्याने कंट्रोल रुम, संगणक कक्ष, माहिती विभाग यासाठी ही जागा फारच तोकडी पडत होती. त्यामुळे मुख्यालयासाठी नव्या जागेचा शोध सुरू होता.

       मध्य प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाची जागा अंदाजे दीड एकर एवढी आहे. अनेक वर्षांपासून इथे असलेल्या या कार्यालयाच्या जागेवर 25 मजल्यांची टोलेजंग इमारत उभी केली जाणार आहे. या इमारतीत एटीएस मुख्यालयाचे स्थलांतर केले जाणार आहे. या इमारतीतील 8 मजले एटीएससाठी राखीव असतील. उर्वरित मजल्यांवर गुन्हे शाखा 3 आणि 4 यांचे कार्यालय असेल. त्याचबरोबर क्यूआरटी आणि इतर विभागीय कार्यालयांची जागा निश्‍चित केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असेल आणि त्यामध्ये पोलिसांसाठी अत्याधुनिक जिम, पुरुष-महिलांसाठी रेस्ट रूम, कॅन्टिन, पार्किंग व्यवस्था असणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमळकर

       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी जाहीर केले.

        करमळकर हे पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. विद्यमान कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांचा कार्यकाळ 15 मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे कुलगुरू पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमार्फत कुलगुरुपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. कुलगुरुपदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. छाननीनंतर केवळ 36 उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये डॉ. करमाळकर यांच्यासह प्रा. एम. राजीवलोचन, प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. अंजली क्षीरसागर यांच्यासह अन्य काही जणांना समावेश होता.

पॅरामोटरमध्ये भारताला सुवर्ण

       पॅरामोटर या साहसी क्रीडा प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देऊन राहुरीच्या आप्पासाहेब ढुस यांनी इतिहास घडविला आहे़.  त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक पॅरामोटर चॅम्पीयनशीप स्पर्धेतील आप्पासाहेब ढुस यांचा सहभाग निश्चित झाला आहे़

       एशियन-ओशियानिक पॅरामोटर चॅम्पीयनशीप व वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पीयनशीप टेस्ट कॉम्पिटीशन (प्री वर्ल्ड कप) स्पर्धा नुकतीच थायलंड येथे १ ते ७ मे दरम्यान झाली़ या स्पर्धेत भारतातून आप्पासाहेब ढूस व इंडिगो कंपनीतील वैमानिक पी़ आ़ सिंग (हैदराबाद) यांनी तर रुस, जपान, आॅस्ट्रेलिया, कतार, थायलंड आदी देशांमधील ६७ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता़ राहुरी येथील आप्पासाहेब ढुस यांनी प्युअर इकॉनॉमी टास्क या प्रकारात सुवर्णवेध घेतला़ या टास्कमध्ये ढुस यांनी १ तास २८ मिनिट ३९ सेकंद इतकी वेळ नोंदवून सर्वाधिक वेळ हवेत तरंगण्याचा विक्रम केला़ तसेच ३५०० फूट उंचीवर उड्डाण घेत सर्वाधिक १८ गुण ढुस यांनी मिळविले़ तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या थायलंड येथील पायलट वोरावी विथायायारनोन याने १ तास २० मिनिटे २८ सेकंद वेळ नोंदवून १३ गुणांची कमाई केली़ थायलंडच्याच समन प्रोमनारी याने १ तास १२ मिनिटे ४३ सेकंद इतकी वेळ नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला़ आप्पासाहेब ढुस यांना या स्पर्धेसाठी स्पेनच्या डेव्हीड ग्राऊपॅरा यांनी मार्गदर्शन केले़ भारताचे दुसरे खेळाडू सिंग यांना रजत पदकावर समाधान मानावे लागले़

१६ मे २०१७

निफ्टीने गाठली ऐतिहासिक पातळी, 9500 अंशांच्या पार

       सेन्सेक्सने 30,590.71 अंशांची उच्चांकी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 62 अंशांची झेप घेत 9500 अंशांची ऐतिहासिक पातळी ओलांडली आहे. केंद्र सरकारची 3 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असल्याचे शेअर दलालांनी सांगितले.

          परदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी तेजीचे नवे शिखर सर केले. सेन्सेक्स 255 अंशांच्या वाढीसह 30,554 अंशांवर व्यवहार करत आहे. वाहन उत्पादक कंपन्या, बँका, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्या, ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रात खरेदी दिसून आली. याशिवाय महागाईचा दिलासा आणि कॉर्पोरेटचे समाधानकारक निकालांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवला.

        मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची आगेकूच कायम राहिली. एप्रिलमध्ये घाऊक महागाई आणि किरकोळ महागाईचा दर कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून आगामी पतधोरणात व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान चलन बाजारात रुपयाची दमदार कामगिरी सुरूच आहे. निर्यातदारांनी बाजारात डॉलरची विक्री केली. ज्याचा रुपयाला फायदा झाला. त्यामुळे रुपयानेदेखील गेल्या 21 महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

जीवन उमंग योजना

        आयुर्विमा क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) जीवन उमंग योजना लाँच केली. 90 दिवसापासून 55 वर्षांपर्यंत व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात. विमा धारकांना चांगला परतावा मिळावा या उद्देशाने एलआयसी शेअर बाजारात गुंतवणूक करते. एलआयसी बाजारातील ट्रेडर नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष व्ही. के शर्मा यांनी सांगितले. 2016 मध्ये शेअरमध्ये 40 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. यंदाही त्याच प्रमाणात केली जाईल. महामंडळाचे भांडवल आणि विमाधारकांचे हिताचे रक्षण करूनच गुंतवणूक केली जाईल. एलआयसी शेअर बाजारातील सर्वात मोठी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार आहे.

पेट्रोल, डिझेल स्वस्त

       सर्वसामान्यांना पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रतीलिटर 2.16 रुपयांनी, तर डिझेलचे दर प्रतीलिटर 2.10 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

      आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये घट झाल्याने त्याचे पडसाद भारतातही उमटले. पेट्रोलियम कंपन्यांनी 15 मेच्या रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. या महिनाभरात पेट्रोलियम कंपन्यांनी दुसर्‍यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे. यापूर्वी 1 मे रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ कपात केली होती.

       भारतातील पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. पण आता कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 5 शहरांमध्ये हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. त्याच्या यशस्वीतेनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या 5 शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे.

मोदी फेस्टिव्हल

       केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार येऊन तीनवर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात 'मोदी फेस्टिव्हल' साजरा करण्याचा निर्णय घेतला. येत्या 26 मे पासून सुरु होणारा हा फेस्टिव्हल तीन आठवडे चालणार आहे. देशातील 125 जिल्ह्यांमध्ये हा फेस्टिव्हल साजरा होणार असून, या माध्यमातून विकासाचा अजेंडा आणि मोदी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे.  
 
     मागची निवडणूक आम्ही लोकांमध्ये आशावाद, अपेक्षा निर्माण करुन जिंकली. पुढच्या निवडणुकीत आम्ही काय कामे केली, किती आश्वासने पूर्ण केली ते घेऊन लोकांसमोर जाणार आहोत. हा फेस्टिव्हल त्या योजनेचाच एक भाग आहे असे एका भाजपा नेत्याने सांगितले. या नेत्यावर फेस्टिव्हलसाठी प्रदेश भाजपाबरोबर समन्वय साधण्याची जबाबदारी  आहे. 
 
   या फेस्टिव्हलमध्ये  विविध सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मोदी सरकारने घेतलेल्या वेगवेगळया धोरणात्मक निर्णयावर चर्चा होईल. एकूणच सरकारच्या कामकाजाचे मुल्यमापन होईल. जूनच्या मध्यापर्यंत हा फेस्टिव्हल चालणार आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून भाजपा ज्या भागांमध्ये मर्यादीत आहे तिथे पक्ष विस्ताराचे लक्ष्य ठेवले आहे.  येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला तीनवर्ष पूर्ण होतील. मोदी स्वत: त्या दिवशी गुवहाटीला जाणार आहेत. मोदींच्या गुवहाटी दौ-यात या फेस्टिव्हलचा शुभारंभ होईल. 
 
      त्यानंतर मोदी स्वत: दिल्ली, पुणे, बंगळुरु, कोलकाता आणि जयपूर या शहरांमध्ये जाऊन आपल्या सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडतील. येत्या 25 मे पासून ते न्यू इंडिया नावाची एक मोहिमही सुरु करणार आहेत. 

'रॅन्समवेअर'ने बॅंकांना धडकी

    रॅन्समवेअर व्हायरसने बॅंकिंग क्षेत्राला धडकी भरवली असून व्हायरसमुळे बॅंकिंग यंत्रणेत अडथळा येऊ नये, म्हणून रिझर्व्ह बॅंकेने एटीएम यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश बॅंकांना दिले आहेत.  देशातील बहुतांश बॅंकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम सेवा बंद ठेवण्याला प्राधान्य दिले.

       बॅंकांनी उचललेल्या पावलामुळे देशभरातील सुमारे 60 टक्के एटीएम बंद होती. रॅन्समवेअर व्हायरसचा प्रभाव आणि एटीएम यंत्रणा अद्ययावत करण्यास वेळ लागणार असल्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस एटीएम सेवेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

        भारतात एकूण दोन लाख 25 हजार एटीएम आहेत. तब्बल 60 टक्के एटीएम विंडोज एक्‍सपी प्रणालीवर काम करत आहेत. ही प्रणाली कालबाह्य झाल्याने सायबर हल्ल्याला बळी पडू शकते, असा संशय रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला आहे. एटीएम संवेदनशील असून त्या त्यापार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बॅंकांनी एटीएम यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत.

       सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्टनेही विंडोजवर अवलंबून असलेली एटीएम अद्ययावत करण्यासाठी विशेष सुरक्षा "पॅच' जारी केला .एटीएममध्ये कोणताही डेटा नसल्याने ग्राहकांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा एटीएम व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनी केला .

१५ मे २०१७

विवेक देशपांडे यांची जेएनपीटीवर फेरनियुक्ती

       जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर येथील रूद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे चेअरमन विवेक देशपांडे यांची केंद्र सरकारने फेरनियुक्ती केली. या ट्रस्टवर निवड झालेले मराठवाड्यातील ते एकमेव असून सलग तिसर्‍यांदा त्यांची निवड झाली आहे. पहिली निवड 6 महिन्यांसाठी, तर दुसरी 2 वर्षांसाठी होती. या काळात 6,000 कोटींची कामे मार्गी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जपान दौर्‍यात मराठवाड्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व देशपांडे यांनी केले होते. या ट्रस्टवर देशपांडे यांच्याशिवाय शिपिंग मंत्रालयाचे संयुक्त सचिव बरून मित्रा, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल विशेष सचिव शशी शेखर, उरण येथील महेश रतन बाल्डी, मुंबईचे प्रमोद जठार, नागपूरचे राजेश बागडी आदींचा समावेश आहे.

लष्करी सामर्थ्यात भारत चौथ्या क्रमांकावर

      जगभरात प्रत्येक देशाचा शस्त्रास्त्रांच्या भंडारातून स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही सर्व देशांमध्ये अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचे समोर आले आहे. अमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीने स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण 51 मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो.

       रिपोर्टनुसार, अमेरिका स्वतःच्या संरक्षणासाठी जवळपास 600 बिलियन डॉलर एवढा खर्च करतो. तर रशिया एका वर्षात जवळपास 54 बिलियन डॉलर खर्च करतो, चीन 161 बिलियन डॉलर खर्च करतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पदावर विराजमान झाल्यानंतर संरक्षण सामर्थ्यावर अधिक भर देणार असल्याचे सूतोवाच केले होते. अमेरिकेच्या संरक्षण बजेटमध्ये जवळपास 54 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. इसिसचा खतरा लक्षात घेता ट्रम्प यांनी संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल रँकिंगच्या यादीत जवळपास 106 देशांचा समावेश आहे. ज्यात अनेक घटकांचा विचार करण्यात आला आहे. यात संरक्षण बजेट, लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांच्या संख्येवर भर देण्यात आले आहे.

      अमेरिकेकडे 5884 टँक्स, 19 एअरक्राफ्टयुक्त हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 13,762 एअरक्राफ्ट, 415 चे नौदल सामर्थ्य असून, त्यांच्या लष्करी जवानांची संख्या 1,400,000 च्या घरात आहे, तर रशियाकडे 20,215 टँक्स, 1 हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 3794 एअरक्राफ्ट आणि 352 नौदल सामर्थ्य असून, रशियाच्या सैन्याची संख्या 766055 जवळपास आहे. चीनकडे 6457 टँक्स, 1 हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 2955 एअरक्राफ्ट 714 नौदल सामर्थ्य असून, त्यांच्या पीपल लिबरेशन आर्मीतील जवानांची संख्या 2335000 आसपास आहे. या सर्व देशांच्या पंक्तीत भारतही विराजमान झाला आहे. भारताकडे 4426 टँक्स, 3 हेलिकॉप्टर केरिअर, 2102 एअरक्राफ्ट, 295 नौदलाचे सामर्थ्य आणि 1325000 जवानांची संख्या आहे.

१४ मे २०१७

भारतातील सर्वात मोठा पूल

      भारताच्या सीमेजवळ तयार केलेल्या सर्वात मोठ्या पुलाचे 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. चीनच्या सीमा रेषेजवळच्या असलेला 9.15 किलो मीटरचा हा पूल आसाममधील ब्रम्हपुत्रा नदीवर  बांधला आहे. युद्धात वापरण्यात येणार्‍या 60 टन वजनाच्या टँकरची वाहतूक करण्याची या पूलाची क्षमता आहे.       

       ब्रम्हपुत्रा नदीवरील धोला-सादिया या पुलाच्या उद्घाटनासोबतच मोदी सरकारला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताचे कार्यक्रमदेखील देशभरात सुरु होणार आहेत. 

      भारताच्या सीमेची सुरक्षा विशेषतः ईशान्य भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीने या पूलाची निर्मिती केली आहे. याशिवाय यामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील नागरिकांना रेल्वे आणि हवाई वाहतूकीसोबतच रस्ते वाहतुकीने संपर्क साधण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक 3.55 किलोमीटर इतका आहे. यादृष्टीने पाहिल्यास धोला-सादिया हा भारतातील सर्वात मोठा पूल आहे.

       या पुलाच्या निर्मितीचे काम 2011 मध्ये सुरु झाले होते. केवळ नागरी कारणासाठी नव्हे तर लष्करालादेखील या पुलाचा वापर करता यावा यादृष्टीने याची निर्मिती केली आहे. पबल निर्मितीसाठी 950 कोटी इतका खर्च केला आहे. आसामच्या राजधानीपासून 540 किलो मीटर, अरुणाचलच्या राजधानीपासून 300 किलो मीटर अंतरावर हा पूल आहे. या पुलापासून चीनची हवाई सीमा केवळ 100 किलो मीटर इतकी आहे. 

जगातील सर्वात मोठी शिवमूर्ती गिनीजमध्ये

      ईशा योग फौंडेशन येथे असलेल्या आदियोगी भगवान शिवच्या 112 फुटी मूर्तीचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. गिनीजने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

       शिव प्रतिमा 112.4 फूट उंच, 24.99 मीटर रुंद आणि 147 फूट लांब आहे. या प्रतिमेचे अनावरण 11 मार्च 2017 रोजी केले होते. ईशा फाउंडेशन देशात याप्रकारची आणखी 3 मूर्ती स्थापन करणार आहे.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारीला तामिळनाडूमध्ये कोईंमतूरच्या बाहेर असणार्‍या ईशा योग फौंडेशनमध्ये स्थापन केलेल्या प्रतिमेचे उद्घाटन केले होते. ही मूर्ती पाहण्यास रोज हजारोंच्या संख्येने लोक येथे येतात. 

१3 मे २०१७

इस्रो लाँच करणार जीएसएलव्ही मार्क-3 रॉकेट

       भारतीय अंतराळ संशोधन संस्था जून महिन्यात जीएसएलव्ही मार्क-3 रॉकेट (भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहन मार्क-3) लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे सर्वात ताकदवान रॉकेट असून 4 टनाच्या कम्युनिकेशन सॅटेलाईटचे वहन करू शकते. अंतराळ तज्ज्ञांच्या मते ही खूप मोठी कामगिरी आहे. भारताचे अशा पद्धतीचे हे पहिलेच मिशन आहे. इस्रोने या रॉकेटला गेमचेंजर नाव दिले आहे.

        ग्लोबल सॅटेलाईट लाँच मार्केटमध्ये अब्जावधी डॉलरची उलाढाल होत असते. भारत या मार्केटमध्ये मोठा हिस्सा मिळवण्याच्या तयारीने आपली वाटचाल करत असून आंतरराष्ट्रीय सॅटेलाईट लाँच व्हेईकलवरचे आपले अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्नात आहे. इस्रोने जून महिन्यात भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहन मार्क-3 (जियोसिन्क्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल जीएसएलव्ही)चे लाँचींग करण्यात येणार आहे.

        भौगोलिक उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या मदतीने सॅटेलाईटला अंतराळ कक्षेत सुस्थित पाठवले जाते. सध्याचे उपग्रह प्रक्षेपण वाहन 2.2 टन वजनाचे सॅटेलाईट प्रक्षेपित करू शकते.

         इस्रोचे चेअरमन किरण कुमार यांनी म्हटले आहे की, जीएसएलव्ही मार्क-3 रॉकेटमध्ये 4 टन वजनाचे सॅटेलाईट वाहून नेण्याची क्षमता आहे. आमचे पुढचे ध्येय हे रॉकेट यशस्वीरित्या लाँच करणे हे आहे. श्रीहरिकोटा येथे सर्व व्यवस्था झाली आहे. सध्या उपग्रहाला हीट शील्डमध्ये जोडण्याची तयारी सुरू असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

*   ग्लोबल सॅटेलाईट लाँच मार्केटमध्ये भारताची मोठी भरारी मारण्याचा उद्देश

*   जीएसएलव्ही मार्क-3 भौगोलिक उपग्रह प्रक्षेपक जूनमध्ये लाँच करणार

*   जीएसएलव्ही मार्क-3 मध्ये 4 टन वजनाचे सॅटेलाईट वाहून नेण्याची क्षमता

जगातील सगळ्यात काळा रंग

        प्रत्येक रंगाला अनेक छटा असतात. काळ्या रंगालादेखील तशा छटा आहेत. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की काळ्या रंगात सगळ्यात गडद म्हणजेच जगातील सगळ्यात काळा रंग वेंटाब्लॅक नावाचे मटेरियल आहे. ते एवढे काळे आहे की, ते कोणत्याही ओबडधोबड वस्तूवर किंवा मूर्तीवर ओतले की, तो पृष्ठभाग किंवा मूर्ती एकदम सपाट बनते. जगातला हा सगळ्यात काळा पदार्थ आहे. तो प्रकाशाचा 99.96 टक्के भाग शोषून घेतो. त्याला ब्रिटनच्या नॅनोटेक कंपनी सरे नॅनोसिस्टम्सने 2014 मध्ये विकसित केले. कंपनीने नुकतेच त्याला स्प्रेच्या रूपात सादर केले.

       वेंटाब्लॅक एवढा काळा आहे की, तो ठार अंधारासारखा दिसतो. वेंटाब्लॅक हा काही पेंट नाही. तो कार्बनच्या नॅनोट्यूब्जचा वापर करून तयार झाला आहे. त्यातील प्रत्येक नॅनोट्यूबची जाडी 20 नॅनोमीटरच्या बरोबरीची आहे. म्हणजे ते केसाच्या जाडीपेक्षाही 3500 पट पातळ आहे. त्यांची लांबी 14 ते 50 मायक्रोन्सपर्यंत आहे. म्हणजे ते एक वर्गसेंटीमीटरच्या छोट्याशा जागेत एक अब्ज नॅनोट्यूब्ज मावतील.

ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

      माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक व ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (79) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने 12 मे रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले. मानसोपचारातील भीष्म असणार्‍या बाम यांनी भारतातील क्रीडापटूंना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे शिवधनुष्य उचलले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन बहिणी असा परिवार आहे. बाम हे योग विद्येसंदर्भात महात्मा सभागृहात व्याख्यान देत असतानाच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

        विश्‍वविक्रमवीर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आदी क्रिकेटपटूंसह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच विश्‍वविक्रमवीर बिलियर्डसपटू गीत सेठी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिक एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन भीष्मराज बाम यांनी केले. राज्य शासनाने त्यांना 2011-12 वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले होते.

         बाम यांनी सेवानिवृत्तीनंतर भारतीय योगशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातून क्रीडा मानसोपचार विषयावर प्रभुत्व मिळविले. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या नेमबाजी संघासह मुंबई रणजी संघाचे मानसोपचार सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले होते. विजयाचे मानसशास्त्र, मार्ग यशाचा, संधीचे सोने करण्याची इच्छाशक्ती, मना सज्जना आणि विनिंग हॅबीटस् ही त्यांची पुस्तके गाजली. विनिंग हॅबीटस् या पुस्तकाचा 12 भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित केला आहे.

१२ मे २०१७

चीनसमोर मोठे आव्हान

       भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात प्रचंड वेगाने वाढण्याची शक्यता असल्याने चीनने ही स्पर्धा पुरेशा गांभीर्याने घ्यावी, असा सल्ला चीनमधील तज्ज्ञांच्या गटाने तेथील सरकारला दिला आहे. चीनने पुरेसे लक्ष न दिल्यास भारताच्या यशाकडे केवळ पाहत बसावे लागेल, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकास करत असून, गुंतवणुकीला आकर्षित करून घेण्यात भारताचा आत्मविश्‍वास दिसून येत आहे. तसेच, स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या मोदी यांच्या धोरणाचाही सकारात्मक परिणाम गुंतवणूकदारांवर होत असल्याचे या तज्ज्ञांच्या गटाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

        सध्या जगातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनने विकासाचे पर्यायी धोरणही तयार करणे आवश्यक आहे. चीनमधील युवकांचे प्रमाण कमी होत असताना भारतातील तरुणवर्ग मात्र नवी आव्हाने अंगावर घेण्यास सज्ज आहे. त्यामुळे चीनने आतापासूनच लक्ष न दिल्यास भारताच्या यशाचा एक साक्षीदार म्हणून चीनचे स्थान राहील, असे या अहवालात स्पष्टपणे सांगतिले आहे. भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढत असताना चीनचा वेग कमी होत असल्याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

         जागतिक बँकेकडून कर्ज मिळवून आगामी 5 वर्षांमध्ये विविध सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये जवळपास 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची भारताला अपेक्षा आहे. याबाबतीत जगातील कोणताच देश सध्या भारताशी स्पर्धा करू शकत नाही. चीनने भारताच्या या धोरणांचा अद्यापही नीट अभ्यास केलेला नाही. चीनमधीलही अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. जागतिक गुंतवणूकदारांसमोर भारताने योग्य स्पर्धात्मक वातावरण निर्माण केल्यास ते चीनसमोर मोठे आव्हान असेल, असेही अहवालात म्हटले आहे.

मिळकतकर भरणार्यांना 5 लाखांचा विमा

         मिळकतकर भरणार्‍या नागरिकांना 5 लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते कर्वेनगरदरम्यान मुठा नदीवर पूल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात ग्रेडसेपरेटर, कोथरूडमध्ये शिवसृष्टी, ‘ई-गव्हर्नन्स’वर भर आदी विविध प्रकल्प आणि योजनांचा समावेश असलेला 2017-18 या वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सर्वसाधारण सभेत सादर केला. हा अर्थसंकल्प 5,912 कोटी रुपयांचा आहे.

        पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणांना प्राधान्यक्रम देणारा हा अर्थसंकल्प आहे. मिळकतकर आणि पाणीपट्टीची सुमारे 1700 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यास प्राधान्य देऊन महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाद्वारे केला आहे. या अर्थसंकल्पात सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागांसाठी पुरेशी तरतूद केली असून, त्यामुळे शहराचा समतोल विकास साधला जाणार आहे.

        महापालिकेच्या 2016-17 च्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 165 कोटी रुपयांची वाढ केली आहे.

        महापालिका आयुक्तांनी 5600 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला होता. तो 312 कोटी रुपयांनी वाढविण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी सुचविलेली करवाढ स्थायी समितीने रद्द केली आहे. त्याऐवजी मिळकतकर आणि पाणीपट्टीची असलेली मोठ्या प्रमाणावरील थकबाकी वसूल करण्यावर यंदा भर देण्यात येणार आहे. यासाठी मिळकतकराबाबत न्यायालयात अडकलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमण्यात येणार आहे.

        प्रामाणिकपणे मिळकतकर भरणार्‍या मिळकतधारकांचा 5 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला जाणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणार्‍या या योजनेसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच शहरातील मिळकतींची ‘जीआयएस’ मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामुळे मिळकतकर आकारणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे.

      पुणे शहराचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा अंमलबजावणीसाठी अंतिम टप्प्यात पोचला आहे. हा आराखडा प्रलंबित असल्यामुळे गेली काही वर्षे बांधकाम व्यवसायात शिथिलता आली होती, परंतु विकास आराखडा मंजूर झाल्यामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यातून बांधकाम परवानगी शुल्क आणि पेड एफएसआयच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ होईल. रस्ते खोदाई, सेवा शुल्क, अग्निशामक दल, आकाशचिन्ह विभागाच्या माध्यमातूनही महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर भर राहील.

        24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी पहिल्या वर्षी 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्यात येणार आहेत. यामुळे या योजनेला चालना मिळणार असून, पाणीपुरवठा योजनेच्या महसुली व भांडवली कामांसाठी 1140 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जायकाच्या सहकार्यातून राबविण्यात येणार्‍या नदीसुधार योजनेला यंदा प्रारंभ होणार आहे.

       हा अर्थसंकल्प वास्तवदर्शी असून, शहराचा समतोल विकास साधण्याला यामध्ये प्राधान्यक्रम दिला आहे. या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करतानाच सभागृहातील सर्व सदस्य आणि प्रशासनाला सोबत घेऊन महापालिकेच्या उत्पन्नाचे मार्गही वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू.

* मुरलीधर मोहोळ - अध्यक्ष, स्थायी समिती

* कचरा प्रक्रियेसाठी प्रकल्प -

         शहरातील कचरा समस्येवर मात करण्यासाठी उरुळी देवाची येथे 750 टन मिश्र कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येणार असून, येथील कचरा डेपोच्या कॅपिंगचे कामही 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मोशी, पिंपरी सांडस येथील कचरा प्रकल्पांसाठीच्या जागा ताब्यात घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

* पीएमपीसाठी 357 कोटी -

         सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मेट्रो कंपनीच्या माध्यमातून शहरातील 13 बस स्थानकांचा आधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार असून, 1,000 बसेसची खरेदी व 550 बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. पीएमपीची संचलन तूट आणि बस खरेदीसाठी सुमारे 357 कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे.

* राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न -

         महापालिकेतील सत्तारूढ राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागांतील विकासकामांना अधिक तरतूद, हा प्रघात यंदाही कायम राहिला आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पूर्वी दिसणारे रकमेतील अंतर कमी झाल्याचे यंदा दिसून आले. भक्कम बहुमत असतानाही भारतीय जनता पक्षाने अर्थसंकल्पात आर्थिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

         महापालिकेत अर्थसंकल्पादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना खिरापत वाटण्यासारखी तरतूद यापूर्वी झाली आहे. त्यातून विरोधी पक्षांच्या काही नगरसेवकांच्या प्रभागांना तर शून्य तरतूद मिळण्याचाही ‘पराक्रम’ घडला आहे. यंदाही काही प्रभागांत शून्य तरतूद द्यावी असा काही घटकांचा आग्रह होता, परंतु अध्यक्षांनी घेतलेल्या समतोल भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही.

         स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजप सदस्यांच्या प्रभागांसाठी 4 ते 5 कोटी, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेसह अन्य सर्व राजकीय पक्ष सदस्यांच्या प्रभागांसाठी तीन ते साडेतीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

        स्थायी समितीचे सदस्य आणि गटनेत्यांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांची, तर सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभागासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापौर मुक्ता टिळक आणि मोहोळ यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी प्रत्येकी सुमारे 30 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले.

* आमदारांनाही तरतूद -

         शहरातील आमदारांनी सुचविलेली विकासकामे करण्यासाठी अर्थसंकल्पातच तरतूद करण्याचा प्रघात महापालिकेत गेल्या 3 वर्षांपासून सुरू झाला आहे. भाजपच्या आठही आमदार आणि विधान परिषदेतील आमदार अनिल भोसले यांनी सुचविलेल्या विकासकामांना प्रत्येकी 2 ते अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

* 34 गावांना निधी देऊ -

         हद्दीलगतच्या 34 गावांचा समावेश महापालिकेत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे. परंतु, अर्थसंकल्पात त्यासाठी खास तरतूद केलेली नाही. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता ते म्हणाले, “34 गावांचा समावेश होणार असल्याचे जाहीर केले असले, तरी त्याबाबतचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे निर्णय होईल असे गृहीत धरून अर्थसंकल्पात तरतूद करता येत नाही. परंतु, गावांचा समावेश झाल्यास तेथील विकासकामांसाठी महापालिका निधी उपलब्ध करून देईल.”

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी

* नवीन रुग्णालय (5 कोटी रुपये) -

         शहरातील पश्‍चिम भागांतील नागरिकांसाठी ससून रुग्णालयाच्या धर्तीवर नवे रुग्णालय उभारणार. त्या माध्यमातून माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणार.

* विमा योजना (10 कोटी रुपये) -

        पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा कवच योजना सुरू करणार. त्यातून मिळकत कर भरणार्‍यांना 5 लाख रुपयांचा अपघात विमा मिळण्याची सोय होणार.

* वैद्यकीय महाविद्यालय (15 कोटी रुपये) -

       महापालिकेच्या रुग्णांलयामधील सेवेसाठी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाविद्यालय सुरू करणार. हुशार व गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा फायदा. 

* पाणीपुरवठा (1 कोटी रुपये) -

       शहरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठ्याकरिता कुंडलिक-वरसगाव योजना आखली असून, त्यामुळे शहराला एक ते दीड अब्ज घनफूट जादा पाणीसाठा उपलब्ध होणार.

* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था -

      नव्या बसगाड्या खरेदी करण्यात येणार असून, त्यात मध्यवस्तीतील प्रवाशांकरिता ‘मिडी बस’ खरेदी करण्याचे नियोजन. नव्या बसगाड्यांमुळे शहरातील सुमारे 370 मार्गांवर बसगाड्यांची वारंवारता वाढणार.

* नाट्यगृह (1 कोटी रुपये) -

         प्रायोगिक रंगभूमीसाठी नाट्यगृह उभारणार. ज्यामुळे नव्या कलाकारांना प्रोत्साहन मिळणार असून, व्यावसायिकदराने नाट्यगृह उपलब्ध करून देणार.

अनिल, ज्योतीला कांस्यपदक

       अनिल कुमार आणि ज्योती यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी भारताला दोन कांस्यपदकाची कमाई करून दिली. अनिलने दमदार पुनरागमन करताना ग्रीको-रोमन विभागातील 85 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या मुहम्मदअली शाम्सीद्दीनोव्हवर 7-6 असा थरारक विजय मिळवला.

          अनिलने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला असून पहिल्याच प्रयत्नात पदक पटकावण्यात तो यशस्वी ठरला. तो म्हणाला, “मला खूप खूप आनंद झाला आहे आणि देशाला पदक मिळवून दिल्याचा अभिमान आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ही अश्यक्यप्राय विजय मिळवण्यात यशस्वी झालो घरच्या पाठीराख्यांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो.”

          ज्योतीने महिलांच्या 75 किलो वजनी गटात कांस्यपदक निश्‍चित केले. उपांत्यफेरीत जपानच्या मसाको फुरूइचीने 10-0 अशा फरकाने तिला पराभूत केले. मात्र, रिपीचेज लढतीत तिच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी नसल्याने ज्योतीचे कांस्यपदक निश्‍चित झाले. महिलांच्या 63 किलो वजनी गटात रितूला संघर्षमय खेळ करूनही कांस्यपदक जिंकण्यात अपयश आले. कोरियाच्या जिंनयंग हँगविरुद्धची लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली, परंतु कोरियन खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. ग्रीको-रोमन विभागातील दुसर्‍या सामन्यात भारताच्या दीपकला कांस्यपदकाच्या लढतीत किर्गीस्थानच्या नुर्गाझी अ‍ॅसानगुलोव्हने पराभूत केले.

मालमत्तेच्या नोंदणीसाठी आधार

      लवकरच प्रॉपर्टी रजिस्टर करताना आधार लिंकिंग करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य शासनाला पाठविला आहे.

       राज्य इन्स्पेक्टर जनरल रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्पॉन्स ऑफ स्टॅम्पस (आयजीआर) विभाग नोंदणी नियम 1961 मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्यावतीने दिली आहे.  या निर्णयामुळे एक वेब कॅम आणि फिंगर प्रिंट स्कॅनरद्वारे आधार लिंक्ड ई-रजिस्ट्रेशन ऑफ होममधून प्रॉपर्टी डिपॉझिटची माहिती मिळणार आहे.

       नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्यावतीने विविध संगणकीय बदल करण्यात येत आहेत. ई-सात-बारा, फेरफारच्या धर्तीवर आता या विभागाने प्रॉपर्टीला आधार लिंकिंगचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर राज्यातील काही नवीन प्रकल्पांसाठी मालमत्तेच्या दस्तऐवजांचे ई-रजिस्ट्रेशन सुरू केले असताना, नोंदणी विभागाने प्रस्तावित दुरुस्तीसह सर्व प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनसाठी हे प्रस्तावित केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक किंवा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात नियमांच्या सुधारणेची अपेक्षा आहे.

      आम्ही सरकारशी पाठपुरावा करीत आहोत नोंदणी नियमांच्या नियम क्रमांक 6 मध्ये सध्याच्या नियमांनुसार उपरजिस्ट्रार कार्यालयांसाठी 2 साक्षीदारांना बोलावून घेऊन अर्जदारांची ओळख सत्यापित करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेकदा ओळखीच्या नसलेल्या व्यक्तींनादेखील साक्षीदार म्हणून बोलावले जाते व जमिनीचे रजिस्टर केले जाते. प्रस्तावामध्ये विभागाने प्रस्ताव संमती आधारित आधार प्रमाणिकरण सेवा असे म्हटले आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या विनंतीवर किंवा त्याच्या संमतीने पडताळणीसाठी विभाग सक्षम केले जाईल, जे त्याच्या/तिची ओळख यंत्रणेचे स्पष्टीकरण देताना अधिकार्‍यांनी सांगितले की, दुरुस्ती केल्यानंतर नोंदणीसाठीचा फॉर्म प्रथम इलेक्ट्रॉनिक किंवा कागद स्वरूपात संमती घेईल. ज्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक युआयडीएआय प्रणालीमध्ये बोटांचे मुद्रण व आयरीस स्कॅनसह दाखल केले जाईल. सत्यापनासाठी सिस्टीममध्ये जतन केले जाईल. उप-निबंधकाने ओळख सत्यापित करणे आणि इतर साक्षीदारांची तपासणी करणे आवश्यक नसल्याने हे उपकार्यक्रम प्रक्रिया सुलभ करते आणि उप-निबंधकांच्या कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी या प्रणालीचा निश्‍चितपणे फायदा होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

       आधार कार्ड असलेल्या व्यक्तीची ओळख पडताळणी केली जाते आणि नागरिकांना 2 साक्षीदार शोधण्यासाठी कमी दबाव टाकला जातो, नोंदणी करतेवेळी तेच तेच साक्षीदार म्हणून बोलाविले जातात. यामुळे यामधील पारदर्शकता कमी होते. जे नोंदणीसाठी मदत करते आणि नेहमी त्यांच्या ग्राहकांकरिता साक्षी म्हणून उभे असतात. हे साक्षीदार नेमके कोण असतात, हे अधिकार्‍यांना माहिती असते. अनेक कार्यालयांत तर एजंटच साक्षीदाराचे काम करीत असताना दिसून आले आहे. 

११ मे २०१७

हरप्रीत सिंगने जिंकले कांस्यपदक

        भारतीय मल्ल हरप्रीत सिंगने आशियाई कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन 80 किलो वजन गटात चीनच्या जुनजे नाचा पराभव करून भारताला पहिल्या दिवशी कांस्यपदक जिंकून दिले.

        हरप्रीतने लढतीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पण त्याला चीनच्या जुनजे नाने तेवढाच प्रतिकार केला. पहिली फेरी संपली तेव्हा दोघेही 1-1 गुण बरोबरीत होते. दुसर्‍या फेरीत हरप्रीतने दुहेरी पट काढीत 3-1 अशी आघाडी घेतली. चीनचा मल्ल अंतिम क्षणापर्यंत गुण मिळविण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, हरप्रीतने कडवा प्रतिकार करीत शेवटी विजय नोंदविला.

         विजयानंतर हरप्रीत म्हणाला, की माझ्यावर खूप दबाव होता. कारण आज झालेल्या इतर लढतीत सर्व मल्ल पराभूत झाले होते व माझ्याकडूनच पदकाची केलेली अपेक्षा मला ती पूर्ण करायची होती.

         दुसरीकडे 75 किलो गटात गुरप्रीत सिंहला चीनच्या बिन यांगकडून 38 मिनिटात 0-8 गुणांनी पराभव पत्करावा लागला.

रेल्वेचा 1 रुपयात दवाखाना सुरू

       लोकल रेल्वेमार्गावर वाढणार्‍या अपघातांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेने घाटकोपर स्थानकाबाहेर 1 रुपयात वैद्यकीय सल्ला पुरवणारे पहिले वनरुपी क्लिनिक सुरू केले. काही दिवसांपूर्वीच रेल्वेने केलेल्या या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे.

       सकाळी 9 वाजता हे क्लिनिक खुले झाल्यानंतर काही काही तासातच 40 ते 45 लोकांनी 1 रुपयात येथून वैद्यकीय सल्ला घेतला. सायंकाळपर्यंत हा आकडा 80 च्या पार गेला होता. यामध्ये रक्तदाब तपासणी आणि वैद्यकीय सल्ला घेणार्‍या रुग्णांची संख्या अधिक होती. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना या ठिकाणी मोफत प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सरकारी किंवा पालिका रुग्णालयात हलवले जाईल.

       घाटकोपरनंतर दादर, कुर्ला, मुलुंड, ठाणे या रेल्वे स्थानकातही असे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या क्लिनिकच्या बाजूला एक औषधाचे दुकानही काढण्यात आले आहे. यातून मिळणार्‍या नफ्यातून हे क्लिनिक चालवण्यात येईल, असे या क्लिनिकमध्ये असणारे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

आर्यन जोशी याची वर्ल्ड चेस ऑलंपियाड 2017 साठी निवड

     डोंबिवली मधील चंद्रकांत पाटकर शाळेत शिकणार्‍या आर्यन जोशी (वय, 15) याची वर्ल्ड चेस ऑलंपियाड 2017 साठी निवड झाली आहे. आर्यन अंध विद्यार्थी आहे. आपल्या अंधत्वावर मात करत आर्यनने एक पाऊल पुढे टाकले आहे. मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्याची निवड झाली असून भारतामधील फक्त 5 जणांची या चेस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

     आर्यन हा या स्पर्धेतीन सर्वात कमी वयाचा विद्यार्थी आहे. निवड झालेल्या 5 खेळाडूंपैकी 2 खेळाडू महाराष्ट्रातील आहेत. वर्ल्ड चेस ऑलंपियाडमध्ये जगातील 30 ते 40 देश सहभागी होणार आहेत.

     यापूर्वी आर्यनने अनेक चेस स्पर्धा जिंकल्या असून मार्च महिन्यात झालेल्या आशियाई चेस स्पर्धेत तो चौथा आला होता. आर्यनला संगणक आणि स्विमिंगची आवड असून नॅशनल अंडर 15 ब्लाईंड स्विमिंग स्पर्धेमध्ये त्याने 4 पदके मिळविली आहेत. 

ज्ञानप्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आण्णा ताम्हनकर यांचे निधन

         ज्ञानप्रबोधिनीचे द्वितीय संचालक राहिलेले ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत सीताराम तथा आण्णा ताम्हनकर यांचे 9 मे रोजी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

         वयाच्या विशीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या संस्कारामुळे आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित करायचे ठरवले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झटत राहिले. पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकासह एमए एमएड केल्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र या विषयात आण्णांनी विजिगीषु प्रेरणा हा संशोधन प्रबंध सादर करुन डॉक्टरेट मिळवली. 1962 मध्ये कै. आप्पा पेंडसे यांनी शिक्षण, संशोधन, ग्रामविकास आणि उद्योग या क्षेत्रात नवरचना व मनुष्यघडणीचे कार्य करणार्‍या ज्ञानप्रबोधिनी या संघटनात्मक संस्थेची स्थापना केली.

         1963 ते 68 या काळात पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात अध्यापन आणि त्यानंतर ज्येष्ठ संशोधक म्हणून कार्य केले. 1969 ते 1982 या संपूर्ण एका तपात आण्णांनी पुण्याजवळील शिवगंगा खोर्‍यात यंत्रशाळेचे प्रशासक म्हणून कार्य केले. एक हजार ग्रामीण तरुणांना यांत्रिकी विद्येतील प्रशिक्षण दिले. यंत्रशाळा उभारून अल्पशिक्षित ग्रामीण तरुणांतून अनेक उद्योजक उभे केले.

         1972 ते 1983 या काळात ज्ञानप्रबोधिनी या मातृसंस्थेचे कार्यवाह झाले. 1983 मध्ये आप्पा पेंडसे यांच्या निधनानंतर आण्णा यांनी प्रबाधिनीचे द्वितीय संचालक म्हणून 6 वर्षे धुरा वाहिली.

         1989 मध्ये सोलापुरात ज्ञानप्रबोधिनीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आण्णा आपल्या कर्तृत्वशाली कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी शिवगंगा, गुंजवणी नद्यांच्या परिसरात पुण्याजवळी विविध ग्रामविकास कार्यांची उभारणी केली. दारुबंदी आंदोलन, बिहार भूकंपानंतर 115 कार्यकर्त्यांसह तेथे जाऊन सेवाकार्य, खलीस्तानी अतिरेक्यांच्या चळवळीने पेटलेल्या पंजाबात सद्भावयात्रा, कोचीन येथील 1983 च्या सर्वधर्म परिषदेत सहभाग, युरोपात 3 महिन्यांचा व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास, प्रबोधिनीच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी अमेरिका दौरा असे कार्य केले. पुणे, सोलापूर, निगडी आणि हराळीत प्रबोधिनीच्या कलश विराजित वास्तू निर्माण केल्या.

        सोलापुरात आण्णा आणि डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या मार्गदर्शनातून प्रबोधिनीच्या रुपाने शिक्षण व संस्कार केंद्र उभे राहिले. फेब्रुवारी 2000 पासून दक्षिण मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हराळी या भूकंपग्रस्त गावी आधुनिक साधनांनी संपन्न शिक्षणतीर्थ उभे करण्याचा संकल्प करण्यात आला.

       हराळी, नारंगवाडी, तोरंबा, किल्लारी या परिसरातील अनेक गरजूंना कर्जे देऊन त्यांचे व्यावसायीक पुनर्वसन केले. तसे 1995 ला हराळीत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केली. 300 विद्यार्थ्यांचे निवासी गुरुकुल सुरू केले. 1995 ते 2000 या काळात 7 हजार फळवृक्षांची लागवड, नऊ एकरचे सत्तर एकर झाले. शेतकर्‍यांसाठी बाजार माहिती केंद्र, रोपवाटिका, शेततळी, गांडूळ खत निर्मिती, फलप्रक्रिया उद्योग, कृषी पदविका अभ्यासक्रम असे अनेक उपक्रम सुरू झाले.

आण्णांना मिळालेले पुरस्कार -

*   शैक्षणिक योगदानाबद्दल डोंबिवलीच्या टिळक शिक्षण संस्थेतर्फे कै. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते तेजस पुरस्कार

*   औरंगाबादच्या नवनीत प्रकाशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार

*   माधवराव चितळे यांच्या हस्ते पुण्याचा निसर्गमित्र पुरस्कार

*   अंबरनाथचा दधीची पुरस्कार

*   कर्‍हाडचा प्रभुणे पुरस्कार.

१० मे २०१७

जगातील सर्वात मोठी दुर्बिण

       अंतराळातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ दुर्बिणीचा वापर करतात. जगात अनेक ठिकाणी अशा दुर्बिणी आहेत, मात्र सर्वात मोठी दुर्बिण हवाईत लावण्यात येणार आहे. या दुर्बिणीचे नाव आहे टीएमटी.

        टीएमटी म्हणजे थर्टी मीटर टेलिस्कोप अर्थात 30 मीटरची दुर्बिण. ही दुर्बिण 217 फुटांच्या घुमटात बसविण्यात येणार आहे. मोठ्या दुर्बिणी ढगांहून उंच असणार्‍या डोंगरांवर लावणे उत्तम मानले जाते. त्यामुळे ही दुर्बिण हवाईच्या माऊना की येथे लावली जाणार आहे. ही दुर्बिण सामान्य दुर्बिणींहून 30 टक्के अधिक शक्तिशाली राहणार असून, अमेरिका, चीन, भारत, कॅनडा आणि जपान संयुक्तपणे तिची निर्मिती करीत आहेत.

         या प्रकल्पावर आतापर्यंत 1.47 अब्ज डॉलरचा खर्च झाला आहे. यात भारताचे 10 टक्के योगदान आहे. या दुर्बिणीचे अनेक महत्त्वपूर्ण भाग भारतात तयार होत आहेत. आगामी काही वर्षांत टीएमटीला ऑनलाईन आणण्याचाही विचार आहे. टीएमटीला ऑनलाईन आणण्यासाठी भारताच्या जवळपास 300 खगोलशास्त्रज्ञांची गरज भासणार आहे.

भारताच्या झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम

       भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा उच्चांक प्रस्थापित केला. तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रीक हिचा 180 विकेटचा विश्‍वविक्रम मोडला.

         झूलन 34 वर्षांची आहे. महिला क्रिकेटची कपिल देव अशी तिची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत तिने हा टप्पा गाठला.

        दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने 20 धावांत 3 विकेट घेतल्या. 153 सामन्यांत तिच्या 181 विकेट झाल्या. कॅथरीनने 109 सामन्यांत 180 विकेट घेतल्या होत्या. कॅथरीनने 2007 मध्ये निवृत्ती घेतली.

        झूलन उजव्या हाताने वेगवान मारा करते. तिने 10 कसोटींमध्ये 40 विकेट घेतल्या आहेत, तर 60 टी-20 सामन्यांमध्ये 50 विकेट मिळविल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये तिचा इकॉनॉमी रेट 3.81 आहे.

        या सामन्यात तिने नदीन डी क्लर्क (7), मसाबाता क्लास (4) आणि रैसिबी एन्टोझाखे (0) या तिघींना बाद केले.

पहिली भारतीय अग्निशामक महिला

      आगीशी युद्ध हे जीवाशी खेळ असतो. अग्निशामक दलात आत्तापर्यत महिलांचा समावेश केला गेला नव्हता. पण 37 वर्षीय हर्शिनी कान्हेकर या पहिल्या महिला फायर फायटर बनल्या आहेत. या तरुण महिलेने एकदम न घाबरता आगीशी खेळ करायचा कसे काय ठरवले असेल?

       नेहमीच्या मध्यममार्गी आयुष्यातील सर्व प्रकारच्या भीती वागवत हर्शिनीचे आयुष्य सुरू होते.

       मुलींच्या महाविद्यालयात हर्शिनी शिकत होती. पण कुणाच्या आठवणीतही न राहणारे आयुष्य मला जगायचे नव्हते त्यामुळे स्वतःला बदलायलाच हवे असे मला वाटत होते, असे हर्शिनी सांगते. त्यामुळे तिने एनसीसीत प्रवेश घेतला. तिच्यातील आव्हाने पेलण्याची क्षमता एनसीसीमुळे सहजपणे समोर आली. त्यानंतर तिने सैन्यदलात प्रवेश घ्यायचा ठरवला.

       पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने व्यवसाय व्यवस्थापनातील पदवीचा अभ्यासक्रम करता करता फायर इंजिनिअरिंगला एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर प्रवेश घेतला. हर्शिनी सांगते, माझी मैत्रिण शिल्पा हिने देखील माझ्याबरोबर परीक्षा दिली मात्र ती पास होऊ शकली नाही. त्यानंतर काही काळाने या महाविद्यालयाच्या इतिहासातील हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी मी पहिलीच मुलगी होते. अर्थातच तेव्हाची भावना अभिमानाची होती.

        या परीक्षेत पास होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. ही परीक्षा यूपीएससी सारखीच असते. पण त्यात फक्त 30 जागा असतात. त्यानंतर तिथे शिकायला जाणारी ती पहिलीच मुलगी होती. 5 वर्षे फक्त मुलींच्या कॉलेजमध्ये शिकलेली हर्शिनी थेट मुलांच्याच बरोबर शिकू लागली. त्यामुळे ते सोपे निश्‍चितच नव्हते. 7 सेमिस्टरचा हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथेच वसतिगृहात राहून पूर्ण करावा लागतो. हर्शिनी पहिली आणि एकमेव मुलगी असल्याने तिच्यासाठी वेगळ्या सोयी कराव्या लागल्या.

       मुलांच्या बरोबरीने शिकताना एकमेव मुलगी असल्याने हर्शिनीला अर्थातच प्रसिद्धीही मिळाली. पण त्यामुळे तिच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबावही होताच. मला माध्यमांतून जी प्रसिद्धी मिळायची आणि माझी दखल घेतली जायची त्यामुळे माझ्या महाविद्यालयातील सर्वच मुले माझी चेष्टा करायची. त्यांच्यामते मी काही वेगळे करत नव्हते. पण हे सर्व हर्शिनी कान्हेकर या व्यक्तीविषयी नव्हते तर पुरुषांचे निर्विवाद वर्चस्व असणार्‍या क्षेत्रात स्त्रियांनी मारलेल्या भरारीची दखल घेतली जात होती हे त्यांना समजणे अवघड होते. आत्तापर्यंत कोणाही स्त्रीने न केलेल्या गोष्टी घडत असल्यानेच ही दखल घेतली जात होती.

९ मे २०१७

राज्यातील शाळांमधून जंकफूडची विक्री आणि वितरण हद्दपार

      राज्यातील शाळांमधून आता चॉकलेट, मिठाई, पेस्ट्री, शर्करायुक्त शितपेये यांसह सर्व प्रकारचे जंकफूडची विक्री आणि वितरण हद्दपार करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. शाळांमधे केवळ सकस अशा गव्हाची चपाती, भात, भाजी, इडली, वडा, सांबर, नारळाचे पाणी, जलजिरा असे पदार्थांची विक्री वा वितरण करावे लागणार आहे.

      विद्यार्थ्यांमधे वाढत चाललेला लठ्टपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय काढण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना जादा साखर, मीठ आणि मेदयुक्त प्रदार्थ वर्जित करून आरोग्यास लाभदायक पदार्थ वापरण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृतीगट करण्यात आला होता.

        कृतीगटाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणते पदार्थ द्यावेत आणि देऊ नयेत यासंबंधी शिफारशी केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने शाळांमध्ये काही पदार्थांवर बंदी घातली आहे. शाळेच्या उपहारगृहातून या पदार्थ्यांची विक्री वा वितरण बंद करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आहे. या शिवाय मुलांनी जंकफूड खाऊ नये यासाठी शाळांनी जागृती देखील करायची आहे.

* या पदार्थांवर बंदी -

      तळलेले पदार्थ, बटाट्याचे चिप्स, शर्करायुक्त शीतपेये, सरबत, बर्फाचा गोळा, गोड रसगुल्ले, गुलाबजामुन, पेढा, कलाकंद, नूडल्स, पिझ्झा-बर्गर, टिक्का, पाणीपुरी, सर्व प्रकाराच्या चघळण्याच्या गोळ्या, कँडी, जिलेबी, बुंदी, सगळ्या प्रकारची मिठाई, केक, बिस्किट, बन्स-पेस्ट्री, जाम-जेली

* हे पदार्थ मिळणार  -

       गव्हाची रोटी, पराठा, भात, भाजी-पुलाव, डाळ, काळा चना, गव्हाचा हलवा, राजमा, कढीभात, खिचडी, पपई, टोमॅटो, अंडी, उपमा, इडली, वडा सांबर, दही, ताक, लस्सी, भाज्यांचे सँडविच, भाज्यांची खिचड, नारळाचे पाणी, जलजिरा.

ऑरेकलकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान

       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाने एक प्रभावी, स्वच्छ व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. ते राज्याला विकासाच्या योग्य दिशेने नेत आहेत. त्यांच्या याच कार्यकर्तृत्वाची दखल घेत घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपनी ऑरेकलने त्यांचा सन्मान केला आहे.  

       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असामान्य दृष्टी आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांना टेक्नोलॉजी ट्रान्सफॉर्मेशन हा पुरस्कार देऊन ऑरेकलने त्यांचा गौरव केला आहे. ऑरेकलचे सीईओ साफ्रा कार्ट्स यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

         ऑरेकलकडून मिळालेला पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सेवांमध्ये तंत्रज्ञानातील नवकल्पनांचा विचार करुन त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केल्याच्या प्रयत्नांना मिळालेल्या मान्यता आहे, अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

         यावेळी, महाराष्ट्र राज्यात आयटी क्षेत्रामधील सेवा वितरणासंबंधींच्या सुधारणांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. आपले सरकार, स्मार्ट सिटी, गाव जोडणी योजना, महाडीबीटी, महानेट, सीसीटीव्ही, आधार कायदा यांसारख्या अनेक योजना आणि धोरणांमध्ये तंत्रज्ञान परिवर्तन घडून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प, आयआयएम यासारखे प्रकल्प राबवले जात आहेत.

        राज्यातील 14,000 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात आल्या असून उर्वरित ग्रामपंचायती जोडण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक तहसील आणि शाळांचे डिजीटायझेशन करण्याचे काम करत आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणालेत. 

* 2016 मध्ये नागपूरमधील 5 खेड्यांचे डिझिटायझेशन -

         2016 मध्ये नागपूर जिल्ह्यामधल्या 5 खेड्यांच्या ग्रामपंचायतींचे डिझिटायझेशन  करण्यात आले. त्याशिवाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना 2018 अखेरपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत झालेल्या 11 व्या आंतरराज्य परिषदेमध्ये दिली.

* ऑप्टिकल फायबर म्हणजे काय?

         ऑप्टिकल फायबर म्हणजे अत्यंत वेगाने माहिती एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठीची काचेची तार. म्हणजेच आधी ऑप्टिकल फायबर वापरून तारांचे जाळे निर्माण करायचे आणि या जाळ्याचा वापर बिनतारी इंटरनेटची वेगवान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करायचा असे यामागचे तंत्रज्ञान आहे. म्हणजेच आपण सगळे वापरत असलेल्या इंटरनेटमध्ये ऑप्टिकल फायबरची भूमिका खूप मोठी आहे. शहरांमध्ये रस्त्यांखालून दूरसंचार कंपन्यांनी अशा ऑप्टिकल फायबर्सची जाळी विणलेली असते.

ऊहो

       आईस्क्रिम खाल्ल्यावर आपण त्याचा कोनही जसा खातो तशाच प्रकारे एडिबल ताट-वाट्याही मध्यंतरी तयार केल्या होत्या. त्यामुळे गृहिणींना ताटे-वाट्या घासण्याची कटकट नाही, असा युक्तिवाद करण्यात आला होता. आता अशा पद्धतीने प्लास्टिक प्रदूषणावर उपाय ठरू शकणारा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञांनी लावला आहे. या शास्त्रज्ञांनी अशी पिण्याच्या पाण्याची बाटली तयार केली आहे जी तोंडात टाकून गिळता येईल.

       विशेष म्हणजे ही बाटली सध्याच्या बाटलीसारखी नसून छोट्या गोळ्यासारखी आहे. ती बुडबुड्यासारखी दिसते. ती तोंडात टाकल्यावर फुटते. या गोळ्याला ऊहो असे नाव देण्यात आले आहे. स्कीपिंग रॉक्स लॅब या कंपनीने ही बाटली बनविली आहे. या कंपनीचे रॉड्रिगो गार्सिया गोन्साल्वेझ यांनी या बाटलीची माहिती दिली. महासागरांमध्ये वाढणार्‍या सीवीड या वनस्पतीपासून ही बाटली बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सीवीडपासून बनवलेल्या आवरणात कोणत्याही प्रकारचा द्रवपदार्थ राहू शकतो, असे ते म्हणाले.

       ऊहोचे आवरण चवहीन असून ते खाता येऊ शकते. परंतु, कोणी ते फेकून दिले, तरी 4 आठवड्यांमध्ये त्याचे विघटन होऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. सामान्य प्लास्टिकची बाटली विघटित होण्यास 700 वर्षे लागतात. मात्र, असले तरी या बाटलीच्या काही मर्यादा आहेत. ही बाटली पुन्हा-पुन्हा भरता येत नाही. तसेच ती काही दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.

८ मे २०१७

ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत

        भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे. हिंदुजा समूहाची संपत्ती 16.2 अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये 3.2 अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे. हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील 1000 प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये 40 अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

      द संडे टाइम्स रिच लिस्टने ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. 2016 मध्ये युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा ब्रिटनमधील अब्जाधीशांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे द संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये नमूद केले आहे. याउलट ब्रिटनमधील अब्जाधीश 14 टक्क्यांनी वाढले असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे.

ब्रिटनमधील प्रमुख भारतीय वंशाचे अब्जाधीश -

*   श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा

*   डेव्हिड आणि सिमन रुबेम

*   लक्ष्मी मित्तल

*   मोहसीन आणि झुबेर इस्सा

*   राज, टोनी आणि हरपाल माथरू

*   लॉर्ड स्वराज पॉल

*   श्री प्रकाश लोहिया

*   अनिल अगरवाल

*   सुनील वासवानी

*   सिमन, बॉबी, रॉबिन अरोरा

*   नवीन आणि वर्षा इंजिनिअर

*   जसमिंदर सिंह

*   भिक्खू आणि विजय पटेल

*   जटानिया बंधू

*   कुलजिंदर बहिया आणि कुटुंबीय

*   टॉम सिंग आणि कुटुंबीय

*   अनिश कपूर

पुस्तकांचे गाव

        पुस्तकांचे गाव म्हणून नवी ओळख बनलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार या गावात सुरू झालेल्या उपक्रमात सारस्वतांचे गाव असलेल्या नाशिकनेही खारीचा वाटा उचलला असून, 200 बोलक्या पुस्तकांचा संच भिलारच्या वाचकांना उपलब्ध झाला आहे. त्यासाठी नॅब डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.

       कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्‍वस्त विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे आणि या उपक्रमाने देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत. पुस्तकांच्या गावाला पुस्तके तर लाखोने जातील, परंतु वाचनचळवळ सर्व घटकांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि नॅब डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर यांनी अंध मुलांसाठी तयार केलेली बोलकी पुस्तके भिलारला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राज्य मराठी संस्थेच्याच सहाय्याने 200 बोलक्या पुस्तकांचा संच भिलारला पाठविला आहे. त्यामध्ये 75 मराठी व इतर हिंदी-इंग्रजी भाषेतील आहेत.

       भिलार गावातील अनेक ज्येष्ठ, वयोवृद्धांना पुस्तकांचे वाचन करणे शारीरिकदृष्ट्या शक्य होत नाही किंवा ज्यांनी कधीही शाळा शिकलेली नाही अशा लोकांना ही बोलकी पुस्तके शांतपणे बसून ऐकता येणार आहेत. ऑडिओ सीडीजच्या स्वरूपात तयार केलेली ही पुस्तके गावातील अंध वाचकांनाही उपयुक्त ठरणार आहेत. या बोलक्या पुस्तकांमध्ये पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रजांपासून अनेक नामवंत लेखकांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यात भविष्यात आणखी भर घातली जाणार आहे.

फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष : इमॅन्युएल मॅक्रॉन

      फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.

       या निवडणुकील माक्रोन यांना सुमारे 80,50,245 म्हणजेच एकूण मतदानापैकी 61.3 टक्के मते मिळाली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांना 50,89,894 म्हणजे एकूण मतदानाच्या 38.7 टक्के मते मिळाली आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशाचे भावी राष्ट्रपती म्हणून माक्रोन यांचे नाव चर्चेत होते. अखेर अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीतही माक्रोन यांनी बाजी मारली.

       माजी बँकर असलेल्या माक्रोन यांचा जन्म उत्तर फ्रान्समध्ये 21 डिसेंबर 1977 रोजी झाला होता. माजी बँकर असलेल्या माक्रोन यांना 2012 साली तात्कालीन राष्ट्रपती ओलांद यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. 2014 साली त्यांनी फ्रान्स सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. 2016 च्या अखेरीस फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते.  

जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल चिनाबवर

         जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, 2019 पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुढील 2 वर्षांत पूर्ण होणार -

*   फिनलंड आणि जर्मनीमधील तज्ज्ञांची मदत

*   कटरा आणि बनिहाल मार्गादरम्यान पुलाचे काम सुरू

*   भूकंपप्रवण क्षेत्र आणि दहशतवाद्यांकडून घातपाताचा धोका असल्याने पूल बांधताना विशेष साहित्याचा वापर

*   दहशतवाद्यांकडून घडविल्या जाणार्‍या संभाव्य स्फोटांमध्ये तग धरू शकणार्‍या 63 मिमी. जाड विशेष तारांचा वापर

*   पुलाच्या देखभालीसाठी रोप-वेचीही व्यवस्था

*   लांबी : 1.315 किमी

*   चिनाबवरील उंची : 359 मीटर

*   आयफेल टॉवरपेक्षा अधिक उंच : 35 मीटर

*   पुलासाठीचा खर्च : 12 हजार कोटी

*   1400 कामगार कामाला

*   पूल बांधणीसाठी लागणारे पोलाद : 24 हजार टन

*   रुंदीचा दुपदरी मार्ग : 14 मीटर

*   15 वर्षे टिकणारा रंग दिला जाणार

        हे जागतिक दर्जाचे काम असून हा पूल पूर्ण झाल्यावर तो पाहून आणि त्याबद्दल वाचून सर्व जग आश्‍चर्यचकित होईल. अभियांत्रिकी कौशल्याचा हा अप्रतिम नमुना असेल.

- डेव्हिड मॅकेन्झी, वास्तू सल्लागार, ब्रिटन

हताची इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालक : भरत कौशल

       ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनांतील आघाडीची कंपनी असलेल्या हिताची इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भरत कौशल यांची निवड करण्यात आली आहे.

      भरत कौशल 1 जून रोजी हिताचीचे विद्यमान अध्यक्ष कोजीन नकाकिटा यांच्याकडून पदभार स्वीकारतील. कौशल सध्या सुमटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनचे (एसएमबीसी) अध्यक्ष आहेत. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलेल्या भरत यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये पदव्यत्तर पदवी मिळवलेली आहे.

पर्यटन महामंडळाचा इतिहाद - जेट एअरवेजशी करार

        राज्यात पर्यटकांचा ओघ वाढून पर्यटनाला चालना मिळावी आणि विमान कंपन्यांच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा फायदा मिळावा यासाठी पर्यटन विकास महामंडळाने इतिहाद व जेट एअरवेजशी सामंजस्य करार केला आहे.

       दोन्ही विमान कंपन्या प्रवाशांना महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांची माहिती विमानातील मासिके आणि जाहिरातींतून देणार आहेत. इतिहाद आणि जेट एअरवेज ही विमान वाहतुकीतील दोन महत्त्वपूर्ण नावे आहेत. परदेशी पर्यटकांना महाराष्ट्रातली विविध पर्यटनस्थळे सुचवण्यात त्यांची मदत होईल.

        त्यामुळे केवळ पर्यटनस्थळे स्पर्धात्मक बनणार नाहीत, तर पर्यटकांकडे उपलब्ध असणार्‍या पर्यायांमध्येही वाढ होईल. एकाहून एक सरस अशा पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्‍वास एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंदराज यांनी व्यक्त केला.

मनरेगा : समान मजुरीसाठी समितीची स्थापना

       महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) मजुरीची पुनर्रचना करण्याचा विचार सरकार करत आहे. या योजनेंतर्गत ज्या निकषांवर मजुरांना मजुरी दिली जाते त्या निकषांवर आता पुनर्विचार करण्यात येणार आहे.

      ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मनरेगाच्या अंतर्गत देण्यात येणार्‍या मजुरीत आसाम, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशात 1 रुपयांची वाढ केली आहे. ओडिशात 2 रुपये तर पश्‍चिम बंगालमध्ये 4 रुपये वाढ केली आहे. केरळ आणि हरियाणा या राज्याने मनरेगा अंतर्गत सर्वाधिक 18 रुपयांची मजुरी वाढविली आहे. यावर्षी मनरेगाच्या मजुरीत 2.7 टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात यात 5.7 टक्के वाढ झाली होती. 1 एप्रिलपासून मजुरीचे नवे दर लागू झालेले आहेत.

      केंद्राने निश्‍चित केलेली मनरेगाची मजुरी आणि अनेक राज्यांकडून देण्यात येत असलेली मजुरी यात अंतर असल्याचे दिसून येते. राज्यांच्या किमान मजुरी दरापेक्षाही मनरेगाचे मजुरी दर कमी आहेत. मजुरीतील हे अंतर दूर करण्यासाठी सरकारने ग्रामीण विकास मंत्रलयाचे अतिरिक्त सचिव नागेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.

        महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची मजुरी ही ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार दिली जाते. प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील मजुरांना या माध्यमातून काम दिले जाते. 1983 च्या पद्धतीवर हे आधारित आहे. केंद्र सरकारच्या एका समितीने मनरेगाच्या किमान मजुरीची शिफारस केली होती.

* काय आहे मनरेगा?

         महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील अकुशल कामगारांना वर्षाला किमान 100 दिवस रोजगार देण्याची ही योजना आहे. 10 कोटी कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील कामगारांच्या हाताला या माध्यमातून काम दिले जाते. हरियाणात मनरेगाची सर्वाधिक मजुरी 277 रुपये प्रति दिवस एवढी आहे. तर, बिहार आणि झारखंडमध्ये सर्वात कमी 168 रुपये प्रति दिवस एवढी मजुरी आहे.

७ मे २०१७

पहिल्या महिला न्यायमूर्ती लीला सेठ यांचे निधन

       दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती व देशातील कोणत्याही उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश न्या. लीला सेठ यांचे नॉयडामधील राहत्या घरी निधन झाले. त्या 83 वर्षांच्या न्या. सेठ ख्यातनाम लेखक विक्रम सेठ यांच्या मातोश्री होत्या.

*   1958 मध्ये लंडनमधील वकिलीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या पहिल्या महिला होत्या.

*   1978 मध्ये त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या

*   1991 मध्ये उच्च न्यायालायच्या (हिमाचल प्रदेश) पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश झाल्या.

मुंबई-कराची विमानसेवा बंद

       पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची (पीआयए) मुंबई ते कराची मार्गावरील साप्ताहिक विमानसेवा बंद केली जाईल, अशी माहिती कंपनीतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या पीआयएकडून आठवड्यातून 2 दिवस (सोमवार आणि गुरुवार) विमानसेवा सुरू होती. सध्या या मार्गावर प्रवाशांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने सेवा बंद केली जात असल्याचे कंपनीने सांगितले. पाकिस्तान सरकारकडून यासाठी विशेष अनुदान मिळाले तरच ही सेवा पुन्हा सुरु होईल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

          परंतु कंपनीची लाहोर-दिल्ली मार्गावरील विमानसेवा सुरुच राहणार आहे. या मार्गावर तुलनेत जास्त रहदारी असल्याने ही सेवा सुरु ठेवणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्याचप्रमाणे, मुंबई-कराची सेवा बंद झाल्यास लाहोर-दिल्ली मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत आणखी भर पडेल असेही कंपनीचे मत आहे. सुमारे 2004 सालापर्यंत कंपनीचा सुरळित व्यवसाय सुरु होता. परंतु हळुहळु कंपनीवरील आर्थिक भार वाढत गेला. त्यानंतर 2013 साली नवाज शरीफ यांचे सरकार आल्यानंतर कंपनीला तब्बल 100 अब्ज रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

६ मे २०१७

फिफाच्या जागतिक क्रमवारीत 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच 100 वे स्थान

     बहारदार कामगिरीच्या बळावर भारतीय फुटबॉल संघाने फिफाच्या जागतिक क्रमवारीत 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच 100 वे स्थान पटकावले आहे.

     आशियाई फुटबॉल महासंघाच्या क्रमवारीत भारतीय संघ 11 व्या स्थानावर आहे. ज्या पद्धतीने भारतीय संघात सुधारणा होत आहे, त्यामुळे मी समधानी असलो तरी आता जबाबदारी वाढली असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेटियन यांनी दिली आहे. अ.भा. फुटबॉल महासंघाचे सचिव कुणाल दास यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन करताना 2019 साली होणार्‍या आशियाई चषकासाठी पात्र ठरण्याचे टार्गेट ठेवावे, असे आवाहन केले आहे.

      आशियाई कप पात्रता फेरी स्पर्धेत भारताने म्यानमारवर 1-0 ने विजय मिळवला होता. 64 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताने म्यानमारमध्ये विजय साजरा केला. त्यानंतर एका मैत्रीपूर्ण लढतीत कंबोडियावर 3-2 ने, तर दक्षिण आफ्रिकन देश असलेल्या प्युर्टो रिकोचा 4-1 ने धुव्वा उडवला होता.

8 विधानसभांमध्ये मंजूर झाले एसजीएसटी

     एप्रिल-मेमध्ये 8 राज्यातील विधानसभेत राज्य वस्तू व सेवा कर (एस जीएसटी) विधेयक मंजूर झाले आहे. ही नवी कर व्यवस्था देशात 1 जुलैपासून लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

     अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये एस जीएसटी विधेयक 9 एप्रिल रोजी मंजूर करण्यात आले. बिहारमध्ये 24 एप्रिल, राजस्थानात 26 एप्रिल, झारखंड 27 एप्रिल, छत्तीसगढ 28 एप्रिल, उत्तराखंड 2 मे, मध्यप्रदेश 3 मे आणि हरियाणात 4 मे रोजी हे  विधेयक मंजूर करण्यात आले. उर्वरित राज्यात हे विधेयक चालू महिन्यात मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. जे राज्य या महिन्यात विधेयक मंजूर करु शकणार नाहीत ते पुढील महिन्यात हे विधेयक मंजूर करतील.

     अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने 16 मार्च रोजी 12 व्या बैठकीत एस जीएसटी विधेयकाला मंजुरी दिली होती. जीएसटी परिषदेची पुढील बैठक श्रीनगरमध्ये 18-19 मे रोजी होणार आहे. विविध  वस्तूंसाठी कराच्या दरांना यात  अंतिम स्वरुप देण्यात येणार  आहे. राज्यातील अधिकार्‍यांनी लोकांना जीएसटीबाबत माहिती देण्यासाठी कार्यक्रम सुरु केलेले आहेत.

चँपियन्स करंडकासाठी भारतीय संघाची निवड

   आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) वाद सुरु असला तरी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार हे निश्‍चित झाले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.

   नुकतेच खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण करून, बीसीसीआयने आयसीसीला गुगली टाकला, पण काही तासांतच बीसीसीआयचा कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने चँपियन्स स्पर्धेसाठी लवकरात लवकर संघाची निवड करा, असा आदेश दिला होता. त्यामुळे संघनिवड करण्यात येणार आहे. कर्णधार विराट कोहली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संघनिवडीवेळी सहभागी होणार आहे.

   संघ निवडण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल ही असतानाही अजून संघाची निवड का करण्यात आली नाही, अशी विचारणा प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांच्याकडे केली होती. चँपियन्स करंडक या स्पर्धेचे आपण गतविजेते आहोत. त्यामुळे आता या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2 जूनपासून इंग्लंडमध्ये ही स्पर्धा सुरु होणार आहे.

५ मे २०१७

श्रीहरिकोटा : जीएसएलव्ही एफ-09 चे यशस्वी प्रक्षेपण

        भारताने 5 मे रोजी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून 4 वाजून 57 मिनिटांनी जीएसएलव्ही एफ-09चे यशस्वी प्रक्षेपण केले. हा प्रकल्प म्हणजे दक्षिण आशियाई देशांना भारताचे गिफ्ट आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

       या प्रकल्पावर 450 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या मोहिमेत नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका सहभागी आहेत. दळणवळणासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. सहभागी देशांना 10 हजार कोटींचा फायदा होणार आहे. जीसॅट 9 या उपग्रहाच्या निर्मितीस 3 वर्षे लागली. जीएसएलव्ही एफ 09 यानाचे वजन 435 टन आहे. तर यानाचे रॉकेट 50 मी. उंच आहे.

असा होणार उपयोग -

*   या प्रकल्पातील सहभागी देशांसोबतचे संवाद दृढ होतील.

*   या देशांना 12 वर्षांत भारताला 96 कोटी रु. द्यावे लागणार.

*   दळणवळणासाठी उपग्रहाचा वापर.

*   टेली एज्युकेशन, आपत्ती व्यवस्थापन, टेली मेडिसीन, टी. व्ही. प्रक्षेपणाला गती मिळेल. 

प्रिन्स फिलिप यांची निवृत्ती

        ब्रिटनचे राजकुमार व ड्यूक ऑफ एडिन्बर्ग प्रिन्स फिलिप यांनी शाही जबाबदारीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. 95 वर्षांचे फिलिप येत्या ऑगस्टनंतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमात शाही घराण्याचे सदस्य म्हणून हजर राहणार नाहीत, असे बकिंगहॅम राजप्रासादाने जाहीर केले. राजे फिलिप सुमारे 780 विविध संस्थांशी आश्रयदाते तसेच अध्यक्ष वा पदाधिकारी नात्याने संबंधित असून, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती आहेत. ड्यूक ऑफ एडिन्बर्ग यांनी यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णयाला महाराणी एलिझाबेथ यांचा पाठिंबा आहे.

         ड्यूक राणीसोबत किंवा स्वतंत्रपणे ऑगस्टपर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमांत सहभागी होत राहतील. त्यानंतर ते दौरे आणि भेटीगाठींचे कोणतेही नवे निमंत्रण स्वीकारणार नाहीत.  तथापि, ते वेळोवेळी काही खास कार्यक्रमांत सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रिन्स फिलिप यांनी महाराणींसोबत सर्व महत्त्वपूर्ण परदेश दौरे केले आहेत. यात भारताच्या तीन दौर्‍यांचाही समावेश आहे. त्यांनी 1961 मध्ये भारताचा पहिला दौरा केला होता. त्यानंतर 1983 आणि 1997 मध्ये त्यांनी भारताचे आणखी दोन राजकीय दौरे केले होते.

४ मे २०१७

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर पहिल्या स्थानी, नवी मुंबई टॉप टेनमध्ये

          देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई टॉप टेनच्या यादीत आहे. नवी मुंबई आठव्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर इंदूर शहर आहे.

          केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील विविध शहरांची यादी जाहीर केली.

टॉप 10 स्वच्छ शहरे -

1) इंदूर - मध्यप्रदेश

2) भोपाळ - मध्यप्रदेश

3) विझाग - आंध्रप्रदेश

4) सुरत - गुजरात

5)  म्हैसूर - कर्नाटक

6) तिरुचिरापल्ली - तामिळनाडू

7) नवी दिल्ली

8)  नवी मुंबई - महाराष्ट्र

9) तिरुपती - आंध्रप्रदेश

10)  बडोदा - गुजरात

         यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरे ही गुजरातमधील आहेत.

         दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेशातील गोंडा हे सर्वात शेवटी आहे. तसेच, सर्वात अस्वच्छ शहरांमध्येसुद्धा 20 शहरे ही एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत.

          2016 मध्ये स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या 73 शहरांचा समावेश केला होता. यामध्ये पहिल्या 10 शहरांत महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा समावेश होता. यामध्ये अनुक्रमे म्हैसूर, चंदीगड, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, विशाखापट्टणम, सूरत, राजकोट, गंगटोक, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईचा टॉप टेनमध्ये समावेश होता.

इराणच्या कोळसा खाणीत स्फोट

       इराणच्या उत्तर भागात एका कोळसा खाणीत स्फोट झाल्याने 35 मजूर ठार झाले आहेत. तर अनेक जखमी झाले आहेत. गोल्सतेन प्रांताच्या एका क्षेत्रीय अधिकार्याच्या माहितीनुसार, एका कोळसा खाणीत स्फोट झाला. या खाणीतून 35 मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. तर 69 मजूर जखमी झाले आहेत.

        इराणच्या मीडियानुसार, 30 अधिक जखमी मजुरांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. गॅसने भरलेल्या 2 किमी. लांब सुरुंगात मजदूर अडकले होते. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी आल्या. 

पाकिस्तान उच्चायुक्तांना भारताने बजावला समन्स

         दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करून विटंबना केल्याप्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स बजावले तसेच या प्रकरणी पाकिस्तानने कारवाई करण्याची मागणी भारताने केली.

        भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव गोपाळ बागले यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी अब्दुल बासित यांच्यासमोर शहीद जवानांचा मुद्दा तसेच त्यांच्या मृतदेहासोबत केलेल्या विटंबनेचा मुद्दाही उपस्थित केला अशी माहिती त्यांनी दिली.    

         पाकिस्तानी सैनिकांनी कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय हद्दीत प्रवेश केला होता, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचे भारताने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांवर आणि घटनास्थळी  सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांवरून हल्लेखोर पुन्हा सीमारेषेपलीकडे पळून गेल्याचे सिद्ध होते असे ते म्हणाले.

        यापूर्वी भारताच्या डीजीएमओंनी (लष्करी कारवाईचे प्रमुख) पाकिस्तानच्या या कृत्याला सडतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण करून भारताने पाकला समन्स बजावले. 

3 मे २०१७

हिरो ऑफ दी लीग पुरस्कार

         बंगळूर एफसीचा स्ट्रायकर सुनील छेत्री याला आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील हिरो ऑफ दी लीग हा पुरस्कार मिळाला. सहभागी 10 संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांनी विविध पुरस्कारांचे मानकरी निवडले. छेत्रीने 7 गोल केले.

         मोहन बागानच्या देबजीत मुजुमदार याने सर्वोत्तम गोलरक्षक हा किताब मिळविला. त्याने 8 सामन्यांत एकही गोल पत्करला नाही. त्यानेसर्वोत्तम बचावपटूचा त्यानेजर्नेल सिंग पुरस्कार मोहन बागानच्याच अनास एडाथोडीका याने पटकावला. त्याने अलीकडेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मध्य फळीतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार एजॉल एफसीच्या अल्फ्रेड किमाह जर्यान याने पटकावला.

       सर्वोत्तम स्ट्रायकर पुरस्कारासाठी फारशी चुरस नव्हती. लाजाँग शिलाँगच्या एसर पेरीक दिपांदा डीका याने हा मान मिळविला. 18 सामन्यांत त्याने 11 गोल नोंदविले.

         नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने यंदा सर्वोत्तम उदयोन्मुख फुटबॉलपटू हा पुरस्कार सुरू केला. शिवाजीयन्सच्या जेरी लालरीनझुला याने हा पुरस्कार पटकावला. एजॉलला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेले प्रशिक्षक खलीद जमिल यांना सय्यद अब्दुल रहिम सर्वोत्तम प्रशिक्षक हा पुरस्कार मिळाला.

चर्चिलला फेअर प्ले -

          यंदा फेअर प्ले गोव्याच्या पुरस्कार चर्चिल ब्रदर्स एफसीला मिळाला. ब्रेकनंतर या संघाने स्पर्धेत पुनरागमन केले होते. ‘सर्वोत्तम संघटन हा पुरस्कार शिवाजीयन्स आणि बंगळूर यांना संयुक्तरीत्या मिळाला. महासंघाचे सामना आयुक्त यासाठी गुण देतात. त्यानुसार निवड केली जाते.

विजय चौधरी यांची डीवायएसपी पदी नियुक्ती

       महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब 3 वेळा जिंकणार्‍या विजय चौधरी याची डीवायएसपी पदी नियुक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. विलंबाने का असेना परंतु त्याची ही नियुक्ती करून शासनाने त्याला अखेर न्याय दिला आहे. 2016 मध्ये महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब तिसर्‍यांदा जिंकल्यानंतर त्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र या आश्‍वासनाबाबत वारंवार विलंब करण्यात येत होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी विजयच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर एक अभियान सुद्धा चालवले होते.

      डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजीत कटके याला नमवून विजय चौधरीने सलग तिसर्‍यांदा मानाचा किताब मिळवला होता. अशा प्रकारची कामगिरी करणारा तो नरसिंह यादव याच्यानंतरचा दुसरा पैलवान आहे.

२ मे २०१७

जगातील सर्वात वयस्कर 146 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

        जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 146 वर्षीय या व्यक्तीने आपण जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती असल्याचा दावा केला होता. बहा गोथो असे त्यांचे नाव असून ते इंडोनेशियात राहत होते. कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार 1870 रोजी गोथो यांचा जन्म झाला होता. त्यांना गेल्याच महिन्यात रुग्णालयात भर्ती केले होते. त्यांना नेमके काय झाले होते ते कळू शकले नाही. 6 दिवस उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. घरी आल्यानंतर ते फक्त ओट्स खात होते. स्थानिक लोक त्यांना सोदिमेदजो नावाने ओळखत.

       एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, ’रुगालयातून घरी परतल्यानंतर त्यांचा आहार खूपच कमी झाला होता. फक्त काही चमचे ओट्स खात होते. पाणीदेखील खूप कमी पीत होते’. गोथो यांच्या वयासंबंधी शंकादेखील आहे. कारण इंडोनेशियात 1900 च्या आधी जन्मनोंदणीला सुरुवात झालेली नव्हती. गोथो केंद्रीय जावा येथील सरागेन शहरात राहत होते.

       गतवर्षी स्थानिक नोंदणी कार्यालयाने त्यांच्या वयाची माहिती खरी असल्याचे सांगितले होते. त्यावेळी गोथो यांनी पत्रकारांशी बातचीत करताना सांगितले होते की, ’1992 मध्येच आपण आपल्या मृत्यूची तयारी सुरु केली होती’. आपल्या कबरेवर ठेवण्यात येणारा दगडही त्यांनी तयार करुन घेतला होता. गोथो यांनी तेव्हा म्हटले होते की, ’आता मला जगण्याची इच्छा नाही’. गोथो यांच्यासमोर 10 भाऊ - बहिण, 4 बायका आणि मुले सर्वाचा मृत्यू झाला होता.

        गोथो यांनी मृत्यूनंतर दफन करण्यासाठी जमीन विकत घेतली होती. निधन झाल्यानंतर त्याच जमिनीत त्यांना दफन केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार सर्वात जास्त वर्ष जगण्याचा रेकॉर्ड फ्रान्स 122 वर्षीय महिलेच्या नावे आहे. 1997 मध्ये त्या महिलेचे निधन झाले. जर गोथो यांचा दावा खरा ठरला तर हा रेकॉर्ड त्यांच्या नावे होईल. 

161 कंपन्यांवर बीएसई लावणार व्यवहार मर्यादा

        मुंबई शेअर बाजाराकडून (बीएसई) 161 कंपन्यांवर 5 मे पासून व्यवहार मर्यादा लादण्यात येणार आहेत. वार्षिक नोंदणी शुल्क न भरल्याने ही कारवाई बीएसईकडून करण्यात येणार आहे.

       यापैकी 140 कंपन्यांवर अन्य नियामकीय संस्थांकडून आधीच मर्यादा घातल्या आहेत. उरलेल्या 21 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांना टी गटात, तर 13 कंपन्यांना एक्सटी गटात टाकण्यात येणार आहे.

       टी गटात टाकण्यात येणार्‍या कंपन्यांत व्हीव्हीएस इंडस्ट्रीज, आल्पस् इंडस्ट्रीज, बिलपॉवर, मधुकॉन प्रोजेक्टस्, री अ‍ॅग्रो, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, पॅराबोलिक ड्रग्ज आणि हनुंग टॉयज अँड टेक्साइल्स यांचा समावेश आहे. एक्सटी गटात टाकण्यात येणार्‍या कंपन्यांत राठी स्टील अँड पॉवर, मॅग्नम, हिमालया इंटरनॅशनल, अलकेमिस्ट कॉर्प, रेमंड लॅब्ज, ट्रायकॉम फ्रूट प्रॉडक्टस्, इन्फ्रोनिक्स सीस्टिमस् आणि इंडोव्हेशन टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे.

          बीएसईने म्हटले की, वारंवार स्मरण आणि नोटिसा देऊनही या कंपन्यांनी वार्षिक नोंदणी शुल्क भरलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. कंपन्यांनी कारवाईच्या आधी शुल्क अदा केल्यास त्यांची नावे थकबाकीदारांच्या अंतिम यादीतून काढली जातील.

१ मे २०१७

दहशतवाद्यांच्या दरोड्यात पाच पोलिस हुतात्मा

        दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये बँकेची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी अडवून लुटण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांत किमान 5 पोलिस आणि 2 सुरक्षा रक्षक ठार झाले. या पोलिसांच्या हौतात्म्यामुळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेला.

        गेल्या 24 तासांत भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा Aदलाचे 2 जवान हुतात्मा झाले. त्यानंतर बँकेची रक्कम लुटण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस हुतात्मा झाले.

      बँकेच्या निहमा गावातील शाखेमध्ये पैसे भरून ही गाडी पुन्हा कुलगामकडे येत असताना दहशतवाद्यांनी त्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गाडीवर आणि सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यात पाच पोलिस हुतात्मा झाले. गोळीबारात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीमही हाती घेतली आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे पळविली.

       गेले 24 तास जम्मू-काश्मीसाठी भयानक होते. आधी 2 जवान हुतात्मा झाले आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना झाली. त्यानंतर आता 5 पोलिस आणि बँकेच्या 2 कर्मचार्‍यांना जीव गमवावा लागला, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

        गेल्या काही वर्षांपासून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पोलिसांवरील या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारली नाही.

कोल्हापुरात फडकला राज्यातील सर्वात उंच तिरंगा

      बॉर्डरनंतर देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या उंच ध्वजस्तंभावरील ध्वजाचे सकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.  या ध्वजस्तंभावर 90 फूट लांब आणि 60 फूट रुंद अशा 5,400 चौरस फुटाचा राष्ट्रध्वज फडकाविण्यात आला.

      यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस अधिक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हिंदकेसरी

       नॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा हिंदकेसरी ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या सुमीतने सुवर्णमहोत्सवी किताबी लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर 9-2 असे मोडून काढले.

        श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकर्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील सणस मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत कुस्ती भलेही निकाली झाली नसली, तरी मल्लांचे मातीतील कौशल्य चाहत्यांच्या मनात घर करून केले. उपांत्य फेरीच्या प्रत्येकी दोन लढती खेळल्यावर तासाभरात दोन्ही मल्ल विजेतेपदाच्या लढतीसाठी आखाड्यात उतरले होते. कणखर मानसिकता आणि अनुभवाच्या जोरावर सुमीतने बाजी मारली. अभिजितला महाराष्ट्र केसरी पाठोपाठ हिंदकेसरी लढतीतही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

        2 वर्षांपूर्वी भारत केसरी ठरलेल्या सुमीतने कुस्तीच्या पहिल्याच मिनिटाला अभिजितला बाहेर ढकलत गुणाचे खाते उघडले. त्यानंतर आक्रमक होत एकेरीपट काढून 2 गुणांची कमाई केली. चौथ्या मिनिटाला पुन्हा एकदा अभिजितला बाहेर ढकलत त्याने 2 गुणांची कमाई करत 4 मिनिटांतच 4-0 अशी आघाडी मिळवली. सहाव्या मिनिटाला अभिजितने आपला हुकमी दुहेरी पटाचा डाव टाकत सुमीतला खाली दाबत 2 गुण मिळविले. मात्र, सुमीतच्या तुलनेत अभिजितची अधिक दमछाक झालेली दिसून आली. पहिल्या फेरीच्या सातव्या मिनिटाला अभिजितचा ढाक टाकण्याचा डाव फसला. धिप्पाड असूनही सुमीतने स्वतःची सुटका करून घेत कुस्ती बाहेर ढकलत 2 गुणांची कमाई केली.

        विश्रांतीला 6-2 अशी आघाडी घेतल्यावर दुसर्‍या फेरीची सुरवात संथ होती. पहिली 4 मिनिटे खडाखडीतच गेली. पाचव्या मिनिटाला अभिजितने आकडी डाव टाकण्याचा सुरेख प्रयत्न केला. पण, या वेळीही सुमीत सटकला आणि त्याच्यावर डाव उलटवत त्याने 2 गुण मिळविले. त्यानंतर निष्क्रिय कुस्ती केल्याचा फटका अभिजितला बसला. त्याचा आयता आणखी एक गुण सुमीतला मिळाला. उपांत्य फेरीत अभिजितला हरवल्यामुळे विजेतेपदाचा विश्‍वास होता. लहानपणापासून हिंदकेसरीचे स्वप्न बाळगले होते. ते सुवर्णमहोत्सवी वर्षात साकार झाले. आता राष्ट्रीय स्तरावरदेखील भारताचे नाव उंचावण्याची मनीषा आहे.