Menu

Study Circle

३१ मार्च २०१८

शरीरातील नव्या, सर्वात मोठ्या भागाचा शोध!

     मानवी शरीर प्राचीन काळापासूनच मानवासाठीच कुतुहलाचा विषय बनलेले आहे. आपल्याकडील सुश्रुतांसारख्या प्राचीन वैद्यकीय तज्ज्ञापासून ते आधुनिक काळातील लिओनार्डो डी विंचीसारख्या कलाकारालाही मानवी शरीरात काय दडले आहे हे पाहण्याची उत्सुकता होती. 

     सध्याच्या काळात मानवी शरीरातील बहुतांश अंतर्गत अवयवांची माहिती आपल्याला आहे. मात्र, मानवी शरीरातील एका नव्या अंगाचा शोध लावल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. वैद्यकीय शास्त्रातील हे सर्वात मोठे यश असल्याचे मानले जात आहे. या मानवी अंगामुळे शरीरात कर्करोग कसा पसरत जातो, याचा शोध लावणे सोपे होणार असल्याचा दावा केला जात आहे.

      वैज्ञानिकांनुसार, आपल्या शरीरात त्वचेच्या आत एक स्तर असतो. या स्तराला ऊती किंवा उत्तक म्हणजेच ‘टिशू’ (पेशींचा समूह) असे म्हटले जाते. या टिशूच्या आत तरल पदार्थांनी भरलेले विभाग असतात. वैज्ञानिकांनी याला ‘इंटरस्टिशिअम’ असे नाव दिले आहे.‘इंटरस्टिशिअम’ फक्‍त त्वचेच्या खाली नाही तर आतडे, फुफ्फुसे, रक्‍तवाहिन्या, त्वचेच्या पेशी यांच्या खालीही असते. हे अत्यंत लवचिक असून यात प्रोटिनचा मोठा थर असतो. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरस्टिशिअम शरीराच्या टिशूजच्या संरक्षणाचे काम करते. या नव्या मानवी शरीराच्या अवयवाबद्दलचा लेख सायंटिफिक रिपोर्टस् जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. माऊंट सिनाय बेथ इस्रायल मेडिकल सेंटर मेडिक्सचे डॉ. डेव्हिड कार-लॉक आणि डॉ. पेट्रोस बेनियासने यांनी सांगितले की, कर्करोग शरीरात कसा पसरतो हे यावरून समजू शकते. यासाठी डॉक्टरांनी पित्त वाहिनीची तपासणी केली. तपासादरम्यान त्यांची नजर या विशेष प्रकारच्या टिशूवर पडली आणि इंटरस्टिशिअमचा शोध लागला. त्याचबरोबर हे शरीरातील सर्वात मोठे अंग असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

दलित नेत्या रजनी तिलक यांचे निधन

     दलित अधिकार कार्यकर्त्या आणि लेखिका रजनी तिलक यांचे काल दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. दलितांच्या अधिकारांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या तिलक यांच्या निधनानं दलित अधिकार चळवळ आणि दलित साहित्याची मोठी हानी झाली आहे. 

      रजनी तिलक यांना दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रजनी तिलक यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवला. देशात स्वच्छता कर्मचारी, शेतकरी आणि देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेले जवान या तीन व्यक्ती महत्त्वाच्या आहेत, असं त्या नेहमी म्हणायच्या. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांचं 'अनकही कहानियां' हे काव्यसंग्रह खूप गाजलं.

30 मार्च २०१८

सौरमालिकेबाहेर अत्यंत उष्ण ग्रहाचा शोध

     अंतराळाच्या या अफाट पसार्‍यात अनेक रहस्ये दडलेली आहेत. खगोल शास्त्रज्ञ सातत्याने अंतराळातील नव्या नव्या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात. नवे ग्रह आणि तार्‍यांचाही नेहमीच शोध घेतला जात असतो. आता संशोधकांनी आपल्या सौरमालिकेबाहेर 26 कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील एका अत्यंत उष्ण ग्रहाचा शोध घेतला आहे.हा ग्रह धातूच्या एखाद्या गोळ्यासारखाच दिसतो आणि त्याचा आकार पृथ्वीपेक्षा वीस पटीने अधिक आहे. ‘के2-229 बी’ नावाच्या या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा अडीच पटीने अधिक आहे. हा ग्रह ‘के’ नावाच्या छोट्या तार्‍याभोवती चौदा तासांमध्ये एक प्रदक्षिणा घालतो.अर्थात त्याच्यावरील वर्ष हे अवघे चौदा तासांचेच असते. आपल्या तार्‍यापासून इतक्या जवळ अंतरावर असल्याने त्याच्यावरील तापमानही अधिक आहे. दिवसा त्याच्यावरील तापमान तब्बल दोन हजार अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक असते. फ्रान्सच्या एक्स-मार्सेली युनिव्हर्सिटी आणि ब्रिटनमधील वार्विक युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी ‘के 2’ दुर्बिणीच्या सहाय्याने या ग्रहाचा शोध लावला आहे. त्याच्याशिवाय अन्यही दोन ग्रह संबंधित तार्‍याभोवती फिरत आहेत. या तिन्ही ग्रहांचे आपल्या तार्‍यापासूनचे अंतर हे बुध आणि सूर्यामधील अंतरापेक्षाही कमी आहे.

 

२९ मार्च २०१८

‘जीसॅट 6-ए’ उपग्रहाचे प्रक्षेपण

     भारताच्या ‘जीसॅट-6 ए’ या संपर्क उपग्रहाचे प्रक्षेपण  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून केले जाणार आहे. ‘जीएसएलव्ही-एफ08’ या प्रक्षेपण यानातून हा उपग्रह सोडण्यात येणार असून त्याचे 27 तासांचे काऊंटडाऊन सुरू झाले. ‘जीएसएलव्ही एफ-08’ यानाचे हे 12 वे प्रक्षेपण असणार आहे. ‘जीसॅट 6-ए’ हा उपग्रह ‘जीसॅट-6’ सारखाच असून उच्च दर्जाच्या एस-बँड कम्युनिकेशनसाठी त्याचा उपयोग केला जाईल. उपग्रह आधारित मोबाईल संपर्कासाठीदेखील याचा उपयोग होणार आहे.

भारताची ‘सुवर्ण मुस्कान’

     महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात मुस्कानने सुवर्णवेध घेतला आणि आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत भारताने चीनला मागे टाकत पदक तालिकेत अव्वलस्थान पटकावले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी 16 वर्षीय मुस्कानने चीन आणि थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे चौथे वैयक्‍तिक सुवर्णपदकही ठरले. 

   याशिवाय मुस्कान, मनू भाकर आणि देवांशी राणा यांनीही सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर भारताने एकूण 9 सुवर्णपदके आपल्या खात्यात जमा केली. चीनला 8 सुवर्ण आहेत. याशिवाय भारतीय नेमबाजांनी पाच रौप्य आणि आठ कांस्य पदकांचीही कमाई केली. अनंतजितसिंग नारुका, आयुष आणि गुरनिलाल सिंग यांनी पुरुषांच्या स्कीटमध्ये 348 गुणांसह रौप्यपदक जिंकले.

२८ मार्च २०१८

मनू-अनमोल यांची सुवर्ण कामगिरी

     मनू भाकेरने सातत्यपूर्ण खेळ करताना सिडनी येथे सुरू असलेल्या कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. १६ वर्षीय मनू आणि १९ वर्षीय अनमोल या युवा नेमबाजांनी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र गटात वर्चस्व गाजवत सुवर्णपदक पटकावले.

     भारताच्याच जेनेमत सेखोनने महिलांच्या स्कीट प्रकारात कांस्यपदक जिंकले. दहा मीटर एअर रायफल प्रकारात १७ वर्षीय श्रेया अग्रवाल आणि १९ वर्षीय अर्जुन बबुटा या जोडीलाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

        मनू आणि अनमोल यांनी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र गटाच्या अंतिम फेरीत सुरुवातीपासून वर्चस्वपूर्ण खेळ केला. त्यांनी पात्रता फेरीत नव्या विक्रमाची (७७० गुण) नोंद करताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून त्याच ताकदीचा खेळ अपेक्षित होता आणि त्यावर ते खरे उतरले. त्यांनी एकूण ४७८.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. चीनच्या लियू जिन्याओ आणि ली झूई या जोडीला (४७३.३) ५.६ गुणांच्या फरकाने रौप्यपदकावर, तर चीनच्याच वँग झेहाओ आणि झिओ जिआरुईक्सून यांना (४१०.७) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याच गटात भारताची गौरव राणा व महिमा अग्रवाल (३७०.२) ही जोडी चौथ्या स्थानावर राहिली.

अनीशचा सुवर्णवेध

     उद्योन्मुख खेळाडू अनीश भानवालाने भारताला कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून दिले. १५ वर्षीय अनीशने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात बाजी मारली.

      सर्वाधिक गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या अनीशसमोर अनहाद जवांदा आणि राजकनवर सिंग संधू या भारतीय खेळाडूंसह चीनच्या खेळाडूंचे तगडे आव्हान होते. मात्र, अनीशने २९ गुणांसह सुवर्णपदक निश्चित केले. चीनच्या चेंग झिपेंग (२७) आणि झँग ज्युमिंग (२३) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

    अनीशच्या या सुवर्णवेधासह भारताने पदकतालिकेत दुसरे स्थान कायम राखले आहे. भारताच्या खात्यात ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण १५ पदक आहेत. १७ पदकांसह चीन अव्वल स्थानावर आहे. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक गटात भारताला रौप्य आणि कांस्यपदक जिंकण्यात यश आले. अनीश, अनहाद आणि आदर्श सिंग या संघाने रौप्य, तर राजकनवर, जप्त्येश सिंग जसपाल आणि मनदीप सिंग या संघाने कांस्यपदक जिंकले.

२७ मार्च २०१८

डॉ. गंगाधर पानतावणे यांचं निधन

     पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे (वय ८१) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमधील एमआयटी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

     साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गंगाधर पानतावणे यांना गेल्याच आठवड्यात 'पद्मश्री' पुरस्करानं गौरवण्यात आलं होतं. दलित साहित्य आणि दलित चळवळ या विषयांत गंगाधर पानतावणे यांचं भरीव योगदान होतं. गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ साली नागपुरात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरात झालं. एमएची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी मिळवली. त्यानंतर याच विद्यापीठात म्हणजेच, आताच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. 

         वैचारिक लिखाणाबरोबरच समीक्षेच्या प्रांतातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. 'धम्म चर्चा` `मूल्यवेध', 'मूकनायक', 'विद्रोहाचे पाणी पेटले आहे', 'वादळाचे वंशज', 'दलित वैचारिक वाड्मय', 'किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड', साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती', 'साहित्य शोध आणि संवाद' हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

२६ मार्च २०१८

आशियाई बिलीअर्डस स्पर्धेत पंकज अडवाणीला अजिंक्यपद

    पंकज अडवाणीने अंतिम फेरीत बी. भास्करवर 6-1 अशा फरकाने मात करत आशियाई बिलीअर्डस अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह पंकजने आपले विजेतेपद यंदाच्या वर्षीही कायम राखले आहे. दुसरीकडे महिलांच्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमी कमानीने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला 3-0 ने पराभूत केले. आशियाई पातळीवर पंकज अडवाणी याचे  हे अकरावे सुवर्णपदक ठरले. आजच्या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतरही पंकजने भास्करच्या चुकांचा फायदा घेत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली.

       चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये पंकज अडवाणीने भास्करला एकही गुण मिळवण्याची संधी न देता चारीमुंड्या चित केले. चौथा आणि पाचवा सेट गमावल्यानंतरच भास्करच्या सामन्यात पुनरागमनाच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या. या विजयानंतर पंकज अडवाणीने, आपल्या कामगिरीत सातत्य राखून देशाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले

सूर्यमाले बाहेरील नव्या ग्रहांचा शोध

    अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ सध्या ट्राजिंटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट (टीईएसएस) मिशनच्या पुढील टप्पा येत्या 16 एप्रिल रोजी लाँच करण्याच्या तयारीत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या माध्यमातून आपल्या सूर्यमालेबाहेरील नव्या ग्रहांचा शोध घेतला जाणार आहे. सूर्यमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेणार्‍या अंतराळ यानाला ‘स्पेस एक्स’च्या ‘फाल्कन 9’ रॉकेटसमवेत फ्लोरिडास्थित एअरफोर्स स्टेशनवरून लाँच करण्यात येणार आहे. 

   ‘टीईएसएस मिशन’ च्या माध्यमातून सुमारे दोन लाख तार्‍यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. संशोधक  या मोहिमेतून सुमारे दोन हजार ग्रह आणि संभावित ग्रहांचा शोध घेण्यात येईल, असा विश्‍वास व्यक्‍त करत आहेत. या संशोधकांच्या मते यातील किमान 300 ग्रह हे पृथ्वीइतके अथवा मोठ्या आकाराचे म्हणजे ‘सुपर अर्थ’ असतील. या ग्रहांचे टेलिस्कोपच्या मदतीने निरीक्षण करून तेथे जीवनाची शक्यता आणि अन्य वैशिष्ट्ये पडताळून पाहण्यात येतील.

२४ मार्च २०१८

व्लादिमीर पुतीन पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी विजयाची घोडदौड कायम राखत पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.राष्‍ट्राध्यपदाच्या निवडणुकीत त्‍यांनी मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवत चौथ्‍यांदा रशियाच्या राष्‍ट्राध्यक्षपदाचा मान मिळवला आहे. 

   पुतीन यांना २०१२ मध्ये झालेल्‍या निवडणुकीतील मतांपेक्षाही यावेळी अधिक मते मिळाली आहेत. रशिया आणि पाश्चात्त्य देशांचे संबंध बिघडलेले असताना झालेल्या या निवडणुकांत रशियन नागरिकांनी पुन्हा पुतीन यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. २०२४ पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदी राहणार आहेत. 

    पुतीन सध्या ६५ वर्षाचे असून, त्‍यांचा राष्‍ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेल त्‍यावेळी ते ७१ वर्षांचे होतील. २०२४ पर्यंत त्‍यांचा राष्‍ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाल असेले. या कार्यकालानंतर जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर दीर्घकाळ रशियाचे नेतृत्व केल्याचा मान पुतीन यांना मिळणार आहे.  

     पुतीन यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कम्युनिस्ट पक्षाचे ग्रुदिनिन यांना १३ टक्के मते मिळाली तर, व्लादिमीर झिरिनोवस्की यांना ६ टक्के मते मिळाली. ७५.९ टक्के मते मिळवत पुतीन यांनी आपला विजय सोपा केला.

‘यलोस्टोन’ ज्वालामुखी

    अमेरिकेतील टेक्सास प्रांतात एक अतिशय धोकादायक ज्वालामुखी सापडला असून, तो बाहेर पडल्यास मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘यलोस्टोन’ असे या ज्वालामुखीचे नाव असून या ज्वालामुखीखाली 75 कि.मी. लांबचे कॅनल सापडले आहे.  त्यात प्रचंड लाव्हा आहे. हा ज्वालामुखी कधीही फाटू शकतो.

२३ मार्च २०१८

रोबोट सोफिया बनणार 'एव्हरेस्टवीर'

    सौदी अरबचे नागरिकत्व मिळवलेली सोफिया रोबो लवकरच 'एव्हरेस्टवीर' बनणार असून ती जगातील सर्वात उंच असलेले माउंट एव्हरेस्ट सर करणार आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी सोफिया पहिली रोबोट बनणार आहे. 

     काठमांडूमध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)च्या एका आयोजित कार्यक्रमात सोफिया सहभागी झाली होती. हुबेहुब मानवासारखी दिसणारी सोफियाने यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट सर करणार असल्याचे सोफियाने यावेळी सांगितले. परंतु, ते कधी सर करणार याविषयी तिनं अद्याप सांगितलं नाही. 

     सौदी अरबचे नागरिकत्व मिळालेली सोफिया ही पहिली रोबो आहे. आतापर्यंत मानवाच्या आदेशानुसार चालणारे यंत्रमानव पुढील काळात स्वतःच स्वतःचे नियंत्रण करू शकतील आणि भविष्यात जगातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मानवाला नक्कीच सहकार्य करतील', असं सोफिया म्हणाली. हाँगकाँगच्या हॅनसन रोबॉटिक्स या कंपनीनं सोफियाला बनवलं आहे. मानवाचे गुण असलेली सोफिया ही पहिली रोबो आहे.

२२ मार्च २०१८

जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर!

      तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या आयबीएमने जगातील सर्वात छोट्या आकाराचा कॉम्प्युटर विकसित केला आहे. त्याची लांबी 1 मिलीमीटर असून रूंदीही 1 मिलीमीटर आहे. ‘आयबीएम थिंक 2018’ कॉन्फरन्समध्ये या कॉम्प्युटरचे प्रदर्शन करण्यात आले.

     एखाद्या मीठाच्या दाण्यापेक्षाही हा कॉम्प्युटर लहान आहे. त्याची निर्मिती करण्यासाठी दहा सेंटपेक्षा कमी खर्च येतो आणि तो मॉनिटर, अ‍ॅनालाईज, कम्युनिकेट अशी कामे करू शकतो. डाटानुसार तो कामही करू शकतो. मानवी डोळ्यांना दिसणार नाहीत इतक्या कमी आकाराच्या फूटप्रिंटवर शेकडो ट्रांझिस्टर्स आहेत. एखादे उत्पादन त्याच्या वापराच्या काळात नीट हाताळले गेले आहे की नाही यावर ते लक्ष ठेवू शकते.

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

     जगातील सर्वाधिक वेगवान समजल्या जाणाऱ्या आणि आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असलेल्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली. राजस्थानातील पोखरण येथील तळावरुन ही चाचणी पार पडली. कमी उंचीवर वेगाने उड्डाण घेणारे आणि रडारच्या टप्प्यातही ने येणारे क्षेपणास्त्र अशी ब्रह्मोसची ओळख आहे.

 

२१ मार्च २०१८

किदम्बी, देववर्मन ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित

    अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि आशियाई स्पध्रेतील माजी सुवर्णपदक विजेता टेनिसपटू सोमदेव देववर्मन यांना मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. त्यांच्यासह पॅरालिम्पिक स्पध्रेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देणारे मुर्लीकांत पेटकर यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.

     यंदाच्या वर्षांत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि स्नूकर व बिलियर्ड्समधील विश्वविजेता पंकज अडवाणी यांना पद्मभुषण, तर २०१७च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पध्रेत ४८ किलो वजनी गटातील विजेत्या सैखोम मिराबाई चानूला पद्मश्री जाहीर झाला आहे. मात्र, हे तिघेही विविध कारणास्तव या सोहळय़ात उपस्थित राहू शकले नाही.

      बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या किदम्बीने गत हंगामात चार सुपर सीरिज जेतेपदांसह एकूण सहा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

२० मार्च २०१८

‘पद्म’ पुरस्कारांसाठी ८४ जणांची निवड

      ‘पद्म’ पुरस्करांसाठी केंद्रीय मंत्री, राज्य सरकारे, राज्यपाल यांच्या शिफारशीदेखील यंदा निवड समितीने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कारांसाठी 35 हजार 595 शिफारशी आल्या होत्या. त्यापैकी फक्‍त 84 जणांची निवड करण्यात आली. दहाजणांच्या निवड समितीने फारसे परिचत नसलेल्या; पण समाजासाठी आयुष्य वेचलेल्या लोकांची निवड केली. ‘पद्म’ पुरस्कार 20 मार्च  आणि 2 एप्रिल रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. यात तीन पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 72 पद्मश्री पुरस्करांचा समावेश आहे.

     माहिती अधिकाराखाली याबाबतचा प्रश्‍न गृह मंत्रालयाकडे विचारण्यात आला होता. आठ राज्य सरकारे, सात राज्यपाल आणि 14 केंद्रीय मंत्र्यांनी सुचवलेली नावे निवड समितीकडून फेटाळण्यात आली. यात अरुण जेटली आणि प्रकाश जावेडकर या केंद्रीय मंत्र्यांचाही समावेेश आहे. तामिळनाडूने सहा, हरियाणाने पाच, जम्मू-काश्मीरने 9, कर्नाटकने 44, उत्तराखंडने 15, बिहार, राजस्थान प्रत्येकी, तर दिल्‍लीने सात नावांची शिफारस केली होती.

निवड समितीत कोण होते?

     कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा, केंद्रीय गृह सचिव राजीव गावुबा, पंतप्रधानांचे अतिरिक्‍त प्रधान सचिव पी. के. मिश्रा, माजी केंद्रीय मंत्री अरीफ मोहम्मद खान, राज्यसभा सदस्य स्वप्नदास गुप्‍ता, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे, एसबीआयच्या माजी चेअरमन अरुंधती भट्टाचार्य, गायक शेखर सेन आणि हरिवंश यांचा समावेश होता.

व्‍ही. के. शशिकला यांचे पती नटराजन यांचे निधन

      बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि 'अण्णाद्रमुक'मधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम नटराजन यांचे निधन झाले आहे.  छातीत दुखत असल्‍याने त्‍यांना गेल्‍या महिन्यात रुग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना सोमवारी रात्री त्‍यांचे निधन झाले. 

    ऑक्‍टोंबर २०१७ मध्ये चेन्नईतील एका रूग्‍णालयात नटराजन यांचे लिवर आणि किडनीचे प्रत्‍यारोपन करण्यात आले होते. मात्र, त्‍यांच्या प्रकृतील सुधारणा होत नसल्‍याने त्‍यांना पुन्हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. 

     सुप्रीम कोर्टाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना चार वर्षांचा तुरुंगवास सुनावला असून, सध्या त्या बंगळुरुमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

१९ मार्च २०१८

पुतीन पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान

      रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनयांनी पुन्हा एकवार ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांना २०१२ मधील निवडणुकीतल्या मतांपेक्षाही अधिक मते यावेळी मिळाली. रविवारी हे मतदान झाले. रशिया आणि पाश्चात्त्य देशांचे संबंध बिघडलेले असताना झालेल्या या निवडणुकांत रशियन नागरिकांनी पुन्हा पुतीन यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. २०२४ पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदी राहणार आहेत. 

     हा सहा वर्षांचा कार्यकाळ संपेल तेव्हा पुतीन ७१ वर्षांचे झालेले असतील. त्यावेळी म्हणजे २०२४ मध्ये जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर दीर्घकाळ रशियाचे नेतृत्व केल्याचा मान पुतीन यांना मिळणार आहे. ६५ वर्षीय पुतीन २००० सालापासून रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान आहेत. 

      पुतीन यांना ७५.९ टक्के मते मिळाली आहेत. पुतीन यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कम्युनिस्ट पक्षाचे ग्रुदिनिन यांना १३ टक्के मते तर व्लादिमीर झिरिनोवस्की यांना ६ टक्के मते मिळाली. प्रबळ विरोधक नसल्याने पुतीन यांचा विजय सोपा होता.

अंटार्क्टिकावर वर्षभर राहण्याचा भारतीय महिलेचा विक्रम

      अंटार्क्टिकावर म्हणजे केवळ हिमवादळ, हिमपात आणि रक्‍त गोठवणारी थंडी असते. अशा अत्यंत थंडीच्या आणि दुर्मीळ प्रदेशात एक वर्षाहून अधिक काळ राहण्याचा विक्रम एका भारतीय महिलेने केला आहे. भारताची मान अभिमानाने उंचावण्याचा हा विक्रम 56 वर्षीय मंगला मणी या इस्रोमध्ये कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ महिलेने केला आहे. असा विक्रम करणार्‍या मंगला मणी या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

   इस्रोच्या शास्त्रज्ञा मंगला मणी यांनी बर्फाच्छादित अंटार्क्टिकावर तब्बल 403 दिवस वास्तव्य केले. त्या नोव्हेंबर 2016 मध्ये आपल्या टीमसोबत अंटार्क्टिकावर असलेले भारतीय संशोधन केंद्र ‘भारती’वर गेल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे त्या 23 सदस्यीय संशोधक पथकात एकट्या महिला होत्या. कठोर परिश्रम आणि जिद्द यामुळे मंगला मणी यांनी एकप्रकारे नारीशक्‍तीचे विराट दर्शनच घडविले. त्या नुकत्याच ‘अंटार्क्टिका मिशन’ पूर्ण करून परतल्या आहेत. 

    अंटार्क्टिकावरील हवामान अत्यंत प्रतिकूल असते. यामुळे संशोधन केंद्रातून बाहेर पडताना फारच सतर्कता बाळगावी लागते. अशा प्रतिकूल वातावरणात दिवसा केवळ दोन ते तीन तासच ‘संशोधन’ केंद्रातून बाहेर पडणे शक्य होते. इतका वेळ बाहेर राहिल्यानंतर उष्णता मिळविण्यासाठी पुन्हा संशोधन केंद्रावर जावेच लागते.

१७ मार्च २०१८

देशातील प्रसिद्ध गणितज्ज्ञ

      जगाला शुन्याची देणगी देणार्‍या भारत देशात प्राचीन काळापासूनच गणिताचा अभ्यास होत आला आहे. नुकताच जगभरात ‘वर्ल्ड पाय डे’ साजरा झाला. ‘पाय’ची किंमत हा प्रकार गणित शिकलेल्या प्रत्येकाला माहिती असेलच. त्यावरूनच हा ‘पाय दिवस’ साजरा केला जातो. यानिमित्त भारतातील काही प्रसिद्ध प्राचीन आणि अर्वाचीन गणितज्ज्ञांची माहिती...

प आर्यभट :

   इसवी सन 476 ते 550 हा आर्यभटांचा काळ. ते एक महान गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. अवघ्या 23 व्या वर्षीच त्यांनी ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये गणिताची अनेक सूत्रे व सिद्धांत मांडलेले आहेत. त्यांचा ‘आर्यसिद्धांत’ हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.

     प ब्रह्मगुप्त : इसवी सन 598 ते 668 हा ब्रह्मगुप्त यांचा काळ. त्यांनी गणित विषयावर ‘ब्रह्मस्फुट सिद्धांत’ हा ग्रंथ लिहिला. गणितीय क्रियांमध्ये शुन्याचा वापर करणारे ते पहिले गणितज्ज्ञ होते, असे मानले जाते. त्यांच्या ग्रंथांमधून अनेक गणितीय सूत्रे व सिद्धांत पाहायला मिळतात, जे आधुनिक काळात अत्यंत महत्त्वाचे ठरले.

प भास्कराचार्य-1 : 

    इसवी सनाच्या सातव्या शतकातील भास्कराचार्यांच्या जीवनाविषयी कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, ते एक मराठी गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते असे काहींचे मत आहे.
 त्यांनीच शुन्याचा वापर करून भारतीय दशमान पद्धती अधिक रूढ केली, असे मानले जाते. 

      भास्कराचार्य आणि ब्रह्मगुप्त यांनी भारतीय गणितशास्त्राला मोठे योगदान दिले.

प भास्कराचार्य-2 : 

      बाराव्या शतकातील हे भास्कराचार्य कर्नाटकातील होते, असे म्हटले जाते. त्यांनीच प्रसिद्ध ‘सिद्धांत शिरोमणी’ हा गणित विषयावरील ग्रंथ लिहिला. त्याचा एक भाग म्हणजे ‘लीलावती’. पाश्‍चात्यांच्या अनेक शोधांपूर्वीच भास्कराचार्यांनी महत्त्वाचे सिद्धांत मांडलेले होते. 

प श्रीनिवास रामानुजन :

       रामानुजन यांना गणित विषयाचा मोठाच ध्यास होता व त्यामुळे शालेय जीवनात त्यांचे अन्य विषयांकडे दुर्लक्ष होत असे. त्यांनी गणिताचे 120 सिद्धांत मांडले. त्यांची गणित विषयातील मोलाची कामगिरी पाहून केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना आमंत्रित केले होते. ‘अ‍ॅनालिटिकल थिअरी ऑफ नंबर्स’,‘एलिप्टिकल फंक्शन’ आणि ‘इनफायनाईट सिरिज’वर त्यांनी महत्त्वाचे काम केले.

प शकुंतला देवी :

    या भारतातील आजपर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ज्ञ आहेत. त्यांना ‘मानव कॉम्प्युटर’ही म्हटले जाई. अत्यंत किचकट गणिती क्रियाही त्या कॅल्क्युलेटरशिवाय करून दाखवत. वयाच्या केवळ सहाव्या वर्षीच त्यांनी आपल्या गणिताच्या ज्ञानाने लोकांना दीपवून टाकले होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जगातील सर्वात वेगवान संगणकाच्या आधीच अवघ्या 50 सेकंदांमध्ये त्यांनी 201 चे 23 वे मूळ काढून दाखवले होते. 

      प सी.आर. राव : ‘थेअरी ऑफ इस्टिमेशन’साठी राव यांची ख्याती आहे. कर्नाटकात त्यांचा जन्म झाला आणि आंध्र विद्यापीठातून त्यांनी गणितात पदव्युत्तर पदवी संपादन केली. कोलकता विद्यापीठातून त्यांनी स्टॅटिस्टिक्समधील एम.ए. पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यांनी 14 पुस्तके लिहिली असून मोठ्या नियतकालिकांमध्ये त्यांचे 350 रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. 

प सी.एस. शेषाद्री :

       शेषाद्री यांनी अल्जेब्रीक जॉमिट्रीमध्ये बरेच योगदान दिले. मद्रास विद्यापीठात त्यांनी गणित विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केली. शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट हे त्यांचे संशोधन कार्य. 2009 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले.

सौरऊर्जेवर चालणारी सायकल!

      ओडिशाच्या बौद्ध जिल्ह्यातील मंकडचुआन नावाच्या एका गावातील तरुणाने चक्क सौरऊर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे. आकाश कुमार मेहर असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव. त्याने एका ऑटोगियर सायकलीला सौरऊर्जेची जोड दिली आहे. ही सायकल ताशी 25 किलोमीटर वेगाने धावू शकते.

   आकाशने भुवनेश्‍वरमधील महाविद्यालयात विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले आहे. प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दिल्लीला गेला होता. मात्र, वडिलांचे आरोग्य बिघडल्याने तो गावी परतला. दिल्लीत असताना त्याने इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा पाहिली होती. त्यापासून प्रेरणा घेऊन त्याने ऑटो गियर सायकल बनवण्याचे काम सुरू केले. केवळ पंधरा हजार रुपये खर्च करून त्याने ही सायकल विकसित केली आहे. त्यावरून दीडशे किलोपर्यंतचे वजन नेता येऊ शकते. अर्थात आकाश ढगाळलेले असेल तर ही सायकल सुमारे चार किलोमीटरचेच अंतर कापते. आकाशने आता अशा प्रकारचे चारचाकी वाहन विकसित करण्याचे ठरवले आहे.

१६ मार्च २०१८

आनंदी राष्ट्रांमध्ये भूतान आशियात अव्वल

      वर्ल्ड हॅप्पीनेस डे'च्या चार दिवसांअगोदरच राष्ट्र संघाच्या 'सस्‍टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन नेटवर्कने जगातील आनंदी देशांची यादी जाहिर केली . यात आशियामध्ये भूतान ९७ गुणांसह अव्वलस्थानी आहे. २० मार्चला 'वर्ल्ड हॅप्पीनेस डे' साजरा करण्यात येतो. भूतानमध्ये नागरिकांच्या आनंदी जगण्यावर अधिक भर दिला जातो.  त्यामुळेच जगभरातील १५६ देशांच्या यादीत भूतानने पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवले. गेल्या दहा वर्षांपासून भूतानमधील आनंदाची व्याख्याही लक्षवेधी ठरत आहे.

   इतर राष्ट्रांच्या तुलनेत भूतानमधील नागरिक अध्यात्म आणि दैनंदिन जीवनाती गोष्टींमध्ये समतोल ठेवतात. याशिवा. येथील नागरिक टिव्ही, रेडिओ आणि इंटरनेट या गोष्टींपासून दूर आहेत. देशाच्या ५० टक्केभाग हा पर्यावरण पूरक आहे. या गोष्टींमुळे नागरिकांच्या आनंद परमोच्च स्तरावर पोहचण्यास मदत होते, असे गेल्या काही दिवसांपासून दिसू येत आहे. २०११ मध्ये भूतानचे तत्कालीन पंतप्रधानांनी 'वर्ल्ड हॅप्पीनेस डे'च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंघातील भाषणात भूतान नागरिकांच्या आनंदावर अधिक भर देणार असल्याचे म्हटले होते.

    बुधवारी जारी करण्यात आलेल्या अहवालातून भूतानमधील नागरिक अधिक आनंदी असल्याचा शिक्कामोर्तब झाला. आशियातील राष्ट्रांमध्ये भूतानच्यानंतर श्रीलंका, भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान आणि चीन हे देश भारतापेक्षा आनंदी असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या यादीत भारताचे स्थान ११ स्थानांनी घसरण झाली आहे.

पहिली स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन

      भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन लवकरच पटरीवर धावणार आहे. जूनपासून १३० किमी ताशी वेगाने धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्याऐवजी १६० किमी ताशी वेगाने धावणारी सेमी हाय स्पीड ट्रेन सुरु होईल. ही स्वदेशी बनावटीची ट्रेन मेट्रोप्रमाणे स्वयंचलित असल्यामुळे लोकोमोटिव्हची शिवाय धावताना दिसेल. प्रवासाचे अंतर अगदी कमी वेळात पार करणे शक्य होणार असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. शताब्दीच्या जागी धावणाऱ्या आधूनिक ट्रेन १६ कोचची असेल. यात अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. आरामदायी आसन व्यवस्थेसाठी प्रत्येक कोचसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. 

     विशेष म्हणजे युरोपीयन देशातील कोचेसवर करण्यात येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च ४० टक्क्यांनी कमी आहे. स्वदेशी बनावटीच्या ट्रेनसाठी एकूण १०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या चेन्नईमधील रेल्वे कारखान्यात या ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी सुधांशू मनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वदेशी बनावटीची सर्वाधिक वेगाने धावणारी ही देशातील पहिलीच ट्रेन ठरेल. भारतीय रेल्वेने यंदाच्या वर्षात २ हजार ५०० कोचेसची विक्रमी निर्मिती केली आहे. रेल्वे कोचेसची मोठ्या प्रमाणात निर्मिती  करण्यावर भर दिला जात असल्याचेही सांगितले. 

ट्रेनची खास वैशिष्ट्ये

>5400 हॉर्स पावर इंजिन 
>12  मॉडर्न कोच 
>160 ताशीपेक्षा अधिक वेगाची क्षमता 
>105 मिनटांत 200 किमी अंतर पार करु शकते.
>शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा २५ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार

आशियाई क्रॉसकंट्रीसाठी स्वाती गाढवेची निवड

      पुण्याच्या स्वाती गाढवेची आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली असून, चीनमध्येही शर्यत होणार आहे. सलग पाचव्यांदा स्वातीची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्वाती ही मध्य रेल्वेत (पणे विभाग) नोकरीस असून, ती भास्कर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सणस क्रीडांगणावर सराव करते. भोसले म्हणाले, 'सलग पाच वेळा आशियाई स्पर्धेसाठी निवड होणारी स्वाती ही भारताची पहिलीच धावपटू आहे. गेल्या वेळी स्वाती सहाव्या क्रमांकावर राहिली होती. या वेळी दहा किलोमीटर अंतराची शर्यत असणार आहे. या वेळी ती पदक मिळवेन, अशी आशा आहे.' दरम्यान, स्वातीसह ललिता बाबर आणि संजीवनी जाधव यांचीही या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१४ मार्च २०१८

पीएच.डी.धारकांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर

      विविध विषयांत संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळविणार्‍या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. आर्थिक सहयोग व विकास संस्था (ओईसीडी) या संस्थेने ही क्रमवारी जाहीर केली आहे. पीएच.डी. पदवी मिळविणार्‍या देशात अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.

    आर्थिक सहयोग व विकास संस्थेने 2014 साली पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या एकूण संशोधकांच्या संख्येनुसार रँकिंग जाहीर केली आहे. या अहवालानुसार जगातील 15 देश हे पीएच.डी. पदवीधारकांच्या संख्येत आघाडीवर आहेत. क्रमवारीनुसार पाचव्या स्थानी जपान, यानंतर फ्रान्स, दक्षिण कोरिया, स्पेन, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तुर्की, इंडोनेशिया, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांचा समावेश आहे.

   भारतात 2014 मध्ये 24,300 पीएच.डी. पदवीधारक

          सन 2014 या वर्षात भारतात सर्व विषयातील मिळून पीएच.डी. पदवी प्राप्त करणार्‍यांची संख्या ही 24,300 इतकी असून जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर आहे. याच काळात अमेरिकेत 67,449 जणांनी पीएच.डी. मिळविली असून, अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर जर्मनीने 28,147 पीएच.डी. पदवी प्राप्त करून जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले आहे, तर इंग्लंड ने 25,020 पीएच.डी. पदवीधारकासह जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे.

          इंग्लंड आणि भारत या देशात पीएच.डी. धारकांच्या संख्येत फार मोठा फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे. पीएच.डी. पदवी प्राप्त करणार्‍या देशात भारत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असला तरी, उभारत्या आर्थिक देशात भारताचा क्रमांक अव्वल ठरला आहे. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स यासारख्या देशांना पीएच.डी. पदवीधर संख्येत मागे टाकले आहे.

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

      जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 वर्षी राहत्या घरी निधन झाले. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्याचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. तर आई इझाबेल या पदवीधर होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हॉकिंग दापंत्य उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला आले. 

    स्टीफन यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. गणित विषयात विशेष आवड असलेल्या स्टीफन यांनी 17व्या वर्षी कॉसमॉलॉजी या विषयात स्कॉलरशिप सुद्धा मिळवली. 1962मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आणि पुढील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1962च्या हिवाळी सुट्ट्यांमध्ये घरी असताना त्यांना त्रास होऊ लागला. डॉक्टरांना देखील रोगाचे अचूक निदान सापडत नव्हते. 8 जानेवारी 1963ला म्हणजेच वयाच्या 21व्या वर्षी स्टीफन यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपते. स्टीफन जास्ती जास्त दोन वर्ष जगतील असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण त्यानंतर या अवलियाने व्हील चेअरवर बसून फक्त एक बोट वापरून सैद्धांतिक भौतिकशास्त्रात भरीव असे योगदान दिले.

१२ मार्च २०१८

नवजोत कौर दुसऱ्या क्रमांकावर

      आशियाई विजेतेपद पटकाविणारी कुस्तीगीर नवजोत कौर हिला ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे. जागतिक कुस्ती महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत नवजोतने ही झेप घेतली आहे. किरगिझस्तान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले होते आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. या क्रमवारीत प्रथमच एवढे वरचे स्थान नवजोतला मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर फिनलंडची पेत्रा ओली आहे. विनेश फोगट ही ५० किलो वजनी गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ५९ किलो गटात संगीता फोगट पाचव्या क्रमांकावर आहे. ६२ किलोत ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक चौथ्या स्थानावर आहे.

काठमांडूत बांगलादेशचे प्रवासी विमान कोसळले

      बांगलादेशहून नेपाळकडे येणारे विमान सोमवारी राजधानी काठमांडू विमानतळाजवळ कोसळले. विमानात 67 प्रवाशांसह 17 कर्मचारी होते. बांगलादेशची राजधानी ढाका येथून काठमांडूकडे येणारे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना अनियंत्रित झाले आणि कोसळले. विमानाला आग लागली असून ती विझवण्याचे काम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

     US-बांग्ला एयरलाइनचे हे प्रवासी विमान धावपट्टीवर उतरत असताना अस्थिर झाले आणि त्यातून धुर येऊ लागला. काही क्षणातच ते विमानतळाच्या जवळ कोसळले. विमानातील 17 जणांना वाचवण्यात यश आल्याचे काठमांडू विमानतळाचे प्रवक्ते बीरेंद्र प्रसाद यांनी सांगितले. घटनास्थळी नेपाळ लष्कर मदत आणि बचाव कार्य करत आहे.

११ मार्च २०१८

जगातील पहिली उडणारी कार लाँच

      जगातील प्रत्येक शहरात आता वाढत्या ट्रॅफिकची समस्या अत्यंत गंभीरपणे जाणवू लागली आहे. या समस्येवर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून अशा वाहनांची चर्चा सुरू आहे की, ती रस्त्यावर धावण्याबरोबरच अलगदपणे आकाशातही उड्डाण करू शकतील. जिनेव्हात सध्या सुरू असलेल्या मोटार शोमध्ये ही कल्पना सत्यात उतरताना दिसत आहे. एका डच कंपनीने या मोटार शोमध्ये पीएएल-व्ही ही उडणारी कार सादर केली आहे. कंपनीने या कारचे नाव ‘लिबर्टी’ असे ठेवले असून, तिची किंमत केवळ चार कोटी रुपये आहे.

    या कारची एकदा का टाकी भरली की, ती सुमारे 500 कि.मी. इतके उड्डाण करू शकते. याशिवाय ती लेडरहित पेट्रोलवर चालते. मात्र, या उडणार्‍या कारमध्ये केवळ दोन माणसे बसू शकतात. या कारमध्ये कार आणि हेलिकॉप्टरमध्ये असणारी टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. या कारचे टॉपस्पीड ताशी 170 ते 180 कि.मी. इतके आहे. जमिनीवरील कारचे उडणार्‍या कारमध्ये रूपांतर होण्यासाठी 10 मिनिटे लागतात. तीन चाकांची, दोन सीटर लिबर्टी हवेत उडताना प्रोपेलर आणि  इंजिनच्या मदतीने उड्डाण करते. तिच्या टपावर असलेल्या रोटरमुळे ती हवेत स्थिर राहते.जगातील पहिल्या उडणार्‍या या कारची किंमत 4 कोटी रुपये इतकी आहे. कंपनीने तब्बल 10 वर्षे कठोर परिश्रम करून या उडणार्‍या कारला तयार केले आहे.

शहजार रिझवी याचं विश्वविक्रमासह सुवर्ण यश

      भारताच्या शहजार रिझवी यानं आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्ण यश प्राप्त केलं आहे. रिझवीनं २४३.३ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावलं. रिझवीनं जर्मनीच्या क्रिस्टियन रिट्जला पिछाडीवर टाकून अव्वल स्थान पटकावलं. तर याच गटात भारताच्या जितू रॉयला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. तसंच या गटात भारताच्या ओमप्रकाशनं चौथं स्थान मिळवलं. रविवारपासून मेक्सिकोत आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेला सुरुवात झालीय. 

       पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये भारताच्या नेमबाजांनी सुरेख कामगिरी केली. भारताच्या तीन नेमबाजांनी सत्रातील पहिल्याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. जितू रायनं याच प्रकारात २१९ गुणांसह कांस्य जिंकले. ओमप्रकाश १९८.४ गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला. मेहुलीनेदेखील २२८.४ गुणांची नोंद करत १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. 
       टॉप-८ खेळाडूंच्या यादीत ५७९ गुणांची नोंद करत रिझवीनं द्वितीय स्थान पटकावलं, तर ५८८ गुणांसह रिट्झ अव्वल स्थानावर आहे . जीतू राय ५७८ गुणांसह तिसऱ्या तर ५७६ गुणांची कमाई करत ओम प्रकाश मिथरवाल चौथ्या स्थानावर आहेत. 

१० मार्च २०१८

पतंगराव कदम यांचे निधन

      काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम (वय ७३) यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी पुण्यातील निवासस्थानी आणले असून सिंहगड बंगला येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 

    पुण्यातून त्यांचे पार्थिव सांगलीला नेण्यात येणार आहे. तेथे सोनहिरा कारखान्यात दुपारी दोन वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

अंजूमची रौप्यपदकाची कमाई

      भारताच्या अंजूम मुदगिल हिने वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. वाऱ्याच्या वेगाशी सामना करून अंजूमने वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्या पदकाचा वेध घेतला. या स्पर्धेतील भारताचे हे आठवे पदक ठरले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार ब्राँझपदके मिळवली. 

    मेक्सिको येथे ही स्पर्धा सुरू आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनच्या ४५ शॉट्सच्या अंतिम फेरीत अंजूमने ४५४.२ गुणांची कमाई केली. चीनच्या रुजिओ पेई हिने ४५५.४ गुण मिळवून सुवर्णपदक, तर टिंग सनने ४४२.२ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. ३ पोझिशनमध्ये गुडघ्यावर बसून (नी पोझिशन), पोटावर झोपून (प्रोन पोझिशन) आणि उभे राहून (स्टँडिंग) अशा तीन प्रकारांत प्रत्येकी १५ शॉट्स मारायचे असतात. यात प्रत्येकी पाच शॉट्सच्या मालिका असतात. सुरुवातीपासूनच अंजूम पदकाच्या शर्यतीत कायम होती. नी पोझिशनमध्ये १५ शॉट्सनंतर ती तिसऱ्या स्थानावर होती. प्रोन पोझिशननंतर ती आघाडीवर होती. स्टँडिंगमध्ये सुरुवातीच्या शॉट्सनंतर तिची चौथ्या स्थानावर घसरण झाली होती. मात्र, ४१व्या शॉट्सला तिने १०.८ गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर तिने झेप घेतली. यानंतर तिने १०.२, १०.१, ९.५ आणि १०.२ असे गुण मिळवून रौप्यपदक निश्चित केले.

९ मार्च २०१८

मारुती सुपर कॅरीला ‘कमर्शिअल व्हेईकल ऑफ द इयर’चा पुरस्कार

      वार्षिक सी. व्ही. ॲवॉर्डसमध्ये मारुती सुझुकी सुपर कॅरी लाइट कमर्शिअल व्हेईकलला मानाचे  पुरस्कार मिळाले. ‘स्मॉल कमर्शिअल व्हेईकल ऑफ द इयर’ व या वषीचा सर्वोच्च पुरस्कार ‘कमर्शिअल व्हेईकल ऑफ द इयर’वर मारुती सुझुकी सुपर कॅरीने आपले नाव कोरले.

        मारुती सुझुकी चॅनलचे उपाध्यक्ष राम सुरेश अकेला; तसेच मारुती सुझुकी कमर्शिअल व रूरल मार्केटिंगचे महाव्यवस्थापक अरुण अरोरा यांनी हे पुरस्कार स्वीकारले. अकेला यांनी पुरस्काराचा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत भारतीयांच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणखी उत्साह आल्याचे सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार उत्पादनांच्या साहाय्याने मारुती सुझुकीने व्यावसायिक वाहन क्षेत्रात सुपर कॅरी ही पहिली मिनी-ट्रक आणली आहे.

प्रसिद्ध सूफी गायक प्यारेलाल वडाली यांचं निधन

     वडाली ब्रदर्स नावाने प्रसिद्ध असलेले प्यारेलाल वडाली यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी त्यांचं निधन झालं. पूरन चंद वडाली यांचे ते छोटे भाऊ होते. 

     प्यारेलाल वडाली यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमृतसरमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. अमृतसरमधील एका छोट्या गावातून आलेले वडाली बंधू हे पंजाबी आणि सूफी गाण्यामुळे देश-विदेशात प्रसिद्ध होते. काफीया, गझल आणि भजन म्हणण्यातही वडाली बंधू पटाईत होते. 

८ मार्च २०१८

भारतातील सर्वात श्रीमंत महिला

      भारतातील सर्वात श्रीमंत वक्ती कोण आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण,  भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण असे विचारले तर आपणाला हे कदाचीत माहीत नसेल. 

    फोर्ब्सने जगातील २५६  अब्जाधीश महिलाची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये भारताच्या आठ महिलांचा समावेश आहे. या आठ महिलांमध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो सावित्री जिंदाल यांचा. सावित्री जिंदाल या जिंदाल ग्रुपच्या चेअरमन आहेत. त्यांची संपत्ती ८.८ बिलियन डॉलर इतकी आहे. त्यांच्या खालोखाल बायोकॉनच्या किरन मुजुमदार - शॉ यांचा नंबर लागतो त्यांची संपत्ती ३.६ बिलियन डॉलर इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्मिता गोदरेज आहेत त्यांची संपत्ती २.९ बिलियन इतकी आहे. 

      फोर्ब्सने केलेल्या सर्वेक्षणात २०१८ मध्ये भारतात १२१ अब्जाधीश लोक आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १९ने वाढली आहे. फोर्ब्स मासिकानुसार भारताने अब्जाधीश लोकांच्या यादीत अमेरिका आणि चीन पाठोपाठ तिसरा क्रमांक पटाकवला आहे

विप्लव देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

      त्रिपुराच्या नूतन मुख्यमंत्रिपदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विप्लव देव यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. तर जिष्णू देबबर्मा यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. या नूतन मंत्रिमंडळाचा शपथविधी शुक्रवार, 9 मार्च रोजी होणार आहे. 

     त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजने 50 पैकी 35 जागा जिंकून डाव्यांच्या हातून सत्ता खेचून आणली होती. भाजपने दिलेल्या कडव्या लढतीच्या जोरावर येथे 25 वर्षांची डाव्यांची सत्ता संपुष्टात आली. पक्षाच्या संघटनबांधणीत महत्त्वाचा वाटा असणारे विप्लव देव यांना मुख्यमंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. या शपथविधी समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील भाजपचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी समारंभासाठी निमंत्रण देण्यात आले आहे

७ मार्च २०१८

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगात नं. १

      मुंबईतलं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातलं प्रथम क्रमांकाचं विमानतळ ठरलं आहे. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनल (ACI) ने विमानतळ सेवेच्या गुणवत्तेवरून दिलेल्या क्रमवारीनुसार हा मान मुंबई विमानतळाला मिळाला आहे. मुंबईसोबतच दिल्ली विमानतळानेही हा मान पटकावला आहे. 

       मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दरवर्षी ४० दशलक्ष प्रवाशांचा राबता असतो. या निकषावर मुंबई आणि दिल्ली विमानतळाला हा मान मिळाला आहे. त्या खालोखाल ५ ते १५ दशलक्ष प्रवाशांना सेवा देणाऱ्या हैदराबाद विमानतळाचा क्रमांक आहे. 

      दिल्ली आणि हैदराबाद विमानतळ जीएमआर समूह तर मुंबई विमानतळ जीव्हीके समूह चालवतात. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलने एक सर्वेक्षण केले होते. त्याआधारे या ही क्रमवारी ठरवली गेली. एअरपोर्टचा अॅक्सेस, चेक-इन, सुरक्षा स्क्रीनींग, विश्रामगृह, सामानाची व्यवस्था, रेस्टॉरंट आदी ३४ निकषांवर जागतिक पातळीवर हे सर्वेक्षण करण्यात आले.

अब्जाधीशांच्या यादीत भारत प्रथमच जगात तिसरा

      अब्जाधीशांच्या यादीत भारत पहिल्यांदाच जगात तिसऱ्या स्थानावर झळकला आहे. भारतात एकूण १२१ अब्जाधीश असून ही संख्या मागील वर्षीपेक्षा १९ अंकांनी वधारली आहे. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत. 
       फोर्ब्जने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज १०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत. 

      भारतात मुकेश अंबानींची संपत्ती सर्वाधिक ४०.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत मागील वर्षीपेक्षा १६.९ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. त्यांचे भारतातल्या सर्वाधिक श्रीमंताच्या यादीतले स्थान यंदाही अढळ आहे. जागतिक पातळीवर त्यांनी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे. २०१७ मध्ये २३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ३३ व्या स्थानावर होते. अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचे दुसरे स्थान पटकावले आहे. जिंदाल स्टील अँड पावरच्या सावित्री जिंदाल या सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. जागतिक क्रमवारीत त्या ८.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १७६ व्या स्थानावर आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा १.७ अब्ज डॉलर्ससह जागतिक यादीतले सर्वात कमी वयाचे भारतीय अब्जाधीश ठरले आहेत. एचसीएलचे संस्थापक शीव नाडर चौथे तर सन फार्माचे दिलीप संघवी पाचवे श्रीमंत भारतीय ठरले आहेत.

६ मार्च २०१८

कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

      नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चे अध्यक्ष कोनराड संगमा यांनी मेघालयच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल गंगा प्रसाद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 

       मेघालयातील विधानसभेच्या निकालानंतर रविवारी संगमा यांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर सोमवारी राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते. 

       कोनराड संगमा मेघालयचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पी संगमा यांचे पूत्र आहेत. १९९६ मध्ये १३ दिवसांच्या वाजपेयी सरकारच्या काळात पी. संगमा लोकसभेचे सभापती होते. कोनराड संगमा यांची बहिण अगाथा संगमा मनमोहन सिंह सरकारमध्ये ग्रामीण विकास खात्याच्या राज्यमंत्री पदावर होत्या.   

        संगमा यांच्या पक्षाला ६० पैकी १९ जागांवर यश मिळाले होते. मेघालयात काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या. पण संगमा यांनी ३४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत सरकार स्थापनेचा दावा केला. मेघालयमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. काँग्रेसला २१ जागावर समाधान मानावे लागले. तर एनपीपीला १९ जागा मिळाल्या. इशान्येत दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या भाजपला २ जागांवर यश मिळाले. इतर स्थानिक पक्षांना एकूण १७ जागा मिळाल्या होत्या.

 

सिंधुताई आणि आपटेंना ‘नारीशक्ती’ पुरस्कार

     अनाथांची आई डॉ. सिंधुताई सपकाळ आणि ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला बळवंत आपटे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारीशक्ती’ पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दरवर्षी महिला दिनी हा राष्ट्रीय ‘नारीशक्ती पुरस्कार दिला जातो. वर्ष २०१७ च्या पुरस्कारासाठी देशभरातील अनेक मान्यवर महिलांसह महाराष्ट्रातील दोन महिलांचा सन्मान होणार आहे. 

डॉ. सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट 

    अनाथांची आई म्हणून व्रत स्वीकारलेल्या ज्येष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आपलं आयुष्य व्यतीत करून शेकडो अनाथांना आईची माया दिली. त्यांच्या या संघर्षाची दखल घेत त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सिंधुताई सपकाळ उपाख्य माई म्हणूनच त्या सर्व परिचित आहेत. सिंधुताईंचा जन्म हा वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथील आहे.

 

५ मार्च २०१८

ऑस्कर: 'द शेप ऑफ वॉटर' सर्वोत्कृष्ट चित्रपट

      आंतरराष्ट्रीय सिनेजगतातील प्रतिष्ठेच्या ९० व्या 'ऑस्कर' पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा शानदार सोहळा सुरू आहे. 'थ्री बिलबोर्ड्स'साठी अभिनेता सॅम रॉकवेलला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 'इकारस'ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. 

ऑस्कर पुरस्कार पुढीलप्रमाणे: 
ऑस्कर २०१८ : ' द शेप ऑफ वॉटर' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

'डार्केस्ट अव्हर' साठी गेरी ओल्डमन यांनी पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर

'शेप ऑफ वॉटर्स' साठी गिलियर्मो डेल टोरो ठरले सर्वोत्तम दिग्दर्शक

ऑस्कर पुरस्कार: सर्वोत्कृष्ट गीत- रिमेम्बर मी (कोको)

ऑस्कर पुरस्कार: अलेक्झांडर डेस्पाल्ट यांना 'शेप ऑफ वॉटर्स' साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा ऑस्कर 
ऑस्कर पुरस्कार: सिनेमॅटोग्राफर राॅजर डिकन्स यांना 'ब्लेड रनर २०४९' साठी ऑस्कर 
जाॅडर्न पील यांना 'गेट आऊट' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार 
ऑस्कर पुरस्कार: जेम्स आयव्हरी यांना ‘कॉल मी बॉय युवर नेम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा रूपांतरण पुरस्कार 
ऑस्कर पुरस्कार: ‘द सायलंट चाइल्ड’ ने पटकावला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्टचा ऑस्कर

ऑस्कर पुरस्कार: सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म - 'कोको' 
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट - ‘अ फॅन्टॅस्टिक वुमन’ 
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री- अॅलिसन जेने (आय, टोन्या) 
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - 'डिअर बास्केटबॉल' 
ऑस्कर पुरस्कार: सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - 'ब्लेड रनर २०४९' 
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - मार्क ब्रिजेस (फॅन्टम थ्रेड) 
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - रिचर्ड किंगस अॅलेक्स गिबसन (डंकर्क) 
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- 'शेप ऑफ वॉटर'

 

अपंगांचा आधारवड जावेद अबिदी यांचं निधन

     अपंगांचे देवदूत असलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जावेद अबिदी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ५३ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे अपंगाचा आधारवड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. 

    अपंगांच्या हक्कांसाठी झगडणारा भारताचा वैश्विक चेहरा म्हणूनही जावेद अबिदी यांची ओळख होती. त्यांनी अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी 'डिसअॅबिलिटी राइट ग्रुप' (डिआरजी)ची स्थापना केली होती. 'राइट्स फॉर पर्सन विथ डिसअॅबिलिटी बिल २०१४' हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर अपंगांचा कँडल मार्च काढला होता. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये जन्मलेल्या जावेद अबिदी यांना स्पिनिया बिफिडा झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे वयाच्या १५ वर्षापासूनच त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला. स्वत: अपंग असल्याने अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. म्हणूनच त्यांना अपंगांचा तारणहार म्हणून ओळखले जायचे.

 

४ मार्च २०१८

सांघिक स्नूकरमध्ये भारत जगज्जेता

      पहिल्यावहिल्या सांघिक स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या सुरेख खेळाच्या जोरावर पाकिस्तानला ३-२ ने नमवून विजेतेपद पटकावले. 

      भारत ०-२ असा पिछाडीवर होता आणि तिसऱ्या फ्रेममध्ये भारत ०-३० असा मागे होता. पण, चंद्राने केलेल्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर भारताने ही पिछाडी भरून काढली. चौथ्या फ्रेममध्येही अडवाणी १-२० असा बाबर मसिहविरुद्ध मागे पडला होता. पण, त्याने आपली स्नूकरवरील हुकुमत सिद्ध करत ६९ गुणांच्या ब्रेकसह ही फ्रेम जिंकली. त्यामुळे भारताने २-२ अशी बरोबरी साधली. अखेरच्या फ्रेममध्ये चंद्रा आणि पाकिस्तानचा महंमद आसिफ यांच्यात चुरस पाहायला मिळाली. चंद्राने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत अखेरची फ्रेमही जिंकली आणि एकवेळ ०-२ अशा पिछाडीमुळे हातून निसटत चाललेली लढत जिंकून दाखविली. 

      पहिल्या फ्रेममध्ये मसिहने चंद्रावर ७३-२४ अशी सहज मात केली होती, तर दुसऱ्या फ्रेममध्ये आसिफने अडवाणीला ६१-५६ असे नमविले. तिसऱ्या फ्रेममध्ये दोन्ही संघांच्या दोन खेळाडूंना खेळण्याची संधी होती आणि त्यात भारताने ७२-४७ असा विजय मिळविला आणि आव्हान जिवंत ठेवले.

राशिद खान सर्वात युवा कर्णधार

      १९ वर्षे १६५ दिवस इतकं वय असताना अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करून फिरकीपटू राशिद खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधार होण्याचा मान मिळवला आहे. आयसीसी वर्ल्डकप पात्रता फोरीत झालेल्या स्कॉटलंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात राशिदने अफगाणिस्तानचे नेतृत्व केले. 

    कर्णधार असगर स्तानिकझई आजारी असल्याने अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व उपकर्णधार राशिद खानकडे देण्यात आले आहे.पहिल्याच लढतीत राशिदला विशेष चमक दाखवता आली नाही. फलंदाजी करताना तो शून्यावर बाद झाला तर गोलंदाजीतही त्याने निराशा केली. ९ षटकांत ६८ धावांच्या मोबदल्यात त्याने केवळ १ बळी टिपला. या सामन्यात स्कॉटलंडने अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. 

      राशिदच्या आधी बांगलादेशचा राजीन सालेह सर्वात युवा कर्णधार ठरला होता. २० वर्षे २९७ दिवस इतकं वय असताना त्याने २००४ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेशचे नेतृत्व केले होते. त्यानंतर झिम्बाब्वेच्या तटेंडा टैबूने २० वर्षे ३५८ दिवस इतकं वय असताना श्रीलंकेविरुद्ध कर्णधारपदाची धुरा वाहिली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९९६ मध्ये २३ वर्षे १२६ दिवस इतकं वय असताना श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

3 मार्च २०१८

दुबईत सोन्याचा मुलामा दिलेले,सर्वात उंच हॉटेल

        दुबईतील पाम वृक्षाच्या आकाराची कृत्रिम बेटं, त्यावरील आलिशान हॉटेल व बंगले, जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’, जगभरातील आश्‍चर्यांच्या हुबेहूब प्रतिकृती, समुद्रातील हॉटेल, वाळवंटात फुलवलेली ‘मिरॅकल गार्डन’ अशा अनेक गोष्टींमुळे ही नगरी आता ‘नवलाईची नगरी’च बनली आहे. जगातील सर्वात उंच हॉटेल हा विक्रम दुबईमधीलच जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस हॉटेलच्या नावे होता. हा विक्रम मोडत दुबईतच सर्वात मोठ्या हॉटेल गेवोराचे नुकतेच उद्घाटन झाले आहे.सोन्याचा मुलामा दिलेली ही 75 मजली इमारत आहे. 

      हॉटेल गेवोरा हे आता दुबईतलेच नाही तर जगातील सर्वाधिक उंचीचे हॉटेल ठरले आहे. हॉटेल गेवोरा हे जेडब्ल्यू मॅरिएट मार्किसपेक्षा केवळ एक मीटरने उंच आहे. हॉटेल गेवोरामध्ये 500 पेक्षा अधिक रुम्स आहेत तर आश्‍चर्याची बाब म्हणजे जेडब्ल्यू मॅरिएट मार्किसमध्ये 1600 पेक्षा जास्त रुम्स आहेत. मात्र तरीही या नव्या हॉटेलची उंची, सोन्याचा मुलामा, आकर्षक डिझाईन यामुळे हे हॉटेल वैशिष्ट्यपूर्ण बनले आहे. त्याला ‘सर्वात उंच’ हे बिरूद लागल्यानेही ते लोकांच्या कुतुहलाचा विषय बनले आहे.

२ मार्च २०१८

जगातील सर्वात मोठे विमान

       जगातील सर्वात मोठे विमान 14,10,000 पौंड वजनाचे आहे. जगात फक्त एकच विमान चार रशियन रणगाडे, एक आख्खी ट्रेन किंवा 50 कार वाहून नेऊ शकतं. या विमानाला सहा इंजिन आहेत. याच्या पंखाची लांबी 290 फूट इतकी प्रचंड आहे. (ही जवळपास फुटबॉलच्या मैदानाएवढी आहे) या अशा अवाढव्य आणि शक्तिशाली विमानाचे नाव आहे, ‘अँटोनोव एएन-225‘.

        याची खासियत म्हणजे हे विमान मुळात रशियन अंतराळयान वाहून नेण्यासाठी 1980 सालात निर्माण केले गेले होते. या विमानाला ‘म्रिया‘ हेसुद्धा नाव आहे. याचे वजन तब्बल 661 टन आहे तर लांबी 276 फूट आहे. या विमानाच्या भव्यतेची तुलनाच करायची तर ती अशी करता येईल की स्ट्यचू ऑफ लिबर्टीच्या तिप्पट वजन आणि एखाद्या स्कूल बसच्या लांबीच्या सहापट लांब. हे विमान म्हणजे आकाशातून उडणारे एक शहरच असावे इतके मोठे आहे. त्यामुळेच लोकांना या विमानाविषयी प्रचंड कुतूहल वाटते.

१ मार्च २०१८

रॉजर फेडरर जगातील सर्वोत्तम खेळाडू

      दुखापती आणि खराब फॉर्मला मागे टाकत स्विस टेनिस स्टार रॉजर फेडररने यंदाचा लॉरियस स्पोर्टस् पर्सन ऑफ दी इयर’ पुरस्कार पटकावला. सर्वोत्तम पुनरागमनाचा पुरस्कारही फेडररलाच देण्यात आला. एकूण सहा लॉरियस पुरस्कार फेडररने आपल्या नावे केले. 20 वेळचा चॅम्पियन फेडरर पुरस्कार घेतल्यानंतर भावूक झाला आणि त्याने आपला कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालचे आभार मानले. जगातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार सेरेना विल्यम्सने पटकावला.

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं निधन

       कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ८२ वर्षाचे होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते. 

      शंकराचार्य जयेंद्र सरस्वती गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वाढत्या वयामुळे त्यांचं शरीर उपचाराला साथ देत नव्हतं. गेल्या महिन्यात त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कमी रक्तदाबाचाही त्रास होता. आज प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.