Menu

Study Circle

३० जून २०१७

भारत-चीनने तैनात केले 3000 सैनिक

      सिक्कीममध्ये भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून, तणाव निवळण्याऐवजी उलट वाढला आहे. दोन्ही देशांनी 3000 सैनिकांची तुकडी या भागात तैनात केली आहे. सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा एकत्र येऊन मिळतात. या ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक परस्पराविरुद्ध उभे ठाकले असून, मागच्या अनेक दशकात प्रथमच इथे अशा प्रकारची युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

       लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गँगटोक येथील 17 माऊंटन डिविजन आणि कालीमपाँग येथील 27 माऊंट डिविजनच्या मुख्यालयाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. भारतानेही कणखर भूमिका घेतली असून, दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीयत. दोन्ही सैन्याच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये ध्वज बैठका आणि अन्य पातळीवर झालेल्या चर्चेचा काहीही उपयोग झाला नाही.

       रावत यांनी भेटीत 17 डिविजनच्या तैनातीचा आढावा घेतला. या डिविजनकडे पूर्व सिक्कीमच्या संरक्षणाची जबाबदारी असून, या डिविजनच्या 4 ब्रिगेडमध्ये प्रत्येकी 3000 जवान आहेत. चीनच्या रस्ते बांधणीवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर हा तणाव निर्माण झाला आहे. सिक्कीममध्ये तीन देशांच्या सीमा मिळतात त्या ट्राय जंक्शनपर्यंत तुम्हाला रस्ता बांधू देणार नाही हे भारताने स्पष्ट केले आहे.

        चीनला इथे क्लास-40 रस्ता बांधायचा आहे. याचा अर्थ युद्धकाळात या मार्गारुन चीनची 40 टन वजनाची लष्करी वाहने सहज ये-जा करु शकतात. ज्यामध्ये हलक्या रणगाड्यांचा समावेश होतो. विकासापेक्षा चीनची रस्तेबांधणीमागे दुसरा इरादा असल्याने भारत आणि भूतान दोन्ही देशांनी चीनला कडाडून विरोध केला आहे.

      भारतावर दबाव आणण्यासाठी चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली आहे. ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वर्तमानपत्रातील लेखातून दररोज इशारे दिले जात आहेत. युद्धाची खुमखुमी असलेल्यांनी इतिहास न विसरता त्यापासून धडा घ्यावा. भारतीय लष्करातील व्यक्ती इतिहासापासून नक्कीच काही तरी धडा घेतील आणि युद्धाच्या गर्जना थांबवतील असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी म्हटले आहे.

ताशी ६०० कि.मी. वेगाने धावणारी रेल्वे : एससी मॅग्लेव

      जपानच्या या रेल्वेचे नाव आहे एससी मॅग्लेव. ताशी 600 किमी वेगाने धावणारी हे रेल्वे डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच समोरून निघून जाते. सर्वात वेगाने धावण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड या रेल्वेच्या नावावर आहे. 2015 मध्ये या रेल्वेने 603 किमीचे अंतर एका तासात कापत नवा विक्रम केला होता.

       त्यावेळी ही रेल्वे 11 सेकंदांत 1.8 किमीचे अंतर कापत होती. ही रेल्वे मॅग्नेटिक सिस्टीमवर आधारित आहे. अशा प्रोजेक्टसाठी खर्चही खूप येतो. मॅग्नेटिक लेविएटेशनमध्ये (चुंंबकीय उत्क्रांती) रेल्वे रूळ आणि चाके यात चुंबकीय दबाव असतो. जेव्हा रेल्वे धावत असते तेव्हा ती रुळाच्या 1 ते 6 इंच वरून जाते.

40 लाख रुपयांची दुर्मिळ पाल : टॉके

      तीवर पाल दिसली की तिला कधी एकदा झटकून टाकतो. मात्र एक पाल अशी आहे की ती हवीहवीशी वाटेल. तिची बाजारातील किंमत 40 लाख रुपये आहे. या दुर्मिळ पालीचे नाव आहे गेक्को. तिला टॉके असेही म्हणतात. ती म्हणे तोंडाने टॉक-के असा आवाज काढते. पालीचा उपयोग औषधनिर्मितीसाठी केला जातो. टॉकेच्या मांसाचा उपयोग नपुंसकता, मधुमेह, एड्स, कर्करोग आदी आजारांवरील औषधांमध्ये होतो. पौरुषत्व वाढवण्यासाठी प्रामुख्याने टॉकेचे मांस वापरले जाते. ही पाल बिहार, इंडोनेशिया, बांगलादेश, ईशान्य हिंदुस्थान, फिलीपाईन्स आणि नेपाळमध्ये आढळते. सध्या जंगलतोडीमुळे पालीची ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

इथेनॉल

          इथेनॉल 'ईथिल अल्कोहोल' किंवा 'ड्रिकिंग अल्कोहोल' असेही म्हणतात. साखरेवर यीस्टमार्फत फर्मंटेशन प्रक्रिया करून इथेनॉल तयार करतात. 

 • वैद्यकीय क्षेत्रात अँटीसेप्टीक म्हणून तसेच केंद्रीय मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये इथेनॉलचा वापर करण्यात येतो 
 • वाहनातील इंधन म्हणून इथेनॉलचा सर्वाधिक वापर ब्राझीलमध्ये होतो. येथे पेट्रोलमध्ये 25 टक्के इथेनॉल मिसळण्यात येते. 
 • सध्या 'रॉकेट फ्युएल' मध्येही याचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

तेल विपणन कंपन्यांना साखर उत्पादक कंपन्यांकडून विकत घ्याव्या लागणाऱ्या इथेनॉलच्या किंमती निर्धारित करण्यासाठी नवीन यंत्रणा अंमलात आणण्याचा निर्णय आर्थिक बाबींविषयीच्या केंद्रीय कॅबिनेट समितीने दि. 13 ऑक्‍टोबर 2016 रोजी जाहीर केला. यामुळे या विपणन कंपन्यांना दर लिटर इथेनॉलमागे 1 ते 1.5 रुपये कमी भरावे लागणार आहेत. 

 • तेल उत्पादक कंपन्यांवर पेट्रोलमध्ये कमाल 10 टक्के इथेनॉल मिसळण्याचे बंधन असून 2016-17 या हंगामासाठी तेलकंपन्या 39 रुपये प्रतिलिटर या दराने इथेनॉल विकत घेऊ शकणार आहेत. 1 ऑक्‍टोबर 2016 पासून 30 नोव्हेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी हा दर निश्‍चित करण्यात आला आहे. 
 • या इथेनॉलवरील उल्पादन कर, वस्तू व सेवा कर / मूल्यवर्धित कर आणि वाहतुकीवरील खर्च तेल कंपन्यांना करावा लागणार आहे. यापूर्वी या सर्व करांचा भार इथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या साखर उद्योगांवर होता. 
 • 2014 साली केंद्रशासनाने या खरेदीचा दर (सर्व करांसह) 48.5 ते 49.5 रुपये प्रतिलिटर असा निश्‍चित केला होता. त्यावेळी सर्व कर वगळता विक्री किंमत अंदाजे 42 रुपये प्रतिलिटर होती. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथेनॉलच्या विक्री किंमतीत 2.5 ते 3 रुपयांची घट करण्यात आली. 

इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम  

 • तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यायी पर्यावरणपूरक इंधनाचा विकास करण्यासाठी 2003 साली केंद्र शासनाने या कार्यक्रमाची सुरुवात केली. 
 • मात्र काही राज्यविशिष्ट प्रश्‍न आणि इथेनॉलच्या अनियमित पुरवठ्यामुळे 2006 पर्यंत तेल कंपन्यांना पुरेशा प्रमाणत इथेनॉल उपलब्ध होऊ शकले नाही. 
 • त्यानंतर इथेनॉलच्या निश्‍चित पुरवठ्यासाठी इथेनॉल किंमत निर्माण धोरण स्वीकारण्यात आले. 
 • राष्ट्रीय जैव - इंधन धोरण 2009  नुसार तेलकंपन्यांना पेट्रोलमध्ये कमीत कमी 5 टक्के इथेनॉलचे मिश्रण करणे बंधनकारक करण्यात आले. 
 • तत्पूर्वी 2001 सालापासूनच भारतात इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यास सुरुवात झाली असून 1 ऑटो फ्युएल पॉलिसी 2003'  मध्येच या पद्धतीचा समावेश करण्यात आला होता. 
 • उसापासून साखर तयार करत असताना सह उत्पादन म्हणून इथेनॉलची निर्मिती होते. याशिवाय मका आणि सोरघुम (ज्वारीचा एक प्रकार) यापासूनही इथेनॉलची निर्मिती करता येते. 

इथेनॉलमिश्रित पेट्रोलचे फायदे 

 • पेट्रोलच्या आयातीत घट होऊन देशाच्या परकीय चलनाची बचत होते. 
 • अशा इंधनामुळे वाहनांमधून होणाऱ्या कार्बन डाय ऑक्‍साइडच्या उत्सर्जनात घट होते. 
 • इथेनॉलच्या उत्पादनासाठी पेट्रोलपेक्षा कमी खर्च येतो याशिवाय इथेनॉलचे 'ऑक्‍टेन रेटिंग' पेट्रोलपेक्षा अधिक असल्याने इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापराने वाहनाच्या इंजिनची कार्यक्षमता सुधारते. 
 • इथेनॉलच्या उत्पादनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला उच्च भाव मिळून याचा ग्रामीण विकासास फायदा होऊ शकतो.

२९ जून २०१७

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी

        केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीस तत्वतः मंजुरी देण्यात आली. अन्य निर्णयांमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्ये तसेच सियाचीनसारख्या अतिप्रतिकूल हवामानात कर्तव्य बजावणार्‍या सैनिकांच्या विशेष भत्त्यातही वाढ केली आहे.

      केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. भारताची राष्ट्रीय विमान कंपनी किंवा नॅशनल कॅरियर म्हणून एअर इंडियाची ओळख होती. या कंपनीचे चिन्ह असलेला महाराजा घरोघरी माहीत होता, परंतु दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालल्याने या सरकारी विमान कंपनीची पूर्णतः विक्री करावी किंवा निर्गुंतवणूक केली जावी, असे पर्याय सरकारपुढे होते आणि केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारला.

        निर्गुंतवणुकीची मर्यादा, प्रमाण(टक्केवारी) आणि त्याबाबतची प्रक्रिया व तपशील ठरविण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे व त्यांनी ठरविलेल्या प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही होणार आहे. एअर इंडियावर 52 हजार कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा होता. आधीच्या मनमोहनसिंग सरकारने या विमान कंपनीसाठी 30 हजार कोटी रुपयांची मदत योजना देऊ केली होती आणि त्याआधारे एअर इंडियाचे कामकाज चालू होते, परंतु दिवसेंदिवस आर्थिक हालाखीची स्थिती वाढतच चालल्याने सरकारने हा निर्णय घेतला.

        खासगी विमान कंपन्यांना हवाई वाहतुकीचे क्षेत्र खुले करण्यात आल्याने एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्सची या क्षेत्रातली मक्तेदारी संपुष्टात आली होती. त्यात एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्सचे एकत्रीकरण करण्यात आल्यानंतर कंपनीची भरभराट होण्याऐवजी ती अधिक तोट्यात जाऊ लागली. त्याचबरोबर हितसंबंधी घटकांनीदेखील खासगी विमान कंपन्यांना झुकते माप देऊन एअर इंडियाचे नुकसान केले, अशी टीका सातत्याने केली गेली होती.

      अन्य निर्णयांनुसार, सियाचीन या जगातल्या सर्वाधिक उंचीवरील युद्धक्षेत्रात तैनात सैनिकांच्या भत्त्यामध्ये वाढ केली आहे. सियाचीनमध्ये अत्यंत प्रतिकूल हवामानात सैनिक कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे येथे तैनात सैनिकांना विशेष भत्तादेखील मिळत होता, पण तो पुरेसा नसल्याची तक्रार होत असे. आता यासंदर्भातील शिफारशी ध्यानात घेऊन सरकारने सैनिकी अधिकार्‍यांसाठी 21,000 रुपयांवरून 42,500 रुपये आणि जवानांसाठी 14,000 रुपयांवरून 30,000 रुपये अशी दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे.

अन्य निर्णय 1 जुलै 2017 पासून लागू -

*   केंद्रीय पेन्शनधारकांना खुशखबरी, त्यांचा वैद्यकीय भत्ता दरमहा 1000 रुपये.

*   केंद्रीय कर्मचार्‍यांना शहरांच्या श्रेणीनुसार 24, 16 व 8 टक्के घरभाडे भत्ता. सध्या हा 30, 20 आणि 10 टक्के या दराने दिला जातो, पण सातव्या वेतन आयोगाने त्यात कपात सुचवली होती, परंतु अल्प उत्पन्न गटातील कर्मचार्‍यांना ही कपात फारशी लाभदायक ठरणार नसल्याने त्यांच्यासाठी घरभाडे भत्ता (शहरांनुसार) 5400, 3600 आणि 1800 रुपयांपेक्षा कमी असणार नाही, असे ठरविले आहे. याचा लाभ सुमारे साडेसात लाख केंद्रीय कर्मचार्‍यांना (18,000 रुपये वेतन असलेले) होईल.

*   मुलांसाठीच्या शिक्षण भत्त्यात दरमहा 1500 रुपयांवरून 2250 रुपये (2 मुले असणार्‍यांना लागू) वाढ. हॉस्टेल सबसिडी 4500 रुपये (दरमहा) वरून 6750 रुपये.

लवकरच 200 रुपयाची नोट चलनात येणार

       नोटाबंदीनंतर सरकारने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. 200 रुपयांची नोटही आता लवकरच चलनात येणार आहे. सरकारी आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटांची छपाई सुरु केली आहे.

       2000 आणि 500 रुपयांच्या नोटांमुळे सुट्या पैंशाची अडचण निर्माण होते. ही अडचण टाळण्यासाठी 200 रुपयाची नोट चलनात आणणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे. 200 रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याचा निर्णय नोटाबंदीच्या आधीच घेण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी आता करण्यात येणार आहे. 200 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या प्रस्तावाला आरबीआयच्या मंडळाने यापूर्वीच संमती दिली होती.

मोदी तीन देशांच्या दौर्यानंतर भारतात परतले

       अमेरिकासह पोर्तुगाल, नेदरलँड या देशांचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

       चार दिवसांच्या या दौर्‍यात मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मोदी यांचा पहिलाच अमेरिका दौरा होता. या दोन्ही नेत्यांनी चर्चेत दहशतवादावर परस्पर सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. सीमेपलीकडील दहशतवादासाठी हल्ल्यांसाठी आपल्या भूभागाचा वापर होऊ न देण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मोदी व ट्रम्प यांनी पाकिस्तानला केले.

       या दौर्‍यात मोदी यांनी प्रथम पोर्तुगालला भेट देऊन अध्यक्ष अन्टोनियो कोस्टा यांच्याशी चर्चा केली. परतीच्या प्रवासात त्यांनी नेदरलँडच्या भेटीत अध्यक्ष मार्क रुट यांची भेट घेतली. या सर्व देशांमधील भारतीयांशीही त्यांनी संवाद साधला.

२८ जून २०१७

जसप्रीत बुमराहची द्वितीय स्थानी झेप

     डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत टी-20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थान मिळवताना दुसरे स्थान मिळवले आहे. त्याचवेळी, भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच, अव्वल तीन अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून बांगलादेशचा शाकिब अल हसन अग्रस्थानी आहे.

     आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज इमाद वसीम याने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचवेळी, इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने आपले अव्वल स्थान गमावले. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला 2-1 असे नमविल्यानंतर एक दिवसाने नवी टी-20 क्रमवारी जाहीर झाली. ताहिरला दोन सामन्यांतून केवळ एकच बळी घेण्यात यश आले.

     तसेच बुमराहनेही आगेकूच करताना दुसर्‍या स्थानी कब्जा केला. फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये कोहली, ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन यांनी आपआपले अव्वल तीन स्थान कायम राखले आहे.

2000 कोटी कमवणारा मदंगलफ पहिला भारतीय चित्रपट

        प्रतिनिधी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या मदंगलफचा जगभरात सध्या धुमाकूळ सुरु आहे. चीनमध्ये अडीच कोटींचा गल्ला जमवत दंगलने तब्बल 2000 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. भारतासह जगभरात एवढा गल्ला जमवणारा दंगल पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे.

       आमिरच्या दंगल चित्रपटाने केवळ कमाईचेच नाही तर विक्रमांचेही आकडे मोडीत काढले आहेत. दंगल हा चित्रपट इंग्रजी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषांतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटांच्या इतिहासातील पाचवा चित्रपट ठरला आहे.

        2017 या वर्षातील दंगल हा सर्वाधिक कमाई करणारा पहिलाच क्रीडा चित्रपट असून चीनमध्ये सर्वाधिक गल्ला जमवणारा पहिलाच नॉन-हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. विदेशातून येत असलेल्या वृत्तानुसार दंगलने जागतिक व्यासपीठावरही भारतीय चित्रपटाकडे बघण्याची दृष्टी बदलविली आहे. पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित नितेश तिवारी दिग्दर्शीत दंगल चित्रपटात फोगाट यांची प्रमुख भूमिका आमिर खान याने साकारली आहे. या चित्रपटाचे कथानक आणि महावीर फोगाट यांच्या संघर्षाचे जागतिक स्तरावर ही कौतुक केले जात आहे. भारतातही या चित्रपटाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

      दंगलने प्रदर्शनानंतर पहिल्या 3 दिवसांत 100 कोटींचा गल्ला गोळा केला होता. आमिर खानचा कमी दिवसात सर्वाधिक कमाई करणारा हा पाचवा चित्रपट असून यापूर्वी 2014 मधील पीके, 2013 मधील धूम-2, 2009 मधील थ्री इडियटस आणि 2008 मधील गजनीने हा विक्रम केला आहे.

२७ जून २०१७

राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्प

    भारतामध्ये वाहतुकीसाठी आजवर फारसा वापरण्यात न आलेला देशांतर्गत जलवाहतूक हा एक चांगला पर्याय आहे. जागतिक बॅंकेच्या 4200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत अलाहाबाद ते हल्दिया हा 1600 किमीचा जलमार्ग हा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकसित करण्याचे केंद्र सरकारने योजिले आहे. 

      या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून वाराणसी ते हल्दिया हा 1300 कि.मी. अंतराचा मार्ग सध्या विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाकडे उत्तर भारतातील वाहतुकीची प्रमुख वाहिनी म्हणून पाहिले जात आहे, कारण हा मार्ग उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल मधून जातो. या प्रकल्पामुळे अतिवर्दळीच्या वाहतूक पट्ट्यातील कोंडी कमी होईल असे प्रकल्प दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे. 

     मात्र गंगा नदीचा जहाज वाहतुकीकरिता वापर करणे, हा या भागातील नैसर्गिक अधिवास असणाऱ्या प्रजातींच्या अस्तित्वाकरिता सर्वात मोठा धोका असल्याचे वन्यजीव संरक्षकांतर्फे मानले जाते. कारण या प्रजातींची संख्या कमी होत चालली आहे. यातील एक मुख्य प्रजाती डॉल्फिन ही आहे. नदीमध्ये आढळनारे डॉल्फिन हे भारतात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्या व त्यांच्या उपनद्यांमध्ये आढळून येतात. त्यांची संख्या जवळपास 2500 इतकी असून आता ती कमी होत आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 मधील अनुसूची 1 अन्वये ही प्रजाती संरक्षित असून तिला धोक्‍यात असलेली प्रजाती म्हणून जाहीर करण्यात आली आहे. 

     गंगानदीवरील विकास कामांमुळे डॉल्फिन आपला अधिवास गमावत आहेत. भक्ष्यांची उपलब्धता कमी झाल्याने ते अपघातात आणि मासे पकडण्याच्या जाळ्यात सापडत आहेत. ही प्रजाती व्यवहारतः अंध असून, ती हालचालींकरिता प्रतीध्वनींच्या जैव पद्धतींवर अवलंबून असते. जहाजांच्या ध्वनी पातळीमुळे डॉल्फिनची हालचाल करण्याची व भक्ष्य शोधण्याची क्षमता बाधित होण्याची शक्‍यता असते. 

      डॉल्फिन तसेच तीन अन्य प्रजातींचा नामशेष होण्याच्या धोक्‍याचा मुकाबला करण्यासाठी, केंद्रीय पर्यावरण व संरक्षण मंत्रालयाने या वर्षी जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या धोकाग्रस्त प्रजातींची यादी केली असून त्यात डॉल्फिनचा समावेश केला आहे व अशा प्रजातींच्या संरक्षणासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

       या प्रकल्पावर काम करणाऱ्या जागतिक बॅंकेच्या चमूचे प्रमुख, तसेच मुख्य वाहतूक विशेषज्ञ, अर्णब बंदोपाध्याय यांनी (अ) गंगानदीतील गाळ उपसणी कमीत कमी करणे. 
(ब)नदी संनियंत्रण यंत्रणेतर्फे संरक्षित डॉल्फिन अधिवासातील मालवाहतुकीच्या जहाजांच्या हालचालीवर मर्यादा ठेवणे. (क)ध्वनीरोधक पट्ट्यांमार्फत पाण्याखालील आवाज कमी करणे यासारखे उपाय सुचवले आहेत. 

     भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (भाअंजप्रा) यांनी त्यांच्या अधिकृत प्रतिसादात या मुद्यांचा पुनरुउल्लेख करीत नमूद केले आहे की, राष्ट्रीय जलमार्ग 1 च्या क्षमतावृद्धीकरिता, जागतिक बॅंक, भाअंजप्रा आणि केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाने नियुक्त केलेल्या सल्लागार समूहाने तयार केलेला पर्यावरण परिणाम पाहणी अहवाल व पर्यावरण व्यवस्थापन योजनेत या मुद्यांचा समावेश केलेला आहे; तसेच नदीपात्रातील डॉल्फिनच्या घरटी बांधण्याच्या जागा ह्या चिन्हांकित करून त्याठिकाणी राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्पाची वर्दळ किमान ठेवण्यात येणार आहे. 

        या उपाययोजनांमुळे डॉल्फिनना निर्माण होणारा धोका कमी होईल का? याबाबत पर्यावरणवादी साशंक आहेत. गंगेमधील डॉल्फिन व मासेमारीचा अभ्यास करणारे पर्यावरणतज्ज्ञ नचिकेत केळकर हे बिहारमधील भागलपूर येथे करण्यात येत असलेल्या वाळू उपसणीच्या परिणामांचे दस्तऐवजीकरण करत आहेत. त्यात त्यांना असे आढळून आले की, वाळू उपसणीमुळे नदीतील डॉल्फिन हे वाळूचे थर नाहीसे झाल्याने निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे व यंत्राच्या आवाजांमुळे अत्यंत तणावग्रस्त होतात.

बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध

    पुण्याच्या पूर्वेला सासवड परिसरात असलेल्या माळरानांमधून बेडकाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. पुणे येथील इन्स्टिट्युट आॅफ नॅचरल हिस्टरी एज्युकेशन अ‍ँड रिसर्च (इनहर) ही संस्था आणि पुणे वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्ष संशोधन सुरू होते. भारताच्या पश्चिम भागात ही प्रजाती आढळत असल्याने या प्रजातीचे स्पेरोथिका पश्चिमा असे नामकरण करण्यात आले आहे.

    प्रचलित स्पेरोथिका ब्रेव्हिसेप्स या प्रजातीशी साधर्म्य दाखविणारी ही प्रजाती जैविक गुणसूत्रे तसेच शारीरिक वैशिष्ट्ये यांच्या अभ्यासाच्या आधारे ब्रेव्हिसेप्सपेक्षा वेगळी असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या संदर्भातील शोधनिबंध जर्नल आॅफ थ्रेटंड टॅक्सा या वैज्ञानिक नियतकालिका च्या जुलै महिन्याच्या खंडात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

       आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ.आनंद पाध्ये, आयसर (पुणे) येथील संशोधक डॉ. निलेश डहाणूकर, इनहर संस्थेचे संशोधक शौरी सुलाखे, निखिल दांडेकर तसेच पुणे वन्यजीव विभागाचे तत्कालीन मुख्य वन्यजीव संरक्षक सुनील लिमये, सहायक वनसंरक्षक किर्ती जमदाडे-कोकाटे यांच्या एकत्रित सहभागाने ही मोहीम पार पडली. वन्यजीव संशोधन म्हणजे फक्त शास्त्रज्ञ व त्यांचे सहकारी यांचेच काम असते, अशा प्रचलित सर्वसामान्य समजुतीला फाटा देत पुणे वन्यजीव विभागाने पुढाकार घेऊन पुण्याच्या पूर्वेला असलेल्या मयुरेश्वर, सुपे, रेहेकुरी आणि करमाळा तसेच भीमाशंकर या अभयारण्यात संशोधनात मोलाचा वाटा उचलला आहे. या संशोधनातून कमी आकर्षक असलेल्या परंतु नैसर्गिक परिसंस्थेत मोलाचे स्थान असलेल्या या जिवांच्या विविधतेवरती प्रकाश पडला आहे.

      याबाबतत कीर्ती जमदाडे-कोकाटे यांच्याशी चर्चा केली असता, वन्यजीव विभागाने इनहरला दिलेल्या दिलेल्या प्रोत्साहनामुळे वन्यजीव विश्वातील हे रहस्य उलगडले आहे. या शोधामुळे वनविभागाच्या प्रदेशांमधे अजून किती संशोधन होणे गरजेचे आहे. हे अधोरेखित झाले आहे. भविष्यात अजून अनेक रहस्ये शोधण्यासाठी वन्यजीव विभाग अशा मोहिमांमध्ये सहभागी होईल. संशोधनानंतर या प्रजातीला स्पेरोथिका पश्चिमा हे भारतीय नाव देण्यात यश आले .

२६ जून २०१७

मानुषी चिल्लरने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब

    जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक म्हणजे मिस इंडिया. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य याची सुरेख सांगड घालत देशाच्या कानाकोपऱ्यातील सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होतात. अशीच एक स्पर्धा मुकतीच मुंबईत पार पडली. ५४ व्या फेमिना मिस इंडियाच्या दिमाखदार अंतिम सोहळ्यामध्ये हरियाणाच्या मानुषी चिल्लरने यश मिळवलं आहे. मानुषीचं नाव जाहिर होताच मागील वर्षी विजेती ठरलेल्या प्रियदर्शिनी चॅटर्जीने तिच्या डोक्यावर मिस इंडियाचा मुकुट घातला. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत जम्मू- काश्मीरच्या सना दुआने दुसरं तर बिहारच्या प्रियांका कुमारीने तिसरं स्थान पटकावलं.

       हरियाणाच्या मानुषीने या स्पर्धेत मिस इंडियाचा किताब पटकावल्यामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मानुषीचे आई- वडील डॉक्टर असून तिचं शिक्षण दिल्लीच्या सेंट थॉमस स्कूल आणि सोनीपतच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज फॉर वुमन मधून झालं आहे. हरियाणामध्ये तिने ‘मिस हरियाणा’ हा किताबही पटकावला होता. मानुषीचं नाव जाहिर होताच मागील वर्षी विजेती ठरलेल्या प्रियदर्शिनी चॅटर्जीने तिच्या चेहऱ्यावर मिस इंडियाचा मुकुट घातला. येत्या काळात चीनमध्ये होणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेत मानुषी भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. मिस इंडियाच्या पुरस्कारासोबतच ती मिस फोटोजेनिकसुद्धा ठरली आहे.

महाराष्ट्राच्या दियाचे सुवर्ण पदक

      महाराष्ट्राच्या दिया चितळेने चमकदार कामगिरी करताना मध्य विभाग राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या सब ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी, प्रिथा वर्तीकर हिला मुलींच्या कॅडेट गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

     इंदोर येथील अभय प्रसाद बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दियाने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या मुनमुन कुंडूचा सहज पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर दियाने जबरद्स्त पुनरागमन केले. तीने सलग चार गेम जिंकताना ६-११, ११-८, ११-२, ११-४, ११-९ असे दिमाखदार जेतेपद पटकावले.

२५ जून २०१७

जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा

हवामान बदलासंबंधीचा जागतिक बॅंकेचा कृती कार्यक्रम 
           जागतिक बॅंक समूहाने दि. 7 एप्रिल 2016 रोजी जागतिक हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा जाहीर केला. हवामानबदल रोखण्यासाठी प्रत्येक देशांतर्गत अंमलात आणण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि 2015च्या पॅरिसमधील जागतिक हवामानबदल परिषदेत प्रत्येक देशाने मान्य केलेली स्वयंनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक बॅंक मदत करणार होती. स्वच्छ ऊर्जानिर्मिती, हरित दळणवळण, हवामानाच्या अनुषंगाने केली जाणारी शेती या क्षेत्रांमधील प्रगतीसाठी जागतिक बॅंकेने 2020 पर्यंत साध्य करावयाची उद्दिष्टे राखली आहेत. 

जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा 
       हवामान-बदलाशी संबंधित सर्व माहिती आणि आकडेवारी एकाच ठिकाणी प्राप्त व्हावी, यासाठी जागतिक बॅंकेमार्फत यापूर्वीच "क्‍लायमेट चेंज नॉलेज पोर्टल' (Climate Change Knowledge Portal) या नावाचे एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. जागतिक बॅंकेने या विषयासंबंधी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार हवामानबदल रोखण्याच्या उपायांची तातडीने अंमलबजावणी न केल्यास 2030पर्यंत जगातील दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्येत 100 दशलक्ष जणांची भर पडणार आहे. 

       जागतिक बॅंक समुहातील हवामानबदल विभागाचे प्रमुख म्हणून सध्या जॉन रोम (John Roome) हे कार्यरत असून यापूर्वी त्यांनी जागतिक बॅंकेच्या पूर्व-आशिया विभागाचे शाश्‍वत विकास संचालक म्हणून काम केले आहे. पाणी, दळणवळण, ऊर्जा, कृषी, पर्यावरण, सामाजिक प्रश्‍न, आपत्ती धोका व्यवस्थापन आणि हवामानबदल इ. विविध विषयांवर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. याशिवाय बॅंकेच्या दक्षिण आशिया आणि आफ्रिकी विभागातही त्यांनी कामकाज पाहिले आहे. 

कृती आराखड्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे  

 • 2020 पर्यंत हवामानाशी संबंधित जागतिक बॅंक समूहाच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ करण्यात येणार असून तो 21 पासून 28 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. 
 • स्वयंनिर्धारित उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी हवामानशास्रीय धोरणे गुंतवणूक योजना व कृती आराखडे तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यामध्ये जागतिक बॅंकेमार्फत साह्य पुरविण्यात येणार आहे. 
 • जागतिक बॅंक समूहाच्या "इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन' या सदस्य संस्थेमार्फत विविध देशांत करण्यात येणाऱ्या गुंतवणुकींमध्ये पुढील 5 वर्षांत 3.5 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. 
 • अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रातील गुंतवणुकीमधील जोखीम कमी करण्यासाठी वैविध्यपूर्ण गुंतवणुकीवर भर देण्यात येणार असून 2020 पर्यंत 20 गिगाव्हॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करण्यात येणार आहे. 
 • शहरी दळणवळण सुविधा आणि कमी कार्बन उत्सर्जन करणारे बहुपर्यायी दळणवळण यांचा जगातील विविध प्रदेशांमध्ये विकास व्हावा, यासाठी 2016 ते 2020 या काळात जागतिक बॅंकेतर्फे 2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 
 • नगरविकासाच्या योजनांच्या आराखड्यात हवामानबदल रोखण्यासाठीचे उपाय समाविष्ट करणे आणि 2020 पर्यंत जगभरात किमान 30 शाश्‍वत शहरे विकसित करणे. 
 • 2020 पर्यंत 40 देशांत तेथील हवामानाचा विचार करून टिकाऊ कृषी पद्धतींचा विकास करण्यात येणार आहे.

२४ जून २०१७

बॅक्टेरियापासून जैविक विजेची निर्मिती

        देशातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कारखान्यातून बाहेर पडणार्‍या घाण पाण्याचा प्रश्‍न सध्या सर्वच शहरांना भेडसावत आहे. या समस्येवर कोणता उपाय अमलात आणावा, असा यक्षप्रश्‍नच तमाम राज्यांना पडत आहे. पंडित रविशंकर शुक्ल युनिव्हर्सिटीच्या बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने या पाण्याचा उपयोग करण्याचा चांगला आणि प्रभावी पर्याय शोधला आहे.

        कारखान्यातून बाहेर पडणार्‍या घाण पाण्यात असलेल्या बॅक्टेरियामधील इलेक्ट्रो बॅक्टेरियांचा शोध लावून त्यांच्या मदतीने संशोधकांनी जैविक वीज तयार करण्यात केली. ही अत्यंत कमी खर्चात अनेक महिने उपलब्ध होणारी आहे. विशेष म्हणजे कारखान्यातील 1 लिटर घाण पाण्याचा वापर करून सलग 3 महिन्यांपासून 4 व्होल्टचा आणि 58 दिवसांपासून 12 व्होल्टचा एलईडी बल्ब पेटवण्यात आला आहे. या विजेपासून संशोधक आपले मोबाईलही चार्ज करत आहेत. आता ते या विजेचे उत्पादन वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत.

        पंडित रविशंकर शुक्ल युनिव्हर्सिटीच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही जैविक वीज तयार केली आहे.

एफअँडओमध्ये 5 कंपन्या सामील

        राष्ट्रीय शेअर बाजारात फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफअँडओ) विभागात 5 नव्या कंपन्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स, मणप्पुरम फायनान्स, रेपको होम फायनान्स आणि श्रेई इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये 30 जूनपासून व्यवहार करता येईल.

       गेल्या आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराने सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरला डेरिव्हेटिव्ह अर्थात फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहारातून (एफ अँड ओ) वगळण्याचे ठरविले होते. बाजारात कंपनीच्या सध्याच्या करारांची मुदत संपुष्टात आल्यानंतर कोणतेही नवे करार होणार नाहीत. परंतु, जून, जुलै आणि ऑगस्टमधील करारांचे व्यवहार त्यांची मुदत संपेपर्यंत सुरु राहतील.

२३ जून २०१७

स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवड

        केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या यादीत महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड या एकमेव शहराचा समावेश केला आहे. केंद्रीय मंत्री व्यंकैय्या नायडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या 30 नवीन शहरांची नावे जाहीर केली आहेत.

      जाहिर करण्यात आलेल्या 30 स्मार्ट सिटींच्या यादीत तिरुवअनंपुरम पहिल्या क्रमांकावर असून रायपूर दुसर्‍या क्रमांकावर आहे. उत्तरप्रदेशमधून अलाहाबाद, अलीगढ आणि झासी या शहरांची निवड केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 30 शहरांच्या विकासासाठी 57,393 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

जीएसटी विधेयकाला सर्व राज्यांनी दिली मंजुरी

      जम्मू-काश्मीर वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी राज्य जीएसटी विधेयकाला मंजुरी दिली आहे. या राज्यांमध्ये 30 जूनच्या मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.

     केरळ आणि पश्‍चिम बंगालने राज्य जीएसटी विधेयक मंजुरीसाठी वटहुकूम जारी केला आहे. तर, उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या विधानसभांमध्ये जीएसटीला मंजुरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जीएसटी मंजुरीसाठी आता जम्मू-काश्मीर हे एकच राज्य शिल्लक आहे. त्यामुळे सर्व 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. 30 जूनच्या मध्यरात्री यानिमित्ताने संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये 1 तासाचा विशेष कार्यक्रम ठेवला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवेगौडा, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी व लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.

     जम्मू-काश्मिरातील पीडीपी-भाजपाचे सरकार जीएसटीच्या विरोधाला तोंड देत आहे. या राज्यातील आर्थिक स्वायत्तता धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे की, जर एखादे राज्य जीएसटीच्या बाहेर राहिले तर व्यापारी आणि ग्राहक या दोघांनाही नुकसान होईल. कारण, अशा राज्यांना दुहेरी कर द्यावा लागेल. जे राज्य जीएसटी लागू करणार नाही त्यांना भरपाईचे पॅकेजही मिळणार नाही, असेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

२२ जून २०१७

महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण

 पाच वर्षांसाठीचे राज्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण

         जागतिक पातळीवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स हब म्हणून महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी तरतूद असलेले राज्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण दि. 9 फेब्रुवारी 2016 रोजी मंत्रिमंडळाने पारित केले. 

 •          यामध्ये प्रामुख्याने पुढील पाच वर्षांसाठी राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीबरोबर 1200 कोटी डॉलर्सच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

राज्य इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरणाचा उद्देश - 

 • महाराष्ट्रात गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण निर्माण करून उत्पादनास चालना देणे. 
 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स व अभियांत्रिकी क्षेत्रात नावीन्यपूर्ण बदल करणे. 
 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स व अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन व विकास करणे. 
 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स व अभियांत्रिकी क्षेत्रात कौशल्यवृद्धी व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे. 
 • एक खिडकी योजना पात्र गुंतवणूकदारांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना पायाभूत सोयी, सुविधा पुरवणे. 
 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स व नॅनो इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रातील संशोधने व विकासाला निधी पुरवणे. 
 • बौद्धिक मालमत्ता निर्मितीस चालना देणे व या उद्योगामधून तयार होणाऱ्या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे. 
 • या धोरणातून एक लाख अतिरिक्त रोजगार निर्मिती होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानमध्ये भीषण कार बॉम्बस्फोट

     अफगाणिस्तानमधील हेमलंड प्रांताची राजधानी लष्कर गाह येथे भीषण स्फोट झाला आहे. एका कारमध्ये हा स्फोट घडवण्यात आला असून, स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 60 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढू शकतो. अफगाणिस्तान गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता हा स्फोट झाला. 
 
      ''24 हून जास्त जणांचा मृत्यू झाला असून, 60 हून अधिक जखमी आहेत. जखमी आणि मृतांमध्ये पोलीस, लष्कर, स्थानिक आणि न्यू काबूल ब्रांचच्या कर्मचा-यांचा समावेश आहे''. 
 
       स्फोट झाला तेव्हा लोक एका बँकेबाहेर आपला पगार घेण्यासाठी जमा झाले होते. स्फोटानंतर जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.

२१ जून २०१७

आंतरराष्ट्रीय योग दिन

        निरोगी आरोग्यासाठी योगा हा सगळ्यात रामबाण उपाय आहे. शरीरामध्ये तसंच आपल्या विचारांमध्ये पॉसिटीव्ह एनर्जी निर्माण व्हावी यासाठी योगा करा असा सल्ला आपण नेहमीच ऐकत असतो. इतकचं नाही, तर योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राजकीय नेते तसंच सेलिब्रेटीही पुढाकार घेतात. योगाचा हा प्रचार आणि प्रसार सध्या चालू आहे. पण विशेष म्हणजे जगभरात आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्याचं संपूर्ण श्रेय हे भारताला जातं.  भारतातील ५००० वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते, असं जाणकार सांगतात. योगाची हीच प्राचीन परंपरा जपायला हवी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊलं उचलली होती. 
       नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला लगेचच तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली होती.  या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम कसे असताता या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली होती. 
 
       'भारताला योगाची प्राचीन परंपरेपासून अमुल्य भेट मिळाली आहे.  माणसाचं मन, शरीर, विचार,कृती तसंच संयम या सगळ्यामध्ये एकाग्रता आणण्याचं काम योगा करतं. आरोग्य आणि कल्याणाकरिताचा वेगळा दृष्टीकोन योगातून मिळतो', अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव मांडताना व्यक्त केली होती.  आपली जीवनशैली बदलायला आणि चैतन्य निर्माण करायला योगा चांगल्याप्रकारे मदत करू शकतो म्हणूनच आम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी काम करू द्या, असंही मोदी सभेत म्हणाले होते.  
 
       संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलांमध्ये ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या या महासभेत 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधी होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी उपस्थित होते.  संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.
 
- 21 जून हा दिवस ठरला आंतरराष्ट्रीय योग दिन.
 
      संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.  भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. 

देशातल्या पहिल्या ट्रेडमार्कचा दर्जा मुंबईतल्या ताज महाल पॅलेसला

        गेट वे ऑफ इंडियाजवळच्या 'ताज महाल पॅलेस' हॉटेलच्या बिल्डिंगला 'ट्रेडमार्क'चा दर्जा मिळाला आहे. न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचा आयफेल टॉवर, सिडनीचे ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या वास्तूंच्या पंगतीत आता मुंबईतला ताज महाल पॅलेसही जाऊन बसला आहे. 114 वर्षं जुनी असलेली ताजमहाल पॅलेस हॉटेलची बिल्डिंग ट्रेडमार्क लाभलेली भारतातील एकमेव वास्तू आहे.

       एखाद्या ब्रँडचा लोगो, एखादी विशिष्ट रंगसंगती, सांख्यिकी अशा गोष्टींचे ब-याचदा ट्रेडमार्क होत असतात. भारतात ट्रेडमार्क अ‍ॅक्ट 1999पासून लागू करण्यात आला आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाचा मुंबईतल्या ताजमहाल पॅलेस या हॉटेलच्या बिल्डिंगला ट्रेडमार्कचा दर्जा देण्यात आला आहे. ताज महाल पॅलेस हॉटेलमधल्या वास्तूरचनेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आम्ही या ट्रेडमार्कचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केल्याचंही ताजमहाल पॅलेस चालवणाऱ्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे जनरल काऊन्सिल राजेंद्र मिश्रा म्हणाले आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या महसुलात ताज महाल हॉटेलचं योगदान महत्त्वाचे असल्याचंही मिश्रा यांनी सांगितलं आहे.

       गेट वे ऑफ इंडिया येथे 1903मध्ये ताज महाल पॅलेसची निर्मिती झाली. बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी यांच्या कंपनीने ही ताज महाल हॉटेलची बिल्डिंग बांधली. ट्रेडमार्कचा दर्जा मिळाल्यामुळे आता कोणालाही ताज महाल पॅलेस हॉटेलच्या छायाचित्राचा व्यावसायिक फायद्याच्या जाहिरातीसाठी वापर करता येणार नाही, जर असे कोणी केल्यास कंपनीला शुल्क द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीत अनेक दुकानांमध्ये ताज महालचे छायाचित्र असलेल्या फोटो फ्रेम्स, कफलिंक्स मिळतात. मात्र आता त्यांना त्या विकता येणार नाहीत.

२० जून २०१७

जीएसटीचे ब्रँड अँबेसिडर अमिताभ बच्चन

      जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर  म्हणून निवड केली आहे. 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे त्याआधी लोकांपर्यंत जीएसटी नेमके काय आहे, त्याचे फायदे काय या सगळ्या गोष्टी पोहचविण्यासाठी बिग बींची निवड करण्यात आली आहे. यासाठी खास तयार केलेला 40 सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केला आहे. जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार असे कॅप्शनही या व्हिडिओला दिले आहे.

       40 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन जीएसटीचे महत्त्व सांगत आहेत तसेच जीएसटीचे महत्त्व सांगताना ते भारताच्या तिरंग्याचा दाखला देत आहेत. भारताच्या झेंड्यावर असणारे तीन रंग हे आपल्याला एकत्र बांधून ठेवतात त्याचप्रमाणे, जीएसटीमुळेही एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजारपेठ होणार असल्याचे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलं आहे.  येत्या 1 जुलैपासून जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करांच्या जागी फक्त जीएसटी हा एकच कर लागू होईल. याआधी जीएसटीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची निवड केली होती.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

        राजर्षी शाहू मेमोरिअल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा राजर्षी शाहू पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, 25 जून शाहू जयंतीदिनी श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. राज्यमहसूल आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जिल्हाधिकारी ट्रस्टचे अध्यक्ष विज्ञान क्षेत्रातील असामान्य कामगिरी आणि राजर्षी शाहूमहाराज यांच्या विचारांचा कृतिशील वारसा चालू ठेवणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून माशेलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

       आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री आणि पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारानेदेखील गौरविले आहे. माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यापूर्वी त्यांना 50 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण तसेच शांतीस्वरूप भटनागर मेडल, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अ‍ॅवॉर्ड हे त्यांपैकी काही आहेत.

प्रज्ञा पाटील

       शरीराबरोबर मनाचाही व्यायाम होणं गरजेचे असून यासाठी योगासनं करणं हे उत्तम साधन असल्याने गेल्या काही वर्षांपासून योगासनाला वाहून घेतलेल्या नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी तब्बल १०३ तास सलगपणे योगासने करून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. 

        इगतपुरीजवळील पिंप्री सदो या गावानजीक हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला.नाशिकच्या 48 वर्षीय योगाशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सतत १०० तास योगा करून एक नवा इतिहास रचण्याचा संकल्प केला होता.यानुसार दिनांक १६ जून रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांनी या योगा मॅरेथॉनला आरंभ केला. योगासनांची विविध आसने करीत त्यांनी  दिनांक १८ रोजी दुपारी दीड वाजता तामिळनाडूच्या के.पी.रचना यांचा ५७ तासाचा विक्रम मोडीत काढीत डॉ. व्ही.गणेशकरण यांचाही ६९ तासाचा विक्रम त्याच दिवशी मोडीत काढला.मात्र त्या यावरच न थांबता त्या संकल्पानुसार सलगपणे योगासने करीत राहिल्या.

         या  विक्रमाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकोर्ड नोंद केली. यावेळी गिनीज बुकचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.

१९ जून २०१७

एका दिवसात तीन वेळा होतो सूर्योदय

      पृथ्वीवर दिवसात एकदाच सूर्योदय व सूर्यास्त होतो; परंतु शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नव्या ग्रहावर दिवसात तीन वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. या ग्रहाला तीन सूर्य असल्यामुळे हा चमत्कार घडतो.

      या ग्रहाचे वस्तुमान गुरू ग्रहाच्या वस्तुमानाहून चौपट आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ३४० प्रकाशवर्ष दूर असून, तेथे वर्षाच्या एका विशिष्ट काळात तिन्ही सूर्य आकाशात दिसून येतात. त्यामुळे तीन वेळा सकाळ आणि तीन वेळा रात्र होते. तीन सूर्यांपैकी प्रमुख सूर्य मोठा असून उर्वरित दोन लहान आहेत. या ग्रहाच्या एक वर्षाच्या एक चतुर्थांश एवढा काळ (पृथ्वीवरील १०० ते १४० दिवस) येथे सतत दिवस असतो. कारण मोठा सूर्य तळपत असतो आणि छोटे सूर्य मावळत असतात. या तरुण ग्रहाचे वजन १.६ कोटी वर्ष असल्याचे मानले जाते.

बलुचिस्तान

  15 ऑगस्ट 2016 रोजी स्वातंत्र्यदिना-निमित्त ध्वजारोहणानंतर देशाला संबोधून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्‍मीर, गिलगिट व बलुचिस्तानचा उल्लेख केल्याने, विशेषतः बलुचिस्तानचा व त्याच्या उल्लेखामागील हेतूचा प्रश्न चर्चेत आला. पाकिस्तानातून निषेधाचे तीव्र सूर उमटले, त्याचप्रमाणे पाकिस्तानला भारताच्या विरोधात गरळ ओकण्याची आयती संधी दिल्याची टीका भारतात झाली. बलुचिस्तानात मात्र या उल्लेखाचे स्वागत झाले. ही लक्षणीय घडामोड समजून घेतली पाहिजे. 

    बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या एकूण भूमीच्या 44 टक्के भाग या प्रांताने व्यापला आहे, मात्र या प्रांताची लोकसंख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त 7 टक्के आहे. सोने , तांबे , मौल्यवान खडे या सारखी खनिजे व कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू या सारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या प्रदेशातील लोकांना मात्र कमालीच्या दारिद्रयाला तोंड द्यावे लागत आहे. 1947 साली पाकिस्तानच्या निर्मितीबरोबरच ईशान्येकडील प्रामुख्याने बलुच लोकांची वस्ती असलेल्या चार संस्थानचे पाकिस्तानात विलीनीकरण करण्यात आले. हे विलीनीकरण बलुच लोकांना मान्य नव्हते. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष 1948 सालापासून आजपर्यंत सुरु आहे. हा प्रदेश आज एक युद्धभूमी बनला आहे. पाकिस्तानी लष्कर, गुप्तहेर संघटना, तालिबानी, अल कायदा व इसिससारख्या दहशतवादी संघटना इथे दमन करीत आहेत. या प्रदेशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट होत आहे. निष्पाप लोकांच्या हत्या होत आहेत. बलुच स्त्रियांवर बलात्कार व त्यांचा छळ केला जात आहे. मानवी हक्कांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. बलुच नेत्या नैला काद्री बलुच यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने बलुचिस्तानवर युद्ध लादले असून मोठा नरसंहार घडवला जात आहे. 

     नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची ही पार्श्वभूमी आहे. त्यांच्या वक्तव्यात त्यांनी बलुचिस्तान, गिलगिट व पाकव्याप्त काश्‍मीरमधील जनतेने त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराची दखल घेतल्याबद्दल जी कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल त्या जनतेचे आभार मानले. हा भारताच्या 125 कोटी जनतेचा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले. कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचे किंवा दहशतीला प्रोत्साहन देण्याचे भारताचे धोरण नाही. या धोरणात बदल झाल्याचे किंवा बदल करण्याचा इरादा असल्याचे या वक्तव्यातून कोठेही ध्वनित होत नाही. भारत बलुचिस्तानात दहशतवादी कारवाया करीत असल्याचा आरोप पाकिस्तान अनेक वर्षांपासून करत आहे, पण तो त्यांना कधीही सिद्ध करता आलेला नाही व आंतरराष्ट्रीय समुदायानेही त्याकडे लक्ष दिलेले नाही. भारताने हे आरोप नेहमीच फेटाळून लावले आहेत. तर मग या उल्लेखाचे प्रयोजन काय? 

     काश्‍मीर प्रश्नावर सतत कांगावा करण्याच्या पाकिस्तानच्या धोरणाला हे उत्तर म्हणता येईल. जुलै 2016 मध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा काश्‍मिरी दहशतवादी बुऱ्हान वणी लष्करी कारवाईत मारला गेल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीचा फायदा घेऊन अशांतता माजवण्याचा व हिंसाचार घडवून आणण्याचा चिथावणीखोर प्रयत्न पाकिस्तान करीत आहे, त्याचबरोबर भारतीय लष्कर काश्‍मीर खोऱ्यात अत्याचार करत असल्याचा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडत आहे. काश्‍मीरमधील तणावग्रस्त परिस्थितीला खतपाणी घालून तिला स्वातंत्र्ययुद्धाचे रूप देण्याचे प्रयत्न पाकिस्तानी लष्कर व आय एस आय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघानेकडून सुरू आहेत. या प्रयत्नांना पायबंद घालणे व पाकिस्तानला सज्जड इशारा देणे गरजेचे होते. त्याचबरोबर 2008 पासून दोन्ही देशात खंडित झालेली शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यात पाकिस्तानकडून वेळोवेळी अडथळे आणले गेले आहेत. भारत पाकिस्तानबरोबर काश्‍मीरसह सर्व मुद्‌द्‌यांवर चर्चेस तयार आहे, पण दहशतवादाच्या मुद्‌द्‌याला त्याचे प्राधान्य आहे. बंदुकीच्या धाकावर चर्चा होऊ शकत नाही , हे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. पाकिस्तानला चर्चेसाठी उद्युक्त करण्याचाही पंतप्रधानांचा हा प्रयत्न असू शकतो. कारण या इशाऱ्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या उच्चायुक्तांना बोलावून आपण चर्चेस तयार असल्याचे सांगितले. चीनला देखील हा अप्रत्यक्ष इशारा आहे. पाकिस्तान व चीनमधील 46 अब्ज डॉलरच्या प्रस्तावित आर्थिक परिक्षेत्राच्या निर्मितीमुळे बलुचिस्तानात हस्तक्षेप होत आहे. त्याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला असे म्हणता येईल. 

    काश्‍मीर मुद्‌द्‌याचे भांडवल करण्याच्या, तो वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना शह देणे, पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचा वारंवार होणारा भंग व भारतात दहशतवादी हल्ल्यांना दिले जाणारे प्रोत्साहन याला लगाम घालणे, हे उद्देश या वक्तव्यामागे दिसतात. पंतप्रधानांचे वक्तव्य बलुचींना पाठिंबा देण्यासाठी नसून पाकिस्तानला शह देण्यासाठी होते, याची जाणीव बलुची नेत्यांनाही झाली असून, त्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

१८ जून २०१७

फेसबुकचे सोलार ड्रोन

फेसबुकच्या सोलार ड्रोनचे उड्डाण यशस्वी
       फेसबुकतर्फे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 'ऍक्वीला' (Aquila) या ड्रोनचे उड्डाण दि. 22 जुलै 2016 रोजी यशस्वीपणे पार पडले. या ड्रोनची ऍरोजोनातील (Arojona) युमा येथे चाचणी करण्यात आली होती. या चाचणीदरम्यान 'ऍक्वीला' हे ड्रोन 1000 फुटांपर्यंत तब्बल 96 मिनिटे उडत होते. या यशस्वी उड्डाणामुळे जगभर इंटरनेट पोचविणे शक्‍य होणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेट पोचविण्यात याचा मोठा फायदा होईल. 

ऍक्वीला (Aquila)ची वैशिष्ट्ये : 

 • फेसबुक इंटरनेट ओआरजीच्या माध्यमातून इंटरनेट पोचविण्यातील महत्त्वाचा घटक 
 • एकावेळी उड्डाण केल्यानंतर तीन महिने 60 हजार 
 • फुटांवर उड्डाण करेल, अशी फेसबुकला अपेक्षा 
 • उड्डाण करत असतानाच 'ऍक्वीला' काही ठराविक भागाला इंटरनेटही पुरवणार 
 • 'ऍक्वीला'मुळे दुर्गम भागात इंटरनेट सेवा पुरविणे शक्‍य होणार 
 • भारतातही या सेवेचा लाभ मिळणार आहे 
 • सर्वात मोठे प्रवासी जेट एअरबस ए-380 पेक्षा दुप्पट उंचीवर उडण्याची क्षमता 
 • संपूर्ण कार्बन फायबरपासून निर्मिती असल्याने वजन कमी 

ऍक्वीला (Aquila) विषयी : 

 • तब्बल 14 महिने परिश्रम केल्यानंतर 'ऍक्वीला' तयार झाले. 
 • ऍक्वीलाची निर्मिती ब्रिटनच्या फेसबुक एरोस्पेस चमूने केली आहे. 
 • बोईंग-737 या विमानाएवढे मोठे म्हणजेच 140 फूट लांब याचे पंख आहेत. 
 • वजन फक्त 450 किलोग्रॅम आहे. दीर्घकाळ हवेत राहण्यासाठी त्याचे वजन शक्‍य तितके कमी ठेवण्याची गरज होती. त्याकरिता संपूर्ण विमानाची बॉडी कार्बन फायबर कम्पोजिटपासून तयार करण्यात आली. ज्यामुळे त्याचे वजन 450 कि.ग्रॅ.पेक्षा कमी भरते. याहूनही कमी वजन करण्याचा अभियंते प्रयत्न करत आहेत. 
 • हे साठ हजार फुटांपर्यंत उड्डाण करू शकते. 
 • 50 किलोमीटरच्या क्षेत्रात इंटरनेट सेवा देण्याची क्षमता 
 • ऊर्जेचा वापर कमीत कमी करण्यासाठी हेतुपूर्वक अतिशय कमी ठेवण्यात आला आहे. सर्वोच्च उंचीवर जिथे तुरळक हवा असेल, तेथे सर्वाधिक 128 किमी/तासाचा वेग ते गाठू शकते. 
 • संपूर्णतः सौरऊर्जेवर चालणाऱ्या या विमानात प्रोपेलर्स, कम्युनिकेशन्स पेलोड, वीज, हिटर आणि कार्यप्रणाली रात्रीच्या वेळी सुरळीत चालू ठेवण्यासाठी दिवसभर सूर्यप्रकाशापासून पुरेशी ऊर्जा साठवून ठेवण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे यासाठी केवळ तीन हेअरड्रायर्ससाठी लागणाऱ्या ऊर्जेएवढीच ऊर्जा लागते. कमीत कमी ऊर्जेचा वापर करण्यावर कंपनीचा भर आहे. 
 • ड्रोनद्वारे इंटरनेट पुरविण्याच्या कल्पनेवर काम करणारी फेसबुक ही काही एकमेव कंपनी नाही. गुगलही प्रोजेक्‍ट लून अंतर्गत हाय-ऍल्टिट्यूड हेलियम बलूनच्या माध्यमातून दुर्गम भागात इंटरनेट सुविधा देण्यावर काम करत आहे. 
 • ऍक्‍वीला ड्रोन नवीन लेझर-बीम तंत्रज्ञानाद्वारे 96 किमी त्रिज्येतील लोकांना जलद इंटरनेट सुविधा पुरवणार आहेत. ऍक्वीलाने प्रक्षेपित केलेल्या सिग्नल्सला जमिनीवर असणारे टॉवर्स आणि अँटेना वाय-फाय किंवा 4-जी नेटवर्कमध्ये रूपांतरित करतील, अशी सर्वसाधारण संकल्पना आहे. पुढे थेट मोबाईलवरच इंटरनेट सिग्नल पाठविण्याचीही त्यांची योजना आहे. 

ऍक्वीलाचे फायदे : 

 • आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवलेल्या भागात 'ऍक्वीला' हे ड्रोनद्वारे हायस्पीड इंटरनेट सुविधा त्वरित पुरवेल. 
 • भारतातील ग्रामीण भागासारख्या इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीसाठी 'ऍक्वीला' वरदान. 
 • पहिल्या टप्प्यात सुमारे 120 कोटी लोकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध 
 • सध्या आहे त्यापेक्षा दहापट जास्त वेगाने इंटरनेट. 
 • कनेक्‍टिव्हिटी वाढल्याने ऑनलाईन सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध 
 • रोजगाराच्या अनेक संधीचे निर्माण. 

भारताच्या किदंबी श्रीकांतचा ऐतिहासिक विजय

      जपानच्या काझुमासा सकाईचा 21-11,21-19 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताच्या किदंबी श्रीकांतने इंडोनेशिया सुपर सिरीज प्रिमियर स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या विजयाबरोबरच श्रीकांत हा ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला. 

     सरळ गेममध्ये विजय मिळविलेल्या श्रीकांत याने पहिल्या गेममध्ये सकाई याला कोणतीही संधी दिली नाही. पूर्ण वर्चस्व राखलेल्या श्रीकांत याने हा गेम 21-11 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सकाई याने जोरदार संघर्ष करत 11-6 अशी आघाडी मिळविली. परंतु श्रीकांत याने योग्य वेळी खेळ उंचावत गेममध्ये 13-13 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या गेममध्ये आश्‍वासक पुनरागमन केलेल्या श्रीकांत याने एका ताकदवान "बॉडी स्मॅश'सहित हे ऐतिहासिक विजेतेपद मिळविले.

१७ जून २०१७

50 हजारांपेक्षा जास्त व्यवहारासाठी हवा आधार

       बँकेत खाते उघडण्यासाठी आणि 50 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची देवाण-घेवाण करण्यासाठी सरकारने आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे. महसूल विभागाने याचा आदेश काढला आहे. विद्यमान बँक खातेधारकांना आधार कार्ड 31 डिसेंबर 2017 पर्यंत जमा करण्यास सांगण्यात आले.

      आधार नंबर न दिल्यास बँक खाते सक्रीय राहणार नाही. 2017-18 च्या अर्थसंकल्पात सरकारने आधारला पॅनशी जोडणे अनिवार्य केलेले आहे. करातून पळवाट काढण्यासाठी लोकांनी एकापेक्षा अधिक पॅनकार्डचा वापर करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. आता व्यक्ती, कंपनी आणि भागीदारीतील कंपनी यांना 50 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारासाठी आधारसोबत पॅन नंबर, फॉर्म नंबर 60 देणे अनिवार्य केले आहे. बँकेत खाते सुरु करताना जर आधार क्रमांक नसेल तर अर्जदाराला आधारसाठी केलेल्या अर्जाचा पुरावा सादर करावा लागेल आणि खाते सुरु झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत आधार क्रमांक जमा करावा लागेल.

जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचे निधन

       आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचे निधन झाले आहे. त्यांनी जर्मनीचे सर्वाधिक काळ चान्सेलर पद भूषवले होते. जर्मनीच्या एकीकरणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. शीतयुद्धाच्या काळात ते जगातील सर्वात आवडत्या नेत्यांमधील एक होते. हेलमुट कोल 1982 ते 1998 सालापर्यंत जर्मनीच्या चान्सेलर पदावर कार्यरत होते. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. त्यांनी पूर्व आणि पश्‍चिम जर्मनीला एकत्रित केल्यामुळे त्यांना फादर ऑफ रि-युनिफिकेशनच्या नावानेही संबोधले जाते. तसेच शीतयुद्धाच्या काळात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश सीनियर यांनी 20 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण नेते म्हणून हेलमुट यांचा उल्लेख केला होता.

       जर्मनीचे एकत्रीकरण केल्यानंतर 1990 ते 1998 च्या कार्यकाळात त्यांनी देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ख्रिश्‍चियन डेमोक्रेटिक युनियन पार्टीचे नेते हेलमुट कोल यांनी 16 वर्षे जर्मनी या देशाचे चान्सेलर पद सांभाळले. जर्मनीचे निर्माता बिस्मार्कनंतरचे सर्वात मोठे नेते म्हणून हेलमुट कोल ओळखले जातात. 

१६ जून २०१७

भारत-अमेरिका संरक्षण करार

      भारत आणि अमेरिकेला एकमेकांचे लष्करी तळ वापरण्याची संमती देणार्‍या करारावर दि. 30 ऑगस्ट 2016 रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी स्वाक्षर्‍या केल्या.

      प्रथम 2002 मध्ये अशा प्रकारचा करार करावा म्हणून अमेरिकेने प्रयत्न केले, परंतु त्यास भारताने नकार दिला होता.

       या वर्षी (2016) जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान या कराराचे स्वरूप निश्‍चित करण्यात आले व शेवटी 30 ऑगस्ट 2016 रोजी कराराला दोन्ही देशांनी औपचारिक संमती दिली.

या करारामुळे पुढील गोष्टी शक्य होतील -

*   या करारामुळे दोन्ही देशांना परस्परांच्या देशातील लष्करी पायाभूत सोयी, पुरवठा आणि सेवा वापरता येणार आहेत.

*   या करारामुळे भारतीय लष्करी दलाची क्षमता वाढेल. विशेषतः नैसर्गिक संकटाच्या काळात लष्कराला परिणामकारकपणे मोहीम राबविता येईल.

*   विमानांची दुरुस्ती आणि इंधन पुरवठ्यासाठी दोन्ही देशांना परस्परांचा भूभाग, हवाई आणि नौदलाचे तळ वापरता येणार आहेत.

*   भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य वाढविणार्‍या या करारामुळे चीनच्या नौदलाच्या आक्रमकतेला वेसण घालणे शक्य होईल.

*   या करारामुळे भारताला कल्पक तंत्रज्ञान मिळू शकेल व त्याच्या वापरातून नवा अनुभव संपादन करता येईल.

भारत-अमेरिका संबंध -

        संरक्षण क्षेत्रासह व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा इत्यादी क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिकेचे संबंध विकसित झाले आहेत. 2008 मध्ये भारत सरकारने अमेरिकेसोबत नागरी आण्विक सहकार्य करार केला आहे.

       भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार जवळपास 100 अब्ज डॉलर इतका आहे. 2014 ची आकडेवारी पाहता अमेरिकन कंपन्यांनी भारतात 28 अब्ज डॉलर इतकी प्रत्यक्ष गुंतवणूक केली आहे. या दोन्ही देशांचे लष्करी तळ, त्यावरील साधनसामग्री, सुटे भाग किंवा काही निश्‍चित सेवा पूर्वपरवानगी घेऊन एकमेकांना वापरता येतील. या सहकार्य कराराचा खरा उपयोग नैसर्गिक आपत्तीच्या काळात होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे.

      भारताला हिंदी महासागरात तसेच त्या पलीकडील सागरी क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आता अमेरिकेसारख्या प्रबळ नौदलाची मदत कामी येणार आहे.

पी. एन. भगवती यांचे निधन

      भगवती यांचा जन्म 21 डिसेंबर 1921 रोजी गुजरातमध्ये झाला. 1960 मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून त्यांनी वकिली करायला सुरुवात केली होती.

      जनहित याचिकेची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे पद्मविभूषण माजी सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचे 15 जून रोजी निधन झाले ते 95 वर्षांचे होते. भगवती देशाचे 17 वे सरन्यायाधीश होते. त्यांनी 12 जुलै 1985 ते 20 डिसेंबर 1986 दरम्यान हे पद भूषविले.

१५ जून २०१७

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन विभागाच्या प्रमुखपदी गिरीश वाघ

       भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन विभागाच्या प्रमुखपदी गिरीश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ते कार्यकारी समितीचे सदस्यही असतील. रवींद्र पिसारोडी यांनी टाटा मोटर्सच्या कार्यकारी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आठवड्याभराने गिरीश वाघ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

       टाटा मोटर्स एका महत्त्वाच्या परिवर्तनाच्या टप्प्यावर असताना पीसारोडी यांची एक्झिट आणि गिरीश वाघ यांची नियुक्ती झाली आहे. अधिक परिणामकारक पद्धतीने काम करण्यासाठी कंपनीमध्ये अंतर्गत पातळीवर मोठे फेरबदल केले असून, 1400 लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे तर, अनेकांच्या जबाबदार्‍या बदलण्यात आल्या आहेत.

         गिरीश वाघ तात्काळ नवीन जबाबदारी स्वीकारणार असून, रवींद्र पिसारोडी यांच्याकडून काही गोष्टी समजून घेणार आहेत असे टाटा मोटर्सकडून जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 46 वर्षीय गिरीश वाघ मॅकेनिकल इंजिनीयर आहेत. 1992 साली थेट कॅम्पस इंटरव्ह्यूमधून त्यांची टाटा मोटर्समध्ये निवड झाली. त्यांनी कंपनीच्या टाटा इंडिका, टाटा नॅनो आणि टाटा एसीई एलसीव्ही प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अमेरिका कतारला विकणार 12 अब्ज डॉलर्सची लढाऊ विमाने

       कतार अमेरिकेकडून अत्याधुनिक एफ-15 लढाऊ विमाने विकत करण्यासंदर्भातील करार झाल्याची घोषणा कतारचे संरक्षण मंत्री खालिद अल अत्तियाह व अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांनी एकत्रितरित्या केली.

     या करारामुळे कतारला नेमकी किती विमाने मिळतील, याचा खुलासा पेंटॅगॉनकडून केलेला नसलास, तरी विमानांची संख्या सुमारे 36 इतकी असावी, असा अंदाज वर्तविला आहे. याआधी गेल्या वर्षी, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने कतारला 72 एफ-15 ईगल जेट्स विकण्यास मान्यता दर्शविली होती. या कराराची किंमत सुमारे 21 अब्ज डॉलर्स इतकी होती.

      कतार दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचा आरोप करत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त व बहारीन या देशांनी कतारबरोबरील राजनैतिक संबंध तोडल्याचे जाहीर केले आहे. यामुळे पश्‍चिम आशियातील वातावरण तणावग्रस्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवरच हा अत्यंत संवेदनशील करार झाला आहे.

      अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या कतारवरील बहिष्कारास पाठिंबा दर्शविला आहे. मात्र अमेरिकेमधील इतर वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांनी सावध भूमिका घेत या प्रकरणी चर्चा करण्यात यावी, अशी भूमिका घेतली आहे.

       12 अब्ज डॉलर्स किंमतीच्या या करारामुळे अमेरिका व कतारमधील संरक्षणात्मक सहकार्य अधिक वृद्धिंगत झाले आहे, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. मॅटीस व अत्तियाह यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचा असलेल्या धोक्याचाही मुद्दा उपस्थित केला गेल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.

१४ जून २०१७

आयएनएस चेन्नई

          दि. 18 नोव्हेंबर 2016 रोजी 'आयएनएस चेन्नई' (INS Chennai) ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या विनाशिकेमध्ये शत्रूचा लांब पल्ल्याचा मारा परतवून लावण्याची क्षमता आहे. 

 •        देशातील पहिलीच आधुनिक यंत्रणेसह सज्ज असलेली ही विनाशिका प्रोजेक्‍ट 15 (अ) मध्ये कोलकाता क्‍लासमधील शेवटची विनाशिका आहे. 2006 मध्ये बांधणीस सुरुवात करण्यात आलेही ही विनाशिका माझगाव डॉकने दि. 31 ऑगस्ट 2016 रोजी नौदलाकडे सुपूर्द केली. 
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या मदतीने विनाशिकेवर आधुनिक शस्रे तैनात करण्यात आली आहेत. विनाशिकेवरील ब्राह्मोस क्षेपणास्रामुळे लांब पल्ल्याचा मारा तसेच पाणी व हवेतून मारा करण्याची क्षमता या विनाशिकेमध्ये आहे. 
 • शत्रूंना चकवा देण्यासाठी विनाशिकेवर खास 'कवच' बसवण्यात आले असून या कवचामुळे युद्ध नौका तसेच जहाजांवर होणारा हल्ला दुसऱ्या दिशेला वळवणे शक्‍य होणार आहे. अशा प्रकारची चार कवचे या विनाशिकेवर आहेत. त्यात छोटी क्षेपणास्र असून पडल्यानंतर ते ढगासारखे बनतात. शिवाय विनाशकेवर दोन हेलिकॉप्टरदेखील तैनात करण्यात आली आहेत. 
 • विनाशिकेत नौसैनिकांसाठी खास स्वयंपाक घर आहे. हे स्वयंपाक घर 24 तास सुरू राहणार असून त्यामध्ये तासाला 800 ते 900 चपात्या आणि आणि डोसा बनविण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. नौसैनिकांसाठीचे खाद्यपदार्थ हे खाद्यतज्ज्ञांच्या सल्ल्याने दिले जाणार आहेत. 
 • विनाशिकेची लांबी 164 मीटर असून वजन 7 हजार 500 टन इतके आहे तसेच विनाशिकेवर 350 नौसैनिक आणि 30 अधिकारी यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. 

प्रमुख भारतीय युद्धनौका 

 • आयएनएस अरिहंत 
 • आयएनएस सिंधुरक्षक 
 • आयएनएस विक्रमादित्य 
 • आयएनएस विराट 
 • आयएनएस गोदावरी

लंडन इमारतीला आग

      लंडनमध्ये ग्रीनफेल टॉवर या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 30 जण गंभीर जखमी झाले. लंडनच्या पश्‍चिमेकडील भागात ही आग लागली. अद्यापही या इमारतीमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

     पश्‍चिम लंडनमधील या इमारतीला ही आग सकाळी लागली. संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. त्यामुळे आगीत अडकलेल्या नागरिकांचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी 40 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 200 जवान प्रयत्न करत आहेत.

      ग्रीनफेल टॉवर ही रहिवाशी इमारत असल्याने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या आतमध्ये अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. लंडन अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दुसर्‍या मजल्यावर लागलेली आग 27 व्या मजल्यापर्यंत पोहचली आहे. या इमारतीचा बहुतांश भाग आगीत जळून खाक झाल्याने इमारत एका बाजूला कलल्याचे सांगण्यात येत आहे.

       दरम्यान, अग्निशामन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत इमारतीमधून अनेक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी अनेकजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

शेतकर्यांना कमी व्याज दरात मिळणार कर्ज

      देशात अनेक राज्यात शेतकर्‍यांची आंदोलने अद्यापही सुरु आहेत. या आंदोलनांचे लोण सध्या देशात उत्तरेकडे पाहायला मिळत आहे. शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने करत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पीक कर्जाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील 9 टक्क्यांपैकी 5 टक्के व्याज आता केंद्र सरकार भरणार आहे. 

     केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढे शेतकर्‍यांना 9 टक्के दराने मिळणार्‍या पीक कर्जापैकी फक्त 4 टक्केच व्याज भरावे लागणार आहे.

        या निर्णयाबाबत काही निकषही केंद्राने लागू केले आहेत. त्यानुसार 3 लाख रूपयापर्यंत पीककर्ज घेणार्‍यांना हा लाभ मिळणार आहे. शेतकर्‍यांना या कर्जाची परतफेड 1 वर्षाच्या आत करावी लागणार आहे.  

काश्मीर खोऱ्यात 6 तासांत 5 हल्ले

      काश्मीर खोऱ्यात मंगळवारी रात्री सहा तासांमध्ये पाच ठिकाणी दहशतवाद्यांकडून लष्करी जवानांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 13 जवान जखमी झाले आहेत.

     लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी त्राल आणि अवंतीपुरा येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात दहा जवान जखमी असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यानंतर सोपोर येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आला. तसेच पुलवामा येथे ग्रेनेड पेकण्यात आले. अनंतनाग येथे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत.

    दहशतवाद्यांनी जवानांच्या चार रायफल्स पळवून नेल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सतत सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. आता दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्येही काश्मीर खोऱ्यात वाढ झाली आहे.

१३ जून २०१७

'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना

         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 18 ऑक्टोबर 2016 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती केंद्राची स्थापना केली. यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या "झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट' (Zero Defect - Zero Effect) या योजनेचीही सुरुवात करण्यात आली. याशिवाय सूक्ष्म, लघु व मध्यम आकाराच्या उद्योगांसाठीच्या पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. 

       अनुसूचित जाती - जमातीतील उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली असून या समाजातील मुलांना देखील उद्योजकतेचे धडे आणि नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रासाठी 490 कोटी रुपयांच्या निधींची तरतूद करण्यात आली असून बाजारप्रवेश सुलभीकरण, लघुउद्योगांची क्षमतावृद्धी आणि अशा उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी हा निधी उभारण्यात आला आहे. सार्वजनिक खरेदी धोरण 2012 नुसार सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या सार्वजनिक खरेदीपैकी किमान 4 टक्के उत्पादने अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींच्या मालकीच्या उद्योगांकडून खरेदी करण्यात यावीत असे बंधन करण्यात आले आहे. 

'झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट' योजना 

 • दोषविरहित उत्पादनांची निर्मिती "झिरो डिफेक्ट' आणि पर्यावरणावर कमीत कमी नकारात्मक परिणाम - झिरो इफेक्ट ही दोन उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी या योजनेची सुरुवात केंद्रशासनाने केली आहे. याशिवाय भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधून जागतिक दर्जा असणारी उत्पादने निर्माण करण्याचे ध्येयही निश्‍चित करण्यात आले आहे. 
 • या योजनेअंतर्गत आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना "झिरो डिफेक्ट - झिरो इफेक्ट' देण्यात येणार आहे. अशा उद्योगांनी बनविलेल्या उत्पादनामुळे विश्‍वासार्ह वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. 
 • पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. 

चिनाब नदीवर उभा राहतोय आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल

        जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतातील चिनाब नदीवर बांधला जात असून त्याची उंची पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही जास्त असणार. या पूलाची उंची 359 मीटर असणार आहे. हा रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षाही 30 मीटर उंच असणार आहे. जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर या पुलाचं काम सुरु आहे. रेआसी जिल्ह्यात बांधकाम सुरु असलेला हा पूल जून 2019 पर्यंत पुर्णपणे तयार असेल. पुलाचं 66 टक्के काम पुर्ण झालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२६ किलोमीटरचा उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे जोडणी प्रकल्प सुरु आहे. चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पुल साकारण्याचे काम कोकण रेल्वेकडून केले जात आहे.
 
       चिनाब नदीवरील हा पुल जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा मानला जातो. अशा या पुलाचे काम २00२-0३ पासून सुरु करण्यात आले. नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर पुल साकारताना कोकण रेल्वेला मोठे आव्हान स्वीकारावे लागत असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले आहे. आयफेल टॉवरची उंची ही ३२४ मीटर तर कुतूबिनारची उंची ही ७२ मीटर एवढी आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच असा पुल बांधण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. 
 
        चिनाब नदीवरील 1.3 किमी लांबीच्या या पुलासाठी एकूण 1,250 कोटींचा खर्च येणार असल्याचं कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता आर के सिंग यांनी सांगितलं आहे. हा पूल 2019 पर्यंत तयार व्हावा यासाठी 1300 कामगार आणि 300 इंजिनिअर्स दिवसरात्र मेहनत करत असल्याचंही त्यांनी सागितलं आहे. 
 
      2004 रोजी या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र 2008-09 रोजी परिसरात जोराचे वारे वाहत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काम थांबवण्यात आलं होतं. प्रती तास 100 किमी वेगाने वाहणा-या वा-याचा विचार करता रेल्वेने पूल बांधण्यासाठी चिनाब नदीवरच दुसरी जागा शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र शेवटी हीच जागा योग्य असल्याचं ठरलं अशी माहिती उपमुख्य अभियंता आर आर मलिक यांनी दिली आहे. 
 
   हा पूल उभारल्यानंतर त्याला असणारा दहशतवाद्यांकडून धोका पाहता कोकण रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पुलाच्या बांधकामात उच्च दर्जाची सामुग्री वापरण्यात आली असून ४0 किलोग्रॅम आरडीएक्स किंवा टीएनटीसारखे भयंकर स्फोटके वापरुन स्फोट घडविल्यासही पुलाला फारसा धक्का लागणार नाही आणि या पुलावरुन ट्रेन सुखरुप धावू शकेल, याची खबरदारी घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. चिनाब नदीवर बांधण्यात येणारा पुल २0१८-१९ पर्यंत पूर्ण होईल. 

१२ जून २०१७

आर्थिक मंदी कायम

      1000 आणि 500 च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून अर्थव्यवस्थेची गती कमालीची मंदावली आहे. त्याचा परिणाम बँकिंग क्षेत्रावरही जाणवत असून मंदीची झळ आणखी काही काळ या क्षेत्राला सहन करावी लागणार असल्याचे स्पष्ट मत भारतीय स्टेट बँकेने व्यक्त केले आहे.

      स्टेट बँक त्यांच्या 15,000 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री खासगी प्लेसमेंटच्या माध्यमातून करणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजातील जोखमीचे घटक या शीर्षकाखाली स्टेट बँकेने संस्थात्मक गुंतवणूकदारांना सद्यस्थितीची जाणीव करून दिली आहे.

     नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रावर जाणवणारा परिणाम दीर्घकाळ आणि अनिश्‍चित असेल असे या दस्तऐवजात नमूद केले आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून ही परिस्थिती आणखी काही काळ सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे स्टेट बँकेच्या या दस्तऐवजात म्हटले आहे. ही अवस्था दीर्घकाळ राहिल्यास स्टेट बँकेच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा बँकेने गुंतवणूकदारांना दिला आहे.

       नोटाबंदीनंतरच्या काळात बँकांकडील चालू आणि बचत खात्यांतील ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे बँकांना त्यांच्याकडील ठेवींवरील व्याजात कपात करावी लागली आहे. परिणामी स्टेट बँकेला इतर व्यावसायिक बँका व वित्त संस्थांच्या स्पर्धाना आगामी काळात तोंड द्यावे लागणार असल्याकडेही या दस्तऐवजात लक्ष वेधण्यात आले आहे. या स्पर्धेला तोंड देण्यात बँकेला अपयश आल्यास नफ्यात कमालीची घट होऊ शकते, अशी भीतीही या दस्तऐवजात व्यक्त केली आहे.

66 वस्तूंवरील प्रस्तावित वस्तू-सेवाकरात कपात

      बाटलीबंद लोणची, मुरांबे तसेच दप्तरे, वह्या, चित्रपट तिकिटे आदी एकूण 66 वस्तूंवरील वस्तू-सेवाकरात कपात करण्याचा निर्णय वस्तू-सेवाकर परिषदेने घेतला असून त्यामुळे या वस्तू ग्राहकांना आधी निश्‍चित केलेल्या दराच्या तुलनेत स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. वस्तू-सेवाकर लागू झाल्यानंतर या दरांची अंमलबजावणी होईल.

      वस्तू व सेवाकर लागू करण्यासाठी केंद्र सरकारने निश्‍चित केलेला 1 जुलै हा दिवस जवळ येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वस्तू-सेवाकर परिषदेची सोळावी बैठक झाली. एकूण 133 वस्तूंवरील वस्तू-सेवाकरात कपातीची शिफारस केली होती, त्यापैकी 66 वस्तूंवरील कर कमी केला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर दिली.

          सॅनिटरी नॅपकिन्सवरील करात कपात करण्यात यावी, अशी जोरदार मागणी देशभरातून होत आहे, मात्र त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. वस्तू-सेवाकर परिषदेची पुढील बैठक 18 जून रोजी होणार असून, त्यात लॉटरीवरील करांबाबत चर्चा होईल.

          बाटलीबंद लोणची, मुरांबे आदींवरील प्रस्तावित 18 टक्के कर 12 टक्के इतका कमी केला आहे. काजूवरील कर 12 वरून 5 टक्के केला आहे.

          शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवरील कर 18 वरून 12 टक्के, तर चित्रकलेच्या वह्यांवरील कर 12 वरून 0 टक्के केला आहे. दप्तरांवरील कर 28 वरून 18 टक्के इतका घटविण्यात आला आहे. 100 रुपये वा त्यापेक्षा कमी किमतीच्या चित्रपट तिकिटांसाठी 28 टक्के कर सुचविला होता. तो दर आता 18 टक्के इतका असेल.

११ जून २०१७

ब्रिटीश संसदेत 12 भारतीय

      युकेमध्ये झालेल्या निवडणुकीत 12 भारतीय नेत्यांनी विजय मिळवला. ब्रिटनमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतात जालंधरमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. निवडून आलेल्या भारतीय खासदारांत 4 भारतीय जालंधर जिल्ह्यातीलच नव्हेत तर जालंधरमधील एकाच विधानसभा मतदारसंघातील आहेत. या 12 निवडून आलेल्यांपैकी 2 नेते ब्रिटीश संसदेत पहिल्यांदाच पाऊल टाकणार आहेत.

        या निवडुकीत जिंकलेल्या भारतीयांमध्ये विरेंद्र शर्मा यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. तनमानजीत हे पहिले असे शिख आहेत जे पगडी परिधान करत नाहीत व ते सर्वात कमी वयाचे खासदार बनले आहेत. तसेच प्रीत कौर गिल या पहिल्या शिख महिला आहेत ज्या खासदार म्हणून निवडून आल्या. भारतीय वंशाच्या निवडून आलेल्या या 12 लोकांपैकी जालंधरचे 4 हे खासदार लेबर पार्टीचे आहेत.

१० जून २०१७

पॅनला आधार जोडणे आवश्यक

       पॅन कार्ड काढणे आणि आयकर विवरणपत्र दाखल करणे यासाठी आधार अनिवार्य करणार्‍या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीस सर्वोच्च न्यालयाने वैध ठरविले आहे. तथापि, आधारमुळे वैयक्तिक गोपनीयतेचा भंग होतो का, या मुद्याचा निर्णय घटनापीठाकडून येईपर्यंत त्याच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.

       आधार योजनेतील व्यक्तिगत माहिती फुटण्याच्या धोक्याबाबतही घटनापीठच निर्णय घेईल. आधारशी संबंधित लोकांची माहिती फुटू नये यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.

        न्यायालयाने म्हटले की, वैयक्तिक गोपनीयतेच्या मुद्यावर घटनापीठाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत आधार क्रमांकाशिवाय दाखल केलेली प्राप्तिकर विवरणपत्रे अवैध मानली जाणार नाहीत. नव्या कायद्याला आंशिक स्थगिती दिल्यामुळे आधीचे आर्थिक व्यवहारही अवैध ठरणार नाहीत.

       2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेल्या वित्त कायद्यान्वये प्राप्तिकर कायद्यात 139 अअ या कलमाचा समावेश केला आहे. त्यानुसार 1 जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरताना तसेच पॅन क्रमांक मिळविताना आधार क्रमांक जोडणे बंधनकारक केले आहे.

         या तरतुदीला साम्यवादी नेते बिनय विश्‍वम यांच्यासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय पीठाने आधार बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाचा सरकार अनादर करीत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

स्टेट बँकेत नोकरीसाठी आधार बंधनकारक -

          स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्मचारी भरतीच्या प्रक्रियेसाठी आधार कार्ड बंधनकारक करणार आहे. बँकेतील पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. बँकेने याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, ती येत्या 1 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेच्या एका परिपत्रकात याचा उल्लेख आहे.

       जम्मू-काश्मीर, मेघालय आणि आसाम या तीन राज्यांत मात्र याची अंमलबजावणी केली जाणार नाही. त्या राज्यांमधील उमेदवारांकडून अर्ज मागविताना बँकेतर्फे त्यांच्याकडून अन्य अटी घालण्यात येतील वा अन्य पुरावे मागण्यात येतील.

       भरती परीक्षेत हजारो उमेदवार बसतात. त्यांची ओळख पटवणे अवघड असते. अनेकदा अन्य पुरावे वा ओळखपत्रे बनावट असू शकतात. त्यामुळे अर्ज करताना त्यावर आधार कार्ड क्रमांक असणे आणि सोबत आधार कार्डाची छायाप्रत जोडणे सक्तीचे केले जाईल. स्टेट बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी सातत्याने भरती होत असते. मार्केटिंग व मॅनेजमेंट विभागात नियमितपणे भरती आणि त्यासाठी परीक्षा ही प्रक्रिया सुरू असते.

भारताला 5 कांस्य पदके

     दुसर्‍या आशियाई कॅडेट तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या 5 खेळाडूंनी कांस्य पदकांची कमाई केली. व्हिएतनामच्या होची मिन्ह शहरात 5 ते 8 जून या कालावधीत स्पर्धेचे आयोजन केले होते.

     देशासाठी कांस्य विजेत्या मुलींमध्ये मृणाल किशोर वैद्य तसेच मुलांमध्ये आदित्य चौहान (65 किलो), अनिल (41 किलो), देवांग शर्मा (61 किलो) आणि अनिस दास तालुकदार (65 किलोवरील गट) यांचा समावेश आहे.

९ जून २०१७

म्यानमार विमान अपघात

        म्यानमारमधील डवाई शहरापासून 218 किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रात तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विमानातील लोकांचा शोध सुरू आहे. एकूण 31 मृतदेह  समुद्राच्या बाहेर काढण्यात आले. अंदमानच्या समुद्रातून हे सगळे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 
पाण्याबाहेर काढलेले 31 मृतदेह मुख्यत: महिला आणि लहान मुलांचे आहेत. म्यानमारमध्ये जोरदार पावसातच लष्कराकडून नौदलाची जहाजं, हेलिकॉप्टर्स आणि मासेमारी करणाऱ्या होड्यांच्या माध्यमातून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी बचाव पथकाला 31 मृतदेह सापडले आहेत. यापैकी 21 महिलांचे मृतदेह, आठ लहान मुलांचे तर दोन पुरूषांचे मृतदेह आहेत, अशी माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. समुद्राबाहेर काढलेले मृतदेह डवाईच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत.
         म्यानमारमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. खराब वातावरणातसुद्धा मासेमारी करणाऱ्या होड्यांच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन सुरू आहे. 
        7 जून रोजी दुपारच्या सुमारास 116 प्रवाशांना घेऊन जाणारं लष्करी विमान बेपत्ता झालं होतं. याबाबत लष्कर कार्यालय आणि विमानतळाच्या अधिका-यांनी अधिकृत माहिती दिली होती. मान्यमारमधील दक्षिणेकडील मायईक आणि रंगून शहरा लगतच्या परिसरात लष्करी विमान बेपत्ता झाल्याचं सांगितलं होते. या विमानात 105 प्रवासी आणि 11 कर्मचारी होते. डवाई शहराच्या आसपास विमान पोहचल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. ही घटना गुरूवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर विमानाचा शोध घेण्यासाठी लष्कराचं पथक रवाना झालं होतं. 

बोपन्नाचे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद

        रोहण बोपन्नाने  कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला.

       बोपन्ना व डाब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले. त्यांनी दोन मॅच पॉर्इंटचा बचाव करताना जर्मनीच्या अन्ना लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज २-६, ६-२, १२-१० ने मोडून काढली.

भारत व कॅनडा यांची जोडी एकवेळ दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण गोरेनफिल्ड व फराह यांनी संधी गमावली. बोपन्ना व डाब्रोवस्की यांनी पूर्ण लाभ घेतला आणि दोन मॅच पॉर्इंट मिळवले. जर्मनीच्या खेळाडूने दुहेरी चूक करताच बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीचे जेतेपद निश्चित झाले.

बोपन्नाने कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याने २०१० मध्ये पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हकच्या साथीने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यावेळी त्याला अंतिम लढतीत ब्रायन बंधूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते.

८ जून २०१७

नासाच्या अंतराळ मोहिमेसाठी भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड

          अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून नुकत्याच निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांच्या पथकात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे. तब्बल 18 हजार उमेदवारांमधून 12 अंतराळवीरांची निवड करण्यात आली. या सगळ्यांना पृथ्वीच्या कक्षेतील आणि दीर्घ पल्ल्याच्या अंतराळ मोहिमांसाठी प्रशिक्षित करण्यात येईल. नासाने निवडलेल्या या 12 जणांमध्ये 7 पुरूष आणि 5 महिलांचा समावेश आहे.

         अंतराळ मोहिमेसाठी प्रशिक्षण घेणारी ही नासाची 22 वी तुकडी असेल. यापूर्वी ‘नासा’कडून कधीच एकावेळी इतक्या प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा नासाने अंतराळवीरांच्या भरतीसाठी जाहीर प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी नासाकडे 18,300 अर्ज आले होते. अंतराळवीरांची निवड करण्यासाठी उमेदवारांची शारीरिक आणि शैक्षणिक परीक्षा घेण्यात आली. यामध्ये संबंधित उमेदवाराने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी किंवा गणित यापैकी एका विषयात पदवी घेतली असली पाहिजे. तसेच उमेदवाराला जेट विमान चालवण्याचा 1000 तासांचा अनुभव असला पाहिजे, अशा प्रमुख अटी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी अनेक उमेदवार नासाचे हे निकष पूर्ण करण्याच्या जवळपास पोहोचले होते. त्यामुळे नासाकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने अंतराळवीर निवडण्यात आले. निवड झालेल्या 12 जणांना 2 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर अंतराळ केंद्रावर संशोधन मोहिमेसाठी पाठवले जाऊ शकते. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी ह्यूस्टन येथे नासाने निवडलेल्या अंतराळवीरांची नावे जाहीर केली.

नेपाळच्या पंतप्रधानपदी देउबा यांचा शपथविधी

      नेपाळचे पंतप्रधान म्हणून शेर बहादूर देउबा यांचा शपथविधी झाला. अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. देउबा (वय 70) हे चौथ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत. माओवादी नेते पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी 9 महिन्यांच्या सत्तावाटप करारानुसार राजीनामा दिल्यानंतर देउबा यांची मतैक्याने निवड झाली.

      दहल यांनीच देउबा यांचे नाव सुचवले. देउबा हे नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष असून त्यांची देशाचे 40 वे पंतप्रधान म्हणून निवड झाली. पार्लमेंटमधील मतदानात त्यांच्या बाजूने 558 पैकी 388 मते पडली. निवडणुकीत ते एकमेव उमेदवार होते. देउबा यांनी 8 सदस्यांचे मंत्रिमंडळ स्थापन केले असून त्यात 3 उपपंतप्रधान व 4 मंत्री आहेत. नेपाळी काँग्रेसचे नेते गोपाळ मान श्रेष्ठ यांना उपपंतप्रधान नेमण्यात आले असून, त्यांना शिक्षण खातेही दिले आहे. ग्यानेंद्र बहादूर कारकी यांना अर्थमंत्रिपद देण्यात आले. सीपीएनचे कृष्ण बहादूर महारा यांना उपपंतप्रधानपद दिले असून त्यांच्याकडे परराष्ट्र खाते दिले आहे. नेपाळी काँग्रेसचे नेते फरमुल्ला मन्सूर यांना कामगार व रोजगार खाते दिले आहे.

         सीपीएन (एमसी) नेते जनार्दन शर्मा यांना गृह कामकाज खाते, तर प्रभू साह यांना कुठलेही खाते दिले नाही. नेपाळ लोकतांत्रिक फोरमचे अध्यक्ष बिजय कुमार गच्छादार यांना उपपंतप्रधानपद दिले असून, त्यांना संघराज्य कामकाज व स्थानिक विकास खाते दिले आहे. देउबा हे पश्‍चिम दादेलधुरा जिल्ह्यातून निवडून आले आहेत व त्यांनी राज्यघटना सुधारण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

७ जून २०१७

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर : डॉ. जब्बार पटेल, श्रीमती ज्योती चांदेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

      अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदाच्या कै. निखिलभाऊ खडसे जीवनगौरव पुरस्कारांसाठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड केली असून हा सोहळा 14 जून 2017 रोजी सायं. 5.00 वा. संमेलनाध्यक्ष मा. श्री. जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे अर्थमंत्री, मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

     अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी रंगभूमीवरील सर्व घटकांची मातृसंस्था आहे. या रंगभूमीवरील सर्व प्रवाहांचा समावेश कै. गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिन सोहळ्यात व्हावा याचा सर्वंकष विचार करून नाट्य परिषदेने मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली आहेत.

सर्वोत्कृष्ट लेखक (व्यावसायिक नाटक) पुरस्कारासाठी -

*   मनस्विनी लता रविंद्र (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)

*   अभिजीत गुरु (नाटक-तीन पायांची शर्यत)

*   शेखर ढवळीकर (नाटक-के दिल अभी भरा नही)

*   आनंद म्हसवेकर (नाटक-यु टर्न-2)

*   सुरेश जयराम (नाटक-छडा)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी -

*   निपुण धर्माधिकारी (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)

*   विजय केंकरे (नाटक-तीन पायांची शर्यत)

*   राजेश जोशी (नाटक-कोड मंत्र)

*   मंगेश कदम (नाटक- के दिल अभी भरा नही)

*   नीरज शिरवईकर/सुदीप मोडक (नाटक-एक शून्य तीन)

*   सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कारासाठी तीन पायांची शर्यतअमर फोटो स्टुडिओ, कोड मंत्र, के दिल अभी भरा नही, एक शून्य तीन, नाटकांना नामांकने जाहीर करण्यात आली आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी -

*   सुमित राघवन (नाटक- एक शून्य तीन)

*   मंगेश कदम (नाटक- के दिल अभी भरा नही)

*   संजय नार्वेकर (नाटक- तीन पायांची शर्यत)

*   अमोल कोल्हे (नाटक-बंधमुक्त)

*   सौरभ गोखले (नाटक- छडा)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारासाठी -

*   आनंद इंगळे (नाटक-9 कोटी 57 लाख)

*   सचिन माधव (नाटक-बाबूराव मस्तानी)

*   प्रियदर्शन जाधव (नाटक-शांतेचं कार्ट चालू आहे)

*   भाऊ कदम (नाटक-शांतेचं कार्ट चालू आहे)

*   किरण पाटील (नाटक-बाबूराव मस्तानी)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी -

*   शर्वरी लोहकरे (नाटक-तीन पायांची शर्यत)

*   मुक्ता बर्वे (नाटक-कोड मंत्र)

*   इला भाटे (नाटक-यु टर्न-2)

*   सखी गोखले (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)

*   शर्मिष्ठा राऊत (नाटक-बंधमुक्त)

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार पुरस्कारासाठी -

*   प्रदीप मुळ्ये (नाटक-क्वीन मेकर)

*   प्रसाद वालावलकर (नाटक-कोड मंत्र)

*   नीरज शिरवईकर (नाटक-एक शून्य तीन)

*   प्रदीप मुळ्ये (नाटक-तीन पायांची शर्यत)

*   प्रदीप मुळ्ये (नाटक- अमर फोटो स्टुडिओ)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना पुरस्कारासाठी -

*   भूषण देसाई (नाटक-तीन पायांची शर्यत)

*   भौतेश व्यास (नाटक-कोड मंत्र)

*   शीतल तळपदे (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)

*   प्रदीप मुळ्ये (नाटक-छडा)

*   योगेश केळकर (नाटक-किमयागार)

सर्वोत्कृष्ट पार्श्‍वसंगीत पुरस्कारासाठी -

*   परिक्षीत भातखंडे (नाटक-स्वप्नपंख)

*   सचिन जिगर (नाटक-कोड मंत्र)

*   राहुल रानडे (नाटक-तीन पायांची शर्यत)

*   राहुल रानडे (नाटक-छडा)

*   रोहित प्रधान (नाटक-एक शून्य तीन)

सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार पुरस्कारासाठी -

*   संतोष गिलगिले (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)

*   अनिल आरोसकर (साईमाऊली)

*   कमलेश विच्चे (सुरक्षीत अंतर ठेवा)

*   संतोष पेडणेकर/हेमंत कदम (नाटक-कोड मंत्र)

*   संदीप नगरकर (नाटक-9 कोटी 57 लाख),

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी -

*   लोकेश गुप्ते (नाटक-तीन पायांची शर्यत)

*   उमेश जगताप (नाटक-कोड मंत्र)

*   अमेय वाघ (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)

*   नकुल घाणेकर (नाटक-स्वप्नपंख)

*   सुदेश म्हशीलकर (नाटक-षडयंत्र)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री -

*   विशाखा सुभेदार (नाटक-शांतेचं कार्ट चालू आहे)

*   सुलेखा तळवलकर (नाटक-9 कोटी 57 लाख)

*   शुभांगी गेखले (नाटक-साखर खाल्लेला माणूस)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी -

*   रेश्मा रामचंद्र (नाटक-छडा)

*   संपदा जोगळेकर (नाटक-स्वप्नपंख)

*   सीमा घोगळे (नाटक-सुरक्षीत अंतर ठेवा)

*   पूजा ठोंबरे (नाटक-अमर फोटो स्टुडिओ)

*   स्वानंदी टिकेकर (नाटक- एक शून्य तीन)

        यांना नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी चंद्रशेखर सांडवे, सुनील देवळेकर, अर्चना नेवरेकर, अविनाश खर्शीकर आणि संजय डहाळे हे परिक्षक होते.

       सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी रमेश थोरात, नाट्यपरिषद कार्यकर्ता पुरस्कारासाठी अ‍ॅड. देवेंद्र यादव, नाट्यसमिक्षक पुरस्कारासाठी शांता गोखले, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था परिवर्तन नाट्यसंस्था, जळगाव, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी नयना डोळस यांची निवड करण्यात आली आहे.

      सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकासाठी एम एच 12 जे 16, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटकासाठी संगीत स्वरसम्राज्ञी, प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता आशिष भिडे, प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ज्योती राऊळ, प्रायोगिक नाटक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुबोध पंडे, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटकातील गायक अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून अनुक्रमे कृष्णा चारी, श्रद्धा जोशी यांची निवड करण्यात आली आहेत.

      जीवनगौरव पुरस्कार हा प्रत्येकी रोख 51 हजार रुपये, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरुपाचा आहे. नाट्य परिषद शाखा कार्यकर्ता किरण येवलेकर, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापकासाठी श्रीकांत तटकरे, निवेदक पुरस्कारासाठी समीर इंदुलकर, गुणी रंगमंच कामगार पुरस्कारासाठी सतीश खवतोडे, तसेच विजय साळवे यांना लोककलावंत म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहेत. रंगभूमी व्यतिरीक्त इतर क्षेत्रात भरीव काम करणार्‍या रंगकर्मी पुरस्कारासाठीप्रदीप कबरे यांची निवड करण्यात आली आहे. माटुंग्याच्या यशवंत नाट्यसंकुलात होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.

पाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ

        पाकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधण्याच्या चीनच्या हालचाली सुरू आहेत, असा अहवाल अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएचे मुख्यालय पेंटॅगॉनने प्रसिद्ध केला आहे. दीर्घकाळापासून मैत्रीचे संबंध असलेल्या देशांमध्ये आर्थिक गुंतवणूक करून चीन त्यांना स्वत:च्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यात म्हटले आहे.

        आफ्रिकेतील दिजबौतीमध्ये चीनने त्यांचा नौदलाचा तळ बांधला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी अमेरिकेचाही लष्करी तळ आहे. पेंटॅगॉनने त्यांचा वार्षिक अहवाल अमेरिकी काँग्रेसला सादर केला आहे. या 97 पानी अहवालात 2016 मधील चीनच्या लष्करी पावलांचा आढावा प्रामुख्याने घेण्यात आला आहे. पेंटॅगॉनच्या अंदाजानुसार, चीनने गेल्या वर्षी संरक्षण क्षेत्रासाठी 180 अब्ज डॉलरची भरघोस तरतूद केली होती. ही तरतूद 140.4 अब्ज डॉलर असल्याचे चीनने अधिकृतरित्या सांगितले होते. नजीकच्या भविष्यात चीन पाकिस्तानसारख्या देशांमध्येही लष्करी तळ बांधण्याच्या दिशेने हालचाली करत आहे, असे या अहवालात ठळकपणे नमूद केले आहे.

       दिजबौतीमधील चीनच्या अस्तित्वामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंकेमध्ये अस्तित्व निर्माण करत चीनने भारताला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

      गेल्या अनेक वर्षांपासून चीन पाकिस्तानला आर्थिक मदत करत आहे, शिवाय पाकिस्तान चीनकडून शस्त्रास्त्रेही आयात करत आहे. गेल्या वर्षी चीनकडून पाकिस्तानने 8 पाणबुड्या घेण्याचा करारही केला. पाकिस्तानचा वापर लष्करी तळ म्हणून करण्याच्या दिशेने चीन प्रयत्न करत असल्याचा उल्लेख पेंटॅगॉनच्या अहवालात असला, तरीही या कृतीला भारत कसे प्रत्युत्तर देणार, याविषयी त्यात भाष्य केलेले नाही.

६ जून २०१७

आशियातील सर्वात मोठी बाजारसमिती ठप्प

      आशियातील सर्वात मोठी बाजारसमिती असलेल्या लासलगाव येथील कांद्याची बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. मागील 6 दिवसांपासून एकही ट्रॅक्टर येथे फिरकलेला नाही. संपूर्ण जिल्ह्यामधील बांधांवरून होणारा कांद्याचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे. लासलगाव बाजारसमितीमधील 15 हजार कोटींच्या व्यवहारांची उलाढाल थांबली आहे.

       शेतकर्‍यांचे सुमारे 100 कोटींचे नुकसान झाले असून मोठा फटका शेती व शेतकर्‍यांशी निगडीत असलेल्या हमाल, मापारी, मालवाहतूकदारांसारख्या घटकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांचाही व्यवसाय ठप्प झाला आहे. यामुळे संप चिघळू नये आणि लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या संपावर सरकारने तोडगा काढावा, अशीच अपेक्षा राज्यातील बांधाबांधावरून व्यक्त होत आहे.

यंदा भारताचा वृद्धिदर 7.2 टक्के राहणार

       नोटाबंदीचा परिणाम ओसरत आला आहे. त्यामुळे यंदा भारताचा वृद्धिदर 7.2 टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. 2016 मध्ये भारताचा वृद्धिदर 6.8 टक्के होता. जागतिक बँकेच्या अधिकार्‍याने सांगितले की, जागतिक बँकेने जानेवारीच्या अंदाजाच्या तुलनेत भारताचा वृद्धिदर अंदाज 4.0 टक्क्यांनी सुधारून घेतला आहे.

       भारत जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा देश म्हणून आपले स्थान पुन्हा पटकावणार आहे. जागतिक बँकेने वृद्धिदराचा अंदाज चीनसाठी 6.5 टक्के ठेवला आहे. 2018 आणि 2019 मध्ये चीनचा वृद्धिदर 6.3 टक्के राहील, असेही बँकेने म्हटले आहे.

      भारताचा 2018 मधील वृद्धिदर 7.5 टक्के, तर 2019 मधील वृद्धिदर 7.7 टक्के राहील. जानेवारी 2017 मध्ये व्यक्त केलेल्या अंदाजाच्या तुलनेत ताजा अंदाज अनुक्रमे 0.3 टक्के आणि 0.1 टक्के कमी आहे. खासगी गुंतवणूक अपेक्षेप्रमाणे गती घेऊ शकलेली नाही, त्यामुळे अंदाजात थोडी घसरण करण्यात आल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.

      बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, 2016 मध्ये चांगला मान्सून आणि कृषी, तसेच ग्रामीण भागातील वाढती मागणी, यामुळे भारताची आर्थिक आघाडी चांगली राहिली. याशिवाय पायाभूत क्षेत्रावरील वाढलेला खर्च, सरकारची मागणी याचाही चांगला परिणाम झाला.

५ जून २०१७

इस्रोतर्फे जीएसएलव्ही मार्क-3 चे प्रक्षेपण

      जीएसएलव्ही मार्क-3 चे प्रक्षेपण होणार आहे. 5 वाजून 8 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून इस्त्रो जीएसएलव्ही मार्क-3 चे प्रक्षेपण करणार आहे. जीएसएलव्ही मार्क-3 मुळे भारताला दुसर्‍या देशावर अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच 4 टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणे भारताला शक्य होणार आहे. यामुळे भारतासमोर अनेक संधी निर्माण होणार आहेत. जास्त वजनाचे कम्युनिकेशन सॅटेलाईट जीएसएटी-19 चा जिओटीमध्ये (जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट) प्रवेश करणे जीएसएलव्ही मार्क-3 चे प्रक्षेपण करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे इस्त्रोचे चेअरमन ए. एस. किरण कुमार यांनी सांगितले आहे. जीएसएलव्ही मार्क-3 चे प्रक्षेपण करण्यासाठी जास्त वेगाच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे इस्त्रोने तब्बल 30 वर्ष संशोधन करत हे इंजिन तयार केले आहे.

        हे प्रक्षेपण इस्त्रोसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे माजी प्रमुख राधाकृष्णन यांनी सांगितले आहे, कारण या प्रक्षेपणाद्वारे इस्त्रो प्रक्षेपण उपग्रहाची क्षमता 2.2-2.3 टनच्या दुप्पट करत 3.5-4 टन करत आहे. भारताला जर 2.3 टन वजनापेक्षा जास्त संपर्क उपग्रहाचे प्रक्षेपण करायचे असल्यास त्यासाठी परदेशात जावे लागत अशी माहिती राधाकृष्णन यांनी दिली. मात्र आजच्या प्रक्षेपणानंतर भारताला दुसर्‍या देशावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही, तसेच इतर देशही आपल्याकडे येऊ लागतील.

शांतता टिकविण्यात भारताची मोठी भूमिका

       भारताला अमेरिकेचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून मान्यता देण्यात या देशाने हिंदी महासागर प्रदेशात शांतता टिकविण्यात बजावलेल्या भूमिकेचा फार मोठा वाटा आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी सांगितले. शांग्री-ला चर्चेदरम्यान बोलताना मॅटिस यांनी हे मत व्यक्त केले.

     दक्षिण आशियात दहशतवाद वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सागरी सुरक्षा आणि इतर नव्या आव्हानांचा सामना करण्याचे उपाय अमेरिका शोधत आहे. सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून मान्यता देणे हा त्याचाच एक भाग आहे.

४ जून २०१७

बी. साई प्रणितला अजिंक्यपद

       भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणितने अंतिम लढतीत पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव करीत १२०००० डॉलर पुरस्कार राशी असलेल्या थायलंड ओपनमध्ये पुरुष एकेरीत जेतेपदाचा मान मिळवला.

         तिसऱ्या मानांकित भारतीय खेळाडूने १ तास ११ मिनिटे रंगलेल्या अंतिम लढतीत चौथ्या मानांकित इंडोनेशियन खेळाडूचा १७-२१, २१-१८, २१-१९ ने पराभव केला. प्रणितचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने सिंगापूर ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवला होता.

       जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानावर असलेल्या प्रणितला अंतिम लढतीत चांगली सुरुवात करता आली नाही. त्याने पहिला गेम गमावला. इंडोनेशियाच्या खेळाडूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ३-० अशी आघाडी घेतली होती, पण प्रणितने लवकरच ४-४ आणि ७-७ अशी बरोबरी साधली. क्रिस्टीने त्यानंतर १४-११ अशी आघाडी घेतली, पण प्रणितने तीन गुण वसूल करीत १४-१४ अशी बरोबरी साधली. क्रिस्टीने त्यानंतर १८-१७ अशी आघाडी घेतली आणि सलग तीन गुण वसूल करीत गेम जिंकला.

        दुसऱ्या गेममध्ये प्रणितने दमदार पुनरागमन करीत सुरुवातीला ५-० आणि त्यानंतर ९-३ अशी आघाडी घेतली. क्रिस्टीने सलग सहा गुण घेत ९-९ अशी बरोबरी साधली. उभय खेळाडूंदरम्यान त्यानंतर १५-१५ अशी बरोबरी होती. प्रणितने १७-१६ च्या स्कोअरवर सलग तीन गुण वसूल करीत आघाडी घेतली आणि त्यानंतर २१-१८ ने गेम जिंकत १-१ने बरोबरी साधली.

      तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये क्रिस्टीने २-२ च्या स्कोअरवर सलग पाच गुण वसूल करत ७-२ अशी आघाडी घेतली.

      प्रणितने पुनरागमन करताना ७-८ असा स्कोअर केला. उभय खेळाडूंदरम्यान १७-१७ अशी बरोबरी होती. त्यानंतर प्रणितने महत्त्वाचे दोन गुण वसूल करीत १९-१७ अशी आघाडी घेतली. क्रिस्टीने दोन गुण वसूल करीत १९-१९ अशी बरोबरी साधली, पण भारतीय खेळाडूने त्यानंतर सलग दोन गुण घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

3 जून २०१७

मुंबईच्या प्रशिक्षकपदी समीर दिघे यांची निवड

         मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा माजी भारतीय संघाचे यष्टीरक्षक समीर दिघे यांच्याकडे सोपवण्यात आली. दिघे यांच्याबरोबर भारताचे माजी फलंदाज आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक प्रवीण अमरेदेखील या शर्यतीत होते. या दोघांमध्ये अमरे यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव असला, तरी मुंबईच्या प्रशिक्षकपदी दिघे यांची निवड करण्यात आली आहे.

       समीर दिघे यांना मुंबईच्या रणजी संघाचे प्रशिक्षकपद 2017-18 या कालावधीसाठी सोपवण्यात आले आहे, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पत्रकात म्हटले आहे. एमसीएच्या क्रिकेट सुधारणा समितीची अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि यामध्ये मोठ्या स्तरावर प्रशिक्षकपदाचा अनुभव नसलेल्या दिघे यांना प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिघे यांनी 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, त्याचबरोबर 23 एकदिवसीय सामने त्यांच्या नावावर आहेत. आतापर्यंत मुंबईने सर्वात जास्त रणजी जेतेपदे पटकावली आहेत. त्यामुळे या संघाचे प्रशिक्षकपद भूषवायला मिळणे, हा माझा सन्मान आहे. पण दुसरीकडे हे फार मोठे आव्हानही असेल. माझ्याकडून आता सार्‍यांच्या फार मोठ्या अपेक्षा असतील.  

लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी

       महाराष्ट्रातील मुळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर हे आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहेत. आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला. त्यात वराडकर हे विजयी झाले असून ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

      लिओ वराडकर यांनी सिमोन केव्हिने यांचा पराभाव केला. लिओ यांना शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मत मिळाली. आयर्लंडमध्ये 2007 साली झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिआश सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यानंतर ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले गेले आणि अखेर ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. सिमोन केव्हिने हे त्यांचे निटचे प्रतिस्पर्धी होते.

२ जून २०१७

महाविद्यालयात प्रवेश घेतानाच मिळणार मतदार नोंदणीचा अर्ज

      नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदविणे सोपे जावे यासाठी भारत निवडणूक आयोग 1 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहीम राबविणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्जही देण्यात येणार आहे, अशी माहिती उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी दिली.

      भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेसंदर्भात मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत वळवी यांनी माहिती दिली. यावेळी अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. वळवी म्हणाले, की राज्यात 18 ते 19 या वयोगटातील 12 लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी तसेच युवा वर्गात मतदानासंदर्भात प्रबोधन व्हावे या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे.

       महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जासोबतच नमुना-6 सुद्धा घेण्यात येणार आहे. यामुळे तरुण मतदारांना सरकारी कार्यालयात जाऊन मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

हॉटेस्ट वुमन ऑफ द इयर

      नुकत्याच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील रेड कार्पेटरवरसुद्धा दीपिकाने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. आता दीपिकाने आणखी एक नवा किताब आपल्या नावे केला आहे.  दिपीका पादुकोण हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर ठरली आहे. फॅशन मॅगजीन मॅक्सीमने दीपिकाला हा किताब दिला आहे.

     प्रसिद्ध फॅशन मॅगजीन मॅक्सीमने 100 हॉट वुमेन्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोप्रा या दोघींनी स्थान मिळवले आहे. हार्ले बाल्डबीन, इम्मा वॉट्सन, इम्मा स्टोन, दकोता जॉन्सन आणि केन्डल जेनर या अभिनेत्रींचासुद्धा मॅक्सीमच्या यादीत समावेश आहे.

      हॉटेस्ट वुमन ऑफ द इयर ठरवण्यासाठी मॅक्मीमने एक सर्व्हे केला होता आणि प्रेक्षकांना वोट करायला सांगितले होते. यामध्ये दीपिकाच्या लाखो चाहत्यांनी तिला मतदान करून पहिल्या स्थानावर आणले. दिपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मॅक्सीमच्या कव्हर पेजचा फोटो शेअर केला आहे. यात हॉटेस्ट वुमन ऑफ दि इयर म्हणून घोषीत करण्याचे तिने सांगितले आहे.

१ जून २०१७

रामचंद्र गुहांचा बीसीसीआय प्रशासकीय समितीचा राजीनामा

       ज्येष्ठ विचारवंत व प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) नेमण्यात आलेल्या चार सदस्यीय प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिला आहे.

       बीसीसीआयने लोढा समितीकडून केलेल्या शिफारशी स्वीकाराव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रशासकीय समितीची नेमणूक केली होती. ’अनुत्सुक’ बीसीसीयला या शिफारशींचा स्वीकार करण्यास ’मदत’ करणे, हे या समितीस नेमून दिलेले कार्य होते. माजी महालेखापाल विनोद राय हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये डायना एडलजी व विक्रम लिमये या अन्य दोन सदस्यांचा समावेश आहे.

        गुहा यांनी राय यांच्याकडे गेल्या 28 मे रोजी राजीनामा सोपविल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास दिली. गुहा यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणांसाठी देत असल्याचे म्हटले आहे. गुहा यांच्या राजीनाम्यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयासमोर येत्या 14 जून रोजी होणार आहे.

        बीसीसीआय व भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील ठरण्याची शक्यता असलेले काही निर्णय आता या प्रशासकीय समितीकडून घेतले जाणे अपेक्षित असतानाच गुहा यांनी हा राजीनामा दिला आहे.

बॉम्बस्फोटाने काबूल हादरले

     अफगाणिस्तानची राजधानी प्रचंड शक्तिशाली ट्रक बॉम्बस्फोटाने  हादरली. या हल्ल्यात ८० लोक ठार, तर शेकडो जखमी झाले. स्फोट झाला त्या भागात भारतासह अनेक देशांचे दूतावास आहेत. सुदैवाने भारताचा एकही कर्मचारी जखमी झाला नाही. घटनास्थळी चोहीकडे रक्तामांसाचा सडा पडला होता. स्फोट एवढा भयंकर होता की, दूरदूरपर्यंत घरे आणि इमारतींना हादरे बसून खिडक्यांच्या काचा फुटल्या. शाळकरी मुली आणि स्फोटातून बचावलेले जखमी लोक सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी धावू लागल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली.

     ढिगारे उपसून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली मृतदेह असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. आत्मघाती हल्लेखोराने झाम्बाक चौकात सकाळी साडेआठ वाजता स्फोटके लादलेल्या ट्रकचा स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. या हल्ल्यात आपला हात नसल्याचे टष्ट्वीट तालिबानने केले आहे. या हल्ल्याचा निषेध करतो, असेही या संघटनेने म्हटले. बॉम्बहल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपनेही स्वीकारलेली नाही.

      स्फोटाने जपानी दूतावासातील खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाली. फ्रान्स आणि जर्मनीच्या दूतावासांचे नुकसान झाले, जीवितहानीचे वृत्त नाही. (वृत्तसंस्था)

 

      भारतीय दूतावासापासून १०० मीटरवर हा स्फोट झाला, असे भारताचे अफगाणिस्तानातील राजदूत मनप्रीत व्होरा यांनी सांगितले. आम्ही सर्व जण सुरक्षित आहोत. स्फोट प्रचंड होता. आमच्या इमारतीसह आसपासच्या इमारतींचे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर काबूलमधील हल्ल्याचा निषेध केला आहे

राजीव गांधींनंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी पहिले पंतप्रधान

    चार देशांच्या युरोप दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल झाले. सहा दिवसांच्या दौ-यातील हा दुसरा टप्पा आहे. मोदींनी सर्वप्रथम जर्मनीला भेट देऊन चॅन्सलेर अँजेला मर्केल यांच्यासोबत चर्चा केली. स्पेन दौ-यात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करणे तसेच स्पेनबरोबरचे आर्थिक संबंध विकसित करण्याचा उद्देश आहे. स्पेनबरोबरच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी आपण इथे आलो आहोत असे मोदींनी माद्रिदमध्ये दाखल होताच इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत टि्वट करुन सांगितले. 
 
     मोदींचा हा स्पेन दौरा एका अर्थाने ऐतिहासिकच आहे. कारण 30 वर्षांनी 1988 नंतर स्पेनला भेट देणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता. स्पेनच्या अर्थमंत्र्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी दिली. 
 
      भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या स्पॅनिश उद्योगपतींबरोबरही मोदी चर्चा करणार आहेत. स्पेनचा दौरा आटोपून मोदी 1 जूनला रशियाला जातील. मोदी 18 व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेला उपस्थित असतील. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर त्यांची चर्चा होईल. त्यानंतर 2 आणि 3 जूनला पंतप्रधान फ्रान्समध्ये असतील. तिथे ते फ्रान्सचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर चर्चा करतील.
 
       जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली. मर्केल यांच्याबरोबर विविध मुद्यांवर समाधानकारक चर्चा झाल्याचे मोदींनी टि्वट करुन सांगितले. चर्चा करताना दोन्ही नेत्यांनी 18 व्या शतकातील शाही महालाच्या बगीच्यामध्येही फेरफटका मारला. 
 
       जर्मनीमध्ये पोहोचल्यानंतर हँडल्सब्लाट या जर्मन वर्तमानपत्राशी बोलताना दहशतवादाला रोखण्यात युरोपची भूमिका महत्वाची असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मागच्यावर्षीय युरोपमधल्या काही देशात दहशतवादी हल्ले झाले. अगदी अलीकडे 22 मे रोजी इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला.  
 
जर्मनी हा भारताचा युरोपमधला महत्वाचा सहकारी देश आहे. दोन्ही देशात 2016 मध्ये 17.42 अब्ज डॉलरचा व्यवहार झाला. या दौ-यात जर्मनीमधल्या छोटया आणि मध्यम उद्योग कंपन्यांना भारताच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टमध्ये जोडण्याचा मोदींचा प्रयत्न असेल. आर्थिक संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. मी या भागीदारीसाठी खूप आशावादी आहे असे मोदींनी सांगितले