Menu

Study Circle

३१ जुलै २०१७

तेजस्विनी सावंतचा अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णवेध

      तेजस्विनी सावंतने कुमार सुरेंद्रसिंग चषक अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेतील महिलांच्या 50 मीटर रायफल थ्रीपोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकले.

     तेजस्विनीने अंतिम फेरीत 454.7 गुणांची कमाई केली. हरयाणाची आदिती सिंग व पंजाबची दिलरीन गिल यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. बंगालची उदयोन्मुख खेळाडू मेहुली घोषने कनिष्ठ महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सोनेरी कामगिरी केली. तसेच तिने युवा विभागात रौप्यपदक मिळवत दुहेरी कामगिरी केली.

      चंदिगढच्या अंजम मुदगिलने महिलांच्या वरिष्ठ विभागात 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने 251.3 गुण मिळवले. मेघना सज्जनारने 248.2 गुण नोंदवत रौप्यपदक मिळवले. रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या आयोनिका पॉलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कनिष्ठ महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये जम्मू-काश्मीरच्या श्रेया सक्सेनाला प्रथम स्थान मिळाले.

उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन

       धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे ख्यातनाम गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (वय 78) यांचे अल्पशा आजारपणामुळे पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर 31 जुलै रोजी जयपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

       हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणार्‍या धृपद गायकीला समृद्ध करण्यात उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. डागर घराण्याच्या मागील 19 पिढ्यांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता.

      ते धृपद-धमार गायला बसले की, मैफल रंगून जात असे, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. देश-विदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या आहेत. अनेक शिष्यांनाही त्यांनी घडवले आहे. धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे खास कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यांच्या मागे पत्नी रिहाना, पुत्र उस्ताद नफिसुद्दीन डागर आणि उस्ताद अनिसुद्दीन डागर असा परिवार आहे.

३० जुलै २०१७

श्रेया अग्रवालची चमकदार कामगिरी

        श्रेया अग्रवाल आणि पॅरा नेमबाज स्वरुप उनाहलकर यांनी १७व्या कुमार सुरेंद्र सिंग (केएसएस) स्मृती नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आपापल्या गटात वैयक्तिक पदकाची कमाई केली.
       भारताच्या ज्युनिअर संघात समावेश असलेल्या श्रेयाने १० मीटर एअर रायफल गटात २४७.७ गुणांचा वेध घेताना मेहुली घोष सारख्या कसलेल्या खेळाडूला मागे टाकत सुवर्णपदकाचा वेध घेतला. यानंतर श्रेयाने ज्युनिअर गटातही आपली चमक दाखवताना २४९ गुणांचा वेध घेत रौप्य पदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, या वेळी तिने मेहुलीला मागे टाकत बाजी मारली.
      दुसरीकडे दिव्यांग गटामध्ये स्वरुपने १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये ६०.९.१ गुणांचा वेध घेत रौप्य पदक पटकावले.

२९ जुलै २०१७

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले तीन अंतराळवीर

       पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आता तीन अंतराळवीरांचे नवे पथक पोहोचले आहे. हे अंतराळवीर 5 महिने या स्थानकावर राहून विविध प्रयोग करतील. रशियन अंतराळ संशोधन संस्था रॉसकॉसमॉसकडून याबाबतचे फुटेजही प्रसिद्ध केले आहे.

      रशियाच्या सोयूझ यानातून हे तिघे अंतराळवीर रवाना झाले होते. त्यामध्ये नासाचा रेंडी ब्रेसनिक, रशियाचा सर्गेई रियाजॅस्की आणि युरोपियन अंतराळ संस्थेचा पाओलो नेस्पोली यांचा समावेश आहे. कझाकस्तानातील बैकानूर येथून सोयूझचे प्रक्षेपण झाले होते. 6 तासांनंतर पृथ्वीभोवती 4 प्रदक्षिणा घालून हे यान अंतराळ स्थानकावर पोहोचले. या तिघांच्या आगमनामुळे आता अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांची संख्या 6 झाली आहे. 

भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक : विशाखापट्टणम

       भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थाननक बनण्याचा मान सीमांध्रराज्यातील विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाने मिळवला आहे.

       क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेद्वारे केल्या गेलेल्या 407 रेल्वेस्थानकांच्या सर्वेक्षणानुसार विशाखापट्टणम स्वच्छतेच्या बाबतीत इतर रेल्वेस्थानकांपेक्षा पुढे आहे.

        रेल्वे फलाटांवरील स्वच्छ स्वच्छतागृहे, कचरा नसलेले रुळ, शुद्ध पाण्याची सुविधा, जागोजागी ठेवलेले कचर्‍याचे डबे, रेल्वेस्थानकाच्या परिसरात मोकळे व शुद्ध वातावरण, तंबाखू किंवा पानाच्या पिचकार्‍या नसलेले जिने व कोपरे यामुळे विशाखापट्टणमने हा बहुमान मिळवला.

         दुसरे सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद आहे. तर सर्वात गलिच्छ रेल्वे स्थानक म्हणून बिहारमधील दरभंगा रेल्वेस्थानकाचा उल्लेख संस्थेच्या अहवालात केला आहे. भारतीय रेल्वेच्या स्वच्छ रेल मोहिमेंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले.

        महाराष्ट्रातील पुणे रेल्वेस्थानकाने या अहवालात पहिल्या 10 स्वच्छ रेल्वेस्थानकांत स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी पुण्याचा क्रमांक 75 वा होता. गेली 3 वर्षे भारतीय रेल्वे ही मोहीम चालवते आहे.

जेफ बेझोस ठरले जगात सर्वात श्रीमंत

       जगातील श्रीमंताच्या यादीत अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पहिले स्थान पटकावले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकले आहे.

     ब्लूम्बर्ग आणि फोर्ब्स या माध्यम संस्थांनी अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीच्या समभागात 1.7 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने बेझोस हे प्रथमस्थानी जाणे सहजशक्य झाले आहे. कंपनीच्या समभागात वाढ झाल्याने बेझोस यांच्या संपत्तीत तब्बल 1.4 अब्ज डॉलर वाढ झाली. मागील 4 महिन्यांत कंपनीच्या समभागात सुमारे 24 टक्के वाढ झाली आहे. बेझोस यांची एकूण संपत्ती 90.5 अब्ज डॉलर आहे.

        मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे अब्जाधीशांच्या यादीत मे 2013 पासून अग्रस्थानी होते. त्यांच्यानंतर बेझोस यांचा क्रमांक लागत होता. आता बेझोस यांनी गेट्स यांना मागे टाकले आहे. गेट्स यांची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे.

       बेझोस हे अ‍ॅमेझॉनचे सहसंस्थापक असून, कंपनीचे 17 टक्के समभाग त्यांच्याकडे आहेत. अ‍ॅमेझॉन या ई-रिटेल कंपनीने अ‍ॅमेझॉन प्राइम ही व्हिडिओ सेवाही सुरू केली आहे. यासोबत कंपनीने ग्रोसरी चेन, क्लाउड कॉम्प्युटिंग, कॉम्प्युटिंग हार्डवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातही प्रवेश केला आहे. बेझोस यांची सर्वांत मोठी गुंतवणूक अ‍ॅमेझॉनमध्ये असून, त्यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन ही खासगी अवकाश संस्था आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राची मालकीही त्यांच्याकडेच आहे.

        फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, गेट्स हे यादीत मागील 4 वर्षे प्रथम होते. यादी सुरू झाल्यापासून 22 पैकी 18 वर्षे गेट्स यांनी यादीत पहिले स्थान कायम ठेवले होते. मेक्सिको दूरसंचार क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक कार्लोस स्लिम 2010 ते 2013 या काळात यादीत पहिले स्थान पटकावत गेट्स यांना मागे टाकले होते.

२८ जुलै २०१७

सिंधूची उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती

       रिओ ऑलिम्पिक रौप्य पदकविजेती पीव्ही सिंधूची राजपत्रित पदावर अधिकारी (गट अ) म्हणून नियुक्ती केली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः पीव्ही सिंधूला सचिवालयात आमंत्रित करून गौरवले आणि उपजिल्हाधिकारी पदाचे नियुक्ती पत्र दिले.

      मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देत सिंधू सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ही माहिती शेअर करताना, पीव्ही सिंधूची गट-अ दर्जाच्या पदावर नियुक्ती केली असून तिला अधिकृतरीत्या नियुक्तीचे पत्र बहाल केले. सिंधू ही देशासाठी एक आदर्श असून तिच्या पुढील वाटचालीत यशाची अनेक शिखरे ती लीलया पार करेल. अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

     मुख्यमंत्र्यांच्या ट्वीवर सिंधूने प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले असून मी देशवासीयांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत राहीन, असे म्हटले आहे.

       दरम्यान, नुकत्याच संपलेल्या आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार्‍या मिताली राजच्या कामगिरीची दखल घेत तिला रेल्वे मंत्रालयाने दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्यालय हैदराबाद (एसएसआर) मध्ये ओएसडी (क्रीडा) म्हणून नियुक्त केले आहे. हे पद गट ब दर्जाचे आहे.

       इंग्लंडमध्ये लॉर्डसच्या मैदानावर विश्‍वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारताला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र एकूण स्पर्धेचा विचार करता भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे या संघातील खेळाडूंची विविध क्षेत्रात नियुक्ती केली जात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंग यांचे निधन

      राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धरमसिंग नारायसिंग ऊर्फ एन. धरमसिंग यांचे वयाच्या 80 व्या वर्षी बंगळूर येथील एम. एस. रामय्या इस्पितळामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

      राज्याचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2004 ते 2006 पर्यंत कामकाज पाहिले होते. गुलबर्गा जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यामधील नेलोगी गावात 1936 साली त्यांचा जन्म झाला. बिदर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 7 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले असून एकवेळ त्यांनी खासदार म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. 

२७ जुलै २०१७

प्रेरणादायी कलाम स्मारकाचे मोदींकडून अनावरण

      दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभालेल्या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनी केले. कलाम यांच्या पैकरांबु या मूळ गावी येथे हे स्मारक बांधले आहे. कलाम 2002 ते 2007 या काळात भारताचे राष्ट्रपती होते.

     स्मृतीस्थळी कलाम यांच्या समाधीवर फुले वाहून मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. स्मारकाच्या प्रवेशद्वारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम तिरंगा फडकाविला. कलाम यांचे थोरले बंधू ए. पी. जे. महमद मुथुमिरान मरायकायर व अन्य नातेवाईकांची भेट घेतली. या स्मारकाचे प्रवेशद्वार इंडिया गेटच्या धर्तीवर तयार केले आहे. स्मारकाच्या मागील भागात राष्ट्रपती भवनाच्या प्रतिमा उभारली आहे. मोदी यांच्यासह तमिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, केंद्रिय मंत्री राधाकृष्णन, निर्मला सीतारामन व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू उपस्थित होते. यावेळी लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. कलाम यांच्या कार्याचा गौरव करणारे फलक त्यांनी हातात घेतले होते.

        लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) व केंद्र सरकारच्या अन्य खात्यांनी हे वैशिष्टपूर्ण स्मृतीस्थळ बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. तमिळनाडू सरकारने पैकरांबु येथे दिलेल्या जमिनीवर हे स्मारक 15 कोटी रुपये खर्चून बांधले आहे. विविधतेत एकता या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात अग्नी क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारल्या आहेत पंतप्रधानांनी त्या आवर्जून पाहिल्या व त्याची माहिती घेतली. तसेच डॉ. कलाम यांचा वीणा वाजवितानाच्या रूपातील पुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. असून यात कलाम यांचा ब्राँझचा पुतळा व शास्त्रज्ञ व राष्ट्रपती काळातील त्यांची 900 चित्रे व 200 दुर्मिळ छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

मिश्र रिले मिडलेत अमेरिकेचा विश्वविक्रम

       अमेरिकेच्या मिश्र संघाने जागतिक जलतरण स्पर्धेत 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत विश्‍व विक्रमी वेळ नोंदवली. अमेरिकेच्या ली किंग हिने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक, कॅनडाच्या कायली मॅस्से हिने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत विश्‍वविक्रमी वेळ दिली.

       अमेरिकेच्या रायन मरफी, केविन कॉर्डेस, केल्सेई वॉरेल, मॅलोरी कॉमेरफोर्ड यांनी 3 मि. 40.28 सेकंद अशी वेळ दिली. यापूर्वी 3 मि. 41.71 सेकंदाचा विक्रम ब्रिटनच्या नावावर होता.

       मिश्र रिले शर्यत जागतिक स्पर्धेत होण्याची ही केवळ दुसरीच स्पर्धा होती. अमेरिकेच्या संघाने पात्रता फेरीतच हा विक्रम केला. त्यामुळे आता होणार्‍या अंतिम फेरीत हा विक्रम पुन्हा मोडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेसह ऑस्ट्रलिया, ब्रिटन आणि कॅनडा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेतील हा सहा विश्‍व विक्रम ठरला. ब्रिटनच्या अ‍ॅडम पिटीने 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात अंतिम फेरीपूर्वी दोनदा विश्‍वविक्रमी वेळ दिली. त्यामुळे अंतिम फेरीत अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

        अमेरिकेच्या लीग किंग हिने महिलांची 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यत विश्‍वविक्रमी वेळेसह जिंकली. ऑलिंपिक चँपियन लीली किंग हिने 1 मि. 4.13 सेकंद अशा वेळेसह 4 वर्षांपूर्वीचा लिथुआनियाच्या रुता मेईलुटिटे हिचा विक्रम मोडीत काढला.

        कॅनडाच्या कायली मॅस्से हिने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात 58.10 सेकंद अशा विश्‍व विक्रमी वेळेसह सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती कॅनडाची पहिली महिला जलतरणपटू ठरली. यापूर्वीचा विक्रम ब्रिटनच्या गेम्मा स्पॉफॉर्थ (58.12 सेकंद) हिने 2009 मध्ये नोंदवला होता. ऑस्ट्रेलियाची एमिली सीबोम सुवर्णपदक राखण्यात अपयशी ठरली.

गुजरातमध्ये अतिवृष्टी

      गुजरात, राजस्थान आणि पश्‍चिम बंगालसह देशातील अनेक भागांत पावसाने गेल्या चोवीस तासांत जोरदार हजेरी लावली. गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये गेल्या चोवीस तासांत 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शहरातील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले आहे. तसेच, गांधीनगर परिसरात अतिवृष्टी झाली असून, चोवीस तासांत तीनशेहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

       अहमदाबाद शहरातील जनजीवन संपूर्णपणे कोलमडून पडले असून, शाळा- कॉलेज, खासगी क्‍लासेसना सुटी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक ठप्प पडली असून, सरकारी कार्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. रस्त्यावरच पाणी साचल्यामुळे चारचाकी, दुचाकी गाड्या निम्म्या पाण्यात बुडाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, राज्यातील पावसाच्या बळींची संख्या 123 वर पोचली आहे. गांधीनगरच्या कालोल तहसीलअंतर्गत चोवीस तासांत 370 मिलिमीटर पाऊस पडला असून, त्यात आज सकाळी अवघ्या चार तासांत पडलेल्या तब्बल 240 मिलिमीटर पावसाचा समावेश आहे.

      अहमदाबाद शहरात पाण्याची पातळी एवढ्या प्रमाणात वाढली, की घर, दुकाने, मंदिरांसह सर्व सखल भागांत पाणी शिरले. संपूर्ण शहर जलमय झाले असून, रस्त्यावरून वाहने कशीबशी मार्ग काढत जात असल्याचे चित्र आहे. अहमदाबाद येथे काल रात्रीपासून जोरात पाऊस पडत असून, गेल्या चोवीस तासांत सुमारे 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रस्त्यावर वाहने उभी असून, घरासमोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे घराबाहेर पडणेही मुश्‍कील झाले आहे. दूध, भाजीपाला आणण्यासाठी नागरिकांना बरीच कसरत करावी लागत आहे.

        दरम्यान, बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगात सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि दंतेवाडा आणि सिपू धरणातून काही दिवसांपूर्वी बनास व सिपू नदीचे पाणी सोडल्यामुळे बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यातील अनेक खेड्यांत पूर आला आहे. बनासकांठा येथे पुरामुळे एकाच कुटुंबातील चौदा जणांसह 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

नितीश कुमार सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री

     लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

     बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांच्या पाठोपाठ त्यांचे आतापर्यंतचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे या समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या 'अंतरात्म्याचा आवाज' ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला.

     महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावरील नवे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

      भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राजभवनाला तसे पत्र पाठविण्यात आले. संयुक्त जनता दलालाही याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. नितीशकुमार यांनी मध्यरात्री राज्यपालांची भेट घेऊन भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला.

२६ जुलै २०१७

वेटलिफ्टिंगमध्ये ओर्मिला देवीला तीन सुवर्ण

     कोनसाम ओर्मिला देवीने आशियाई कुमार व युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. तिने हा पराक्रम युवा गटातील 44 किलो वजनी गटात केला. ओर्मिलाने स्नॅचमध्ये 55 किलो, क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 72 किलो व एकूण 127 किलो वजन उचलून बाजी मारली.

        वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच, क्लीन अ‍ॅण्ड जर्क, तसेच एकूण वजन धरून क्रमवारी निश्‍चित होते. या स्पर्धेतील 48 किलो वजनी गटात दलबेहेरा झिलील तीनही प्रकारांत पाचवी आली. तिने एकंदर 158 किलो (69 व 89) वजन पेलले. थायलंडच्या तीरापात चॉमचेऊन याने युवकांच्या 50 किलो गटात जागतिक विक्रम करताना क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 127 किलो वजन उचलले.

कारगिल विजय दिन

      कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या फौजांचे सामर्थ्य आणि देशासाठीचा त्याग यांचे स्मरण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. 

    कारगिल येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारताने विजय मिळविला होता. हा विजय दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. 
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, "देशाच्या अस्मितेसाठी आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारगिल युद्धात प्राणपणाने लढलेल्या शूर जवानांची आठवण येते. देशाच्या लष्करी सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. देशाला अत्यंत सुरक्षित ठेवणाऱ्या लष्करी फौजांच्या महान त्यागाची आठवण हा दिवस करून देतो."

ग्रॅंड स्लॅम विजेते रोझ यांचे निधन

      ऑस्ट्रेलियाचे दोन ग्रॅंड स्लॅम आणि डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा विजेते माजी खेळाडू मर्विन रोझ यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. डाव्या हाताने खेळणाऱ्या रोझ यांनी १९५४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि १९५८ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. याखेरीज त्यांनी दुहेरीत पाच ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत. ऑस्ट्रेलियाने १९५१ आणि ५७ मध्ये विजेतेपद मिळविलेल्या डेव्हिस करंडक संघाचेही ते सदस्य होते. निवृत्तीनंतर त्यांनी मार्गारेट कोर्ट, बिली जिन किंग आणि अरांता सॅंचेझ व्हिकारियो याटेनिसपटूंना मार्गदर्शन केले होते.

२५ जुलै २०१७

अल्फाबेटच्या संचालकपदी सुंदर पिचाई यांची निवड

    गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या संचालक मंडळावर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती केली आहे. याविषयी अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज म्हणाले, ”गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुंदर पिचाई चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची वाढ होत असून, नावीन्यपूर्ण उत्पादनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ते अल्फाबेटच्या संचालक मंडळावर आल्याने त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्साही आहे.”

     भारतीय वंशाचे 45 वर्षीय पिचाई हे मूळचे चेन्नईमधील आहेत. आयआयटी खड्गपूरमधून त्यांनी पदवी मिळविली असून, मागील 2 वर्षांपासून ते गुगलची धुरा सांभाळत आहेत.

     पिचाई यांची कंपनीमध्ये 2004 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांनी 2014 मध्ये कंपनीतील उत्पादन, अभियांत्रिकी आणि संशोधन विभागांचा ताबा त्यांच्याकडे घेतला. कंपनीचे यूजर एक अब्जाहून अधिक वाढविण्यात त्यांनी योगदान दिले आहे. जाहिरातींचे उत्पन्न आणि यूट्यूबमधील व्यवसाय वाढविण्यास त्यांनी हातभार लावला आहे. गुगलमधील उत्पादनांचा विकास आणि तंत्रज्ञानविषयक धोरण याची जबाबदारी पिचाई यांच्यावर आहे.

प्रणॉयचे ग्रां.प्रि. गोल्ड विजेतेपद

     हसीना सुनीलकुमार प्रणॉयने अखेर विजेतेपदांचा दुष्काळ संपवला. त्याने अमेरिकन ओपन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकताना त्याचाच सरावातील सहकारी पारुपली कश्‍यपला तीन गेमच्या रंगतदार लढतीत पराजित केले. 

      ॲनाहेईम (कॅलिफोर्निया) येथे झालेल्या या स्पर्धेतील निर्णायक लढतीत प्रणॉयने २१-१५, २०-२२, २१-१२ असा विजय मिळवताना शटलवर जबरदस्त नियंत्रण राखले. त्याने तंदुरुस्तीतही आपण खूपच वरचढ आहोत, हे ६५ मिनिटे रंगलेल्या लढतीत दाखवले. सुपर सीरिजच्या तुलनेत ग्रां.प्रि. स्पर्धेचा दर्जा खालचा आहे; पण प्रणॉयचा खेळ अव्वल दर्जाचाच होता. कश्‍यप आणि प्रणॉय यांच्यात अनेक सरावाच्या लढती झाल्या असल्या, तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धातील ही तिसरीच लढत होती. 

        यापूर्वीची लढत तीन वर्षांपूर्वी झाली होती. त्यात प्रणॉयने दोन गेममध्येच बाजी मारली होती. त्याचबरोबर दोघांच्या जागतिक क्रमवारीतही खूपच अंतर आहे. प्रणॉय २३ वा आहे; तर कश्‍यप ५९ वा. कश्‍यपची खरी ताकद प्रणॉय जाणून होता. 

        कश्‍यपने ७-१ अशी झटपट सुरवात केली खरी; पण रॅली लांबण्यास सुरवात झाल्यावर प्रणॉयची हुकमत दिसू लागली. १२-१२ बरोबरीनंतर पहिल्या गेममध्ये प्रणॉयने तीनच गुण गमावले. दुसऱ्या गेममध्ये कश्‍यपने जोरदार प्रतिकार करीत १४-९ आघाडी घेतली; पण प्रणॉयने १५-१५ बरोबरी साधली. कश्‍यपने हा गेम जिंकण्यासाठी सर्वस्व पणास लावले; पण त्यामुळे प्रणॉयसाठी तिसरा गेम सोपा झाला. त्याने ३-०, ७-३, ११-७ अशी आघाडी वाढवत विजय निश्‍चित केला. 

यश प्रणॉयचे
प्रणॉयचे तिसरे ग्रां.प्रि. गोल्ड विजेतेपद
यापूर्वी २०१४ मध्ये इंडोनेशियन मास्टर्स; तर गतवर्षी स्विस ओपन
इंडोनेशियन ओपनची उपांत्य फेरी ही त्याची यंदाची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी होती

मिताली आयसीसी महिला विश्वकप संघाच्या कर्णधारपदी

     भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला आपल्या संघाला आयसीसी महिला विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावून देता आले नाही, मात्र, या स्टार महिला फलंदाजाची या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आयसीसी पॅनलने निवडलेल्या आयसीसी महिला विश्वकप 2017 च्या संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे.   

      आयसीसीने 12 सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यात उपांत्य फेरीत 171 धावांची शानदार खेळी करणारी अष्टपैलू हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. या संघात चॅम्पियन इंग्लंडचे पाच, दक्षिण आफ्रिकेचे तीन आणि ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूला स्थान मिळाले आहे. 
       हैदराबादची खेळाडू असलेल्या 34 वर्षीय मितालीने स्पर्धेत संघाचे शानदार नेतृत्व केले आणि 409 धावा फटकावल्या. मितालीने संघाला 12 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठून दिली. अंतिम लढतीत भारताला इंग्लंडविरुद्ध 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 
       मितालीने उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या साखळीतील न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत सर्वोत्तम कामगिरी केली. त्या लढतीत तिने 109 धावांची खेळी केली. स्पर्धेदरम्यान मितालीने वन-डे क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला फलंदाज ठरली. मितालीची दुसºयांदा विश्वकपच्या सर्वोत्तम संघात निवड झाली आहे. यापूर्वी 2009 मध्ये तिची या संघात वर्णी लागली होती. हरमनप्रीतने स्पर्धेत 359 धावा केल्या आणि 5 बळी घेतले तर दीप्ती शर्माने 216 धावा फटकाविताना 12 बळी घेतले. 
      या संघाची निवड पाच सदस्यांच्या समितीने केली. त्यात आयसीसीचे महाव्यवस्थापक (क्रिकेट) ज्योफ अलारडाइस, विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप, इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्डस्, माजी भारतीय कर्णधार व सध्या पत्रकार असलेली स्नेहल प्रधान व ऑस्ट्रेलियाची माजी अष्टपैलू लिसा स्थळेकर यांचा समावेश होता. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल कालवश

     ज्येष्ठ शास्त्रज्ञ  प्रा. यशपाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. प्रा. यशपाल यांच्या कार्याची दखल घेत 1976 साली पद्मभूषण व 2013 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 1983-1984 दरम्यान ते योजना आयोगाचे मुख्य सल्लागार होते.

      1986 ते 1991 पर्यंत त्यांनी यूसीजीचे अध्यक्षपद भूषवले आहे. तर 2007 पासून 2012 पर्यंत प्रा. यशपाल जेएनयूच्या कुलपतीपदी होते. शिवाय दूरदर्शनवरील विज्ञानासंबंधी कार्यक्रम 'टर्निंग पॉईंट'चे त्यांनी सूत्रसंचालन केले आहे. 

      यशपाल यांनी पंजाब विद्यापीठातून 1949 साली भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर 1958 साली मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएच.डीही मिळवली होती. वैज्ञानिक तथ्ये आणि त्यांची प्रक्रिया सोप्या शब्दांत त्यांनी मांडल्या. त्यांनी अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्य केले आहे.

२४ जुलै २०१७

ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी अध्यक्ष यू. आर. राव यांचे निधन

     आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अवकाश संशोधक व भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष यू. आर. राव यांचे निधन झाले. इस्रो वतीने विविध प्रक्षेपणांमध्ये त्यांनी विविध माध्यमांतून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते 85 वर्षांचे होते.

      भौतिक संशोधनातील सर्वोच्च संस्था असलेल्या इस्रोच्या शासकीय समितीचे अध्यक्ष म्हणून राव कार्यरत होते. तसेच, ते तिरुअनंतपुरम येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरूही होते.

       मागील अनेक वर्षे त्यांनी विविध संस्थांच्या सर्वोच्च पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. विदेशी विद्यापीठांमध्येही त्यांनी काम केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील 10 पुरस्कार आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले होते.

पासपोर्टसाठी जन्माचा दाखला गरजेचा नाही

     पासपोर्ट काढण्यासाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक राहणार नाही. भारतीय नागरिकांसाठी पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून जन्म तारखेचा पुरावा म्हणून या पुढे आधार किंवा पॅन कार्डही ग्राह्य धरले जाईल असे सरकारने स्पष्ट केले.

     पासपोर्ट नियमावली 1980 नुसार 26 जानेवारी 1989 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या व्यक्तींना जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला दाखवणे बंधनकारक आहे. जन्माच्या दाखल्याची एक प्रत पासपोर्टसाठीच्या अर्जासोबत जोडावी लागते. मात्र या नियमात आता बदल केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी संसदेत नव्या नियमाविषयी माहिती दिली. पासपोर्टची प्रक्रीय सहज सोपी करण्यासाठी आता जन्म तारखेचा पुरावा म्हणून आधार किंवा पॅन कार्ड वापरता येणार आहे. सरकारी कर्मचार्‍यांना सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्डही सादर करता येईल. देशातील कोट्यवधी जनतेला पासपोर्ट काढणे सोपे व्हावे यासाठी नियमात बदल केल्याचे त्यांनी संसदेत सांगितले.

     60 वर्षांवरील आणि 8 वर्षांखालील अर्जदारांना पासपोर्ट शुल्कात 10 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करणार्‍यांना पालकांपैकी फक्त एकाचे नाव द्यावे लागणार आहे. यामुळे सिंगल पॅरेंट्सना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय घटस्फोट झालेला असल्यास त्याची प्रत किंवा दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्रही पासपोर्टसाठी अर्ज करताना सादर करावे लागणार नाही. अनाथ मुलांना अनाथालयातून जन्म तारखेचा पुरावा म्हणून एक प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

      काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनाही पासपोर्टसंदर्भात एक नवीन अ‍ॅप लाँच करणार असल्याचे जाहीर केले होते. पासपोर्टसाठी अर्ज केल्यावर पोलीस पडताळणी ही महत्त्वाची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया सहज सोपी करण्यासाठी अ‍ॅप तयार केले आहे. ऑगस्टपर्यंत हे अ‍ॅप मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये सुरू होईल.

सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्षपदी आदेश बांदेकर यांची नियुक्ती

      सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले बांदेकर यांचे नाव ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुचवले होते.

      शिर्डी आणि पंढरपूर संस्थांचे अध्यक्षपद युतीमध्ये भाजपाकडे असून, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेच्या कोट्यात आहे. भाजपा-शिवसेना आघाडीचे सरकार येऊन पावणेतीन वर्षे झाली, तरी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेला काही कायदेशीर अडचणींमुळे मिळू शकलेले नव्हते. बांदेकर यांच्या नियुक्तीने तो मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वे स्थानकात मिळणार स्वस्तामध्ये शुद्ध पाणी

    भारतीय रेल्वेची इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ही कंपनी येत्या वर्षभरात देशभरातील 450 रेल्वे स्थानकांमध्ये स्वस्तात शुद्ध पाणी विकण्याची 1100 यंत्रे सुरु करणार आहे. येथे 1 रुपयाला 1 ग्लास पाणी मिळेल.

    सध्या 345 रेल्वे स्थानकांवर अशी पाणी विकण्याची 1,106 यंत्रे आहेत. नव्या स्टॉल्समुळे प्रवाशांना दिवसाचे 24 तास शुद्ध पाणी मिळेल व सुमारे 2,000 नवे रोजगारही उपलब्ध होतील. या यंत्राव्दारे 1 रुपयात 300 मिली पाणी मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, या माध्यमातून स्वस्तात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्वस्तात स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 2015 मध्ये यंत्रातून पाणी देण्याची योजना सुरु करण्यात आली. यात रिव्हर्स ओसमोसिस (आरओ) पद्धतीने शुद्ध पाणी मिळते. ही यंत्रे स्वयंचलित आहेत.

ईएमआय भरू न शकणा-र्यांसाठी आता नवा कायदा

      आर्थिक कारणांमुळे ईएमआय भरू न शकणार्‍या ग्राहकांना कर्जाच्या आर्थिक संकटातून बाहेर काढणारा नवीन कायदा केंद्र सरकार लवकरच आणणार आहे. हा कायदा ग्राहकांच्या हिताचाच असणार आहे. कर्जाची रक्कम भरता न येणार्‍यांना एकरकमी रक्कम भरण्याऐवजी कर्जाचे हफ्ते बांधून देण्याचा नवा नियम या कायद्यान्वये करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सागितले. त्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदार, लघू उद्योजक, शेतकरी आणि वैयक्तिक कर्ज घेणार्‍यांना या नव्या कायद्याचा फायदाच होणार आहे.

      ईएमआयची रक्कम न भरल्यास ग्राहकाला दिवाळखोर जाहीर केले जायचे. तसे होऊ नये म्हणून हा कायदा तयार करण्यात येत आहे. ईएमआय न भरणे हा सामाजिक कलंकाचाही भाग आहे. या कारणास्तव ग्राहक दंड भरायला उत्सूक होत नाहीत. त्यामुळे लोकांचे आयुष्य पुन्हा रूळावर आणण्यासाठी त्यांना संधी द्यायला हवी, असे लॉ फर्म केसर दास बी अँड असोसिएट्सचे सुमंत बत्रा यांनी सांगितले.

       वैयक्तिक दिवाळखोरीबाबतचे नियम 100 वर्षापूर्वीच बनलेले आहेत. परंतु त्यांचा वापर गेल्या काही दशकांपासून सुरू करण्यात आलेला आहे. यातील बरीच प्रकरणे जिल्हा न्यायाधीशांच्या अंतर्गत येतात. गेल्यावर्षी संसदेत आयबीसी कायदा मंजूर करण्यात आला. त्यात ग्राहकांना दिवाळखोर घोषित करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र त्याची कारवाई अजूनही कार्पोरेट सेक्टर आणि स्टार्ट अप्सपर्यंत मर्यादीत ठेवण्यात आली आहे. यापार्श्‍वभूमीवर लोकांना कर्जाच्या संकटातून बाहेर काढता यावे आणि त्यांना कर्ज फेडणेही सोयीस्कर व्हावे, असा कायदा बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्ज फेडण्याची प्रक्रिया मानवतावादी बनविण्यावर या कायद्यात भर देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

२३ जुलै २०१७

इराक, अफगाणिस्ताननंतर दहशतवादाचा सर्वाधिक फटका भारतास

    अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या अहवालामध्ये 2016 मध्ये इराक व अफगाणिस्तान या देशांनंतर भारतास दहशतवादाचा सर्वांत अधिक फटका बसल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. या यादीमध्ये याआधी पाकिस्तान तिसर्‍या क्रमांकावर होता.

        या अहवालानुसार 2016 या वर्षात जगभरात 11,702 दहशतवादी हल्ले झाले. यांमधील तब्बल 927 हल्ले भारतात घडविण्यात आले. 2015 मध्ये भारतात 798 दहशतवादी हल्ले झाले होते. 2016 मध्ये हे प्रमाण 16 टक्क्यांनी वाढले आहे. भारतात दहशतवादामुळे होणार्‍या मृत्युंमध्येही वाढ झाली आहे. 2015 मध्ये देशात दहशतवादामुळे 289 मृत्यू झाले, 2016 मध्ये हा आकडा 337 इतका झाला. याचबरोबर दहशतवादी हल्ल्यांत 2015 मध्ये 500 भारतीय जखमी झाले, तर 2016 मध्ये हीच संख्या 636 पर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले आहे. या उलट पाकिस्तानमध्ये 2015 च्या तुलनेमध्ये 2016 त दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण तब्बल 27 टक्क्यांनी घटले आहे. 2015 मध्ये 1010 दहशतवादी हल्ले घडविलेल्या पाकिस्तानमध्ये 2016 त 734 दहशतवादी हल्ले झाले.

         इस्लामिक स्टेट (इसिस) व तालिबान या दहशतवादी संघटनांनंतर भारतातील नक्षलवादी हे तिसरे सर्वांत धोकादायक दहशतवादी असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. भारतातील नक्षलवाद्यांनी हिंसाचाराच्या या स्पर्धेत बोको हराम या दहशतवादी संघटनेसही मागे टाकले आहे. देशात गेल्या वर्षी (2016) घडविलेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांतील 336 हल्ले नक्षलवाद्यांनी घडविले होते व यामध्ये 174 नागरिक मृत्युमुखी पडले. तसेच, नक्षलवाद्यांच्याच्या हल्ल्यात 141 नागरिक जखमी झाल्याचेही आढळले आहे. या काळात देशात घडविण्यात आलेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांच्या 50 टक्क्यांपेक्षाही जास्त हल्ले जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर व झारखंड या चार राज्यांमध्येच घडविण्यात आले आहेत.

       जुलै 2016 मध्ये नक्षलवाद्यांनी बिहारमध्ये घडविलेला हल्ला, हा 2016 मधील सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला होता, असे निरीक्षण या अहवालामध्ये नोंदविले आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांसह 16 जण मृत्युमुखी पडले होते. किंबहुना, भारतातील एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी तब्बल सुमारे दोन तृतीयांश हल्ले नक्षलवाद्यांकडून घडविण्यात आले आहेत. याचबरोबर इतर कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडविणार्‍या दहशतवादी गटांमध्ये जास्त वैविध्य असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. भारतात दहशतवादी हल्ले घडविणार्‍या संघटनांची संख्या तब्बल 52 झाली आहे. ही संख्या 2015 मध्ये 45 इतकी होती.

        जम्मू-काश्मीर राज्यातील दहशतवादी हल्ल्यांतही 2015 च्या तुलनेमध्ये तब्बल 93% वाढ झाल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. यासंदर्भात भारतीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीर राज्यातील दहशतवादी हल्ल्यांत 54.81% इतकीच वाढ झाल्याचे म्हटले आहे.

       जगामध्ये घडविण्यात आलेले दहशतवादी हल्ले व त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या, या दोन्हींत 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये अनुक्रमे 9 व 13 टक्क्यांनी घट झाल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. 

      अफगाणिस्तान, सीरिया, नायजेरिया, पाकिस्तान आणि येमेन या देशांमध्ये दहशतवादी हल्ले तुलनात्मकदृष्ट्या कमी झाल्याने हे प्रमाण घटल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

थ्रीडी प्रिंटिंगने बनवले सिलिकॉनचे हृदय

     स्विस संशोधकांनी थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने खर्‍या हृदयासारखेच दिसणारे सिलिकॉनचे हृदय बनवले आहे. ते खर्‍या हृदयासारखेच धडकते. हे कृत्रिम हृदय केवळ दिसण्यातच नव्हे, तर कार्यातही नैसर्गिक हृदयासारखेच आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

    या कृत्रिम हृदयाच्या निर्मितीमुळे आता भविष्यात हृदय प्रत्यारोपणासाठी दात्यांची गरज भासणार नाही. हृदयविकारामुळे जगभरात अनेक लोकांचा मृत्यू होत असतो. दरवर्षी सुमारे 1.73 कोटी लोकांना हृदयविकार होतो. हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी दातेही मिळत नाहीत. त्यामुळे आता कृत्रिम हृदय हाच मार्ग शिल्लक राहिलेला आहे. त्यादृष्टीने नवी नवी संशोधने होत आहेत. आताही जे कृत्रिम हृदय बनवले आहे ते 3,000 वेळा धडकल्यानंतर बंद झाले. याचा अर्थ ते 35 ते 45 मिनिटेच कार्यरत राहू शकते. स्वित्झर्लंडच्या ज्यूरिखमधील ईटीएचचे संशोधक आता त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निकोलस कोहर्स या संशोधकाने सांगितले, आम्ही एक असे कृत्रिम हृदय बनवू इच्छितो जे सर्वसाधारणपणे आकाराने व कार्याने खर्‍या हृदयासारखेच असेल आणि ते दीर्घकाळ कार्यरत राहील. हे कृत्रिम हृदय 90 ग्रॅम वजनाचे आहे.

शरदला रौप्य तर वरुणला ब्राँझपदक

    जागतिक अपंग मैदानी स्पर्धेत भारताने उंच उडी प्रकारात दोन पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या टी-४२ या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य; तर वरुण भाटीने ब्राँझपदकाची कमाई केली. 

     शरदने कारकिर्दीमधील सर्वोच्च कामगिरी करताना १.८४ मीटर उडी मारली. सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमेरिकेच्या सॅम ग्वेवेपेक्षा त्याची उडी फक्त दशांश दान मीटरने कमी पडली. वरुणनेदेखील १.७७ मीटर उडी मारताना ब्राँझपदकाची कमाई केली. रौप्य कामगिरीनंतर शरद म्हणाला, ‘‘मी येथे सुवर्णपदक मिळविण्यासाठीच आलो होतो. माझे प्रयत्न थोडे कमी पडले. रौप्यपदक मिळविल्याचाही आनंद आहेच.’’ वरुणनेदेखील पदक मिळविल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र, आपण सर्वोत्तम कामगिरी दाखवू शकलो नाही, याची खंत त्याने व्यक्त केली. 

      स्पर्धेच्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने वातावरण थंड झाले होते. उडी मारण्यासाठी हे वातावरण चांगले होते, अशी प्रतिक्रिया शरदने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘हवामानात चांगलाच थंडपणा आला होता. उडी मारण्यासाठी अत्यंत अनुकूल असेच हे वातावरण होते. पण मी एका पायाने उडी मारणारा खेळाडू असल्यामुळे मला तोटा झाला. पावसामुळे मी ज्या पायाने उडी मारतो, तेथील ट्रॅक घसरडा झाला होता. त्याचा निश्‍चित कामगिरीवर परिणाम झाला.’’
      भारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाच पदके मिळविली आहेत. सरदारसिंग गुर्जर याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना भारताचे खाते उघडले. त्यानंतर दोन दिवसांनी अमित सरोहाने क्‍लब एफ-५१ प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर थाळीफेक प्रकारात कमलज्योती दलाल हिने ब्राँझपदकाची कमाई केली.

२२ जुलै २०१७

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी पेन्शन योजना

      केंद्र सरकारतर्फे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी अर्थात सीनियर सिटिझनसाठी प्रधानमंत्री व्यय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) या नावाने नवी पेन्शन योजना कार्यरत करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी योजनेचे लोकार्पण केले.

     लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनअर्थात एलआयसीच्या सहकार्याने राबवण्यात येणार्‍या या योजनेमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारे सहभागी होता येणार आहे. या नव्या योजनेमध्ये 10 वर्षांपर्यंत दरवर्षी 8 टक्के दराने व्याजासह दरमहा पेन्शनची रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेनुसार दर वर्षी किमान 60,000 रुपये (अर्थात दरमहा किमान 5,000 रुपये) पेन्शन मिळणार आहे. 60,000 रुपयांच्या वार्षिक पेन्शनसाठी संबंधितांना 7,22,000,890 रुपये एकरकमी जमा करावे लागणार आहेत. योजनेअंतर्गत दरवर्षी किमान 12,000 रुपये अर्थात दरमहा 1,000 रुपये पेन्शन प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, त्यासाठी 1,44,000,578 रुपये एकरकमी जमा करावे लागणार आहेत.

      ही पेन्शन योजना 10 वर्षांसाठी असणार आहे. एकदा पेन्शन योजनेची निवड केल्यानंतर पुढील 10 वर्षे संबंधित व्यक्ती पेन्शन प्राप्त करू शकणार आहे. योजनेसाठी 60 वर्षांपुढील कुणीही ज्येष्ठ नागरिक पात्र ठरणार आहे.

योजना -

*   योजनेत सहभागी झाल्यानंतर 60 वर्षे वयाची व्यक्ती पुढील 10 वर्षे जिवंत राहिल्यास पेन्शन रकमेबरोबरच योजनेतील एकूण रक्कम दरमहा हप्त्यांमध्ये परत मिळेल.

*   योजना पूर्ण होण्यापूर्वीच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास उर्वरित रक्कम पेन्शनच्या किमतीसह वारसदाराकडे सुपूर्त केली जाईल.

*   योजनेंतर्गत दरमहा, दर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने पेन्शन दिले जाणार आहे.

*   पेन्शनर किंवा त्यांची वृद्ध पत्नी गंभीर आजारी पडल्यास संबंधित व्यक्ती योजनेतून मुदतीपूर्वी रक्कम कधीही काढू शकतो. मात्र, त्यावेळी त्याला खरेदी किमतीच्या 98 टक्के रक्कम परत मिळेल.

*   60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना या योजनेची खरेदी 3 मे 2018 पर्यंत करता येणार आहे.

*   योजनेला जीएसटीतून मुक्त केले आहे. पेन्शन घेतल्यानंतर 3 वर्षांनी कोणत्याही अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी खरेदी मूल्याच्या 75 टक्क्यांइतकी रक्कम कर्जाऊ मिळण्याची सोयही केली आहे.

योजना एका दृष्टिक्षेपात (आकडे रुपयांत) -

कालावधी      किमान गुंतवणूक      कमाल गुंतवणूक       किमान पेन्शन        कमाल पेन्शन

वार्षिक               1,44,578                7,22,892                    12,000                    60,000

अर्धवार्षिक         1,47,601                7,38,007                      6,000                    30,000

तिमाही              1,49,068                7,45,342                      3,000                    15,000

मासिक              1,50,000                7,50,000                      1,000                      5,000

(टीप : साडेसात लाख रुपये एकरकमी गुंतवल्यास दरमहा 5,000 रुपयांप्रमाणे 10 वर्षे पेन्शन मिळेल.)

संजय कोठारी नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव

     "पब्लिक एंटरप्रायजेस सिलेक्‍शन बोर्डा'चे अध्यक्ष संजय कोठारी हे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव असतील, तर ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांच्याकडे माध्यम सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

      वनसेवेतील गुजरात केडरचे ज्येष्ठ अधिकारी भारत लाल यांना संयुक्त सचिवपद नेमण्यात आले आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने पुढील दोन वर्षांसाठी या नियुक्‍त्यांना मान्यता दिली आहे. कोठारी हे 1978 च्या आयएएस बॅचचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी राज्य आणि केंद्रीय पातळीवरदेखील विविध पदांवर काम केले आहे.

मुखर्जींनी केले लष्कराचे कौतुक
     राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तिन्ही सेना दलांच्या कामगिरीचे कौतुक करत हुतात्मा जवानांच्या त्याग आणि बलिदानास आदरांजली वाहिली आहे. सशस्त्र सेना दलांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभामध्ये बोलताना मुखर्जी यांनी सेनादलांचा प्रमुख या नात्याने लष्कराच्या भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी सायंकाळी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री अरुण जेटली आणि तिन्ही सेनादलांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री, पद्मभूषण शिवाजीराव पाटील यांचे मुंबईत निधन

     सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी मंत्री, माजी खासदार व शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पदमभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांचे  मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. ते शिरपूर येथे राहात होते.

      काही दिवसापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री उशिरा त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले. पहाटे चारला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अनिता देशमुख व गीता पाटील या दोन मुली, नातू तथा अभिनेता प्रतीक बब्बर असा परिवार आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील होत. 

    शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता.अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ बंधू (कै.) उत्तमराव पाटील, वहिनी (कै.) लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते काँग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकार मंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली.

     सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. 1982 मध्ये शिरपूर साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली. जागतिक ऊस व बिट साखर उत्पादक महासंघाचे अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात. केंद्र शासनातर्फे त्यांना पदमभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या पत्नी विद्याताई पाटील यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. 

     शिवाजीराव पाटील यांच्यावर सोमवारी (ता. 24) सकाळी 11 ला शिरपूर येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलच्या आवारात अंत्यसंस्कार होतील.

२१ जुलै २०१७

रिलायन्स जिओ फोन - फ्री फ्री फ्री...

      रिलायन्स इंडस्ट्रीजच्या होणार्‍या वार्षिक बैठकीदरम्यान रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी जिओ हा जगातील सर्वात स्वस्त फोन लॉन्च केला.

   सर्वांना 'डेटा फ्रीडम' देण्याची घोषणा अंबानी यांनी केली आहे.  अंबानी हे मुंबईत झालेल्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. 

 

जिओच्या फीचर फोनमध्ये काय मिळणार?

-   सर्व जिओ अॅप्स अगदी मोफत असतील.
-   लाइफटाईम फ्री कॉलिंग सुविधा 
-   जिओचा फोन मोफत मिळणार
-   आयुष्यभर मोफत बोलता येणार
-   नवीन फोनमध्ये 153 रुपयांमध्ये धन धना धन'
-   अमर्यादित डेटा मिळणार
-   1500 रुपयांचे 3 वर्षांसाठी सुरक्षा ठेव जमा करावे लागणार
-   तीन वर्षानंतर सुरक्षा ठेव परत (रिफंड) मिळणार
-   जिओच्या व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा
-   जिओच्या फोनमध्ये असेल 22 भाषांचा समावेश

24 ऑगस्टपासून करता येणार प्रीबुक 

-   जिओचा नवा स्मार्ट 4जी फोन 24 ऑगस्टपासून प्रीबुक करता येणार
-   प्रत्येक आठवड्याला 5 लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाणार
-   फोन 'मेड इन इंडिया' असतील

भारताचा स्टार पारुपल्ली कश्यपची विजयी सलामी

     भारतीय स्टार पारुपल्ली कश्यप याने यूएस ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला कोरियाचा अव्वल मानांकित ली ह्यून याच्यावर सनसनाटी विजय मिळविला.

      खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या कश्यपने जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या ली वर एक तास तीन मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१६, १०-२१, २१-१९ ने विजय नोंदविला. खांद्याच्या दुखापतीतून परतलेला दुसरा खेळाडू समीर वर्मा यानेदेखील व्हिएतनामचा हुआंग नाम याच्यावर २१-५, २१-१० नी विजय नोंदवित सकारात्मक सुरुवात केली. एच. एस. प्रणयदेखील दुसऱ्या फेरीत दाखल झाला. त्याने आॅस्ट्रियाचा लुका रेबर याचा २१-१२, २१-१६ ने पराभव केला. हर्षिल दाणीने मेक्सिकोचा अर्तरो हर्नांडेजवर २१-१३, २१-९ ने मात केली. रितुपर्णा दासने कॅनडाची राचेला हांड्रिच हिला २१-१६, २१-१८ ने, तर कृष्णप्रिया कुदरावल्लीने अमेरिकेची माया चेनला २१-१३, २१-१६ ने नमविले. सारंग लखानी, अभिषेक येलगार, साई उत्तेगजिता राव, रेश्मा कार्तिक व ऋत्त्विका गाडे यांना मात्र सलामीलाच पराभवाचा सामना करावा लागला.

टर्की आणि ग्रीसला भूकंपाचा धक्का, 2 ठार, 200 जखमी

    टर्की आणि ग्रीकला पहाटेच्या सुमारास 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामध्ये ग्रीकच्या केओएस बेटावर दोघांचा मृत्यू झाला आहे. 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून, केओएसला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसल्याचे अधिका-यांनी सांगितले. केओएसमध्ये 120 तर, टर्कीमध्ये 70 जण जखमी झाले.
    अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार टर्कीच्या बोडरम रिसॉर्टपासून 10 किमी आणि ग्रीकच्या केओएस बेटापासून 16 किमीवर भूकंपाचा केंद्रबिंदू  आहे. भूकंपात दोन जण ठार झाले तर, अनेक जण जखमी झाले अशी माहिती केओएसचे महापौर जॉर्ज यांनी दिली. काही इमारती आणि घरांची पडझड झाली आहे. दुर्घटनास्थळावर युद्धस्तरावर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. 

२० जुलै २०१७

रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती

         भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले कोविंद राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले. मतमोजणीत रामनाथ कोविंद यांना सात लाख, दोन हजार, 644  म्हणजेच एकूण मतदानापैकी 65.65 टक्के मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांना तीन लाख,  67 हजार 314 म्हणजेच एकूण मतदानापैकी 34.35 टक्के एवढी मते मिळाली आहेत. 
        राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या 50 टक्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक असते. केंद्रात सत्ताधारी असलेल्या एनडीएकडे स्वत:ची 48 टक्के मते होती. याखेरीज 6 विरोधी पक्षांसह ज्या 16 पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मतांचे प्रमाण 15 टक्के  होते. त्यामुळे रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात होता. 
        रामनाथ कोविंद मूळ उत्तप्रदेशमधील कानपूरचे असून दलित प्रवर्गातले आहेत. रामनाथ कोविंद 12 वर्ष राज्यसभा सदस्य होते. ते भाजपाचे उत्तर प्रदेशचे महासचिवदेखील होते. 
       भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार कोण, या हालचालींना सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात भरपूर चर्चा झाली होती. राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण अडवाणींचे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. जोडीला मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांची नावेही चर्चिली गेली होती. पण अखेर भाजपाकडून रामनाथ कोविंद आणि काँग्रेसकडून मीरा कुमार यांना उमेदवारी मिळाली होती. राष्ट्रपतिपदाची निवडणूक जवळ येता येता अनेक विरोधी पक्षांनी कोविंद यांना पाठिंबा दर्शवल्याने त्यांचा विजय निश्चित झाला होता. 

इंग्लंडमधील सर्वात युवा डॉक्टर

       लंडनमध्ये राहणारा गुजरातमधील एक तरुण इंग्लंडमधील सर्वात तरुण डॉक्टर ठरला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून उत्तर-पूर्व इंग्लंडमधील एका रुग्णालयातून तो आपल्या रुग्णसेवेस सुरुवात करणार आहे.  अर्पण दोषी असे या तरुणाचे नाव असून, त्याने  शेफिल्ड विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी या पदव्या घेतल्या आहेत. पदवी घेतली तेव्हा त्याचे वय 21 वर्षे 335 दिवस होते. त्यामुळे सर्वात तरुण डॉक्टर बनण्याचा मान त्याच्या नावावर नोंदला गेला आहे.  
        अनिवासी भारतीय असलेल्या अर्पण आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल म्हणतो,  जोपर्यंत माझ्या मित्रांनी इंटरनेटवर शोध घेतला नाही तोपर्यंत मला मी इंग्लंडमधील सर्वात युवा डॉक्टर ठरल्याचे मला माहितच नव्हते. मी ही गोष्ट अद्याप  माझ्या आई-वडिलांना सांगितलेली नाही.  पण त्यांना हे समजल्यावर खूप आनंद होईल."  अर्पण दोषीचा जन्म भारताच झाला होता. तसेच 13 वर्षांच्या होईपर्यंतचे त्याचे प्राथमिक शिक्षण गुजरातमधील गांधीनगर येथील स्थानिक शाळेत झाले होते.
           अर्पणचे वडील मेकॅनिकल इंजिनियर असून, त्यांना फ्रान्समध्ये नोकरी मिळाल्यावर त्यांनी कुटुंबासह फ्रान्समध्ये स्थलांतर केले होते. तेव्हापासून अर्पण हा परदेशात वास्तव्य करत आहे. मात्र मायभूमीबाहेर राहून आणि इंग्रजी माध्यमात शिकूनही अर्पण गुजराती आणि हिंदी भाषा उत्तम प्रकारे बोलू शकतो.  

१९ जुलै २०१७

संजीवनी जाधवला सुवर्ण

        आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नाशिकच्या संजीवनी जाधवला महासंघाच्या स्पर्धेत वरिष्ठ गटात राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक हुलकावणी देत होते. अखेर तिने गुंटूर येथे संपलेल्या ५७ व्या राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्‍स स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून ही मालिका खंडित केली. 

        विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीला तमिळनाडूच्या एल. सूर्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून फेडरेशन, आंतरराज्य स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागत होते. भुवनेश्‍वर येथे आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत संजीवनीने सूर्यावर मात करून ब्राँझपदक मिळविले.

       गुंटूर येथे पुन्हा पहिल्या दिवशी पाच हजार मीटर शर्यतीत संजीवनीला सूर्यापाठोपाठ रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.  दहा हजार मीटर शर्यतीत सूर्याचा सहभाग नव्हता. त्यामुळे संजीवनीचा सुवर्णपदकाचा मार्ग मोकळा झाला. तिने सुवर्णपदक जिंकताना ३५ मिनिटे २१.३३ सेकंद वेळ दिली. स्पर्धेत संजीवनी भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाचे प्रतिनिधित्व करीत होती. आसामच्या फुलन पालला रौप्य आणि छत्तीसगडच्या डिम्पल सिंगला ब्राँझपदक मिळाले. 

       पहिल्या दिवशी पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला दहा हजार मीटर शर्यतीतही ब्राँझपदकावर (३० मि.३७.९४ सेकंद) समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्याच रणजीत पटेलने (नाशिक) रौप्यपदक जिंकले. उत्तराखंडचा प्रदीप चौधरी सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

       मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 72 वर्षांच्या होत्या. 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अशी त्यांची ओळख. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून त्या आजारी होत्या.त्यांना हृदयाचा त्रास होता. 
       मुळच्या कोल्हापूरच्या असणा-या उमा भेंडे यांनी अनेक साठ व सत्तरच्या दशकात अनेक भूमिका गाजवल्या. त्यांचं मूळ नाव अनुसया असं होतं. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिलं होतं.
     1960 रोजी 'आकाशगंगा' या मराठी चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. 'आम्ही जातो आमुच्या गावा', 'भालू', 'प्रेमसाटी वाट्टेल ते' हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. उमा भेंडे यांनी मराठीशिवाय, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही भूमिका केल्या. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांतही काम केलं. दोस्ती हा त्यांचा गाजलेला हिंदी सिनेमा आहे.  मराठी अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती आहेत.

१८ जुलै २०१७

वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्‍स स्पर्धेत अमितला रौप्य

        जागतिक पॅरा ॲथलेटिक्‍स स्पर्धेत भारताच्या अमित कुमार सरोहा याने पुरुषांच्या क्‍लब थ्रो प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.

      सरोहाने तिसऱ्या प्रयत्नांत ३०.२५ मीटर फेक करून ही कामगिरी केली. त्याची कामगिरी ही आशियाई विक्रम ठरली. सर्बियाच्या झेल्जतो दिमित्रीजेविच याने ३१.९९ मीटर फेक करून सुवर्णपदक राखले. याच प्रकारात भारताचाच धरमवीर २२.३४ मीटरसह दहाव्या क्रमांकावर राहिला. सरोहाने २०१५ मध्ये बीएनिअल अजिंक्‍यपद स्पर्धेत याच प्रकारात रौप्य, तर इंचेऑन येथे २०१४ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

जम्मु काश्‍मीर: जवानाकडून लष्करी अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या

       जम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी सेक्‍टर  भारतीय लष्करामधील एका जवानाने मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली.

         मेजर शिखर थापा असे मृत झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून थापा यांची नेमणूक उरी येथे तैनात असलेल्या 8 राष्ट्रीय रायफल्स या विभागामध्ये करण्यात आली होती. आहे. मोबाईल फोन वापरण्यासंदर्भात उद्‌भविलेल्या वादातून ही दुदैवी घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

        संबंधित जवान कामाच्या वेळी मोबाईल फोन वापरत असल्याचे चौकशीत आढळून आले. यामुळे थापा यांनी जवानाचा मोबाईल फोन जप्त करत त्याला कडक इशारा दिला. तसेच यावेळी झालेल्या वादामध्ये या मोबाईल फोनचेही नुकसान झाले. यामुळे संतापलेल्या जवानाने थापा यांच्या पाठीवर थेट दोन गोळ्या झाडल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘आधार’ प्रकरण आता ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे

        आधार कार्डमुळं व्यक्तिगततेच्या अधिकाराचं उल्लंघन होतंय का? याबाबतचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाचं ९ न्यायाधीशांचं घटनापीठ घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठानं हे प्रकरण ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडं सोपवलं आहे.

    सर्वोच्च न्यायालयात  ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडं सुनावणी झाली. घटनेनुसार व्यक्तिगततेच्या अधिकाराचं उल्लंघन होतं की नाही हे आधी निश्चित होणं गरजेचं आहे. त्यामुळं हे प्रकरण आता ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडं सोपवणं गरजेचं आहे, असं न्यायालयानं सुनावणी दरम्यान सांगितलं. व्यक्तिगततेचा अधिकार नसतो, असा निकाल १९५४ मध्ये ८ न्यायाधीशांच्या खंडपीठानं तर १९६२ मध्ये ६ न्यायाधीशांच्या खंडपीठानं दिला होता. त्यामुळं हे प्रकरण ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडं सोपवावं लागलं. तसंच या प्रकरणी ९ न्यायाधीशांचं खंडपीठ स्थापन करण्यात यावं, असं अॅटर्नी जनरल यांनी सांगितलं होतं. या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश जे. एस. खेहर, जे. चेलामेश्वर, ए. आर. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अब्दुल नझीर यांचा समावेश होता.

       आधार कार्ड योजनेमुळं व्यक्तिगततेचा भंग होत असल्याच्या मुद्यावरून दाखल झालेल्या अनेक याचिकांची सुनावणी  घटनापीठासमोर झाली. मागील सुनावणीत सरकारच्या आधारकार्ड योजनेतील माहितीचा गैरवापर आणि व्यक्तिगततेचा भंग या मुद्यांवर दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर अॅटर्नी जनरल आणि वरिष्ठ वकील श्याम दिवाण यांनी बाजू मांडली होती. सरकारनं जनहिताच्या योजनांसाठी आधारकार्ड नोंदणी अनिवार्य केली असून त्याबाबत तातडीने घटनापीठापुढे सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. तीन न्यायाधीशांच्या पीठापुढे ७ जुलै रोजी हे प्रकरण सुनावणीस आलं होतं. त्यावेळी आधारबाबतचे प्रश्न हे मोठ्या पीठापुढं असावेत व सरन्यायाधीशांनी घटनापीठाच्या स्थापनेचा निर्णय घ्यावा, असं अॅटर्नी जनरल यांनी सांगितलं होतं.

१७ जुलै २०१७

फेडररचे विक्रमी विजेतेपद

         लंडन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने लौकिकास साजेसा खेळ करत रविवारी विंबल्डनचे विक्रमी आठवे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्याने क्रोएशियाच्या मरिन चिलीचचा सरळ सेटमध्ये एक तास ४१ मिनिटांत पराभव केला. 

         फेडररने अकराव्यांदा विंबल्डनची अंतिम फेरी गाठताना आठव्यांदा विजेतेपद मिळविले. एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदाचा विक्रमही आता फेडरेरच्या नावावर नोंदला गेला. फेडररचे हे कारकिर्दीमधील एकोणीसावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. 

             पहिल्या सेटमध्ये चिलीच कोर्टवर घसरून पडला आणि त्यानंतर जणू त्याचे स्वतःच्या खेळावर नियंत्रणच राहिले नाही. पहिल्या सेटमध्ये पाचव्या आणि नवव्या गेमला चिलीचची सर्व्हिस ब्रेक करत फेडररने पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सुरवातीलाच मिळालेल्या ब्रेकच्या संधीने फेडररने ३-० अशी आघाडी घेतली. त्या वेळेस चिलीचला पायाच्या दुखापतीवर इलाज करण्यासाठी ट्रेनरची मदत घ्यावी लागली. त्या वेळी चिलीच लढतीतून माघार घेतो की काय असे वाटले होते; पण उपचारासाठी आवश्‍यक वेळ घेत तो पुन्हा कोर्टवर उतरला. अर्थात, त्याचा खेळावर परिणाम झाला. तो शंभर टक्के योगदान देऊ शकला नाही. दुसरा सेट त्याने सहज गमावला. तिसऱ्या सेटमध्ये चिलीचने चांगली सुरवात केली. सेट बरोबरीत असतानाच सातव्या गेमला फेडररने पुन्हा ब्रेकची संधी साधली आणि विजेतेपदावर सहज शिक्कामोर्तब केले. 

दृष्टिक्षेपात लढत
निकष               फेडरर          चिलिच

एस                       ८                ५
डबल फॉल्ट           २                ३
ब्रेक पॉइंट           ५-१०           ०-१
विनर्स                  २३             १६
एरर्स                     ८              २३

अंतिम निकाल
रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड ३) वि.वि. मरिन चिलीच (क्रोएशिया ७)
६-३, ६-१, ६-४

दि ग्रेट फेडरर
      फेडररचे वयाच्या ३५व्या वर्षी विंबल्डन विजेतेपद
      अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्कर खेळाडू. यापूर्वी १९७६ मध्ये आर्थर ऍश यांचे वयाच्या ३२व्या वर्षी विजेतेपद. 
      एकही सेट न गमावता फेडररचे विंबल्डन विजेतेपद. यापूर्वी १९७६ मध्ये बियाँ बोर्ग यांची अशी कामगिरी
      फेडररचे आठवे विंबल्डन विजेतेपद. कारकिर्दीमधील १९वे ग्रॅंड स्लॅम विजेतेद
      विली रेनशॉ आणि पीट सॅम्प्रास यांचा पुरुष एकेरीत सर्वाधिक सात विजेतेपदाचा विक्रम मागे टाकला

  

१५ जुलै २०१७

डीएमईआरच्या सहसंचालकपदी तात्याराव लहाने

        वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या पूर्णवेळ सहसंचालकपदी डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी या पदाचा हंगामी कार्यभार डॉ. लहाने सांभाळत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियुक्तीसाठी अंतिम मंजुरी दिली. डॉ. लहाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयासह सर जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभारही सांभाळणार आहेत.

        वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व त्यांना संलग्न रुग्णालयांचे संचालन व नियंत्रण करते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयावरही नियंत्रण ठेवते. आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे कामही संचालनालयाकडून करण्यात येते.

राज्य मुक्त शिक्षण मंडळ स्थापनेस मान्यता

        शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त शालेय शिक्षण मंडळ स्थापन करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे. 5 वी, 8 वी, 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांना समकक्ष परीक्षा या मंडळातर्फे घेतल्या जातील. हे प्रस्तावित मंडळ राज्य मंडळाचा भाग राहणार आहे.

        ही समकक्षता शासनाच्या शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठीही लागू राहील, असा शासन निर्णय विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी प्रसिद्ध केला आहे. याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी सादर केला होता. राज्य मंडळ गेली कित्येक वर्ष खासगी विद्यार्थी थेट परीक्षा योजना (फॉर्म नंबर 17) राबवित आहे. या योजनेत राज्यात दरवर्षी एक ते दीड लाख विद्यार्थी सहभागी होतात. हा प्रतिसाद मोठा असला तरी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचे कारण नियमित विद्यार्थ्यांसाठी जे विषय, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके असतात, तीच बहिस्थ विद्यार्थ्यांसाठीही असतात. त्यामुळे अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडावे लागते होते. बहिस्थः विद्यार्थ्यांचे व्यवसायिक कौशल्य, व्यवहारिक ज्ञान, गरजा यांचा वेगळा विचार सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत नाही. विशेष गरजा असणार्‍या व्यक्तींसाठी पुरेशी व्यवस्था बहिस्थ विद्यार्थी योजनेत नाही.

         मुक्त विद्यालयासाठी प्रवेशाच्या 5 वी, 8 वी, 10 वी आणि 12 वीसाठी स्वतंत्र पात्रता ठरविल्या आहेत. त्यासाठीचे विषयही वेगवेगळे असतील. परीक्षेसाठी 6 महिने अगोदर नोंदणी करावी लागणार आहे. एकदा केलेली नोंदणी 5 वर्षांसाठी वैध राहणार आहे. अभ्यासक्रम, विषय आणि मूल्यमापन, नोंदणी व परीक्षा शुल्क यांची पद्धतीही स्वतंत्रपणे ठरविली आहे. या योजनेसाठी राज्य पातळीवर शिक्षण संचालक दर्जाचा अधिकारी प्रमुख राहणार आहे. इतर अधिकारी व कर्मचारी हे प्रतिनियुक्ती अथवा कंत्राटी तत्त्वावर नेमण्याचा अधिकार राज्य मंडळास शासन मान्यतेने राहणार आहे.

       कला, क्रिडा क्षेत्रात रस असणार्‍या व करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केवळ 10 वी व 12 वीमध्ये अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन मुक्त विद्यालयाची परीक्षा देता येणार आहे.

योजनेची उद्दिष्टे -

*   औपचारिक शिक्षणाला पूरक व समांतर शिक्षण पद्धती

*   शालेय शिक्षणातील गळती रोखणे

*   प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार आदी सर्वांना शिक्षणाच्या संधी उपल्ब्ध

*   व्यवसायाभिमुख शिक्षण देणे,

*   स्थानिक स्तरावर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे

*   दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शिक्षणाची सुविधा

योजनेची वैशिष्टये -

*   सोयीनुसार अध्ययनाची सवलत

*   अभ्यासक्रमाची लवचिकता

*   व्यवसायिक विषयांची उपलब्धता

*   संचित मूल्यांकनाची व्यवस्था

*   सर्वांना शिक्षणाची व्यवस्था

*   दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था

१४ जुलै २०१७

नववी, दहावीच्या तोंडी परीक्षा बंद

         नववी, दहावीच्या भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा बंद करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाषा विषयांचा 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा हा पॅटर्न बदलण्यात आला असून यापुढे विद्यार्थ्यांना 100 गुणांची प्रश्‍नपत्रिका सोडवावी लागणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात नववीसाठी तर 2018-19 या वर्षापासून दहावीसाठी या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भातील परिपत्रक राज्य मंडळाने जारी केले आहे.

         तोंडी परीक्षांचे गुण शाळांच्या हातात असल्याने दहावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत होते. निकाल वाढवण्यासाठी अनेक शाळा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण देत असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांची भाषा विषय गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 80ः20 हा पेपर पॅटर्न बदलण्यासंदर्भात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिक्षण संचालनालय आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रक जारी केले असून यात भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.

असा असेल नवा पॅटर्न -

*   संपूर्ण भाषा विषयांसाठी 100 गुणांची तर, संयुक्त भाषा विषयांसाठी प्रत्येकी 50 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे.

*   गणित हा 100 गुणांचा विषय. यातील 80 गुण लेखी आणि 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी. 80 गुणांमध्ये 40 गुण बीजगणित आणि 40 गुण भूमितीसाठी असतील.

*   विज्ञान-तंत्रज्ञान विषयाची 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. 80 गुणांमध्ये भाग-1 व भाग-2 प्रत्येकी 40 गुणांचा असेल.

*   सामाजिकशास्त्रे या विषयांतर्गत इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल मिळून 100 गुण. इतिहास 40, राज्यशास्त्र 20 व भूगोल 40 अशी गुणांची विभागणी असणार आहे.

जगातील सर्वात विश्वासार्ह सरकारमध्ये भारत अव्वल

      केंद्रात असलेल्या मोदी सरकारच्या कामकाजावावर देशातील जनता खुश असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. जगातील सर्वात विश्‍वासार्ह सरकारमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटकडून जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये 15 देशांची नावे दिली आहेत. या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे.

       फोर्ब्स मासिकाकडून जगातील 34 देशांमधील स्थितीचा आढावा घेतला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल असलेल्या विश्‍वासाची पडताळणी सर्वेक्षणातून केली आहे. या यादीनुसार, भारत प्रथम क्रमांकावर, कॅनडा दुसर्‍या तर, रशिया आणि तुर्कस्थान तिसर्‍या स्थानावर आहेत. भारताच्या सर्वाधिक 73 टक्के लोकांनी देशाच्या सरकारवर विश्‍वास दाखवला आहे. तर कॅनडातील 62 टक्के लोकांचा सरकारवर विश्‍वास आहे.

      तुर्कस्थान आणि रशियाला या दोन्ही देशातील 58 टक्के लोकांनी सरकारवर विश्‍वास दाखवला आहे. जर्मनीत 55 टक्के, तर दक्षिण आफ्रिकेत 48 टक्के लोकांनी सरकारच्या कारभारावर विश्‍वास ठेवला आहे. ऑस्टेलियातील 45 टक्के लोकांनी ऑस्ट्रेलिया सरकारवर भरोसा दाखवला आहे. 41 टक्के लोकांचा ब्रिटन सरकारवर विश्‍वास आहे. जपानमध्ये फक्त 36 टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर खूष आहेत. तर, अमेरिकेत फक्त 30 टक्के लोकांनी सरकारवर विश्‍वास दाखवला आहे.

       आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेत समावेश होणार्‍या देशांचे फोर्ब्सकडून सर्वेक्षण केले आहे. यामध्ये लोकशाही असलेल्या 34 देशांचा समावेश असून या संस्थेतील देश एकमेकांची मदत करतात. यासोबतच या संस्थेशी 70 हून अधिक बिगरसदस्यीय अर्थव्यवस्था जोडल्या गेलेल्या आहेत. 

पृथ्वीजवळ असणार्या सरस्वती दीर्घिका समूहाचा शोध

      पृथ्वीपासून सुमारे 4 अब्ज प्रकाशवषे्र दूर असणार्‍या सरस्वती या दीर्घिकांच्या एका प्रचंड मोठ्या समूहाचा (सुपरक्लस्टर) शोध लावण्यात पुण्यातील आयुका आणि आयसर या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांच्या टीमला यश आले. विश्‍वात अशा प्रकारच्या प्रचंड आकाराच्या खगोलीय रचनेचा शोध ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असून, भारतातर्फे असा शोध प्रथमच लावण्यात आला आहे.

        भारतीय शास्त्रज्ञांचे पथक गेली 15 वर्षे या दीर्घिका समूहाविषयी माहिती मिळवीत होते. अखेरीस या समूहाचे स्थान, त्याची रचना आणि पृथ्वीपासूनचे अंतर निश्‍चित झाल्यावर हा शोध जाहीर करण्यात आला. सरस्वती या दीर्घिका समूहात एकाचवेळी हजारो दीर्घिकांच्या समावेश आहे. त्यातील कित्येक आपल्या आकाशगंगेच्या आकाराहून प्रचंड मोठ्या देखील आहेत. रेवती नक्षत्राच्या दिशेने हा समूह स्थित आहे.

       स्लोअन डिजिटल स्काय सर्वेच्या आधारे हा शोध लावण्यात आला. आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकन अस्ट्रोनॉमीकल सोसायटीच्या द अस्ट्रॉफीजिकल जर्नल या मानाच्या नियतकालिकाच्या येत्या अंकात हा संशोधन प्रबंध छापून येणार आहे. आयुकाचे शास्त्रज्ञ जॉयदीप बागची हे त्याचे प्रमुख लेखक असणार आहेत.

         या शोधाविषयी माहिती देताना आयसर मधील संशोधक शिशिर सांख्ययन म्हणाले, हा एक महत्त्वाचा शोध म्हणायला हवा. विश्‍वाची उत्पत्ती आणि त्यासंदर्भातील विविध खगोलीय घटनांचा अभ्यास करणे यामुळे अधिक पुढच्या टप्प्यावर पोचू शकेल. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून यापुढील अनेक रहस्य उलगडू शकतील.

१३ जुलै २०१७

महिला फुटबॉल प्रशिक्षकपदी : मेमॉल रॉकी

        भारताची आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू, नंतर राष्ट्रीय ज्युनियर संघाच्या प्रशिक्षक या भूमिकेनंतर आता गोमंतकीय मेमॉल रॉकी यांनी राष्ट्रीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक हे आव्हान स्वीकारले आहे. साजिद दार यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचे ठरविल्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने महिला प्रशिक्षकास प्राधान्य दिले.

       राष्ट्रीय महिला संघाच्या पहिल्या गोमंतकीय प्रशिक्षक हा मान मेमॉल यांना मिळाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा सीनियर महिला फुटबॉल संघ या महिन्यात मलेशियाविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. पहिला सामना 29, तर दुसरा सामना 31 जुलैला क्वालालंपूर येथे खेळला जाईल.

         साजिद दार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एप्रिलमध्ये भारताचा सीनियर महिला फुटबॉल संघ एएफसी महिला आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेत खेळला होता. उत्तर कोरियात झालेल्या या स्पर्धेत भारताला उझबेकिस्तानकडून 7-1 असा मोठा पराभव पत्करावा लागला होता, शिवाय दक्षिण कोरिया व उत्तर कोरियाकडूनही भारताला हार पत्करावी लागली होती. नंतरच्या लढतीत हाँगकाँगवर भारतीय महिलांनी दोन गोलांनी विजय प्राप्त केला होता. त्या स्पर्धेत मेमॉल राष्ट्रीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक होत्या. फिफाच्या मानांकनात भारतीय महिला संघ सध्या 60 व्या स्थानी आहे. त्यापूर्वी भारतीय महिला संघ 56 व्या क्रमांकावर होता.

      वास्को येथील मेमॉल या 2012 पासून भारतीय फुटबॉलमध्ये प्रशिक्षक या नात्याने कार्यरत आहेत. त्यांनी 16 वर्षांखालील वयोगटापर्यंत राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन केलेले आहे. या वर्षी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली होती. महिलांच्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील गुणवत्ता शोधण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. साजिद यांच्यानंतर राष्ट्रीय सीनियर संघाची जबाबदारी स्वीकारण्याविषयी विचारणा होताच मेमॉल यांनी हे आव्हान स्वीकारण्याचे ठरविले. “मी या जबाबदारीकडे आव्हान या नात्याने पाहत आहे. कारकिर्दीतील हा मोठा क्षण आहे,” असे मेमॉल म्हणाल्या.

        भारतीय महिला संघ सॅफ करंडक विजेता आहे. मलेशियाविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्यास भारताला महिला मानांकनात क्रमवारी उंचावणे शक्य होईल. मेमॉल यांनी सध्या मलेशियाविरुद्धच्या दोन्ही लढतींवर लक्ष केंद्रित केले आहे.

अनुराग म्हामलला ग्रँडमास्टर किताब

      बुद्धिबळपटू अनुराग म्हामल भारताचा 48 वा, तर गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर बनला आहे. स्पेनमध्ये सुरू असलेल्या बेनास्के आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने आवश्यक 2500 एलो गुणांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी त्याने ग्रँडमास्टर किताबाचे पाच नॉर्म प्राप्त केले होते, परंतु 2500 एलो गुणांचा टप्पा न ओलांडल्यामुळे त्याच्या ग्रँडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. स्पेनमधील स्पर्धेपूर्वी अनुरागच्या नावावर 2498 एलो गुण होते.

     बेनास्के आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीनंतर 4.4 एलो गुणांची कमाई करत 22 वर्षीय अनुरागने 2500 एलो गुणांचा टप्पा पार केला. स्पेनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या 27 व्या ओपन द ग्रोस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविताना त्याने 21 एलो गुणांची कमाई केली होती. त्यामुळे त्याचे एलो गुण मानांकन 2498 झाले होते. बेनास्के आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अनुरागने इंटरनॅशनल मास्टर रोमियो सोरिन मिलू याला हरवून 2500 एलो गुणांचा टप्पा ओलांडला. सध्याच्या कामगिरीनुसार त्याचे 2502 एलो गुण झाले आहेत.

अंटार्क्टिकातील मोठा हिमखंड तुटला

      सुमारे 5,800 वर्ग किलोमीटरचा मोठा हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटला आहे. ही घटना 10 ते 12 जुलैच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईच्या भूभागाच्या अदांजे नऊपट मोठा हा हिमखंड आहे. मोठा हिमखंड तुटल्याने अंटार्क्टिका द्वीपकल्पाचा आकारच बदलून गेला आहे. तुटून वेगळ्या झालेल्या या हिमखंडाला ए 68 असे नाव देण्यात येणार आहे. हा हिमखंड तुटून वेगळा होण्यापूर्वी लार्सेन सी या हिमखंडाचा भाग होता. अंटार्क्टिकापासून तुटत असल्याचे नासाच्या अ‍ॅक्वा मोडीस उपग्रहाने छायाचित्र टिपले होते. जागतिक तापमानामध्ये झालेल्या वाढीमुळे हिमखंड तुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

         शास्त्रज्ञांच्या मतानुसार, समुद्र पातळीत 10 सेमीने वाढ होईल. शिवाय, या द्वीपकल्पापासून वाहतूक करणार्‍या जहाजांच्या अडथळ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हिमखंड तुटल्याने तातडीने काही परिणाम जाणवणार नाहीत. मात्र, कालांतराने समुद्र वाहतुकीवर परिणाम जाणवू शकतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी लार्सेन ए आणि लार्सेन बी हिमखंड 1995 आणि 2002 साली तुटले होते.

चीनला लक्ष्य करण्यासाठी भारत करतोय अण्वस्त्र निर्मिती

      भारत-चीन या दोन देशांमध्ये सिक्किम परिसरातील वर्चस्वावरून सध्या युद्धचर्चेचे मोहोळ उठले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारताने चीनवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखली आहे. भारताचे लक्ष पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानवर होते, पण आता ते चीनकडे वळल्याचे बोलले जाते. सध्याची परिस्थिती पाहता भारताचे चीनवर अधिक लक्ष असून त्यासाठी अत्याधुनिक अण्वस्त्रांची निर्मिती करण्यात येत असल्याचा दावा अमेरिकेच्या ज्येष्ठ अण्वस्त्र विशेषज्ज्ञांनी केला आहे.

     दक्षिण भारतातील आपल्या तळावरून संपूर्ण चीनला लक्ष्य करता येईल, अशा अत्याधुनिक अण्वस्त्राची निर्मिती भारताकडून करण्यात येत आहे, असा दावा अमेरिकेतील हंस एम क्रिस्टिन्सन आणि रॉबर्ट एस नॉरिस या विशेषज्ज्ञांनी ऑनलाईन मॅगेझिनच्या जुलै-ऑगस्टच्या आवृत्तीतील प्रसिद्ध लेखात केला आहे. इंडियन न्यूक्लियर फोर्स 2017 या शिर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध केला आहे. भारताकडे जवळपास 150 ते 200 अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी पुरेशा प्रमाणात प्लूटोनियम उपलब्ध आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 120 ते 130 अण्वस्त्रांचीच निर्मिती केली आहे, अशी शक्यता या लेखात वर्तवली आहे. पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानपेक्षा भारताने आता चीनवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार भारताने आपली रणनिती निश्‍चित केली आहे, असा दावाही या तज्ज्ञांनी केला आहे.

      पाकिस्तानकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन भारत अण्वस्त्रे विकसित करत होता. पण सध्या भारताकडून करण्यात येणार्‍या अण्वस्त्र निर्मितीतील आधुनिकीकरण पाहता भारताचे लक्ष आता चीनकडे अधिक आहे, याचे संकेत मिळत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. भारताकडे 7 सक्षम क्षेपणास्त्र आहेत. हवेतून मारा करणारी 2, जमिनीवरून मारा करणारी 4 बॅलेस्टिक मिसाइल आणि समुद्रातून मारा करणारी 1 सक्षम बॅलेस्टिक मिसाइल आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. भारत किमान आणखी चार सक्षम क्षेपणास्त्र प्रणालींवर काम करत असून, पुढील दशकभरात त्या तैनात करण्याची शक्यता आहे, असा दावाही त्यांनी या लेखातून केला आहे.

१२ जुलै २०१७

श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा राजीनामा

        झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मॅथ्यूजच्या राजीनाम्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार म्हणून दिनेश चंडिमल, तर एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी उपुल थरंगाची निवड करण्यात आली आहे.

       मॅथ्यूजने श्रीलंका आणि झिंबाब्वे यांच्यात होणार्‍या एकमेव कसोटी सामन्याआधी निवड समितीचे अध्यक्ष सनथ जयसूर्याची भेट घेत आपल्या आणि संघाच्या भविष्याबद्दल चर्चा केली. मॅथ्युजने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा सर्व प्रकारातून कर्णधारपदचा राजीनामा दिला आहे, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

       मॅथ्यूजने 2013 मध्ये 25 व्या वर्षी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर 34 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 12 टी-20 सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे. झिंबाब्वेने श्रीलंकेला मालिकेत 3-2 असे पराभूत करत तब्बल 8 वर्षांनी परदेश दौर्‍यात विजय मिळविला होता. झिंबाब्वेविरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंवर होणार्‍या टीकेला कर्णधार मॅथ्युज सामोरा गेला. मॅथ्युजने या पराभवाचे वर्णन ’पचवण्यास अवघड पराभव’ असे केले.

        चँपियन्स करंडक स्पर्धेतील पराभवानंतर ग्राहम फोर्ड यांनी प्रशिक्षकपद सोडल्याने श्रीलंका संघ ही मालिका प्रशिक्षकाशिवायच खेळला. चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका साखळीतच गारद झाल्यावर सरकारने सर्व क्रिकेटपटूंची तंदुरुस्त चाचणी घेतली होती. त्यानंतर क्रीडामंत्री दयासिरी जयसेकरा यांनी सर्व खेळाडू अनफिट असल्याचा आरोप केला होता.

रवी शास्त्रीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

       भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड. त्याबरोबरच गेल्या महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. रवी शास्त्रीबरोबरच भारताच्या अन्य दोन माजी क्रिकेटपटूंकडे संघव्यवस्थापनामध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामध्ये माजी गोलंदाज झहीर खानची गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघाच्या परदेश दौर्‍यादरम्यान राहुल द्रविड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष  सी. के. खन्ना यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली.

        कर्णधार विराट कोहलीची पहिली पसंत असल्याने प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्रीचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीची निवड झाल्याचे वृत्त आले होते. पण बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावले होते. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकाच्या नावाबाबतची उत्सुकता वाढली होती. अखेर रात्री बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी रवी शास्त्री याची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचे घोषित केले. त्याबरोबरच झहीर खानची गोलंदाजी प्रशिक्षक आणि, राहुल द्रविडची परदेश दौर्‍यासाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याचेही त्यांनी जाहीर केले.

       अनिल कुंबळेचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यात असताना बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले होते. दरम्यान, कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार हे निश्‍चित झाले होते. दरम्यान, कोहलीशी झालेल्या मतभेदांनंतर अनिल कुंबळेने संघाचे प्रशिक्षकपद तडकाफडकी सोडले होते. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि टॉम मुडी यांच्यासह 10 जणांनी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 5 जणांच्या मुलाखती पार पडल्या होत्या.    

११ जुलै २०१७

जागतिक वारसा स्थळ - अहमदाबाद

           संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनेस्को’ या संस्थेने गुजरातमधील प्रमुख शहर अहमदाबादला ‘जागतिक वारसा’स्थळ म्हणून घोषित केले. ‘युनेस्को’च्या या घोषणेचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी स्वागत केले आहे. ऐतिहासिक शहर अहमदाबादचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश केल्याची माहिती ‘युनेस्को’ने ट्विट करून दिली. उल्लेखनीय म्हणजे, या शर्यतीत मुंबई आणि नवी दिल्ली ही भारतातील दोन प्रमुख शहरेसुद्धा होती.

           वर्ल्ड हेरिटेज कमिटीची पोलंडमधील क्राको या शहरात बैठक आयोजित केली होती, तिथे निर्णय घेतला गेला. अहमदाबाद जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करताना ‘युनेस्को’ने म्हटले की, हे शहर 15 व्या शतकात सुल्तान अहमद शाह याने वसविले होते. साबरमती नदीच्या तीरावर वसलेल्या हमदाबादमध्ये आर्किटेक्टची अनके उदाहरणे आहेत. उदा. भद्रागड या किल्ल्याचे दरवाजे, गेट, अनेक मशिदी. याशिवाय शहरात जैन व हिंदूंची अनेक भव्य मंदिरेही आहेत. तसेच हे शहर गेल्या 60 वर्षांपासून गुजरातची राजधानीही आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

           व्यंग्यचित्रातून दिसतो ’चेहर्याआडचा माणूस’ असे सांगणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन झाले. ’व्यंग्यचित्र म्हणजे कागदावर उमटलेल्या कुंचल्याच्या फर्राट्यांचा हास्याविष्कार‘, या रूढ व्याख्येच्या पलीकडे जात ज्यांच्या व्यंग्यचित्रांनी प्रसंगी अनेकांना अंतर्मुख केले... कागदावर जणू जगण्याचे तत्त्वज्ञानच मांडले... अशी मंगेश तेंडुलकर यांची ओळख होती.

           वाढते दारिद्य्र, शहरातील टेकडीफोड, वाहनांचा गोंगाट, रस्त्यांची दुर्दशा, मोबाईलच्या गमती-जमती अशा गंभीर अन् हलक्या-फुलक्या विषयांवरील वेगळा विचार देणारी मंगेश तेंडुलकर यांची व्यंग्यचित्रे होती. मंगेश तेंडुलकर यांनी 1954 पासून व्यंगचित्रे काढण्यास सुरुवात केली होती. भुईचक्र, संडे मूड, कार्टुन ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. संडे मूड या पुस्तकासाठी त्यांनी वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार मिळाला होता.

सायकल चालवल्याने कॅन्सरचा धोका कमी

           नियमितपणे सायकल चालवल्याने हृदयविकार आणि कॅन्सरचा धोका कमी होता, असा निष्कर्ष या संशोधनात काढला आहे. ब्रिटनमध्ये नियमितपणे सायकलवरून येणार्या-जाणार्या सुमारे अडीच लाख लोकांवर हे संशोधन केले आहे. यामध्ये कार अथवा सार्वजनिक परिवहन मंडळाच्या वाहनातून प्रवास करणार्यांच्या तुलनेत पायी चालणेही शरीरासाठी फायदेशीर ठरते. ग्लासगोतील संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले आहे. नियमितपणे सायकल चालवल्याने कोणत्याही कारणामुळे होणार्या मृत्यूचा धोका 41 टक्क्यांनी कमी होतो. ज्या लोकांनी आठवड्याला सरासरी 48 कि.मी. किंवा त्याहून जास्त सायकल चालवली त्यांच्या शरीरासाठी ते फारच उपयुक्त ठरले.

           याशिवाय आठवड्याला किमान 10 किलोमीटर चालणार्यांमध्ये हृदयविकार बळावण्याची शक्यता बर्याच अंशी कमी झाल्याचेही संशोधनात आढळले. ग्लासगो युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. जेसन गिल यांनी सांगितले की, सायकलला जीवनाचा भाग बनवल्यास त्याचा शरीराला मोठा लाभ मिळतो व अनेक आजार दूर ठेवण्यास मदत मिळते. तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल व कॅन्सर या गंभीर आजाराला दूर ठेवायचे असेल, तर सायकल चालवणे लाभकारक ठरते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

2050 मधील लोकसंख्या आणि भारत

           फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज’ या लोकसंख्येचा अभ्यास करणार्या जागतिक संस्थेने 2013 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या द्वैवार्षिक अहवालात नमूद केले होते की, 2050 पर्यंत भारत हा लोकसंख्येच्यादृष्टीने जगात सर्वात मोठा देश असेल. 2050 मध्ये भारताची लोकसंख्या 1 अब्ज 60 कोटी होऊन या काळात चीनची लोकसंख्या मात्र 1 अब्ज 30 कोटी राहील. या अहवालानुसार जागतिक मानवी लोकसंख्या 7 अब्ज 10 कोटींवरून वाढून 2050 मध्ये ती सुमारे 9 अब्ज 70 कोटी होईल.

           जगातील लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोक आफ्रिका खंडात राहणारे असतील आणि त्यातल्या एकट्या नायजेरियाची लोकसंख्या अमेरिकेच्याही पुढे जाईल, असेही या अहवालात म्हटले होते. लोकसंख्येमध्ये अमर्याद वाढ व्हायची कारणे अनेक असतात. देशात जन्माला येणार्या बालकांची संख्या वाढणे हे मुख्य कारण जरी असले, तरी वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मृत्यूदर कमी होणे, तसेच एका देशातून दुसर्या देशात स्थलांतरित होणार्या लोकांच्या प्रमाणातील वृद्धी होते. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य या माणसाच्या आवश्यक गरजांची उपलब्धता जिथे मुळातच कमी असते, अशा देशांतून किंवा प्रदेशांतून, या सोयी जिथे भरपूर आहेत अशा ठिकाणी लोक नेहमीच स्थलांतरित होत आले आहेत. त्यामुळे नद्यांच्या सुपिक खोर्यात मानवांची संख्या वाढत जाते आणि वाळवंटात, हिमाच्छादित प्रदेशात किंवा पर्वतीय दुर्गम भागात ती विरळ असते.

           लोकसंख्येचा स्फोट झाल्याने मानवी जीवनातील सुखसोयींवर विपरीत परिणाम होऊन राहणीमानाचा दर्जा खूपच खालावू शकतो, कारण -

           1) अन्नपाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचे मोठ्या प्रमाणावर वाटप होऊन त्यांची कमतरता भासू लागते.

           2) मानवी वस्तीसाठी जंगले नष्ट केली जातात. डोंगर, टेकड्या पादाक्रांत केल्या जातात आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो.

           3) खाणारी तोंडे आणि मूलभूत सेवा-सुविधा वापरणार्या व्यक्ती वाढल्याने राष्ट्रीय अर्थनियोजनाचा बोजवारा उडतो. साहजिकच, विकासदर खूप खालावतो. या गोष्टी यापुढे निश्चितच गंभीर होतील. त्यामुळे या बाबींचे यथायोग्य नियोजन आतापासूनच होणे नितांत आवश्यक आहे.

           पाण्याचे दुर्भिक्ष -

           मुंबई, पुणे, औरंगाबाद या महाराष्ट्रातील शहरांतच नव्हे, तर राजधानी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद अशा महानगरांमध्ये, तसेच भारतातील वाढत्या शहरांमध्ये, ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. ‘युनो’च्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये जगातील 40 टक्के जनता पाण्याच्या टंचाईने त्रस्त होणार आहे, मग भारतच त्याला अपवाद कसा ठरणार? त्यामुळे भारतासारख्या मोसमी पावसावर अवलंबून असणार्या देशात, पावसाळ्यातील 4 महिने पडणार्या पाण्याचे नियोजन करणे हे सर्वोच्च उद्दिष्ट ठेवायला हवे.

           लागवडीखालील शेतजमीन -

           लोकसंख्या वाढीमुळे शहरांचा आणि गावांचा विस्तार होतच राहणार आहे. हा विस्तार होताना जमिनीचे भाव वाढणार आणि पर्यायाने त्या गावालगतची शेतजमीन गिळंकृत होऊनच हा विस्तार होणार हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे लागवडीखालील शेते झपाट्याने कमी होत जाऊन शेतमालाची प्रचंड टंचाई निर्माण होईल. यासाठी शहरांचा विस्तार करताना लागवडीखालील जमीन व्यवस्थित राहावी याकडे लक्ष पुरवणे महत्त्वाचे ठरेल.

           अन्नपुरवठा आणि आयात -

           लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत जाणार त्या प्रमाणात अन्नपुरवठा नक्कीच वाढणार नाही. आपण ज्या गोष्टींत स्वयंपूर्ण आहोत, त्याही हळूहळू कमी पडत जातील. त्यात शेतीच नष्ट होत गेल्यामुळे सार्या जीवनावश्यक गोष्टी, अगदी दूधसुद्धा आयात करायची वेळ येऊ शकते, परंतु एकूण एक गोष्ट आयात केल्यास त्यामुळे होणारी भाववाढ आणि वाढत्या आयातीमुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होणारे गंभीर परिणाम कल्पनेच्याही पलीकडे त्रासदायक ठरतील.

           आरोग्य -

           देशाच्या वार्षिक सरासरी उत्पन्नामधील फक्त 1.4 टक्के रक्कम आरोग्यावर खर्च होते. लोकसंख्या वाढीमुळे ही टक्केवारी निम्म्याहून खाली येईल. साहजिकच, सार्वजनिक आरोग्याचा पुरेपूर बोजवारा उडून रोगराई वाढेल. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने सांडपाण्याचे नियोजन फार दूरदर्शीपणे करावे लागेल.

           प्रदूषण -

           आज फक्त दूषित पाण्यामुळे सव्वा कोटी लोक दरवर्षी गंभीर आजारांना सामोरे जातात. सुमारे 30 लाख जनता वायुप्रदूषणामुळे आजारी पडते. लोकसंख्या वाढीमुळे जल आणि वायुप्रदूषण कमालीचे वाढणार यात शंकाच नाही.

           समुद्रकिनारे -

           समुद्रकिनार्यांलगत नेहमी वस्तीची वाढ जास्त होत असते. जगातील 50 टक्क्यांहून अधिक समुद्रकिनारे मानवी वस्तीमुळे, सांडपाण्यामुळे विद्रूप होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अतिलोकसंख्येमुळे निर्माण होणार्या घाणीमुळे समुद्रकिनारे खराब तर होतातच, पण समुद्रातील मच्छीमारी मोठ्या प्रमाणात वाढून जलचरांच्या अस्तित्वावर आणि माशांच्या अस्तित्वावरच घाला बसण्याची वेळ येते.

           शिक्षण -

           1 अब्ज 60 कोटी जनतेत शालेय, महाविद्यालयीन तसेच उच्च शिक्षणाचे प्रमाण योग्य ठेवणे आणि निरक्षरता नष्ट करणे फारच जिकिरीचे ठरेल. आधीच आपल्याकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची परिस्थिती दयनीय आहे. त्यामुळे गरिबांसाठी सरकारी शाळा आणि उच्च शिक्षणाच्या योजना लवकरच आखाव्या लागतील.

           वीजटंचाई -

           फक्त जलविद्युतवर अवलंबून असल्याने आपल्या देशात सर्वत्रच विजेची टंचाई बारोमास जाणवते. वैज्ञानिक आणि सामाजिकदृष्टीने आण्विक विद्युत प्रकल्प आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांबाबतीत मोठ्या प्रमाणावर धोरणात्मक पावले उचलावी लागतील. उद्योगधंद्यांच्या वाढीच्यादृष्टीने ते खूप गरजेचे ठरेल. या सर्व घटकांचा साकल्याने विचार करूनच 2050 मधील भारतीय लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी आतापासूनच ठोस योजना आखाव्या लागतील.

                                                                                                                                                                              - डॉ. अविनाश भोंडवे

१० जुलै २०१७

तेलाच्या किमतीत 3 टक्क्यांनी घट

           अमेरिकेने खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये वाढ केल्याने तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचा पुरवठा नियंत्रित करण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला आहे. या प्रकारामुळे गतसप्ताहामध्ये खनिज तेलाच्या किंमतीत 3 टक्क्यांनी घट झाल्यामुळे ओपेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ओपेक देशांनी जून महिन्यात प्रतिदिन 2 दशलक्ष पिंपे खनिज तेलाची निर्यात केली आहे.

           एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेमध्ये ही निर्यात चांगली झाली आहे. उत्पादनावर कठोर निर्बंध घालूनही खनिज तेलाचे उत्पादन वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढून भाव कमी होत आहेत. ओपेक देशांचा सहयोगी सदस्य असलेल्या रशियाने 24 जुलै रोजी होणार्या बैठकीमध्ये करारामध्ये काही बदल करण्याबाबतचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी काळात तेलाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

सरकार जवानांसाठी खरेदी करणार 1.85 लाख रायफल्स

           लष्कराने स्वदेशी असॉल्ट रायफल्स नाकारल्यानंतर काही आठवड्यातच सरकारने जुन्या झालेल्या इन्सास रायफल्स बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने उच्च क्षमतेच्या 1.85 लाख रायफली खरेदी करण्याच्या प्रक्रियेला वेग आणण्याचा निर्णय घेतला आहे.

           लष्कर 7.62 x 51 एमएम रायफल्सची खरेदी प्रक्रियेचा वेग वाढवण्यावर भर देत आहे. लष्कराने किमान 65 हजार रायफल्स त्वरीत खरेदी करण्याची मागणी केली आहे. या रायफली लवकर आल्या तर सीमेवर आणि दहशतवाद विरोधी अभियानावेळी याचा उपयोग करता येईल, असे लष्कराचे म्हणणे आहे. असॉल्ट रायफलींबाबत 20 बंदूक निर्मात्यांकडून माहिती मागवली आहे. यामध्ये अनेक विदेशी कंपन्यांचाही समावेश असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले. 

           सैन्य दलाला असॉल्ट रायफलची गरज -

           गत महिन्यात लष्कराने इच्छापूर येथे असलेल्या सरकारी रायफल कारखान्यात तयार झालेल्या 7.62 x 51 एमएम रायफल्स निकृष्ठ दर्जा आणि गोळीबाराच्या क्षमतेचा हवाला देत नाकारले होते. लष्कराला असॉल्ट रायफल्सची गरज आहे आणि या रायफल्सची निविदा येत्या काही महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

           सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वदेशी रायफल कारखान्याकडून उत्पादित रायफल्समध्ये अनेक कमतरता आहेत. या रायफल्सचा वापर करायचा असेल तर मॅगझीनचे पुन्हा एकदा डिझाईन करण्याची आवश्यकता होती. लष्कराने मागील महिन्यातही एस स्वदेशी असॉल्ट रायफल मानक पूर्ण करत नसल्याने नाकारले होते. याला 5.56 एमएम एक्सकॅलिबर रायफल म्हटले जाते.

९ जुलै २०१७

जी-20 कडून भारताचे कौतुक

           जागतिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा आणि सातत्यपूर्ण, सर्वसमावेशक विकासासाठी भारताने उचललेल्या पावलांची जी-20 देशांनी स्तुती केली आहे. भारतामध्ये ‘स्टार्ट-अप’ उपक्रम, ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ला प्राधान्य आदी बाबींचे आंतरराष्ट्रीय समुदायाने कौतुक केले.

           हॅम्बर्ग येथे झालेल्या जी-20 परिषदेमध्ये स्वीकारलेल्या कृती आराखड्यात भारताच्या आर्थिक कामगिरीची दखल घेतली. जी-20 परिषदेने म्हटले आहे, की आर्थिक क्षेत्रामध्ये सुधारणा घडवण्यासाठी भारतात इलेक्ट्रॉनिक व्यापाराची आणि इतर अनेक दालने खुली करण्यात येत आहेत. भारत बाह्य व्यावसायिक कर्जांना (ईसीबी) स्टार्ट-अपच्या माध्यमातून साह्य करीत असून, व्यापार अधिक सुलभरीत्या व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे.

           जी-20 च्या सदस्य देशांच्या प्रयत्नांचाच हा भाग आहे. कृती आराखड्यात म्हटले आहे, की भारतामध्ये कामगार क्षेत्रात सुधारणा सुरू आहे. कामगारांना सुरक्षा पुरवणे, महिला कामगारांच्या संख्येत वाढ करणे आणि व्यापार सुलभ करणे या बाबी भारतामध्ये सुरू आहेत. जी-20 देशांनीच भारताची कामगिरी अधोरेखित केल्याने भारतातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे चित्र आहे. देशातील व्यापार क्षेत्रात सुलभता यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत.

आगामी दशकात भारतच आर्थिक वृद्धीचे मुख्य केंद्र

           वैविध्यकरणासह सुधारणांवर भर देत आर्थिक आघाडीवर स्थिती भरभक्कम करण्याच्या दिशेने केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे आगामी दशकात भारतच जागतिक आर्थिक वृद्धीचे केंद्र होईल. या आर्थिक वाटचालीत चीनला भारत पिछाडीवर टाकेल, असा निष्कर्ष अमेरिकेतील नावाजलेल्या हार्वर्ड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राने (सीआयडी) आर्थिक वृद्धीबाबत केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनाअंती काढला आहे.

           या संशोधनानुसार 2025 पर्यंत भारत आणि युगांडा 7.7 टक्के वार्षिक आर्थिक वृद्धी दराने जगातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था असेल. एकीकडे भारतीय आर्थिक वृद्धीच्या वाटेने आगेकूच करीत असताना येणार्या दशकात मात्र जागतिक आर्थिक वाटचाल सुस्तावलेली असेल, असा इशाराही हार्वर्ड विद्यापीठातील या केंद्राच्या संशोधकांनी आर्थिक वृद्धीसंदर्भात अंदाज व्यक्त करताना दिला.

           गेल्या काही वर्षांपासून जागतिक आर्थिक घडामोडीचे मुख्य केंद्र चीनऐवजी भारत बनले आहे. आगामी दशकापर्यंत भारतच जागतिक आर्थिक वृद्धीचे मुख्य केंद्र असेल. तथापि, उदयोन्मुख अर्थव्यवस्थेची गती वेगवेगळी असू शकते. इंडोनेशिया आणि व्हिएतनामच्या नेतृत्वाखाली आग्नेय आशिया आणि पूर्व आफ्रिकेत वृद्धीचे नवे केंद्र निर्माण होईल, अशी आशाही यात व्यक्त केली आहे.

           भारताने आर्थिक सुधारणांची प्रक्रिया राबवत नवनवीन क्षेत्राच्या विकासासाठी वैविध्यपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे भारताची वित्तीय स्थिती सक्षम होत भरभक्कम झाल्याने भारत आर्थिक वृद्धीच्या दिशेने दमदारपणे आगेकूच करीत आहे, असेही स्पष्ट नमूद केले आहे. भारताने निर्यात क्षेत्रातील वैविध्यावर भर दिला. निर्यात व्यापारात रासायनिक, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासारख्या किचकट क्षेत्राला उभारी दिली.

           आर्थिक वृद्धीसंदर्भातील ताजी आकडेवारी चीनच्या निर्यात व्यापारात लक्षणीय घट झाल्याचे दर्शविते. जागतिक आर्थिक मंदीनंतर पहिल्यांदाच चीनचे आर्थिक पतमानांकन चार पायर्यांनी खाली घसरले आहे. तथापि, आर्थिक वृद्धी दराच्या बाबतीत चीनचा दर आजही जागतिक सरासरीपेक्षा अधिक असला तरी आगामी दशकांत चीनचा आर्थिक वृद्धी दर 4.4 टक्के असेल असा अंदाज आहे. आजघडीच्या तुलनेत ही घट लक्षणीयच आहे. एकमेव संसाधनांवर विसंबून असलेल्या सर्व प्रमुख तेल उत्पादक देशांना अनपेक्षित अडचणीचा सामना करावा लागत आहेत.

           भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांनी मात्र वैविध्यकरणासह नव्याने क्षमता केली असल्याने आगामी काळात या देशांचा आर्थिक वाटेवरील वेग अधिक असेल, असे या केंद्राचे संचालक व हार्वर्ड केनेडी स्कूलचे प्रो. रिचर्ड हौसमन यांनी म्हटले आहे.

८ जुलै २०१७

नरेंद्र मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची घेतली भेट

           भारत आणि चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या सिक्कीम सीमेच्या वादावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात सुरुवातीला भेट होणार नाही, अशी चर्चा होती. मात्र जी-20 शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चासुद्धा केली आहे. त्यामुळे मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मोदी आणि शी जिनपिंग यांनी भेट घेतल्याची अधिकृत माहिती दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, भेटीदरम्यानची माहिती अद्यापही उघड केलेली नाही.

           दरम्यान, चीनने जर्मनीतील हॅमबर्ग येथे पार पडणार्या जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द केल्याची घोषणा केली होती. मात्र अचानक या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्या वातावरण पोषक नसल्याचे चीनने स्पष्ट करत भेट घेणार नसल्याचे सांगितले होतं. भारत आणि चीनमधील वाद संपवण्यामध्ये ही बैठक महत्त्वाची ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी दोन्ही देशाच्या प्रमुखांमध्ये हॅमबर्ग येथे बैठक होईल, असे सांगण्यातही येतेय. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग जी-20 परिषदेत बातचीत करत सिक्कीम सीमेवर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये सुरू असलेला वाद संपवतील, अशी सूत्रांची माहिती होती. मात्र अद्यापही सिक्कीम सीमेसंदर्भात काही चर्चा झालीय, याचा तपशील अद्यापही उघड झालेला नाही.

           जर्मनीत होत असलेल्या जी 20 शिखर परिषदेमध्ये चीनला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सोबतच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांना परिषदेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनीदेखील भारताचे कौतुक करताना दहशतवादाविरोधात घेतलेली कठोर भूमिका आणि आर्थिक विकासात होत असलेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले.

निर्मला शेरॉन, महम्मद अनास यांना सुवर्ण

           भारताच्या महम्मद अनास व निर्मला शेरॉन यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात 400 मीटर धावण्याची शर्यत जिंकली आणि 22 व्या आशियाई मैदानी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. पाठोपाठ अजय कुमार व पी. यू. चित्रा यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात 1500 मीटर धावण्याची शर्यतजिंकली. भारतीय धावपटूंनी एकंदर सुवर्णपदकांची कमाई करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताने आतापर्यंत 6 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्य अशी 14 पदके मिळवली आहेत आणि पदक तालिकेत अव्वल स्थान राखले आहे. राजीव आरोकियाने पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवले, तर जिस्ना मॅथ्यूने महिलांच्या विभागात याच शर्यतीत अनुक्रमे कांस्यपदकाची कमाई केली. लिंग निदान चाचणीचे दडपण असलेल्या द्युती चंदने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले.

           21 वर्षीय निर्मलाने 400 मीटरचे अंतर 52.01 सेकंदांत पार केले. जिस्नाने हे अंतर 53.32 सेकंदांत पूर्ण केले. व्हिएतनामच्या क्वाच थेईला रौप्यपदक मिळाले. भारताच्या एम.आर.पुवम्माला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 400 मीटर अंतराची शर्यत महम्मदने 45.77 सेकंदांत जिंकली. त्याचाच सहकारी आरोकियाने रुपेरी कामगिरी करताना हे अंतर 46.14 सेकंदांत पूर्ण केले. केरळच्या चित्राने भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घालताना 1500 मीटर अंतराची शर्यत 4 मिनिटे 17.92 सेकंदांत पार केली. तिने चीनची गेंग मिन व जपानची आयोका जिन्हौचीवर मात करीत आश्चर्यजनक कामगिरी केली.

            पुरुषांमध्ये 1500 मीटर अंतर 3 मिनिटे 45.85 सेकंदात पूर्ण करीत अजय कुमारने सुवर्णपदक जिंकले. त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेतेपद आहे. महिलांच्या 100 मीटर अंतराच्या शर्यतीत द्युतीला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिला हे अंतर पार करण्यास 11.56 सेकंद वेळ Aलागला. पुरुषांमध्ये भारताचा स्थानिक खेळाडू अमियकुमार मलिकला चुकीच्या प्रारंभामुळे 100 मीटर शर्यतीमधून बाद व्हावे लागले.

७ जुलै २०१७

जगातील सर्वात रूंद नदी!

    जगभरातील अनेक नद्या आपल्या लांबी, रुंदीसाठी ओळखल्या जातात. अ‍ॅमेझॉन, नाईलसारख्या नद्यांची मोठीच ख्याती आहे. मात्र, जगातील सर्वात रूंद नदी आहे दक्षिण अमेरिकेत. उरूग्वे आणि अर्जेंटिनाच्या सीमेवरील या नदीचे नाव मरिओ डे ला प्लाटाफ असे आहे. या नदीचे पात्र तब्बल 220 किलोमीटर रुंदीचे आहे. ही नदी अशी वैशिष्ट्यपूर्ण असली तरी ती तितकी प्रसिद्ध नाही, याचे कारण म्हणजे अनेक भूगर्भ संशोधक तिला नदी मानतच नाहीत. अनेकांच्या मते, ही एक खाडी आहे. मात्र, तेथील पाणी गोडे असल्याने त्याला मखाडीफ म्हणता येत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी उरूग्वे आणि पेराना नदी येऊन मिळते. मात्र, अर्जेंटिना आणि उरूग्वे हे दोन्ही देश रिओ डे ला प्लाटाला एक नदी म्हणूनच ओळखतात. याठिकाणी दोन नद्यांचा संगम होऊन त्या अटलांटिक महासागरात मिळत असल्याने तिथे तिचे पात्र मोठे आहे.

       1516 मध्ये एक स्पॅनिश दर्यावर्दी जुआन दिज डे सोलिस याने या नदीचा सर्वप्रथम शोध घेतला होता. त्यावेळी तो अटलांटिक आणि प्रशांत महासागरादरम्यानचा मार्ग शोधत होता. त्यावेळी त्याने या विशाल नदीचा उल्लेख मगोड्या पाण्याचा समुद्रफ असा केला.

       1520 मध्ये एक पोर्तुगीज नाविक फर्डिनंड मॅगेलान याने यावर काही संशोधन केले. इटालियन संशोधक सॅबस्टीयन कॅबोट यानेही 1526 ते 1529 या काळात या नदीबाबत बरेच संशोधन केले. त्यानंतर या नदीला मरिओ डे ला प्लाटाफ असे नाव दिले. सॅबेस्टीयन यानेच या काळात पेराना आणि उरूग्वे नदीचाही शोध लावला.

संजीवनी जाधवला ब्राँझ

        आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरलेल्या भारतीय अ‍ॅथलिट्सने येथील कलिंगा स्टेडियमवर 22 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 2 सुवर्णपदकांसह 7 पदके मिळवीत पदकतालिकेत आघाडी घेतली. महिलांच्या गोळाफेकीत मनप्रीत कौर तर पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत जी. लक्ष्मणने सुवर्णपदकावर नाव कोरले. दोघांचे हे आशियाई स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक होय.

       पुरुषांच्या थाळीफेकीतील आशास्थान विकास गौडाला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले तर महिलांच्या लांब उडीत व्ही. निनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर नयना जैम्सने ब्राँझपदक जिंकले. कविता राऊतनंतर नाशिकची पताका फडकविणार्‍या संजीवनी जाधवने 5000 मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.

      यंदा चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रँडप्रिक्स स्पर्धेत 18.86 या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकणार्‍या मनप्रीतने 18.28 मीटर अंतरावर गोळा फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. 2 वर्षांपूर्वी वुहानच्या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणार्‍या जी. लक्ष्मणनने 5000 मीटर शर्यतीत शेवटच्या फेरीत वेग वाढवित पदकाचा रंग सोनेरी केला. त्याने 14 मिनिटे 54.48 सेकंद वेळात शर्यत पूर्ण केली. कतारचा यासेर सलेम रौप्य तर सऊदी अरेबियाचा तारीक अहमद ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. भारताचा दुसरा धावपटू मुरली गावीतला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

       महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत संजीवनी जाधवने सुरवात भन्नाट केली. चार फेर्‍यापर्यंत ती आघाडीवर होती. शेवटच्या फेरीत कझाकिस्तानच्या दारिया मासलोव्हाला गाठणे संजीवनी व माजी विजेत्या संयुक्त अरब अमिरातच्या आलिया सईदला शक्य झाले नाही. शेवटच्या 60 मीटरमध्ये आलियाने संजीवनीला मागे टाकीत 15 मिनिटे 59.95 सेकंदात रौप्य जिंकले. विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार्‍या संजीवनीने 16 मिनिटे 00.24 सेकंदात शर्यत पूर्ण केली. कविता राऊतनंतर आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली. कविताने 2009 च्या गुंगझाओ स्पर्धेत 2 पदके जिंकली होती. सुवर्णपदक विजेत्या दारियाने 15 मिनिटे 57.95 सेकंद वेळ दिली.

       पुरुषांच्या थाळीफेकीत 2013 व 2015 च्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या विकास गौडाची सुरवात निराशजनक झाली. उलट सुवर्णपदक विजेत्या एहसान हदादीने पहिल्याच प्रयत्नात 61.67 मीटर अंतरावर थाळी फेकून आपले इरादे स्पष्ट केले. लंडन ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या एहसानने शेवटच्या प्रयत्नात 65.54 मीटर अंतरावर थाळी फेकून सुवर्णपदक निश्‍चित केले. त्याचे हे कारकिर्दीतील पाचवे सुवर्णपदक होय. मलेशियाच्या महम्मद इरफानने शेवटच्या प्रयत्नात 60.96 मीटरवर थाळी फेकीत रौप्यपदक मिळविले. विकासला 60.81 मीटर कामगिरीसह ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

       महिलांच्या लांब उडीत व्हिएतनामची बु थी थू आणि भारताची व्ही. निना यांची 6.54 मीटर अशी सारखीच कामगिरी होती. मात्र, निनाची दुसरी सर्वोत्तम उडी 6.25 तर बु हिची 6.44 असल्याने नियमाप्रमाणे बु हिला सुवर्णपदक मिळाले. भारताच्या नयना जैम्सला 6.42 मीटरसह ब्राँझपदक मिळाले. महिलांच्या भालाफेकीत ली लिंगवेईने सुवर्णपदक जिंकले. भारताची राष्ट्रीय विक्रमवीर अनू राणीला 57.32 मीटरसह ब्राँझपदक मिळाले.  

६ जुलै २०१७

कॅग अहवाल (महाराष्ट्राची आर्थिक प्रगती)

      दि. 15 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या कॅगच्या अहवालात (Comptroller and Auditor General) प्रगतिशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची प्रगती खुंटली असल्याचा निष्कर्ष कॅगने काढला आहे. 

 • कॅगच्या अहवालात 2005 ते 2015 या दहा वर्षांच्या कालावधीचा राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे. 
 • 2005 ते 2015 या कालावधीत ज्या प्रमाणात राज्याची लोकसंख्या वाढली, त्या प्रमाणात आर्थिक प्रगती झाली नसल्याचा उल्लेख कॅग अहवालात आहे. 
 • 2005 ते 2015 या काळात भारतातील राज्यांचा सकल उत्पादन वाढीचा दर 15.44% इतका होता तर त्याच कालावधीत महाराष्ट्राचा सकल उत्पादन वाढीचा दर 14.81% इतका राहिला. या अर्थाने महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षांत कमी आर्थिक प्रगती केल्याचे कॅगने नमूद केले आहे. 
 • 2011 ते 2015 या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या 'एकूण स्थूल उत्पादन' (जीडीपी) वाढीच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे कॅगच्या अहवालात नोंदवले गेले आहे. 
 • 2010-2011 मध्ये राज्याचा जीडीपी वाढीचा दर 22.60% होता तर 2014-2015 मध्ये हाच दर 11.69% इतका घसरल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General) 
       भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या यंत्रणेची निर्मिती केली गेली आहे. कॅग - कर्तव्य आणि अधिकार 1976 या कायद्यानुसार कॅगला लेखापरीक्षणाचे काम करावे लागते. 

 • केंद्र सरकार तसेच देशातील सर्व राज्य सरकारे आणि जेथे विधानसभा आहे, अशा राज्य सरकारच्या संचित निधीतून झालेला खर्च हा कायद्याने ठरवून दिल्याप्रमाणे झाला आहे की नाही, हे तपासण्याचे काम 'कॅग' करते. 
 • केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या संस्थांना, महामंडळांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करत असते. अशा संस्थांचा व्यय-अव्यय तपासून त्याचा अहवाल तयार करते. 
 • स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उद्योग तसेच सार्वजनिक उद्योगांतील गुंतवणूक - निर्गुंतवणूक व्यवहारांची तपासणी करून अहवाल तयार करते. 
 • केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध मंत्रालयांनी / खात्यांनी केलेले व्यवहार जमा-खर्च तसेच आकस्मिक निधीतून झालेला खर्च या सर्वांची तपासणी आणि अहवाल तयार करण्याचे काम 'कॅग' करते. 
 • सध्या भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) शशिकांत शर्मा आहेत. या आधीचे कॅग विनोद रॉय मे 2013 मध्ये निवृत्त झाल्यानंतर शशिकांत शर्मा हे भारताच्या कॅगपदी आले.

भारत आणि इस्रायलमध्ये 7 महत्त्वपूर्ण करार

       भारत आणि इस्रायल या दोन देशांनी 7 मोठ्या करारांवर स्वाक्ष-या केल्या आहेत. कृषी क्षेत्रासह अवकाश संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी हे करार करण्यात आले आहेत. मोदी आणि नेत्यानाहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे. अंतराळ, कृषी आणि संरक्षण क्षेत्रांतील सहकार्याबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. त्याप्रमाणेच गंगा स्वच्छतेसाठीही इस्रायलने भारतासोबत करार केलाय. भारत आणि इस्रायलमध्ये तब्बल 17 हजार कोटींचे करार झाले आहेत.

      भारत आणि इस्रायलमधल्या सात महत्त्वाच्या करारांमध्ये अवकाश संशोधन, कृषी आणि संरक्षण क्षेत्रांचा समावेश आहे. दोन्ही देश औद्योगिक क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सहकार्य करणार आहेत. पाणी आणि स्वच्छता क्षेत्रातही भारत आणि इस्रायल एकमेकांना मदत करणार आहेत. जलसंधारण, लहान उपग्रह या क्षेत्रांतही प्रगती करण्यासंदर्भात इस्रायल आणि भारतामध्ये करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'नमामि गंगे'ची स्वच्छता करण्यासाठी इस्रायल हातभार लावणार आहे.

भारत आणि इस्रायलमध्ये 7 करार

1 .40 कोटी डॉलरच्या भारत-इस्रायल इंडस्ट्रियल आर अँड डी अँड टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन फंडासाठी करार

2. भारताच्या जल संरक्षणासाठी करार

3. भारतातल्या राज्यांमध्ये पाण्याची गरज भागवण्यासंदर्भात करार

4. भारत-इस्रायल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन- कृषीच्या 3 वर्षांच्या (2018-2020)कार्यक्रमाची घोषणा

5. इस्रो आणि इस्रायलमध्ये आण्विक घड्याळ विकसित करण्यासाठीच्या सहयोगाची योजना

6. जीईओ आणि एलईओ ऑप्टिकल लिंकसाठी करार

7. छोट्या सॅटलाइटपासून वीजनिर्मिती करण्यासाठी करार

५ जुलै २०१७

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ए. के. जोती

     निवडणूक आयुक्त अचलकुमार ए. के. जोती यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी 6 जुलै रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी जोती यांची नेमणूक करण्यात आल्याबाबत कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. जोती हे 6 जुलै रोजी कार्यभार स्वीकारणार आहेत.

     अचलकुमार जोती (64) हे 1975 च्या बॅचचे सनदी अधिकारी असून, त्यांना दीर्घकाळ प्रशासनाचा अनुभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्य सचिव म्हणून काम पाहिले, तसेच गुजरात दक्षता समितीचे आयुक्त, कांडला पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, उद्योग, महसूल आणि पाणीपुरवठा विभागाचे सचिव या पदांवर काम पाहिले आहे.

     जोती हे जानेवारी 2013 मध्ये गुजरातचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. 8 मे 2015 रोजी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा वय वर्षे 65 इतका असल्याने जोती पुढील वर्षापर्यंत या पदावर असतील.

जननी सेवा योजना

        जून 2016 पासूनच जननी सेवा योजनेची सुरुवात करण्यात आली होती. मात्र मुलांसाठी आहाराचे पत्रक अजून निश्‍चित केले नसल्याने आता काही मोठ्या स्थानकांवर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. आई-वडिलांना वेळप्रसंगी अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी ही योजना खास सुरु करण्यात आली आहे.

       रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून जननी सेवा योजनेची घोषणा करण्यात आली. एका कार्यक्रमात त्यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रेल्वे स्थानकावर लहान मुलांचा आहार आता उपलब्ध होणार आहे. 2016-17 च्या रेल्वे अर्थसंकल्पानुसार ही घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बाळाचा आहार, गरम दुध आणि गरम पाणी रेल्वे स्थानकावरील दुकांनामध्ये उपलब्ध होणार आहे.

        या योजनेला जननी सेवा योजना असे नाव देण्यात आले आहे. जननी सेवा योजना देशातील मुख्य रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असणार आहे. ई-कॅटरिंग योजनेच्या माध्यमातून मुलांसाठी आहाराची उपलब्धता निश्‍चित केली जात आहे. ई-कॅटरिंग योजनेच्या माध्यमातून लखनऊ, जयपूर, अजमेर, हावडा, चेन्नई आणि पठाणकोट येथील स्टेशनवर मुलांसाठी आहार उपलब्ध राहील अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार ह.भ.प. वक्ते यांना जाहीर

      राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा यंदाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर केला आहे. बुलढाण्याचे ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांना यंदाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2016-17 देण्यात येणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे.

      ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1934 रोजी बुलडाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. अवघ्या 9 व्या वर्षांपासून त्यांनी कुटुंबियांच्या सोबतीने मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरु केली. प्राथमिक शिक्षणाबरोबर त्यांना संत साहित्याची विशेष आवड असल्याने त्यांनी बालवयातच अडीच हजार अभंगांचे पठण केले होते. 1954 ते 1958 या काळात त्यांनी साखरे महाराज मठात श्री गुरु निलकंठ प्रभाकर मोडक यांच्याकडे अध्ययन केले.

      पुढे 1992 पर्यंत त्या काळातील थोर पंडित संत महात्मे, ह.भ.प.परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारुरकर, गोपाळ शास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर आदि संत महात्मांच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ पुराण इत्यादी ग्रंथाचा पंढरपूर येथे अभ्यास करुन चार्तुमासामध्ये 60 वर्षांपासून त्यांचे अध्ययन व अध्यापनाचे कार्य चालू आहे. विठ्ठल कवच, विठ्ठल सहस्त्रणाम, विठ्ठल स्तवराज, विठ्ठल अष्टोत्तरनाम, विठ्ठल हृदय, मुक्ताबाई चरित्र, ज्ञानेश्‍वर दिग्विजय, वाल्मिकी रामायण, संत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमन अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. ह.भ.प.वक्ते यांची कीर्तन, प्रवचनाद्वारे मानवतावादी सेवा अखंड सुरु असून त्यांच्या मागदर्शनाखाली हजारो साधकांनी शास्त्राचा अभ्यास करुन राष्ट्र जीर्णोद्धाराचे कार्य करीत आहेत.

जुन्या नोटा बदलण्यासाठी आणखी मुदत शक्य

       नोटाबंदीच्या काळात ज्यांना 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बदलून घेणे शक्य झाले नाही त्यांना आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला फटकारताना नोटा बदलून घेण्यासाठी लोकांना आणखी संधी का दिली नाही, अशी विचारणा केली आहे. नोटा बदलण्यासाठी आणखी मुदत देणे शक्य आहे काय, याचा विचार करून त्याबाबत येत्या 15 दिवसांत म्हणणे मांडण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेलाही दिला आहे.

        जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी केंद्र सरकारने 30 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत लाखो ग्राहकांनी नोटा बदलून घेतल्या. मात्र, त्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अक्षरशः दिवसभर रांगेत थांबावे लागले होते. नोटा बदलून घेण्याची प्रक्रियाही खूपच क्लिष्ट असल्याच्या अनेकांच्या तक्रारी होत्या. यातील काही ग्राहकांनी केंद्राच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. या सर्व याचिकांवर सध्या एकत्रित सुनावणी सुरू आहे.

        न्यायालयाच्या या निर्णयावर केंद्र सरकारच्यावतीने बाजू मांडताना सरकारी वकील रणजितकुमार म्हणाले, नोटा बदलून घेण्यासाठी सरसकट मुदतवाढ दिली जाऊ नये. ज्यांचे कारण खरोखरच संयुक्तिक आहे अशानाच नोटा बदलून घेण्याची संधी दिली जावी. यावर विचार करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदतही त्यांनी मागितली. न्यायालयाने ती मान्य केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला आता येत्या 2 आठवड्यांत याबाबत निर्णय घेऊन त्याची माहिती न्यायालयाला सादर करावी लागणार आहे.

        केंद्र सरकारने जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर अशी मुदत दिली होती. रिझर्व्ह बँकेत नोटा जमा करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत होती. बँकांना जमा झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी 20 जुलैपर्यंतची मुदत आहे.

४ जुलै २०१७

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्ट

      स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 4 ऑक्टोबर 2016 रोजी वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक - ऑक्टोबर 2016 हा अहवाल केला असून 2016 सालात जागतिक अर्थव्यवस्था 3.1 टक्के दराने तर 2017 साली 3.4 टक्केने वाढणार असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे.

      विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांमधील मंदीची स्थिती, उत्पादनांच्या मागणीतील घट या कारणामुळे भविष्यकाळातही विकास दर कमीच राहण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे.

या अहवालातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे -

*   2016 सालात विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांमधील वृद्धीदर 1.6 टक्केच्या जवळपास राहणार आहे. 2015 साली हा दर 2% टक्के होता. यापूर्वी जुलै 2010 मधील अंदाजानुसार आर्थिक वृद्धीदर 1.8 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

*   2017 साली अमेरिकेचा वृद्धीदर 2.2 टक्के राहणार आहे तर ब्रेक्झिटमुळे ब्रिटनचा वृद्धी दर 2016 व 2017 सालात अनुक्रमे 1.8 व 1.1 टक्के राहण्याची शक्यता आहे.

*   युरोपियन युनियनचा 2015 मधील वृद्धीदर 2 टक्के नोंदविला असून 2016 व 2017 या वर्षात हा दर अनुक्रमे 1.7 व 1.5 टक्केपर्यंत कमी येण्याची शक्यता आहे.

जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानचा वृद्धीदर 2016 व 2017 साली अनुक्रमे 0.5 व 0.6 टक्के राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे.

*   गेल्या 6 वर्षांत पहिल्यांदाच विकसनशील अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वृद्धीदरात वाढ होण्याची शक्यता असून 2016 व 2017 या वर्षी या अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर अंदाजे 4.2 टक्के व 4.6 टक्के असेल.

*   सब सहारन आफ्रिकेतील देशांची स्थिती बिकट असून 2016 च्या अखेरपर्यंत नायजेरियाची अर्थव्यवस्था 1.7 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

*   दक्षिण अमेरिकेतील देशांच्याही अर्थव्यवस्थेत मंदीचेच वातावरण असून 2016 व 2017 या वर्षात व्हेनेझुएलाचा वृद्धी दर -10 टक्के आणि -4.5 टक्के एवढा असेल तर याच 2 वर्षात ब्राझीलची अर्थव्यवस्थाही ऋणात्मक वाढ दर्शविण्याची शक्यता आहे.

*   या पार्श्‍वभूमीवर आशियाई अर्थव्यवस्थांची स्थिती तुलनेने बळकट असल्याचे दिसून येते. भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात 2016 व 2017 साली 7.6 टक्के या स्थिर दराने वाढ होणे अपेक्षित असून या काळात जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी ही अर्थव्यवस्था असणार आहे.

*   मात्र त्याचवेळी हा वृद्धीदर कायम राखण्यासाठी भारताने करप्रणालीतील सुधारणा लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आणि पायाभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी असा सल्ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतास दिला आहे.

*   2016 व 2017 सालात चीनच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर अनुक्रमे 6.6 व 6.2 टक्के असण्याची शक्यता आहे. 

मरे, व्हीनसची विजयी सलामी

      अमेरिकेची दिग्गज टेनिसस्टार व्हीनस विल्यम्स, गतविजेता ब्रिटनचा अँडी मरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र, यासाठी तिला बेल्जियमच्या एलिस मेर्टन्सविरुद्ध चांगलेच झुंजावे लागले. त्याचवेळी, पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ग्रेट ब्रिटनच्या अँडी मरेने अपेक्षित विजयी सलामी देताना कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बबलिकविरुद्ध सहज विजय मिळवला.

     अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात एलिसने आपल्याहून अधिक अनुभवी असलेल्या बुजूर्ग व्हीनसला कडवी टक्कर दिली. व्हीनसने पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये मात्र आक्रमक खेळ करताना 7-6 (9-7), 6-4 अशी बाजी मारली.

       पुरुष गटात गतविजेत्या अँडी मरेने धडाक्यात विजयी सलामी देताना नवख्या अलेक्झांडरचा 6-1, 6-4, 6-2 असा धुव्वा पाडला. सुरुवातीपासून मरेने केलेल्या आक्रमक खेळापुढे अलेक्झांडरचा काहीच निभाव लागला नाही. दरम्यान, पुरुष गटाच्या अन्य लढतीत निक किर्गियोसला दुखापतीमुळे पहिल्याच सामन्यातून माघार घ्यावी लागली.

       दुसरीकडे जपानचा नववा मानांकित केई निशिकोरीने इटलीच्या मार्को सेसचिताओला 72 मिनिटांच्या लढतीत 6-2, 6-2, 6-0 तर फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाने कैमरन नौरीला 6-3, 6-2, 6-2 असे पराभूत केले.

पाक पुरस्कृत दहशतवादविरोधी लढाईत इस्रायल भारताच्या पाठिशी

       पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत. इस्रायलच्या दौर्‍यावर जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे हा त्यांचा ऐतिहासिक दौराच आहे. मोदींच्या या महत्त्वपूर्ण दौर्‍यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मोदींच्या भेटीपूर्वीच इस्रायलने पाकिस्तानच्या भूमीवरून होणार्‍या दहशतवादी कारवायांविरोधातील लढाईत आपण भारताच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे.

      पाकिस्तानच्या भूमीतून लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना भारतात कारवाया करत आहे. ‘लष्कर ए तोयबा आणि हमास या दोन्ही संघटनांमध्ये कोणताही फरक नाही. इस्रायल आणि भारताला आपला बचाव करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. दहशतवादी हा दहशतवादीच असतो, असे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकार्‍याने म्हटले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील उपमहासचिव मार्क सोफर यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी लढाईत आपण भारताच्या पाठिशी आहोत. ही बाब इस्रायलने उघडपणे बोलून दाखवली आहे.

       भारत केवळ पाकिस्तानच्या भूमीतून होणार्‍या दहशतवादी कारवायांनी नव्हे तर भारतातील दहशतवादी कारवायांनीही पीडित आहे. भारताप्रमाणेच इस्रायललाही दहशतवादाशी लढावे लागते. भारताप्रमाणेच इस्रायललाही दहशतवादापासून संरक्षण करण्याचा अधिकार आहे. दोन्ही देश दहशतवादासारख्या संकटाचा सामना करत आहेत. कोणताही वाईट हेतू साध्य करण्यासाठी हत्या करणे हा दहशतवादच आहे. हे काम विदेशी भूमीतून भारतात केले जात आहे. तेच इस्रायलमध्येही घडत आहे. दोन्हीही देश दहशतवादविरोधी लढाई लढत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

      दरम्यान, इस्रायलच्या दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंना आपले मित्र असल्याचे संबोधून या दौर्‍यातून आपल्याला अनेक अपेक्षा आहेत, असे म्हटले होते. मोदींच्या या दौर्‍यादरम्यान, सैन्य, कृषी, पाणी आणि अंतराळ तंत्रज्ञान आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

३ जुलै २०१७

अमेरिकेकडून भारताला मिळणार 22 गार्डियन ड्रोन

       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा भारताला लाभदायक ठरला आहे. नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर, अमेरिकेने भारताला 22 प्रीडेटर गार्डियन ड्रोन निर्यात करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयाने भारताचे लष्करी सामर्थ्य मजबूत करण्यास मदत होईल. डीएसपी-5 श्रेणी परवाना सैन्य साहित्याच्या निर्यातीसाठी जारी केला आहे. गार्डियन ड्रोनमध्ये हिंदी महासागरातील हालचाली टिपण्यास भारतीय सैन्याला मदत होणार आहे. त्यामुळे हिंदी महासागरातील शत्रू सैन्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे भारताला शक्य होणार आहे.

      पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये 26 जून रोजी बैठक झाली होती. या बैठकीनंतर काही दिवसात हा निर्णय घेतला आहे. प्रीडेटर गार्डियन ड्रोनची किंमत 2 अब्ज अमेरीकन डॉलर म्हणजेच सुमारे 13 हजार कोटी रुपये इतकी आहे. या ड्रोनची निर्मिती जनरल अ‍ॅटनॉमिकक्स या कंपनीने केली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून ड्रोन निर्यातीचा तातडीने घेतलेला निर्णय भारत-आशिया क्षेत्रातील भारताच्या नाविक क्षमतेच्या बळकटीकरणाची इच्छा दर्शवतो.

इराणमध्ये टोटल करणार 4.8 अब्ज डॉलरचा करार

       फ्रान्समधील ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या टोटल कंपनीने फ्रान्समधील ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या टोटल कंपनीने इराणमध्ये नैसर्गिक वायू क्षेत्र विकसित करण्यासाठी 4.8 अब्ज डॉलरचा करार करणार आहे.

       इराणच्या नागरी आण्विक कार्यक्रमामुळे टाकण्यात आलेले निर्बंध आंतरराष्ट्रीय समुदायाने उठविल्यानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा करार विदेशी कंपनीकडून होत आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, की देशातील पर्शियाच्या आखातातील साऊथ पार्स या नैसर्गिक वायू क्षेत्राचा अकरावा टप्पा विकसित करण्यात येणार आहेत. याबाबत इराणचे पेट्रोलियम मंत्रालय, टोटल कंपनीचे व्यवस्थापक, चीनमधील चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि इराणमधील पेट्रोपार्स या कंपन्यांमधे हा करार होणार आहे. या करारावर स्वाक्षरी होईल.

       इराणवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्याआधी 2006 पर्यंत देशात गुंतवणूक करण्यात टोटक कंपनी आघाडीवर होती. निर्बंध उठविण्यात आल्यानंतर आता टोटलने इराणमध्ये पुनरागमन केले आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकचा सदस्य असलेला इराण हा तिसर्‍या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे.

२ जुलै २०१७

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन

      ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबई गाठलेली. तोरडमल यांना मामा या नावाने संबोधले जायचे. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ज्योतिबाचा नवस हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसे, आत्मविश्‍वास, शाब्बास सूनबाई हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.

       प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनार, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्स, विकत घेतला न्याय या नाटकांतूनही अभिनय केला होता. तब्बल 5 दशकांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातून मायबाप प्रेक्षकांना सतत हसवत ठेवणार्‍या तरुण तुर्क म्हातारे अर्क या त्यांच्या व्यावसायिक नाटकाने 5000 प्रयोगांची यशस्वी घौडदौड केलेली. तोरडमल स्वतः या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करायचे. या नाटकाविषयी एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते की, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरशः रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले.

       त्यांनी धों. कर्वे यांनी लिहिलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले होते. अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या 27 इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. त्याशिवाय, 20 पुस्तके लिहिली आहेत. उत्तरमामायण या पुस्तकात त्यांनी आपल्या नाट्यविषयक आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे मामांच्या तिसरी घंटा या आत्मचरित्राचा उत्तरार्ध म्हणायला हवा.

आयसीसी महिला विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर 95 धावांनी विजय

       आयसीसी विश्‍वचषकात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर 95 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 38 षटकांत सर्वबाद 74 धावांतच गारद झाला. भारताकडून एकता बिश्ट हिने सर्वाधिक 5 बळी मिळवले आहेत. गोस्वामी, शर्मा, जोशी आणि कौर यांनीही प्रत्येकी एक बळी टिपला आहे. पाकिस्तानकडून साना मीर आणि नाहिदा खान वगळता इतर कोणालाही धावसंख्येत दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाकिस्तानकडून नाहिदा खान हिने चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. नाहिदा खान हिने 3 चौकारांच्या जोरावर 23 धावांपर्यंत मजल मारली. मात्र कौरच्या गोलंदाजीवर तिचा निभाव न लागल्याने ती तंबूत परतली. सिद्रा नवाज, इराम जावेद, अस्वामिया इक्बाल, डायना बेग यांना भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या दोन सामन्यांवर कब्जा मिळवलेला भारतीय महिलांचा संघ या सामन्यात सुरुवातीला काहीसा ढेपाळला होता. मात्र भारतीय महिलांनी पुन्हा एकदा सामन्यावर ताबा मिळवला.

         भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या नशरा संधू आणि सादिया युसूफ यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय महिला फलंदाजांनी गुडघे टेकायला लावल्याचे चित्र उभे राहिले होते.  स्मृती मंधाना, मिताली राज, हरमनप्रीत कौर यांनी लागोपाठ बळी दिल्याने भारतीय महिला संघाला चमकदार कामगिरी दाखवता आली नव्हती. भारताकडून पूनम राऊतने 47 धावांची खेळी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पराभवाच्या छायेत असलेल्या भारतीय संघाला एकदा बिश्ट हिने नवसंजीवनी मिळवून दिली आणि विजयश्री खेचून आणला.

गुरुत्वीय लहरीचा संशोधनात्मक प्रयोग

        अमेरिकेतील लिविंगस्टन आम हॅनफर्ड येथे इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल व्हेव्ह ऑब्झर्व्हेटरीच्या जुळ्या वेधशाळा आहेत. काटकोनात एकमेकांशी जोडलेल्या चार किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून लेझर किरण सोडले जातात. बोगद्याच्या शेवटी लावलेल्या आरशांवरून त्यांचे परावर्तन होते. परावर्तित झालेले किरण हे डिटेक्‍टरद्वारे पकडले जातात. 12 सप्टेंबर 2015 रोजी लेझर किरणां- मध्ये अतिशय सूक्ष्म हालचालींची नोंद झाली. भारतीय शास्रज्ञांनी विकसित केलेल्या मॉडेलद्वारे या नोंदींचे विश्‍लेषण करण्यात आले. सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार या नोंदी तपासण्यात आल्या, त्या वेळी दोन कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेल्या त्या गुरुत्वीय लहरी असल्याचे स्पष्ट झाले. सूर्याच्या वस्तुमानानुसार 36 व 29 पट अधिक वस्तुमानाच्या कृष्णविवराची टक्कर होऊन 62 पटींनी मोठे कृष्णविवर तयार झाल्याचे शास्रज्ञांचे मत आहे. या वेळी तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी 1.3 अब्ज वर्षांनी 12 सप्टेंबर 2015 रोजी पृथ्वीपर्यंत पोचल्या व त्या नोंदविल्या गेल्या. 

           या लहरींचं आतापर्यंत थेट निरीक्षण झालेले नव्हते. पण अप्रत्यक्षरीत्या त्या शोधल्या गेल्या होत्या. 1993 चा भौतिकशास्रातला नोबेल पुरस्कार हल्स-टेलर द्वैती ताऱ्यांच्या निरीक्षण करणाऱ्या शास्रज्ञांना मिळाला. त्यांनी सांगितले होते, की दोन तारे धडकल्यानंतर त्यांच्या कक्षेत किंचित बदल झाला आहे. त्यांनी गुरुत्वीय लहरी या काही गणिती आकडेमोडीपलीकडे असतील हे अप्रत्यक्ष निरीक्षणामधून दाखवले होते. 

        भारतीयांचा सहभाग भारतातील सुमारे 61 शास्रज्ञ या प्रयोगात सहभागी झाले होते. त्यात "आयुका'तील प्रा. संजीव धुरंधर, सुकांत बोस, सेंधिल राजा, राजेश नायक, वरुण भालेराव, भूषण गद्रे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. आनंद सेनगुप्ता, तिरुअनंतपुरम येथील आयसर संस्थेच्या अर्चना पै, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे सी. एस. उन्नीकृष्णन, चेन्नई मॅथॅमॅटिकल इन्स्टिट्यूटचे के. जी. अरुण, बंगळूरचे पी. अजित, इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च झियाउद्दीन खान यांचा यात सहभाग होता. इंडियन इनिशिएटिव्ह इन ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेशन या प्रकल्पांतर्गत भारतीय शास्रज्ञ सहभागी झाले होते. या प्रयोगाचा पुढचा टप्पा म्हणून भारतातही ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेशन प्रयोगशाळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील औंढा नागनाथ जवळील दुधाळा येथील जागेची पाहणीही झाली आहे. 

भविष्यातील उपयोग 

 • अचूक जीपीएस तंत्रज्ञानासाठी 
 • स्थिर रेसर तंत्रज्ञानाच्या विकासासाठी. ब्लडलेस सर्जरी, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगला फायदा 
 • मोठ्या अवकाश मोहिमांसाठी 
 • विश्‍वाच्या उत्पत्तीनंतरच्या स्थितीच्या शोधासाठी 
 • गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाचा इतिहास 
 • 1915 - अल्बर्ट आईनस्टाईन यांनी व्यापक सापेक्षता सिद्धांत मांडला. 
 • 1916 - प्रचंड वस्तू विशिष्ट मार्गाने फिरत असल्याने गुरुत्वीय लहरी निर्माण होतात, असे आईनस्टाईन यांनी सांगितले. 
 • 1962- रशियन भौतिकशास्रज्ञ एम. ई. गेर्त्सेन्शतीन आणि व्ही. पुस्तोव्होविट यांनी गरुत्वीय लहरींचा वेध घेण्यासाठी ऑप्टिकल पद्धतीने एक रेखाकृती संशोधन पत्रात प्रसिद्ध केली. 
 • 1969- भौतिकशास्रज्ञ जोसेफ वेबर यांनी असा दावा केला, की प्रचंड अल्युमिनियम वृत्तचित्ती-प्रतिध्वनीने गुरुत्वीय लहरी शोधण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. 
 • 1972- मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे रेनर वेईस यांनी गुरुत्वीय लहरींचा वेध घेण्यासाठी स्वतंत्रपणे ऑप्टिकल पद्धत प्रस्तावित केली. 
 • 1974 - खगोलशास्रज्ञांनी परिभ्रमण करणारा स्पंदन पावणारा न्यूट्रॉन तारा शोधला. गुरुत्वाकर्षणीय किरणोत्सारामुळे हळूहळू त्याची गती मंदावत होती. या शोधासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला. 
 • 1979 - नॅशनल सायन्स फाउंडेशनने (एनएसएफ) पॅसाडेनातील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि एमआयटीला "लायगो'साठी आराखडा विकसित करण्यासाठी निधी दिला. 
 • 1990 - एनएसएफने लायगोच्या प्रयोगासाठी 25 कोटी अमेरिकन डॉलर देण्याची तयारी दाखविली. 
 • 1992 - वॉशिंग्टन आणि लुईझियानामधील ठिकाणे लायगोच्या सोयींसाठी निवडण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांनी बांधकामाला सुरवात. 
 • 1995 - जर्मनीमध्ये जीईओ 600 ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्‍टरच्या बांधकामास सुरूवात झाली. 2002 पासून माहिती मिळायला प्रारंभ झाला. 
 • 1996 - इटालीमध्ये व्हिर्गो ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्‍टरच्या बांधकामास प्रारंभ झाला. 2007 मध्ये तेथून माहिती घ्यायला प्रारंभ झाला. 
 • 2002-2010 - लायगो प्रारंभिक अवस्थेत सुरू राहिले. 
 • 2007 - लायगो आणि व्हिर्गो प्रयोगशाळांनी माहिती एकमेकांना द्यायची तयारी दाखविली. त्यांनी गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यासाठी जागतिक नेटवर्क तयार केले. 
 • 2010-2015 - लायगो डिटेक्‍टरचा दर्जा वाढविण्यासाठी 20.5 कोटी अमेरिकी डॉलर खर्च झाले. 
 • 2015 - सुधारित लायगोने प्रारंभिक शोधाला सुरवात केली. 
 • 12 सप्टेंबर 2015 - दोन कृष्णविवरांच्या टकरीतून गुरुत्वीय लहरी निर्माण झाल्याची लायगोत नोंद. 
 • 11 फेब्रुवारी 2016 - गुरुत्वीय लहरी सापडल्याची "लायगो'ची घोषणा. 

गंगा नदी

        गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि गंगा नदीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी माधव चितळे समितीची स्थापना नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन जलसंपदा मंत्रालयाने दि. 23 जुलै 2016 रोजी केली. ही समिती चार सदस्यीय असेल. या समितीचा कालावधी 3 महिन्यांचा असणार आहे. या समितीमध्ये सचिव जलसंपदा मंत्रालय, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन, सचिव, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, डॉ. मुकेश सिन्हा (संचालक, सेंट्रल पाणी आणि वीज संशोधन केंद्र) यांचा समावेश आहे. 

       माधवराव चितळे समिती पर्यावरण बदल आणि गंगा नदी प्रवाह अविरत राहावा, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल तसेच बेकायदा वाळू उपसा, पर्यावरण संरक्षण याबद्दलही मार्गदर्शक तत्त्वे ठरविणार आहे. ही समिती जुलै 2016 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या 6 व्या राष्ट्रीय गंगा बेसिन प्राधिकरणच्या बैठकीत, केंद्रीय नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या घोषणेनुसार तयार करण्यात आली. 

गंगा नदीविषयी : 

 • भारतातील सर्वात लांब नदी 
 • लांबी 2,510 कि.मी. 
 • जलवाहन क्षेत्र 8,38,200 कि.मी. 
 • गंगेचा उगम - उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री "भागीरथी' या नावाने उगम 
 • देवप्रयाग येथे अलकनंदा नदी ही गंगेला मिळते 
 • देवप्रयागनंतर भागीरथी-अलकनंदा यांच्या संयुक्त प्रवाहाला "गंगा' हे नाव प्राप्त होते. 
 • बांगलादेशमध्ये गंगा "पद्मा' नावाने वाहते. 
 • पं. बंगाल व बांगलादेश या भागात गंगेच्या असंख्य शाखांचा प्रवाह होऊन जगातील सर्वात मोठा विस्तीर्ण 58,782 कि.मी. क्षेत्रफळाचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. 
 • गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या मुखालगत 16,900 चौ. कि.मी. विस्ताराचा अरण्यमय व दलदलीचा सुंदरबन हा प्रदेश विखुरलेला आहे. हा प्रदेश बंगाली वाघांचे माहेरघर आहे. 

जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्याविषयी :

 • भारतातील "पाणी' या महत्त्वाच्या प्रश्‍नावर कार्य करणारे शास्रज्ञ म्हणून ओळख 
 • जन्म 1934, चाळीसगाव, जि. जळगाव येथे 
 • पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासह बी. ई. सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण 
 • 1956 पासून महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवेत कार्यरत 
 • नियोजन, नदी खोऱ्याचे विकास प्रकल्प, पाटबंधारे आदी क्षेत्रांत तज्ज्ञ म्हणून कार्य 
 • 1981 ते 1983 या काळात महाराष्ट्र शासनाचे सचिव म्हणून कार्यभार 
 • 1984 मध्ये केंद्रीय नदी खोरे आयोगाचे अध्यक्ष 
 • 1985 मध्ये केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष (भारत सरकारचे पदसिद्ध सचिव) 
 • 1989 मध्ये जलसंसाधन मंत्रालयात सचिव 
 • 1992 मध्ये सेवानिवृत्ती 
 • 1993 स्टॉक होम (जल) हा आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

१ जुलै २०१७

जीएसटीमुळे काय स्वस्त, काय महाग

     नव्या जीएसटी करप्रणालीमुळे दैनंदिन जीवनातील विविध वस्तू आणि सेंवाच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. जीएसटीमुळे काय स्वस्त आणि काय महाग होणार याचा थोडक्यात आढावा -

या वस्तू होणार स्वस्त -

      बिस्किटे, चॉकलेट, केशतेल, साबण, टुथपेस्ट, टी.व्ही, वॉशिंग मशिन, प्राथमिक स्मार्टफोन, सिमेंट, चहा, कॉफी, साखर, चित्रपट तिकिटे, नाटकाची तिकिटे, हॉटेलमधील खाणे, दुचाकी, प्राथमिक कार, फर्निचर, खासगी टॅक्सी सेवा, दूध, धान्ये, भाज्या, फळे, मिठाई, झाडू, मेणबत्ती, सायकली, अ‍ॅल्युमिनियमची भांडी, तांब्याची भांडी, खते.

या वस्तू महागणार -

        मोबाईल बिल, आयुर्विमा पॉलिसी, बँकिंग सेवा, गुंतवणूक व्यवस्थापन सेवा, वाय-फाय सेवा, डीटीएच सेवा, तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग, घरभाडे, कुरियर सेवा, मेट्रोचा प्रवास, एअरिएटेड पेये, शाम्पू, अत्तरे, सोने, सिगारेट्स, पान मसाला, बटर, चीज, सुका मेवा, रेझर, मनगटी घड्याळ, व्हिडीओ गेम्स, स्टोव्ह, इलेक्ट्रिक हॉट प्लेट, वॉल पेपर, प्लास्टर, टायर, प्लास्टिक वस्तू, टारपोलिन.

खते, ट्रॅक्टरवरील करात घट -

       खते आणि ट्रॅक्टरवरील वस्तू आणि सेवा कराचा दर कमी करून केंद्र सरकारने शेतकर्‍यांना दिलासा दिला. जीएसटी अंमलाच्या पूर्वसंध्येला जीएसटी परिषदेचे आयोजन केले होते. या बैठकीत खतांवरील जीएसटीचा दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के, तर ट्रॅक्टरवरील जीएसटीचा दर 28 टक्क्यांवरून 18 टक्के केला. जीएसटीमुळे शेतकर्‍यांवर भुर्दंड पडू न देण्याबाबतच्या मुद्द्यावर परिषदेमध्ये चर्चा झाली. त्यामुळे खते आणि ट्रॅक्टरवरील प्रस्तावित कराचे प्रमाण कमी करण्यावर या बैठकीत सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

के. के. वेणुगोपाल नवे अॅटर्नी जनरल

       देशाच्या अ‍ॅटर्नी जनरल पदावर ज्येष्ठ विधिज्ञ के. के. वेणुगोपाल यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील मिळाला आहे. विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेतला.

       राज्यघटनेचे तज्ज्ञ असलेले 86 वर्षीय के. के. वेणुगोपाल हे पद्मविभूषण व पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी आहेत. याआधी सत्तरीच्या दशकात मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते. 

       याआधी अनेक सरकारी यंत्रणांचे वकील म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. अलिकडच्या काळात टुजी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय व ईडीची बाजू मांडली होती. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याबाबतच्या सुनावणीवेळी त्यांनी मध्य प्रदेश सरकारची बाजू मांडताना न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी कॉलेजियम पद्धत रद्द करणार्‍या कायद्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. बाबरी मशीद प्रकरणी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची बाजू त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती.