Menu

Study Circle

३१ जानेवारी २०१८

श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा क्रमांक सहावा

      जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक असून भारताची संपत्ती 8 हजार 230 अब्ज डॉलर इतकी आहे. अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

     या अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये नागरिकांच्या खासगी संपत्तीचा समावेश असून सरकारी संपत्ती वगळण्यात आली आहे. 64 हजार 584 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेला अमेरिका हा सर्वात धनाढ्य देश आहे. या यादीत चीन दुसर्‍या, तर जपान तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारताने फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली या देशांनाही मागे टाकले आहे. 2017 साली भारत हा सर्वात चांगली कमाई करणारा देश असल्याचे अहवालात म्हटले आहे. 2007 साली भारताची संपत्ती 3,165 अब्ज डॉलर होती. एका दशकात ती 160 टक्क्यांनी वाढून 8 हजार 230 अब्ज डॉलरवर गेली आहे. 2016 मध्ये भारताची संपत्ती 6 हजार 584 अब्ज डॉलर होती. म्हणजे वर्षभरात या संपत्तीत 25 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळत आहे. भारतामध्ये एकूण 20 हजार 730 कोट्यधीश व्यक्‍ती आहेत. कोट्यधीशांचा विचार करता भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे. तर देशात 119 अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारताचा अमेरिका आणि चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.

प्रकाश पादुकोण यांना जीवन गौरव पुरस्कार

      भारतीय बॅडमिंटनचे आयडॉल आणि ऑल इंग्लड बॅडमिटनचे पहिले भारतीय मानकरी प्रकाश पादुकोण यांना बॅडमिंटन असोसिएशनकडून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. प्रकाश पदुकोण यांचे खेळातील योगदान उल्लेखनिय असे आहे. ते युवा खेळाडूंचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे ते  या पुरस्कारास पात्र आहेत, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून देण्यात येणारा हा पहिला वहिला जीवन गौरव पुरस्कार आहे.

       यावेळी प्रकाश पादुकोण म्हणाले की, मेहनत आणि कौशल्यासोबत चाहत्यांच्या प्रेमामुळे खेळाच्या मैदानात चांगली कामगिरी करु शकलो. पैसा मिळवणे, पुरस्कारावर नाव कोरणे किंवा पालकांना खूश करण्यासाठी बॅडमिंटन खेळलो नाही. तर खेळातून समाधान मिळायचे म्हणून  कोर्टवर उतरायचो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  सध्याच्या घडीला  बॅडमिंटन खेळात खूप चांगले बदल झाले. परिणामी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीतही सुधारणा झाली. क्रिकेटनंतर बॅडमिंटन दुसऱ्या स्थानावर आहे, असे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले. मर्यादित साधन सामग्रीनंतरही कर्नाटक राज्य बॅडमिंटन असोसिएशन आणि भारतीय बॅडमिटंन असोसिएशनने मला समर्थन दिले.

          १९८० मध्ये पादुकोण यांनी कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी नोंदवली होती. डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीसह याच वर्षी त्यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत विजेतपद पटकावून जागतिक बॅडमिंटनमध्ये अव्वलस्थान मिळवले होते. खेळातील कामगिरीची दखल घेत यापूर्वी  भारत सरकारकडून त्यांना अर्जुन पुरस्कार (१९७१) आणि  आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

३० जानेवारी २०१८

विजय गोखले यांनी पदभार स्वीकारला

     अनुभवी प्रशासकीय अधिकारी असलेल्या विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी एस. जयशंकर यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. भारत-चीन यांच्यातील डोकलाम मुद्द्यावर तब्बल ७३ दिवस चाललेल्या चर्चेत गोखले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 

     १९८१च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी असलेले गोखले ही नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयात सचिव (आर्थिक संबंध) म्हणून कार्यरत होते. आता परराष्ट्र सचिव म्हणून त्यांच्यापुढे नेपाळ, मालदीव, श्रीलंका आणि म्यानमारसोबतचे संबंध दृढ करण्यासोबतच पाकिस्तान आणि चीनसोबतची कटुता कमी करण्याचे आव्हान असणार आहे. 

       चीन विशेषज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोखले यांनी परराष्ट्र मंत्रालयात परतण्यापूर्वी २० जानेवारी २०१६ ते २१ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत चीनमधील भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले होते.

उर्दू शायर मोहम्मद अल्वी यांचं निधन

     उर्दूचे सुप्रसिद्ध शायर मोहम्मद अल्वीयांचं  अहमदाबाद येथे निधन झाले. अल्वी हे आधुनिक शायर म्हणून प्रसिद्ध होते. 

      मोहम्मद अल्वी यांनी साध्या आणि सोप्या शब्दात गझल मांडली. अल्वी यांच्या चौथा 'आसमान' या कवितासंग्रहाला १९९२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. अल्वी यांचा जन्म १९२७ साली अहमदाबाद येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षणही अहमदाबाद येथे झाले. अल्वी यांनी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियामधून उच्च शिक्षण पूर्ण केले. अल्वी यांच्या 'खाली मकान', 'आखिरी दिन की तलाश' आणि 'तिसरी किताब' हे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत. 

२९ जानेवारी २०१८

राहण्यासाठी ‘स्वस्त’ देशात भारत दुसरा!

      राहण्यासाठी किंवा निवृत्तीनंतर शांत जीवन जगण्याचा विचार करीत असाल, तर भारतासारखा जगात ‘दुसरा’ देश नाही. ‘स्वस्ताई’ असलेल्या जगातील 112 देशांच्या यादीत भारताने द. आफ्रिकेनंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘गो बँकिंग रेट्स’ने यासंदर्भात पाहणी केली असून खरेदीची क्षमता, भाडे, किराणा मालाचे भाव आणि ग्राहक किंमत निर्देशांक या चार निकषांवर ही पाहणी करण्यात आली आहे. यात भाड्यांच्या निर्देशांकात भारत सर्वात आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.

     दैनंदिन वापराच्या वस्तू आणि किराणा मालही इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त असल्याचे पाहणीत म्हटले आहे. कोलकात्यात राहणार्‍या एका व्यक्‍तीचा महिन्याचा खर्च सर्वसाधारणपणे 18 हजार रुपये इतका असतो. जगातील सर्वात स्वस्त 50 देशांमध्ये भारताची लोकसंख्या सर्वाधिक असली तरी प्रमुख शहरांत राहणार्‍या लोकांची खरेदी क्षमताही इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे.

       या यादीत पाक 14 व्या, नेपाळ 28 तर बांगला देश 40 व्या स्थानावर आहेत. खरेदी क्षमता, घरभाडे, किराणा माल आदींची तुलना न्यूयॉर्क शहरातील किमतीशी करण्यात आली आहे. न्यूयॉर्कपेक्षा भारतातील भाडे 70 टक्क्यांनी कमी असून किराणा आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू 40 टक्क्यांनी स्वस्त आहेत. राहण्यासाठी द. आफ्रिका हा सर्वात स्वस्त देश असल्याचे पाहणीत म्हटले आहे. न्यूयॉर्कपेक्षाही द. आफ्रिकेतील लोकांची खरेदी क्षमता चांगली असल्याने या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. 

       सर्वाधिक महागड्या देशांमध्ये बर्म्युडा, बाहमास, हाँगकाँग, स्वित्झर्लंड आणि घाना यांचा समावेश आहे.

डेन्मार्क क्विन कॅरोलिन ऑस्ट्रेलियन ओपनची नवी सम्राज्ञी

      जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपला पराभूत करत डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीने ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. कारिकिर्दीतील तिचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम आहे.महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हालेप आणि कॅरोलिन यांच्यातील सामना रंगतदार झाला.  

     शेवटपर्यंत अटीतटीच्या लढतीत कॅरोलिन वोज्नियाकीने हालेपला ७-६ (७-२), ३-६, ६-४ असे पराभूत केले. या ऐतिहासिक विजयामुळे वोज्नियाकी जागतिक मानंकानात पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.नव्याने रिलिज होणाऱ्या यादीत ती हालेपच्या जागा घेईल. २०१२ नंतर जागतिक मानांकनात कॅरोलिन वोज्नियाकी अव्वल स्थानावर पोहचली आहे. 

२८ जानेवारी २०१८

प्रजासत्ताक परेडमध्ये ‘शिवराज्याभिषेक’ चित्ररथाला प्रथम क्रमांक

      ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या परेडमध्ये पुन्हा एकदा मराठी पताका फडकला आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व कराणऱ्या ‘शिवराज्याभिषेक’ सोहळ्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते पारितोषकांचे वितरण करण्यात आले. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी हा चित्ररथ साकारला होता. यात आसामच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाल्याचे कळतंय.

    या आधी २०१५ मध्ये महाराष्ट्राच्या ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. १९९२ मध्येही महाराष्ट्राकडून ‘शिवराज्याभिषेक’ साकारण्यात आला होता. त्यावेळीही त्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. खास गोष्ट म्हणजे १९९२ ते १९९५ या तिनही वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावून हॅट्रीक केली आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यासाठी प्राध्यापक नरेंद्र विचारे महत्वाची भूमिका पार पाडतात. यंदाही ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ ही संकल्पना त्यांचीच होती. 

      कौतुकास्पद बाब म्हणजे, यंदाचा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने सर्व तीनही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. तर सांस्कृतिक कार्य मंत्री अध्यक्ष असलेल्या दक्षिण मध्य कल्चरल झोन कडून सादर करण्यात आलेल्या नृत्यासही प्रथम क्रमांक मिळाला. 

       राष्ट्रीय रंग शाळेत झालेल्या आंतरराज्यीय नृत्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या पथकाने प्रथम क्रमांक मिळवीत महाराष्ट्राचा मान राखला आहे.

      प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील यशस्वी कामगिरी बद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिल्लीत फोन करून संबधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.महाराष्ट्रसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सन्मान आहे असे विनोद तावडे यांनी सांगितले.

२६ जानेवारी २०१८

गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण

      विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येणारे सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा एकूण ८५ जणांना पद्मसन्मान मिळाला आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान, इलायाराजा (संगीत) आणि परमेश्वरन (साहित्य आणि शिक्षण) यांना पद्मविभूषण तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व बिलियर्डपटू पंकज अडवाणीला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 

      महाराष्ट्रातून गुलाम मुस्तफा खान यांना संगीत क्षेत्रातातील अतुलनीय व उल्लेखनीय कार्यासाठी पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध सतार वादक अरविंद पारीख यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 

       वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे. यात साहित्यिक गंगाधर पानतावणे व शिक्षणतज्ज्ञ अरविंद गुप्ता यांचा समावेश आहे. याशिवाय कला क्षेत्रासाठी प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी, व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी रामेश्वरलाल काबरा, कला व चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी शिषीर मिश्रा, क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी मुरलीकांत पेटकर, सामाजिक कार्यासाठी संपत रामटेके यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

२५ जानेवारी २०१८

अमरनाथ यात्रेतील देवदूताला वीरता पुरस्‍कार

      अमरनाथ यात्रेवरून परतत असताना दहशतवाद्यांकडून यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार करण्यात आला होता. या बसमध्ये ५२ यात्रेकरूंचा समावेश होता. प्रवाशांच्या बसवर गोळीबार सुरू असताना ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बस दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवली त्या सलीम गफूर यांचा यावर्षी वीरता पुरस्‍कार देऊन गौरव करण्यात आला. वीरता हा दुसरा सर्वोच्च पुरस्‍कार आहे. 

      सलीम गफूर १० जुलै २०१७ रोजी अमरनाथ यात्रेवरून प्रवाशांना घेऊन अनंतनागर परिसरातून परत येत होते. यावेळी परिसरात असणार्‍या दहशतवाद्यांकडून बसवर जोरदार गोळीबार करण्यात आला. गोळीबार सुरू असताना दहशतवाद्यांच्या या कारवाईला न घाबरता त्यांनी दोन किलोमीटरपर्यंत बस सुखरूपणे आणली. यात्रेकरूंच्या जीवाची काळजी घेणार्‍या सलीम यांना वीरता पुरस्‍कार देऊन गौरव करण्यात आल्याने कुटुंबिय आनंदी असले तरी दहशतवादाविषयी ते चिंता व्‍यक्‍त करतात. यात्रेकरूंच्या या बसमध्ये ६० प्रवासी होते. अमरनाथ यात्रा करून अनंतनाग परिसरातून बसचा पुन्‍हा परतीचा प्रवास सुरू करण्यात आला. 

      गुजरातमधील वलसाडमध्ये राहणार्‍या सलीम यांना एक दु:ख कायम सलत असल्याचे ते सांगतात. ते म्‍हणतात, ‘‘इतर प्रवाशांचा जीव वाचवला असला तरी मी इतर आठ जणांचा जीव वाचवू शकलो नाही. याचं दु:ख कायम माझ्या मनात राहिल. या आठ जणांचा जीव वाचवण्यात मला यश आले असते तर मला आणखी आनंद झाला असता. वीरता पुरस्‍कारसाठी त्‍यांच्याबरोबर  ४४ जणांच्या नावाची घोषणा करण्यात  आली आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आधी एक दिवस या पुरस्‍काराचे वितरण करण्यात येते. 

जापानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

      जपानमधील एका प्रसिद्ध स्की रिसॉर्टजवळ झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात एका जपानी सैनिकाचा मृत्यू झाला. या उद्रेकामुळे झालेल्या हिमस्खलनात ७८ जण जखमी झाले असून, अनेक जण पर्वतावर अडकले आहेत. 

     जखमींपैकी काही जण डोंगरमाथ्यावरील गोंडोला स्टेशनमध्ये अडकून पडले होते. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नंतर गोंडोला थांबविण्यात आली. अडकलेल्यांपैकी आठ जणांची सुटका करण्यात आली आहे

२४ जानेवारी २०१८

सर्वात मोठे हिरे!

      3,106 कॅरेटचा हा हिरा 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील खाणीत सापडला होता. खाणीच्या मालकाचे नाव होते सर थॉमस कलिनन. त्यांचेच नाव या हिर्‍याला देण्यात आले. ब्रिटनचा राजा एडवर्ड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हा हिरा भेट म्हणून देण्यात आला. त्यानंतर त्याचे दोन तुकडे करण्यात आले. त्यांना ‘ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ आणि ‘लेसर स्टार ऑफ आफ्रिका’ अशी नावे देण्यात आली. हे दोन्ही हिरे सध्या ब्रिटिश शाही मुकुटाची शोभा वाढवत आहेत.

    लेसी ला रोना : हा हिरा कॅनडाच्या एका खाण मजुराला 2015 मध्ये सापडला. एखाद्या टेनिस बॉलच्या आकाराचा हा हिरा आहे. अद्यापही तो मूळ रूपात असून त्याचे तुकडे करण्यात आलेले नाहीत. ग्रॅफ डायमंडस् ज्वेलरने हा हिरा सुमारे 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे.

     एक्सेलसियरः 995 कॅरेटचा हा हिरा 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील खाणीत सापडला होता. त्याचे नंतर वीस तुकडे करण्यात आले. तोपर्यंत त्याला एकही खरेदीदार मिळाला नव्हता. कालांतराने जो तुकडा 70 कॅरेटचा होता त्याची सुमारे 16 कोटी रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. सध्या हा हिरा एका ब्रेसलेटची शोभा वाढवत आहे.

      स्टार ऑफ सिएरा लियोनः आफ्रिकेतील एका देशाचे नाव सिएरा लियोन असे आहे. तिथेच 1972 मध्ये 969 कॅरेटचा हा हिरा सापडला होता. त्याचे नंतर 17 तुकडे करण्यात आले. सर्वात मोठा तुकडा 54 कॅरेटचा आहे. 

      लेसोथो : नुकतेच दक्षिण आफ्रिकेत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. लेसोथोच्या पर्वतराजीतील खाणीत हा 910 कॅरेटचा हिरा सापडला. या हिर्‍याने संपूर्ण जगभर प्रसिध्दी मिळवली आहे.

ताशी ११२३ कि.मी. वेगाने धावणारी ट्रेन

       कल्पना करा की आपण एका कॅप्सूलमध्ये बसलो आहोत आणि एका व्हॅक्यूम ट्यूबमधून ती ताशी 1123 किलोमीटर वेगाने धावते आहे. आपण काही तासांऐवजी काही मिनिटांमध्येच एखाद्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकता. धडाडीचे ब्रिटिश उद्योजक सर रिचर्ड ब्रान्सन यांनी अशा कारचे आणि त्या कारसाठीच्या व्हॅक्यूम ट्यूब मार्गाचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न ते आता साकार करीत असून ‘व्हर्जिन’ कंपनीकडून त्याचे काम वेगात सुरू आहे.

        ‘टेस्ला’ कंपनीचे सहसंस्थापक आणि ‘स्पेस एक्स’सारख्या अंतराळ कंपनीचे एलन मस्क यांनीच प्रथम अशा हायपरलूपची कल्पना मांडली होती. या कल्पनेवर आधारित अनेक योजनांचे काम सुरू झाले आणि असे दिसले की मॅग्‍नेटिक लेव्हिटेशन टेक्नॉलॉजी (चुंबकीय उत्तोलन तंत्रज्ञान) च्या आधारे एका व्हॅक्यूम ट्यूबमधून ट्रेन चालवता येऊ शकते. भविष्यात अशी ट्रेन वेगाचे नवे विक्रम घडवून नवी क्रांती आणू शकते. माग्लेव किंवा मॅग्‍नेटिक लेव्हिटेशन ट्रेनच्या विकासासाठीही सध्या काम सुरू आहे. त्यामध्ये चुंबकाच्या आधारे ट्रेन ट्रॅकच्या वरून धावू लागते. सर ब्रान्सन यांची व्हर्जिन हायपरलूप वन याबाबतीत सर्वात आघाडीवर आहे. अमेरिकेत लास वेगासपासून 40 मैल उत्तरेस वाळवंटात या ट्रेनच्या योजनेवर काम सुरू आहे. त्यासाठी 500 मीटर लांबीचा प्रायोगिक टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आला आहे. 300 लोकांची एक टीम यासाठी काम करीत असून त्यामध्ये दोनशे कुशल इंजिनिअर आहेत. या ट्यूबमधून हायपरलूप वनने ताशी 378 किलोमीटर वेगाने प्रवास केला आहे. 

२३ जानेवारी २०१८

माळशेजघाटात देशातील पहिला ’पारदर्शक पूल’

      माळशेज घाटातील 700 मी. खोल दरीवर 18 मी. लांबीचा पारदर्शक वॉक वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या 3 वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल तसे झाल्यास हा देशातील पहिला पारदर्शक पूल ठरणार आहे.

       जुन्नर जवळील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्याची भुरळ फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील पर्यटकांना पडली आहे. माळशेजचे हे सौंदर्य आता जगाच्या नकाशावर आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. लवकरच माळशेज घाटात देशातला पहिला ’पारदर्शक पूल’ (वॉक वे) बांधण्यात येणार आहे. माळशेज घाटातील 700 मी. खोल दरीवर 18 मी. लांबीचा पारदर्शक वॉक वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या 3 वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल तसे झाल्यास हा देशातील पहिला पारदर्शक पूल ठरणार आहे.

       कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेजमध्ये पर्यटन विभागाचे रिसॉर्ट आहे. त्याच्या जवळच माळशेजच्या दरीलगत दुमजली इमारत बांधण्यात येणार असून त्यावर हा पारदर्शी वॉक वे असेल. 18 मी. लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. ’वॉक वे’चे फ्लोरिंग पारदर्शी काचेचे राहील. या वॉक वे वरुन चालताना पर्यटकांना हवेत चालण्याचे थ्रिल अनुभवता येईल. खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर (काळजी घेऊन) फोटो काढण्याचीही मुभा देण्यात येईल.

         सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन टप्प्यात ही योजना प्रत्यक्षात आणायची आहे. पहिल्या टप्प्यात ’वॉक वे’ चे बांधकाम, तर दुसर्‍या टप्प्यात आर्ट गॅलरी, अ‍ॅम्पिथिएटर, म्युझिकल फाऊण्टन्स याची रचना करायची आहे. आमदार किसन कथोरे यांनी हा प्रस्ताव मांडला असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. माळशेज घाट पावसाळ्यात पर्यटकांनी फुललेला असतोच, मात्र वॉक वे बांधल्यावर वर्षाचे 365 दिवस इथे पर्यटकांची गर्दी होईल. जिल्ह्याच्या महसूलात वाढही होईल आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळही विकसित होईल, असे दुहेरी उद्दिष्ट यामुळे साध्य होणार आहे. 

परदेशी गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांच्या यादीत भारत पाचवा

     दावोस येथे 22 जानेवारी रोजी ’वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या 48 व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. यावेळी मोदींनी जगभरातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत भारताचा विकास आणि देशातील गुंतवणुकीच्या संधी याबात चर्चा केली. दरम्यान, जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंचा एक अहवाल समोर आला आहे. जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार केली असून, या यादीत जपानला मागे टाकत भारताने पाचवे स्थान पटकावले आहे.

     ’प्राईसवॉटर हाऊस कुपर्स’ या संस्थेने हा अहवाल तयार केला असून, यासाठी जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते नोंदविण्यात आली.

       या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत गुंतवणुकीसाठी पुरेशा संधी आहेत, असे अहवालात म्हटले आहे. चीन या यादीत दुसर्‍या स्थानी असून जर्मनी तिसर्‍या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानी आहे.

        भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत हा गुंतवणुकीसाठी पोषक देश आहे, याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मोदी करत आहे. यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ’मेक इन इंडिया’चा प्रसार केला जाणार आहे. मोदी या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणार आहेत. 

२२ जानेवारी २०१८

जागतिक आर्थिक परिषदेत मोदींचे ‘मिशन इंडिया’

      स्वित्झर्लंडच्या  दावोस येथे प्रारंभ होत असलेल्या 48 व्या जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत असून जागतिक अर्थव्यस्थेत भारत ‘विकासाचे इंजिन’ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल, अशी भूमिका मोदी मांडणार आहेत. 20 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान या परिषदेत सहभागी होणार आहेत. यापूर्वी 1997 साली ए. डी. देवेगौडा यांनी सहभाग घेतला होता. 

      पाच दिवस चालणार्‍या या परिषदेत भारताचे 130 हून अधिक जणांचे प्रतिनिधी मंडळ सहभागी होईल. जगभरातील उद्योग, राजकीय, कला आदी क्षेत्रातील तीन हजार जणांचा या परिषदेत सहभाग असणार आहे. भारताकडून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. जागतिक आर्थिक परिषदेचे अध्यक्ष क्लाऊस श्‍वाब संध्याकाळी परिषदचे उद्घाटन करतील.

'कुंकू'फेम अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे निधन

      झी  मराठी वाहिनीवरील 'कुंकू' या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्‍वे अपघातात निधन झाले. मुंबईत मालाडजवळ प्रफुल्‍लचा अपघात झाला. प्रफुल्लच्या अकाली मृत्यूमुळे त्‍याच्या कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका बसला आहे.

      'कुंकू' मालिकेत प्रफुल्‍लने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती. 

२१ जानेवारी २०१८

भारतीय महिला वकिलाची ट्रम्प प्रशासनात नियुक्‍ती

      भारतीय वंशाच्या वकील मनीषा सिंह यांना ट्रम्प प्रशासनामध्ये आर्थिक आणि व्यापार विभागाच्या सहायक सचिवपदावर नियुक्‍त करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली असून या पदावर नियुक्‍त होणार्‍या सिंह या पहिल्या महिला आहेत.

    सिंह यांना शपथ दिल्यानंतर आम्ही अमेरिकेच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासोबतच आणि सिंह यांच्या नेतृत्वाखाली आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेच्या आर्थिक आणि व्यापार विभागाने ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित केली.

२० जानेवारी २०१८

भारतीय वंशाच्या महिलेने ब्रिटनमध्ये रचला इतिहास

      ब्रिटनच्या संसंदेत भारतीय वंशाच्या मुस्लिम महिलेने इतिहास रचला आहे.  भारतीय वंशाच्या पण सध्या ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय नुसरत गनी यांनी ब्रिटिश संसदेला संबोधित केले. ब्रिटीश संसदेत भाषण करणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत.

    नुसरत यांचा जन्म बर्मिंघम येथे झाला. मात्र, त्यांचे आई-वडील मुळचे पाकव्याप्त काश्मीरमधील आहेत. कामानिमित्त ते बर्मिंघम येथ स्थायिक झाले. नुसरत यांना परिवहन मंत्रालयाचे मंत्रीपद देण्यात आले आहे.

१९ जानेवारी २०१८

U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात

       न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या सामन्यात भारताने झिंबाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला. या विजयाबरोबरच सलग दोन सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला दहा गडी राखून बाद करण्याच्या इंग्लंडच्या २००८ मधील विक्रमाशी युवा टीम इंडियाने बरोबरी केली आहे. 

       आजच्या सामन्यासाठी युवा टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने खास रणनिती आखली होती. द्रविडने या रणनितीनुसार मागच्या दोन्ही सामन्यात ५० धावा ठोकणाऱ्या कर्णधार पृथ्वी शॉला सलामीला उतरविले नाही. त्याऐवजी द्रविडने शुभम गिल आणि हार्विक देसाईला सलामीला पाठविले. द्रविडचा हा निर्णय सार्थ ठरवत शुभम आणि हार्विकने टिच्चून फलंदाजी करत झिंबाब्वेच्या गोलंदाजांना जेरीस आणले. हे दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत बाद झाले नाहीत. शुभमने नाबाद दमदार ९० धावा ठोकल्या तर हार्विकने त्याला सुरेख साथ देत नाबाद ५६ धावा केल्या. 

         झिंबाब्वेने टॉस जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेत ४८.१ षटकांमध्ये सर्व बाद १५४ धावा केल्या होत्या. झिंबाब्वेकडून मिल्टन शुम्बाने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर कर्णधार लियाम निकोल्स अवघ्या ३१ धावांवर बाद झाला. टीम इंडियाकडून अनुकूल रॉयने भेदक गोलंदाजी करत झिंबाब्वेचे ४ गडी बाद केले. तर अभिषेक शर्मा आणि अर्शदीपने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. मात्र भारताच्या सलामीच्या जोडीने १५५ धावांचं लक्ष्य अवघ्या २१.४ षटकांत गाठून झिंबाब्वेला आस्मान दाखवलं.

१८ जानेवारी २०१८

महाराष्ट्रातील तिघांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

   ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मा तळवळकर, प्रभाकर कारेकर यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष-2016 च्या  संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती प्राप्त पुरस्कार्थींना 3 लाख रुपये रोख अंगवस्त्र आणि ताम्रपट प्रदान करण्यात आले. तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार्थींना 1 लाख रुपये रोख, अंगवस्त्र आणि ताम्रपट प्रदान करण्यात आले. यावर्षी 4 मान्यवरांना अकादमी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तर 43 कलाकारांना अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तबलावादक अरविंद मुळगावकर प्रकृती बरी नसल्यामुळे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.

      चित्रपट तसेच नाटकातून अभिनय करणारे प्रसिद्ध कलावंत मोहन जोशी यांना अभियन क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी यंदाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहन जोशी यांनी अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. यामध्ये आगर्‍याहून सुटका, झालं गेलं गंगेला मिळालं, माझ छान चाललंय ना, मा. राष्ट्रपती, आंधळी कोशिंबीर, आसू आणि हसू,  कलम 302, धर्मयुद्ध, लष्कराच्या भाकर्‍या अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. यासह 150 पेक्षा अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेले आहे. मोहन जोशी यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले.

    पद्मा तळवळकर या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. खयाल गायकीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. तळवळकर यांनी ग्वाल्हेर, किराना आणि जयपूर घराण्यातून  खयाल गायकीचे शिक्षण घेतलेले आहे. तळवळकर या  जयपूर-अत्रौली घराण्याच्या आहेत. त्यांनी प्रसिद्ध तबलावादक पंडित सुरेश तळवळकर यांच्याशी लग्न केले असून त्यांना सत्यजीत आणि सावनी हे दोन अपत्य आहेत. तेही तबलावादक आहेत. श्रीमती तळवळकर यांना भुलाभाई मेमोरियल ट्रस्टची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती, यासह राष्ट्रीय कला प्रदर्शन केंद्राची त्यांना फेलोशिप मिळाली. श्रीमती तळवळकर पंडित जसराज गौरव पुरस्कार 2004, श्रीमती वत्सला भीमसेन जोशी पुरस्कार 2009, राजहंस प्रतिष्ठान पुरस्कार 2010 ला प्राप्त झालेले आहे.

     पंडित प्रभाकर कारेकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. त्यांचा जन्म गोव्याचा असून त्यांची संपूर्ण कारर्कीद ही मुंबईतील आहे. त्यांनी आग्रा घराणा आणि ग्वाव्हेर घराण्यातून शास्त्रीय गायनाचे धडे गिरविले. यासोबतच पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. सी आर व्यास यांच्याकडूनही त्यांनी गायनाचे  धडे घेतले. ते नाकातून गात असल्यामुळे त्यांच्या आवाजात कुठलाही राग  बहरतो.

ब्रिटनने ‘उदासीनते’साठी केली मंत्र्याची नियुक्ती

   व्हर्च्युअल जगामध्ये वावरणाऱ्या लोकांमध्ये संवाद हरवत चालला आहे. यामुळेच ब्रिटन देशाने नागरिकांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी एका मंत्र्याची नियुक्ती केली आहे. समाजापासून दूर असलेल्या ९ दशलक्ष लोकांसाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारी ट्रेसी क्राऊच या मंत्र्याची नियुक्ती केली. या लोकांमध्ये समाज आणि माध्यमांपासून दूर एकांतवासात जीवन जगणाऱ्या तरूण आणि वृद्ध लोकांचा समावेश आहे. 

     मंत्री ट्रॅसी क्राऊच यांनी देशातील नागरिकांच्या उदासीनतेवर एक पोर्टफोलिओ बनवण्यासाठी सरकारला मदत केली होती. उदासीनतेला सामोरे जाणारे, समाजात मोकळेपणाने न वावरणाऱ्या लोकांचा शोध घेण्यात या पोर्टफोलिओची मदत झाली होती. 

     ‘उदासीनता हे आधुनिक आयुष्याचे विदारक सत्य आहे. अनेक लोक या सत्याचा सामना करत आहेत. उदासीनतेला लोकांपासून दूर करणे याकडे मी एक आव्हान म्हणून बघते. जे लोक  नैराश्याने ग्रासलेले आहेत, ज्या लोकांनी त्यांचा हक्काचा माणून गमावल्याने त्यांना एकटेपणाचा सामना करावा लागत आहे. असे लोक जे त्यांचे विचार कोणालाही सांगू शकत नाहीत अशा लोकांसाठी मी हे आव्हान पेलायला तयार आहे.’ असे थेरेसा मे यांनी म्हटले आहे. 

      ब्रिटनमधील जो कॉक्स यांनी उदासीनतेवरील एका प्रोजेक्टची मांडणी केली होती. २०१६ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. जो कॉक्स यांनी देशभरातील उदासीनतेने ग्रासलेल्या लोकांच्या संख्येची मांडणी केली होती. तिला त्या लोकांसाठी सर्वकाही करायचे होते. असे ट्रॅसी क्राऊच यांनी म्हटले आहे.

     जो कॉक्सने उत्साहाने या विषयाची मांडणी केली होती. तिच्या हत्येनंतर आम्ही त्या विषयाचा पाठपुरावा केला. या योजनेमुळे इंग्लंडमधील अनेक उदासीन लोकांना जगण्याची नवी आशा मिळणार आहे. असेही क्राऊच यांनी म्हटले. 

     संशोधनानूसार इंग्लंडमधील ९ दशलक्ष लोक उदासीनतेचा सामना करत आहेत. ते सतत एकटे पडल्याचा अनुभव घेत आहेत. यामध्ये २ लाख वृद्ध लोकांचा समावेश असून ते लोक अनेक महिने मित्र, नातेवाईक यांच्याशी बोलत नाहीत. यामध्ये ८५ टक्के लोक हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत.

१७ जानेवारी २०१८

आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार: नवीन पटनाईक

      एमआयटीच्यावतीने 8 व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन दि. 19, 20 व 21 जानेवारी दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांना मैत्रेयी पुरस्काराने तर खासदार सुस्मिता देव यांना गार्गी पुरस्काराने गौरवियात येणार आहे.

        आठव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन 19 जानेवारी रोजी होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सिनेअभिनेत्री मनीषा कोईराला, खासदार दुष्यंत चौटाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक प्रा. राहुल कराड यांनी दिली. यावेळी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास, अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस, संचालिका डॉ. सायली गणकर उपस्थित होते. विविध पक्षातील 12 तरुण आमदारांचा सत्कार केला जाणार आहे. छात्र संसदेचा समारोप 21 जानेवारी रोजी होणार आहे.

नेतान्याहूंच्या भारत दौर्‍याचे महत्त्व

    इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे 6 दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. 15 वर्षांनंतर पहिल्यांदा इस्राईली पंतप्रधान भारत दौरा करत आहेत. दोन्ही देशांदरम्यान सायबर सुरक्षा, कृषितंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान, तेल आणि ऊर्जा क्षेत्र, होमिओपॅथी औषधे आदी क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. मागील काही महिन्यांत दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये बाधा येण्यास कारणीभूत ठरले होते. नेतान्याहूंच्या दौर्‍यामुळे हे संबंध पुन्हा सुदृढ होणार आहेत.

     यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात म्हणजेच 2003 मध्ये एरियल शेरॉन हे इस्राईलचे पंतप्रधान भारत दौर्‍यावर आले होते. नेतान्याहू यांची ही भेट राजकीय आणि व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नेतान्याहूंबरोबर 130 उद्योगपतींचे शिष्टमंडळही भारतात आले आहे. भारत व इस्राईल यांच्यातील  संरक्षण, अर्थ, व्यापार, कृषी, सांस्कृतिक आरोग्य शिक्षण यासंदर्भातील द्विपक्षीय पातऴीवरील संबंधांच्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्या पार्श्वभूमीवर ही भेट होते आहे तीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. 6 महिन्यांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक इस्राईलचा दौरा पार पडला होता. या दौर्‍याचे कारणही खास होते. भारत-इस्राईल राजनैतिक संबंधाना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदींचा इस्राईल दौरा आखण्यात आला होता.

इस्राईलची निर्मिती 1948 मध्ये झाली. भारताच्या इस्राईलसोबतच्या मैत्रीला अनेक वर्षे झाली असली तरी सुरुवातीपासून हे संबंध छुप्या स्वरूपाचे होते. इस्राईल भारताला संरक्षण साधनसामुग्रीचा पुरवठा करत होता. पण, ही मदत उघडपणाने केली जात नव्हती. कारण दोन्ही देशांदरम्यान राजकीय संबंध प्रस्थापित झालेले नव्हते. 1994 मध्ये ते प्रस्थापित झाले. त्याच वर्षी पहिल्यांदा इस्राईलची राजधानी तेल अवीवमध्ये भारतीय दुतावास निर्माण करून राजदूताची नेमणूक करण्यात आली आणि दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना सुरुवात झाली. मोदींच्या दौर्‍यानंतर 6 महिन्यांमध्येच इस्राईलचे पंतप्रधान भारत दौर्‍यावर आले आहेत.

हा दौरा तीन महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर होत आहे -

1) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलमधला अमेरिकेचा दूतावास तेल अवीवमधून जेरूसलेममध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आणि जेरूसलेम ही इस्राईलची राजधानी असल्याची घोषणा केली. हा निर्णय अत्यंत स्फोटक होता. भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेत या निर्णयाचा विरोध करण्यासाठी झालेल्या ठरावाच्या बाजूने म्हणजेच ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात मतदान केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये काहीसा कडवटपणा निर्माण झाला.

2) अलीकडील काळात संपूर्ण पश्चिम आशियाच्या सत्तासमतोलामध्ये इराणचे महत्त्व वाढते आहे. मध्यंतरी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणसमवेत अणुकरार केलेला होता. इराणचा सर्वांत मोठा धोका इस्राईलला आहे. मात्र, भारत आणि इराण हे दोघेही सामरिक भागीदार आहेत. तसेच भारत इराणकडून मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात करत आहे. संपूर्ण पश्चिम आशियात इराण हा भारताचा मित्र देश आहे. ही बाब इस्राईलला खटकत आहे.

3) चीनने आशिया खंडात आपला प्रभाव वाढवण्यासाठी आणि व्यापार वाढवण्यासाठी एका महत्त्वांकाक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. याला वन बेल्ट वन रोड (ओबीओर) असे म्हणतात. या प्रकल्पावर भारताने बहिष्कार टाकला असून इस्राईलने त्याला समर्थन दिले आहे. इस्राईलने या करारावर स्वाक्षरी केली आहे. चीन पाकिस्तानच्या मदतीने हिंदी महासागरात आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे, परंतु इस्राईल मात्र चीनकडे भारताला असलेला धोका या दृष्टीने पाहत नाही. चीनच्या प्रश्नावरूनही दोन्ही देशांतील संबंध फार चांगले आहेत, असे ठामपणाने सांगता येणार नाही.

या तीन घटनांच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारचा कडवटपणा किंवा दुरावा हा दोन्ही देशांदरम्यान निर्माण झाला होता. तो दूर करण्याचा प्रयत्न या 6 दिवसांच्या भारत भेटीतून होणार आहे.

1965 चे भारत-पाकिस्तानचे युद्ध, 1971 चे बांगलादेश निर्मितीचे युद्ध किंवा 1999 चे कारगिलचे युद्ध या सर्व युद्धात इस्राईलने भारताला मदत केली होती. विशेषतः स्वित्झर्लंडकडून खरेदी केलेल्या बोफोर्स तोफांचा दारूगोळा कारगिल संघर्षात इस्राईलकडूनच मिळाला होता. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमधील संबंध आणखीन घनिष्ठ होऊ शकतात. त्या संदर्भात महत्त्वपूर्ण करार या भेटीदरम्यान होणार आहेत.

व्यापार आणि आर्थिक संबंधांचा विचार करता भारत आणि इस्राईल यांच्यातील व्यापार हा साधारणतः 12 अब्ज डॉलर इतका आहे. त्यातील जास्त भाग हा संरक्षणाचा आहे. हा व्यापार 20 अब्ज डॉलरपर्यंत नेता येऊ शकतो. त्यासाठी एक अत्यंत मोठी प्रलंबित गोष्ट आहे. गेल्या कित्येक वर्षांत त्यावर चर्चा झालेली नाही. भारत आणि इस्राईल या देशांदरम्यान मुक्त व्यापार क्षेत्राची निर्मिती. गेल्या काही वर्षांपासून त्यावर चर्चा सुरु आहे, पण त्याला अंतिम स्वरूप मिळालेले नाही. या भेटीदरम्यान त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होण्यासाठी काही निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षा आहे. ते झाल्याशिवाय व्यापारवृद्धी होणार नाही. याखेरीज हिर्यांना पैलू पाडण्याच्या क्षेत्रात रशिया, इस्राईल आणि भारत तीनही देश आघाडीवर आहेत. त्यामुळे या क्षेत्रात व्यापार वाढू शकतो.

सध्या भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्यादृष्टीने सायबर सिक्युरिटी हे महत्त्वाचे क्षेत्र पुढे आलेले आहे. याबाबत भारत इस्राईलकडे अपेक्षेने पाहात आहे. सध्याचा दहशतवाद हा अत्याधुनिक स्वरूपाचा असल्याने त्याचा प्रसारही अत्याधुनिक पद्धतीने होतो. त्यासाठी इंटरनेटचा वापर होतो. त्याला रोखण्याचे तंत्रज्ञान इस्राईलकडे आहे. 2014 मध्ये राजनाथसिंह यांनी इस्राईलचा दौरा केलेला होता. इस्राईल हा सातत्याने दहशतवादाच्या छायेत असणारा देश असल्याने दहशतवादाचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत. काश्मीरमध्ये आपल्याला दगडफेक करणार्‍या लोकांचा त्रास होत आहे. दगडफेकीच्या आडून दहशतवादी काही मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांचा सामना करण्यासाठी इस्राईलने पॅलेट गन विकसित केल्या आहेत. त्या भारतासाठी निश्चितच उपयोगी पडतील. दोन्ही देशांतील संबंध घनिष्ठ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः दहशतवादाचा प्रश्न असेल त्याबाबत इस्राईलची खूप मोठी मदत होऊ शकते त्यामुळे इस्राईलच्या पंतप्रधानांचा नेतान्याहूंचा दौरा भारताच्यादृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.

मुंबईतील कचर्‍यापासून आयसीटी करणार तेलनिर्मिती

        कचर्‍याचे विघटन करून केरोसिन (घासलेट) सोबत वापरता येईल असे इंधन (सीटीएल - कॅटेलिक थर्मो लिक्वीफॅक्शन ऑइल) तयार करण्याचे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा दावा माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या (आयसीटी) बायोटेक्नॉलॉजी विभागाने (डीबीटी) केले आहे. संशोधन यशस्वी झाल्यामुळे चेंबूर येथील माहूलमधील भारत पेट्रोलियम वसाहतीत (बीपीसीएल कॉलनी) यावर आधारित पहिला प्रकल्प राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आयसीटीच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे देण्यात आली. तसेच पूर्व दिल्ली भागातही अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

          मुंबईत निर्माण होणाजया कचर्‍याची विल्हेवाट लावणे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने कचरा वर्गीकरणाचा उपाय सांगितला, परंतु वर्गीकरणाच्या उपक्रमापासून अद्याप बहुतांश गृहनिर्माण संस्था, आस्थापना दूर आहेत. तसेच काही ठिकाणी उत्तम प्रकारे वर्गीकरण केले जात असले तरी डम्पिंग ग्राउंडवर कचरा पुन्हा एकत्र केला जातो. त्यामुळे पालिकेचा कचरा वर्गीकरणाचा उपक्रम फारसा प्रभावी ठरला नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, वर्गीकरण न करता, सर्व प्रकारच्या कचर्‍याचे विघटन करून त्यापासून इंधननिर्मिती करता येऊ शकते, असे संशोधन आयसीटीने केले आहे.

          पालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत दररोज 7,000 मेट्रिक टन कचर्‍याची निर्मिती होते. या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडे असलेले डम्पिंग ग्राउंड अपुरे पडते. यावर उपाय म्हणून पालिकेने मागील वर्षी मुंबईतील ज्या गृहनिर्माण संस्था, आस्थापना, खासगी आस्थापना 20 हजार चौ. मीटरपेक्षा जास्त चटई क्षेत्रात जागेत वसलेल्या आहेत अथवा ज्या गृहनिर्माण संस्था 100 किलोपेक्षा जास्त कचजयाची निर्मिती करतात, अशा गृहनिर्माण संस्थांनी व आस्थापनांनी कचर्‍याची विल्हेवाट स्वतः लावावी, असे आदेश दिले होते. आयसीटीचा अशा प्रश्नांवर एक चांगला उपाय असल्याचा दावा आयसीटीतर्फे करण्यात आला आहे.

1 टन कचर्‍याचे विघटन -

        पहिला प्रकल्प येत्या आठवड्यात चेंबूरच्या माहूल भागात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात 1 टन कचर्‍याचे विघटन करून सीटीएल ऑइलची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर 14 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.

2 लाख लीटर पाण्याचे विघटन -

          या प्रकल्पामुळे दररोज तब्बल 2 लाख लीटर पाण्याचेही विघटन होणार आहे. प्रयोगाच्या शेवटी मिळणारे पाणी हे घरगुती कामासाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीदेखील हा प्रकल्प उपयुक्त आहे.

काय आहे प्रकल्प?

           म्युनिसिपल सॉलिड व्हेस्ट - म्युनिसिपल लिक्विड व्हेस्ट प्लॅन ट्रिटमेंट प्लॅन (एमएसडब्ल्यू - एमएलडब्ल्यू) असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पात सर्व प्रकारचा कचरा आणि सांडपाणी एकत्र करून त्याचे मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण मोठ्या यंत्रामध्ये बारीक केले जाते. त्यानंतर तयार झालेल्या मिश्रणात कॅटेलिस्ट लिक्विड मिसळले जाते. कचर्‍याच्या प्रमाणाच्या 1 टक्के कॅटेलिस्ट लिक्विड मिसळण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर 90 मिनिटे ते 2 तास हे मिश्रण 150 अंश सेल्सिअस इतक्या तापमानात तापवणे गरजेचे असते. विघटनानंतर शेवटी पाणी, इंधन आणि अल्प प्रमाणात कचरा असे तीन वेगवेगळे घटक मिळतात. 1 टन कचर्‍यापासून जवळजवळ 500 किलो इंधन मिळते. विशेष म्हणजे 1 टक्के कॅटेलिस्ट लिक्विड मिसळले जाते, ते लिक्विड रिसायक्लेबल असल्यामुळे प्रकल्पानंतर शेवटी परत मिळवता येते.

दुसरा प्रकल्प दिल्लीत -

         दुसरा प्रकल्प पूर्व दिल्ली भागात उभारण्यात येणार असून हा प्रकल्प मुंबईपेक्षा खूप मोठा असेल. या प्रकल्पात तब्बल 100 टन कचर्‍याचे विघटन करून इंधननिर्मिती करण्यात येणार आहे.

१५ जानेवारी २०१८

नितीन कीर्तनेने पटकावले विजेतेपद

       पुण्याच्या नितीन कीर्तने याने वरिष्ठ गटाच्या आंतरराष्ट्रीय आयटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील 35 वर्षांवरील एकेरीचे विजेतेपद मिळवले. ग्वाल्हेर येथील सिटी सेंटर टेनिस कोर्टवर नुकतीच ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील 35 वर्षांवरील पुरुष एकेरीत पहिल्या फेरीत नितीनला पुढे चाल मिळाली. यानंतर दुसर्‍या फेरीत त्याने कौमारुद्दीन खानला 6-0, 6-1 असे नमविले. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत नितीनसमोर विपिन सिरपौलचे आव्हान होते. यात अग्रमानांकित नितीने विपिनवर 6-4, 6-0 असा विजय मिळवला. विपीनने पहिल्या सेटमध्ये चांगली लढत दिली. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये त्याचा नितीनसमोर निभाव लागला नाही. उपांत्य फेरीत नितीनने प्रफुल्ल अर्जेरियावर 6-0, 6-1 अशी सहज मात केली, तर दुसर्‍या उपांत्य लढतीत चौथ्या मानांकित नरेंद्रसिंह चौधरीने दुसर्‍या मानांकित दिलीप मोहंतीला 6-4, 6-0 असा पराभवाचा धक्का दिला.

         अंतिम लढतीत नितीने नरेंद्रसिंहवर 6-3, 6-1 असा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये नितीनने दोन वेळा नरेंद्रसिंहची सर्व्हिस ब्रेक केली. दुसर्‍या सेटमध्ये नितीनच्या आक्रमक सर्व्हिस, बँकहॅँडच्या जबरदस्त फटक्यांसमोर नरेंद्रसिंहचा निभावच लागला नाही. नितीनला ट्रॉफी आणि 60 आयटीएफ गुण मिळाले. नितीनचे हे आयटीएफ सिनियर गटातील हे सलग तिसरे, तर एकूण चौथे विजेतेपद ठरले. यापूर्वी त्याने देहरादून, मुझफ्फरनगर आणि मुंबईतील आयटीएफ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

१३ जानेवारी २०१८

‘इस्रो’ची सर्वात दीर्घ मोहीम

       भारताच्या हवामान बदल टिपणार्‍या उपग्रहासह ‘इस्रो’ने यशस्वी प्रक्षेपण केलेली ही मोहीम सर्वात दीर्घ मोहीम ठरली आहे. बहुस्तरीय मोहिमेत ‘इस्रो’चा मायक्रो उपग्रह 359.584 किमीच्या कक्षेत सोडण्यात आला. त्यासाठी पीएसएलव्ही-सी 40 प्रक्षेपक खाली आणण्यात आला. त्यानंतर चौथ्या टप्प्यासाठी प्रक्षेपणानंतर 105 मिनिटांनी रॉकेट रिस्टार्ट करण्यात आले. त्यानंतर चौथा टप्पा 2 तास 21 मिनिटांनी बंद झाला. त्यामुळे इस्रोची ही सर्वांत दीर्घ मोहीम ठरली आहे. अशाच प्रकारची पद्धत यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये पीएसएलव्ही-सी35 मोहिमेत वापरण्यात आली होती. तेव्हाची मोहीम 2 तास 15 मिनिटे चालली होती, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. पीएसएलव्ही सी-40 या मोहिमेत धृवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही) हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.

         ऑगस्ट 2017 मध्ये पीएसएलव्ही-सी 39 मोहीम अपयशी ठरली होती. या मोहिमेद्वारे दिशादर्शक उपग्रह आयआरएनएसएस-1एच प्रक्षेपित केला जाणार होता. प्रक्षेपणाच्या अखेरच्या टप्प्यात उष्णता कवच वेगळे झाले नसल्याने रॉकेटच्या चौथ्या टप्प्यात हा उपग्रह अडकला होता. इस्रोने 4 महिन्यांपूर्वी आलेल्या या अडचणींवर मात करून 30 उपग्रह यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. ‘इस्रोने 100 वा उपग्रह प्रक्षेपित केला हे झळाळते यश असून भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे,’ असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांच्या कार्यकाळातील ही शेवटची मोहीम आहे. कार्टोसॅट 2 मालिकेमुळे देशाला नवीन वर्षाची भेट मिळाली आहे, असे कुमार यांनी म्हटले आहे. मोहिमेमध्ये कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, कोरिया, ब्रिटन आणि अमेरिका या 6 देशांचे 28 उपग्रह होते. 3 उपग्रह मायक्रो, तर 25 नॅनो उपग्रह होते.

१२ जानेवारी २०१८

इस्रोने 100 वा उपग्रह अंतराळात सोडला

      भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने नवा इतिहास रचला. इस्त्रोने श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून 31 उपग्रह अंतराळात सोडून आत्तापर्यंत 100 उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. श्रीहरीकोटा येथून सकाळी 9.29 वा पीएसएलव्ही सी 40/कार्टोसॅट 2 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण केले.

       पीएसएलव्ही सी 40 सोबत भारताने तब्बल 31 उपग्रह अंतराळात सोडले. यामध्ये भारताचे 3, तर 28 उपग्रह अन्य 6 देशांचे आहेत. या 6 देशांमध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. 2017 मध्ये इस्रोचे पीएसएलव्ही सी 39 हे मिशन अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताच्या आजच्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. या अपयशानंतरही इस्रोने पुन्हा जोमाने तयारी करून, पीएसएलव्ही सी 40 या प्रक्षेपकाचे यशस्वी उड्डाण केले.

        या दरम्यान भारताने स्वतःचा एक 100 किलोचा मायक्रो आणि एक 10 किलोचा नॅनो उपग्रह आंतराळात सोडला आहे. याशिवाय भारताचा सर्वात मोठा उपग्रह आहे तो म्हणजे कार्टोसॅट 2 सीरिज उपग्रह. हा उपग्रह 710 किलोग्रॅमचा असून कार्टोसॅट 2 हा उपग्रह म्हणजे भारताचा ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जात आहे. आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे काम करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीची अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्र पाठवणार आहे.

किती उपग्रह सोडले -

*    अमेरिका - 19

*    दक्षिण कोरिया - 5

*    कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि फिनलँडचे प्रत्येकी एक

बीएफआयच्या कार्यकारी परिषदेत निवड : सरिता देवी

       विश्व आणि आशियाई स्पर्धेतील माजी विजेत्या एल. सरिता देवी हिची भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या कार्यकारी परिषदेत महिला बॉक्सिंग खेळाडूंची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. रोहतक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पार पडलेल्या निवडणुकीत सरिताला 31 पैकी 22 मते मिळाली. तिने रेल्वेच्या सीमा पुनियावर मात केली.

       “महिला बॉक्सिंगपटूंच्या समस्या परिषदेसमोर मांडण्यावर माझा प्राधान्य असेल, या समस्यांमधून मलाही जावे लागले आहे. वरिष्ठ खेळाडू असल्याने 2 दिवसांपूर्वीच ही निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला. महिला खेळाडूंच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे मला वाटले,” असे 4 वेळा आशियाई जेतेपद पटकावणार्‍या मणिपूरच्या सरिताने सांगितले.

        विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील माजी विजेती एल. सरिता देवी (60 किलो) आणि आशियाई रौप्यपदक विजेती सोनिया लाथर (57 किलो) यांनी राष्ट्रीय महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

        सरिताने अरुणाचल प्रदेशच्या अ‍ॅक्विलीया दुपकवर सहज विजय मिळवला. रेल्वेच्या सोनियानेही उत्तराखंडच्या कमला बिस्तला 5-0 असे नमवले. त्यांच्यासह निखत झरीनने (51 किलो) छत्तीसगडच्या आभावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. रेल्वेच्याच पवित्राने 60 किलो गटात माजी मणिपूरच्या चाओबा देवीवर विजय मिळवत अंतिम चौघींमध्ये स्थान निश्चित केले.

         मणिपूरच्या संर्जू बाला देवीने 48 किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना मध्य प्रदेशच्या दीपा कुमारीवर 5-0 अशी मात केली. मात्र आशियाई विजेत्या शिक्षाला 54 किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबच्या शविंदर कौर सिधूने रेल्वेच्या शिक्षाला पराभूत केले.

११ जानेवारी २०१८

‘इस्रो’च्या अध्यक्षपदी सिवन यांची नियुक्ती

      भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अध्यक्षपदी सिवन के. यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर ऑफ सायन्ससह विविध पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. सध्या ते विक्रम साराभाई अवकाश संशोधन संस्थेत संचालक म्हणून कार्यरत आहेत. 

मुद्रा योजनेत टॉप तीन राज्यांत महाराष्ट्र

      प्रधानमंत्री मुद्रा योजनेत महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात  42 हजार 860 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. मुद्रा योजनेत 40 हजार कोटींहून अधिक कर्ज वितरित करणार्‍या देशातील टॉप तीन राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. 

      देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू केली. या योजनेत शिशु, किशोर व तरुण कर्ज अशा तीन टप्प्यात 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत बँकांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येतो.

        या योजनेंतर्गत महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत 91 लाख 53 हजार 619 कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून 44 हजार 49 कोटी 17 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. 42 हजार 860 कोटी 43 लाख रुपये लघुउद्योजकांना वितरित करण्यात आले आहेत. सन 2015-16 या वर्षात 13 हजार 372 कोटी 42 कोटी रुपयांचे कर्ज प्रत्यक्षात वितरित करण्यात आले. 2016-17 या वर्षात 16 हजार कोटी 976 लाख 76 हजार, तर 2017-18 या वर्षात 12 हजार 511 कोटी 25 लाख इतके कर्ज प्रत्यक्षात लघु उद्योजकांना वितरित करण्यात आले.

तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्र देशात अव्वल

    मुद्रा योजनेतील तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. या प्रकारात 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. गेल्या तीन वर्षांत तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्रात 12 हजार 176 कोटी 13 लाख रुपयांचे कर्ज प्रत्यक्षात वितरित करण्यात आले आहे. किशोर कर्ज गटात 50 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यामध्ये राज्यात तीन वर्षांत  11 हजार 956 कोटी 95 लाख तर शिशु कर्ज गटात 18 हजार 727 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. शिशु गटात 50 हजार रुपयांपर्यंत कर्जपुरवठा केला जातो. 

देशात 4 लाख कोटींचे कर्ज वितरण

       मुद्रा योजनेत तीन वर्षांत 10 कोटींहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून लघु उद्योगांना 4 लाख 43 हजार 496 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू ही राज्ये मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये टॉप तीनमध्ये आहेत.

१० जानेवारी २०१८

आंचलने रचला इतिहास

       भारतात फारशा परिचित नसलेल्या स्किइंग स्पर्धेत आंचल ठाकूरने इतिहास रचला असून, या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तुर्की येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आंचलने कांस्यपदकाची कमाई केली. 

       आंतरराष्ट्रीय स्किइंग फेडरेशनतर्फे आयोजित एल्पाईन एज्डेर चषक स्पर्धेत स्लॉलम शर्यतीत आंचलने पदक जिंकले. आंचलने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या कामगिरीविषयी सर्वांना माहिती दिली. ‘अनपेक्षित अशी एक घटना आज घडली आहे. मी पहिल्याच आंतरराष्ट्रीय पदकाची कमाई केली आहे,’ असे ट्विट तिने केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे कौतुक केले. ‘स्किईंग खेळामध्ये मिळवलेल्या पदकाबद्दल तुझे अभिनंदन. संपूर्ण देशाला तू केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीविषयी गर्व वाटतोय. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा,’ असे ट्विट मोदी यांनी केले. 

सरकारचा पाठिंबा मिळेल 
        पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या अभिनंदनाबाबत आंचलने आनंद व्यक्त केला. ‘पंतप्रधान माझे अभिनंदन करतील, असे मला कधीही वाटले नव्हते. त्याशिवाय सोशल मीडियावरून मला जो प्रतिसाद मिळाला, तो खूपच उत्साहवर्धक असून, आता या खेळाला सरकारचा पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास तिने तुर्कीहून पीटीआयशी बोलताना व्यक्त केला. 21 वर्षीय आंचल चंदीगढ येथे शिकत असून, तिचे वडील रोशन ठाकूर हिवाळी क्रीडा फेडरेशनचे सचिव आहेत. रोशनदेखील चांगले स्किइंगपटू आहेत. आंचलने युरोपात या खेळाचे प्रशिक्षण घेतले. सरकारच्या कोणत्याही पाठिंब्याशिवाय आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी केली असल्याचेही तिने म्हटले आहे. भारतात नियमितपणे बर्फ पडत नसल्याने सरावासाठी विदेशातच जावे लागते, असेही तिने स्पष्ट केले. भारतात फक्त गुलमार्ग आणि अऊली येेथे स्किइंगची सराव केंद्रे आहेत. 

काय आहे स्किइंग? 
     स्कीइंग हा बर्फावर खेळला जाणारा खेळ आहे. अनेक  हिंदी चित्रपटांत हा खेळ दाखवण्यात आला आहे.  बर्फावरून वेगाने स्कीज्च्या मदतीने पुढे जावे लागते.  स्कीज्बरोबर बूट वापरले जातात, जे  स्कीज्ला जोडता येतात.एल्पाईन स्किइंगमध्ये डोंगरावरून वेगाने पुढे यावे लागते.

आधारकार्डसाठी आता नवी टू-लेयर सेफ्टी सिस्टीम

        आधार कार्डधारकांची प्रायव्हसी अधिक सुरक्षित करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने  एक नवी टू-लेयर सेफ्टी सिस्टीम जारी केली आहे. ही दुपदरी प्रक्रिया म्हणजे व्हर्चुअल आयडी आणि लिमिटेड केवायसी. या प्रक्रियेमुळे यापुढे आपल्याला प्रत्येक ठिकाणी सत्यता पडताळणीसाठी (ऑथेंटिकेशन) आधार क्रमांक देण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी १६ डिजीटचा व्हर्चुअल आयडी ग्राह्य धरण्यात येईल.

      व्हर्चुअल आयडीमुळे आधार ऑथेंटिकेशन आधीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे. व्हर्चुअल आयडी एक १६ अंकी क्रमांक असेल, जो ऑथेंटिकेशनच्या वेळी आधार क्रमांकाऐवजी वापरण्यात येईल. हा क्रमांक आवश्यक असेल तेव्हा संगणकीय पद्धतीने तत्काळ जनरेट करता येईल. सर्व संस्था १ जून २०१८ पासून ही नवी पद्धत अंमलात आणणार आहेत.

          लिमिटेड केवायसी सुविधा आधारकार्डधारकांसाठी नव्हे तर संस्थांसाठी आहे. केवायसीसाठी संस्था आपला आधार क्रमांक घेतात. मात्र लिमिटेड केवायसी सुविधेंतर्गत कोणतीही संस्था तुमचा आधार क्रमांक साठवून ठेवू शकणार नाहीत. या सुविधेमुळे संस्थांना आधार क्रमांकावर अवलंबून न राहता स्वत:चे केवायसी करण्याची परवानगी देण्यात येईल. परिणामी संस्था टोकन क्रमांकाद्वारे ग्राहकांची ओळख पटवतील.

९ जानेवारी २०१८

चीनचे माजी अध्यक्ष जिंताओ यांचे निधन

       चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. 2003 ते 2013 या दहा वर्षांच्या काळात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. 21 डिसेंबर 1942 रोजी जन्मलेल्या जिंताओ यांनी 1998 ते 2003 या काळात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

     त्यानंतर 2002 मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढे 2003 साली मार्च महिन्यात जिंताओ यांनी जियांग जेमिन यांच्याकडून चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.

८ जानेवारी २०१८

अजीज अन्‍सारी सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता

       मूळचे भारतीय असलेले अभिनेते, कलाकार अजीज अंसारी यांना 'गोल्डन ग्लोब्स' पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. 'मास्टर ऑफ नन' या टीव्‍ही सीरीजमध्‍ये उत्‍कृष्‍ट भूमिका केल्‍याबद्‍दल सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा पुरस्‍कार त्‍यांना प्रदान करण्‍यात आला. पुरस्‍कार सोहळ्‍यात अजीज यांनी आपल्‍या आई वडिलांचे समर्थन मिळाल्‍याबद्‍दल त्‍यांचे आभार मानले. 

    अजीज अंसारी यांचा हा पहिला गोल्डन ग्लोब्स पुरस्‍कार आहे. यापूर्वी अंसारी 'मास्‍टर ऑफ नन' याच शोसाठी २०१६मध्‍ये देखील गोल्डन ग्लोब्स पुरस्‍कारासाठी नॉमिनेट झाले होते. मात्र, त्‍यांना या पुरस्‍कारावर आपले नाव कोरता आले नाही. 

याशिवाय, अभिनेत्री, दिग्‍दर्शकांनाही गोल्‍डन ग्‍लोब्‍स पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. 

निकोल किडमॅन-उत्‍कृष्‍ट अभिनेत्री- ('बिग लिट्ल लाइस')

एलिजाबेथ मोस-उत्‍कृष्‍ट अभिनेत्री-ड्रामा टीव्‍ही कॅटेगरी-('द हैंडमेड्स टेल'). गेल्‍यावर्षी एलिजाबेथ मोसने उत्‍कृष्‍ट अभिनयासाठीचा एमी ॲवॉर्ड आपल्‍या नावे केला होता. 

साइओर्स रोनन -उत्‍कृष्‍ट अभिनेत्री- म्युझिकल/कॉमेडी कॅटेगरी-(‘लेडी बर्ड’)

 ‘लेडी बर्ड’- सर्वोत्‍कृष्‍ट मोशन पिक्चर्स 

गुइलेरमो डेल तोरो -सर्वोत्‍कृष्‍ट दिग्‍दर्शक - (‘द शेप ऑफ वॉटर’) 

अभिनेता श्रीवल्लभ व्यास यांचे निधन

       आमीर खानच्या 'लगान' चित्रपट ईश्‍वर काकांची अविस्मरणीय भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे दीर्घ आजारने जयपूर येथे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. व्यास यांनी जवळपास 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. शिवाय काही मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 2008 मध्ये ब्रेन स्ट्रॉकमुळे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले. त्यानंतर आर्थिक खर्च वाढू लागल्याने त्यांचे कुटुंबीय जैसलमेरला शिफ्ट झाले. गेली दोन वर्षांपासून त्यांची पत्नी शोभा आणि दोन मुलींसह ते जयपूर येथे राहत होते.

      काही प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक संकटात असलेल्या व्यास यांच्या कुटुंबियांना आमिर खान, इमरान खान आणि मनोज वायपेयी यांनी मदत केली होती. आमिरने त्यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली होती.  

        व्यास यांनी 1991मध्ये चित्रपट व्यवसायात प्रवेश केला होता. त्यांनी 'सरदार', 'माया मेम साहब', 'वेलकम टू सज्जनपूर', 'सरफरोश', 'लगान', 'बंटी और बबली', 'चांदनी बार' आणि 'विरुद्ध' यासह 60हून अधिक चित्रपटात काम केले होते. चित्रपटासह त्यांनी टिव्ही मालिकांमध्ये देखील काम केले होते. 'आहट', 'सीआयडी', 'कॅप्टन व्योम' मधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या. 

६ जानेवारी २०१८

अखेर पाकवर कारवाई

       दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानचा खरा चेहरा अमेरिकेला दिसू लागला आहे. अमेरिकेने 9/11 नंतर दहशतवादाच्या विरोधात छेडलेल्या युद्धात सहभागी होऊन वॉशिंग्टनकडून अब्जावधी डॉलरची मदत लाटणारा पाकिस्तान प्रत्यक्षात दहशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे, काश्मीरमध्ये छुपे युद्ध लढत असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला वेळोवेळी सांगितले आहे. दहशतवादाबाबतच्या पाकिस्तानच्या धोरणातील दुटप्पीपपणाही भारताने अनेकदा उघड केले आहे. मात्र, अमेरिकेने पाकची मदत थांबविली नव्हती. भारताला आणि आपल्याला भेडसावणार्‍या दहशतवादाबाबत अमेरिका भेदभाव करते की काय, अशी शंका त्यामुळे या उपस्थित होत होती. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून पाकिस्तानचा खोटेपणा अधोरेखित केला.

         दहशतवादाच्या विरोधातील युद्धात पाकिस्तानला अमेरिकेने 33 अब्ज डॉलरची मदत दिली, परंतु दहशतवाद रोखण्यासाठी पाकने काहीही केले नाही. तो आम्हाला गेली 15 वर्षे मूर्ख बनवित आला आहे, असे ट्विट करून ट्रम्प यांनी नव्या वर्षात पाकिस्तानबाबत अमेरिका कठोर भूमिका घेईल हेच सूचित केले होते. ट्विटच्या आधारे परराष्ट्र धोरणे ठरविली जात नसली, तरी आपल्या लौकिकाला साजेसे वागत ट्रम्प यांनी, पाकिस्तानला संरक्षणासाठी दिली जाणारी मदत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादांना नेस्तनाबूत करण्यासाठीची कटिबद्धता दाखवित नाही आणि निर्णायक कारवाई करीत नाही, तोपर्यंत पाकिस्तानला सुरक्षाविषयक मदत दिली जाणार नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. अमेरिका अफगाणिस्तानात तालिबानींच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे तेथील तालिबानी अफगाणिस्तानची सीमा ओलांडून पाकिस्तानमधील डोंगराळ भागात आश्रय घेतात. त्यांच्या विरोधात अमेरिका ड्रोन हल्ले करीत आहे. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर पाकिस्तानने कारवाई करण्याची गरज असते. ती पाककडून प्रामाणिकपणे होत नसल्याचा, तसेच अमेरिकेला हवे असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांना इस्लामाबाद मदत करीत असल्याचा वॉशिंग्टनचा आरोप आहे. ट्रम्प यांचे नववर्षाचे ट्विटही याच अनुषंगाने होते. अफगाणिस्तानला अस्थिर करणार्‍या आणि तेथील अमेरिकी फौजांना लक्ष्य करणार्‍या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्याऐवजी त्यांना मदत करून पाकिस्तान दुटप्पी धोरण राबवित आहे.

           दहशतवाद्यांना पोसण्याच्या पाकच्या डावपेचाचा सर्वांत मोठा फटका भारताला बसतो आहे. आता तो अमेरिकेलाही बसू लागला आहे. त्यामुळे वॉशिंग्टनकडून कारवाईचे पाऊल उचलले जात आहे. मध्य आशिया आणि अफगाणिस्तान यांचा शेजार लाभलेल्या पाकिस्तानच्या या भौगोलिक स्थानामुळेच अमेरिकेने त्या देशाला सतत चुचकारले आहे. मात्र, यामुळेच अमेरिकेला आपल्याशिवाय पर्याय नसल्याची भावना पाकिस्तानातील लष्करशाहीत निर्माण झाली. अफगाणिस्तानावर वर्चस्व मिळवून आपली पश्चिम सीमा सुरक्षित करण्याचा पाकिस्तानचे डावपेच आहेत. त्यासाठी तो देश तालिबानींना पाठबळ देत आहे. दुसरीकडे चीनबरोबरील सामरिक संबंध दृढ करून, तसेच त्या देशाच्या महामार्गांच्या प्रकल्पात सहभागी होऊन पाकिस्तानने अमेरिकेनंतरचा दुसरा सहकारीही शोधला आहे. पाकच्या या दुहेरी नीतीकडे कानाडोळा करण्याचे आतापर्यंतचे धोरण बदलून ट्रम्प यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे गळे काढत असलेल्या पाकिस्तानच्या ढोंगाला अमेरिकेने भुलू नये. केवळ तालिबानीच नव्हे, तर भारताच्या विरोधातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास पाकला भाग पाडणे आवश्यक आहे.

आता रेल्वेप्रवासातही मिळणार आरोग्यसेवा

       रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये सक्षम वैद्यकीय सोयीसुविधा नसतात त्यामुळे या प्रवासादरम्यान काही आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवली तर ही भीती प्रवाशांना भेडसावत असते. रेल्वे प्रवाशांच्या आरोग्यसुविधांसंदर्भात केंद्रसरकारने आता गांभीर्याने विचार केला आहे.

        रेल्वेमध्ये डॉक्टर, फार्मासिस्ट आणि परिचारिका यांची नियुक्ती केली डाणार आहे प्रवाशांसाठी अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे बोर्ड तसेच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने काही महत्त्वाची पावले उचलली आहे. रेल्वे बोर्डाच्या आरोग्य विभागाने प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व रेल्वेगाड्यांमधील गार्ड आणि सर्व रेल्वे स्थानकांचे स्टेशन मास्तर यांच्याजवळ अत्यावश्यक औषधांसह ड्रेसिंग सामुग्री असलेल्या प्रथमोपचार पेट्या असतील, हे कटाक्षाने पाळले जाणार आहे.

       रेल्वे प्रवासादरम्यान आरोग्यविषयक कोणत्या बाबी सरकारकडून केलेल्या आहेत, याची विचारणा युनियन ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्ट्स या संघटनेचे उमेश खरे यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली होती. त्यात जेनेरीक औषधांची उपलब्धता, वैद्यकीय यंत्र सामुग्रींना औषधांचा दर्जा मिळण्यासंदर्भात किंमत नियंत्रित केली आहे का, याचीही विचारणा करण्यात आली होती. दूरवरचा प्रवास असेल वा अपघातसदृश्य परिस्थितीमध्ये अनेकदा प्रवाशांना आरोग्यसेवा मिळत नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान आरोग्याशी संबधित काही महत्त्वाच्या बाबींवर विचार करण्यात आला आहे का, असेही खरे यांनी पत्रामध्ये विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे देताना पंतप्रधान कार्यालयाने रेल्वेबोर्डाच्या आरोग्यविभागाने केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांची माहिती दिली आहे.

        प्रमुख रेल्वे स्थानकांवर आणि राजधानी, शताब्दी एक्सप्रेस गाड्या, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अधीक्षक, गार्ड यांच्याजवळही गरज भासू शकणार्‍या औषधांचा साठा देण्यात येणार आहे. अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये लागणारे वैद्यकीय सामुग्री असलेल्या प्रथमोपचार पेट्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी त्याची मागणी करू शकतात, असेही रेल्वेबोर्डाच्या आरोग्यविभागाने स्पष्ट केले आहे.

कर्मचार्‍यांना आरोग्य प्रशिक्षण -

       प्रवाशांना प्राथमिक उपचारसेवा देण्यासाठी गाड्यांमध्ये असलेल्या कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व स्थानकांच्या स्टेशन मास्तरांकडे स्थानकाच्या जवळपासचे सरकारी व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या डॉक्टरांची, रुग्णालयांची तसेच दवाखान्यांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांची मदत घेता येऊ शकेल, गरज पडल्यास रेल्वे रुग्णालये व राज्य सरकार दोन्ही रुग्णवाहिकांच्या सेवांची मदत प्रवाशांना घेता येणार आहे.

५ जानेवारी २०१८

अमेरिकेच्या कोणत्याही दंडात्मक कारवाईला प्रत्युत्तर देण्यास सज्ज

      दहशतवादी गटांना पाठिंबा देणार्‍या पाकिस्तानवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. अमेरिकेकडून करण्यात येणार्‍या दंडात्मक कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची दपरेक्ती पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे.

      डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षांनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानची आर्थिक मदत रोखण्याबरोबरच कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही लगेचच यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला देणार्‍या येणार्‍या 255 दशलक्ष अमेरिकी डॉलरची लष्करी मदतही रोखली आहे. पाकिस्तानच्या जनतेसाठी अमेरिकेच्या कारवाईला प्रत्युत्तर देणार असल्याचे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महानिदेशक मेजर जनरल असिफ गफर यांनी सांगितले.

     डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये पाकिस्तानने दहशतवादाच्या मुद्यावर नेहमीच दगा दिल्याचे म्हटले होते. पाकिस्तानकडूनच दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली जाते आणि आश्रयही दिला जातो, असेही ट्रम्प ट्विटमध्ये म्हणाले होते. या ट्विटरनंतर पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानकडून दहशतवादाला थारा दिला जात नसल्याचा दावाही केला.

चीनच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा भारत, अमेरिकेला धोका

      बीजिंग-चीनच्या नवीन हायपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे अमेरिकेच्या संरक्षणसिद्धतेस केवळ आव्हानच नाही तर हे क्षेपणास्त्र जपान आणि भारतातील लष्करी तळांचा अचूक निशाणा साधू शकते, असा इशारा प्रसारमाध्यमांच्या वृत्तात दिला आहे.

     टोकियोतील मुत्सद्देगिरीविषयक मासिकात चीनने गेल्या वर्षी हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल(एचजीव्ही) अर्थात डीएफ-17 च्या दोन चाचण्या घेतल्याचे नमूद केले आहे. यानंतर दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टमध्ये वरील इशारा दिला आहे. अमेरिकी गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात पीपल्स लिबरेशन आर्मी(पीएलए) रॉकेट फोर्सने 1 नोव्हेंबरला पहिली आणि त्यानंतरच्या दोन आठवड्यांनी दुसरी चाचणी घेतली. दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या असून डीएफ-17 2020 मध्ये प्रत्यक्ष ताफ्यात समाविष्ट केले जाईल. चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पारंपरिक क्षेपणास्त्रापेक्षा एचजीव्ही क्षेपणास्त्र अतिवेगाने लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन

      राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले, ते 68 वर्षांचे होते.

      ठाणे जिल्ह्यातील मोठे नेते म्हणून डावखरे यांची ख्याती होती. हिवरे गावचे सरपंच त्यानंतर 1986 साली ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या दखलपात्र कामगिरीनुसार ठसा उमटवला होता. 1987 मध्ये ते ठाण्याचे महापौर झाले होते. त्यानंतर 1992 पासून चार वेळा ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचा चांगला सुसंवाद होता. अत्यंत मितभाषी स्वभावाचे ते होते. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचेच नव्हे तर समाजाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

     20 नोव्हेंबर रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते. हृदयाचा त्रास आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने ते त्रस्त होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

वसंत डावखरे यांचा अल्पपरिचय -

*    वसंत डावखरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. पुढे शिक्षणासाठीही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला. हिवरे गावचे सरपंच ते विधान परिषदेचे उपसभापती हा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे.

*    1986 साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत ते नौपाड्यातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. 1986-87 साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते ठाण्याचे महापौरही झाले.

*    1992 पासून सलग चारवेळा ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले.

*    1998 मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर सलग 18 वर्षे ते उपसभापती होते.

४ जानेवारी २०१८

महाराष्ट्राला सिंचन व्यवस्थापनासाठीचा पुरस्कार

      देशात सर्वात जास्त पाणी वापर संस्था स्थापन करून विक्रमी सिंचन व्यवस्था निर्माण करणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्र शासनाच्या केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार प्रदान केला. केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे सचिव च. आ. बिराजदार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

      केंद्र शासनाचा हा पुरस्कार प्रथमच महाराष्ट्राला मिळाला आहे. येथील स्कोप कॉम्प्लेक्सच्या सभागृहात केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या हस्ते सिंचन व ऊर्जा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व संस्थांचा विविध श्रेणीत पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचे सचिव यु. पी. सिंह, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पुष्पेंद्र सिंह, केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र वर्मा मंचावर उपस्थित होते.

         केंद्र शासनाच्या केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळाच्यावतीने मिळालेला पुरस्कार हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे मी मानतो. यापुढे महाराष्ट्राची सिंचन क्षमता दुप्पट करण्याचा प्रयत्न राहील अशा भावना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या. ते म्हणाले, राज्यात सुमारे 13 लक्ष लाभक्षेत्रावर 3,242 पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहेत.

‘नासा’चे तंत्रज्ञान वापरून तिप्पट उत्पादन देणारी गव्हाची प्रजाती

     नासा या अमेरिकी अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित केली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढणार आहे. नासाच्या प्रयोगात सतत सूर्यप्रकाशात रोपे राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाट्याने होते.

      ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकाने सांगितले, की जलद वाढ तंत्र वापरताना त्यात गहू, चवळी व बार्ली यांची 6 पिढ्यांतील रोपे तर कॅनोलाची 4 पिढ्यांतील रोपे एका वर्षांत वाढवण्यात आली. यात विशिष्ट प्रकारचे काचगृह वापरले होते. नियंत्रित वातावरणात वाढवण्यात आलेल्या प्रयोगात सूर्यप्रकाश भरपूर ठेवला होता.

       2050 पर्यंत जगात अन्नधान्य उत्पादनात 60 ते 80 टक्के वाढ केली तरच लोकांना अन्न मिळू शकणार आहे, त्यामुळे उत्पादनवाढीच्या या प्रयोगाला महत्त्व आहे. 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या 9 अब्ज असणार आहे. अधिक वेगाने वनस्पतींची वाढ करण्याचे प्रयोग हे संशोधनात केले जात होते ते आता प्रत्यक्ष वापरात आणण्याची वेळ आली आहे. डो अ‍ॅग्रोसायन्सेस बरोबर भागीदारीत हे तंत्र वापरून गव्हाची डीएस फॅरेडे ही नवी प्रजाती विकसित करण्यात आली असून, ती या वर्षीच वितरित होणार आहे.

       डीएस फॅरेडे ही जास्त प्रथिने असलेली गव्हाची प्रजाती असून त्यात लवकर अंकुरण होते. या गव्हात काही जनुके समाविष्ट केली असून, त्यामुळे ही प्रजाती जास्त ओलसर हवामानातही टिकते. ऑस्ट्रेलियात गेली 40 वर्षे ही समस्या सोडवण्याचे प्रयत्न चालू होते. पीएच.डी.च्या विद्यार्थिनी अ‍ॅमी वॉटसन या संशोधनाच्या सहलेखिका असून, जर्नल नेचर प्लांट्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. फलोद्यान व ऊर्ध्व शेती पद्धतीतही या तंत्राचा वापर होणार आहे.

डीएस फॅरेडे गहू प्रजात -

*    जास्त प्रथिने

*    वेगाने वाढ

*    ओलसर हवामानातही टिकण्याची क्षमता

*    गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढणार

३ जानेवारी २०१८

मराठीला अभिजात भाषा दर्जा देण्याचा केंद्राचा विचार

       मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात केंद्र सरकार सक्रिय असून संबंधित समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असून त्याबाबतच्या शिफारशींवर विचार सुरू आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी दिली. लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून यासंबंधी प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाला मिळाला आहे.

       1500 ते 2000 या कालावधीत भाषेचा नोंद इतिहास असणे अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असते. त्याचप्रमाणे प्राचीन साहित्य हे भाषांतरित नसून मूळ भाषेतील असल्याचा निकष पूर्ण केल्यास भाषेला अभिजात दर्जा मिळतो. सध्या तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम आणि ओडिया या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. 

अमेरिकेने रोखली पाकची लष्करी मदत

       अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी 255 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची लष्करी मदत अमेरिकेने तूर्तास स्थगित केली आहे. आपल्या भूमीतून पाठबळ मिळत असलेल्या दहशतवादी कारवायांवर पाकिस्तान काय कारवाई करते, यावर भविष्यातील मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे सांगत अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमधील सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला. गेल्या 15 वर्षांत अमेरिकेने दिलेल्या 33 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या बदल्यात पाकिस्तानने फक्त असत्य आणि फसवणूकच दिली आहे, अशा कडक शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकचा समाचार घेतला होता. त्यानंतर काही वेळातच पाकची लष्करी मदत थांबवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

       ‘परदेशी लष्करी मदतीअंतर्गत आर्थिक वर्ष 2016 साठी पाकिस्तानला देण्यात येणारा 255 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा निधी खर्च करण्याची अमेरिकेची योजना नाही’, असे ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला सांगितले. ‘पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवाद्यांवर ठोस कारवाई करावी, अशी अध्यक्ष ट्रम्प यांची अपेक्षा असून दक्षिण आशिया धोरणाला पाककडून मिळणार्‍या पाठिंब्यावरच भविष्यातील सुरक्षाविषयक मदतीसह अन्य संबंधांबाबत निर्णय घेतला जाईल’, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

‘बागान’च्या पराभवानंतर प्रशिक्षकांचा राजीनामा

      मोहन बागान संघाला आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नई सिटी संघाकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर प्रशिक्षक संजॉय सेन यांनी राजीनामा दिला. सेन यांची डिसेंबर 2014 मध्ये नियुक्ती केली होती.

     लढतीच्या सहाव्याच मिनिटाला जीन-मायकेल जॉचिमनो गोल करून चेन्नई संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 36 व्या मिनिटाला अन्सूमान क्रोमाहने गोल करून मोहन बागानला बरोबरी साधून दिली. मात्र, 71 व्या मिनिटाला वेनिअमिन शुमेयकोने गोल करून चेन्नईला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून चेन्नईने मोहन बागानला नमविले. 7 सामन्यानंतर मोहन बागानला प्रथमच पराभव पत्करावा लागला.

पश्चिम बंगालची‘अ‍ॅरोज’वर मात -

        पश्चिम बंगाल संघाने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत इंडियन अ‍ॅरोज संघावर 2-0 ने मात केली. पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी 3 मिनिटांच्या अंतरात 2 गोल केले. यातून इंडियन अ‍ॅरोज संघ शेवटपर्यंत सावरला नाही. पश्चिम बंगाल संघाकडून महंमद अल अमना (13 मि.) आणि कात्सुमी युसाने (16 मि.) गोल केले. इंडियन अ‍ॅरोज संघाने गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यात त्या संघाला यश आले नाही. पश्चिम बंगालचे प्रशिक्षक खलिद जमिल यांना अपशब्द वापरल्याचे गोलकीपर प्रशिक्षक युसूफ अन्सारीने रेफ्रींना सांगितले. रेफ्रींनी इंडियन अ‍ॅरोज संघाला ताकीदही दिली. या विजयासह पश्चिम बंगाल संघ गुणतक्त्यात 17 गुणांसह आघाडीवर आहे. पश्चिम बंगालचा हा 8 सामन्यांतील पाचवा विजय ठरला. इंडियन अ‍ॅरोज संघाचा हा सातव्या सामन्यांतील चौथा पराभव ठरला. अ‍ॅरोज संघ 7 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

२ जानेवारी २०१८

भारताचे नवे परराष्ट्र सचिव : विजय गोखले

       चीनमधील माजी राजदूत व सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंधविषयक विभागाची जबाबदारी सांभाळणारे सचिव विजय केशव गोखले यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती जाहीर केली. त्यांना 2 वर्षांची मुदत मिळणार आहे. वर्तमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे 28 जानेवारी रोजी निवृत्त होतील. गोखले हे चीन तसेच पूर्व आशियाशी निगडित तज्ज्ञ मानले जातात. 1981 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झालेले गोखले हे जयशंकर यांच्या खालोखाल सेवाज्येष्ठ आहेत.

      2013 ते 2016 या काळात त्यांनी जर्मनीत राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर जानेवारी 2016 ते ऑक्टोबर 2017 या काळात त्यांची चीनमधील भारतीय राजदूत म्हणून नेमणूक झालेली होती. ऑक्टोबर-2017 नंतर ते दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयातच आर्थिक संबंधविषयक सचिव म्हणून काम पाहत होते. गोखले यांनी जानेवारी 2010 ते ऑक्टोबर 2013 या काळात मलेशियात भारतीय उच्चायुक्त म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी त्यांनी हाँगकाँग, हानोई, बीजिंग, तैपेई, न्यूयॉर्क याठिकाणीही विविध राजनैतिक जबाबदार्‍या सांभाळल्या होत्या. गोखले यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

      कोकण मराठी साहित्य परिषदेने राजापूर येथील साहित्यिक मानसी हजेरी, लांज्यातील अमोल रेडीज यांच्यासह कोकणातील 14 जणांना वाङ्मयीन पुरस्कार जाहीर केले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील साहित्यिकांना विविध वाङ्मयीन पुरस्कार दिले जातात.

      प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप 5,000 रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकाचे विशेष पुरस्काराचे स्वरूप 3,000 रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. कोमसापचे पुरस्कार समितीचे निमंत्रक अरुण नेरुरकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार वितरण कार्यक्रम कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे 28 जानेवारीला सकाळी 10 वाजता कोमसापच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात होणार आहे.

वाङ्मय प्रकार, पुरस्कार, लेखक आणि पुस्तकाचे नाव या क्रमाने -

     कादंबरी -

*    र. वा. दिघे पुरस्कार - विवेक गोविलकर (युनायटेड आयर्न अँड स्टील)

*    वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार - गुंजार पाटील (शिवशंभू)

     कथासंग्रह -

*    वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार - राजश्री बर्वे (चांदण्यांचं झाड)

*    विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार - कल्पना बांदेकर (मन पाखरू पाखरू)

     कविता -

*    आरती प्रभू स्मृती पुरस्कार - वसुंधरा तारकर (बाईमाणसाच्या संज्ञेतून)

*    वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार - नरसिंग इंगळे (शब्दवेणा)

     चरित्र, आत्मचरित्र -

*    धनंजय कीर स्मृती पुरस्कार - जगन्नाथ वर्तक (हिरवे वाळवंट),

*    श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार - भावना पाटोळे (यशवंतराव चव्हाण)

     समीक्षा -

*    प्रभाकर पाध्ये स्मृती विशेष पुरस्कार - (कै.) डॉ. विद्याधर करंदीकर (कवी, नाटककार स्वा. सावरकर)

     ललित -

*    अनंत काणेकर स्मृती पुरस्कार - वैभव साटम (बिटकी)

*    सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार - प्रतिभा सराफ (माझी कुणीतरी)

     बालवाङ्मय -

*    प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार - मानसी हजेरी (ससोबाचा चांदोबा)

     संकीर्ण -

*    वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार - डॉ. अविनाश पाटील (आगरी बोली, लोकसंस्कृती आणि साहित्य परंपरा)

*    अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार - विनोद पितळे (बायलाइन)

     वैचारिक साहित्य -

*    फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार - डॉ. सोमनाथ कदम (मातंग समाजाचा इतिहास)

     नाटक, एकांकिका -

*    रमेश कीर पुरस्कार - अमोल रेडीज (द गेम ऑफ डेस्टिनी).

*    दृकश्राव्य, कला-सिनेमा या विषयावरील योग्य पुस्तक आले नसल्याने पुरस्कार देण्यात येणार नाही.

१ जानेवारी २०१८

एव्हरेस्टवर एकट्या गिर्यारोहकाला बंदी

       नेपाळने गिर्यारोहकांच्या सुरक्षेचा विचार करून नेपाळच्या अखत्यारीत असलेल्या शिखरांवर आणि माऊंट एव्हरेस्टवर एकट्या गिर्यारोहकाला जाण्यास मनाई केली आहे. जगातील सर्वोच्च शिखरांच्या पंगतीत बसलेल्या माऊंट एव्हरेस्टवर पोहोचणे गर्यिारोहकांसाठी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हे गिर्यारोहक अवरित सराव करतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गिर्यारोहकांचे झालेले मृत्यू पाहता नेपाळमधून एकट्या गिर्यारोहकाला एव्हरेस्टवर जाण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबरच अंध आणि दिव्यांग गिर्यारोहकांच्या एव्हरेस्ट चढाईला मनाई केली आहे. या बंदीबाबत अनेक गिर्यारोहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नियमांवर गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू असून या आठवड्यात हे नियम लागू केले जाणार असल्याचे नेपाळने स्पष्ट केले आहे.

    2017 या वर्षात बहुतांश गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला. सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेक हे देखील एव्हरेस्ट सर करण्याच्या तयारीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना टाळण्यासाठीच सुरक्षेचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

‘त्रिवार तलाकच्या जोखडातून मुस्लीम महिलांना मुक्ती’

       अनेक वर्षे ‘हाल’ सहन केल्यानंतर तोंडी तिहेरी तलाकच्या जोखडातून स्वतःला मुक्त करण्याचा मार्ग मुस्लीम महिलांना सापडला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या प्रथेला गुन्हा ठरवणारे विधेयक लोकसभेने मंजूर केल्यानंतर मोदी यांनी या मुद्यावर प्रथमच मतप्रदर्शन केले.

        मुस्लीम महिलांना समान संधी देण्याबाबत आपले सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर भर देताना पंतप्रधानांनी एकट्या मुस्लीम महिलेला हज यात्रेला जाण्याची परवानगी देण्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचाही उल्लेख केला. केरळातील  शिवगिरी यात्रोत्सवाच्या निमित्ताने मोदी यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण झाले. शिवगिरी हे समाजसुधारक  नारायण गुरू यांचे पवित्र स्थान आहे.

      नुकत्याच लोकसभेत संमत झालेल्या ‘मुस्लीम विमेन प्रोटेक्शन राइट्स ऑन मॅरेज’ विधेयकाचा उल्लेख न करता मोदी म्हणाले की, त्रिवार तलाकमुळे मुस्लीम माता-भगिनींचे जे हाल होत होते, ते कुणापासून लपून राहिलेले नव्हते. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर त्यांना तिहेरी तलाकच्या प्रथेपासून स्वतःला मुक्त करून घेण्याचा मार्ग सापडला आहे.

        या विधेयकामुळे तिहेरी तलाक किंवा ‘तलाक-ए-बिद्दत’ बेकायदेशीर ठरला असून, तो देणार्‍या पतीला 3 वर्षांपर्यंतच्या कैदेची त्यात तरतूद आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरवला आहे. या कायद्याच्या आराखड्यानुसार संबंधित महिला निर्वाह भत्ता मागू शकते आणि मुलांचा ताबा मिळण्यासाठीही दावा करू शकते.