Menu

Study Circle

स्टडी सर्कल - एक आगळेवेगळे विद्यासंकुल

Study Circle is the pioneer in training students for the civil services in Maharashtra. Its books,magazines,weeklies and notes are highly sought after as they give very good results. The institute has in its 27 years glorious track record helped more than 1.5 lakh aspirants to make a successful career as civil services officers across India, especially in Maharashtra  

          गेल्या 52 वर्षात केंद्रीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रशासकीय आस्थापनांमध्ये उच्च तसेच इतर पदावर मराठी विद्यार्थ्यांचा टक्का घसरत असल्याचे अनेक अहवालातून दिसून आले आहे. विशेषतः UPSC च्या नागरी सेवा/सीडीएस/एनडीए/आयइएस/सीएमएस तसेच रेल्वेच्या आणि विविध बँकांद्वारे घेतल्या जाणार्‍या भरती परीक्षांच्या अंतिम निकालात मराठी विद्यार्थ्यांची नावे कमीच आढळतात. 

          काहीवेळेला एखाददुसर्‍या सेवेतील मराठी विद्यार्थ्यांचे यश वाढताना दिसते, पण  ते  देशातील  जनतेच्या  टक्केवारीच्या  तुलनेत  कमीच  आहे.  याबाबत  महाराष्ट्र  शासनाने  नेमलेल्या  मा.  अरुण  बोंगीरवार  आयोगात  ऊहापोह  करून  त्याबाबत  विविध  उपाययोजना  सुचविल्या  आहेत.  तसेच  विविध  संस्थांमार्फत  याबाबत  केलेल्या  पाहणीनुसार  असे  जाणवते  की  मराठी  विद्यार्थी  स्पर्धा  परीक्षेसंबंधीच्या  गुणवत्तेत  मागे  पडत  नाहीत,  पण  त्यांना  त्याबाबतची  अद्ययावत  माहिती  किंवा  परिपूर्ण  मार्गदर्शन,  विशेषतः  ग्रामीण  भागात  खूपच  उशिरा  मिळते.  अशा  विद्यार्थ्यांपर्यंत  स्पर्धा  परीक्षेसंबंधीचे  सर्वंकष  मार्गदर्शन  पोचवून  त्यांच्यात  जागरुकता  आणि  सक्षमता  निर्माण  करण्यासाठी  स्टडी  सर्कलने  गेली  25  वर्षे  विविध  उपक्रमाद्वारे  काम  केले  आहे.  या  विद्यार्थ्यांना  एकाच  ठिकाणी  सर्व  प्रकारच्या  स्पर्धा  परीक्षांचे  मार्गदर्शन  देणारे  शिक्षणसंकुल  विकसित  केल्यास  त्याचा  फायदा  प्रशासकीय  क्षेत्रात  काम  करू  इच्छिणार्‍या  अनेक  होतकरू  विद्यार्थ्यांना  होऊ  शकतो.

                 स्टडी सर्कल ही संस्था गेली 25 वर्षे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जाऊन चांगल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे, त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करीत आहे व घडवीत आहे. शिकविण्याची वस्तुनिष्ठ पद्धती, हेतूविषयीचा स्वच्छ दृष्टिकोन, मूल्याधिष्ठित ज्ञानदान, व्यवहारी व भेदभाव विरहित वागणूक ह्या गुणांमुळे संस्था अतिशय यशस्वी झाली असून तिने विद्यार्थ्यांचा विश्‍वास संपादन केला आहे. संस्थेकडे अनेक क्षेत्रातले तज्ञ व प्रशिक्षित शिक्षक असून त्यांच्या मदतीने स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत नवनवे उपक्रम व अभ्यासक्रम तयार करून स्टडी सर्कलने आपले स्वतःचे असे स्वायत्त स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रात संस्थेची 25 केंद्रे असून त्याची एकत्रित जागा सुमारे 1 लाख चौ. फुटाच्या आसपास आहे आणि हजारो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. हा सर्व पसारा बघता ते जणू एक छोटेसे विद्यापीठच बनले आहे.
               ह्या यशाने प्रेरित होऊन संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद पाटील ह्यांनी जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयार व्हावे, त्यांनी लोकसेवेत यावे म्हणून अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक मोठे शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचा त्यांचा मानस असून त्याद्वारे विविध उपक्रम चालविता येतील. सदरहू संकुल हे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यक परिषद, विद्यापीठ अनुदान मंडळ ह्यांच्या नियमांनुसार व त्यांच्या परवानगीने विविध सोयींनी युक्त व सुसज्ज असे असेल.
               डॉ. आनंद पाटील यांनी स्टडी सर्कलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला आहे. येथील विद्यार्थ्यांची बुद्धी, क्षमता व सामर्थ्य ह्याचा त्यांना चांगला अंदाज आहे व असे होतकरू विद्यार्थी पुढे आणून अभियांत्रिकी व वैद्यकीय ज्ञान व सेवा ग्रामीण भागात पोहोचविण्याचा त्यांचा हेतू आहे.
               दर्जेदार शिक्षण पद्धती, कठोर परिश्रम ह्या स्टडी सर्कलच्या अंगभूत गुणांनी ही महाविद्यालये सुद्धा निश्‍चितपणे व उच्च दर्जा मिळविण्यात व टिकविण्यात यशस्वी होतील असा त्यांना ठाम विश्‍वास आहे. ह्या शिक्षण संकुलाद्वारे आपले स्पर्धा परीक्षांविषयीचे उपक्रम, अभ्यासक्रम व त्यांची प्रकाशित पुस्तके ह्यांना देशभरात मान्यता मिळावी व ते असंख्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे म्हणून अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्याचा डॉ. आनंद पाटील यांचा मानस आहे. स्टडी सर्कल हे देशातील एक अतिशय आगळे वेगळे शिक्षण संकुल तयार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

‘स्टडी सर्कल’ - कार्यात्मक आढावा

 
      आजच्या स्पर्धेच्या युगांत स्टडी सर्कल ही संस्था - ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च ट्रस्ट च्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी घडविण्याचे काम गेली 25 वर्षे अव्याहतपणे करीत आहे.

               स्टडी सर्कल ही संस्था म्हणजे केवळ प्रशिक्षण देणारे व्यासपीठ नसून ती युवकांनी युवकांसाठी चालविलेली अभ्यास चळवळ आहे. या चळवळीमुळे महाराष्ट्रातील युवकांमध्ये नोकरी तसेच स्पर्धा परीक्षांविषयी जे औदासीन्य होते ते दूर होण्यास मदत तर झालीच; पण स्टडी सर्कलने तरुणांमध्ये हेही पक्के रुजविले की जर मेहनतीत सातत्य ठेवले तर आपणास यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
               डॉ. आनंद पाटील यांनी या चळवळीचं बीज 1988-89 मध्ये महाराष्ट्रात रुजविले. डॉ. पाटील यांची एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षाला असतानाच आर्मी मेडिकल कोअर (AMC) साठी निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी UPSC च्या कंबाईन्ड मेडिकल सर्व्हिसेस आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षा देऊन त्यात यश प्राप्त केले. त्यावेळी त्यांना असे जाणवले की प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परीक्षांविषयी महाराष्ट्रात खूपच औदासीन्य आहे व तरुणांना याविषयी फारशी माहिती नाही आणि केवळ याच कारणामुळे त्यांनी ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला व स्टडी सर्कल निर्माण झाले.
               डॉक्टरांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीमातेच्या पवित्र क्षेत्री पहिले प्रशिक्षण केंद्र स्थापन करून कार्याचा प्रारंभ केला आणि तिच्याच आशीर्वादाने स्टडी सर्कल नावाचा एक प्रचंड वटवृक्ष आज आपणास दिसतो आहे. नंतर त्यांनी मुंबईत प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यास त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यमंत्री व सिडकोचे चेअरमन श्री. राम महाडिक व शारदाश्रम विद्यामंदिरचे बहुमोल साहाय्य मिळाले.
               डॉ. पाटील ह्यांनी त्यावेळी ‘‘मराठी स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ’’ हे मासिक सुरू करून तरुणांमध्ये जागृती निर्माण केली. निव्वळ पैसा व वशिल्यानेच सरकारी नोकरी मिळते हा गैरसमज दूर केला. तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण करण्यास या मासिकाचा खूप उपयोग झाला. हे मासिक सुरुवातीस 5000 प्रती काढून सुरू झाले. आज त्याची संख्या 50,000 च्या पुढे गेली आहे. स्टडी सर्कलची ’स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ‘ व ‘जनरल नॉलेज‘ ही मासिके आज खूप लोकप्रिय असून ते विद्यार्थ्यांच्या विश्‍वासास पात्र ठरली आहेत.
              स्वातंत्र्यपूर्व काळी सुधारक , केसरी या दैनिकांनी आणि ‘‘सत्यशोधक समाज’’ च्या चळवळीने जो जोम तरुणांमध्ये निर्माण केला होता, शिक्षण प्रसाराचे जे कार्य रयत शिक्षण संस्थेने केले, त्याचसारखे कार्य व प्रसार ग्रामीण भागात पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न स्टडी सर्कलच्या अभ्यास चळवळीने केला आहे.
              स्टडी सर्कलचे दुसरे प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र मुंबईत दादर परिसरातील शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये सुरू झाल्यानंतर त्याचा विस्तार पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नांदेड, लातूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, चंद्रपूर असा विस्तार फैलावत गेला. निव्वळ प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार म्हणजे यश नव्हे तर विद्यार्थ्यांच्या यशातच संस्थेचे यश असते. यासाठी डॉ. आनंद पाटील यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि मूल्याधिष्ठित काम या आपल्या गुणांनी संस्थेला वेगळ्या शिखरावर नेऊन पोहोचविले. या संस्थेचे अनेक विद्यार्थी आज पोलीस उपनिरीक्षक, उपजिल्हाधिकारी, आय.ए.एस., आय.पी.एस वा तत्सम पदांवर निवडले गेले आहेत. अशा अनेकांची यादी देता येईल. पण वानगी दाखल पुढील नावेच पुरेशी ठरतील. - उदा. श्री. विवेक वाडेकर, श्री. महेश भागवत, श्री. विश्‍वास नांगरे पाटील, श्री. दिलीप सावंत, श्री. अजय वैद्य, श्री. श्यामसुंदर पाटील, इ. 
              पूर्वी समाजामध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये असा समज होता की सरकारी नोकर्‍या ह्या वशिला व पैसा असल्याशिवाय मिळत नाहीत, पण हा गैरसमज दूर करण्यासाठी स्टडी सर्कलने प्रामाणिक मूल्ये, व्यावसायिक तत्त्वावर प्रशिक्षण, तसेच सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक इच्छाशक्ती ह्या सर्वांची सांगड घालून अनेकांना यश मिळवून दिले. एका छोट्या झर्‍याप्रमाणे सुरू झालेली ही संस्था आज मोठा धबधबा बनली आहे.
             स्टडी सर्कल महाराष्ट्रात विविध रूपाने तरुणांना मार्गदर्शन करीत आहे. त्यात मासिके, तत्पर व कार्यमग्न केंद्रप्रमुख, यशस्वी माजी विद्यार्थी, हितचिंतक ह्या सर्वांचा समावेश आहे.
             सर्वात महत्त्वाचे कार्य स्टडी सर्कलने हाती घेतले,ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात विनाशुल्क चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे. स्टडी सर्कलमार्फत गडचिरोलीपासून रत्नागिरीपर्यंत व मुंबईपासून लातूरपर्यंत जिल्हा व तालुका स्तरावर विनामूल्य परिसंवाद व मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित करण्यात येतात. वर्षभरात अशी सुमारे 200 चर्चासत्रे आयोजित केली जातात. खास करून आदिवासी, अल्पसंख्यांक तसेच सरकारी कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी विविध मार्गदर्शन शिबिरे त्यांच्या सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जातात. 
या शिबिरात स्वतः डॉ. आनंद पाटील हे प्रमुख वक्ते असतात. त्याचबरोबर संस्थेचे माजी विद्यार्थी की जे आज उच्च पदांवर आहेत तेही त्यात मार्गदर्शन करीत असतात. सुमारे 1000 ते 1500 विद्यार्थी प्रत्येक सत्रात भाग घेतात. यावेळी स्टडी सर्कलने प्रकाशित केलेली प्रकाशने 30 ते 50 टक्के सवलतीच्या दरात त्यांना पुरविली जातात.
            स्टडी सर्कलचे अभ्यासक्रम हे स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर तयार केलेले असतात. प्रत्येक केंद्रात जी मुले पूर्णवेळ कोर्ससाठी प्रवेश घेतात त्यांना त्यांच्या गरजेनुसार व्यक्तिगत पातळीवर मार्गदर्शन केले जाते आणि त्यांची निश्‍चितपणे प्रशासकीय सेवेत निवड होते. स्टडी सर्कलद्वारे - गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिष्यवृत्ती व आर्थिक मदत देऊन प्रोत्साहित केले जाते. अशारीतीने शिष्यवृत्ती प्राप्त झालेला पहिला विद्यार्थी विलास शिंदे (वर्ष 1996-97) हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची सनदी परीक्षा 269 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळविलेले आहे.
            स्टडी सर्कलने विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेतील यशाबाबत आत्मविश्‍वास निर्माण केला आहे. डॉ. आनंद पाटील यांनी विकसित केलेल्या ‘ ज्ञान-आकलन-अंदाज’ या त्रिसूत्रीवर आधारित अध्यापनाच्या नावीन्यपूर्ण पद्धतींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत तर यश मिळतेच, शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगसुंदर विकास होतो. स्टडी सर्कलच्या -फाउंडेशन कोर्स, लाइट हाऊस कोर्स, मोड्युलर कोर्सेस, ऑनलाइन टेस्ट, ई काउन्सेलिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे लेक्चर्स तसेच डिस्टन्स लर्निंग-पोस्टल कोर्सेस - यासारख्या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना खूपच फायदा झाला आहे. या कोर्सेसमध्ये निव्वळ क्लासरुम ट्रेनिंगला महत्त्व नसते, तर विद्यार्थी स्वत: विचार करायला शिकला पाहिजे, त्याच्यात सकारात्मक दृष्टिकोन, समतोल विचारसरणी व जबाबदारीची भावना निर्माण झाली पाहिजे, तो देशाचा जागरूक व आदर्श नागरिक बनला पाहिजे- यावर भर दिलेला असतो. 
              डॉ. आनंद पाटील स्वतः मुलाखतीचे तंत्र, समर्पक माहिती, सखोल व अचूक ज्ञान व पुरोगामी दृष्टिकोन ह्यासाठी प्रसिद्ध आहेत. आजही अनेक वरिष्ठ अधिकारी की जे आय.ए.एस. पात्रतेसाठी नेमणुकीच्या यादीत आहेत अथवा यु.पी.एस.सी.-एम.पी.एस.सी. च्या इंटरव्ह्यूची तयारी करीत आहेत ते नेहमीच डॉ. आनंद पाटील ह्यांचे मार्गदर्शन घेत असतात.
             ह्या चळवळीला अनेक मोठया लोकांचा उदा. श्री. भूषण गगराणी, श्री. विजय भटकर, प्रिन्सिपल वसंतराव वाघ, श्री. राम महाडिक, श्री. बी.डी. शिंदे, प्रोफेसर एच. के. डोईफोडे, प्रोफेसर व्ही. एन. दांडेकर, डॉ. आर.जी. जाधव, मा. आर. आर. पाटील या आणि अशा उच्च पातळीवरील शैक्षणिक, प्रशासकीय व साहित्य क्षेत्रातील नामांकित प्रभृतींचे सहकार्य व पाठिंबा लाभला आहे. म्हणूनच स्टडी सर्कलची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक चळवळ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
             स्टडी सर्कलचे शेकडो विद्यार्थी वर्ग 1, वर्ग 2 व वर्ग 3 मध्ये व याबरोबरच आय.ए.एस., आय.पी.एस., आय.एफ.एस., आय.आर.एस. व यासारख्या प्रशासकीय सेवेत निवडले गेले आहेत. अतिशय माफक फी, योग्य आणि अचूक मार्गदर्शन, यशस्वी उमेदवारांचे अनुभवपर मार्गदर्शन व तज्ज्ञ प्राध्यापकांचे परीक्षाभिमुख अध्यापन व याचबरोबर सराव चाचण्या आणि मौखिक चाचणी सत्रे आयोजित करणारी स्टडी सर्कल ही महाराष्ट्रात एकमेव संस्था आहे.

 

         मोफत  मार्गदर्शन  शिबिरे :  स्टडी  सर्कलद्वारे  ग्रामीण  भागातील  विद्यार्थ्यांना  विविध  स्पर्धा  परीक्षा  मार्गदर्शन  शिबिरांद्वारे  प्रोत्साहित  करून  त्यांच्यातील  आत्मविश्‍वास  जागृत  करण्याचा  प्रयत्न  केला  जातो.  अशा  प्रत्येक  शिबिरास  300  ते  500  विद्यार्थी  उपस्थित  राहून  या  शिबिरांचा  लाभ  घेतात.  अशा  प्रकारच्या  पहिल्या  शिबिराचे  उद्घाटन  प्रसिद्ध  घटनातज्ज्ञ  श्री.  स.  मा.  गर्गेयांनी  केले  होते.  नाशिक  येथील  शिबिराचे  उद्घाटन  महाराष्ट्राच्या  आरोग्य  विज्ञान  विद्यापीठाचे  पहिले  कुलगुरू  डॉ.  दयानंद  डोणगांवकर  यांनी  केले  होते.

             1988 - पोस्टल कोर्सेस : मराठी भाषेतून स्पर्धा परीक्षासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तसेच मराठी माध्यमातून आयएएस/आयपीएस परीक्षांसाठी (मुख्य) परीक्षाभिमुख व उपयुक्त वाङ्मय तयार करण्यासाठी स्टडी सर्कलने महाराष्ट्रात सर्वप्रथम संशोधन यंत्रणा ज्येष्ठ प्राध्यापकांच्या सहाय्याने निर्माण केली. त्यातूनच स्टडी सर्कलचा पोस्टल कोर्स तयार झाला. या कोर्सचा वापर करून अनेकजण यशस्वी झाले आहेत. त्यापैकी उल्लेखनीय उमेदवार म्हणजे रमेश थेटे, जे मागासवर्गीयात देशात आयएएस परीक्षेत सातवे आले होते.
             1989-एसपीएनएस मासिक : आयएएस व आयपीएस सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍यांसाठी मराठी माध्यमात खूपच तुटपुंजे साहित्य उपलब्ध असल्याने ती उणीव भरून काढण्यासाठी ‘स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ’ हे मासिक 1989-90 साली सुरू करण्यात आले. विविध विषयांवरील लेख, चालू घडामोडी, प्रश्‍नपत्रिकांची आदर्श उत्तरे यांचा समावेश या मासिकात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य असे सकारात्मक मार्गदर्शन केले जात आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वाचावीत, प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव कसा करावा, याविषयीचे मार्गदर्शन या मासिकाद्वारे केले जाते. महाराष्ट्रभर या मासिकाची उपयुक्तता व लोकप्रियता सतत वाढत आहे. सध्या या मासिकाचा वाचक वर्ग सुमारे 10 लाखापेक्षा जास्त आहे. अल्पावधीतच ‘स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ’ हे मासिक गा्रमीण तथा नागरी भागातील युवकांचे करीयर नियोजनासाठीचे एक उत्कृष्ट साधन ठरले आहे.
              1996 - स्टडी सर्कल फाउंडेशन कोर्स : स्पर्धा परीक्षांच्या जगात ‘स्टडी सर्कल’ या संस्थेने कार्यक्षमता आणि उत्तम यश यासाठी नाव कमावलेले आहे. विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करवून घेणे एवढेच मर्यादित ध्येय या संस्थेचे नसून ‘‘सनदी नोकरीसाठी आवश्यक असलेला सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास’’ साधण्यासाठी स्टडी सर्कलने पूर्ण वेळ फाउंडेशन व सर्टिफिकेट कोर्सची सोय केलेली आहे. या कोर्समुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षाबाबतचा पाया दृढ होतो. स्टडी सर्कलचा फाउंडेशन वर्गांची सोय मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक व सांगली, या शहरांमध्ये उपलब्ध आहे.
            1996 - एमबीए अभ्यासक्रम : यावर्षी कॅनेडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट यांच्या सहकार्याने स्टडी सर्कलने आंतरराष्ट्रीय दर्जाचा एम.बी.ए. हा अभ्यासक्रम सुरू केला. तसेच इंडियन मर्चंट चेंबर, मुंबई पुरस्कृत एक्झिम डिप्लोमा सुरू केला गेला आहे. 1998-99 सालच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासन पुरस्कृत व मान्यताप्राप्त एक्झिम डिप्लोमा, स्टडी सर्कलमार्फत सुरू केला गेला आहे.
            1997 - सीईएसआर मासिक : एसपीएनएसचे इंग्रजी रूप म्हणून "काँपिटीटीव्ह एक्झामिनेशन्स अँड सर्व्हिसेस रेफरन्स (सीईएसआर)" हे मासिक सुरू करण्यात आले.
            1998 - आयएएससाठी स्कॉलरशीप : स्टडी सर्कल ही फक्त एक संस्था नसून ती एक प्रभावी अभ्यास चळवळ आहे. ही चळवळ महाराष्ट्रात सतत पसरवीत राहण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन पातळीवरील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचे काम स्टडी सर्कलने सुरू केलेले आहे. गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन स्टडी सर्कलतर्फे त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तर मिळतेच, परंतु अभ्यासाला प्रोत्साहनसुद्धा मिळते. स्टडी सर्कलतर्फे अशीच शिष्यवृत्ती प्राप्त झालेला विद्यार्थी, विलास शिंदे हा 1999-2000 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची सनदी परीक्षा 269 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.
           1999 - जनरल नॉलेज मासिक : स्टडी सर्कलच्या स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ या मासिकाबरोबरच ‘स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज’ हे मासिक 1999 या वर्षांपासून सुरू केले गेले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करून घेणे या मासिकाचा मुख्य उद्देश आहे.
           2000 - सीएमसीचे उपक्रम : या वर्षापासून स्टडी सर्कलने सीएमसी या शासकीय संगणक प्रशिक्षण संस्थेचे सर्व अभ्यासक्रम औरंगाबाद व कोल्हापूर केंद्रात सुरू केले.
           2001 - एमएससीआयटी : डॉ. विजय भटकर यांच्या इटीएच या संस्थेच्या सहकार्याने स्टडी सर्कलच्या सर्व केंद्रात MSCIT कोर्सेस सुरू आहेत.
           2003 - ऑन लाइन टेस्टस् : सर्वप्रकारच्या स्पर्धा परीक्षांत मॉक एक्झाम्सना महत्त्व असते. त्यासाठी स्टडी सर्कलने विकसित केलेल्या सॉफ्टवेअर द्वारा - GRE, SAT, TOFEL, GATE, UGC, UPSC, MPSC, BANKS, RRB, SSB या आयोगांच्या परीक्षा उमेदवारास माफक दरात उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
          2003 - अ‍ॅलमनस् असोसिएशन : स्टडी सर्कलच्या छोट्या रोपाचे हळूहळू वटवृक्षात रूपांतर झाले. त्याच्या अनेक फांद्यांनी यशाचे शिखर गाठले. आपल्याला ज्या संस्थेमुळे यश मिळाले, त्या संस्थेच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडायचे, या भावनेने स्टडी सर्कलच्या माजी विद्यार्थ्यांनी 19 ऑक्टोबर 2003 रोजी स्टडी सर्कल अ‍ॅलमनस् असोसिएशनची स्थापना केली. याद्वारे प्रशासकांना प्रशिक्षण देण्यापासून ते होतकरु विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना कुशल प्रशासक बनविण्यापर्यंतचे उपक्रम राबविले जात आहेत.
           2005 - स्पर्धा परीक्षा स्कॉलरशीप : विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप योजना 2005 पासून सुरू केली होती. नोव्हेंबर 2004 मध्ये राज्यभर चाळणी परीक्षा घेऊन 2005-06 सालासाठी 555 विद्यार्थ्यांसाठी 5 लाख रु. ची तरतूद करण्यात आली. याच वर्षी स्टडी सर्कलने लातूर, निगडी व दिल्ली येथे विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू केले.
           2012 - स्टडी सर्कल, नोकरी मार्गदर्शक व्यवसाय (साप्ताहिक): स्पर्धा परीक्षांसोबत इतर करिअर्सच्या संधी, वेळोवेळी येणार्‍या स्कॉलरशिप परीक्षा, विविध शैक्षणिक-व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, शासनाचे विविध व नवनवे उपक्रम विद्यार्थ्यांपर्यत लगेच व अंतिम दिनांक जाण्यापूर्वी पोहचावेत याचसोबत विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी अतिसंभाव्य प्रश्‍नपत्रिका, झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना सहज व कमी पैशात उपलब्ध करून देण्याच्या हेतुने स्टडी सर्कल, पब्लिकेशन मार्फत 2012 मध्ये नोकरी मार्गदर्शक व्यवसाय हे साप्ताहिक सुरू करण्यात आले आहे. स्टडी सर्कलच्या इतर उपक्रमांना जसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतो तसाच प्रतिसाद साप्ताहिकाला मिळत आहे. हे साप्ताहिक विद्यार्थीभिमुख असल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार साप्ताहिकाची उत्क्रांती होत आहे.
             स्टडी सर्कलच्या अभ्यास चळवळीला सध्या 24 वर्षे पूर्ण झालेली आहेत. परंतु स्टडी सर्कलचे ’’नोकरी मार्गदर्शक व्यवसाय’’ हे साप्ताहिक असल्यामुळे त्याचे 25 आठवडे 8 मे 2013ला पूर्ण झाले. तुमच्या विश्‍वासामुळे, प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळे या साप्ताहिकाचे आयुष्य दीर्घ आणि सार्थक होईल अशी अपेक्षा आहे. 
             हे साप्ताहिक सुरू करताना डॉ. आनंद पाटील ह्यांचे  Vision असे होते की, हे साप्ताहिक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे आणि युवावर्गाचे मुखपत्र असावे. अभ्यासक्रम आणि सराव पेपर इतर प्रकाशनाद्वारे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे आणि त्यांच्या आकांक्षांना पंख देणारे असे हे साप्ताहिक असावे. त्या दिशेने स्टडी सर्कलच्या टीमने वाटचाल सुरू केलेली आहे. परंतु ही वाटचाल तुमच्या सहभागाशिवाय अपुरी आहे. 
              MPSC OAS CENTERS : MPSC ने वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरण्याची online  प्रक्रिया 2010 सालापासुन सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात स्टडी सर्कलची केंद्रे यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशिक्षणासाठी स्टडी सर्कलच्या केंद्रावर येतात. तेव्हा त्यांना online form भरण्यासाठी सवलत व्हावी. ह्या एका सामाजिक हेतूने MPSC OAS Center ची Franchisee स्टडी सर्कलने घेतली. 
              विद्यार्थ्यांची चळवळ : स्टडी सर्कल संस्थेचे ऋणानुबंध दूरवरील ग्रामीण विद्यार्थ्यांशी दृढत्वाने जुळलेले आहेत. साधनांची अनुपलब्धता व मार्गदर्शनाच्या अभावी वाटचाल करू न शकणार्‍या असंख्य इच्छुक उमेदवारांना स्टडी सर्कलच्या विविध उपक्रमांचा - मार्गदर्शन वर्ग, पत्रव्यवहाराने मार्गदर्शन, पुस्तके, प्रश्‍नपत्रिका संग्रह, नोट्स, ‘स्पर्धा परीक्षा-नोकरी संदर्भ’ हे मासिक इ. मुळे - निश्‍चितच आधार मिळाला आहे व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्‍वासात भर पडत आहे.
               मिशन महाराष्ट्र 2015 : मिशन महाराष्ट्र 2015 ही अभ्यास चळवळ 2010 मध्ये स्टडी सर्कलद्वारा सुरु करण्यात आली. UPSC च्या परीक्षेत मराठी तरुणांचा आकडा वाढत आहे. परंतु किती विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये येतात ? या प्रश्‍नांच्या उत्तराचेच दुसरे नाव म्हणजे मिशन महाराष्ट्र 2015. 1917 मध्ये श्री. सी. डी. देशमुख हे देशात UPSC च्या परीक्षेत प्रथम आले होते. त्यानंतर श्री भूषण गगरानी हे 1992 वर्षी देशात चौथे आले होते. यानंतरच्या पुढील वर्षात आजतागायत पहिल्या 10 मध्ये मराठी तरुणांचे नाव आलेले नाही.
               आज महाराष्ट्र देशभरात सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. तर मग UPSC च्या परीक्षेतच महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे का? या प्रश्‍नांचे उत्तर म्हणजे मिशन महाराष्ट्र 2015 होय.
               मराठी तरुणांना योग्य मार्गदर्शन तथा आवश्यक बाबींचा पुरवठा करुन त्यांना  UPSC च्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने येण्यास प्रवृत्त करणारी चळवळ म्हणजे मिशन महाराष्ट्र 2015.
              या चळवळी अंतर्गत स्टडी सर्कलद्वारे 10 विद्यार्थ्यांना निवडण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचे पूर्ण पालकत्व स्टडी सर्कलने घेऊन त्या विद्यार्थ्यांना UPSC  च्या परीक्षेची तयारी करवून घेतली जात आहे. जेणेकरुन 2015 पर्यंत नक्कीच UPSC चा topper महाराष्ट्रातून असेल.
               स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन : मराठीतील स्पर्धा परीक्षेसंबंधीचे साहित्य बर्‍याच प्रमाणात विस्कळित आणि असंघटित स्वरूपात असल्याचे आढळून येते. म्हणूनच या साहित्याचे प्रमाणीकरण व्हावे, त्याची व्याप्ती आणि वृद्धी होत असताना त्यात जास्तीत जास्त अचूकता येऊन त्याचे अद्यावतीकरण व्हावे, या दृष्टिकोनातून संबंधित व्यक्ती - त्यात लेखक, प्रकाशक, विद्यार्थी, पालक हे सर्व घटक येतात - त्यांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे. म्हणूनच या सर्वांना ज्या अडचणी येतात, ज्या समस्या भेडसावतात, त्याचा ऊहापोह करण्यासाठी मराठीतील या क्षेत्रातील सर्व मान्यवरांना एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाची मुहुर्त मेढ रोवण्यात आली.
   वर्ष         स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन                    स्थळ                                अध्यक्ष 

   2010     पहिले, स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन                पुणे                           श्री. विश्‍वास पाटील
   2011     दुसरे, स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन               औरंगाबाद                    श्री. ज्ञानेश्‍वर मुळे.
   2012    तिसरे, स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन                नागपूर                       श्री. लक्ष्मीकांत देशमुख
   2013    चौथे, स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन                   नाशिक                      श्री. शेखर गायकवाड
   2014    पाचवे, स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन                कोल्हापूर                     डॉ. विजयकुमार फड
  2015      सहावे, स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन              अहमदनगर                  श्री. रंगनाथ नाईकडे

 

              स्टडी  सर्कलच्या  सर्व  उपक्रमांत  डॉ.  आनंद  पाटील  यांच्या  प्रेरणेमुळे  अनेक  आजी  माजी  विद्यार्थ्यांचा  उत्स्फूर्तपणे  सहभाग  असतो.  म्हणूनच  या सार्‍या  चळवळीचे  वर्णन  विद्यार्थ्यांनी,  विद्यार्थ्यांकरिता  विद्यार्जनाकरिता  चालविलेले  उपक्रम  असे  सार्थपणे केले  जाते.