Menu

Study Circle

८ डिसेंबर २०१७

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम

सामान्य अध्ययन पेपर -१ :  इतिहास, भूगोल व कृषी

विभाग पहिला : इतिहास

:

1.7  : स्वातंत्र्योत्तर भारत

1.7.11 - नक्षलवाद व माओवाद

Latest Update

२७ नोव्हेंबर २०१७

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम

सामान्य अध्ययन पेपर -१ :  इतिहास, भूगोल व कृषी

विभाग पहिला : इतिहास

1.9 महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक)

1.9.4 - भक्ती वाङ्मय

Latest Update

२० नोव्हेंबर २०१७

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम

सामान्य अध्ययन पेपर -१ :  इतिहास, भूगोल व कृषी

विभाग पहिला : इतिहास

1.7  स्वातंत्र्योत्तर भारत

1.7.10 - इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय ,बांगला देशाची मुक्ती ,इंदिरा गांधींच्या काळातील अलिप्ततावाद ,राज्यातील आघाडीची सरकारे,विद्यार्थ्यांमधील असंतोष जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी,पंजाब व आसाममधील दहशतवाद,नक्षलवाद व माओवाद

Latest Update

Latest Update

२ ऑगस्ट २०१६

*     घटक : (5) भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास

*     उपघटक : (1) सामाजिक पार्श्‍वभूमी व राष्ट्रीय संघटनांची स्थापना

      मुंबईचा इतिहास

      ‘विंध्य पर्वताचे पठार, गुजरात आणि कोकण या भागात मुख्यतः मासेमारीवर उपजीविका करणारे कोळी लोक प्रामुख्याने या बेटांवर राहत. इसवी सनापूर्वीच्या तिसर्‍या शतकात हा परिसर मौर्य साम्राज्याचा एक भाग बनला. सम्राट अशोकच्या कारकीर्दीतच इथल्या कन्हेरी आणि महाकाली या लेण्यांची निर्मिती झाली. मौर्य साम्राज्यानंतर हा परिसर अनेक हिंदू राजांच्या आधिपत्यात होता. नंतर गुजरातच्या सुलतानी राजवटीने तो जिंकला आणि 1534 मध्ये पोर्तुगिजांनी तो त्यांच्याकडून जिंकून घेतला. पोर्तुगिजांनी या परिसराला ‘बॉम्ब बैया’ असे नाव दिले. याचा अर्थ ‘जहाजे नांगरण्यासाठी योग्य जागा’ असा होतो. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी म्हणजे 1662 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे पोर्तुगीज राजकन्येशी लग्न झाले. त्यावेळी पोर्तुगिजांनी हुंड्याप्रीत्यर्थ ही बेटे चार्ल्सला दिली. चार्ल्सला ही बेटे काही फारशी आवडली नाहीत आणि सुमारे 6 वर्षांनंतर त्याने ती ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक 1000 रुपयांच्या भाडेकराराने दिली. ईस्ट इंडिया कंपनीने तिथे संरक्षक कठडे बांधले, बंदोबस्त वाढवला, व्यापारासाठी इमारती बांधल्या, लोकांना तिथे येण्यासाठी सवलती दिल्या. या सगळ्याबरोबर त्यांनी ‘बॉम्ब बैय्या’ या पोर्तुगीज नावाचे ‘बॉम्बे’ असे सुटसुटीत रूपांतर केले.

      ईस्ट इंडिया कंपनीच्या या प्रयत्नांमुळे या ‘बॉम्बे’ची लोकसंख्या वाढायला लागली. तिथला व्यापार वाढला. अरब देशातल्या मक्का आणि बसरा या शहरांशी व्यापार सुरू झाला. 1686 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपली व्यापारी वसाहत सुरतहून मुंबईला हलवली. कंपनीच्या या निर्णयामुळे या 7 बेटांचे सगळे भवितव्यच बदलून गेले.

       “ब्रिटिश साम्राज्यातले सुरत हे भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावरचे महत्त्वाचे शहर होते. फार पूर्वीपासून ते कापसाच्या उत्पादनाचे केंद्र होते. मोगलांच्या राजवटीपासून आशियातल्या आणि युरोपातल्या देशांबरोबर इथून व्यापार चालत असे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेले सुरत आर्थिकदृष्ट्या सधन होते आणि तिथली कायदा-सुव्यवस्थेची स्थितीही चांगली होती. या गोष्टी होत्या तोपर्यंत सुरतेची भरभराट होत होती, पण पश्‍चिम आशियाबरोबरचा व्यापार मंदावला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांची सत्ता अस्थिर बनली तेव्हा सुरतेचे महत्त्व कमी व्हायला लागले.

      अस्थिरता असेल तर व्यापार वाढत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खालावली तेव्हा साहजिकच सुरतमधल्या व्यापार्‍यांनी अधिक ‘सुरक्षित’ जागेचा शोध सुरू केला. त्यांच्या व्यापाराचे संरक्षण करून त्यांचे अन्य हितसंबंध जपणारा असा कुणीतरी ‘संरक्षक’ त्यांना हवा होता. दुबळ्या होत जाणार्‍या मुघलांना आणि महत्त्वाकांक्षी मराठ्यांना नाकारून सुरतेच्या व्यापार्‍यांनी ईस्ट इंडिया कंपनीची निवड केली. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीनं आपली व्यापारी वसाहत ‘बॉम्बे’ला हलवल्यावर ही व्यापारी मंडळीही ‘बॉम्बे’त आली. त्यामुळे ‘बॉम्बे’ची सातही बेटे जहाज आणि गोदी बांधणारे पारशी, गुजराती व्यापारी, जैन सराफ, मारवाडी सावकार, कोकणी मुस्लिम व्यापारी, बगदादी ज्यू आणि युरोपातले मुक्त व्यापारी यांनी भरून गेली. यामुळे हे शहर तर वाढलंच, पण मध्यम व्यापारी शहरापासून ते जागतिक व्यापारी केंद्रापर्यंत वाढले आणि जगाच्या नकाशावर आलं ते इथल्या कापसाच्या आणि अफूच्या व्यापारामुळे. या स्थित्यंतरात चीनच्या चहानं खूपच महत्त्वाची भूमिका बजावली.

      18 व्या शतकात ब्रिटिशांची चहाची आणि चीनची अफूची आवड सगळ्या जगाला माहीत होती, पण ब्रिटिशांना आवडणारा चहा चीनमधून फार महागड्या किमतीला आणावा लागत असे. त्यामुळे चहा ही फक्त श्रीमंतांचीच मिरासदारी झाली होती. फ्री ट्रेड लॉबीच्या दडपणामुळे ब्रिटिश पार्लमेंटने चहावरचे आयातकर कमी केले आणि त्यामुळं समाजाच्या सर्व थरांतून चहाच्या मागणीचा प्रस्फोट झाला. मागणी वाढल्यामुळे आयात वाढली आणि लाखो पौंड चहा चीनमधून ब्रिटिश बंदरात यायला लागला. मात्र, यात एक अडचण होती. चहाच्या बदल्यात चिनी व्यापार्‍यांना अन्य ब्रिटिश माल नको होता. त्यांना चांदी हवी होती. चहाची आयात खूपच जास्त असल्याने ब्रिटिशांकडचा चांदीचा साठा झपाट्याने कमी व्हायला लागला.

      त्यामुळे ब्रिटिश अर्थव्यवस्थेपुढे गंभीर पेचप्रसंग उभा राहिला. ब्रिटिशांनी यावर एक वेगळाच उपाय शोधून काढला. चिन्यांना ब्रिटिश मालात रस नसला, तरी त्यांना भारतात पिकणार्‍या कापूस आणि अफू या दोन्ही गोष्टी हव्या होत्या, हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी तिहेरी व्यापाराची पद्धत सुरू केली. म्हणजे चीनमधून आयात केलेल्या चहाच्या बदल्यात ते चांगला गुजरातमधला कापूस आणि माळव्यामधली अफू निर्यात करायला लागले. या दोन्ही गोष्टी ‘बॉम्बे’मधून चीनच्या कँटॉन बंदरात जायला लागल्या. टॅन चुंग या चिनी इतिहासकाराने या त्रिसूत्री व्यापाराचे फार छान वर्णन केले. तो म्हणतो - ‘ही व्यवस्था म्हणजे भारताची अफू चीनला, चीनचा चहा ब्रिटनला आणि ब्रिटिशांची राजवट भारताला!’ चीनबरोबरच्या व्यापाराची ईस्ट इंडिया कंपनीकडे असलेली मक्तेदारी उठवण्यात आली आणि ‘बॉम्बे’च्या भरभराटीला अधिक गती आली. त्यामुळे भारतीय व्यापार्‍यांना ईस्ट इंडिया कंपनीबरोबर दोन हात करण्याची, व्यापाराच्या मैदानात त्यांच्यावर मात करण्याची संधी चालून आली. यात जहाजे बांधणार्‍या आणि मालाची ने-आण करण्यात आघाडीवर असलेल्या पारशी समाजाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली.

      जमशेटजी जिजीभॉय यांचा यात खूप मोठा वाटा होता. त्यांनी जार्डोन मॅथ्सन कंपनीबरोबर भागीदारीतून केलेल्या व्यापाराने यशाची नवी शिखरे गाठली. ‘बॉम्बे’च्या भरभराटीला तिसरा हातभार लागला तो गुलामगिरी नष्ट करणारे आणि अमेरिकेला ‘सिव्हिल वॉर’मध्ये ढकलणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा. अमेरिकेत कापसाची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर होत होती. कापसाची ही शेते गोर्‍यांच्या मालकीची होती, पण तिथे काम करणारे मजूर मात्र आफ्रिकेतून आलेले काळे गुलाम होते. 1850 च्या हंगामाच्या वेळी असे सुमारे 15 लाख शेतमजूर अमेरिकेत अतिशय हलाखीचे जीवन जगत होते. अनन्वित छळ सोसणारे हे गुलाम साध्या माणुसकीलाही पारखे झाले होते.

      मात्र, त्यांच्या कष्टातून निर्माण होणार्‍या कापसावर ब्रिटनमधल्या लँकेशायरच्या कापडगिरण्या चालत होत्या. गृहयुद्ध (सिव्हिल वॉर) सुरू झाले आणि अमेरिकेतून ब्रिटनला होणारा कापसाचा पुरवठा बंद पडला. आता ब्रिटनपुढे ‘बॉम्बे’ हाच एकमेव पर्याय होता. सिव्हिल वॉरपूर्वी इंग्लंड भारताकडून कापसाची फक्त 20 टक्के आयात करत होता. आता त्यांची गरज खूप पटींनी वाढली होती. मागणी आणि पुरवठ्यातल्या या तफावतीमुळं कापसाच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. गुजरातमधल्या कापसाचे व्यापारी प्रेमचंद रायचंद यांना याचा अंदाज आला आणि त्यांनी या व्यापारात उडी घेतली. मुंबईतून ते तडक गुजरातमध्ये गेले. ब्रिटिश गिरण्यांना हव्या असणार्‍या कापसाची लागवड करण्याची त्यांनी गुजरातमधल्या शेतकर्‍यांना गळ घातली आणि त्या शेतकर्‍यांनीही त्यांना तितक्याच उत्साहाने जोरदार प्रतिसाद दिला.

      अवघ्या काही महिन्यांत अमेरिकेतून येणार्‍या कापसाची जागा भारतीय कापसाने भरून काढली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कापसाचा व्यापार प्रचंड प्रमाणात वाढला. ‘बॉम्बे’ बंदरातूनच हा व्यापार सुरू झाला आणि त्यातून ‘बॉम्बे’ची झळाळी आणखीच वाढली. रोजगार शोधण्यासाठी भारताच्या पश्‍चिम भागातून मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईत यायला लागले. काही जणांनी खलाशी म्हणून काम पत्करले, तर काही जण कापूस आणि अफूच्या वाहतुकीचं काम करायला लागले. त्यांच्या मागोमाग अनेक कुशल कामगार, व्यावसायिक आणि उद्योजक भारतात आले.

      बंदर आणि औद्योगिक परिसरात रोजगाराच्या संधी वाढल्या तशी बाहेरून ‘बॉम्बे’मध्ये येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली. या वाढत्या लोकसंख्येच्यादृष्टीने ‘बॉम्बे’तल्या राहण्याच्या सोयी-सुविधा अतिशय वाईट होत्या, पण तरीसुद्धा आजूबाजूच्या शहरातल्या आणि देशाच्या विविध भागांतल्या भूमिहीन लोकांचा ‘बॉम्बे’कडे येण्याचा ओघ अजिबात कमी झाला नाही. कापसाच्या व्यापारामुळे भांडवलाचा प्रचंड ओघ मुंबईकडे वळला. त्यामुळे अनेकांचे नशीब बदलले. कापसाचा व्यापार हेच अनेकांचे जीवन बनले. अमेरिकेतले ‘सिव्हिल वॉर’ संपेपर्यंत ‘बॉम्बे’ने फक्त कापसाच्या व्यापारातून 70 दशलक्ष पौंड मिळवले होते. ‘बॉम्बे’त आलेला हा पैसा आणि भांडवल यातून मुंबईतल्या भूसंपादनाच्या योजनांना गती मिळाली. शहर आणि बंदरात बांधकामाच्या अनेक योजना उभ्या राहिल्या. मोठे भांडवलदार या योजनांकडे आकर्षिले गेले आणि त्यातूनच एक आधुनिक शहर म्हणून ‘बॉम्बे’ उभे राहिले. पण हा एक बुडबुडा होता आणि कोणताही बुडबुडा फार काळ टिकत नाही. अमेरिकेतले सिव्हिल वॉर संपले आणि 1865 मध्ये अमेरिकी कापसाचा पुरवठा पुन्हा सुरू झाला.

      अमेरिकेचे अंतर कमी असल्याने भारतीय कापसाची मागणी घटली. कापसाच्या व्यापारामुळे निर्माण झालेला भरभराटीचा बुडबुडा फुटला आणि ‘बॉम्बे’तला कापड बाजार कोसळला. व्यापारी जगतात घबराट निर्माण झाली. अनेक कंपन्यांचे दिवाळे निघाले. कापसावर सट्टा लावणार्‍यांचे धंदे बुडाले. एका रात्रीत अनेकजण देशोधडीला लागले. पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीवर गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले आणि ब्रिटिश राजवटीने कंपनीबरोबर केलेला भाडेकरार रद्द केला आणि ‘बॉम्बे’ पुन्हा ब्रिटिश साम्राज्याच्या आधिपत्यात आले. 1862 पासून ‘बॉम्बे’ने सातही बेटांवर हातपाय पसरले आणि त्यातूनच ‘बॉम्बे’ एक नवे आधुनिक शहर बनले.” “साहसाची आवड आणि संपत्तीविषयीची ओढ या मानवी स्वभावातल्या मूलभूत गोष्टी आहेत, पण फक्त काही शहरांचीच एवढी भरभराट का होते, हे नेमके सांगता येणार नाही. मला वाटते, ज्या शहरात शांतता आहे आणि व्यापार्‍यांना कायद्याचे संरक्षण मिळते त्या शहरांची भरभराट होते.

      1750 ते 1850 या 100 वर्षांच्या काळात ‘बॉम्बे’ची जी भरभराट झाली ती व्यापार आणि कायदा-सुव्यवस्था यातले अन्योन्यसंबंधच स्पष्ट करते. माणसा-माणसांमध्ये व्यापार हा नैसर्गिक आहे. माणसे परस्परांशी व्यापार करून देशासाठी संपत्ती निर्माण करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माणसे संपत्ती निर्माण करत असताना राज्याने म्हणजेच सरकारने त्यांना सुरक्षितता उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यात शांतता, कायदा व सुव्यवस्था, व्यापारवृद्धीसाठी योग्य वातावरण आणि पायाभूत सोयी यांचा समावेश होतो. जर सरकारने या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, तर लोक त्याला चांगला प्रतिसाद देतात. याचाच अर्थ सुशासनातूनच व्यापारवृद्धी होऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे, सुशासनाबरोबरच सुसंवाद असणेही गरजेचे आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शासन जरी योग्य वातावरण निर्माण करत असले, तरी त्याला मर्यादा आहेत. माणसेच व्यापार आणि गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करत असतात.

      आर्थिक व्यवहारात जर सरकारने फार ढवळाढवळ केली, तर अंतिमतः त्यात अपयश येतं असे इतिहासात दाखले आहेत. पाचवा धडा म्हणजे, जागतिकीकरणातून भांडवल पुरवठा होतो आणि भांडवलातून संपत्ती निर्माण होते. ज्यांना व्यापाराची भीती वाटत नाही, अशा देशांनी आपल्या सीमा व्यापारासाठी खुल्या केल्या, तर संपत्तीचा ओघ त्यांच्याकडे वळतो. सहावा धडा म्हणजे, उद्योजकतेमुळेच राष्ट्रीय संपत्ती निर्माण होते. व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या समन्वयातून उद्योजकता निर्माण होते आणि भांडवल कसे उभे करायचे, त्याचा साठा कसा निर्माण करायचा, धोका केव्हा पत्करायचा आणि ही संपत्ती पुढच्या पिढीकडे केव्हा सोपवायची, हे या उद्योजकांना बरोबर ठाऊक असते.

      उद्योगाविषयीची सगळी गुणवत्ता असलेले अनेक समाज भारतात आहेत. भारतातल्या भांडवलनिर्मितीचा कुटुंब हाच पाया आहे आणि कौटुंबिक उद्योगांनी भारतात चांगला लौकिक मिळवला आहे. सातवा धडा म्हणजे, खासगी भांडवलात सार्वजनिक मालमत्ता निर्माण करण्याची ताकद असते. ‘बॉम्बे’च्या इतिहासातून हे स्पष्ट झाले, की कापसाच्या वायदे बाजारातून मिळालेल्या अतिरिक्त संपत्तीतूनच भूसंपादनाच्या प्रक्रियेने वेग घेतला. समुद्रात भराव घालून जमीन संपादन करण्याच्या या प्रक्रियेत सरकारपेक्षा खासगी कंपन्यांनीच अधिक चांगली कामगिरी बजावली.

 

**************** 

 

*     घटक : (5) भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास

*     उपघटक : (4) जहाल गटाची वाढ

      लोकमान्य टिळक व मंडाले

      लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्व म्हणजे मंडालेतील तुरुंगवास. या पर्वात त्यांनी ‘गीतारहस्य’ लिहिले. मंडालेचा थिबा राजा रत्नागिरीत, तर रत्नागिरीचा (राजकीय) राजा मंडालेत- अशी इंग्रजांची राजकीय कूटनीती होती. थिबा हा ब्रह्मदेशाचा राजा असल्याने सुमारे दहा एकर परिसरात समुद्रदर्शनी उंचीवरील राजवाडा व मानधनाची सोय केली गेली होती. संबंधित देशात राजाने पुन्हा बंड करू नये म्हणून राजाचे स्थलांतर करण्याची इंग्रजांची ही प्रथा होती. तर एक राजकीय कैदी म्हणून लोकमान्यांना ठेवले होते.

      1908 हे लोकमान्य टिळकांचे शिक्षावर्ष. ते थिबा राजवाडा परिसरात सैनिकांच्या बराक 15 मध्ये होते. मंडालेत शहरारील थिबा राजाचा राजवाडा व भुईकोट असलेला किल्ला चहुबाजूनी खोल खंदक व पाणी यात सुरक्षित आहे. थिबाचा ब्रह्मदेशातला हा राजवाडा छोटेखानी आहे. इथे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या सागवानी लाकडात नक्षीकाम व कलाकुसर केलेला आहे. राजा, राण्या आणि इतर कुटुंबीयांच्या कोठया अजूनही शाबूत आहेत. पोहण्याचा हौद व लाकडी टेहळणी मनोरा शाबूत आहेत. राजाचा दरबार हॉल छोटेखानी असून त्याच्या लाकडी कलाकुसरीवर ब्राह्मी छाप दिसते. जमिनीपासून दहा फूट उंचीवर असलेल्या राजवाडयाच्या मागील भागात पुरातन वस्तू, शस्त्रे व तैलचित्रांचे संग्रहालय आहे. राजवाडा परिसरात त्याकाळी अंतर्गत वाहतुकीसाठी नेरोगेज रेल्वे अस्तित्वात होती. तिचा वापर मंत्रिगण व प्रशासकीय अधिकारी करीत. आज तिचे केवळ अवशेष तेवढे शिल्लक राहिले आहेत. मागील भागात जंगल व झाडी आहे.

      2 हजार वर्षांपूर्वी भगवान गौतमाने संपूर्ण मानवकल्याणासाठी विपश्यना ही सिद्धी प्राप्त करून तिची दीक्षा जनसामान्यांना दिली. या विद्येची जपणूक ब्रह्मदेशाने केली. मंडाले येथील आचार्य सत्यनारायण गोयंका या कर्मठ हिंदू कुटुंबातील सत्पुरुषाने ही विद्या पुन्हा भारतात आणली. आज जगभरात (अगदी इस्लामी देशांसहित) सुमारे 1200 पीठे स्थापन करून ते या विद्य्ोचा प्रसार करीत आहेत. स्थलांतरित बिहारींच्या मोठया वसाहती, गावे, घरेदारे व जमीनजुमला उत्तर-मध्य ब्रह्मदेशात आहेत. या लोकांची भारताशी असलेली नाळ बहुतांशी तुटलेली आहे. म्यानमारमध्ये एकंदर लोकसंख्येच्या 5 टक्के असलेल्या भारतीय लोकांमध्ये तमिळींची संख्याही बरीच आहे. तमिळ मुख्यत: व्यापारासाठी आले व बर्‍यापैकी प्रगती करून आजही भारताशी नाते ठेवून आहेत.

 

****************

    घटक : (6) गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ

    उपघटक : (3) मुस्लीम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ (सर सय्यद अहमद खान व अलिगड चळवळ, मुस्लीम लीग व अली बंधू, इक्बाल, जिना)

      ब्रिटिश राज्यास भारतीयांचा प्रतिसाद ‘

      सामान्यत: मुसलमानांनी पाश्चात्त्य शिक्षणास नकार दिला व गतराज्याचे पुनरुत्थान करण्याच्या दिवास्वप्नात ते रंगून गेले. हिंदूू मात्र शिक्षणात व नोकर्‍यांत त्यांच्या किती तरी पुढे निघून गेले.’ आधुनिकतेला, नवसंस्कृतीला होकार वा नकार देण्याची कारणे इतिहासातही शोधता येतात.. बंगालचा नवाब सिराजुदौल्ला याच्यावर ब्रिटिशांनी 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईत मिळवलेला विजय हा भारतातील ब्रिटिश राज्यस्थापनेचा शिलान्यास मानला जातो. या लढाईत हिंदूंनी ब्रिटिशांना मदत केली होती. अनेक इतिहासकारांनी यास ‘ब्रिटिश-हिंदू युती’ म्हटले आहे. अशा प्रकारे बंगाल ब्रिटिशांच्या अमलात गेला नि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा र्‍हास सुरू होऊन 1737 पासून दिल्लीवर मराठयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या र्‍हासाची कारणे शोधून त्यावर उपाय सांगणारा एक महान धर्मपंडित व विचारवंत त्या काळात उदयास आला. त्यांचे नाव शाह वलीउल्लाह (मृ.1762). ‘

      दक्षिण आशियात उदयाला आलेले सर्वश्रेष्ठ धर्मपंडित’ असा त्यांचा सार्थ गौरव केला जातो. अनेक संस्था, संघटना व नेते त्यांच्या विचार प्रेरणेतूनच निर्माण झाले. राष्ट्रवादी देवबंद धर्मविद्यापीठ तर त्यांच्या विचारांतूनच निर्माण झाले, परंतु अलीगडच्या इंग्रजी-शिक्षित मुस्लीम नेत्यांवरही त्यांचा प्रभाव कमी नव्हता. त्यास भारतातील ‘वहाबी चळवळ’ असे चुकीने म्हटले जाते. ती वस्तुत: त्यांच्या विचारांतून निर्माण झालेली ‘वलिउल्लाही चळवळ’ होय. वहाबी चळवळ ही अरेबियातील मुहंमद अब्दुल वहाब (मृ.1787) यांनी सुरू केलेली चळवळ होय.

      अरेबियातील विशुद्ध इस्लाम न पाळणार्‍या मुस्लिमांविरुद्धची ती चळवळ होती. तेथे कोणीही बिगर-मुस्लीम नव्हते. वलिउल्लाही चळवळ हिंदूंच्या सान्निध्यामुळे मुस्लीम समाजात शिरलेल्या गैर-इस्लामी प्रथा व चालीरीतींविरुद्ध होती. मुस्लिमांचे सामथ्र्य विशुद्ध इस्लाम पाळण्यावर अवलंबून असते व त्यापासून ते दूर गेल्यामुळे त्यांचे राजकीय प्रभुत्व कमी झाले, अशी त्यांची कारणमीमांसा होती. त्यांनी वहाबसारखी कडवी भूमिका घेतली नव्हती.

      हिंदूंसोबतच्या सहजीवनास त्यांची मान्यता होती.हिंदूंसोबतच्या सहजीवनास त्यांची मान्यता होती. त्यांनी शरियतच्या प्रमुख चार प्रणालींचा समन्वय घडवून आणला होता. ते नक्षबंदी सूफी विचारांचे असले, तरी त्यांनी प्रमुख चारही सूफी पंथांचा समन्वय घडवून आणला होता. सूफी पंथाचा स्वीकार करताना चारही पंथांच्या प्रमुख संतांची नावे घेण्याची प्रथा त्यांनी सुरू केली होती. सुन्नी व शिया यांच्यातही त्यांनी सलोखा घडवून आणला होता. तेव्हा वलिउल्लाही चळवळ म्हणजे वहाबी चळवळ नव्हे. भारतात कधीही वहाबी चळवळ सुरू झाली नाही. शाह वलिउल्लाह यांचा एवढा प्रभाव पडलेला आहे, की त्यांच्या विचारांचा व कार्याचा अभ्यास केल्याशिवाय ब्रिटिश, हिंदू व मुसलमान यांच्यातील परस्पर संबंधाचा इतिहास नीट समजणार नाही. त्यांचे मुख्य ध्येय मुस्लिमांचे राजकीय प्रभुत्व कायम ठेवणे हे होते. मराठयांच्या वाढत्या प्रभावामुळे ते दु:खी झाले होते. यासाठी त्यांनी अहमदशाह अब्दालीला पत्र पाठविले होते, की ‘येथे मराठयांचे राज्य उदयास आले आहे. त्या आक्रमकांनी संपूर्ण भारत आपल्या प्रभावाखाली आणला आहे.

      दिल्लीचा बादशाह त्यांच्या हातातील बाहुले बनला आहे.. आता तुमचे अनिवार्य कर्तव्य आहे, की तुम्ही भारतावर चालून यावे व मराठा सत्तेचा अंत करून असाहाय्य मुसलमानांची मुक्तता करावी.’ त्यानुसार पानिपतची लढाई (1761) झाली. अब्दालीला जय मिळाला. पण त्याला मोगलांचे साम्राज्य काही पुन्हा उभे करता आले नाही. पुढच्याच वर्षी शाह इहलोक सोडून गेले. पानिपतचा परिणाम मराठयांची ताकद कमी होण्यात व ब्रिटिशांचा प्रभाव वाढण्यात झाला. क्रमाने ब्रिटिशांचे वर्चस्व वाढत गेले व 1803 मध्ये मराठयांचा पराभव करून त्यांनी दिल्ली जिंकून घेतली. मोगल बादशाह आता मराठयांऐवजी ब्रिटिशांच्या अंकित आला. त्यानंतर 15 वर्षांनी ब्रिटिशांनी पुण्याजवळ पेशवांचा पराभव करून पेशवाई बुडविली. आता मुसलमानांचे खरे प्रतिस्पर्धी ब्रिटिश बनले होते.

      मराठयांच्या राज्यापेक्षा ब्रिटिशांचे राज्य मुसलमानांसाठी अधिक हानिकारक ठरणार, हे बंगालमधील राज्यकारभारावरून स्पष्ट झाले होते. मराठयांनी राजकीय वर्चस्व स्थापन केले असले, तरी त्याचा मुसलमानांच्या धार्मिक, सामाजिक व एकूण सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला नव्हता. ते मुस्लीम राज्याचे प्रदेश जिंकून घेत, तेथील प्रमुखांकडून खंडणी, चौथाई वगैरे आर्थिक लाभ मिळवीत; त्यांच्याकडून शरणागती स्वीकारीत व निघून जात. तेथे पूर्वीचेच कायदे वगैरे राहू देत. यामुळे मुस्लीम समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर परिणाम होत नसे. मात्र ब्रिटिशांचे तसे नव्हते. ते जिंकलेल्या प्रदेशात ब्रिटिश पद्धतीची राज्यव्यवस्था लावून देत. याचा परिणाम हिंदू व मुसलमानांच्या केवळ राजकीय व आर्थिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर होत असे. दुसर्‍या भाषेत सांगायचे म्हणजे त्यांनी येथे आपली आधुनिक पाश्चात्त्य संस्कृती आणली होती. त्यांचे राजकीय वर्चस्व हे पाश्चात्त्य संस्कृतीचे वर्चस्व ठरणार होते. हिंदू व मुसलमान दोघांकरिताही ती नवीन होती. त्यांना आपापल्या संस्कृतींचा अभिमान होता.

      परंतु, त्या दोन्ही समाजांकडून मिळालेला प्रतिसाद मात्र सर्वस्वी भिन्न होता. ब्रिटिशांनी दिल्लीवर विजय मिळविला, त्याच वर्षी (1803) वलिउल्लाही चळवळीचे नेते व शाह वलिउल्लाह यांचे पुत्र शाह अब्दुल अझीज (मृ.1824) यांनी ‘दक्षिण आशियाच्या मुस्लीम इतिहासातील सर्वात महत्त्वाचा व युगप्रवर्तक’ मानला गेलेला धर्मादेश घोषित केला. त्यानुसार ब्रिटिश अमलाखालील भारत मुस्लीम कायद्यानुसार चालत नसल्यामुळे ‘दार-उल-इसलाम’ राहिला नसून ‘दार-उल-हरब’ (शत्रुभूमी) झाला असल्याचे घोषित करण्यात आले. नंतर 1947 पर्यंत या धर्मादेशाची सतत चर्चा होत राहिली. मात्र याउलट हिंदूंची भूमिका ब्रिटिश राज्याचे आनंदाने स्वागत करणारी होती. इतिहासकार रमेशचंद्र मजुमदार यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘बंगालमधील हिंदूंनी ब्रिटिश राज्याची स्थापना हे अत्याचारी मुस्लीम राज्यापासूनच्या मुक्तीचे ईश्वरी वरदान मानले. असे जाहीरपणे म्हणणार्‍यांत राजा राममोहन राय, द्वारकानाथ टागोर. प्रभृतीचा समावेश होता.’ महाराष्ट्रातील समाजसुधारकही ब्रिटिश राज्याला ईश्वरी वरदान मानत होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1932 साली लिहिले होते, ‘बंगाल प्रांत इंग्रजांचे हाती जाऊन 60-70 वर्षे झाली. परंतु, इतक्यातच त्या देशाचे स्थितीत जे अंतर पडले, ते पाहिले असता विस्मय होतो.. तेथील लोकांस युरोप खंडातील विद्या आणि कलांचे विशेष ज्ञान होत आहे.

      जो अज्ञानांधकार फार दिवसपर्यंत या देशास व्यापून होता, तो जाण्यास प्रारंभ झाला आहे.’ 1849-50 या काळात लोकहितवादींनी लिहिले होते, ‘हिंदू लोकांमध्ये मूर्खपणा वाढला, तो दूर होण्याकरिताच हे (इंग्रज) गुरू दूर देशातून इकडे ईश्वराने पाठविले आहेत.. त्यांच्या राज्यामुळे हिंदू लोकांत जागृती जहाली व पृथ्वीवर काय काय आहे हे कळू लागले.. सरकारने विद्या वाढवून या लोकांस शहाणे करावे.’ तसेच, ‘यास्तव सुज्ञांनी इंग्रज जाण्याची इच्छा कदापि करू नये. याप्रमाणे सरकार व चांगले सुधारलेले लोक हिंदू लोकांस सोबतीस कदापि मिळणार नाहीत. जेव्हा हिंदू लोकांचा मूर्खपणा जाईल, तेव्हा ईश्वर इंग्रजास या देशातून जाण्याची आज्ञा करील.’ ब्रिटिश राज्यास हिंदू व मुसलमानांचा असलेला परस्परविरोधी प्रतिसाद हा पाश्चात्त्य संस्कृतीकडे पाहाण्याच्या त्यांच्या भिन्न दृष्टिकोनांतून निर्माण झाला होता. त्याच कारणास्तव 1857 पर्यंत हिंदू ब्रिटिशांचे मित्र तर मुसलमान कडवे विरोधक बनले होते.

      या परस्परविरोधी प्रतिसादाविषयी इतिहासकारांनी भरपूर लिहून ठेवले आहे. जामिया मिलिया विद्यापीठाचे प्रा. मुजीब अश्राफ यांनी लिहिले आहे, की ‘ब्रिटिश राज्याविरुद्ध होण्याचे हिंदूंना काहीच कारण नव्हते, परंतु मुसलमानांना ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व मानसिक अशी अनेक कारणे होती.’ ब्रिटिश सरकारने नवी शिक्षणपद्धती आणली. मोगल काळापासून राज्यकारभाराची व शिक्षणाची असलेली पर्शियन वा उर्दू भाषा बदलून इंग्रजी भाषा आणली (1837). त्या शिक्षणाचे व भाषेचे हिंदूंनी स्वागत केले, तर त्यावर मुसलमानांनी बहिष्कार टाकला. हे मुसलमानांसाठी अतिशय घातक ठरले.

      डॉ. एम. टी. टायटस यांनी लिहिले आहे, ‘मौलवींचे ऐकून मुसलमानांनी भरभराटीस येत असलेल्या (विविध) पाश्चात्त्य संस्थांवर बहिष्कार टाकला. आवेशपूर्ण भाषेत परंपरावादी मौलवींनी अशा काफिरांच्या (शिक्षण) संस्थांवर टीकेचा भडिमार केला.. त्यांना गंभीर ताकीद दिली, की अशा शाळांत जाणार्‍यांना व जाऊ देणार्‍या पालकांना इस्लाम त्यागी मानले जाईल.. हिंदूंनी मात्र नव्या शिक्षणाचा लाभ उठविला व शासनाशी जुळवून घेतले.’

      पं. नेहरूंच्या भाषेत सांगायचे, तर ‘सामान्यत: मुसलमानांनी पाश्चात्त्य शिक्षणास नकार दिला व गतराज्याचे पुनरुत्थान करण्यात दिवास्वप्नात ते रंगून गेले.. हिंदूू मात्र शिक्षणात व नोक र्‍यांत त्याच्या किती तरी पुढे निघून गेले.’ अशा प्रकारे आर्थिक वगैरे सर्वच क्षेत्रांत मुसलमान मागे पडले. त्यांच्याकरिता ब्रिटिश राज्य शाप तर हिंदूंकरिता वरदान ठरले होते.

      ब्रिटिश राज्यामुळे भारतात हिंदू, इस्लामी व पाश्चात्त्य या तीन संस्कृतींच्या परस्परसंबंधाचा प्रश्न निर्माण झाला. हिंदू व इस्लामी संस्कृतींच्या प्रवाहाच्या काही धारा परस्परात मिसळल्या असल्या, तरी मुख्य प्रवाह स्वतंत्र व समांतर वाहत आला होता. आता त्यांच्यासमोर पाश्चात्त्य संस्कृतीचे आव्हान उभे ठाकले. त्यांना अज्ञात असणार्‍या राष्ट्रवाद व सेक्युलॅरिझम या पाश्चात्त्य संस्कृतीतील प्रबल आधुनिक विचारशक्तींना त्यांचा प्रतिसाद कसा राहील, यावरून भारताचा पुढील इतिहास घडणार होता.

 

****************

 

    घटक : (8) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्ये

    उपघटक : (2) 2) महात्मा फुले

      विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून भारतीय स्वातंत्र्यलढ्याची चळवळ अधिक व्यापक व प्रभावी बनली. स्वातंत्र्याचे आकर्षण व ऊर्मी ही मनुष्यात सहजच असते. त्यामुळे अनेक लोक तिकडे खेचले गेले. या चळवळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले व चर्चाविश्‍वाचा मोठा हिस्सा तिने व्यापला. काँग्रेसच्या अधिवेशनातून सामाजिक परिषदेची हकालपट्टी होणे ही बाब फक्त काँग्रेसपुरतीच मर्यादित नव्हती. एकूणच समाजात राजकीय चळवळीचे उदात्तीकरण झाले. राजकीय नेत्यांना नायकत्व प्राप्त झाले. या नेत्यांमध्ये अग्रगण्य असलेले नेते महाराष्ट्रातील होते. 1905 मध्ये लॉर्ड कर्झन या व्हाइसरॉयने बंगालची फाळणी केली. या फाळणीची तीव्र प्रतिक्रिया भारतभर उमटली. भारतीय राजकारणात जहाल आणि मवाळ हे प्रवाह पहिल्यापासूनच अस्तित्वात होते. त्यात आता तिसरा म्हणजे अतिजहाल सशस्त्र क्रांतिकारकांच्या तिसर्‍या प्रवाहाची भर पडली.

      विसाव्या शतकाच्या प्रारंभी या तिन्ही प्रवाहांचे नेतृत्व महाराष्ट्रातील नेत्यांकडे होते. जहालांचे नेते लोकमान्य टिळक, मवाळांचे नेते नामदार गोखले आणि क्रांतिकारकांचे विनायक दामोदर सावरकर. अशा परिस्थितीत सामाजिक चळवळीची पीछेहाट झाली.

      या काळात महाराष्ट्रात सामाजिक चळवळ टिकवणे कठीण होते. महात्मा जोतिराव फुले यांच्या पश्‍चात सत्यशोधक समाजाचा किल्ला लढवण्याचे काम सामुदायिकरीत्या झाले. कृष्णाजी पांडुरंग भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे हे दोघे या संदर्भात ठळकपणे पुढे येतात.

      लोखंडे भालेकरांच्यानंतर प्रबोधनकार केशवराव ठाकरे, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी महत्त्वाची कामगिरी केली. हे दोघेही उत्तम पत्रकार होते. ठाकरे प्रभावी वक्तेसुद्धा होते, परंतु चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्ये त्यांच्या ठायी नव्हती. आगरकरप्रभृती उच्चवर्णीय सुधारकरांच्या बाबतीतही काही वेगळी अपेक्षा करता येणार नाही. धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या विधवाविवाहाच्या पुरस्कर्त्यालासुद्धा आपल्या मूळ उद्दिष्टाला आणि कार्यक्रमात मुरड घालून स्त्रीशिक्षणापुरते मर्यादित व्हावे लागते.

      सुधारणांच्या आगरकरी प्रकाराला आगरकरांच्या पश्‍चात त्यांच्यासारखे नेतृत्व लाभले नसले, तरी फुलेप्रणीत सत्यशोधक समाजाला करवीर शाहू छत्रपतींच्या रूपाने एक समर्थ पर्याय प्राप्त झाला. जोतिरावांपासून शाहू महाराजांकडे नेतृत्वाचे संक्रमण होताना घडून आलेला महत्त्वाचा बदल म्हणजे वेदांविषयीचे धोरण. स्वतः जोतिरावांचा वेद आणि वेदप्रामाण्य यांना तीव्र विरोध होता. त्यांची विचारधारा, त्यांचे इतिहासलेखन अशा अनेक गोष्टी या विरोधावर आधारित होत्या. तथापि, एवढे असूनही वेदनिष्ठ दयानंद सरस्वतींसारख्या धर्मसंस्थापकाला सहकार्य करण्याइतका लवचिकपणाही त्यांच्यात होता. फुले यांच्या मृत्यूनंतर विशेषतः शाहू महाराजांच्या उदयानंतर वेदांचा अधिकृतपणे स्वीकार करण्यात आला.

      या वातावरणातही काही सत्यशोधकांनी जोतिरावांचा वेदविरोधाचा वारसा चालू ठेवला. मुकुंदराव पाटलांसारखे सत्यशोधक प्रसंगोपात्त वेदांवर टीका करीत राहिले; पण वेदांना पूर्ण लक्ष्य करून त्यांची चिकित्सा करणारा विचारवंत म्हणजे पंडित धोंडिराम नामदेव कुंभार. धोंडिराम कुंभारांचे चरित्रतपशील समाधानकारकपणे उपलब्ध नाहीत. तथापि, सत्यशोधक समाजाच्या 1876 च्या अहवालात उल्लेख असलेले व 1875 मध्ये पुण्याला आलेल्या इंग्लंडच्या युवराजाला उद्देशून स्वागतपर पद रचणारे जोतिरावांच्या ’गुलामगिरी’ ग्रंथात जोतिरावांशी प्रश्‍नरूपाने संवाद साधरणारे धोंडिबा तेच हे असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. ’

      गुलामगिरी’ जून 1873 मध्ये प्रकाशित झाला (त्यानंतर लगेचच सत्यशोधक समाजाची स्थापना). त्या वेळी धोंडिराम हे केवळ जिज्ञासू श्रोते होते. त्यानंतर वीस वर्षांनी 1893, 1896 आणि 1897 या तीन वर्षांत त्यांनी अनुक्रमे सलग ’सत्यदर्पण’, वेदाचार’ आणि तमाशा’ ही पुस्तके लिहिली. ’वेदाचार’ हे पुस्तक वेदांशी संबंधित आहे. ’पंडित’ ही पदवी त्यांनी खुद्द शंकराचार्यांबरोबर केलेल्या जाहीर वादात मिळाली अशीह नोंद आहे. त्यानंतर अशा प्रकारचा वाद एका शतकानंतर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला, पण सप्तर्षींना अशी पदवी वगैरे काही मिळण्याऐवजी तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. धोंडिराम कुंभारांच्या ’वेदाचार’ या पुस्तिकाची प्रत प्रसिद्ध अभ्यासक श्री. विजय सुरवाडे यांच्याकडून डॉ. य. दि. फडके यांच्यामार्फत बाबा आढावांना उपलब्ध झाली व त्यांनी ती प्रसिद्ध केली. या पुस्तिकेत धोंडिरामांचा उल्लेख ज्येष्ठ शृंगेरी कुडलगीचे स्वामी जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या संस्थानचे सुरसुभे, असा करण्यात आलेला आहे. ’

      वेदाचार’ ही पुस्तिका रचनेच्या दृष्टीने जोतिरावांच्या ’गुलामगिरी’शी नाते सांगणारी आहे. पं. धोंडिराम कुंभार आणि सत्यशोधक व बॉम्बे रायफलच्या चौथ्या पलटणीचे जमादार लक्ष्मणराव गोपाळराव सावंत देसाई इनामदार, यांच्यातील हा संवाद आहे. पुस्तिका लक्ष्मणराव देसाई यांनी प्रकाशित केली. वेदाचार’मध्ये धोंडिराम कुंभारांचा रोख मुख्यत्वे वैदिक धर्मात यज्ञाच्या प्रसंगी करण्यात येणार्‍या पशुहिंसेवर आहे.

      * वेदांचे प्रामाण्य मानताना उत्तरकालीन ब्राह्मणांनी स्वतःला अनुकूल अशी वैचारिक व्यूहरचना केली. त्यानुसार वेदांमधील यज्ञीय हिंसेची व कर्मकांडाची जबाबदारी ब्राह्मणांवर टाकायची आणि उपनिषदांमधील उच्च दर्जाच्या ब्रह्मज्ञानचर्चेचे श्रेय क्षत्रियांना द्यायचे. असे केले म्हणजे यज्ञांवर टीका करणार्‍या उपनिषदांबरोबर व यज्ञविरोधी गौतम बुद्ध या क्षत्रिय वर्णाच्या धर्मसंस्थापकालाही आपले म्हणता येते.

      धोंडिरामांनी वेदांचा तपशीलवार अभ्यास केल्याचे दिसून येते. तो त्यांनी वेदांच्या इंग्रजी भाषांतरावरून केला, असे म्हटले तरी त्यासाठी त्यांना इंग्रजी भाषा चांगली आत्मसात करावी लागली. इंद्रादि वैदिक देवदेवतांवर धोंडिरामांनी नैतिक मुद्द्यांवरून टीका केली आहे. हिंसेच्या संदर्भात ते म्हणतात, की वेदांत असा एखादा भाग सापडणार नाही, की त्यात यज्ञमिशे हिंसा नाही.’ धोंडिराम अगोदर यज्ञाची रचना स्पष्ट करतात. यज्ञात चार अग्नी, एकोणीस प्रकारचे पुरोहित, पंधरा पाने व स्थाने, अठ्ठावीस यज्ञशाळाप्रकार आणि अठरा अनुष्ठाने, असा एकूण संभार असतो. यानंतर वेदांमधील ब्राह्मण ग्रंथांच्या आधारे धोंडिराम यज्ञक्रियाच्या स्वरूपाकडे वळतात. ’अध्वर्यु’ (मुख्य पुरोहित) त्या पशूस ’शामित्र’ शाळेत (पशू वधविण्याची शाळा) नेऊन त्याचे उत्तरेस पाय करून पाडितो. पशूस पाडल्यानंतर ’शमिता’ (पशूस वधणारा खाटिक ऊर्फ कसाब) हा त्या पशूचा गळा दाबून व मुष्टिप्रहार करून मोठ्या क्रूरतेने प्राण घेतो. पुढे या पशूचा शमिताभट कसाबाने प्राण घेतल्यावर ”इडासुनुवर” (पशू फाडण्याचा लाकडी कुद्यावर) पशूस टाकून हातात स्वधिनी (सुंशा) घेऊन त्याने पशूस फाडतात व त्याचे मांस काढून त्याचा होम करतात (भाजतात). त्यातून काही जळूनही जाते, शेष राहिलेले मांस पुरोहित व सर्व ब्राह्मण मंडळी वाटून घेतात. मागे यवन राजाने सर्व वेदांचे खंडन केले. त्या उपरांत जैन, बौद्ध, इंग्लिश, जर्मन लोकांनी त्याचा तर्जुमा केला व आता शेवटी मी सत्यशोधक पंडित धोंडिराम नामदेव तर त्याचे खंडनच काय, परंतु खंडन करून वरती मुंडणही करण्यास सिद्ध झाले आहेत. धोंडिरामांना यज्ञाय हिंसेचे खूप तपशील पुरवले आहेत.

 

****************

 

    घटक : (9) महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक)

    उपघटक : 1) प्रायोगिक कला - 1) नृत्य, 2) नाटक, 3) चित्रपट, 4) संगीत, 5) लोककला - लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इतर लोकनृत्ये

टिळकांच्या काळातील कीर्तन

      * कीर्तन हे वारकरी संप्रदायाचं लोकजागृतीचं प्रभावी माध्यम आहे. महाराष्ट्रात कीर्तनाच्या अन्य परंपराही आहेत; पण सर्वांत लोकप्रिय आणि लोकाश्रय लाभलेली परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. परंतु या संप्रदायाचं नेतृत्व ग्रामीण भागात पसरलेलं व त्यामुळं त्याला शहरात काय चाललं आहे याची पुरेशी माहिती नसे. याउलट हरदासी किंवा नारदीय कीर्तन परंपरा सामान्य लोकांपर्यंत पसरली नसली तरी या प्रकारची कीर्तनं करणारे हरदास उच्चवर्णीय शिक्षित समाजगटातील असल्यामुळं त्यांच्यातल्या सामाजिक, राजकीय जाणिवांचं प्रमाण लक्षणीय होतं.

      लोकमान्य टिळकांची भूमिका विष्णूबुवा जोग महाराजांना मान्य होती. पण; विनायकमहाराज साखरे यांना टिळकांची विचारसरणी मान्य नव्हती. त्यांनी टिळकांना विरोध केला. जोग आणि साखरे यांच्यातला हा फरक जगाकडं तुच्छतेनं व नैराश्यानं पाहणारी वेदान्ती विचारसरणी आणि सन्मानपूर्वक शुभेच्छांतून पाहणारी वारकरी विचारसरणी असा आहे. विष्णूबुवा जोग महाराजांच्या अनुयायांनी त्यांच्या तात्विक भूमिकेत झालेल्या बदलाकडं दुर्लक्ष केलं व पूर्ववत शंकराचार्यांच्या मायावादाची री ओढणारी मांडणी वारकरी संप्रदायावर आरोपित करण्याची परंपरा अबाधित ठेवली हा मुद्दा जसा महत्त्वाचा आहे तसाच आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे जोग महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातल्या सहकार्याचा. महाराजांच्या चरित्रातला हा पैलू तसा अज्ञातच राहिल्यामुळं वारकरी शिक्षण संस्थेतून तयार होणार्‍या कीर्तनकारांचा जितका उपयोग स्वातंत्र्यलढ्यात झाला असता तितका होऊ शकला नाही.

      पुण्यातल्या चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले विष्णूबुवा जोग महाराज मल्लविद्येत निष्णात होते. त्यांचे थोरले भाऊ पांडोबा जोग ‘प्रधान मल्ल’ म्हणून ओळखले जात. ते पुण्याच्या नगरकर तालमीत वस्तादही होते. स्वतः जोग महाराजांनी सुद्धा ही गादी काही काळ सांभाळली होती. स्वतः जोग महाराज व त्यांचे बंधू पांडोबा हे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. अठराव्या व एकोणिसाव्या शतकातल्या संधिकाळातल्या पुण्याला अनेक व्यसनांनी ग्रासले होते, हे लोकमान्य टिळकांचे अभ्यासक अ. ज. करंदीकर आणि पांडोबा जोग यांच्या चरित्रलेखकानंही स्पष्ट केलं आहे. पुण्यात शाक्त पंथ बोकाळला व गुप्त अनाचाराला उत्तेजन मिळालं होत.

      जोगबंधूंचं ब्रह्मचर्य व्रत आणि विष्णूबुवांची वारकरी संप्रदायाकडं असलेली ओढ ही त्या काळच्या या सार्वत्रिक प्रवाहाविरुद्धची प्रतिक्रिया असण्याची शक्यता आहे. करंदीकरांच्या म्हणण्याप्रमाणं ‘स्त्री राज्य’ संपुष्टात आणण्यात लोकमान्य टिळकांचाही हातभार लागला. जोग महाराजांमुळं पुण्यातले तालीमबाज तरुण टिळकांच्या मागं उभं राहण्यास मदत झाली. त्याचप्रमाणं वारकरी संप्रदायाची ताकदही टिळकांना महाराजांमुळं मिळाली.

      स्वराज्याच्या मागणीला सर्व थरांतल्या लोकांचा पाठिंबा आहे, असं चित्र दिसावं म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांनी अठरापगड जातींच्या लोकांची व विविध धर्मसंप्रदायांच्या अनुयायांची मोठी सभा शनिवारवाड्यावर भरवली होती. तिला वारकरी सांप्रदायिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. टिळकांचे लेखनिक अप्पाजी विष्णू कुलकर्णी यांनी ‘लोकमान्य टिळकांची गेली 8 वर्षे’ हे पुस्तक लिहिलं. त्यात 1901 ते 1908 या कालखंडातल्या टिळकांच्या राजकारणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. बहुधा हेच पुस्तक समोर ठेवून दा. न. शिखरे यांनी ‘आठ साल’ हे नाटक लिहिलं.

      या नाटकात टिळक आणि वारकरी संप्रदाय यांची जवळीक दिसून येते. जोग महाराजांची जेमतेम साक्षर म्हणता येईल अशी त्यांची शैक्षणिक पात्रता होती; परंतु पुणे शहरात व त्यातही चित्पावन कुटुंबात जन्म असल्यानं त्यांना भवतालच्या परिस्थितीचं बर्‍यापैकी भान होतं. त्यामुळं ते टिळकांकडं आकर्षित झाले. ते टिळकांचे पाठीराखे बनले शिवाय त्यांनी समवयस्क तालीमबाज तरुणांनाही आपल्याबरोबर घेतलं व त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याची जाणीव वारकर्‍यांपर्यंत पोचवली. जोग महाराज आणि टिळक एकामागं एक कालवश झाल्यानंतर महात्मा गांधींचं राजकारण सुरू झालं. गांधीजींनी पांढर्‍या शुभ्र खादीची गांधी टोपी प्रचारात आणली तोपर्यंत वारकरी शिक्षण संस्थेतल्या राजकीय जाणिवा जागृत असल्यानं संस्थेनं आपल्या विद्यार्थ्यांसाठी धोतर-सदर्‍यावर गांधी टोपीचा गणवेश स्वीकारला. टिळकांच्या आग्रहावरून नाटककार नारायण बापूजी कानिटकर यांनी पहिलं कीर्तन केलं.

      या कीर्तनात स्वतः टिळकांनी झांजा वाजवल्या होत्या. नाशिक इथं भरलेल्या पहिल्या कीर्तन संमेलनाचं अध्यक्षपदसुद्धा टिळकांनी भूषविलं होतं. टिळकांनी कीर्तन करावं, साथीचं काम आमची वारकरी मंडळी करतील, असा प्रस्ताव जोग महाराजांचा होता व टिळकांनी तो तत्त्वतः मान्यही केला होता. टिळकांनी राष्ट्रीय कीर्तनाचा पुरस्कार केला. त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देत दत्तोपंत पटवर्धन हे त्यांचे अनुयायी तशा प्रकारची कीर्तनं करू लागले. दत्तोपंत हे पहिले राष्ट्रीय कीर्तनकार होत. दत्तोपंतांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य म्हणजे नारदीय पद्धतीच्या आपल्या कीर्तनातला पूर्वरंग ते जोग महाराजांच्या शैलीत निरूपण करत आणि उत्तररंगात राष्ट्रीय कामगिरी करणार्‍या शिवाजी महाराज, झाशीची राणी, स्वतः टिळक अशा देशभक्तांच्या आयुष्यातल्या प्रसंगांवर आख्यानं लावीत.

      वारकरी कीर्तनात पूर्वरंग व उत्तररंग अशी विभागणी नसते. स्वराज्याच्या मागणीसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी टिळक इंग्लंडला निघाले तेव्हा पुणेकरांनी मोठी मिरवणूक काढून टिळकांना निरोप व शुभेच्छा दिल्या. या मिरवणुकीत जोग महाराजांनी टिळकांना खांद्यावर घेतलं होतं. जोग महाराजांच्या कामगिरीचा व योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख टिळकांनी केला. महाराजांच्या मृत्यूनंतर ‘केसरी’त लिहिलेल्या लेखात टिळक लिहितात, “स्वदेशी चळवळ, मद्यपान निषेध, गोरक्षण, धर्मसंरक्षण वगैरेंसंबंधीच्या संस्थांत बुवा स्वतः प्रामुख्यानं काम करीत असत व सर्व वारकरी संप्रदायालाही असल्या सार्वजनिक कामात लक्ष घालायला बुवा नेहमी शिकवीत असत.

      कुठलाही धार्मिक संप्रदाय समाजाच्या एकंदर उभारणीपासून अलग राहणं इष्ट नाही. इतकंच नाही, तर ते धार्मिक तत्त्वाच्या विरुद्ध आहे, असं बुवांचं मत असल्यामुळं परमार्थ व व्यवहार यांची सांगड प्रत्यक्ष घालून दाखविण्याची संधी ते केव्हाही वाया जाऊ देत नसत. अशा महंताकडं वारकरी संप्रदायाचं नेतृत्व गेली दहा-पंधरा वर्षे असल्यामुळं वारकरी संप्रदायात इष्ट तो बदल झाला असून, समाजावर बुवांनी एक प्रकारे उपकार करून ठेवले आहेत.” ‘संतवाङ्मय हे समाजाला तेजोहीन करणारं आहे, असा जो प्रा. शि. म. परांजपे, राजवाडेप्रभृतींचा दृष्टिकोन, त्याला जोग यांनी या प्रस्तावनेत अत्यंत समर्पक उत्तर दिलं आहे. 

१३ जून २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ :  विभाग पहिला : इतिहास

*     घटक : (5) भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास

*     उपघटक : (4) जहाल गटाची वाढ, स्वराज्याची चळवळ

      स्वराज्याचा महामंत्र

      ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच!’ हा लोकमान्य टिळक यांनी दिलेला स्वराज्याचा महामंत्र ! लोकमान्यांनी हा देदीप्यमान मंत्र दिला, त्या घटनेला 2016 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली.

      लोकमान्य टिळक मंडालेहून आले आणि थंड लोळागोळा झालेलं देशातले वातावरण पुन्हा एकदा तापू लागले. टिळकांनी सभांमध्ये भाग घेता कामा नये, गणेशोत्सवात ते बोललेच तर त्यांनी देशस्थितीवर भाष्य करता कामा नये, आदी आदेश थेट इंग्लंडमधून निघू लागले. टिळकांच्या गायकवाड वाड्याभोवती पोलिस ठाणी उभी राहिली आणि टिळकांकडे येणार्‍या-जाणार्‍यांची चौकशी करण्यात येऊ लागली. तरीही जेव्हा आपल्याला जुमानलं जात नाही, असे सरकारच्या लक्षात आलं, तेव्हा एकेक करून बंदीहुकूम मागे घ्यावे लागले. टिळकांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा त्यांचा आधार बनला.

      टिळकांचा ध्यास होता तो केवळ स्वराज्याचा. स्वराज्य मिळवायचे तर त्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे गरजेचे आहे, हे त्यांनी ओळखले होते. 1914 मध्ये युरोपात युद्ध सुरू झाले होते. लोखंड गरम असतानाच त्यावर घाव घालण्याची गरज आहे, हे टिळकांच्या मनात पक्के होते. सुरतेच्या फाटाफुटीनंतर काँग्रेसमध्ये घडत तर काहीच नव्हते. 6 वर्षं रेंगाळलेल्या अवस्थेतच गेली होती. आता टिळक स्वराज्यप्रेमी भूमीत होते. टिळकांना काँग्रेसमध्ये परत घेतल्याशिवाय देश उभा राहणार नाही, असे त्या 6 वर्षांत बोलले जात होतेच, पण पुढाकार कुणी घ्यायचा?

      सरकारकडून दडपशाहीच्या कारभारात खंड नव्हता. टिळकांचा जाहीरनामा त्यांना मवाळांशी जुळवून घ्यायचे असल्याचा पुरावा आहे, असे दाखले दिले जाऊ लागले. तुरुंगात जाण्यापूर्वीचे टिळक आता राहिलेले नाहीत, असे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनाही वाटू लागले. या समजुतीतून गोखले यांनीही समेटाचा एक मसुदा तयार केला. तो टिळकांनी जागच्या जागीच फेटाळला.

      समेट घडून यावा यासाठी अ‍ॅनी बेझंट यांचेही प्रयत्न सुरू होते. त्यासाठी काँग्रेसचे एक पदाधिकारी सुब्बराव यांना घेऊन त्या पुण्यात आल्या. 5 डिसेंबर 1914 ला त्या आल्या आणि 6 रोजी त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत टिळकांशी चर्चा केली. 7 रोजी त्या मद्रासला निघून गेल्या. सुब्बराव मुंबईला गेले. तिथे त्यांनी फिरोजशहा मेहतांशी चर्चा केली. ते 8 रोजी पुण्यात परतले आणि त्यांनी गोखले आणि टिळक यांची भेट घेतली. टिळकांच्या मनात काय होते, ते सुब्बराव यांना कळले होते. सुब्बरावांनी ते गोखले यांना ऐकवले.

      भूपेंद्रनाथ बसू हे काँग्रेसचे त्या वर्षीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. समेटाची आशा नसल्याचे पत्र टिळकांनी त्यांना लिहिले होते. गोखले यांनीही एक खासगी पत्र लिहून ‘टिळकांना काँग्रेसमध्ये परत घेऊ नये’ असे भूपेंद्रनाथ बसू यांना कळवले. गोखले हे त्यानंतर टिळकांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना भेटले. ही भेट 19 डिसेंबरला गायकवाडवाड्यात झाली. मद्रासची काँग्रेस पार पडेपर्यंत टिळकांनी सर्व गोष्टी सबुरीनं घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र टिळकांनी गोखले यांना धारेवर धरायला आरंभ केला.

      भूपेंद्रनाथ बसूंना गोखले यांनी जे खासगी पत्र लिहिले, ते प्रसिद्ध करण्याविषयी टिळकांनी आग्रह धरला. ते पत्र कोलकात्याच्या ‘अमृतबझार पत्रिके’च्या हाती लागल्याने त्यांनी ते ‘काळोखातला वार’ अशा संज्ञेने प्रसिद्ध केले. हा वाद नेमका होता तरी काय? सरकारवर बहिष्कार घालण्याच्या बाजूचे टिळक आहेत, असे त्यांच्या विरोधकांचं मत होते आणि गोखले यांचा त्याला पाठिंबा होता.

      1915 हे वर्ष उजाडले तरी वाद काही मिटत नव्हता. ‘सरकारवर बहिष्कार घालायच्या बाजूने आपण कधीच (नेव्हर) नव्हतो’, असे टिळकांचे म्हणणे होते, तर ‘ते बहिष्काराच्या बाजूनेच आहेत,’ हे पटवायच्या उद्देशाने गोखल्यांनी 1907 मध्ये टिळक काय म्हणायचे, त्याचे दाखले द्यायला सुरवात केली. मग मात्र टिळकांनी शेवटचे अस्त्र काढले आणि ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला. तो नेहमीप्रमाणे कडक होताच, पण तो अतिजहालही होता.

      त्यात टिळकांनी ‘’राष्ट्रीय पक्षातील (टिळकांच्या) लोकांस मवाळांच्या काँग्रेसांत घ्या अगर घेऊ नका, पण त्यासाठी गुप्त लेखाचे किंवा कृत्याचे उपाय योजू नका किंवा राष्ट्रीय पक्षातील लोक जे उघड उघड बोलतात त्याचा विपर्यास करून सरकारचा गैरसमज करू नका. गोखले काय आणि टिळक काय, दोघांच्याही गोवर्‍या आता बहुतेक ओंकारेश्वरी गेल्या आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही. टिळक काँग्रेसमध्ये आले तर ती कब्जात घेतील या म्हणण्यात काही हशील नाही. काँग्रेस राष्ट्रीय आहे, टिळकांची नव्हे किंवा गोखल्यांचीही नव्हे. काँग्रेसचे धोरण काय असावे हे काँग्रेसने ठरवावयाचे आहे, अमुक एका व्यक्तीने नाही,’’ या शब्दात गोखले आणि मंडळींचा समाचार घेतला. 9 फेब्रुवारी 1915 रोजी हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 10 दिवसांनी गोखले यांचे निधन झाले. गोखले यांच्या चाहत्यांचा असा समज झाला, की गोखले यांच्या निधनास तो अग्रलेख कारण ठरला.

      गोखले गेले तेव्हा टिळक सिंहगडावर आपल्या ‘गीतारहस्या’ची मुद्रिते तपासण्यासाठी गेले होते. त्यांना ही दुःखद बातमी 20 फेब्रुवारी 2015 च्या पहाटे देण्यात आली. ते लगेचच गड उतरून खाली आले. त्यांनी ओंकारेश्वरी श्रद्धांजली वाहिली. 23 फेब्रुवारीच्या अंकात (कै.) गोखले यांच्या देशसेवेचा आणि स्वार्थत्यागाचा त्यांनी भरभरून गौरव केला. मृत्युलेख कसा असावा, याचा तो आदर्शपाठ होता.

      लोकमान्यांनी त्यानंतर काँग्रेसप्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी आपल्या राष्ट्रीय पक्षातल्या ज्येष्ठांची एक सभा बेळगावमध्ये भरवली. या सभेत वादावादी झाली. काँग्रेसमध्ये जाण्याच्या विरोधात असणार्‍या गटाचं नेतृत्व डॉ. बा. शि. मुंजे यांच्याकडे होते. टिळकांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी काँगेसच्या सिद्धान्तावर सरळ विश्वास दाखवून ‘आता हा प्रवेश करावा’, असे स्पष्ट केले. मुंजे यांनी त्याला विरोध केला, पण त्याविषयीचा निर्णय घेण्यास मोकळीक ठेवून लोकमान्य वरच्या खोलीत गेले असताना तो केला. या बैठकीचे वातावरण बदलले आणि समेटाच्या विरोधात सभा जाणार, असे चिन्ह दिसू लागल्याने लोकमान्यांना खाली पाचारण करण्यात आले. त्यांनी भर सभेत प्रश्न केला ः ‘कोणाकोणाचा विरोध आहे?’ एकही हात वर होईना म्हणताच त्यांनी ‘समेटाच्या बाजूने सभा आहे,’ असे म्हणून ठराव मताला टाकला. ठराव एकमताने काँग्रेसप्रवेशाच्या बाजूने संमत झाला. श्रोत्यांच्या मनाची पकड घेण्यात टिळक अतिशय वाकबगार होते.

      1 जून 1915 च्या नगरच्या सभेत त्यांनी सरकारी अधिकार्‍यांच्या अतिरेकी वेतनाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले ः ’‘इंग्लंडच्या पंतप्रधानाला भारताचा राज्य कारभार पाहण्यासाठी दरमहा 5000 रुपये मिळतात, तर भारताचा राज्य कारभार पाहायला येणार्‍या महाराज्यपालास (गव्हर्नर जनरल) दरमहा 20,000 रुपये. याचे कारण त्याला इतरांची किंमत चुकवून नेमलेले असते. हा हिंदुस्थान आहे, जा आणि काय खायचे ते खा. तो सांगतो, तुमच्यासाठी इंग्लंडमधील थंड हवा सोडून आम्ही इकडे आलो, पण बाबा, इकडे आलास तो तुला बोलावले आहे कोणी? तुम्ही आम्हाला अधिक शहाणे करायला आलात, मान्य, पण किती दिवस? दोन पिढ्या की तीन पिढ्या की कालाच्या अंतापर्यंत? शिक्षकाने काही मुदतीत शिकवून मुलगा तयार केला नाही तर शिक्षकच नालायक ठरतो. आज देशी संस्थानात व्यवस्थित राज्य कारभार चालतो की नाही? अधिकार द्या व चांगले चालविले नाहीत तर काढून घ्या. बादशहाला सिव्हिल सर्व्हंटांनी कारभार केला काय किंवा आमच्या बेळवींनी केला काय एकच. गोर्‍या नोकराच्या जागी काळे नोकर इतकाच फरक. हे म्हणण्यात राजद्रोह नाही. पोलिस शिपायाचा द्रोह म्हणजे राजद्रोह नाही.’’

      दुसर्‍या दिवशी लोकमान्यांनी पुन्हा एकदा ‘होमरूल’ या विषयावर दुसरं भाषण केल. रात्री सव्वानऊ वाजता भाषणास ते उभे राहिले आणि दोन तास ते अखंड बोलत राहिले. जुन्या कापड बाजारात झालेल्या या सभेत टिळक म्हणाले ः ‘’आम्ही स्वराज्य मागतो यात सर्व काही आले. आमची मागणी सर्वसमावेशक आहे. एक स्वराज्य नाही म्हणजे काही नाही. इंग्लंडात नावाला स्वदेशी राजा असता प्रजेला सर्वाधिकार मिळालेले आहेत. स्वराज्य ही गुरूकिल्ली आहे.’’ या भाषणात सगळीकडे स्वराज्याचा महामंत्र त्यांनी सातत्याने जपलेला होता.

      टिळकांना कुठे ना कुठे अडकवायचे हे सरकारचे धोरण होते आणि त्यानुसारच बेळगाव आणि नगर या ठिकाणी भाषणं ही राजद्रोहाची ठरवून ‘124 अ’ कलमाखाली त्यांच्याविरुद्ध पुण्याचे ‘डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पोलिस गायडर’ यांनी पुण्याचे जिल्हा न्यायाधीश हॅच यांच्यापुढे फिर्याद दाखल केली आणि ‘टिळकांकडून 50 हजारांचा जामीन मागावा,’ अशी मागणी केली.

      न्यायालयात स्वतः टिळक आणि त्यांच्या वतीनं बॅ. जिना, डेव्हिड एस. एरूलकर, बॅप्टिस्टा, करंदीकर, बखले आणि काका पाटील या वकिलांची फौज काम पाहत होती. सरकारच्यावतीने बॅ. पटवर्धन, बिनिंग, दावर आणि त्यांच्या साथीला गायडर होते.

      बॅ. जिना यांनी ‘टिळकांची नेमकी कोणती वाक्ये राजद्रोहाची आहेत’, असा सवाल केला, तेव्हा तिथे ‘ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानास कायम दास्यात ठेवले,’ किंवा ‘नामधारी साम्राज्यसत्तेशिवाय सर्व ब्रिटिश सत्ता शक्य तितक्या लवकर नाहीशी केली पाहिजे,’ अशी काही वाक्ये शोधून पुढे करण्यात आली. या खटल्यात टिळक निर्दोष सुटले.

      * ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच,’ हे वाक्य टिळकांनी नेमकं कधी उच्चारलं, याविषयी अनेक प्रवाद आहेत. त्यांनी ते नगर, बेळगाव, अकोला, सातारा, अलाहाबाद, कानपूर, कोलकाता आदी ठिकाणी उच्चारल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्यांनी स्वराज्याची मोहीम हाती घेतल्यापासून आणि ‘होमरूल’ची स्थापना केल्यापासून स्वराज्याविषयीचा आवाज वाढवत नेला, पण प्रत्यक्षात त्यांनी ही घोषणा लखनौ काँग्रेसमध्ये केली. या घोषणेची तारीख आहे 29 डिसेंबर 1916.

      स्वामी श्रद्धानंद हे आर्य समाजाचे एक थोर नेते. त्यांनी या घटनेचं ‘थेट वृत्तांकन’ केले आहे. स्वामी श्रद्धानंद हे काही लेचेपेचे नेते नव्हते. हरिद्वारमध्ये त्यांनी गुरुकुलाची स्थापना केली होती. लोकमान्यांच्या निधनानंतर त्यांनी एक लेख लिहिला होता, त्यात त्यांनी ‘लखनौ काँग्रेसपूर्वी लोकमान्यांची दोन वेळा गाठ पडली होती आणि तिसर्‍यांदा आपण त्यांना लखनौ काँग्रेसच्या काळात भेटलो’, असे म्हटले आहे. लोकमान्यांचे ‘न भूतो’ स्वागत झाल्याचे आपल्या या लेखात त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या लेखात लोकमान्यांचा ‘पंडित’ असा गौरवाने उल्लेख केला आहे. लखनौ काँग्रेसमध्ये भाषण करणारे एकामागून एक येत होते आणि प्रत्येकजण टाळ्यांच्या गजरामध्ये आपले भाषण संपवत होता. लोकमान्य व्यासपीठावर आले आणि टाळ्यांचा जो गजर सुरू झाला तो थांबेचना. मुस्लीम लीगबरोबरचा लखनौ करार हा त्या टाळ्यांबरोबर आकाशाशी स्पर्धा करत होता.

      स्वामी श्रद्धानंद म्हणतात ः ‘लोकमान्य व्यासपीठावर आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सभागृहावर एक कटाक्ष टाकला. टाळ्या वाजतच राहिल्या. साधे धोतर, त्यावर साधा सदरा आणि पायात मराठा पद्धतीचे जोडे असा त्यांचा वेश होता. दोन्ही हात वर करून त्यांनी काँग्रेस प्रतिनिधींना नमस्कार केला. टाळ्यांचा गजर थांबेपर्यंत ते थांबले. ते एकेक शब्द तोलून-मापून बोलू लागले. साधी वाक्ये ते उच्चारू लागले. त्यासरशी श्रोते कान सरसावून त्यांना ऐकू लागले. त्यांचा आवाज चढला आणि ते उच्चारते झाले ः ‘आम्हाला ब्रिटिश सांगतात, ‘तुम्ही आर्यांचे वंशज आहात, तुम्ही काही या भूमीचे खरे मालक नाही आहात. आम्ही आर्यांनी येथल्या मूळ वंशाच्या लोकांकडून हा देश घेतला. त्यानंतर मुस्लिमांनी या देशावर आक्रमण करून तो आमच्याकडून काबीज केला. त्यामुळे इंग्लिश राज्यकर्ते हे या अनार्यांच्या भूमीचे पालक आहेत. ठीक आहे, मी त्यांचा हा युक्तिवाद मान्य करायला तयार आहे, पण मग जर ते या भूमीचे सध्याचे रक्षणकर्ते आहेत, तर त्यांनी ही भूमी आता सोडून ती भिल्ल, गोंड आणि द्रविड आदींच्या ताब्यात परत द्यावी आणि मुख्य म्हणजे येथून तातडीने चालते व्हावे. या भूमीचे जे मूळ मालक आहेत, त्यांची सेवा करायला आम्ही आनंदाने तयार आहोत.’

      लोकमान्यांनी ही घोषणा करताच सभागृहात प्रचंड जल्लोष झाला, टाळ्या तर एकसारख्या वाजत राहिल्या. लोकमान्यांनी नेमके बोट ठेवल्याचा हा आनंद होता. टाळ्या कमी होण्याची काहीशी वाट पाहून त्याच टिपेला गेलेल्या आवाजात लोकमान्यांनी म्हटले आहे, की ‘होमरूल (स्वराज्य) इज माय बर्थराइट अँड आय शॅल हॅव इट.’ सर्व सभागृह प्रचंड आवाजाने दुमदुमून गेले. एक क्षण तर असा निर्माण झाला, की मांडव कोसळतो की काय, अशी स्थिती उद्भवली.

      आवाज, प्रतिध्वनी आणि प्रचंड जल्लोषात लोकमान्यांचा जयजयकार झाला, इतका की त्यांनाही त्यापुढे बोलता आले नाही. त्या काळात टेपरेकॉर्डर आलेला नव्हता, चित्रफीत निघू शकत नव्हती, पण श्रद्धानंदांनी केलेले हे वर्णन वाचल्यावर त्या सभागृहातले वातावरण नेमकेपणाने उभे राहते आणि लोकमान्यांनी काबीज केलेल्या त्या जनसमुदायासमोर आपणही जाऊन उभे राहतो आणि त्या धीरोदात्त लोकनेत्यापुढे नतमस्तक होतो. लोकमान्यांनी लखनौला काय बोलायचे, ते निश्चित केले होते. इंग्रजांनी टाकलेले जाळे त्यांच्याच दिशेने उलटवून त्यांचीच कोंडी करण्याचे अप्रतिम आणि वादातीत असे कौशल्य या सर्व काळात दिसून आले आहे, हे विशेष. नगरने सुरवात केली, ज्याचा उत्तुंग टोला लखनौमध्ये लगावण्यात आला!

      - अरविंद व्यं. गोखले 

१२ जून २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ :  विभाग पहिला : इतिहास

*     घटक : (8) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्ये

*     उपघटक : (2) महात्मा फुले

      महात्मा फुले

      आगरकरकालीन विचारी आणि कार्यकर्त्या पुरुषांमध्ये ज्येष्ठतेचा मान जातो लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि महात्मा जोतिराव फुले यांच्याकडे.

      * जोतिराव फुले यांचे कार्य केवळ वैचारिक मांडणीच्या पातळीवर राहिले नाही. त्यांनी या विचारांना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्यासाठी चळवळ उभारली. शूद्रातिशूद्र आणि मुलींसाठी शाळा काढल्या. सार्वजनिक सत्यधर्म तथा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नव्या धर्मसमाजाच्या पायावर व्यापक सामाजिक सुधारणा घडवून आणायचा प्रयत्न केला. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांना भोगाव्या लागणार्‍या दुःखाचे मूळ कारण ब्राह्मणांनी प्रसृत केलेला धर्म असून, त्या धर्माचे उच्चाटन करण्यासाठी त्यांचे समर्थक आणि वाहक असलेल्या ब्राह्मणवर्गावर टिकेचे प्रहार करण्याशिवाय पर्याय नाही या निश्चयाने त्यांनी तशी टीका केली. फुल्यांच्या मांडणीनुसार यात शूद्रातिशूद्रांचे नुकसान असून, ब्राह्मणांचा फायदा आहे. तसेच हा ब्राह्मणांच्या अडाणीपणातून आपोआप निष्पन्न झालेला प्रकार नसून उलट धूर्त ब्राह्मणांचे कारस्थान आहे.

      * जोतिराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ पुस्तकावर आणि सत्यशोधक समाजाच्या अहवालावर निबंधमालेतून परीक्षण करताना शास्त्री यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. स्वतः जोतिरावांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले, परंतु जोतिरावांचे तरुण सहकारी कृष्णराव भालेकर या टीकेमुळे प्रचंड अस्वस्थ झाले. भालेकर उत्साही आणि उपक्रमशील होते. चिपळूणकर आणि एकूणच ब्राह्मणी पत्रकर्त्यांकडून होणार्‍या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आपले स्वतंत्र पत्र पाहिजे, असे त्यांच्या लक्षात आले. यापूर्वी अशा टीकेचा समाचार घ्यायचा झाल्यास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालवलेल्या ‘ज्ञानोदय’सारख्या पत्रांचा आधार घ्यावा लागे. त्यामुळे सत्यशोधक लोक ख्रिस्ती धर्माचे पक्षपाती आहेत, असा समज पसरवणं विरोधकांना सहज शक्य होई.

      सत्यशोधक ब्राह्मणेतरांचे असे पत्र काढण्यास अनुकूल परिस्थिती नव्हती. स्वतः जोतीरावसुद्धा त्याविषयी उत्सुक वा उत्साही नव्हते. त्यामुळे मुंबईच्या सत्यशोधकांनी या संकल्पित पत्रासाठी पाठवलेला छापखाना पुण्यात धूळ खात पडला व शेवटी तो परत पाठवावा लागला. तरीही भालेकरांनी उमेद खचू दिली नाही. त्यांनी ‘दीनबंधू’ पत्र सुरू केले. ब्राह्मणेतर पत्रकारितेचे ‘दीनबंधू’ हे पहिले पत्र ठरले. भालेकरांची परंपरा त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मुकुंदराव पाटील यांनी चालू ठेवली. मुकुंदरावांनी ‘दीनमित्र’ नावाचे पत्र काही दशके स्वातंत्र्योत्तर काळातसुद्धा चालवले.

      * हिंदूंच्या समाजव्यवस्थेत स्त्रिया आणि कनिष्ठ जाती यांना सोसाव्या लागणार्‍या जाचाचे मूळ हिंदू धर्मात आहे, याची खात्री पटलेल्या जोतिराव फुले यांना 2 पर्याय उपलब्ध होते. पहिला धर्मांतराचा (येथे धर्मांतर या शब्दाने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार असा अर्थ घ्यावा) आणि दुसरा स्वतंत्र धर्मसमाज काढण्याचा.

      जोतिरावांच्या बाबा परमजीसारख्या सहकार्‍यांनी पहिला पर्याय निवडला. फुल्यांनी तो निवडला नाही.

      याची कारणे -

      1) थॉमस पेनच्या पुस्तकांमुळे त्यांना ख्रिस्ती धर्माच्याही मर्यादा कळून चुकल्या होत्या.

      2) एकदा हिंदू धर्माची चौकट मोडून बाहेर गेले की तुम्ही हिंदूसाठी अप्रस्तुत ठरता, परके होता व तुमच्या म्हणण्याकडे कोणीही लक्ष देत नाही.

*****************

*     घटक : (8) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्ये

*     उपघटक : (3) म. गो. रानडे

      म. गो. रानडे

      महात्मा जोतिरावांच्या लक्षात आलेल्या गोष्टी न्या. रानड्यांनाही उमगल्या होत्या. तथापि, या गोष्टींची साक्षात झळ जितकी फुल्यांना बसत होती, तितकी ती रानड्यांना बसायचे कारण नव्हते. शिवाय त्या दोघांमधील स्वभावभेद. म्हणजे प्रा. वा. ब. पटवर्धन सुचवतात त्याप्रमाणे रानडे विचारी आणि फुले विकारी, असे समजायचे कारण नाही. रानडे हे उत्क्रांतीवादी होते आणि फुले क्रांतिवादी होते, परंतु फुले क्रांतिवादी असल्याचे कारणच मुळी त्यांना समस्या सुटण्याची असलेली निकड. दुसरे असे की फुले समस्याग्रस्त वर्गात मोडणारांपैकी होते; तर रानडे ज्या वर्गामुळे समस्या निर्माण झाल्या त्या वर्गातील होते अशी फुल्यांची खात्री होती. त्यामुळे कधी ना कधी फुले आणि रानडे यांच्यात संघर्ष होणे अपरिहार्य होते. तसा तो झाला, पण बराचसा एकतर्फी कारण फुले कितीही स्पष्ट झाले व त्यांनी कितीही टीका केली तरी रानड्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले नाही.

      * रानडे-फुले यांच्यात झालेल्या संघर्षाची तुलना नंतर झालेल्या शिंदे-आंबेडकर संघर्षाशी करता येण्यासारखी आहे. पहिल्या संघर्षातील बरेचसे मुद्दे दुसर्‍या संघर्षाला लागू पडतात. शिंद्यांनीही डॉ. बाबासाहेबांना प्रत्युत्तर द्यायचे टाळले.

      डॉ. बाबासाहेबांची निकड शिंद्यांना समजत होती आणि मुख्य म्हणजे एकूण व्यवस्थेचा विचार केला, तर बाबासाहेब फुल्यांप्रमाणेच समस्यापीडित वर्गातले त्यांच्यापेक्षा अधिक चिडलेले आणि शिंदे उच्चवर्गीय नसले तरी सवर्ण होते आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक जीवनाच्या एका क्षेत्रात तरी उच्चवर्णीयांबरोबर म्हणजे लोकमान्य टिळकांबरोबर सहकार्य करीत होते. सामाजिकदृष्ट्या जोतिरावांना अनुसरणारे विठ्ठलराव शिंदे राजकीयदृष्ट्या टिळकांना अनुसरून स्वराज्य हवे असे म्हणत होते.

      फुले-रानडे आणि शिंदे-डॉ. आंबेडकर या दोन द्वंद्वांची तुलना टिळक-आगरकर या द्वद्वांशी करता येते. पहिल्या 2 द्वंद्वांमधील द्वांद्विक वेगवेगळ्या जातसमुहांमधील होते. तिसर्‍या द्वंद्वातील द्वांद्विक मात्र एकाच जातसमूहामधील म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मण होते.

      * फुले, रानडे, शिंदे आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील समान दुवा म्हणजे मानवी जीवनातील धर्माची आवश्र्यकता त्यांना पटली होती. सामाजिक सुधारणा धर्माच्या बरोबरीने केल्या पाहिजेत, या मुद्यावरून डॉ. आंबेडकरांना मार्क्सवाद्यांवर आणि शिंद्यांना आगरकरांवर म्हणजे मिलस्पेन्सरच्या उपयुक्ततावाद आणि अज्ञेयवाद यांच्यावर टीका करावी लागली. स्वतः रानडे यांनीसुद्धा मिलस्पेन्सरच्या विचारसरणीवर टीका करून आगरकरांसारखे तरुण त्यांच्या नादी लागतात, याबद्दल खेद व्यक्त केला.

      * जोतिराव फुले यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्यावर पुढील संदर्भात टीका केली -

      1) रानडे यांच्या प्रार्थना समाजाबद्दल फुल्यांना संशय होता.

      2) रानड्यांनी शेतकर्‍यांच्या परिस्थितीविषयी केलेल्या विधानांचा खरपूस समाचार फुल्यांनी घेतला.

      3) ज्या राष्ट्रसभेच्या (काँग्रेसच्या स्थापनेस रानड्यांनी हातभार लावला आणि तिच्या व्यासपीठावर सामाजिक परिषद स्थापन केली. तिच्यावरही फुल्यांनी टीका केली.

      4) रानडे यांनी मराठी ग्रंथकार संमेलन भरवले तेव्हा तर फुल्यांनी रानड्यांना पत्र लिहून आव्हान दिले.

      हे सगळे गृहीत धरूनही महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय जीवनातील रानड्यांचे स्थान अबाधित राहिले.

      * जोतिरावांना मानणार्‍या दोन महापुरुषांनी फुल्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून रानड्यांच्या मोठेपणाची पावती दिली. ते महापुरुष म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. रानड्यांची प्रशंसा करताना डॉ. आंबेडकरांना त्यांचे उदारमतवादी राजकारण अभिप्रेत होते. थोडक्यात, रानड्यांचा विचार व अनुषंगाने त्यांचे महत्त्व टाळता येत नाही.

      * लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ब्राह्मणांवर टीका करून त्यांचे दोष दाखवले असले तरी त्यांच्याकडून ज्याला भावनात्मक व संस्थात्मक कार्य फारसे होऊ शकले नाही. लोकहितवादींची ही उणीव रानड्यांनी भरून काढली. त्यांच्या एकूणच विचारांत, कार्यात नकारात्मक टीकेचा विध्वंसक भाग अभावाने आढळतो. त्यांचा सारा भर सकारात्मकतेवर होता. त्यांना समकालीन लोक पदवीधरांचा मुकुटमणी म्हणत व त्यालाच अनुलक्षण जोतिरावांनी एकदा चिडून पहिला ’दिवाभीत’ असे संबोधले कारण त्यांची तुकडी ही मुंबई विद्यापीठातील पदवीधरांची पहिली तुकडी होती.

      * प्रत्यक्ष अस्पृश्यता निवारणापर्यंत रानड्यांची मजल जाऊ शकली नाही, हे खरे असले तरी सामाजिक समस्यांना राजकीय स्वातंत्र्याइतकेच महत्त्व असते, हे काँग्रेसच्या गळी उतरवण्यात रानडे यशस्वी झाले, हे रानड्यांचे कर्तृत्व कोणीच नाकारू शकत नाही.अस्पृश्यांच्या संदर्भातही त्यांनी एक कामगिरी महत्त्वाची आहे. अस्पृश्य मानण्याला गेलेल्या महार जातींमधील योद्ध्यांच्या जिवावर पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करणार्‍या ब्रिटिशांनी हातात सत्ता आल्यानंतर सवर्णांची मर्जी राखण्यासाठी अस्पृश्यांना सैन्यात घेणे बंद केले. त्यांची भरती परत सुरू करावी, असा शेकडो सह्यांचा अर्ज सरकारकडे करण्यात अस्पृश्यांचे पुढारी गोपाळबाबा वलंगकर यांच्याबरोबर रानडे अग्रभागी होते. ब्रिटिशांनी ही मागणी तेव्हा मान्य केली नाही, पण डॉ. आंबेडकरांनाही प्रेरणा देणार्‍या घटनांपैकी ही एक घटना होती हे विसरता कामा नये. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीत सैन्यभरतीच्या मागणीचा मुद्दा वारंवार डोकावताना दिसतो. इतकेच नव्हे, तर ब्रिटिशांसाठी धारातीर्थी पडलेल्या महारवीरांना व त्यांच्या कोरेगाव भीमा येथील स्मारकाला त्यांनी अस्पृश्यांच्या अस्मितेचे प्रतीक केले.

      ’’आम्ही (म्हणजे प्रार्थना समाज) तुकारामांचेच कार्य करीत आहोत,’’ हे रानड्यांचे उद्गार लक्षात घेतल्यास त्यांच्या कार्याचे स्वरूप व पद्धत समजते. त्यांचे सहकारी सीतारामांत देवधर यांनी रानड्यांवर अभंगरचना करुन एका अभंगात त्यांनी रानड्यांच्या जीवनाचे जे सूत्र सांगितले आहे ते संत तुकोबांचेच आहे.

- डॉ. सदानंद मोरे

************

*     घटक : (8) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्ये

*     उपघटक : (12) विनायक दा. सावरकर

      गांधीजी आणि सावरकर

      थोर नेत्यांच्या भूमिका त्या त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून स्वीकारलेल्या असतात. मात्र, तिच त्यांची अंतिम भूमिका नसते. दोन महायुद्धांच्यावेळी महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिका अशाच परस्परविरोधी होत्या. गांधीजी-सावरकरांच्या बदललेल्या भूमिकांची संगती व त्यांमागचे त्यांचे समर्थन व विरोध पाहिला, की आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.

      * पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. ते सशस्त्र क्रांतिकारक होते. रक्तपात करून हिंसक मार्गाने इंग्रजांना देशातून हाकलून द्यावे व देशाला स्वतंत्र करावे, अशी त्यांची तेव्हाची धारणा होती. त्या काळात युद्धात इंग्रजांची बाजू घ्यावी किंवा इंग्रजांना मदत करावी, अशा कल्पना त्यांच्या स्वप्नातसुद्धा आली नसती.

      याउलट महात्मा गांधी त्यावेळी इंग्रजांना युद्धप्रयत्नात विनाअट सहकार्य करावे, या मताचे होते. इतकेच नव्हे, तर भारतीय तरुणांनी ब्रिटिश सैन्यात भरती होऊन जर्मनांचा सशस्त्र-हिंसक प्रतिकार करावा, असेही त्यांना वाटत होते. त्याच्याही पुढे जाऊन ते अशा सैन्यभरतीसाठी प्रचार करीत होते. गावोगावी जाऊन तरुणांना तसे आवाहन करत होते.

      * दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी गांधी व सावरकर यांच्या भूमिकांची अदलाबदल झाली. ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना विश्वासात न घेता भारताचा ब्रिटनला पाठिंबा असून, भारत ब्रिटनच्या बाजूने युद्धात उतरत आहे, असे परस्पर जाहीर केले. हे कृत्य काँग्रेस व गांधीजींना पटले नाही. त्याचा निषेध म्हणून भारतात 1935 च्या कायद्यानुसार प्रांतांत सत्तारूढ झालेल्यात काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. युद्ध प्रयत्नांमध्ये भारत कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. 1942 च्या ऑगस्ट महिन्यात इंग्रज सरकार संकटात आले, जर्मनीची सरशी होत आहे, सुभाषबाबू जपानमधून भारतावर स्वारी करून येत आहेत, अशा वातावरणात ‘चले जाव’ चळवळ सुरू केली.

      यावेळी सावरकरांनी याच्या नेमकी विरुद्ध भूमिका घेतली. हिंदू महासभेच्या वतीने त्यांनी ब्रिटिश सरकारला पूर्ण पाठिंबा व सहकार्य देऊ केले. हिंदू तरुणांनी सैन्यात भरती व्हावे, असा प्रचार ते करू लागले. काँग्रेससाठी ते टीकेस पात्र ठरले. काँग्रेसवाले त्यांना ‘रिक्रूटवीर’ म्हणून हिणवू लागले.

      सावरकरांसाठी हिंसा-अहिंसा ही समस्या केव्हाच नव्हती. त्यांनी कधीही अहिंसेचा पुरस्कार केला नव्हता, किंबहुना ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ ही त्यांची मूलभूत भूमिका होती. मुद्दा ब्रिटिशांच्या पूर्ण विरोधात असलेले सावरकर ब्रिटिशांना पूर्ण सहकार्य करायच्या भूमिकेत जातात ते का, हा एक प्रश्न आहे व त्यातील संगती कशी शोधायची हा दुसरा.

      गांधीजींच्या संदर्भात पहिल्या महायुद्धाच्या वेळीही गांधीजी हिंसेच्या विरोधातच होते. तथापि, त्यांना जर्मनांपेक्षा ब्रिटिशांची बाजू न्याय्य वाटली. दुसरं असे, की हिंसा करता येत नाही म्हणून नाइलाजाने अहिंसेचा मार्ग पत्करायचा, अशी गांधीजींची भूमिका कधीच नव्हती.

      ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांना शस्त्रे बाळगण्यास कायद्याने बंदी केली होती, त्यामुळे त्यांच्यावर आत्मसंरक्षणासाठी ब्रिटिश सरकार व पोलिसांवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती. सैन्यात भरती झाल्याने शस्त्रास्त्रे चालवण्याचे ज्ञान भारतीयांना होईल व ते आत्मरक्षण करू शकतील, अशी गांधीजींची भूमिका होती. विशेष म्हणजे गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाचा अंगीकार करूनही काँग्रेसच्या बहुतेक अधिवेशनांमध्ये ब्रिटिश सरकारने शस्त्रबंदी उठवावी, हा ठराव हमखास मान्य करून घेण्यात येत असे. गांधीजींच्या लष्करभरतीच्या आवाहनाला गुजरातमध्ये प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे गांधीजींना तात्कालिक नैराश्य येऊन त्यांची प्रकृतीही बिघडली. गुजराती लोक सैन्यात जात नाहीत म्हणून वैष्णव पंथाला जबाबदार धरून तशी टीकाही केली.

      * 1909 मध्ये तुरुंगात गेलेले सावरकर हिंदुत्ववादी झालेले नव्हते. पहिले महायुद्ध सुरू होऊन संपेपर्यंत ते अंदमानच्या तुरुंगात असल्यामुळे त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा न द्यायचा प्रश्नच नव्हता. दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा सावरकर अंदमानातून सुटलेले होते, शिवाय त्यांच्यावरील निर्बंध दूर होऊन ते राजकीय कृती करण्यास स्वतंत्र होते. अंदमानातल्या काळात ते पूर्णपणे हिंदुत्ववादी बनून तुरुंगातून बाहेर पडले होते. दुसर्‍या महायुद्धावेळी हिंदू तरुणांनी लष्करात दाखल होऊन युद्धकौशल्य आत्मसात करावे, हा त्यांच्या भूमिकेचा एक महत्त्वाचा पदर होता.

- डॉ. सदानंद मोरे  

११ जून २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ :  विभाग पहिला : इतिहास

*     घटक : (8) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्ये

*     उपघटक : (1) गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर

      गोपाळ गणेश आगरकर

      * जातिभेदामुळे आपल्या समाजाची अवनीती झाली हे ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर सांगतात. ते म्हणतात की, ’’एकीकडे काँग्रेसचे अधिवेशन लंडनमध्ये भरवण्याचे बेत करायचे आणि दुसरीकडे स्वदेशातील स्वधर्मीय शूद्रांना विषमतेची वागणूक द्यायची हा दुटप्पीपणा आता चालणार नाही.’’ ते पुढे म्हणतात, ’’शहाणे असाल तर आमचे ऐका. यावर तुमचे ते सोवळे तुम्हास खुंटीवरच टांगून ठेवले पाहिजे. सोवळे-ओवळे व तद्विषयक मूढ कल्पना यांचे साम्राज्य होते, तेव्हा ब्राम्हणांनी वाटेल तसा जुलूम केला. ब्राह्मणास श्रेष्ठपद दिले व शूद्रास नीच ठरवले. खर्‍या ज्ञानाचा लोप केला व घोकंपट्टीस उत्तेजन दिले. धर्मविचारांची व मनाची फारकत करून टाकली व त्यांचे रहस्य शरीराच्या बाह्य कवायतीत आणून सोडले. आता यापुढेही अविचाराची बेबंद पातशाही चालणार नाही.’’

      सार्वजनिक हौदावर पाणी भरायच्या निमित्ताने आगरकर असे लिहिण्यास प्रवृत्त झाले असले आणि ब्रिटिशांकडे स्वराज्य मागावयाचे झाल्याला आपण आपली पात्रता सिद्ध करण्याचा, देशबांधवांना समान वागणूक देणे हा एक भाग असला, तरी आगरकरांची भूमिका प्रासंगिक तडजोडीची वा संधीसाधुपणाची नाही याची नोंद घ्यायला हवी.

      सर्व मानव प्राणी जन्मतः सारख्या योग्यतेचे अधिकारी असून, त्यांचे हक्कही एकसारखे असतात व ती योग्यता व ते हक्क त्यांच्याकडे राहणे हे केवळ त्यांच्या कमी-अधिक बुद्धिविकासावर व उद्योगशीलतेवर अवलंबून आहे? या सूत्राला ते सुधारणेचे श्रेष्ठ तत्त्व म्हणतात व त्याची अंमलबजावणी जगात सर्वत्र होत असल्याचे निदर्शनास आणतात. त्याचबरोबर हिंदुस्थानात अद्याप अज्ञानमूलक किंवा अभिमानप्रेरित वैषम्यकल्पनांची पुटे बसत चाललेली आहेत हे सांगायला विसरत नाहीत. त्यामुळे कालगतीने जातिभेदकल्पनावृक्षाचा आज येथे इतका काही विलक्षण विस्तार होऊन गेला आहे व त्याची मुळे इतकी काही खोल गेली आहेत, की त्याचे समूळ छेदन करणे एका सुधारकासच काय, परंतु सुधारकसहस्त्रांच्या कंपनीसही भारी व जोखमीचे वाटेल तर नवल नाही.

      श्रेष्ठ नीतितत्त्वाचा भाग बाजूला ठेवला व व्यावहारिक विचार केला तरी काय दिसते? आगरकर लिहितात, कोणत्याही देशाचे कोणत्याही बाबतीत पुढे पाऊल पडण्यास त्या देशातील लोकांमध्ये परस्पर प्रेमभाव असला पाहिजे व तो एकमताने व एकदिलाने वागण्यास तयार असले पाहिजेत, याबाबत कोणाचे मतभेद नाही, परंतु हा स्नेहभाव राहण्यास व एकमत उत्पन्न होण्यास जातिभेद आडवा येतो ही गोष्ट मात्र कबूल करण्याचे अनेकांच्या जीवावर येते. जातिभेद आपल्या अवनीतीचे एक कारण आहे, अशी त्यांची मनातून खात्री झाली नसते असे नाही, परंतु ती झाली आहे असे कबूल केल्यास त्याबरोबर आपल्या आचरणाची दिशा बदलण्याची जी जोखीम त्यांच्यावर येऊन पडते, ते त्यास पूर्वसंस्कारांमुळे अवजड वाटू लागते. त्यामुळे जातिभेदाची संस्था घातक नाही असे सिद्ध करण्याचा ते ओढून-ताणून प्रयत्न करू लागतात.’’

      हे सर्व लेखन करताना आगरकरांच्या नजरेसमोर जोतिराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाने उभारलेल्या बंडाचे निशाण फडफडत असणार. जोतिराव व त्यांचा समाज काँग्रेसच्या स्वराज्य संपादनाच्या प्रयत्नांकडे संशयाने पाहत होते व त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवत होते. वेदादि धर्मग्रंथांमधील उच्चनीचतेच्या कल्पनांना आव्हान देत होते हे नजरेसमोरचे वास्तव नाकारणे ही आत्मवंचना ठरली असती. पण स्वराज्याच्या प्रयत्नात सहकार्य करणे दूरची गोष्ट, ही मंडळी धर्मात राहिली तरी पुष्कळ असे वाटण्याइतकी परिस्थिती गंभीर होती आणि ते या सनातनी कर्मठांना कळत नव्हते याची आगरकरांना खंत आहे.

      त्या काळात अनेक अस्पृश्र्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. पण अद्याप त्याची लागण शूद्रांना म्हणजे स्पृश्य ब्राह्मणेतरांना झाली नव्हती. तेव्हा निदान आता तरी जागे व्हा आणि भूतकाळातील चुकांची दुरुस्ती करा असे आगरकर आपल्या ज्ञातिबांधवांना कळकळीने विनवतात. शूद्रांना अतिशूद्रांइतके वाईट वागवले जात नाही हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचा आधार घेऊन ते सांगतात, की शूद्रादिकासंबंधाने आमचा कर्मठपणा बहुतेक यापूर्वी चेपून गेलेला आहे. तोच जरा अधिक चेपण्यास आम्ही तयार झालो व हल्ली असलेले परस्परांतील वैषम्य आम्ही अंशतः तरी कमी करण्याचा निश्चय केला, तर या वर्गाकडून होणार्‍या बंडाचे परिणाम आम्हास फारसे भोवणार नाहीत. तेव्हा सध्याच्या वस्तुस्थितीकडे लक्ष देऊन आमचे लोक हे वैषम्य वाढविण्याच्या घातक प्रयत्नास लागणार नाहीत अशी आम्ही आशा करतो.’’

      मात्र आगरकरांचा हा आशावाद पुढे अरण्यरुदन ठरला असेच इतिहास सांगतो. त्याचा परिणाम म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक तेढ.

      * आगरकरांच्या समाजसुधारणांची व्याप्ती उच्चवर्णियांच्या कौटुंबिक सुधारणांपुरती असल्याचा आक्षेप नेहमी घेण्यात येतो. पण त्याचा अर्थ त्यांना समाजातील खालच्या थरांतील लोकांविषयी, त्यांच्या रास्त हक्कांविषयी काही कर्तव्य नसते असा होत नाही. ब्राह्मणांनी जातिभेदाच्या आहारी जाऊन खालच्या जातींच्या लोकांना वाईट वागणूक देऊ नये असा उपदेश करताना ते लिहितात, ’’कोणी म्हणेल की, हा जातिभेद काही आजचा अस्तित्वात आला नाही. हा अनेक शतके असाच चालू आहे, असे असून, आजच शूद्र वर्गात असंतोष का उत्पन्न व्हावा?’’

      या प्रश्नाचे उत्तर स्वतः आगरकर देतात - ’’याचे कारण इतकेच की आजपर्यंत त्यास अज्ञानावस्थेत ठेवण्याची खबरदारी घेतली गेली असल्यामुळे त्यास आपल्या अवनीतीचे मुळीच ज्ञान झाले नव्हते व त्याबद्दल विषाद मानण्याचेही त्यास कारण नव्हते. परंतु इंग्रजी अंमलाने त्यास ज्ञानाची द्वारे खुली होऊन त्यांचे डोळे उघडले असल्यामुळे ब्राह्मणांस भूदेव मानून त्यांची सेवा करणे हाच तुमचा धर्म आहे, हा उपदेश यापुढे अर्थातच त्यास मानवणार नाही व ते ब्राह्मणांच्या भूदेवत्वाविरुद्ध बंड केल्यावाचून कधीही राहणार नाहीत.’’

      पण मुद्दा भविष्यकालीन घडामोडींचा नव्हता. ती प्रक्रिया जोतिरावांनी आधीच सुरू केली होती. तिचा संदर्भ देऊन आगरकर पुढे लिहितात. ’’या बंडास यापूर्वीच सुरवात झालेली आहे. परंतु या वर्गात विद्येचा विशेष प्रसार झाला नसल्यामुळे त्याचे पूर्ण स्वरूप अजून भासू लागले नाही. विद्येचा जसजसा अधिक प्रसार होत जाईल, तसतसे शूद्रादी वर्गास हल्लीची वैषम्यावस्था अधिकाधिक टोचू लागून ते नाहीसे करण्यास ते जारीने प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. हौदावरून ब्राह्मणादिकांची जी आज अवहेलना होते, ती या भावी बंडाचीच सूचक होय.’’

      सामाजिक व धार्मिक मुद्याची राजकीय निष्पत्ती आगरकरांच्या ध्यानात आल्यावाचून राहिली नाही. ते असेही लिहितात की, ’’राष्ट्रसभेसारख्या हितकारी संस्थेविषयी या लोकांच्या मनात द्वैतभाव उत्पन्न होऊ लागला आहे व ते कदाचित काही मुसलमान, पारशी वगैरे लोकांप्रमाणे विघ्नसंतोषीपणा करतात की काय अशीही भीती वाटू लागली आहे. म्हणून देशकालवर्तमानाकडे नजर ठेवून परदेशस्थ म्लेच्छांशी व्यवहार करण्यास जसे आमचे लोक नाखुषीने का होईना - हळूहळू कबूल होत आहेत, त्याचप्रमाणे त्याच कारणाकरिता येथेही ब्राह्मणशुद्रातील वैषम्य होईल तितके कमी करण्यास त्यांनी मनाचा हिय्या केला पाहिजे.’’

      शूद्रांबरोबर अशाप्रकारचा समतेचा व्यवहार करण्यात पाप आहे, ही कल्पना धर्मशास्त्राचा आधार घेऊन कित्येक शतके उच्च वर्णीयांच्या मनात वास्तव्य करून होती. मिल स्पेन्सरच्या विचारांचे संस्कार झालेल्या बुद्धिनिष्ठ आगरकरांना ती पटणे शक्य नव्हते. तथापि लोकांवर तिचा प्रभाव असल्याचे वास्तवही त्यांना ठाऊक होते. त्यानुसार ते पुढे सांगतात, आमच्या समजुतीप्रमाणे आम्ही त्यास पापाचरण करण्यास सांगत नाही. परंतु त्यात पाप आहे अशी त्यांची अद्याप समजूत असेल, तथापि, ’सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्याजति पंडितः’ या न्यायाने त्यांनी आपले आचरण ठेवले पाहिजे.’’

      आगरकर या संदर्भात आणखी एका कटू गोष्टीची आठवणवजा जाणीव करून देतात - आमच्या या अति कर्मठपणामुळे आमचा अतिशूद्रवर्ग तर आम्ही गमावल्यासारखाच आहे. त्यापैकी बहुतेक लोकांनी आम्हाला यापूर्वीच रामराम ठोकला आहे व राहिलेल्यासही हात द्यायला मिशनरी वर्ग तयार आहेच.

      शूद्रांचा प्रश्न चर्चेला घ्यायची गरज आगरकरांना भासावी याचे एक तात्कालिक कारण म्हणजे नळावरचे भांडण. अहमदनगर येथे म्युनिसिपालिटीच्या सार्वजनिक हौदावर मुसलमानांची पहिल्यापासूनच पाणी भरण्याची जुनीच वहिवाट होती. तेथे पूर्वीच्या काळी मुसलमानांचे राज्य होते व त्यांचे संख्याबाहुल्यही प्रभावी होते म्हणूनही असेल. मधल्या काळात धर्मांतरित ख्रिस्ती लोक पाणी भरू लागले तेव्हा ब्राह्मण त्यांच्या विरोधात न्यायालयात गेले. न्यायालयाने ख्रिस्ती लोकांच्या बाजूने निर्णय दिला. आगरकर या बाबतीत ब्राह्मणांना कानपिचक्या देतात. उद्या असाच तंटा ब्राह्मण व नवजागृत शूद्र यांच्या दरम्यान उपस्थित झाला व ब्राह्मणांनी न्यायालयात तक्रार केली, तर न्यायालय शूद्रांच्या बाजूने निर्णय देईल याची जाणीवही ते करून देतात.

- डॉ. सदानंद मोरे 

१० जून २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ :  विभाग पहिला : इतिहास

*     घटक : (3) सामाजिक-सांस्कृतिक बदल  

*     उपघटक : (2) अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय, सामाजिक

       धार्मिक सुधारणांच्या चळवळी समाजसुधारक आणि त्यांच्या मर्यादा

      लोकहितवादी फुले, आगरकर, आंबेडकर अशा महापुरुषांचे लेखन वाचताना एका गोष्टीची नेहमीच खंत वाटते. त्यांच्या अंगची पात्रता व तळमळ या दोन गोष्टींचा विचार केला असता, ते संपूर्ण समाजाचे नेतृत्व करण्यास पात्र व सक्षम होते. तथापि, या देशात कोणालाही जन्म घेताना, येथील समाजव्यवस्थेमुळे विशिष्ट जातीतच घ्यावा लागतो. त्यामुळे त्याची इच्छा असो वा नसो, पण त्या जातीत जन्माला आल्याचे फायदे-तोटे त्याच्या वाट्याला येतात. जात हे त्याच्या अस्तित्वाचे जणू पहिले पर्यावरण बनते. त्याच्यावर जातीचे संस्कार केले जातात. त्यामुळे त्याला जातीच्या चौकटीत अनुभवाला सामोरे जाण्याची आणि विचार करण्याची जणू सवय लागते. हे सर्व नैसर्गिक स्वाभाविक असून, ते असेच चालायचे असे त्याला वाटू लागते. जातीमुळे त्यात जणू संरक्षक कवचकुंडले लाभलेली असतात व असुरक्षिततेच्या भावनेपोटी तो त्यांचा त्याग करायला धजावत नाही. इतर जातींमधील व्यक्तींकडे तो संशयाने पाहू लागतो, इतकेच काय तर त्या आपल्या छुप्या, संभाव्य शत्रू आहेत अशी जाणीवही त्याच्या मनात मूळ धरू लागते.

      दुसरे असे, की आर्थिकदृष्ट्या पाहता जातिव्यवस्था ही मुळात समाजाची आर्थिक व्यवस्था असल्यामुळे प्रत्येक जातीचा स्वतःचा असा एखादा विशिष्ट व्यवसाय असे. ते कर्म त्याच जातीने करायचे, अन्य जातीने नाही, अशी काटेकोर मर्यादा जातिव्यवस्था बळकट असेपर्यंत पाळली जायची. त्यामुळे एक जातीच्या मनात दुसर्‍या जातीबद्दल तिरस्कार, हेवा असला तरी जातीजातींमध्ये स्पर्धा असायचे कारण नाही, ही बंधने शिथिल झाली, तेव्हा एकमेकांवर व्यावसायिक आक्रमणे होऊ लागली व त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यात स्पर्धाही होऊ लागली! खरे तर ही जातिव्यवस्था मोडण्याच्या प्रक्रियेची सुरवात होती. यामुळे या व्यवस्थेचा पायाच उखडणार होता, पण त्यामुळेच व्यक्तींना त्यांच्या जातीमुळे मिळणारे एक संरक्षक कवच निखळून पडणार होते.

      थोडक्यात सांगायचे झाल्यास जातिव्यवस्था नको असे ज्यांना वाटते, त्यांच्यापैकी बहुतेकांना त्यांच्या स्वतःच्या जातीमुळे होणारे तोटे नको असतात, परंतु फायदे सोडायची त्यांची तयारी नसते!

      जातिव्यवस्थेचा आणि नेतृत्वाचाही संबंध असतोच. स्वजातीचा नेता हा अधिक विश्वसनीय व म्हणून स्वीकारार्ह वाटतो. त्याच्याशी संवाद होऊ शकतो. त्याला स्वजातीयांची सुख-दुःखे कळू शकतात. त्यांच्या इच्छा-आकांक्षाही, भावभावनांशी तो एकरूप होऊ शकतो. नेत्याच्या दृष्टीनेही त्याच्या जातीची माणसे त्याची हक्काचे अनुयायी असतात.

      या सर्व गोष्टींचे सार तुकारामांच्या अभंगातील एक म्हणीने सांगता येते - जातीसाठी माती खाणे.

      या नेत्यांना आपला व्यापकपणा बाजूला ठेवून त्यांच्या त्यांच्या जातीपुरते मर्यादित राहून त्या जातींचे नेतृत्व करावे लागले. भले त्यांचे म्हणणे सर्वांसाठी असले, तरी इतर जातींचे लोक ते ऐकून घेतील याची खात्री नाही आणि स्वजातीचे लोकसुद्धा, त्यात स्वजातीचे आत्मपरीक्षण व आत्मटीका असली तर त्यांची संभावना कुर्‍हाडीचा दांडा अशीच करणार!

      ही परिस्थिती आजसुद्धा पूर्णपणे बदललेली नाही. आपल्या जातीवर टीका करणारा माणूस परजातीचा असेल, तर तो स्वाभाविक शत्रू आणि चुकूनमाकून स्वजातीचा असेल तर ज्ञातीद्रोही हे समीकरण तेव्हा रूढ होते. ब्राह्मणांच्या लेखी जोतिराव फुले हे ब्रह्मद्वेष्टे तर लोकहितवादी किंवा आगरकर स्वजातशत्रू, तर बहुजनांच्या चष्म्यातून चिपळूणकर शत्रू व वि. रा. शिंदे आपले’ नाहीत. जातिव्यवस्थेने महापुरुषांनाही मर्यादित केले.

      परिस्थितीच्या मर्यादांमुळे आगरकरांना अनेकवेळा आपला श्रोतृवर्ग किंवा वाचकवर्ग स्वज्ञातीयांपुरता मर्यादित करून त्यांना उद्देशून लिहावे लागत असे. अर्थात अशा लिखाणातूनही त्यांचा रोख या लोकांवर प्रसंगी टीका करून, प्रसंगी त्यांना चुचकारून, प्रसंगी इशारा देऊन त्यांना परिवर्तनसन्मुख करण्याकडे होता.

      त्या त्या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या जातींना उद्देशून लिहावे लागत असले, तरी त्या लेखनातून त्यांचे एकूण समाजाबद्दल आणि समाजसुधारणांबद्दल मत काय होते हे जाणून घेणे अभ्यासकांसाठी अवघड नाही. त्यानुसार फुले आणि आगरकर हे दोघेही समतावादीच होते. त्यांच्यात काही फरक असेल तर तो प्रमाणाचाच होता व त्याचेही कारण आगरकरांपुढील लक्ष्य श्रोतृ समुदाय आणि पूर्वसंस्कार.

      आगरकरांना एकूणच समाज अभिप्रेत होता, हे दाखवणारे अनेक लेख उपलब्ध आहेत. किंबहुना, समाजजीवनाचे असे एकही अंग नाही, की ज्याची दखल आगरकरांची घेतली नाही. पुरुषांचा व बायकांचा पोषाख, अंत्यसंस्कार, गर्भाधान, स्वच्छता, इतकेच काय पादत्राणांसंबंधीही त्यांनी विचार केला आहे. हे लेखन एकतर्फी होऊ नये, याची त्यांनी दखल घेतलेली दिसून येते. योग्य अशा जोडप्यांचा आराखडा करणे किंवा तो बनवणे यासाठी त्यांची ‘सुधारक’ पत्रातून जाहिरात देऊन स्पर्धाही आयोजित केली होती.

      समाजसुधारणांचे किंवा एकूणच सामाजिक कार्याचे क्षेत्र इतके व्यापक आहे, की कोणालाही सर्वच्या सर्व समस्या एकाच वेळी हाताळणे व्यवहारातः शक्य नसते. निवड करावीच लागते. प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो, तो करताना कोणच्या सूत्राला धरून केला जातो हे महत्त्वाचे असते. काही लोक फक्त आपल्या जातीपुरताच विचार करतात. जातीच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. अर्थात असे हितसंबंध न्याय्य आणि रास्त असतील, तर त्यावर आक्षेप घ्यायचे काही कारण नाही. मात्र आपल्या जातीचे वर्चस्व प्रस्थापित करून इतर जातींचे शोषण करणे, हा जर त्यांचा हेतू असेल तर अशा कार्याला सामाजिक कार्य कोणी म्हणणारही नाही. आपल्या किंवा कोणत्याही जातीवर अन्याय होत असेल, तर तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणे समर्थनीयच आहे. कारण अंतिमतः ते समतेकडे घेऊन जाणारे आहे, पण एका जातीचे वर्चस्व काढून दुसर्‍या जातीच्या वर्चस्वाची स्थापना कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. कारण त्यातून विषमता कायम राहणार आहे. आगरकरांनी जरी ब्राह्मणांना उद्देशून लिखाण केले, तरी त्यात त्यांचा उद्देश ब्राह्मण्यांना सुधारून त्यांचे सामर्थ्य वाढवून त्यांचे वर्चस्व चिरंजीव करणे हा नव्हता.

      आगरकरांच्या सुधारणांमागील सूत्र विवेकनिष्ठ सुखी समाजाची निर्मिती हेच होते. विषम समाज सुखी असणार नाही हे उघड आहे. कारण विषम समाजात एक गट बलिष्ठ, दुसरा दुर्बल अशीच परिस्थिती असणार व त्यामुळे त्यांच्यात बलिष्ठांकडून दुर्बलांचे शोषण व दुर्बलांवरील अन्याय चालूच राहणार. समताधिष्ठित समाजात असे होणार नाही.

      पाश्चात्त्य सुखवादी उपयुक्ततावादी व उदारमतवादी परंपरेचे संस्कार स्वतःवर करून घेतलेले आगरकर हे व्यक्तिवादी होते. या मुद्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले पाहिजे. या विचारसरणीत व्यक्तीला घटक मानून विचार केला जातो. ही व्यक्तिवादी विचारसरणी भांडवलशाहीच्या विकासाच्या प्रक्रियेचा एक अटल भाग म्हणून उदयास आली.

      भांडवलशाही ही खुल्या स्पर्धेवर आधारित असलेली समाजरचना होती. राजसत्ता आणि धर्मसत्ता (युरोपमध्ये ख्रिस्ती चर्च) यांचे वर्चस्व असेल, त्यांच्याकडून व्यक्तीच्या हालचालींवर, कर्मावर, स्वातंत्र्यावर निर्बंध आणले जात असतील, तर भांडवलशाहीचा उदय अशक्य होईल. म्हणून आधीच्या दोन्ही सत्तांशी टक्कर देतच भांडवलशाहीचा उदय झाला, पण ही टक्कर देताना तिचा तात्त्विक आधार म्हणून भांडवलशाहीला उदारमतवादी विचारसरणीचा आश्रय घ्यावा लागला. व्यक्तिवाद हेच भांडवशाहीचे समर्थन आहे. उदाहरण द्यायचे असेल, तर व्यक्तीने आपल्या श्रमातून निर्माण केलेल्या संपत्तीवर व्यक्तीचीच मालकी स्वामित्व हवी, तो तिच्या व्यक्तित्त्वाचाच हिस्सा आहे. ना राजसत्ता तिच्यावर दावा करू शकते ना धर्मसत्ता. हा जॉन लॉकचा सिद्धांत उदारमतवादी असून, तो भांडवलशाहीला पोषक ठरला. ही विचारसरणी सरकार म्हणजेच राज्यसंस्था आवश्र्यक मानते. ती पण तिला अभिप्रेत असलेली राज्यसंस्था ही व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण करणारी आहे, संकोच करणारी नाही.

      अशा प्रकारचे व्यक्तिवादी तत्त्वज्ञान भारतातील लोकांना एकदम परके होते. भारतात भांडवलशाही व्यवस्थाच अस्तित्वात नव्हती हे त्याचे एक कारण, पण हे कारण अभावात्मक झाले. त्याचे भावात्मक कारण म्हणजे येथील जातिव्यवस्था.

      जातिव्यवस्थेवर आधारलेल्या समाजात व्यक्तीची ’व्यक्ती’ अशी स्वतंत्र ओळखच नसते. ती कोणत्या जातीची याला अधिक महत्त्व दिले जाते. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती महाज्ञानी असली व ती शूद्र असेल, तर तिच्या ज्ञानाला किंमत राहात नाही. याच कारणाने तुकोबांचे कवित्व तत्कालीन कर्मठांनी बुडवले किंवा याच कारणामुळे ब्रह्मज्ञानी असलेला विदुर धृतराष्ट्राला ब्रह्मज्ञान सांगू शकला नाही. ब्रह्मज्ञान सांगायचा अधिकार शूद्र असल्यामुळे विदुराला नव्हता, पण याचाच अर्थ असा होतो, की विदुराच्या व्यक्ती म्हणून असलेल्या ओळखीपेक्षा ’जात’ म्हणून असलेली ओळख अधिक प्रबळ होती व याच ओळखीवर समाजरचना आधारित होती.

      या मुद्याचे महत्त्व, व्यक्ती जितक्या खालच्या जातीतील तिला अधिक समजणार. कारण तो तिच्या अनुभवाचा भाग असतो. ते आंबेडकरांना सर्वांत अधिक समजणार, त्यांच्यानंतर ते फुल्यांना समजणार. आगारकरांना ते समजण्याची शक्यता कमी. त्यात आगरकरांचा काहीच दोष नाही, हे लक्षात घ्यायला हवे. ’व्यक्ती’ या नात्याने वावरणे, वर्तणे हे ब्राह्मणांसाठी इतर कोणत्याही जातीच्या व्यक्तीपेक्षा अधिक सोपे होते. त्यांच्यावर जे निर्बंध होते, ते त्यांच्या व्यक्तित्वावर ज्या मर्यादा होत्या, त्या ब्राह्मण जात्यंतर्गत होत्या. त्यांचे उल्लंघन करणे फार अवघड नव्हते. त्याला विरोध झाला असता तर तो फक्त ब्राह्मणांकडूनच.

      फुले-आंबेडकरांच्या संदर्भात हा विरोध अधिक तीव्र होता. तो एकूणच व्यवस्थेचा विरोध होता! फुल्यांनी जातिनिर्बंध झुगारले. याचा राग ब्राह्मणांना येणार यात विशेष काही नाही, पण तो फुल्यांच्या भाऊबंदांनाही आला. कारण ते भाऊबंद व्यवस्थेचा भाग होता. अज्ञानापोटी का होईना त्यांनी फुल्यांना विरोध केला. हा विरोध करताना ते ’व्यक्ती’ म्हणून वावरत नव्हते, तर समाजव्यवस्थेचा घटक म्हणून वावरत होते. जी व्यवस्थाच तोडायला फुले सिद्ध झाले होते. - डॉ. सदानंद मोरे

                                                                                      ************ 

*     घटक : (4) सामाजिक व आर्थिक जागृती

*     उपघटक : (4) महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका

      लोकहितवादी

      लोकहितवादी यांचा स्वतंत्र असा संप्रदाय नव्हता, तसेच अनुयायीवर्गही नव्हता. त्यांनी नवी चळवळही उभारली नाही. तथापि त्यांनी पारंपरिक धार्मिक समजुती, रुढी, प्रथा, परंपरा आणि मुख्य म्हणजे समकालीन कर्मठ ब्राह्मण यांच्यावर जी टीका केली त्यामुळे फुले, रानडे, आगरकर या सुधारकांसाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली.

      स्वतः जातीने ब्राह्मण असूनही लोकहितवादींनी ब्राह्मणांवर टीका केली होती. लोकहितवादी संपूर्ण समाजाच्या हिताची चिंता करणारे होते. ब्राह्मणांवर टीका करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणली, की ते हिंदू समाजाचे स्वाभाविक नेते असल्यामुळे त्यांच्यामार्फत इतरांची सुधारणा होईल, अशी लोकहितवादींची प्रामाणिक समजूत होती. त्यांच्या लेखी ब्राह्मणांचे नेतृत्व म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व नव्हते. दुसरे असे, की ब्राह्मणांच्या विशिष्ट वागणुकीमुळे, ते सर्व समाजाचे पुढारी असल्याने, सर्वांचे नुकसान झाले व होत आहे. तसेच स्वतः ब्राह्मणांचेही त्यात नुकसान आहे. लोकहितवादी ब्राह्मणांच्या वर्तनाकडे मूर्खपणाचा प्रकार म्हणून सहानुभूतीने पाहतात.

      विष्णुशास्त्री चिपळूणकर

      विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली व त्यांनी आपापली कार्यक्षेत्रे निवडून त्यात महत्त्वाचं योगदान दिलं. जिला ब्राह्मणेतर पत्रकारिता संबोधण्यात येते तिची सुरवातसुद्धा बाह्मणेतर मंडळींना चिपळूणकर यांनी उचकवल्यामुळे झाली.

      वि. का. राजवाडे यांचे स्वतःचे प्रेरणास्थान चिपळूणकर होते. राजवाडे चिपळूणकरांना ‘महात्मा’ म्हणत व टिळकांपेक्षाही श्रेष्ठ मानीत. चिपळूणकरकालीन सुशिक्षित उच्चवर्णीयांवर इंग्रजी भाषेची विलक्षण पकड होती. मराठीचा वापर करण्यात त्यांना कमीपणा वाटत असे. चिपळूणकरांनी त्यांना मराठी भाषेची महती पटवून दिली व या पकडीतून सोडवले. खुद्द राजवाडे यांनाही इंग्रजीत विचार करायची व लिहायची ‘दुष्ट खोड’ लागली होती. ती केवळ चिपळूणकरांच्या निबंधमालेमुळे सुटली. 1925 साली राजवाडे यांचे निधन झाले.

      महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे चिपळूणकरांची प्रभा आणि प्रभावळ अस्तंगत होऊ लागली. फुले-शाहू यांचे अनुयायी असलेले ब्राह्मणेतरही गांधीजींच्या मागं जाऊ लागले. टिळकांच्या बरोबरीने काम केलेले ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे, चित्रशाळेचे वासुकाका जोशी यांनीही तोच मार्ग चोखाळला. तरीही चिपळूणकरांचा प्रभाव पूर्णपणाने ओसरला असे म्हणता येत नाही. कारण तोपर्यंत चिपळूणकरांनी मराठी भाषेचा एक नवा नमुना घडवला होता. त्यामुळे चिपळूणकर किंवा त्यांच्या अनुयायांच्या विचारांवर टीका करायची झाली, तरी त्यासाठी ‘चिपळूणकरी नमुन्याची’ भाषा वापरायची अशी स्थिती होती. समाज जीवनामध्ये अशा विसंगती ठायीठायी दिसून येतात.

      गोपाळ कृष्ण गोखले

      टिळकांच्या गोटातून फुटून आगरकर उघडपणे रानड्यांच्या छावणीत दाखल झाले तेव्हा त्यांच्याबरोबर आणखी एक महत्वाचे नेते होते, ते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधील अंतर्गत संघर्षात गोपाळराव टिळकांच्या विरुद्ध म्हणजे आगरकर यांच्या पक्षात होते. आगरकरांनी ’केसरी’चा राजीनामा देऊन आपले स्वतंत्र ’सुधारक’ पत्र सुरू केले तेव्हा गोखले आगरकरांबरोबर होते.

      1 ऑगस्ट 1888 या दिवशी निघालेल्या ’सुधारकांच्या’ जाहीरपत्रात दोन व्यक्तींच्या सह्या होत्या. त्या म्हणजे स्वतः आगरकर आणि गोखले. याचा अर्थ असा होतो की आगरकरांची सामाजिक मते गोखल्यांना मान्य होती. अर्थात, गोखले हे आगरकरांप्रमाणे निरीश्वरवादी/अज्ञेयवादी नव्हते. ते दत्तोपासक असून, धर्माची आवश्यकता मानणार्‍यांपैकी होते. नंतरच्या काळात त्यांनी सामाजिक सुधारणांकडील लक्ष पूर्णपणे काढून घेऊन ते राजकारणाकडे वळविले. याबाबतीत तरी टिळकांचा कित्ता गिरवला. समाजसुधारणांना आधारभूत असलेल्या एका गोष्टीचा ते आयुष्यभर पाठपुरावा करीत राहिले. ती म्हणजे सक्तीचे प्राथमिक शिक्षण. याच गोष्टीला खुद्द जोतिरावांनीही केंद्रस्थानी ठेवले होते.

      * आगरकरांच्या अपमृत्यूनंतर सुधारणावादी पक्षाला मोठा हादरा बसला, पण तरीही सुधारणांचे काम थंडावले नाही. सुधारक बंद पडले नाही. वा. ब. पटवर्धन, सी. ग. देवधर अशा मातब्बरांनी ते चालवले. आगरकर स्वतः देव व धर्म मानीत असोत किंवा नसोत. त्यांनी वृत्ती व वर्तन एखाद्या संताला साजेशी होती, असे गृहीत धरून प्रा. म. दा. आळतेकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.

      * सुधारणा पक्षाला सर्वांत मोठा धक्का बसला ते 1902 मध्ये स्वतः न्या. रानडे यांच्या मृत्यूमुळे. रानडे यांच्या मृत्यूनंतर एका बाजूने टिळकांचा वाढता प्रभाव व दुसर्‍या बाजूने गोखल्यांचे पूर्ण वेळ राजकारण करणे यामुळे उच्चवर्गीयांमधील सुधारणांविषयीची जागृती कमी झाली व ते बहुधा राजकारणाकडे वळाले. यातून उद्भवलेल्या पोकळीतून ब्राह्मणेतर चळवळीचा उदय झाला. आधी स्वातंत्र्य मिळवू, सुधारणांचे नंतर पाहता येईल, ही टिळकांची भूमिका समाजातील बहुसंख्य लोकांना पटण्यासारखी होती. रानडे आगरकरांच्या छावणीला टिळकांना टक्कर देऊ शकेल असा तोलामोलाचा माणूस उरला नाही. गोखल्यांनी राजकारणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तर हा पक्ष अगदीच कमकुवत झाला.

                                                                    ************ 

*     घटक : (6) गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ

*     उपघटक : (5) हिंदू महासभेचे राजकारण

      हिंदुत्ववादी संघटनांची बलोपासना

      महाराष्ट्राला मल्लविद्येची परंपरा आहे. पश्चिम बंगालमधल्या क्रांतिकारकांनी तिची माहिती इथे येऊन घेतली. भारतीय मल्लविद्येला वळण देणारे, विशेषतः मल्लखांब रुजवणारे म्हणून बाळंभटदादा देवधर यांचे नाव घेतले जाते. दुसरा बाजीराव पेशवे यांच्याबरोबर ब्रह्मावर्त ऊर्फ बिठूर इथे गेलेल्या बाळंभटदादांनी देशभर दौरा करून मल्लखांबाचा प्रसार केला.

       स्वातंत्र्यपूर्व भारतीय राजकारणातले दोन ध्रुव कोणते, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचे निःसंशय आणि निःसंदिग्ध उत्तर आहे महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. मुख्य मुद्दा हिंसा-अहिंसा आणि अनुषंगाने प्रत्यक्ष व्यवहारातल्या शारीरिक बळाचा आणि शस्त्रांचा वापर हा आहे.

      वादविवादात आणि राजकारणात प्रतिपक्षाच्या मतांची आपणाला अनुकूल अशी अतिशयोक्त मांडणी करून तिचे खंडण करणे हा प्रकार सार्वत्रिक आहे. गांधीजींच्या बाबतीत हा प्रकार नेहमीच घडलेला दिसून येतो आणि त्यात हिंदुत्वनिष्ठ लोक अग्रेसर असायचे. पुण्यातील ‘भाला’ नावाचे पत्र चालवणारे भास्करराव भोपटकर यांचे नाव या संदर्भात अपरिहार्य ठरते. भोपटकरांच्या भाषणाला लोक तुडुंब गर्दी करीत. विनोदाचे हत्यार वापरून, शाब्दिक कोट्या करून श्रोत्यांना गुंगवून टाकण्यात ‘भाला’कार वस्ताद होते.

      ‘लेंगे स्वराज्य लेंगे, चरखा चला चला के’ हे अहिंसक काँग्रेसवाल्यांचे तेव्हाचे घोषवाक्य होते. त्यावर भोपटकर ‘लेंगे स्वराज्य लेंगे खारका चबाचबाके’ असे म्हणत. ‘खारीक’ हा शब्द पौष्टिक खुराकाचे प्रतीक असा सांकेतिक घ्यायचा. खुराक म्हटल्यावर व्यायाम आलाच. इंग्रजांना पराभूत करायचे असेल तर बलोपासना करायला हवी. शरीर कमवायला हवे. ठोशास ठोसा देता यायला हवा. ते गांधीवादी दुर्बलांचे, अहिंसक नेभळटांचे काम नाही, असे भोपटकर म्हणत असत.

      जेव्हा भारतीय लोकांकडे पुरेशी आधुनिक हत्यारे नव्हती (1857 नंतर तर शस्त्रबंदीचा कायदा झाला) तेव्हा शरीर कमवून आखाड्यात घुमून, काटक बनून इंग्रजांशी मुकाबला करण्याचे स्वप्न इथल्या युवकांनी बाळगले होते. पुण्यातला लहुजी वस्ताद यांचा आखाडा त्यासाठी प्रसिद्ध होता. स्वतः जोतिराव फुलेही पूर्ववयात याच उद्दिष्टासाठी लहुजींच्या आखाड्यात जात असल्याचे त्यांनी स्वतःच नोंदवले आहे.

      कुप्रसिद्ध रँडला यमसदनाला पाठवणारे चापेकर बंधूसुद्धा अशीच बलोपासना करणारे होते. मैलो न मैल धावणे, टेकड्या चढणे, दंड-बैठका, सूर्यनमस्कार या प्रकाराने शरीर सुदृढ, बळकट आणि काटक करून शेवटी इंग्रजी सत्तेविरोधी बंड करणे हा त्यांचा हेतू होता.

      डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचे नावही या संदर्भात घ्यायला हवे. मुंजे यांचा भर शारीरिक बल, पौष्टिक आहार (मांसाहारासह) आणि मुख्य म्हणजे लष्करी प्रशिक्षण यावर होता. डॉक्टरांचे व सावरकरांचे चांगले जमायचे. भारताचे हिंदूकरण व त्यासाठी हिंदूंचे सैनिकीकरण हा त्यांचा कार्यक्रमच होता असे म्हटले तरी चालेल.

      अर्थात सावरकर हे विज्ञाननिष्ठ व तंत्रस्नेही असल्यामुळे केवळ बलवर्धन आणि लष्करभरती यांनी भागणार नाही. लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज करायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. गांधीवादी संपूर्ण शस्त्रसंन्यासाची भाषा करीत असताना त्याची अशी प्रतिक्रिया उमटणं साहजिक होते. डॉ. य. दि. फडके यांनी तर या प्रकाराला ‘शस्त्रवेड’ असे म्हटले आहे. अर्थात, आधुनिक शस्त्रे फक्त सैन्यात उपलब्ध होऊ शकतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी बलोपासना हाच मार्ग उरतो. त्याचा पुरस्कार सर्वच हिंदुत्वनिष्ठ त्या काळात करीत होते. गांधीजींचे सुदृढ शरीराला हरकत असायचे काही कारण नव्हते. पण त्यांच्यासाठी तो मुख्य कार्यक्रम नव्हता.

      वैश्य समाजाने सासवणे इथे बांधलेल्या हनुमानाच्या मंदिराचं उद्घाटन गांधीजींच्या हस्ते झाले तेव्हा अनेकांनी त्याची टिंगल केली होती. गांधीजींनी मात्र हनुमानाच्या बळाची प्रशंसा केली, पण त्याचबरोबर हनुमानाने आपले बळ फक्त दुष्ट शक्तींच्या विरोधात वापरले होते याची आठवण करून दिली. पुण्यातले गुलाम दस्तगीर यांच्यासारखे मल्लविद्येचे उस्ताद गांधीजींच्या मागं होते.

      हिंदुत्ववाद्यांना आदर्श असलेल्या लोकमान्य टिळकांना शारीरिक बळाचे महत्त्व पुरेपूर अवगत झाले होते. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन जीवनातले एक वर्ष केवळ शरीर सुदृढ करण्यास वाहून घेतले असल्याचे सर्वज्ञात आहे. टिळकांच्या काळात पुण्यात अनेक तालमी व आखाडे होते.

      बंगालचे तरुण ब्रिटिश सत्ता उलथून टाकायचे बेत आखू लागले तेव्हा बंगालमधील ही उणीव तिथल्या देशभक्तांच्या लक्षात आली. तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांची भाची सरलादेवी पुण्यात आल्या आणि त्यांनी पुण्यातल्या बलोपासनेची माहिती घेऊन तो नमुना बंगालमध्ये नेला.

      हिंदुत्ववादी संघटनांनी व संस्थानांनी बलोपासनेवर भर देणे अगदीच स्वाभाविक होते. तथापि, ही उपासना केवळ वैयक्तिक पातळीवर न राहता तिला सुव्यवस्थित व शिस्तबद्ध स्वरूप यावे असा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे संघाच्या शाखांवरून दिसून येईल. हा प्रयोग संघ व समविचारी संस्थांसाठी, संघटनांसाठी फार अवघड नव्हता. त्याचे कारण म्हणजे खरे तर भारताला पण विशेषतः महाराष्ट्राला व्यायामाची, मल्लविद्येची मोठी परंपरा लाभली आहे. बलराम व कृष्ण यांनी कंसाच्या चाणूर आणि मुष्टिक यांच्यासारख्या बलाढ्य मल्लांना कसे लोळवले किंवा भीमाने हिडिंब राक्षसाशी व जरासंधाशी कसा मुकाबला केला याची वर्णने महाभारतात आढळून येतात. मल्लविद्येच्या वेगवेगळ्या डावपेचांची नावेही उपलब्ध होतात. नंतरच्या काळातही राजामहाराजांनी पहिलवानांना आश्रय देऊन त्यांच्या कुस्त्या लावायचा छंद जोपासला होता. त्याचे अगदी ठळक उदाहरण म्हणजे करवीर छत्रपती शाहू महाराज. महाराज स्वतःही उत्तम कुस्तीगीर होते.

      पुण्यात तालमीची परंपरा निर्माण होण्याचं कारण म्हणजे पेशवाईच्या काळात तिला मिळालेले उत्तेजन. राघोबादादा, नानासाहेब, सदाशिवरावभाऊ हे पेशवेकुलोत्पन्न तास न तास कसरतीत रमायचे. दुसर्‍या बाजीरावला कुस्ती बघणे त्यालाही आवडायचे. त्याच्या काळात झालेल्या आश्रितांच्या भाऊगर्दीत मल्लांना स्थान होते.

      इंग्रजांनी बाजीरावाचा पराभव करून पेशवाई बुडवली व त्याला स्वतःला उत्तरेत ब्रह्मावर्त ऊर्फ बिठूर इथे तहहयात पेन्शनवर पाठवले. त्याच्याबरोबर ब्रह्मावर्तास गेलेल्या मल्लांमध्ये एक होते बाळंभटदादा देवधर. बाळंभटदादांचे नाव महत्त्वाचे यासाठी, की त्यांनी भारतीय मल्लविद्येला नवे वळण दिले. दादांचे एक अभिनव चरित्र (एक होता बाळंभट) श्रीमती मनीषा बाठे यांनी लिहिलंय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाळंभटदादा हे मल्लखांब व मल्लखांबविद्या यांचे जनक होत. त्यांनी प्रवर्तित केलेली मल्लखांबविद्या व मल्लखांबांच्या अनुषंगाने कुस्ती यांच्या शाखोपशाखा भारतभर पसरल्या.

      लाकडी खांबाला प्रतिस्पर्धी समजून त्याच्यावर पेच - पकडींचा कसून सराव करून बाळंभटांनी मल्लविद्येचे नवे तंत्र विकसित केले व त्याच्या आधारे बाजीराव पेशव्यांच्या दरबारात येऊन आव्हान देणार्‍या अनेक मल्लांना अस्मान दाखविले व पेशव्यांची अब्रू वाचवली.

      मल्लखांब विद्येचा देशभर प्रसार करावा व त्यातून तयार होणार्‍या बलशाली तरुणांनी परकीय सत्तेचा प्रतिकार करावा या हेतूनं त्यांनी ब्रह्मावर्त सोडून देशभर भ्रमंती केली. बनारस, बडोदा, पुणे इत्यादी ठिकाणी आखाडे स्थापन केले.

      बडोद्याचा आखाडा अधिक गाजला. तेथे बाळंभटांची परंपरा हके जमाल - जुम्मादादा - माणिकराव अशी पुढे गेली. माणिकरावांच्या काळात बडोद्याला सयाजीराव गायकवाडांसारखा सूज्ञ सत्ताधीश लाभला. त्यांच्या आश्रयाने माणिकरावांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देऊन तयार केले.

      वेगवेगळ्या माध्यमांतून बाळंभटांनी प्रवर्तित केलेली व्यायामपद्धती संघ, सेवादल इत्यादी संस्थांपर्यंत झिरपत गेली. या झिरपण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते - ल. ना. सप्रे, वैद्य, करमरकर, उदय देशपांडे, महेश अटाळे.

      देशात ‘फिजिकल कल्चर’ निर्माण व्हावे असे सावरकर, मुंजे, ल. ब. भोपटकर आदी अनेकांना वाटत होते.                                                                                                                                        - डॉ. सदानंद मोरे

१७ मे २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ :  विभाग पहिला : इतिहास

*          घटक : (6) गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ    -

-           उपघटक : (2) गांधीजींच्या लोक चळवळी -असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, चलेजाव चळवळ

चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी

       बिहारमधल्या चंपारण्य जिल्ह्यातल्या नीळ - उत्पादक शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी महात्मा गांधीजींनी 14 मे 1916 रोजी लढ्याचं रणशिंग फुंकलं. या लढ्याची शताब्दी सुरू झाली. गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्धच्या या पहिल्याच लढ्यात यश मिळवून आपलं नेतृत्व देशपातळीवर प्रस्थापित केलं.

        महात्मा गांधी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आले. त्यांचे राजकीय गुरू, गोपाळकृष्ण गोखले यांना शब्द दिल्याप्रमाणे ते राजकारणापासून दूर राहिले आणि हा काळ त्यांनी भारत समजून घेण्यासाठी व्यतीत केला.

        साधारणपणे वर्षभर देशभर भ्रमंती केल्यानंतर बापूजी आणि त्यांचे दक्षिण आफ्रिकेहून आलेले सोबती अहमदाबादमध्ये वास्तव्याला आले. सुरवातीला ते कोचाराब येथील स्वराज आश्रमात राहत होते. त्या काळात अस्पृश्य मानल्या जाणार्‍या एका कुटुंबाला आश्रमात येण्यास परवानगी दिल्यामुळं सामाजिक बहिष्काराला तोंड द्यावं लागलं. त्यानंतर बापूंनी शहरापासून दूर, साबरमती नदीकाठी जाण्याचा निर्णय घेतला. बापूंचा हा आश्रम त्यांच्यासोबत स्वातंत्र्यचळवळीत असलेल्या सत्याग्रहीसमोर असलेल्या दोन पर्यायांच्या मध्ये, म्हणजेच स्मशानभूमी आणि तुरुंगाच्यामध्ये होता.

        एकदा बिहारमधल्या चंपारण्य भागातील मोतीहारी येथील नीळ उत्पादक आणि सावकार राजकुमार शुक्ला बापूंना भेटायला आले. बापूंना भेटून त्यांनी चंपारण्यातल्या नीळ उत्पादकांवर ओढवलेली परिस्थिती बापूंना सांगितली आणि तिथूनचं चंपारण्य सत्याग्रहाचं बीज रुजलं. 

       कापड गिरण्यांच्या व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणात म्हणजे शेकडो टनांमध्ये रंगांची गरज भासत असे. चंपारण्यातील बहुतांश जमीनदार हे ब्रिटिश होते. या जमीनदारांनी मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या निळीची लागवड करून नफा कमवण्याचा मार्ग शोधला. या जमीनदारांची जमीन कसणारे शेतकरी नगदी आणि अन्नधान्याची गरज भागणार्‍या पिकांचं उत्पादन घेत असत. उत्पन्नाच्या साधनासोबतच या शेतकर्‍यांची रोजच्या अन्नाची गरज भागत असे. शेतीतून मिळणारा नफा मालकाला जात असे आणि यांना शेतीचं किरकोळ उत्पन्न.

          जमीनदारांना भाडं म्हणून उत्पन्नातला ठराविक हिस्सा अन्नधान्याच्या रूपात देण्यासोबत या शेतकर्‍यांना सरकारला सुद्धा शेतसारा (महसूल) द्यावा लागे. निळीची शेती करून ती इंग्लंडला पाठवून त्यातून खूप नफा कमावता येऊ शकतो, हे जमीनदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या शेती कसणार्‍या शेतकर्‍यांना इतर पिकं सोडून फक्त निळीचं उत्पादन घेण्याची सक्ती केली. त्याकाळी नीळ हे नगदी पिकांमधलं सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारं पीक ठरलं होतं.

         या पिकाला खूप पाणी लागे, शिवाय जमिनीतली मूलद्रव्ये जास्त शोषली जात असल्यानं जमिनीची सुपीकता नंतर कमी होई. महत्त्वाचे म्हणजे, निळीच्या लागवडीमुळे शेतकर्‍यांच्या त्याचं कुटुंब जगवण्यासाठी लागणार्‍या अन्नधान्याची पिकं घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. छोट्या शेतकर्‍यांसाठी शाश्‍वत शेतीचा मार्ग असलेली ही पद्धत बंद करण्यात आली होती. जबरदस्तीने करायला लावलेल्या निळीच्या लागवडीचे लवकरच विपरित परिणाम दिसू लागले. त्या भागात अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण  झाली. अनेकांना उपासमारीला तोंड द्यावं लागलं. त्यातून अनेकांचा मृत्यूही ओढवला.

       एखाद्या शेतकर्‍याने निळीऐवजी अन्नधान्याच्या गटातल्या पिकाचं उत्पन्न घेतलं तर त्याला दंडात्मक कर भरावा लागत असे. पुढं युरोपात कृत्रिम रंगांचा शोध लागला आणि कारखान्यामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यावर  नैसर्गिक रंगांची मागणी जवळपास बंद झाली. ‘नीळं सोनं’ असलेलं निळीचं पीक आता बिनकामाचं गवत बनले. 

       या जमीनदारांचा उत्पन्नातील नफा ओसरू लागल्यावर भाडेतत्त्वात वाढ आणि बेसुमार कर आकारणीकडं ते वळाले. त्यांची शेती कसणार्‍या शेतकर्‍यांना उत्पन्नाच्या ‘तीन कठिया’ म्हणजेच तीन चतुर्थांश भाग भाडं म्हणून भरावा लागत असे. निळीच्या उत्पादनामुळं जमिनीचा पोत गेला होता अशा स्थितीत दुसर्‍या नगदी किंवा अन्नधान्याच्या गटातल्या पिकांचं उत्पन्न घेणं शेतकर्‍यांना अवघड झालं होतं आणि त्यातच हा इतका शेतसारा भरणं म्हणजे मरणप्राय संकट होते. जमीनदारांनी या भागात दहशत बसवली होती. जमीनदारांनी स्वैरपणे ठरवलेला आणि ब्रिटिश सरकारनं मान्य केलेला हा शेतसारा किंवा दंड देऊ न शकलेल्या वाटेकरी, शेतकर्‍यांना मात्र अन्यायाला सामोरे जावं लागे. त्यांची घरं, जवळ असलेली संपत्ती, पशूधन आणि अगदी कपडेसुद्धा जप्त करण्यात आले. या सगळ्या त्रासामुळं वाटेकरी, शेतकरी यांची स्थिती दयनीय झाली होती. अनेकजण मृत्युमुखी पडले होते, तर काहीजणांना जमीनदार आणि त्यांच्या समर्थकांनी मारले होते. चंपारण्यातील या बिकट अवस्थेचा सविस्तर वृत्तांत राजकुमार शुक्ला यांनी बापूजींना सांगितला.

       चंपारण्यातल्या शेतकर्‍यांनी यापूर्वी पिंपरामध्ये 1914 आणि तुर्कौलिया इथं 1916 मध्ये सक्तीच्या नीळ उत्पादनाविरोधात आवाज उठवला होता. दोन्ही प्रसंगात जमीनदार आणि ब्रिटिश पोलिसांनी त्यांची आंदोलनं दडपून टाकली होती. आता चंपारण्यातील मोठ्या संख्येनं असलेल्या नीळ उत्पादकांना न्याय, हक्कासाठी लढा उभारण्यासाठी राजकुमार शुक्ला बापूंना विनवणी करत होते. त्यांच्यासाठी बापूच आशेचे एकमेव किरण होते.

        चंपारण्यातील वाटेकरी शेतकर्‍यांवर ओढावलेली ही स्थिती आणि जमीनदारांची पाशवी कृत्यं ऐकल्यानंतर बापूंना चंपारण्यातील परिस्थिती समजून घेण्यासाठी आणखी काही सांगण्याची आवश्यकता नव्हती. म्हणूनच या नीळ उत्पादकांसाठी ते उभे राहिले व अहमदाबादमधील त्यांच्या आश्रमापासून मोतीहारीपर्यंत त्यांनी पदयात्रा काढली. यात त्यांच्यासोबत कस्तुरबा आणि आश्रमातील इतर सोबती, महादेव देसाई, त्यांचे आफ्रिकेहून आलेले सी. एफ. अँड्य्रू आणि एच. एस. पोलॉक हे मित्र सहभागी झाले होते.

        मोतीहारीला जाताना ते मध्ये वाटेत पाटण्याला थांबले. इथं उच्चभ्रू वर्गातील काही वकील आणि पदवीधर तरुण त्यांना येऊन मिळाले. यांपैकी काहींशी बापूंचे चांगले संबंध तयार झाले, यातील काहीजण पुढं ब्रिटिशांच्याविरोधातल्या लढ्यातील त्यांचे विश्‍वासू आणि अहिंसा चळवळीचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. यात डॉ. राजेंद्र प्रसाद, ब्राजकिशोर प्रसाद, आचार्य कृपलानी, डॉ. अनुग्रह नारायण सिन्हा, राज किशोर प्रसाद, राम नवमी प्रसाद, शंभू शरण, रामर्षी देव त्रिवेदी आणि धरणीधर प्रसाद आदींचा समावेश होता. हे सगळे तरुण इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन आलेल्या आणि दक्षिण आफ्रिकेत अन्यायाविरोधात चळवळ उभारून नेते म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि पुन्हा एकदा ‘शोषितांचा कैवारी’ बनलेल्या बापूंच्या कार्यामुळे प्रभावित झाले होते.

       बापू मोतीहारीला पोचले तेव्हा तेथील ब्रिटिश प्रशासक अस्वस्थ झाला होता. त्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अशी सूचना केली होती आणि अप्रत्यक्षपणे परत जाण्याचा सल्ला दिला होता. बापूंनी मात्र तिथल्या नीळ उत्पादकांच्या प्रतिनिधींना भेटण्यास सुरवात केली आणि त्यातून समोर आलेल्या गोष्टींनी ते चकीत झाले. या नीळ उत्पादकांची अवस्था राजकुमार शुक्ला यांनी सांगितल्यापेक्षा कितीतरी पट अधिक दयनीय होती. जमीनदारांची मनमानी मानवी मूल्यांचा भंग करणारी तर होतीच, पण कुठल्याही पातळीवर समर्थनीय नव्हती. त्यांनी या गरीब शेतकर्‍यांवर केलेले अत्याचाराचे गुन्हे निर्दयी होते.

       चंपारण्यात महिला दिसत नाहीत, किमान सार्वजनिक ठिकाणी तरी दिसत नाहीत, ही गोष्ट काही दिवसांतच बापूंच्या ध्यानात आली. त्यांनी कस्तुरबा आणि आश्रमातल्या काही महिलांना गावातल्या महिलांविषयी माहिती घेण्याची व त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवलं. थोडी शोधाशोध केल्यानंतर कस्तुरबांच्या असं लक्षात आलं की, या महिला फक्त त्यांच्या बंद घरातच त्यांच्याशी बोलण्यास तयार होतात. त्या स्वतः बाहेर येत नाहीत किंवा समोरची व्यक्ती महिला असल्याची खात्री पटल्याशिवाय त्या घरात प्रवेश देत नाहीत. सतत पाठपुरावा आणि अनेकदा मनधरणी केल्यानंतर त्यांना यामागचं कारण उलगडले. या शेतकर्‍यांच्या कुटुंबात इतकी गरिबी होती की, त्यांच्याकडे सर्व कुटुंबात मिळून एकच कापडाचा तुकडा होता. पुरुष ते धोतर म्हणून वापरत असत, तर महिला त्याची अर्धी साडी नेसत असत. पुरुष जेव्हा तो एकुलता कपडा घालून बाहेर पडत असे तेव्हा घरातील महिलांना अत्यंत तोकड्या कपड्यात जवळ जवळ नग्नावस्थेतच राहावे लागे. यामुळेच या महिला घराचे दार लावून अंधारात बसत असत. म्हणूनच त्या कुठेही जात नसत आणि कोणा अगंतुकाला घरात प्रवेश करू देत नसत. हे वास्तव जेव्हा बापूंना समजले तेव्हा त्यांनी अंतर्मुख होऊन स्वतः वापरत असलेल्या कपड्यांबद्दल विचार केला.

     गरजेपेक्षा अधिकच्या कपड्यांचा वापर हळूहळू कमी, इथे सुरवात झाली आणि कर्नाटक दौर्‍यांपर्यंत त्यांनी आपले अनावश्यक कपडे कमी करून शेवटी ते पंचावर आले.

       बापू आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नीळ उत्पादकांशी बोलून त्यांचे प्रश्‍न समजून घेतले आणि त्यांची ही अवस्था व्यवस्थितपणे मांडून कायदेशीर चौकटीत बसवली. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा हा इतिवृत्तांत होता, त्यांच्या हतबल अवस्थेचा शोक होता. त्यांनी न्यायासाठी याचना केली होती. जमीनदारांकडे याची जबाबदारी होती आणि त्यांनी वसाहत प्रशासनाकडे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. बापूंना हद्दपार करण्याचा आदेश निघाला पण त्यांनी त्यास नकार दिला.

         बापूंना तिथून उचलून मोतीहारीला आणण्यात आलं. शेतकर्‍यांचा मोठा जमाव जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर येऊन थांबला होता. बापूंना तुरुंगवास होण्याचा धोका होता तरीही त्यांनी सरकारच्या आदेशाला आव्हान दिलं. त्यांना चांगल्या वर्तनाबद्दलची वैयक्तिक हमी देण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी नकार दिला. बापूंचा यापेक्षा अधिक छळ हा लोकभावनेचा उद्रेक ठरू शकेल, अशी भीती सरकारला होती. शिवाय, ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही नसल्यानं त्यांनी बापूंना फक्त सक्त आदेश देऊन सोडले. जमीनदारांचा मनमानी कारभार आणि त्यात गरीब शेतकर्‍यांची होणारी होरपळ याची एक कमिशन नेमून चौकशी करावी, अशी एक याचिका बापूजींनी प्रोव्हिन्शिएल गव्हर्नर आणि व्हाईसरॉयकडे केली.

        त्यांच्या ब्रिटिश मित्रांनी चंपारण्यातील शेतकर्‍यांच्या स्थितीवर लेख लिहून ते लंडनमधील वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केले. एवढंच नव्हे, तर ब्रिटिश संसदेतही त्यांनी याचिका दाखल केली.

      नीळ उत्पादकांना न्याय मिळावा म्हणून लंडनमध्ये टीका आणि सार्वजनिक दबाव निर्माण झाल्याने ब्रिटिश सरकारला याची चौकशी करण्यासाठी समिती नेमून त्यात बापूंना सहभागी करून घेण्याची वेळ आली. बापूंनी नीळ उत्पादकांचे नोंदवलेले जबाब समितीपुढे सादर केले. जमीनदार त्यांच्या दृष्कृत्यांचं समर्थन करू शकले नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे कर आकारणी आणि भाडेतत्त्वात सुधारणा करण्याचा त्वरित आदेश निघाला. ‘तीन काठिया’ रद्दबातल केला गेला.

       जमीनदारांचे विशेषाधिकार, खास करून कायदेशीर मार्गांनी खंडानं जमीन कसणार्‍या शेतकर्‍यांची पिळवणूक करण्याचा अधिकार यावर अंकुश ठेवण्यात आला. सक्तीनं नीळउत्पादन घेण्याची पद्धत बंद करण्यात आली आणि शेतकर्‍यांना त्यांच्या आवडीचं पीक उत्पादन घेण्याची मुभा देण्यात आली.

      हा ब्रिटिश सरकारविरुद्धचा निर्णायक विजय होता आणि त्याचे पडसाद भारतभर उमटले. ब्रिटिशांना गुडघे टेकायला भाग पाडायला लावणारे नेते म्हणून लगेच बापूंची ओळख देशाच्या राजकीय पटलावर निर्माण झाली.

        चंपारण्य सत्याग्रहाच्या यशानंतरच स्वातंत्र्यचळवळीची सूत्रं बापूंच्या हातात आली आणि ते स्वातंत्र्यसंग्रामाचे अग्रणी बनले. चंपारण्यातील गरिबी आणि अभावजन्य स्थितीमुळे उत्पन्नाचं साधन नसलेल्या व गरीब शेतकर्‍यांच्या गरज भागवणार्‍या खादी व ग्रामोद्योगाचं महत्त्व बापूंच्या लक्षात आलं. यातून त्यांनी खादी आणि इतर भारतीय जुन्या, परंपरांगत उद्योगांचं, जे भारतीय उत्पादकाचे ग्राहकात रूपांतर करण्यासाठी ब्रिटिशांनी बंद केले होते, ते पुनरुज्जीवित केले.

**************

*    घटक  : (6)  गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ

*    उपघटक : (5) हिंदू महासभेचे राजकारण

महाराष्ट्र धर्म

       ”शिवाजीमहाराजांचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्रानं देशातल्या हिंदूसमाजाचं नेतृत्व करून आणि धुरीणत्व स्वीकारून हिंदुराष्ट्राची स्थापना करावी,” हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या मांडणीचं सूत्र, हाच महाराष्ट्रधर्म. खुद्द राजवाडे यांची प्रेरणा म्हणजे ‘निबंधमाला’ चालवणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर. मात्र, राजवाडे यांचा राष्ट्रवाद आणि सावरकर व संघ यांचा राष्ट्रवाद यात भेद होता. राष्ट्रामधल्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची कल्पना राजवाडे यांची.

        देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातलं 1920 ते 1930 म्हणजेच विसाव्या शतकाचं तिसरं दशक महत्त्वाचं पर्व आहे. जुनं नेतृत्व अस्तंगत होऊन नवं नेतृत्व पुढं येण्याचा, धडपडण्याचा हा कालखंड. पण त्यामुळं तो गोंधळाचा, अनिश्‍चिततेचा, प्रयत्न आणि प्रमारांच्या धडपडीचा कालखंड आहे.

        दुसर्‍या दशकातल्या महायुद्धाचं संकट संपुष्टात येतं न् येतं तोच या तिसर्‍या दशकाच्या उत्तरार्धात आर्थिक मंदीचं सावट जगभर पसरलं. भारत देश ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्यानं आणि ब्रिटिशांचं राज्य जगभर पसरलं असल्यामुळं त्याला जागतिक प्रभावापासून दूर राहता येणं शक्यच नव्हतं. याच प्रभावाचा एक भाग होता मार्क्सवाद. काही वर्षांपूर्वी मार्क्सवाद हा फक्त विचारांच्या आणि फारच झालं तर चळवळीच्या पातळीवर होता. परंतु पहिले महायुद्ध संपता संपता रशियात क्रांती होऊन मार्क्सवादी विचारांच्या कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली. अशीच म्हणजे श्रमिकांची सत्ता जगभर प्रस्थापित झाली पाहिजे, हा मार्क्सवादी विचारांच्या अंगभूत गाभ्याचा भाग होता. भांडवलशाहीतून निष्पन्न झालेला साम्राज्यवादी वसाहतवाद हा जितका विस्तारशील तितकाच भांडवलशाहीचा ‘नकार’ म्हणून पुढं आलेला हा साम्यवादसुद्धा विस्तारशील. ही साम्यवादी विचारसरणी याच म्हणजे तिसर्‍या दशकात भारतात दाखल झाली. रॉय, डांगे अशी नावं कानपूर, मीरत असे खटले सर्वत्र गाजू लागले.

      या साम्यवादी विचारसरणीत देव आणि धर्म यांना स्थान नसल्यानं आधीच एका विस्तारशील धर्माशी म्हणजे इस्लामशी गाठ पडलेल्या धर्मनिष्ठ हिंदूंसाठी हे अतिरिक्त आव्हान होते.

      ब्रिटिशांचे राजकीय पारतंत्र्य हे तर प्रखर वास्तव होतेच, त्याच्या जोडीला पॅनइस्लामवाद आणि साम्यवाद या नव्या धोक्यांचा संभव झाला.

      ब्रिटिश सत्तेच्या उदयापूर्वी देशावर, मराठ्यांनी खिळखिळे केलेले का होईना, पण मुसलमानांचे राज्य होते. काँग्रेसनं स्वराज्याची चळवळ सुरू केल्यावर, तिच्याकडं हिंदूंची सत्ता आणू पाहणारी चळवळ म्हणून पाहणार्‍या मुसलमानांच्याही आशा पल्लवित होऊन परत एकदा हिंदुस्थानावर सत्ता गाजवावी, निदान हिंदूंच्या बरोबरीनं सत्तेत अर्धा वाटा मिळवावा, असं त्यांना वाटू लागलं. भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्‍नाचा थेट संबंध ब्रिटिशांच्या राज्याशी असला, तरी मुसलमान आणि त्यांची भूमिका या गोष्टी बाजूला ठेवून तो सोडवता येणे शक्य नाही, याची जाणीव गोखले, टिळक व गांधी या नेत्यांना झाली व त्यांनी त्याची दखल घेतली. लखनौ करार ही जशी या जाणिवेची एक निष्पत्ती तशीच खिलाफतीच्या चळवळीला सक्रिय पाठिंबा ही तिची दुसरी निष्पत्ती होती.

      गांधी आणि काँग्रेस काहीही म्हणोत, काँग्रेसचे राज्य ही हिंदूंची सत्ता असेल असे वाटणारे अनेक मुसलमान तेव्हा अस्तित्वात होते, तसेच काँग्रेसच्या राज्यात मुसलमानांच्या हाती सत्तेच्या किल्ल्या जातील, काही झालं तरी ते अर्ध्या वाट्याच्या खाली येणार नाहीत असं वाटणारे अनेक हिंदूही अस्तित्वात होतेच! याच हिंदूंना आता नास्तिक कम्युनिस्टांनाही तोंड द्यायचं होतं.

      तसेच इंग्रजांच्या काळात मिळणारे शिक्षण आणि संधी यांचा लाभ घेतलेला हिंदुधर्मातील शूद्र आणि अतिशूद्र यांचा वर्ग .... नवजागृत मंडळी आपल्या हक्कांची मागणी करीत होती व आपल्यावर झालेल्या अन्यायाचा जाबही विचारू लागली होती.

       महाराष्ट्रातील व मद्रासकडील ब्राह्मणेतर चळवळींनी राजकीय स्वरूप धारण करून सत्तेत वाटा मागायला सुरवात केली होती. अतिशूद्रांचा किंवा अस्पृश्यांचा वर्ग तितका सामर्थ्यवान नसला, तरी त्यानंही स्वतंत्रपणानं आपल्या हक्कांचं निर्धारण करायला सुरवात केली होती. विशेष म्हणजे आपल्या अवनतीचं कारण, हिंदू धर्म व या धर्मातले ब्राह्मण पुरोहित असल्याची या दोन्ही वर्गांची खात्री होऊन त्यांनी हिंदुधर्म व ब्राह्मण यांच्याविरुद्ध टीकेची मोहीम उघडली होती. ही गोष्ट वर्चस्ववादी ब्राह्मणांना परवडणारी नव्हती; पण जे ब्राह्मण आपल्या वर्चस्वाच्या पलीकडं जाऊन, आजपर्यंत गाजवलेल्या अधिसत्तेचा त्याग करून केवळ हिंदू धर्माच्या हिताचा विचार करायला तयार होते त्यांनाही मानवणारी नव्हती.

      महात्मा गांधी आपल्याला धर्मनिष्ठ हिंदू म्हणवून घेत असले व एक साधुपुरुष म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली असली तरी ते मुसलमानांना व ब्राह्मणेतरांना सहानुभूती दाखवून झुकतं माप देत असल्याच्या शंकेनं अनेकजण ग्रस्त झालेले होते.

      या पार्श्‍वभूमीवर उदयाला आलेलं हिंदूंचं संघटन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तात्त्विक पातळीवर गांधीवादी, बुद्धिवादी, ब्राह्मणेतर, धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी काहीही म्हणोत. यातले बरेचसे प्रश्‍न व्यावहारिक पातळीवरील होते व मनुष्यस्वभावाशी सुसंगत होते. त्यांची सोडवणूक करण्यासाठी गांधी जे उपाय सांगत होते त्यांचा अंगीकार करण्यासाठी गाठावी लागणारी नैतिक उंची व स्वार्थत्यागाची तयारी असणारे लोक समाजात किती असणार? गांधींजींची ही नैतिकता वगैरे नसून त्यांचं फॅड आहे, ते भ्रमिष्ट आहेत, असे आक्षेप व्यावहारिक पातळीवरून घेतले जात होते!

      गांधींजींनी ही समज  त्या त्या वेळी प्रगटही केली आहे. त्यांची अभिव्यक्तीची पद्धती वेगळी होती. उदाहरण द्यायचं झालं तर मलबारातल्या मोगल्यांच्या बंडाच्या वेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचं घेता येईल. या प्रकरणात हिंदूंवर खूप अत्याचार झाले होते. त्यावर गांधी म्हणाले, "".... brave, God-learing mopalas who were fighting for what they consider as religion and in a manner which they consider as religious.'' हा काही स्पष्ट शब्दांत केलेला निषेध नव्हता; पण त्याचा ध्वनी पाहिला तर गांधींनी त्यात इस्लाममधल्या ईश्‍वराची आज्ञा आणि धार्मिकतेच्या चुकीच्या कल्पनेतून होऊ शकणार्‍या उत्पातांची सूक्ष्म समीक्षा केली आहे, असं दिसून येतं. ही टीका इस्लामचा उदारमतवादी अन्वयार्थ लावण्याचं आव्हान, इस्लामच्या समर्थकांपुढं ठेवते!

        ते काहीही असो, गांधींजींचा मार्ग सर्वांनाच मानवेल, अशी अपेक्षा करता येत नाही आणि दुसरा मुद्दा असा की, तो जर बुद्धिवादी, नेमस्त, दलित, साम्यवादी अशा अनेक समूहांना मानवत नव्हता, तर सर्वच्या सर्वच हिंदूंना तो मार्ग पटावा, असा आग्रह तरी कसा धरता येईल.

****************

*    घटक  : (6)  गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ

*    उपघटक : (5) हिंदू महासभेचे राजकारण

संघाचा राष्ट्रवाद

        गांधींजींचा मार्ग ज्यांना तो मानवला नाही त्यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी स्वतंत्र संघटना काढली.  त्या पुढं जाऊन या लोकांना हिंदुधर्मीयांचं स्वतंत्र राज्य हवं, निदान हिंदुस्थानात तरी हिंदूंची सत्ता हवी, असं वाटत होतं. या गृहीतकाला धरूनच त्यांनी वेगळ्या प्रकारच्या राष्ट्रवादाची मांडणी केली. इतिहासाचा वेगळा अन्वयार्थ लावून त्याचीही वेगळी संगती लावली. डॉ. हेडगेवार यांनी स्वतंत्र असं लेखन केलेलं नाही. त्यांची व्याख्यानंही उपलब्ध नाहीत. पण सावरकरांचा हिंदुत्वावरचा ‘प्रबंध’ आणि नंतर माधवराव गोळवळकर तथा गुरुजी यांचं ‘वुई’ ही दोन पुस्तकं तरी संघाचं वैचारिक अधिष्ठान समजायला हरकत नसावी.

         इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची मांडणी पायाभूत धरून, तिच्यातली ब्राह्मणकेंद्रितता बाजूला करून, सावरकरांनी आपले विचार मांडले होते. अलीकडच्या काळात मांडण्यात आलेली समरसतेची कल्पनासुद्धा राजवाड्यांच्या लेखनात सापडते. त्यामुळे त्यांना संघाचे वैचारिक पूर्वज समजायला हरकत नसावी.

        शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्रानं देशातल्या हिंदुसमाजाचं नेत्तृत्व करून धुरीणत्व स्वीकारून हिंदुराष्ट्राची स्थापना करावी, हे राजवाड्यांच्या मांडणीचं सूत्र, हाच महाराष्ट्रधर्म.

       स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा ही या त्रिसूत्रीचे जनक व ‘निबंधमाला’ चालवणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे राजवाड्यांचं प्रेरणास्थान. राजवाड्यांनी समर्थ रामदासांना राष्ट्रगुरू ठरवलं त्यांचा हा विचार संघानं ग्राह्य धरला होता.

        राजवाड्यांचा राष्ट्रवाद आणि सावरकर व संघ यांचा राष्ट्रवाद यातला भेद लक्षात घ्यायला हवा. राष्ट्रामधील महाराष्ट्राच्या धुरीणत्वाची कल्पना राजवाड्यांची. ती सावरकरांना व संघाला मान्य असल्यामुळं आतापर्यंत एक वगळता सर्व सरसंघचालक मराठी असल्याचं दिसून येईल. या प्रकारचं धुरीणत्व पेशव्यांनी प्रथम प्रस्थापित केलं. पण राजवाडे पेशव्यांची चूकही दाखवतात. राजवाड्यांच्या मते पेशव्यांनी विशेषतः उत्तरेकडील स्थानिक राजांची सत्ता अबाधित ठेवून भारताचं एक संघराज्य - फेडरेशन बनवायला हवं होतं. तसं न करता त्यांनी अधिक सत्तेचा हव्यास धरला व त्याचा परिणाम म्हणून उत्तरेतले सत्ताधारी मराठ्यांपासून दुरावले. याबाबतीत राजवाडे विशेषतः नानासाहेब पेशव्यांचा कडक निषेध करतात.

       राजवाडे यांच्या कल्पनाशक्तीच्या भरार्‍यांना केवळ ऐतिहासिकच नव्हे तर वर्तमानकालीन वास्तवाचंही अधिष्ठान होतं. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्याच्या प्रक्रियेत अग्रेसर राहण्याचं सामर्थ्य महाराष्ट्रात आहे, हे सांगताना ते संबंधित व्यक्तीचा नामनिर्देश करायलाही विसरत नाहीत. ती व्यक्ती म्हणजे बडोदा संस्थानचे अधिपती सयाजीराव गायकवाड!

        महाराष्ट्राच्या या धुरीणत्वातून साकार होणार्‍या नव्या स्वतंत्र्य हिंदुस्थानचं स्वरूप अमेरिकेप्रमाणं संयुक्त संस्थानांचं असेल. ते एक फेडरेशन असून त्यातील घटक संस्थांनांना पुरेशी स्वायत्तता असणार याबाबत राजवाडे निःशंक होते. महाराष्ट्रधर्म अर्थात महाराष्ट्राचं धुरीणत्व गृहीत धरून सावरकरांनी व संघानं ज्या प्रकारच्या स्वतंत्र हिंदुस्थान देशाचं संकल्पचित्र समोर ठेवलं ते राजवाड्यांप्रमाणे शिथिल संघराजाचं - फेडरेशनचं नसून केंद्र बलवान असलेल्या राष्ट्राचं होतं. हा महत्त्वाचा भेद म्हणजे त्यांना राजवाड्यांनी पेशव्यांवरील केलेली टीका मानवली नसणार हे उघड आहे.

        सावरकरांवर राजवाड्यांचा प्रभाव असला, तरी त्यांच्यामधल्या एका महत्त्वाच्या भेदाचीही नोंद केली पाहिजे. सावरकर जितके बुद्धिवादी होते तितकेच ते भावनाशीलही होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादात ‘भारतमाता’ - ‘स्वातंत्र्यदेवी’ या कल्पनांना स्थान मिळू शकलं.

       राजवाड्यांच्या व्यक्तिमत्त्वात भावनाप्रधानतेला स्थान नव्हतं ते केवळ बुद्धिवादी होते. त्यामुळं त्यांच्या लेखनात मातृभूमी, भारतमाता अशा गोष्टी फारशा आढळणार नाहीत. सावरकरांमध्ये त्या आढळतात. पण त्यांच्याशी बंगाली प्रभावाचा संबंध नाही. त्यांच्या घराण्यात अष्टभुजा देवीची उपासना चालत आली होती. सावरकरकांनी अगदी बालपणीच ती पूर्णपणे आत्मसात केली होती. पुढे त्यांचा कल नास्तिकतेकडं झुकल्यावर अष्टभुजेची उपासना सुटली. पण तिची जागा भारतमातेच्या उपासनेनं घेतली हा एक महत्त्वाचा "metamorphosis' होता.

        संघाच्या राष्ट्रवादातली भारतमातेची कल्पना बंगाली देशभक्तांच्या संपर्कातून आली. डॉ. हेडगेवार कोलकाता इथं वैद्यकीय शिक्षण घेत असताना तिथं त्यांचा बंगाली क्रांतिकारकांशी संबंध आला. बंगालमध्ये शक्तिपूजेचा संप्रदाय प्रभावी असून त्यातून भारतमातेची कल्पना निघाली.

         डॉ. हेडगेवार यांच्या पश्‍चात गोळवळकर गुरुजी सरसंघचालक झाले त्यांचाही बंगालशी संबंध आला होता.  तरुण वयातच गोळवळकरांचा हेडगेवार आणि संघ यांच्याशी संबंध आला तेव्हापासूनच त्यांचं वेगळेपण हेडगेवारांच्या ध्यानात आलं. उच्चशिक्षित असलेल्या गोळवळकरांची मानसिक ठेवणं आध्यात्मिक होती. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी जेमतेम वर्ष दीड वर्ष प्रॅक्टिस केली असेल नसेल तोच त्यांना वैराग्य प्राप्त झालं व ते अचानक घरातून निघून गेले.

        बंगालमधील सारगाछी आश्रमात जाऊन त्यांनी स्वामी अखंडानंद यांची सेवासाधना केली.      अखंडानंदांना रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा सहवास लाभला होता. स्वामीजींच्या मार्गदर्शनानं गोळवळकरांनी योग आणि अध्यात्मात इतकी प्रगती केली होती की, ते जमिनीपासून काही फूट अंतरावर कोणत्याही आधाराशिवाय आसन घालू शकत असत. हा प्रकार प्रत्यक्ष पाहणार्‍या एका प्रसिद्ध मर्दनतज्ज्ञांनी नोंदवून ठेवला आहे.

        घरी काहीही न सांगता आश्रमात दाखल झालेले गोळवळकर काही दिवसांनी परत आले तेव्हा घरच्यांना जितका आनंद झाला तितका किंवा त्यापेक्षाही अधिक हेडगेवार यांना झाला. हेडगेवारांना त्यांना आपला उत्तराधिकारी नेमायचे होते आणि तसे झालेही.

        डॉ. हेडगेवार गुरुजींमुळे प्रभावित झाले याचे एक कारण गुरुजींचा आध्यात्मिक अधिकार असू शकेल. पण दुसरे कारण होते गुरुजींनी 1938 मध्ये लिहिलेले ‘वुई - अवर नेशनहूड डिफाइन्ड’ हे पुस्तक.

        या पुस्तकातल्या विचारांसंबंधी हेडगेवारांचे चरित्रलेखक ना. ह. पालकर लिहितात, “श्री गुरुजी यांना भारतीय संस्कृतीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार ज्या श्री रामकृष्ण परमहंसांच्या परंपरेतून झाला होता. त्या परंपरेत श्री कालिमाता वा श्री जगन्माता हेच उपास्य दैवत म्हणून मानलं जातं. आता श्री गुरुजी यांचं उपास्य हे कोणत्याही मृण्मय वा अन्य मूर्तीच्या रूपात त्यांच्या डोळ्यांसमोर उभे न राहता, ‘हिंदुराष्ट्र’ या स्वरूपातच त्यांना त्या ‘दैवता’चे दर्शन घडू लागले होते. ‘वुई’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकात ते लिहितात, की "I offer this work to the public as an humble offering at the holy feet of the Divine Mother - the Hindu Nation...''

         सावरकर, हेडगेवार, गोळवळकर एकाच भारतमातेचा निर्देश करीत असले तरी त्यांची उगमस्थानं वेगवेगळी होती!

        सावरकरांचं उगमस्थान घरातल्या देवीच्या उपासनेत सापडतं. हेडगेवारांचं बंगालमधल्या अनुशीलन समितीच्या क्रांतीकारकांच्या सहवासात, तर गोळवळकरांचं त्यांच्या बंगाली परंपरेच्या आध्यात्मिक साधनेत. थोडक्यात गुरुजींमुळं संघाच्या संघटनेला व चळवळीला एक प्रकारचं आध्यात्मिक अधिष्ठान लाभलं. राजकारणासह सर्वच लौकिक व्यवहारांकडं निखळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून पाहणार्‍या सावरकरांना अशा आध्यात्मिक अधिष्ठानाची आवश्यकता वाटत नव्हती.

        सावरकर आणि गुरुजी यांच्यातल्या या मतभेदाची चुणूक 1956 साली लोकमान्य टिळक जन्मशताब्दीच्या निमित्तानं प्रसिद्ध झालेल्या ‘केसरी’च्या विशेषकांतल्या या दोघांच्या लेखांमधून पाहायला मिळते.

         सावरकर टिळकांच्या गीतारहस्यालाच काय परंतु प्रत्यक्ष भगवद्गीतेलाच उपयुक्ततावादी ग्रंथ मानतात ! याउलट गुरुजी ‘सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जे करील तयाचे। परि तेथ भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।।’ ही रामदासांची ओवी उद्धृत करतात. त्याही पुढं जाऊन ‘अशा अधिष्ठानाविरहित केलेली व्यावहारिक कामे व त्यांचे परिणाम हे आसुरी संपत्तीचे होत. त्यांनी राष्ट्राचे खरे कल्याण होणे शक्य नाही’ अशा शेरा मारतात.

       गोळवलकर गुरुजींनी हिंदू महासभेचे एकेकाळी अध्यक्षपद भूषविणार्‍या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बरोबर जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली, तेव्हा अस्वस्थ झालेल्या ना. भा. खरे यांनी श्यामाप्रसादांच्या कृतीला ‘हिंदू महासभा नष्ट करण्याचा प्रयत्न’ असं म्हटलं. शयामाप्रसाद मुखर्जी हे ‘सरदार पटेलांच्या सततच्या सहवासानं हिंदू महासभाद्वेष्टे बनले असावेत’ असाही खर्‍यांचा कयास होता. खरे तर मुखर्जी यांनी स्वतःच खरे यांना आपण गोळवळकरांच्या मदतीनं नवा पक्ष काढीत असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर खरे यांनी हिंदू महासभा विसर्जित करून या नव्या पक्षात सामील व्हावं, अशी सूचनाही केली होती. ही 1952 च्या निवडणुकीच्या वेळची गोष्ट आहे. त्याही आधी म्हणजे 1946 च्या निवडणुकांत हिंदू महासभेचा पराभव झाला होता. (तेव्हा जनसंघ नव्हता) त्याची मीमांसा करताना हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते मामाराव दाते यांनी, “ब्रिटिश सरकारविरुद्ध असलेल्या गांधींच्या अहिंसावादी विचारानं गुरुजी त्या वेळी प्रभावित झालेले होते. त्यांनी हिंदुसभेच्या इच्छुकांना निवडणुकीत विरोध केल्यानं हिंदू महासभेला यश आलं नाही,” अशी कारणमीमांसा केली होती.

       गांधीहत्येचे बालंट असलेल्या हिंदू महासभेपासून संघाचं वेगळेपण दाखवणं इतक्या वरवरच्या व्यावहारिक मुद्द्यापुरता हा मामला मर्यादित करणं चुकीचं ठरेल. त्याचा संबंध भगवंताच्या अधिष्ठानाशी व त्यामुळे येणार्‍या तद्नुषंगिक जबाबदारीशी पोहोचतो हे विसरता कामा नये. डॉ. हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजी यांचं हे बंगाली कनेक्शन राजकीय पक्ष स्थापन करताना कामाला आलं हे खरं असले तरी तेव्हा बंगालीबाबू आपल्या चंचल स्वभावधर्मानुसार थेटच दुसर्‍या टोकाला म्हणजे कम्युनिझमपर्यंत पोहोचत होते. त्यामुळे ज्या पक्षाचा अध्यक्ष बंगाली त्याचा खुद्द बंगालमध्ये प्रभाव पडू नये, अशी चमत्कारिक परिस्थिती उद्भवली. कम्युनिझमच्या प्रभावामुळं भारतमाता वगैरे गोष्टी जपण्याची जबाबदारी अर्थातच संघावर येऊन पडली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

        1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रीतसर स्थापना झाली, तेव्हा गांधीजींच्या असहकारितेच्या प्रभावाची पहिली लाट ओसरली होती. सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या रूपानं हेडगेवारांसारख्यांना वेगळ्या भूमिकेचा पर्याय उपलब्ध झाला होता. गांधींच्या बदनामीची मोहीमही जोरानं सुरू झाली होती.

        गांधीजींनी अफगाणिस्तानच्या अमीराला हिंदुस्थानात पाचारण करून त्याच्या मदतीनं इथलं ब्रिटिश सरकार उलथून टाकण्याचा कट रचला असं सांगून त्यांची तुलना जयचंद राठोडशी करण्यात येऊ लागली होती. असे उपद्व्याप करणार्‍यांमध्ये हेडगेवारांच्या निकटवर्ती व्यक्तींचा समावेश होता. परंतु, स्वतः हेडगेवार या प्रचाराला बळी पडले नाहीत.

        एकीकडं गांधीजींना थेट इंग्रजांचेच हेर ठरवणारे व दुसरीकडं त्यांना मुसलमानांचे एजंट मानणारे यांच्या विचारांमधील विसंगती त्यांना जाणवली. याचाच परिणाम म्हणून हेडगेवारांनी 1930 च्या जंगल सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास पत्करला. त्यांचा हा दुसरा तुरुंगवास संघाच्या स्थापनेनंतरचा आहे. 1930 सालाचा विचार केला तर त्याच्या आधी स्वतः तात्यारावांनीही गांधीजी आणि त्यांची अहिंसा यांच्यावर वृत्तपत्रीय लिखाण व नाटके यांच्या माध्यमातून टीकेची झोड उठवली होती. सावरकरांना मानणारी व्यक्ती गांधींच्या चळवळीत भाग घेते आहे, ही गोष्ट तशी कल्पना करायला अवघडच आहे.

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकीय संस्थेपासून अलिप्त ठेवलं तरच त्याचं संरक्षण होईल, याची खात्री केशव बळिराम हेडगेवार यांना होती. त्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी स्नेह असूनही हिंदू महासभेपासून त्यांनी अंतर ठेवलं.

      हिंदू महासभेनं त्यामुळं आपली वेगळी रामसेना काढण्याचा प्रयत्न केला. महासभेनं भागानगर सत्याग्रहाच्या प्रकरणावरून हेडगेवार यांच्यावर टीका केली, त्याला संघाकडून प्रत्युत्तरही दिलं गेलं.

      गांधीजींनी 1920 मध्ये सुरू केलेल्या असहकारितेच्या चळवळीला तिच्या पहिल्या पर्वात प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिचा मुकाबला कसा करावा याविषयी ब्रिटिश सरकार गोंधळात पडलं. सरकारनं गांधीजींवर खटला भरून त्यांना तुरुंगात टाकलं. या खटल्यात गांधीजींना 6 वर्षांची शिक्षा झाली, तो दिवस 18 मार्च 1922 हा होता. त्यामुळं प्रत्येक महिन्याची 18 तारीख ‘गांधी दिन’ म्हणून पाळून सरकारचा निषेध करण्याचा व गांधीजींविषयी आदर व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशाच एका गांधीदिनी डॉ. हेडगेवार गांधीजींविषयी म्हणाले, “आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. महात्मा गांधीजींसारख्या पुण्यश्‍लोक पुरुषाच्या अंगी असलेल्या सद्गुणांचं श्रवण व चिंतन करण्याचा हा दिवस आहे. त्यांचे अनुयायी म्हणविण्यात भूषण मानणार्‍यांच्या शिरावर तर त्यांच्या गुणांचं अनुकरण करण्याची जबाबदारी विशेषच येऊन पडते. महात्मा गांधीजींच्या अंगी असलेला अत्यंत महत्त्वाचा सद्गुण म्हटला पाहिजे, तो म्हणजे हाती घेतलेल्या कार्याकरिता आत्यंतिक स्वार्थत्याग होय. महात्मा गांधीजींची चळवळ जर त्यांच्या अनुयायी वर्गापासून कशाची अपेक्षा करीत असेल तर ती या आत्यंतिक स्वार्थत्यागाची. बोलणे एक व कृती एक, अशा दुटप्पी वर्तनाचे लोक महात्माजींना नकोत. तोंडानं ‘महात्मा गांधी की जय’ म्हणावयाचे, हात वर करून त्यांच्या कार्यक्रमाला दुजोरा द्यावयाचा व घरी गेल्यावर आपले चैनीचे व स्वार्थत्यागाचे सर्व व्यवसाय तसेच चालू ठेऊन, त्या कार्यक्रमाविरुद्ध वर्तन करावयाचे, अशा दोगल्या (दुटप्पी) वृत्तीच्या अनुयायांकडून महात्माजींची कार्यनौका कधीच वल्हविली जाणार नाही. आपला दुबळेपणा झाकण्याकरिता शांतीचे पांघरूण घेऊ नका. प्रतिपक्षाच्या बरोबरीनं मनगटात सामर्थ्य आणा व नंतर शांतीच्या गोष्टी बोला म्हणजे ते शोभेल. महात्माजींचे अनुयायी म्हणवून घ्यावयाचे असल्यास स्वतःच्या घरावर (हलवायाच्या नव्हे) तुळसीपत्र ठेवून रणांगणात उतरा.”

        डॉक्टरांचे हे उद्गार ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. कम्युनिस्ट पक्षाचा उदय होऊन वर्गविग्रहाची व क्रांतीची भाषा प्रचारात यायला अजून वेळ होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी इंग्लंडला गेलेले असल्यामुळे दलितांची अशी वेगळी चळवळ नव्हती.

       ब्राह्मणेतर पक्ष स्वातंत्र्याची चळवळ हे ब्राह्मणांचे राखीव कुरण असल्याचा समज करून घेऊन त्यापासून चार कोस दूरच होते.

        काँग्रेसमधल्या मवाळ किंवा नेमस्त गटाला गांधीजींची चळवळ मान्य नसली तरी त्याला देशात कोणी विचारत नसल्यानं तो पूर्णपणे निष्प्रभ झाला होता.

        बॅ. महंमद अली जीना गांधीजींना स्पष्ट विरोध करण्याची ही वेळ नव्हे असे समजून बाजूला स्वस्थ बसून काय चाललं आहे हे फक्त पाहात होते.

        अ‍ॅनी बेझंट बाईंपासून रँग्लर र. पु. परांजप्यांपर्यंत कोणाचं काहीही चालत नव्हतं. गांधीजींच्या मागं जायचे की नाही यावरून टिळकांच्या अनुयायांमध्ये संघर्ष होता.      

         सावरकरांची पर्यायी भूमिका अजून स्पष्ट व्हायच्या प्रक्रियेत होती, तीसुद्धा जवळ जवळ गुप्तपणानं आणि नेतृत्व तर शक्यच नव्हतं, त्यांना राजकीय विधानं करण्याचीच काय पण रत्नागिरी सोडायचीही बंदी होती. एकटे बाबाराव सावरकर हिंदुत्वाचा प्रचार करणार तरी किती?

        अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, नागपूरचे डॉ. मुंजे काहीही आणि कितीही म्हणाले तरी तुम्ही गांधीजींच्या बरोबर की गांधीजींच्या विरोधात हाच मुख्य प्रश्‍न होता. आणि हेडगेवार तेव्हा तरी निश्‍चितपणानं गांधीजींच्या बरोबर या भूमिकेत होते.

          गांधी श्रेष्ठ की सावरकर श्रेष्ठ असा वाद चालला असता, हेडगेवार तिथं आले व त्यांनी तो ऐकला. त्यांनी त्या वाद घालणार्‍या दोघांना समजावलं, की “गुलाब श्रेष्ठ, की मोगरा श्रेष्ठ अशासारखाच हा वाद आहे. जसा गुलाबासारखा मोगरा नाही, तसाच मोगर्‍यासारखा गुलाब नाही, हेही तितकेच खरे व तसे पाहू जाता सौंदर्य, कोमलता व सुगंध या तिन्ही दृष्टींनी या दोघांत कोण श्रेष्ठ याविषयी मतभेद होणे सहज शक्य आहे. अशावेळी ज्यानं त्यानं दुसर्‍या फुलाला चुरगाळून न टाकता आपापल्या अभिरुचीप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या फुलाचा मनसोक्त आस्वाद सुखेनैव घ्यावा, असे मी सांगेन.”

        डॉक्टरांचे सांगणे मनावर न घेणारे लोक हिंदुत्ववादी वर्तुळात निघाले व त्यांनी एक फूलच (महात्मा गांधींजींची हत्या) चुरगळून टाकलं व त्या चुरगळण्याचा परिणाम म्हणून संघावर बंदी आली.

         जंगल सत्याग्रहात भाग घेताना हेडगेवारांनी एक धोरणात्मक काळजी घेतली होती. संघानं ‘संघ’ म्हणून सत्याग्रहात भाग घेतला तर सरकारची त्याच्यावर वक्रदृष्टी होईल व नुकतीच सुरू झालेली संघटना त्यात बळी जाईल म्हणून संघस्वयंसेवकाला सत्याग्रह करायचा झाला तर त्यानं संघाचा सदस्य या नात्यानं न करता वैयक्तिक पातळीवर करावा, असं या धोरणाचं सूत्र होतं. त्यानुसार सत्याग्रह करताना संघाच्या गणवेशात न करता नेहमीच्या पोशाखात करायचा असंही ठरलं.

        21 जुलै 1930 रोजी यवतमाळपासून सहा मैलांवरील धामणगाव मार्गावरील लोहारा जंगलात सत्याग्रह झाला. हातातल्या कोयत्यानं निर्बंधित क्षेत्रातील गवत कापण्यात आलं. या गुन्ह्यासाठी डॉक्टरांना लगेच अटक झाली. यवतमाळ येथील कारागृहाच्या कोर्टात खटला चालून एकूण 9 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा तुरुंगवास त्यांनी अकोला इथल्या कारागृहात भोगला. या काळात संघाचं सरसंघचालक पद डॉ. ल. वा. परांजपे यांनी सांभाळलं. या काळात नागपूरमधल्या संघ कार्यालयात सूतकताईचं काम जोमात चालत होतं.

       राजकीय चळवळीत भाग घेताना संघाचे अस्तित्व धोक्यात येणार नाही वा त्याची झळ संघास लागणार नाही अशा बेताने घ्यायचा या हेडगेवारांच्या धोरणात विलक्षण संगती आढळते. ते फक्त गांधींच्या किंवा काँग्रेसच्या सत्याग्रहापुरते मर्यादित नव्हते. त्याचा अनुभव खुद्द सावरकरांनासुद्धा आला.

        हैदराबादच्या निजामाच्या राज्यात हिंदूंवर मिळणार्‍या वागणुकीच्या विरोधात खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभेच्या वतीनं सत्याग्रह घडवून आणला होता. या सत्याग्रहात संघानं सामील व्हावं, अशी सावरकरांसह सर्वच हिंदुत्ववाद्यांची अपेक्षा होती. पण हेडगेवारांनी त्यांना मुळीच दाद दिली नाही. वैयक्तिक पातळीवर ज्याला भाग घ्यायचा असेल, त्याला घेऊ द्या. पण संघटना म्हणून संघाला त्यात ओढू नका, असे हेडगेवारांनी संबंधितांना निक्षून सांगितले. संघानं सत्याग्रहात भाग घेतला आहे, अशा बातम्या हिंदू महासभेच्या वर्तुळातून प्रसृत होऊ लागल्या तेव्हा डॉक्टरांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

        संघाच्या पायाभरणीत बाबाराव सावरकर आणि डॉ. मुंजे यांचा महत्त्वाचा वाटा होता. बाबारावांनी आपली स्वतःची हिंदू संघटना संघात विलीन केली होती. तात्यारावांच्या बौद्धिक मांडणीचा तर संघाला मोठा आधार मिळाला. 1937 पर्यंत म्हणजे तात्यांचं रत्नागिरीमधलं स्थानबंदित्व संपुष्टात येऊन त्यांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वीकारेपर्यंत या सर्व घटकांचे परस्परसंबंध चांगले होते.

      संघाला स्वतःचा राजकीय पक्ष नसल्यामुळं, संघानं ‘आपली’ संघटना म्हणून काम करावं अशी अपेक्षा हिंदू महासभेची व अर्थात सावरकरांचीही असणं स्वाभाविक मानता येईल. तथापि संघाला ते मान्य होणं शक्य नव्हतं.

       हिंदू राष्ट्रवाद, हिंदू संघटना यांच्याविषयीचे मूलभूत मतैक्य जमेस धरूनही संघ आणि हिंदू महासभा यांच्यात महत्त्वाचे भेद होते. शिवाय हिंदू महासभेचे सर्वेसर्वा स्वातंत्र्यवीर सावरकर वैचारिक भूमिका व व्यक्तिमत्त्व यांचाही प्रश्‍न होताच.

        सावरकर टोकाचे बुद्धिवादी. हिंदू धर्मातील रूढी-परंपरांविषयीची त्यांची टोकाची मते संघाला परवडण्यासारखी नव्हती.

       नेतृत्वाबाबतची संघाची भूमिका एकचालकानुवर्तित्वाची होती. हिंदू महासभेची अधिकृत भूमिका तशी नसली तरी प्रत्यक्ष व्यवहारात सावकरांचे व्यक्तित्व, वक्तृत्व आणि प्रभाव जमेस धरता हिंदू महासभेतही कळत नकळत सावरकरांच्या एकचालकानुवर्तित्वाचा शिरकाव झाला. एकचालकानुवर्तित्व मानणार्‍या दोन संघटना एकत्र येणे याचा अर्थ त्यांच्यापैकी एका संघटनेच्या नेत्यानं दुय्यम भूमिका स्वीकारणे. संघ व सभा यांच्या बाबतीत हे अशक्य होतं.  याअंतर्गत बाबींचा जाहीर उच्चार व्यावहारीकदृष्ट्या परवडणारा नव्हता. त्यामुळे बाह्यात्कारी सहमती व अंतर्गत संघर्ष असा काहीसा प्रकार घडला.

        हेडगेवारांचा सावरकरांशी प्रत्यक्ष संबंध आलेला असल्यानं व त्यांना सावरकरांनी प्रत्यक्ष मदत केलेली असल्यानं काही ऋणानुबंध निर्माण झाले असल्यानं हेडगेवारांच्या काळात ही कटुता मर्यादित होती. हेडगेवारांच्या पश्‍चात गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले. गुरुजींचा सावरकरांशी तसा प्रत्यक्ष संबंध आलेला नसल्यामुळं त्यांच्यावर सावरकरी संस्कार झालेला नव्हता. त्यामुळं गुरुजींच्या काळात हा दुरावा अधिक वाढला. स्वातंत्र्योत्तर काळात संघाने आपली राजकीय शाखा म्हणजे (भारतीय जनसंघ) स्थापन केल्यानंतर हा प्रश्‍न कायमचा निकालात निघाला.

        हिंदू महासभेतल्या एका जहाल गटाच्या गोडसे-आपटे अशा मंडळींनी गांधी हत्या घडवली. नथूराम पूर्वी संघाचा स्वयंसेवक होता. पण दरम्यान त्याला संघाची धोरणे मिळमिळीत वाटल्यामुळं त्यानं संघाचा त्याग करून स्वतःची वेगळी हिंदू संघटना काढली होती. गांधी हत्येनंतर हत्येचं खापर संघाच्याही डोक्यावर फोडणं अवघड नव्हतंच. हिंदू महासभा तसा नगण्य पक्ष असल्यानं त्याच्यावर बंदी घातली काय आणि नाही घातली काय, विशेष फरक पडणार नव्हताच.

        भागानगर सत्याग्रहाच्या काळात संघ आणि सभा यांचे संबंध ताणले गेले होते, याचे एक उदाहरण सांगायला हरकत नाही. भागानगर सत्याग्रहात भाग घ्यायला संघाने नकार दिला यावर चिडून जाऊन गो. गो. अधिकारी यांच्या ‘वंदे मातरम’ पत्रातून संघ व सरसंघचालक यांच्याविरोधात 12 टीका लेख छापून आले. त्यात खुद्द हेडगेवारांवर ‘अहंकारी’ असल्याचा आरोप करून ‘अहंकाराचं विष हे सापाच्या विषापेक्षाही भयंकर असतं,’ असा इशारा दिला होता.

       अशा प्रकारच्या जहाल टीकेला उत्तर न देता गप्प राहाणं संघाला परवडलं नसतं. नागपूर येथील मावकरांनी चालवलेल्या ‘सावधान’ पत्रानं ही कामगिरी बजावली. नित्य कार्ये व नैमित्तिक कार्ये या धर्मशास्त्रानं केलेल्या भेदाचा आधार घेऊन ‘सावधान’ सांगतो की भागानगरचा सत्याग्रह नैमित्तिक कार्य होते. तो नित्यानित्यविवेक अधिकारींना करता आला असता तर संघाविरुद्ध बारा फुत्कार त्यांनी सोडलेच नसते. भागानगर आटोपल्यानंतरही राष्ट्रविमोचनाचे कार्य शिल्लक उरतेच; हे भागानगरीत उत्साहाच्या उसंडत्या बालीश भरात श्री. अधिकारी विसरलेले दिसतात. ज्या वेळी राष्ट्रविमोचनाकरिता अखेरचा एकच घाव घालावयाचा असतो. त्या अंतिम समर-क्षणाच्या आगमनाची पूर्वतयारी हे राष्ट्रविमोचनाचे नित्य कार्य होत व भागानगर आंदोलनासारखी आंदोलने ही राष्ट्रविमोचनाची नैमित्तिक कार्ये होत.”

         या वादामुळे संघ आपला अवयव म्हणून काम करणार नाही याची हिंदू महासभेला खात्री पटली व सभेची अशी वेगळी संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ‘रामसेना’ हे त्या स्वयंसेवक संघटनेचं नाव. त्यासाठी हिंदू महासभेला डॉ. मुंजे यांच्यासारखा मोहरा पुढं करावा लागला. त्याप्रमाणे पत्रक निघाले. “रामसेना हे महासभेचे सैन्य राहील. मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुंजे यांच्यामार्फत येणार्‍या महासभेच्या सर्व आज्ञा रामसेनेला पाळाव्या लागतील.”

       राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात असताना, वेगळ्या संघटनेची गरज काय या संभाव्य शंकेचा खुलासा पत्रकात आधीच करून टाकला होता, तोदेखील हेडगेवारांच्या गौरवपूर्ण उल्लेखासह - “हिंदूंच्या सैन्यशिक्षणाचे द्रोणाचार्य पूज्य डॉ. हेडगेवार यांनी पक्षातीत हिंदू संघटना ही नागपुरात सुरू केली.”

         हेडगेवारांची संघटना पक्षातीत असल्याने ती हिंदू महासभेशी बांधील नाही व म्हणून हिंदू महासभेला ना तिला आज्ञा करता येत ना तिच्यावर अवलंबून राहाता येत. या पत्रकावर डॉक्टरांचंही नाव टाकण्यात आले होते. त्यावर हेडगेवार यांना, आपलं नाव आपल्या न कळत व आपल्या संमतीशिवाय टाकण्यात आलं असल्याचं जाहीर करावं लागलं. त्यामुळं डॉ. मुंजे दुखावले जाणार होते. पण त्याला इलाज नव्हता. संघाला राजकीय संस्थेपासून अलिप्त ठेवले तरच तिचे संरक्षण होईल, याची डॉक्टरांना खात्री होती.

 **************       

*    घटक  : (8)  महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्ये

*    उपघटक : (1)  गोपाळ गणेश आगरकर

 गोपाळ गणेश आगरकर

         जातिभेदामुळे आपल्या समाजाची अवनीती झाली हे ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर सांगतात. ते म्हणतात की, ”एकीकडे काँग्रेसचे अधिवेशन लंडनमध्ये भरवण्याचे बेत करायचे आणि दुसरीकडे स्वदेशातील स्वधर्मीय शूद्रांना विषमतेची वागणूक द्यायची हा दुटप्पीपणा आता चालणार नाही. ते पुढे म्हणतात, शहाणे असाल तर आमचे ऐका. यावर तुमचे ते सोवळे तुम्हास खुंटीवरच टांगून ठेवले पाहिजे. आता यापुढेही अविचाराची बेबंद पातशाही चालणार नाही.”

       आगरकरांच्या समाजसुधारणांची व्याप्ती उच्चवर्णियांच्या कौटुंबिक सुधारणांपुरती असल्याचा आक्षेप नेहमी घेण्यात येतो. पण त्याचा अर्थ त्यांना समाजातील खालच्या थरांतील लोकांविषयी, त्यांच्या रास्त हक्कांविषयी काही कर्तव्यच नसते असा होत नाही. ब्राह्मणांनी जातिभेदाच्या आहारी जाऊन खालच्या जातींच्या लोकांना वाईट वागणूक देऊ नये असा उपदेश करताना ते लिहितात, ”कोणी म्हणेल की, हा जातिभेद काही आजचा अस्तित्वात आला नाही. हा अनेक शतके असाच चालू आहे, असे असून, आजच शूद्र वर्गात असंतोष का उत्पन्न व्हावा?”

        या प्रश्‍नाचे उत्तर स्वतः आगरकर देतात - ”याचे कारण इतकेच की आजपर्यंत त्यास अज्ञानावस्थेत ठेवण्याची खबरदारी घेतली गेली असल्यामुळे त्यास आपल्या अवनीतीचे मुळीच ज्ञान झाले नव्हते व त्याबद्दल विषाद मानण्याचेही त्यास कारण नव्हते. परंतु इंग्रजी अंमलाने त्यास ज्ञानाची द्वारे खुली होऊन त्यांचे डोळे उघडले असल्यामुळे ब्राह्मणांस भूदेव मानून त्यांची सेवा करणे हाच तुमचा धर्म आहे, हा उपदेश यापुढे अर्थातच त्यास मानवणार नाही व ते ब्राह्मणांच्या भूदेवत्वाविरुद्ध बंड केल्यावाचून कधीही राहणार नाहीत.”

         जोतिरावांनी आधीच सुरू केलेल्या सुधारणांचा संदर्भ देऊन आगरकर पुढे लिहितात. ”या बंडास यापूर्वीच सुरवात झालेली आहे. परंतु या वर्गात विद्येचा विशेष प्रसार झाला नसल्यामुळे त्याचे पूर्ण स्वरूप अजून भासू लागले नाही. विद्येचा जसजसा अधिक प्रसार होत जाईल, तसतसे शूद्रादी वर्गास हल्लीची वैषम्यावस्था अधिकाधिक टोचू लागून ते नाहीसे करण्यास ते जारीने प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. हौदावरून ब्राह्मणादिकांची जी आज अवहेलना होते, ती या भावी बंडाचीच सूचक होय.”

        मुळातल्या सामाजिक व धार्मिक मुद्याची राजकीय निष्पत्तीसुद्धा आगरकरांच्या ध्यानात आल्यावाचून राहिली नाही. ते असेही लिहितात की, ”राष्ट्रसभेसारख्या हितकारी संस्थेविषयीही या लोकांच्या मनात द्वैतभाव उत्पन्न होऊ लागला आहे व ते कदाचित काही मुसलमान, पारशी वगैरे लोकांप्रमाणे विघ्नसंतोषीपणा करतात की काय अशीही भीती वाटू लागली आहे. म्हणून देशकालवर्तमानाकडे नजर ठेवून परदेशस्थ म्लेच्छांशी व्यवहार करण्यास जसे आमचे लोक नाखुषीने का होईना - हळूहळू कबूल होत आहेत, त्याचप्रमाणे त्याच कारणाकरिता येथेही ब्राह्मणशुद्रातील वैषम्य होईल तितके कमी करण्यास त्यांनी मनाचा हिय्या केला पाहिजे.”

       शूद्रांबरोबर अशा प्रकारचा समतेचा व्यवहार करण्यात पाप आहे, ही कल्पना धर्मशास्त्राचा आधार घेऊन कित्येक शतके उच्च वर्णीयांच्या मनात वास्तव्य करून होती. मिल स्पेन्सरच्या विचारांचे संस्कार झालेल्या बुद्धिनिष्ठ आगरकरांना ती पटणे शक्य नव्हतेच. तथापि लोकांवर तिचा प्रभाव असल्याचे वास्तवही त्यांना ठाऊक होते. त्यानुसार ते पुढे सांगतात, आमच्या समजुतीप्रमाणे आम्ही त्यास पापाचरण करण्यास सांगत नाही. परंतु त्यात पाप आहे अशी त्यांची अद्याप समजूत असेल, तथापि, सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्याजति पंडितः’ या न्यायाने त्यांनी आपले आचरण ठेवले पाहिजे.”

         आगरकर या संदर्भात आणखी एका कटू गोष्टीची आठवणवजा जाणीव करून देतात - ”आमच्या या अतिकर्मठ पणामुळे आमचा अतिशूद्रवर्ग तर आम्ही गमावल्यासारखाच आहे. त्यापैकी बहुतेक लोकांनी आम्हाला यापूर्वीच रामराम ठोकला आहे व राहिलेल्यासही हात द्यायला मिशनरी वर्ग तयार आहेच. ”

       शूद्रांचा प्रश्‍न चर्चेला घ्यायची गरज आगरकरांना भासावी याचे एक तात्कालिक कारण म्हणजे नळावरचे भांडण. अहमदनगर येथे म्युनिसिपालिटीच्या सार्वजनिक हौदावर मुसलमानांची पहिल्यापासून पाणी भरण्याची जुनी वहिवाट होती. तेथे पूर्वीच्या काळी मुसलमानांचे राज्य होते व त्यांचे संख्याबाहुल्य प्रभावी होते म्हणूनही असेल, मधल्या काळात धर्मांतरित ख्रिस्ती लोक पाणी भरू लागले तेव्हा ब्राह्मण त्यांच्या विरोधात न्यायालयात गेले. न्यायालयाने ख्रिस्ती लोकांच्या बाजूने निर्णय दिला. आगरकर या बाबतीत ब्राह्मणांना कानपिचक्या देतात. उद्या असाच तंटा ब्राह्मण व नवजागृत शूद्र यांच्या दरम्यान उपस्थित झाला व ब्राह्मणांनी न्यायालयात तक्रार केली, तर न्यायालय शूद्रांच्या बाजूने निर्णय देईल याची जाणीवही ते करून देतात. अशावेळी ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् .... पद्भ्यां शुद्रोऽ जायत’ हे श्रृतिवाक्य चालणार नाही असेही बजावतात.

       एकीकडे काँग्रेसचे अधिवेशन लंडनमध्ये भरवण्याचे बेत करायचे आणि दुसरीकडे स्वदेशातील स्वधर्मीय शूद्रांना विषमतेची वागणूक द्यायची हा दुटप्पीपणा आता चालणार नाही हे त्यांचे सांगणे आहे. ते स्पष्ट इशारा देतात की, ”शहाणे असाल तर आमचे ऐका. यावर तुमचे ते सोवळे तुम्हास खुंटीवरच टांगून ठेवले पाहिजे. दोन दिवस सासूचे, दोन दिवस सुनेचे! सोवळे-ओवळे व तद्विषयक मूढ कल्पना यांचे साम्राज्य होते, तेव्हा त्यांनी वाटेल तसा जुलूम केला. ब्राह्मणास श्रेष्ठपद दिले व शूद्रास नीच ठरवले. खर्‍या ज्ञानाचा लोप केला व घोकंपट्टीस उत्तेजन दिले. धर्मविचारांची व मनाची फारकत करून टाकली व त्यांचे रहस्य शरीराच्या बाह्य कवायतीत आणून सोडले. आता यापुढेही अविचाराची बेबंद पातशाही चालणार नाही. आता अमक्याच्या पोटी जन्म झाला, म्हणून तोच श्रेष्ठ ठरेल. या जबरदस्त विचारओघाची गती अविचारबांधाने थांबू शकणारी नाही. नको तसे म्हणता हिचा तुमच्यावर परिणाम झाला आहे, होत आहे व पुढे झाल्यावाचून राहणार नाही. तेव्हा आता उगाच आढेवेढे घेण्यात काय अर्थ आहे?”

         सार्वजनिक हौदावर पाणी भरायच्या निमित्ताने आगरकर असे लिहिण्यास प्रवृत्त झाले असले आणि ब्रिटिशांकडे स्वराज्य मागावयाचे झाल्याला आपण आपली पात्रता सिद्ध करण्याचा, देशबांधवांना समान वागणूक देणे हा एक भाग असला, तरी आगरकरांची भूमिका प्रासंगिक तडजोडीची वा संधीसाधुपणाची नाही याचीही नोंद घ्यायला हवी.

        सर्व मानव प्राणी जन्मतः सारख्या योग्यतेचे अधिकारी असून, त्यांचे हक्कही एकसारखे असतात व ती योग्यता व ते हक्क त्यांच्याकडे राहणे हे केवळ त्यांच्या कमी-अधिक बुद्धिविकासावर व उद्योगशीलतेवर अवलंबून आहे? या सूत्राला ते सुधारणेचे श्रेष्ठ तत्त्व म्हणतात व त्याची अंमलबजावणी जगात सर्वत्र होत असल्याचेही निदर्शनास आणतात. त्याचबरोबर हिंदुस्थानात अद्याप अज्ञानमूलक किंवा अभिमानप्रेरित वैषम्यकल्पनांची पुटे बसत चाललेली आहेत हे सांगायला विसरत नाहीत. त्यामुळेच कालगतीने जातिभेदकल्पनावृक्षाचा आज येथे इतका काही विलक्षण विस्तार होऊन गेला आहे व त्याची मुळे इतकी काही खोल गेली आहेत, की त्याचे समूळ छेदन करणे एका सुधारकासच काय, परंतु सुधारकसहस्त्रांच्या कंपनीसही भारी व जोखमीचे वाटेल तर नवल नाही.” पण तरीही ही जोखीम घ्यायची त्यांची तयारी आहे व ती आपण निभावून नेऊ याची त्यांना खात्रीही आहे. म्हणून तर ते आव्हान देतात - सद्विचार कुठारापुढे या अज्ञानमूलक जातिभेदकल्पनावृक्षाच्या अखंड जाळ्याचा काय पाड?”

       श्रेष्ठ नीतितत्त्वाचा भाग क्षणभर बाजूला ठेवला व व्यावहारिक विचार केला तरी काय दिसते? आगरकर लिहितात, कोणत्याही देशाचे कोणत्याही बाबतीत पुढे पाऊल पडण्यास त्या देशातील लोकांमध्ये परस्पर प्रेमभाव असला पाहिजे व तो एकमताने व एकदिलाने वागण्यास तयार असले पाहिजेत, याबाबत कोणाचे मतभेद नाही; परंतु हा स्नेहभाव राहण्यास व एकमत उत्पन्न होण्यास जातिभेद आडवा येतो ही गोष्ट मात्र कबूल करण्याचे अनेकांच्या जीवावर येते. जातिभेद आपल्या अवनीतीचे एक कारण आहे, अशी त्यांची मनातून खात्री झाली नसते असे नाही, परंतु ती झाली आहे असे कबूल केल्यास त्याबरोबर आपल्या आचरणाची दिशा बदलण्याची जी जोखीम त्यांच्यावर येऊन पडते, ते त्यास पूर्वसंस्कारांमुळे अवजड वाटू लागते. त्यामुळे जातिभेदाची संस्था घातक नाही असे सिद्ध करण्याचा ते ओढून-ताणून प्रयत्न करू लागतात.”

        इतिहासाच्या अभ्यासकाच्या सहज लक्षात येण्यासारखे आहे, की हे सर्व लेखन करताना आगरकरांच्या नजरेसमोर जोतिराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाने उभारलेल्या बंडाचे निशाण फडफडत असणार.

        जोतिराव व त्यांचा समाज काँग्रेसच्या स्वराज्य संपादनाच्या प्रयत्नांकडे संशयाने पाहत होते व त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवत होते. वेदादि धर्मग्रंथांमधील उच्चनीचतेच्या कल्पनांना आव्हान देत होते हे नजरेसमोरचे वास्तव नाकारणे ही आत्मवंचनाच ठरली असती. पण स्वराज्याच्या प्रयत्नात सहकार्य करणे दूरची गोष्ट, ही मंडळी धर्मात राहिली तरी पुष्कळ असे वाटण्याइतकी परिस्थिती गंभीर होती आणि ते या सनातनी कर्मठांना कळत नव्हते याची आगरकरांना खंत आहे.

         त्या काळात अनेक अस्पृश्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. पण अद्याप त्याची लागण शूद्रांना म्हणजे स्पृश्य ब्राह्मणेतरांना झाली नव्हती. तेव्हा निदान आता तरी जागे व्हा आणि भूतकाळातील चुकांची दुरुस्ती करा असे आगरकर आपल्या ज्ञातिबांधवांना कळकळीने विनवतात. शूद्रांना अतिशूद्रांइतके वाईट वागवले जात नाही हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचाच आधार घेऊन ते सांगतात, की शूद्रादिकासंबंधाने आमचा कर्मठपणा बहुतेक यापूर्वी चेपून गेलेला आहे. तोच जरा अधिक चेपण्यास आम्ही तयार झालो व हल्ली असलेले परस्परांतील वैषम्य आम्ही अंशतः तरी कमी करण्याचा निश्‍चय केला, तर या वर्गाकडून होणार्‍या बंडाचे परिणाम आम्हास फारसे भोवणार नाहीत. तेव्हा सध्याच्या वस्तुस्थितीकडे लक्ष देऊन आमचे लोक हे वैषम्य वाढविण्याच्या घातक प्रयत्नास लागणार नाहीत अशी आम्ही आशा करतो.”

       आगरकरांचा हा आशावाद पुढे अरण्यरुदन ठरल्याने ब्राह्मणेतर चळवळ आणि त्यातून सामाजिक तेढ वाढली.

आगरकरकालीन विचारप्रवाह

         गोपाळ गणेश आगरकर यांच्या सामाजिक विचारांची मीमांसा करताना तत्कालीन वैचारिक वातावरणात सुधारणांचे (सुधारणाविरोधाचे) कोणकोणते प्रवाह वाहत होते याचा उल्लेख करून ती करता येईल.

         समाजातील उच्चशिक्षितांनी काढलेल्या रानडे-भांडारकरांचा प्रार्थना समाज हा पहिला प्रवाह होय. प्रार्थना समाजाचे लोक नेमस्त राजकारण व नेमस्त समाजकारण करणार होते. त्यांना नरम सुधारक असे म्हटल्यास आगरकरांना गरम सुधारक असे म्हणता येईल. हे दोन प्रवाह एकत्र होण्याचे कारण म्हणजे त्यांचा समान विरोधक. हा विरोधक म्हणजे टिळकांच्या नेतृत्वाखालील गरमच काय, पण नरम सुधारकांकडेसुद्धा वक्र दृष्टीने पाहणारा वर्ग होय.

         टिळक वधू-वरांच्या लग्नाचे वय वाढविण्यासाठी संमतीचा कायदा सरकारकडून करवून घ्यायच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्याकडे कर्मठ प्रतिगाम्यांचे नेतृत्व आपोआप आले. त्याबाबत आगरकर लिहितात, ”सर रोमेशचंद्रांसारखे पुरुष बंगाल इलाख्यात, सर टी. माधवरावांसारखे मद्रास इलाख्यात आणि रा. टिळकांसारखे या इलाख्यात लोकांच्या नावाने संमतीच्या बिलाचा पाडाव करण्यास उभे राहिले आहेत. हे पाहून खेदाने व लज्जेने (आम्ही) आपली मान खाली घालतो.”

          टिळकांच्या संदर्भातील त्यांचा आणखी एक शेरा चिंतनीय आहे - या घटकेस साधा--- असलेल्या सुधारणांची इयत्ता आणि तिची साधने याविषयी टिळकांचे बहुतेक विचार सामान्य लोकांस मान्य होण्यासारखे असल्यामुळे किंवा त्यांस मान्य असलेल्या विचाराबाहेर जाण्यास टिळक तयार नसल्यामुळे त्यांचे वर्तन भवभूतीने रामचंद्रांकडून वटविलेल्या स्नेह, दया, सौख्य, फार तर काय लोकांच्या संतोषासाठी मला जानकीचा त्याग करावा लागला तरी त्याबद्दल खेद वाटणार नाही” या श्‍लोकार्थाप्रमाणे होत आहे व या क्षणी ते अत्यंत लोकप्रिय झाले असून, प्रत्येकाच्या तोंडातून त्यांचे नाव निघत आहे. पण लोकांना आज ज्या गोष्टी प्रिय आहेत, त्या या हतभाग्य लेखकास पसंत नसल्यामुळे लोकछंदानुवर्तन त्याला अशक्य झाले आहे. इतकेच नाही तर लोकांस अप्रिय, परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्या मर्जीविरुद्ध पुनःपुन्हा त्यांच्या समोर आणणे हेच आपले कर्तव्य व जीविताचे सार्थक अशी त्याची दृढ कल्पना झाली असल्यामुळे -- श्रद्धाळू पंडितमन्य व देशाभिमानी म्हणवून घेणार्‍या जनसमूहाच्या उपहासाचे व रोषाचे स्थान त्याने आपणास करून घेतले आहे.”

         आगरकरांचा हा उतारा सुधारणांच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे. भवभूतीच्या -- उत्तररामचरित्रातून त्यांनी उद्धृत केलेले वाक्य रामाने लोकापवादातून केलेल्या सीतेच्या त्यागाला अनुलक्षून आहे. त्यातील मूळ शब्दप्रयोग आराधनाय लोकानां’ असा आहे. त्यावरूनच आगरकरांनी टिळकांवर लोकाराधनतत्पर’ अशी टीका केली.

          आगरकरांच्या उपरोक्त अवतरणातून आगरकर एक धीरोदात्त शोकात्म नायक (Tragic---- Hero)  या रूपात पुढे येतात. पण मग आगरकरांच्या दृष्टीने रामाने काय करायला आणि काय म्हणायला हवे होते?  याचे उत्तर आगरकर कोठे देत नाहीत. पण आपण त्याची कल्पना करू शकतो. रामाने अयोध्येच्या राज्यावर लाथ मारून सीतेसह -- ते राज्यच सोडून जायला हवे होते! रामचरित्राचा असा शेवट असलेले नाटक कदाचित लिहिले असते, तर ते भासानेच! पण भास महाभारतावरील नाटकचक्राच्या बाहेर पडला नाही व त्यामुळे आपण एका वेगळ्याच कलाकृतीला मुकलो!

         यावर राम आणि टिळक यांच्या बाजूनेही काही लिहिता येईल. रामाने सीतेचा त्याग केला तो त्याला स्वतःला त्या राज्याचा उपभोग घ्यायचा होता म्हणून नव्हे. भवभूती या प्रकरणात ’आराधनाय लोकानाम’ असा शब्दप्रयोग करतो. लोकांची मर्जी राखण्यासाठी टिळकांनी त्यासाठी लोकसंग्रह’ हा भगवद्गीतेतील शब्दप्रयोग केला असता.

         पण मुद्दा तोही नाही. चुकीची मते धारण करणार्‍या लोकांना नीट समजावून सांगून शहाणे करणे, प्रगल्भ बनवणे हासुद्धा लोकाराधनेचा - लोकसंग्रहाचा भाग होत नाही काय?

         आणि मुख्य म्हणजे सीता रामाची पत्नी असली, तरी तिचा समावेश लोकांत अथवा रामाच्या प्रजेत होत नाही का?

          गौतम ऋषींनी लोकापवादभयापोटी टाकून दिलेल्या अहिल्येचा उद्धार करणारा राम आणि त्याच कारणातून सीतेचा त्याग करणारा राम या रामाच्या दोन व्यक्तित्त्वांमधील संघर्षालाही कदाचित भासाने नाटकाचा विषय केला असता का?

        टिळक-आगरकरांच्या मैत्रकथेतील शोकात्मता विश्राम बेडेकरांना जाणवली व ती त्यांनी ’टिळक आणि आगरकर’ या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्या नाटकाचा शेवट मेलोड्रॅमॅटिक’ पद्धतीने करून त्यांनी ही कृती आपली आपणच फसवली.

       वस्तुस्थिती अशी आहे, की ज्या लोकाराधनेसाठी सुधारणारूपी सीतेचा त्याग करायला टिळक तयार झाले होते, ती त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर नव्हतीच; परंतु मूर्खाच्या मूर्खपणाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्हती. ज्या-ज्या म्हणून बंधनाने लोकांना एकत्रित ठेवून स्वराज्यलढ्यासाठी प्रवृत्त करता येईल त्याचा-त्याचा उपयोग करायला टिळक तयार होते. धर्मबंधन’ हे एक दृढ व प्रभावशाली बंधन असते. संमती वयाच्या कायद्याला - त्यातील परकीय सरकारच्या हस्तक्षेपाचे निमित्त करून, त्यातून तुमच्या धर्मावर आघात होतो आहे असे लोकांना पटवीत त्यांच्यात असंतोषाचा अग्नी चेतवायचा टिळकांचा प्रयत्न होता. हा अग्नी धगधगीत ठेवण्यासाठी फक्त कोरडी लाकडे वापरावीत, असा आगरकरांचा आग्रह होता, तर टिळकांनी सुक्याबरोबर ओलेही जळणार या व्यवहारावर बोट ठेवले असते.

      सीता त्यागाकडे स्त्रियांच्या प्रश्‍नाच्या दृष्टीने बघितले जात असल्याने त्याची चर्चाही त्याच पद्धतीने होत असते; परंतु शेवटी-शेवटी रामाने लक्ष्मणाचीसुद्धा हकालपट्टी केल्याचा प्रसंग रामचरित्रात नाही. हा खरे तर अत्यंत निष्ठावान भावावर केलेला अन्यायच होता; पण तो का करावा लागला तर अन्यथा दुर्वास ऋषी अयोध्यानगरीचाच शाप देऊन नाश करायला सिद्ध झाला होता. ज्या लक्ष्मणाने राजा असलेल्या भावाच्या आज्ञेवरून सीतेला वाल्मीकींच्या आश्रमाजवळ सोडले त्याच्यावरच त्याच राजाच्या आज्ञेवरून ही वेळ यावी याला एक काव्यगत न्याय समजायचा की मूळ शोकात्मिकेचा विस्तार?

        या संदर्भात आगरकर-टिळकांचे विचार सामान्य लोकांस मान्य असणे आणि सामान्य लोकांस मान्य असलेल्या विचारांच्या बाहेर टिळकांनी जाणे असे दोन पर्याय सांगत असले, तरी त्यांचा स्वतःचा पर्याय दुसरा आहे हे लक्षात घ्यायला हवे. टिळक हे सुधारणेच्या बाजूचे असूनही सुधारणाविरोधकांचे अधिक्य असल्यामुळे त्यांच्यात शिरले आहेत हा आगरकरांचा आरोप होताच; पण त्याचा अर्थ टिळक या लोकांचे नेतृत्व सुधारणांना अडवण्यासाठी करीत होते असा नाही. त्यांचे नेतृत्व संपादन करून त्यांचे सामर्थ्य स्वराज्याच्या प्राप्तीच्या लढ्यासाठी वापरणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते व त्यात त्यांना बर्‍यापैकी यशही मिळाले.

         टिळकांसारखे यश नंतरच्या काळात स्वा. सावरकरांना का मिळू शकले नाही याचे स्पष्टीकरण टिळक व सावरकर यांची या संदर्भात तुलना केली तर करता येईल. टिळकांचाच राजकीय विचार पुढे नेत असल्याचा दावा करणारे सावरकर सामाजिक बाबतीत आगरकरांसारखे गरम धोरण स्वीकारू पाहत होते. त्यानुसार त्यांनी हिंदू धर्मावर आगरकरांसारखी किंबहुना त्यांच्यापेक्षाही जहाल टीका करायला सुरवात केली. त्यामुळे त्यांचे अनेक संभाव्य अनुयायी त्यांच्यापासून दुरावले. सावरकरांनी जी गफलत केली तीच गफलत आगरकर टिळकांना करायला सांगत होते; पण टिळक ती करणार नव्हते.

       सावरकरांनी ती केली याचे एक कारण म्हणजे सावरकर आगरकरांसारखेच मिल स्पेन्सरांना - अनुसरणारे उपयुक्ततावादी होते. धर्माची तत्त्वे उपयुक्ततावादी बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहिली की एकामागे एक निरुपयोगी ठरू लागतात, हे वेगळे सांगायची गरज नाही.

        थोडक्यात, टिळकांचे गरम राजकारण व आगरकरांचे गरम समाजकारण यांचे मिश्रण म्हणजे नंतर उत्पन्न झालेला सावरकरी प्रवाह होय! अर्थात आगरकरांच्या हयातीत त्यांच्या राजकीय गरमपणाला व्यक्त व्हायला वावच मिळाला नाही. तसे प्रसंगच त्यांच्यावर आले नाहीत. त्यांच्या लेखनावरून व टिळकांनी केलेल्या त्यांच्या मूल्यमापनावरून त्यांना राजकीय दृष्टीनेही गरम म्हणू शकतो.

        विचारसरणीच्या पातळीवर आगरकर आणि सावरकर यांच्यात दोन साम्यस्थळे ठसठशीतपणे आढळत असल्याचे या अगोदरच स्पष्ट केले आहे.

          सुधारकांना टिळकांसारखा मातब्बर नेता लाभल्यामुळे गरम राजकीय विचारांच्या आगरकरांना आपला राजकीय गरमपणा बाजूला ठेवून नरम राजकारण करणार्‍या रानडे यांच्याबरोबर जावे लागले. रानडे-भांडारकरप्रभृती मंडळींचे धर्मविषयक धोरण आगरकरांच्या धोरणांपेक्षा वेगळे होते. त्यांची एकूणच जीवनदृष्टी आगरकरी जीवनदृष्टीशी मेळ खाणारी नव्हती. विसंगतीचे एखादे स्थळ दाखवले तरी पुरेसे. न्या. रानडे यांच्या प्रार्थना समाजाच्या एका उत्सवात रानडे यांनी केलेल्या भाषणाचे वृत्तांकन करून त्यावर आगरकरांनी केलेली टिप्पणी पाहिली, तर या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. या वृत्तानुसार, रानडे यांच्या म्हणण्याप्रमाणे तुकाराम अत्यंत शांत व ईश्‍वरपरायण होता. जन्मास येऊन त्याने आपल्या हयातीत जे केले ते करण्याचा बोजा आजकाल प्रार्थना समाजावर येऊन पडला आहे. तेव्हा त्याच्या घटकावयवांस- शांत वृत्तीचा स्वीकार केलाच पाहिजे.”

         आगरकरांना तुकारामांसारख्या संतांबद्दल आदरच नव्हता असे नाही; पण त्यांचे कार्य पूर्णतः पारलौकिक स्वरूपाचे असून, सामाजिक वा राजकीय सुधारणांचे प्रश्‍न लौकिक आहेत, असे आगरकरांचे मत होते. त्याची निष्पत्ती म्हणजे - रिपनसारख्याच्याने किंवा पेरिक्लीजसारख्याच्याने ऐहिक सुखासंबंधाने पाच वर्षांत जितक्या गोष्टी करवतील त्यांचा एक शतांशसुद्धा शंभर संतांच्याने त्यांच्या शंभरपट वेळात होणार नाही.”

         मनुष्य जीवनाची ऐहिक क्षेत्रे धर्माशी अतूटपणे संलग्न आहेत असे मानणार्‍या रानडेप्रभृतींपेक्षा आगरकरांचे मत एकदम वेगळे आहे. रानडेप्रभृतींच्या म्हणण्याप्रमाणे धर्म हा सामाजिक सुधारणांचा पाया असला पाहिजे. हे मत पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारल्याचे दिसून येते आणि विशेष म्हणजे टिळकांचे मतसुद्धा असेच होते.

       अर्थात लौकिक-ऐहिक एका बाजूला व पारलौकिक धार्मिक दुसर्‍या बाजूला अशी विभागणी करणारे आगरकर हिंदू धर्म किंवा आर्यत्व सोडायला कसे तयार नाहीत याची चर्चा यापूर्वी केलेली आहेच.

         मंत्र, तंत्र, पूजा, प्रार्थना, विधी (कर्मकांड) यांच्यात आगरकरांना रस नव्हताच. आता या गोष्टी वजा करूनही हिंदुत्व किंवा आर्यत्व काय उरते याची चर्चा आगरकरांनी केली नाही. हिंदू धर्माची तात्त्विक भूमिका इतकी उदार व खुली आहे, की आगरकरांचा अज्ञेयवाद किंवा अगदी निरीश्‍वरवाददेखील त्यात बसू शकतो. पण हा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी टिळकांनी हिंदूची व्याख्या करताना घातलेली वेदप्रामाण्याची अट बाजूला केली पाहिजे. ते काम नंतर सावरकरांनी केले. म्हणजेच या संदर्भात आगरकर - सावरकर अशी संगती आहे. मुद्दा एवढाच आहे, की रानडे, टिळक, आगरकर, सावरकर या सर्वांमध्ये हिंदुत्वाचे समान सूत्र सापडते. जरी त्यांच्या-त्यांच्या हिंदुत्वाचे स्वरूप व व्याप्ती यांच्यात फरक आहे. रानडे महाराष्ट्रीय संतांचा भागवत धर्म हे हिंदुत्वाचे उत्क्रांत व उज्ज्वल स्वरूप मानतात. इतकेच काय, पण याच भागवत धर्माची तौलनिक धर्माच्या चौकटीत केलेली मांडणी, अर्थात प्रार्थना समाज म्हणजे नवभागवत धर्म असे रानडे यांचे प्रतिपादन होते. या धर्माची कास धरूनच समाजकारण व राजकारण करायला हवे. सामाजिक व राजकीय सुधारणा करायला हव्यात असा त्यांचा आग्रह होता. रानडे संप्रदायात वावरूनसुद्धा आगरकर याबाबतीत आपले वेगळेपण राखून होते. ऐहिक व पारलौकिक यांची गल्लत करू नये असे त्यांचे म्हणणे होते.

       मतामतांच्या या गलबल्यात - आणखी एका महत्त्वाच्या प्रवाहाकडे दुर्लक्ष होता कामा नये. तो म्हणजे महात्मा जोतिराव फुले यांचा सत्यशोधक समाज व त्याचे राजकीय रूपांतर - ब्राह्मणेतर चळवळ.

आगरकरांचे हिंदुत्व

        ”आगरकर हे आमच्यासारखेच प्रखर राष्ट्रीय विचारांचे असून, त्यांना गुलामगिरीचा आमच्या इतकाच तीव्र तिरस्कार वाटतो,” अशा अर्थाची विधाने टिळकांनी केलेली आहेत व ती खरीही आहेत. मग दोघांच्यात फरक उरतो?

      पहिली गोष्ट अशी, राजकीय स्वातंत्र्य ही टिळकांसाठी प्राधान्यक्रमाची व तातडीची बाब होती. त्यामुळे ते ज्या कोणत्या मार्गाने मिळवणे शक्य होईल, त्या मार्गाचा उपयोग करून मिळवण्यात टिळकांना काही गैर वाटत नसे. साध्याने (हेतूने) साधनांचे समर्थन होते हे त्यांचे व्यापक नैतिक सूत्र होते.

         हर्बर्ट स्पेन्सरला अनुसरणारे आगरकर उत्क्रांतीवादी होते. त्यामुळे स्वराज्याची निकड त्यांनाही असली, तरी घाई मात्र नव्हती. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, घाईने घडवून आणलेली राज्यक्रांती कधीही हितावह होत नाही. पुष्कळदा इतके मात्र होते की अशा घाईमुळे देशास उन्नती आणणारी जी सामर्थ्य असतात, ती धुळीस मिळून देशच्या देश अजिबात नाहीसे होतात किंवा निरंतर दास्यास पावतात. घाई करून जावयाचे आहे कोठे? काल निरवधी आहे व जनन अनंत आहे. ज्या गोष्टी आजच्या पिढीला असंभवनीयशा वाटत आहेत, त्या तेथून दहाव्या पिढीला कदाचित सुकर वाटतील व विसाव्या पिढीच्या हातून घडूनही येतील.’

       आगरकरांचे हे उद्गार संभाव्य रशियन आक्रमणाच्या संदर्भात व रशियासारख्या परक्या सत्तेच्या मदतीने ब्रिटिशांना हिंदुस्थानातून हाकलून देण्याची स्वप्ने पाहण्याच्या उतावळ्यांच्या भूमिकेला अनुलक्षून केले गेले असले, तरी तो त्यांचा सर्वसाधारण सिद्धांत मानण्यास हरकत नसावी.

      टिळक मात्र स्वराज्यासाठी सैतानाचीही मदत घ्यायला तयार असणार्‍यांपैकी होते. नंतरच्या काळात त्यांनी ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्याशी संगनमत करून अफगाणिस्तानच्या अमिराच्या मदतीने ब्रिटिश सत्तेविरुद्ध काही कट शिजवला असल्याची चर्चा होती. एकदा ब्रिटिशांना घालवून दिले म्हणजे पुढचे पुढे पाहता येईल. ज्याच्या साह्याने हे कृत्य केले, त्यानेच उलटून आपले स्वातंत्र्य परत बळकावले तर परत लढा उभारू, अशी टिळकांची भूमिका असणार.

      साध्यसाधन विवेकाचा म्हणजेच साधनशुचितेचा प्रश्‍न टिळक-आगरकर वादात उपस्थित झाला नव्हता. तो प्रश्‍न टिळक-गांधींच्या वादातील आहे.

       या वादात आगरकरांनी काय भूमिका घेतली असती हे सांगणे सोपे नाही. मात्र, तरीही सामाजिक किंवा गृह सुधारणांची सबब सांगत स्वराज्यप्राप्तीसाठीच्या कृतीपासून दूर राहणे हे आगरकरांना आवडले नसते.

         सामाजिक सुधारणांचे महत्त्व सांगून राजकीय स्वातंत्र्य लांबले तरी चालेल ही भूमिका कोण घेतो याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच असे सांगणार्‍याचा हेतू काय हेही महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा इंग्रज राज्यकर्ता असा सल्ला देतो, तेव्हा तो तपासून घ्यायला हवा. आगरकर अशा अनाहूत फुकट सल्लागारांवर टीका करायला बिचकत नाहीत.

      न्या. काशिनाथपंत तेलंगांसारखा माणूस, जो एरवी रानडे-भांडारकरांचा साथीदार मानला जात होता, एकदम राजकीय स्वातंत्र्याचे गोडवे गाऊ लागतो, तेव्हा आगरकर काहीसे संभ्रमात पडल्यासारखे वाटतात. तेलंगांच्या व्याख्यानाचे सार सांगण्यासाठी त्यांनी ’केसरी’चे दोन अंक वापरले. खरे तर सामाजिक सुधारणांसाठी राजकीय सुधारणा मागे टाकायला सांगणार्‍यांना खुद्द प्राचार्य वर्डस्वर्थ यांनी फटकारले होते. त्याचाही उल्लेख करायला आगरकर विसरत नाहीत. वर्डस्वर्थ यांनी श्री. मलबारी यांना लिहिलेल्या पत्राचा सारांश आगरकरांच्या शब्दांत -” सामाजिक सुधारणांसाठी अगदी जीव सोडण्याची गरज नाही. राजकीय सुधारणा होत चालली म्हणजे तिच्यात कधी बरोबर, कधी किंचित पाठीमागून सामाजिक सुधारणा होत जाते.”

          एरवी सामाजिक सुधारणांचा हिरिरीने पुरस्कार करणार्‍या आगरकरांच्या लेखनातील अशी स्थळे म्हणजे ’टिळक-आगरकर’ नाटक लिहिणार्‍या विश्राम बेडेकर यांना आगरकरांच्या विचारविश्‍वातील धरणीकंप वाटला. खरे तर या प्रकारांत धरणीकंप वगैरे काही नव्हता. टिळक आणि आगरकर यांच्या विचारांचे व त्यांच्यातील वादाचे आपण सुलभीकरण करून सोडले आहे.

’           आधी सामाजिक की राजकीय’ ही या वादाची अत्यंत बालबोध मांडणी झाली. एकूण प्रश्‍न खूप गुंतागुंतीचा होता. त्याचे पदर न उलगडता आपण एकाला पुरोगामी व दुसर्‍याला प्रतिगामी ठरवून मोकळे होतो.

      टिळकांनी स्वराज्येच्छू आणि स्वातंत्र्यप्रेमी असण्यास आगरकरांची हरकत असण्याचे कारण नव्हते. स्वतः आगरकरही तितकेच स्वराज्येच्छू व स्वातंत्र्यप्रेमी होते. मुद्दा स्वराज्याच्या नावाखाली सामाजिक सुधारणांना विरोध करण्याचा होता. टिळक अल्प सामर्थ्याचा मुद्दा उपस्थित करीत सामाजिक सुधारणांबद्दल उदासीन राहिले असते, तरी आगरकरांना चालले असते. पण ते सुधारणाशत्रूंशी हातमिळवणी करून त्यांना बळ देऊ लागले. इतकेच नव्हे, तर त्यांचे नेते गणले जाऊ लागले, तेव्हा आगरकरांपुढे टिळकांवर टीकास्त्र सोडण्याखेरीज पर्याय उरला नाही.

       तत्कालीन आगरकरादी सर्व उच्चवर्णीय समाजसुधारकांच्या सुधारणांच्या कल्पनांची गोळाबेरीज करून तिचे सार काढले, तर ती प्रक्रिया स्त्रियांची सुधारणा आणि त्यातही स्त्रीशिक्षण या कल्पनेवर येऊन थांबते. ’केसरी’ चालवताना टिळकांच्या बरोबर असलेले आगरकर स्त्रियांच्या प्रश्‍नाविषयी रानडे-भांडारकरादी प्रार्थनासमाजी उदारमतवादी सुधारकांच्या मताशी नुसतेच सहमत नव्हते, तर सहानुभूती बाळगून होते. केसरी’मधील त्यांचा ’हिंदुस्थान देश बुडाला, हो, ठार बुडाला!’ हा अग्रलेख पाहण्यासारखा आहे. पहिल्यांदा ते सुधारणाविरोधकांच्या मतांचे सार सांगतात-

     ”हे रानडे आणि हे भांडारकर! हे पंडित आणि हे मोडक! हे आमच्या समाजाचे पुढारी! यांच्या अकला गेल्या तरी कोठे! ज्या वयात बुद्धीचा आणि विचारशक्तीचा पूर्ण विकास व्हावयाचा व चांगली गोष्ट कोणती व वाईट कोणती हे चांगले कळावयाचे, त्या वयातच यांना चळ लागला नाही ना?’ ही शिव्याशापांची लाखोली आगरकर उद्धृत करतात.

        हिंदुस्थानची संपत्ती स्त्री-शिक्षणाकडे लावण्यापेक्षा ती समुद्रात तरी का नाही लोक ओतीत? हे भरतखंडवासी आर्य जनहो, स्त्रियांस विद्यामृत पाजून त्यांस जारिणी होऊ देणे तुम्हास बरे वाटते का?’ या विरोधकांच्या उद्गारांवरून त्यांची स्त्री शिक्षणासंबंधीची मते सहज समजून येण्यासारखी आहेत. अशा मतांच्या लोकांचे नेतृत्व टिळकांसारख्यांनी करावे यामुळे आगरकरांना येणारा सखेद संतापही समजण्यासारखा आहे.

       स्त्रीशिक्षण विरोधकांचे सारे अभावात्मक आणि नकारात्मक आक्षेप खोडून आगरकर जो आशावाद प्रगट करतात, तो तेच करू जाणोत - आमची पूर्ण खात्री आहे की स्त्री आणि पुरुष या उभय जातींत ज्ञानाचा जो जो अधिक प्रसार होत जाईल, तो तो मनुष्यजातीची हरएक प्रकारे सुधारणा होईल व ज्या वेळेस या भरतखंडात गार्गीवाच कनवी, वडवाप्रातीथेयी व सर्वामैत्रीयी यांच्याप्रमाणे सार्‍या स्त्रिया अत्यंत ज्ञानवती होतील, त्या वेळेस हे भरतखंड स्वातंत्र्यादी ऐहिक सुखांचा पूर्ण अनुभव घेईल. इतकेच नाही, तर त्या स्थितीत कोणतीही इच्छा परिपूर्ण न होण्याचा संभव न राहिल्यामुळे, या पृथ्वीवर स्वर्गस्थिती अवतरल्यासारखी होईल किंवा ही पृथ्वीच स्वर्गतुला होईल!”

      आगरकरांचे हे अवतरण मराठी साहित्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाणारे कवी केशवसुत हे आगरकरांचे अनुयायी होते, हे आपण जाणतोच. त्यांच्या कवितेत स्वर्गसमक्षता’ हे ऐहिक मूल्य आढळते, असे प्रसिद्ध समीक्षक दि. के. बेडेकर यांनी दाखवून दिले आहे. केशवसुतांच्या या मूल्याचे उगमस्थान आगरकरांचे प्रस्तुत वाक्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.

        स्त्रीशिक्षणाचा प्रश्‍नही वरवर दिसतो तितका सरळ नाही. स्त्रीशिक्षणास अनुकूल असणार्‍यांमध्येसुद्धा अंतर्गत मतभेद होतेच. स्त्रियांना शिक्षण द्यायचे झाल्यास जे शिक्षण पुरुषांना देण्यात येते, ते द्यायचे की त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम ठेवायचा हा पहिला प्रश्‍न. या शिक्षणाचे माध्यम पुरुषांच्या प्रमाणेच इंग्रजी ठेवायचे की मराठी हा दुसरा.

         या संदर्भात आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. पश्‍चिमेकडे स्त्रीदाक्षिण्य’ नावाचा प्रकार आहे व त्याचे अनुकरण भारतातील नवशिक्षित करू लागले होते. विनय, सहनशीलता असे काही पुरुषांमध्ये सहसा न आढळणारे गुण स्त्रियांमध्ये आढळतात. याचे या लोकांना कोण कौतुक! पुढे विशेषतः रविकिरण मंडळाच्या काळात मराठी कवींनी स्त्रियांचे जणू दैवतीकरणच केले व त्यामुळे ते हास्यास्पदही ठरले.

        अशा प्रकाराला आगरकरांचा विरोध होता. ते लिहितात, स्त्रियांच्या अंगी तारीफ करण्यासारखे जे गुण दिसतात, ते बहुतेक अंशी त्यांच्या दास्याचे परिणाम होत. पूर्वीच्या लोकांप्रमाणे स्त्रिया म्हणजे पायाखालची धूळ हे मत जसे आम्हास पसंत नाही, त्याचप्रमाणे अलीकडे त्यांची फाजील प्रशंसा करण्याचा जो प्रघात पडला आहे, तोही आम्हास अप्रशस्त वाटतो. एज्युकेशनल कमिशन निघाल्यापासून एक-दोन बायकांच्या संबंधाने मोठेच बंड माजले आहे व त्यांच्या प्रशंसकांनी त्यांच्या गुणाची तुतारी वाजवून लंडनपर्यंत त्यांचा लौकिक पसरून दिला आहे. अशा कृपेस त्या पात्र आहेत किंवा नाहीत, याचा आम्हास मोठा संशय आहे.’

          स्त्री आणि पुरुष यांना समतेने वागवण्याचा आगरकरांचा आग्रह आहे, स्त्री-पुरुषांना समान शिक्षण आणि समान स्वातंत्र्य द्या; आपण होऊन डावा-उजवा हात करू नका, असे करून जी व्यवस्था होईल ती होवो.”

         समतेच्या संकल्पनेबद्दल आगरकर निःशंक आहेत - डॉ. हंटर यांनी प्रसन्न होऊन कोण्या स्त्रीला मुद्रावदान केले, म्हणून केसरी समता सोडून तिच्या गुणाची टिमकी वाजवील असे नाही. स्त्रियांची उन्नती होणे ही गोष्ट केसरीस अत्यंत इष्ट आहे व ती होण्यासाठी तो आपल्याकडून होईल तितके परिश्रम करील; परंतु शुष्क गुणांसाठी एखादीला हरभर्‍याच्या झाडावर चढविण्याचे काम त्याच्याने होणार नाही.’

         आज ज्या अर्थाने पुरोगामी’ या शब्दाचा वापर केला जातो, त्या अर्थाने आगरकरांना पुरोगामी म्हणता येत नाही, याचीही येथे नोंद केली पाहिजे. आगरकरांनी हिंदू धर्मावर कठोर टीका केली, पण ती करण्यामागचा त्यांचा उद्देश आणि त्याच प्रकारची टीका करणार्‍या पुरोगाम्यांचा उद्देश यातील फरक समजून घेतला पाहिजे. आगरकरांनीच म्हटल्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या फांद्या वगैरे तोडून त्याला यासाठी खच्ची करतात की, तो नव्या जोमाने वाढावा, अधिक वाढावा, तसेच त्यांच्या या टीकेचे आहे. इतकेच काय तर सुधारणा करताना आपली मूळ प्रकृती किंवा भारतीय आर्यत्व न सोडता करायच्या असे त्यांनी जाहीरच करून टाकले होते.

        आर्यत्वाच्या या सूत्राची अंमलबजावणी आगरकर स्त्रियांच्या प्रश्‍नांच्या संदर्भात कशी करतात हे पाहण्यासारखे आहे.

         सुधारणा म्हणजे पाश्‍चात्यांचे अनुकरण ही कल्पना आगरकरांना मान्य नाही. चिमाबाईचे एमाबाईशी सख्य होणार कसे?’ या लेखात त्यांनी अशा सख्याची स्वप्ने पाहणार्‍या सर टी. माधवरावांसारख्या मातब्बराच्या मतांची अव्यवहार्यता व अनावश्यकता दाखवून दिली आहे. अशा प्रकारच्या सख्यासाठी एकतर ब्रिटिश बायकांना स्थानिक देशी (उदा. मराठी) भाषा शिकावी लागेल किंवा भारतातील बायकांना इंग्रजी शिकावी लागेल. ब्रिटिश बायका देशी भाषा मुळीच शिकणार नाहीत, असे आगरकर दाखवून देतात आणि उद्या दुसर्‍या पर्यायानुसार भारतीय बायकांनी इंग्रजी शिकून घेतली तरी हे सख्य होणार नाही. कारण सख्यासाठी अनेक गोष्टींमध्ये साम्य असावे लागते, ते तर नाही आणि ते आणायचे म्हटले तर भारतीय बायकांना ब्रिटिश मडमांचे अनुकरण करावे लागेल. त्याला आगरकरांचा तीव्र विरोध आहे. अशा अनुकरणाची सक्ती आपल्या बायकांवर करणार्‍या आंग्लाळलेल्या पुरुषांवर आगरकर टीकेची झोड उठवतात. कित्येक आपल्या बायकांवर गाउन म्हणजे झगे चढवितात! कित्येक कुंकू पुसून डोक्यावर कॅप्स किंवा वेताच्या टोप्या घालवितात. कित्येकांनी आपल्या बायकांस ब्रेड व बिस्कुटे तयार करण्यात पटाईत केले आहे... कित्येक बायकांची मोठी शिफारस काय ती पियानो वाजविण्याची माहिती!’

         असा उपहास केल्यावर आगरकर लिहितात, स्त्रियांना देता येईल तितके शिक्षण व स्वातंत्र्य देण्याविषयी आम्हास बिलकुल मत्सर नाही. पण युरोपियन लोकांच्या मडमांशी त्यांचे सख्य होण्यासाठी त्यांना मॅडम बनविण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा आम्हास मोठा तिरस्कार आहे. आम्हास व आमच्या स्त्रियांस साहेब आणि मॅडम बनवायचे नाही. आम्हास व आमच्या स्त्रियांस आर्यत्व कायम ठेवून जितकी सुधारणा, तेवढ्या झपाट्याने करवेल तितकी तेवढ्या झपाट्याने करावयाची आहे. अखेरपर्यंत होता होईल तो हिंदू राहावयाचे असा आपला निश्‍चय असला पाहिजे...’

         येथे टिळक आणि आगरकर जवळ येतात. मुद्दा एवढाच आहे, आगरकरांचा सामाजिक सुधारणांचा झपाटा टिळकांना पेलणारा नाही व टिळकांच्या राजकीय सुधारणांचा झपाटा आगरकरांना मानवणारा नाही.

**********

         आगरकर आणि टिळक यांनी अनुक्रमे ’केसरी’ आणि ’मराठा’ ही मराठी आणि इंग्रजी पत्रे सुरू केली, तेव्हा ’निबंधमाला’ या मासिक पुस्तकाचे उत्पादक व संपादक विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांच्या समवेत होते. ते केसरी’च्या संपादक मंडळातही होते.

        सुरवातीला शाळा काढण्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांमध्ये तेच ज्येष्ठ व पोक्त असल्यामुळे त्यांच्याविषयी इतर सहकार्‍यांना पूज्यताबुद्धी होती. त्यामुळे टिळक - आगरकर - नामजोशी अशा या वर्तुळातील तरुणांना विष्णुपंचायतन’ असे म्हणण्याची प्रथा पडली. श्री. के. क्षीरसागर यांच्यासारखा एखादा स्वतंत्र बाण्याचा विचारवंत सोडला, तर अनेकांचा कल टिळकांना चिपळूणकरांचे शिष्य मानण्याकडे दिसतो. क्षीरसागर मात्र टिळकांचे गुरुत्व पेलण्याची पात्रता शास्त्रीबुवांच्या अंगी नव्हती असे म्हणतात.

          केसरी, मराठा पत्रे सुरू झाली तेव्हा टिळक मराठा’ या इंग्रजी पत्राचे संपादक असल्याने व लिहिण्याविषयी ते (आगरकरांसारखे) फारसे उत्साही नसल्याने ’केसरी’तील लेख त्यांनी लिहिले असल्याची शक्यता फार कमी आहे. उलट आगरकरांना लिहिण्याची हौस आणि शैलीही त्यांनी चिपळूणकरांची उचललेली. दुसरे असे की दरम्यानच्या काळात ’निबंधमाला’ ही बंद पडू घातल्यामुळे चिपळूणकरांना लिहिण्यासाठी नवे पीठ हवे होतेच. बरे ते स्वतः संपादक मंडळात होतेच. त्यामुळे मुख्य संपादक या नात्याने आगरकरांच्या नावे जमा झालेले काही लेख चिपळूणकरांचे असणार यात शंका नाही.

         दुसरे असे, की सरकारी वक्रदृष्टीने वृत्तपत्रावर तोहमत येऊन ते बंद पडण्याची वेळ येऊ शकते, हा धडा चिपळूणकरांच्या मालेकडून या नवतरुणांना मिळाला असेल. त्यामुळे सुरवातीच्या काळात तरी ब्रिटिश सरकारविषयी लिहिताना त्यांच्या लेखनात सावधपणा दिसून आला तर नवल नाही.

         याच सुरवातीच्या काळात रशिया हिंदुस्थानवर हल्ला करणार आहे अशी चर्चा सर्वत्र चालली होती. त्या पार्श्‍वभूमीवर रशियासारख्या मध्ययुगात वावरणार्‍या देशापेक्षा इंग्रजी राजवट आम्हाला केव्हाही सुखकर आहे, असे जाहीर करणे केव्हाही सोयीचे ठरले असते. त्यामुळे आगरकर ’इंग्लंडशिवाय आम्हास गती नाही’ असा अग्रलेख लिहिताना दिसतात. आम्हास कधी काळी चांगले दिवस येणार असतील, तर ते इंग्लिश लोकांच्या साहाय्याने येणार आहेत. आमच्यावरचे इंग्लिश लोकांचे झाकण नाहीसे झाले की निरंतन दास्य आमच्यासाठी राखून ठेवल्यासारखे आहे असे आम्हास वाटते.”

         आम्हाला केव्हातरी राजकीय स्वातंत्र्य मिळवायचे आहे हे आगरकर मुळीच लपवून ठेवीत नाही. त्यांचे म्हणणे असे आहे, स्वातंत्र्य सांभाळण्यासाठी, त्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सामाजिक स्थिती प्राप्त करण्याच्या आधी स्वातंत्र्य मिळाले (किंवा मिळवले) तर आपण परत एकदा रशियासारख्या अशा एखाद्या देशाच्या पारतंत्र्यात सापडू, की जेव्हा गेलेले स्वातंत्र्य परत मिळवणे केवळ अशक्य होईल. या संदर्भातील त्यांचे मार्गदर्शक सूत्र महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्याकडून पारतंत्र्य येण्याचा संभव असल्यास ते स्वातंत्र्य इष्ट नाही. पारतंत्र्याकडून स्वातंत्र्य येण्यास संभव असल्यास त्या पारतंत्र्याचा कंटाळा करणे वेडेपणा होय.”

       आगरकरांना जे स्वातंत्र्य हवे आहे तसे कसे आहे तर आम्ही आमचे पारतंत्र्य जाऊन पुनः न गमवेल अशा प्रकारच्या स्वातंत्र्यास पावू हे इष्ट स्थित्यंतर इंग्लिश लोकांच्या आश्रयावाचून, मदतीवाचून व अमलावाचून व्हायचे नाही, अशी आमची पक्की खात्री झाली आहे-” त्यामुळे साहजिकच राज्यप्रकरणी प्रश्‍नांचा विचार करताना अत्यंत ध्यानात ठेवण्याजोगी गोष्ट ही आहे की घाईने घडवून आणलेली राज्यक्रांती कधीही हितावह होत नाही.”

        पारंपरिक भारतीय राजनीतीमध्ये योग आणि क्षेम असा भेद करण्यात आलेला आहे. आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीची प्राप्ती करून घेणे म्हणजे योग आणि प्राप्त करून घेतलेली ती गोष्ट सांभाळणे, तिचे जतन करणे म्हणजे क्षेम असा हा भेद आहे. योगापेक्षा क्षेम अवघड असल्याची ग्वाही साधुसंतांनीही दिलेली आहे. निधान जोडावया। भाग्य घडे धनंजया। की जोडिले भोगावया। विपाये होय।।” ही ज्ञानेश्‍वरी’मधील ओवी आहे, तर तुकोबा कठीण योगाहुनी क्षेम। ओकलिया होतो श्रम।।” हे तुकोबांचे वचन आहे.

      स्वातंत्र्याचा योग हा अनेकांचा ध्यास असताना आगरकर स्वातंत्र्याच्या क्षेमाचा मुद्दा उपस्थित करतात. (टिळक योगवादी होते हे वेगळे सांगायची गरज नाही.)

      क्षेमाला महत्त्व देणार्‍या विचारवंतांचे दोन प्रवाह स्पष्ट दिसून येतात. आगरकर त्यासाठी समाजसुधारणांची आवश्यकता प्रतिपादन करतात. नंतरच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यासाठी सैनिकीकरणाचा म्हणजे लष्करी सामर्थ्य वाढविण्याचा पुरस्कार केला. मिळालेले स्वातंत्र्य गमवायचा प्रसंग म्हणजे अर्थातच परराष्ट्राने आक्रमण करून आपल्याला जिंकून, आपले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रसंग. असा प्रसंग आला तर त्या परराष्ट्ररूप शत्रूशी मुकाबला करून त्याचे आक्रमण परतविण्यासाठी आवश्यक असे सुसज्ज सैन्यदल आणि पुरेसे शस्त्रबळ आपल्याकडे पाहिजे हा सावरकरांचा पक्ष.

        सावरकरांचा हा पक्ष बहुतेक हिंदुत्ववाद्यांना मान्य होताच. डॉ. बा. शि. मुंजे हे त्यातील एक महत्त्वाचे नाव. मुंजे सावरकरांच्याही आधी लष्करीकरणाचा व बलोपासनेचा प्रचार करीत होते. त्यासाठी नंतर त्यांनी नाशिक येथे लष्करी शाळाही काढली.

         पण सावरकर आणि इतर हिंदुत्ववादी यांच्यातील महत्त्वाच्या भेदाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लष्करी सामर्थ्याबरोबर सामाजिक सुधारणांच्या प्रश्‍नांचे गांभीर्य व महत्त्व सावरकरांना उमगले होते. स्वातंत्र्य ही केवळ सैन्यबळावर टिकवता येणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, समतेवर आधारित समाजरचनेची आवश्यकता असल्याचेही त्यांचे मत होते. त्यामुळेच एकीकडे हिंदू समाजातील अविवेकी प्रथा-परंपरांवर त्यांनी टीकास्त्र सोडले तर दुसरीकडे अस्पृश्यतेविरुद्धही चळवळ उभारली.

         आगरकरांच्या काळात लष्करी सामर्थ्याचा उच्चार किंवा कल्पनाही शक्य नव्हती. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिशांना भारतीय लोकांनी शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी घातली होती. भारतीय वंशाच्या सैनिकांना सुभेदार पदाच्या वरती बढती दिली जात नसे. सावरकरांच्या काळात विशेषतः दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा परिस्थितीत बराच पालट झाला होता. पहिल्या महायुद्धाच्या काळातच लोकमान्य टिळकांनी भारतीयांना सैन्यात अधिकारपदे मिळण्याचा आग्रह धरला होता. ब्रिटिशांची अडचण आणि गरज लक्षात घेऊनच त्यांनी ही मागणी केली होती. वीसच्या दशकात बॅ. जीना प्रभृतींनी लष्करी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र राष्ट्रीय ऍकॅडमीचा आग्रह धरला होता. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी तर ब्रिटिशांच्या गरजा अधिकच वाढल्या.

         दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सावरकरांची स्थानबद्धता संपुष्टात येऊन राजकारणात वगैरे भाग घेण्यास असलेली बंदीही उठली होती. त्यांनी तरुणांना सैन्यात सामील होण्याचे आवाहन तर केलेच, पण त्याहीपुढे जाऊन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या भाषणातून लेखक-कवींनाच लेखण्या मोडून बंदुका हातात घेण्याचा सल्लाही दिला! (संभाव्य) स्वातंत्र्याच्या क्षेमासाठी हे आवश्यकच असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

         आता त्यांनी या आधी म्हणजे रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या व राजकीय कृतीवर निर्बंध असण्याच्या काळात राजकारण करताच येत नव्हते, म्हणून सामाजिक सुधारणांवर भर दिला असे कोणी म्हणू शकेल. ते त्यांच्याच हिंदुत्ववादी राजकारणाचेच एक अंग होते, असा आक्षेपही घेता येईल. आपण हिंदुत्वाचे व हिंदू राष्ट्राचे राजकारण करीत असल्याचे सावरकरांनी कधीही लपवले नाही आणि लष्करभरतीचे म्हणाल तर त्यांच्या दृष्टीने महायुद्धामुळे प्राप्त झालेली दुर्मिळ संधीच होती. त्यामुळे त्या काळात सैनिकीकरणाचा प्रचार करण्यावर अधिक भर देऊन तिचा उपयोग करून घेणे व्यावहारिकदृष्ट्या त्यांना योग्य वाटले असणार हे उघड आहे. पण अगदी त्या काळातसुद्धा ते भाषणाला जेथे जात तेथे सहभोजनाचा आग्रह धरीत असत हे लक्षात घ्यायला हवे. अर्थात, तेव्हाही त्यांच्या राजकीय सभेसाठी जमा झालेले त्यांचे हिंदुत्ववादी सहकारी सभा संपल्यावर सहभोजनासाठी अस्पृश्यांच्या वस्तीत जाण्याचा प्रसंग टाळण्यासाठी व्यासपीठावरून काढता पाय घेत हादेखील इतिहासच आहे.

         सावरकरांनी सामाजिक सुधारणांचे ओळखलेले महत्त्व जमेस धरूनही सामाजिक सुधारणा पूर्ण होऊन समाज स्वातंत्र्याचे क्षेम करण्याच्याच स्थितीत येईपावेतो स्वातंत्र्य पुढे ढकलले तरी चालेल हे मत मात्र त्यांना मान्य झाले नसते हे उघड आहे. आगरकरांचा कल मात्र ते चालेल असे मानण्याकडे दिसून येतो.

          या संदर्भात थोडे मागे जाऊन जोतीराव फुलेंच्या भूमिकेची आठवण करून देण्यास हरकत नसावी. आगरकरांप्रमाणे फुलेसुद्धा राजकीय स्वातंत्र्य पुढे ढकलले तरी चालेल याच कलाचे होते. तथापि, भेद उरतोच. इंग्रजी अंमलाचा व सत्तेचा उपयोग शूद्रातिशूद्रांनी आपली शैक्षणिक व सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी करून घ्यावा ही त्यांची भूमिका होती. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवले तर तेव्हाचा आपला समाज त्याच्या क्षेत्रास समर्थ नसल्यामुळे आणि दुसर्‍याच एखाद्या राष्ट्राच्या उदा. रशियाच्या पारतंत्र्यात जाऊ अशी त्यांची भीती होती. फुलेंना दुसर्‍या परराष्ट्राच्या अमलाची भीती नसून ब्रिटिश गेल्यावर याच देशातील उच्चवर्णीयांच्या हातात राजकीय सत्ता जाईल व ते या स्वातंत्र्याचा लाभ अडाणी व असमर्थ शूद्रातिशूद्रांना होऊ देणार नाही, ही शंका वाटत होती. पण रानडे काय, आगरकर काय किंवा फुले काय, इंग्रजी अमलाची गरज मान्य करणार्‍यांपैकी होते हे लक्षात घ्यायला हवे. फुलेंना बाजूला काढून त्यांच्यावर ब्रिटिश धार्जिणेपणाचा आरोप करणे अन्यायकारक होईल हे वेगळे सांगायची गरज नाही.

         इंग्रजी राज्याच्या आवश्यकतेचा मुद्दा आगरकर विस्ताराने मांडताना दिसतात. तो असा पूर्वी हिंदुस्थानातले निरनिराळे लोक माळेतील विस्खलित मण्यांप्रमाणे असत; आता त्यांच्यातून देशाभिमानाचा दोरा शिरू लागून, त्यांची माळ गुंफू लागली आहे. बाप-लेक, नवरा-बायको, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, व्यक्ती-समाज, नगर-नागरिक व राजा-प्रजा यांच्यातील संबंधांचे उद्घाटन होत असून, एकाने दुसर्‍याशी कसे वागावे, याची चर्चा होत आहे व तिचा परिणाम लोकांच्या आचरणावर होत आहे. धर्मस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य अधिकाधिक मिळू लागल्याने, जुलुमाशिवाय ऐक्य होऊ लागले आहे. या मार्गाने समाजसुधारणा होण्यास पुष्कळ वर्षे लागतील खरी; पण ती पक्क्या पायावर होत असल्यामुळे, तिची ढासळण्याची भीती नाही.”

        आगरकरांचा हा परिच्छेद फार महत्त्वाचा आहे. त्यातील ब्रिटिश सत्तेमुळे आम्ही एक राष्ट्र होत आहोत हा विचार टिळकांनीही अनेकदा व्यक्त केल्याचे दिसून येतो. मात्र आगरकरांचा दुसरा विचार तेव्हाच्या सर्वांनाच मान्य होऊ शकेल असा नव्हता. नव्याने निर्माण होणार्‍या राष्ट्रातील विविध घटकांचे परस्परसंबंध कसे असतील याविषयीचा हा मुद्दा आहे. हे संबंधसुद्धा नव्याने घडत आहेत, घडतील व घडवावे लागतील असा आगरकरांचा आग्रहच आहे. या नव्यात घडण्याची चर्चा सुरू झाली आहे व तिचा परिणाम प्रत्यक्ष आचरणार होत आहे याचेही त्यांना समाधान आहे. राष्ट्र नवे आणि संबंध मात्र जुनेच ही विसंगती त्यांना मान्य नाही.

       या बाबतीत 2 मुद्दे उपस्थित होऊन चर्चा होऊ शकते-

         पहिला मुद्दा या संबंधांमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. ते पूर्वीसारखेच असू द्यावेत. पूर्वी अशाच संबंधांच्या काळात आम्ही मराठ्यांनी स्वराज्य स्थापिले. देशभर राज्यविस्तार केलाच होता की नव्हता?

        दुसरा मुद्दा म्हणजे हे संबंध नव्याने घडवावे लागतील हे मान्य, पण त्याची घाई नको आणि मुख्य म्हणजे ते आमचे आम्हीच घडवणार त्यासाठी ब्रिटिशांच्या परकीय सत्तेची मदत आवश्यक नाही. हे संबंध कोणत्या सूत्राने घडवायचे? आगरकर हे संबंध सुखवादी - उपयुक्ततावादी नैतिक सूत्राच्या आधारे घडवायच्या विचाराचे होते.

 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

        आगरकरकालीन विचारी आणि कार्यकर्त्या पुरुषांमध्ये ज्येष्ठतेचा मान जातो लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि महात्मा जोतिराव फुले यांच्याकडे. लोकहितवादी यांचा स्वतंत्र असा संप्रदाय नव्हता, तसेच अनुयायीवर्गही नव्हता. त्यांनी नवी चळवळही उभारली नाही. तथापि त्यांनी पारंपरिक धार्मिक समजुती, रुढी, प्रथा, परंपरा आणि मुख्य म्हणजे समकालीन कर्मठ ब्राह्मण यांच्यावर जी टीका केली त्यामुळे फुले, रानडे, आगरकर या सुधारकांसाठी अनुकूल पार्श्‍वभूमी तयार झाली.

           लोकहितवादी संपूर्ण समाजाच्या हिताची चिंता करणारे होते. ब्राह्मणांवर टीका करून त्यांच्यात सुधारणा घडवून आणली, की ते हिंदू समाजाचे स्वाभाविक नेते असल्यामुळे त्यांच्यामार्फत इतरांची सुधारणा होईल, अशी लोकहितवादींची प्रामाणिक समजूत होती. त्यांच्या लेखी ब्राह्मणांचे नेतृत्व म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व नव्हते. दुसरे असे, की ब्राह्मणांच्या विशिष्ट वागणुकीमुळे, ते सर्व समाजाचे पुढारी असल्याने, सर्वांचे नुकसान झाले व होत आहे. तसेच स्वतः ब्राह्मणांचेही त्यात नुकसान आहे. लोकहितवादी ब्राह्मणांच्या वर्तनाकडे मूर्खपणाचा प्रकार म्हणून सहानुभूतीने पाहतात.

**************

*    घटक  : (8)  महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्ये

*    उपघटक : (1)  गोपाळ गणेश आगरकर

महात्मा जोतिराव फुले

          जोतिराव फुले यांचे कार्य केवळ वैचारिक मांडणीच्या पातळीवर राहिले नाही. त्यांनी या विचारांना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्यासाठी चळवळ उभारली. शूद्रातिशूद्र आणि मुलींसाठी शाळा काढल्या. सार्वजनिक सत्यधर्म तथा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नव्या धर्मसमाजाच्या पायावर व्यापक सामाजिक सुधारणा घडवून आणायचा प्रयत्न केला.

         शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांना भोगाव्या लागणार्‍या दुःखाचे मूळ कारण ब्राह्मणांनी प्रसृत केलेला धर्म असून, त्या धर्माचे उच्चाटन करण्यासाठी त्यांचे समर्थक आणि वाहक असलेल्या ब्राह्मणवर्गावर टिकेचे प्रहार करण्याशिवाय पर्याय नाही या निश्‍चयानेच त्यांनी तशी टीका केली. अशी टीका स्वतः जातीने ब्राह्मण असलेल्या लोकहितवादींनीही केली होती.

        फुल्यांच्या मांडणीनुसार ब्राम्हणांच्या नेतृत्त्वामुळे शूद्रातिशूद्रांचे नुकसान असून, ब्राह्मणांचा फायदा आहे. तसेच हा ब्राह्मणांच्या अडाणीपणातून आपोआप निष्पन्न झालेला प्रकार नसून उलट धूर्त ब्राह्मणांचे कारस्थान आहे.

८ मे २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ :  इतिहास

*          घटक (7) : स्वातंत्र्योत्तर भारत   -

-           उपघटक (5) : संयुक्त महाराष्ट्र चळवळ : त्यात सहभागी झालेले महत्त्वाचे राजकीय पक्ष व व्यक्ती

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी

      स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, 1920 पासूनच काँग्रेसने लावून धरलेली आणि दार कमिशन, नेहरू-पटेल-पट्टाभिसीतारामय्या (जेव्हीपी) आयोग व भाषावार प्रांत रचना समिती या सार्‍यांनी एकमुखाने उचलून धरलेली स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी तिला 30 वर्षे पूर्ण होत आली तरी राजकारणाच्या घोळात अडकली आहे.

       कधी द्विभाषिक मुंबई राज्यातील काँग्रेस सरकारचे बहुमत टिकवायचे म्हणून (1957), कधी नागपूर व अकोला करारांचे गाजर पुढे केले म्हणून (1960), कधी विदर्भवाद्यांचे पुढारी केंद्राला अनुकूल झाले म्हणून (1975), तर कधी शिवसेनेचे भाजपासोबतचे सरकार सत्तेवर आले म्हणून (1995).

        1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा त्याचे उद्घाटन करताना पं. नेहरूंनी एक महत्त्वाचे वाक्य उच्चारले होते, ‘मुंबईची शान राखा आणि विदर्भाचा विकास करा’. नंतरच्या सरकारांनी मुंबईचे जे करायचे ते केलेले दिसले, विदर्भाचे मात्र त्यांनी मातेरे केले. 35 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या या काळात विदर्भाने अनुभवल्या. नक्षल्यांच्या कुर्‍हाडींनी  750 हून अधिक आदिवासींचे गळे कापलेले त्याने पाहिले. मेळघाटसारख्या एका तालुक्यात वर्षाकाठी हजारो आदिवासी मुले कुपोषणाने मरताना पाहिली.

          नद्या आहेत पण सिंचनाच्या योजना नाहीत, मोठी शहरे आहेत पण त्यांना जोडणार्‍या रस्त्यांचा विकास नाही, काळी व सुपीक जमीन आहे पण कृषी विकासाच्या योजना नाहीत. कापूस विदर्भात आणि सूतगिरण्या महाराष्ट्रात, वीज विदर्भात आणि उद्योग पुण्या-मुंबईत.

        1980 मध्ये विदर्भाच्या विकासाचा अनुशेष 40 हजार कोटींहून अधिक होता असे तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. नागपुरात मिहानचे स्वप्न आले पण राजकारणाने त्या मागल्या प्रेरणा घालविल्या.

         ‘मुंबईचे दरडोई वार्षिक उत्पन्न 94 हजारांचे, पुण्याचे 84, नाशिकचे 74, तर पूर्वेकडे ते क्रमाने होत जाऊन चंद्रपूरचे 27, तर गडचिरोलीचे 17 हजारांच्या खाली जाणारे आहे.’ तात्पर्य, गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्राने विदर्भाला आपली वसाहत बनवून त्याची नुसती लूट केली. सरकारे बदलली, पक्ष बदलले पण त्यातल्या नेत्यांच्या मनातील मुंबईचा भूलभुलय्या कधी कमी झाला नाही आणि त्यांच्या विदर्भाविषयीच्या उदासीनतेत कधी कमतरता आली नाही.

         आता, इंद्रावती नदीवर धरण बांधून गडचिरोलीचा भामरागड हा दक्षिणपूर्व भाग पाण्याखाली बुडविण्याच्या आंध्र प्रदेशच्या योजनेला महाराष्ट्र सरकारची मान्यता. त्या जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या सिरोंचा या तालुक्याच्या शहरासह अनेक मोठी गावे आणि तेथील मौल्यवान अरण्य बुडवून गोदावरी बांधाच्या तेलंगण सरकारच्या योजनेला मान्यता. धाबा आणि गोंडपिपरी या चंद्रपूर जिल्ह्यातील भागांपासून मार्कंडा, चामोर्शी अशी गडचिरोली जिल्ह्यातील मोठी गावे व तेथील सुपीक जमीन बुडविणार्‍या वैनगंगेवरील चेवेल्ला प्रकल्पाचे तेलंगणचे काम कधीचेच सुरूही झालेले. सरकारला भ्रांत नाही, लोकप्रतिनिधींना जाग नाही आणि निवडणुकांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून काम करणार्‍या पुढार्‍यांना व कार्यकर्त्यांना यातली कोणतीही माहिती नाही.

           या स्थितीत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ते, नामवंत कायदेपंडित आणि कै. बापूजी अणे या वंदनीय विदर्भवादी नेत्याचे नातू अ‍ॅड. श्रीहरी अणे हे त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन विदर्भाच्या आंदोलनात उतरले. जुन्या व कट्टर विदर्भवाद्यांची साथ त्यांना मिळत आहे.  1 मे 206 रोजी त्यांनी केलेल्या आंदोलनात विदर्भवाद्यांचे ऐक्य सार्‍यांच्या निदर्शनाला आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि रिपब्लिकन पक्ष या विदर्भातील चारही प्रमुख पक्षांची भूमिका विदर्भ राज्याला अनुकूल अशी आहे. खरी अडचण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून विदर्भाच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून घेण्याची आहे. शिवसेना आणि मनसे या मुंबईस्थित पक्षांचा विदर्भाला विरोध असला तरी त्या दोहोंचे विदर्भातले वजन व स्थान नाममात्र आहे. केंद्रात विदर्भाला अनुकूल असलेल्या भाजपाचे सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष विदर्भ राज्य व्हावे या मताचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा विदर्भाला असलेला पूर्वीचा विरोध मावळला आहे आणि काँग्रेस पक्षातील बहुसंख्य स्थानिक नेते विदर्भवादी बनले आहेत. विदर्भातील सगळ्या जिल्हा परिषदांनी आणि बार कौन्सिलांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे ठराव केले आहेत.

         विदर्भाहून कमी लोकसंख्या असलेल्या देशांची जगातली संख्या शंभराहून अधिक आहे ही एकच बाब या मागणीला विदर्भाच्या आत्मनिर्भरतेचा मुद्दा पुढे करून विरोध करणार्‍यांना उत्तर द्यायला पुरेशी आहे. ही स्थिती विदर्भाच्या निर्मितीला पूर्णत: अनुकूल आहे. 

७ मे २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ :  इतिहास

*          * घटक (4) : सामाजिक व आर्थिक जागृती   -

-          - उपघटक (5) : महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका

भगतसिंग  व क्रांतिकारक दहशतवादी

             भगतसिंगांचा ‘क्रांतिकारक दहशतवादी’ असा उल्लेख करणारे पुस्तक बिपिन चंद्र  व अन्य अभ्यासकांनी  लिहिले आहे व ते सारेच अभ्यासक ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’च्या मुशीतील आहेत, म्हणून वाद निर्माण केला गेला. ‘दहशतवादी’ हा भगतसिंग आदींनी स्वतसाठी वापरलेला शब्द आता निराळया संदर्भात वापरला जातो, म्हणून तो गाळण्याची मागणी बिपिन चंद्र यांनीच 2007 मध्ये केली होती..

             भगतसिंगांचा ‘क्रांतिकारक दहशतवादी’ असा उल्लेख एका पुस्तकात असल्याच्या प्रकरणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आम्हा लेखक व प्राध्यापकांना देशद्रोही या नावाखाली जरा जास्तच वाईट पद्धतीने दोषारोप सहन करावे लागत आहेत असे मला वाटते. अलीकडच्या काळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरही देशद्रोहाचे आरोप झाले. शारीरिक हमरीतुमरीवर येणे, धमक्या देणे असेही प्रकार घडले. मुस्कटदाबी करणार्‍या शिक्षाही दिल्या गेल्या. निवृत्त व विद्यमान प्राध्यापकांना सार्वजनिक पातळीवर मते मांडण्यापासून रोखण्यात आले. भगतसिंग यांच्या संदर्भात क्रांतिकारी दहशतवादी असा उल्लेख असलेले पुस्तक नष्ट करण्याचा व त्याची विक्री बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रश्‍न केवळ या पुस्तकापुरता मर्यादित आहे असेही नाही, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी लिहिलेली इतर पुस्तकेही नष्ट करण्याचा किंवा त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली कित्येक दशके ही पुस्तके वापरात होती व आता अचानक त्यांच्यावर बंदी घातली जात आहे. माझ्या मते पुस्तकांची विक्री बंद करणे किंवा त्यावर बंदी घालणे हे अयोग्य आहे.

           पुस्तकांवर कुठल्या कारणासाठी टीका केली जाते आहे यापेक्षा त्याविरोधात जी हत्यारे उपसण्यात आलेली आहेत ती आश्चर्यकारक आहेत. बिपिन चंद्र, आदित्य मुखर्जी, के. एन. पण्णीकर, सुचेता महाजन व मी (आजी व माजी जेएनयू प्राध्यापक) यांनी भगतसिंगांविषयी लिहिलेल्या पुस्तकाच्या रूपाने आता नवा वाद सुरू करण्यात आला आहे. या पुस्तकात शहीद भगतसिंग यांच्याबाबत दहशतवादी या शब्दाचा उल्लेख केला असून त्यामुळे देशातील एका महान क्रांतिकारकाची ही सहेतुक मानखंडना आहे, असा आरोप या पुस्तकाच्या आधारे आमच्यावर करण्यात आला आहे.

           यात वस्तुस्थिती अशी की, बिपिन चंद्र यांनी या पुस्तकाची दोन प्रकरणे लिहिली तेव्हा त्यांनी भगतसिंगांविषयी आदर बाळगूनच ती लिहिली यात शंका नाही. भगतसिंगांच्या जीवनकार्याचा गांभीर्याने अभ्यास करणार्‍यांना ही गोष्ट हे पुस्तक वाचताना जाणवल्याशिवाय राहिली नाही. 

            बिपिन चंद्र यांनी 1970 मध्ये भगतसिंग यांचे ‘मी नास्तिक का आहे’ हा दुर्मीळ व गाजलेला लेख पत्रकाच्या रूपात पदरमोड करून प्रसिद्ध केला आणि तो विद्यार्थी व सहकार्‍यांना कानाकोपर्‍यावर उभे राहून वितरित केला होता. विद्यार्थ्यांना भगतसिंगांच्या गोष्टी सांगण्यात ते रमत असत. भगतसिंग यांना अवघे 23 वर्षांचे आयुष्य मिळाले. ते बुद्धिमान होते, त्यांचे वाचन अफाट होते, ते चक्क खिशातून पुस्तके काढून त्यांच्या सहकार्‍यांच्या हाती ठेवत. लोक जे काही दशकात करून दाखवू शकत नाहीत ते भगतसिंगांनी मोजक्या वर्षांत करून दाखवले, असे बिपिन चंद्र सांगतात.

           भगतसिंग व त्यांचे सहकारी क्रांतिकारक हे केवळ फासावर गेलेले शूरवीरच नव्हते, तर ते द्रष्टे विचारवंत होते. ते केवळ त्यांच्या कृतींनाच नव्हे तर विचारांनाही टीकात्मक विवेचनाच्या ऐरणीवर तावूनसुलाखून घेण्यास सतत तयार होते. बिपिन चंद्र यांनी भगतसिंगांना कधीही दहशतवादी म्हटलेले नाही.

           भगतसिंग व त्यांचे सहकारी त्यांची विचारसरणी, कल्पना, पद्धती व धोरणे अधिक ठाशीवपणे मांडण्यासाठी स्वत:च दहशतवादी हा शब्द वापरत होते; पण भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांनी वापरलेला हा शब्द जसाच्या तसा न वापरता उलट त्याला क्रांतिकारक हे विशेषण जोडले. त्यातून ‘क्रांतिकारक दहशतवादी’ हा शब्द तयार झाला. त्याला भगतसिंगांच्या बाबतीत नकारात्मक अर्थ नाही. त्या वेळीही तो नव्हता, कारण दडपशाही करणार्‍या ब्रिटिशांविरोधात त्यांनी दहशतीचा मार्ग वापरला होता. आताच्या काळात दहशतवादी हा शब्द नकारार्थी आहे, कारण निरपराध लोकांविरोधात दहशती कारवाया करणार्‍यांना दहशतवादी म्हटले जाते, त्यामुळे नंतर बिपिन चंद्र यांनी दहशतवादी हा शब्द वापरणे सोडून दिले.

          2007 मध्ये जाहीर निवेदन काढून हा शब्द पुस्तकातून वगळण्यात यावा, असे बिपिन चंद्रांनी सांगितले, पण आता ज्या पुस्तकावर टीका होते आहे ती त्यांच्या पुस्तकाची 1988 मधील आवृत्ती आहे व त्याची सुधारित आवृत्ती काढली गेली नाही. पुस्तक जसे होते तसे पुन्हा छापण्यात आले. या परिस्थितीत दिल्ली विद्यापीठाने पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घातली.

          रा. स्व. संघाचे विचारवंत दीनानाथ बत्रा यांनी पुस्तकाच्या इंग्रजी प्रती नष्ट करून लेखकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. बिपिन चंद्र यांच्या पुस्तकावर सखोल विश्‍लेषणाअंती हिदू, मुस्लीम व इतर जातीयवादाचे रंग दाखवणार्‍या तीन प्रकरणांमुळे टीका झाली असती तर त्यामागचा तर्क योग्य होता.

           राजकीय विचारसरणी जर फुटीरतावादी जातीय व्यवस्थेवर आधारित असेल व तोच राष्ट्रवाद म्हणून पुढे केला जात असेल तर ते चुकीचे आहे. 

२ मे २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ :  इतिहास

*          घटक (4) : सामाजिक व आर्थिक जागृती   -

-           उपघटक (1) :  भारतीय राष्ट्रवाद -1857 चा उठाव आणि त्यानंतर

अंदमान आणि काळे पाणी

         10 मार्च 1858 साली एस. एस. सेमिरामीस या पहिल्या बोटीने नांगर टाकून 200 राजबंद्यांना अंदमान बेटावर पोचवले. तेथे सर्व बंदिवानांना बोटीच्या लोखंडी भिंती असलेल्या मोठ्या दालनवजा जागेत कोंबण्यात आले. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 200 राजबंद्यांची पहिली तुकडी घेऊन कोलकता फिडरपूर बंदरातून निघाली होती.

अंदमानातील स्वातंत्र्यसैनिक -

*          अंदमानात पाठवलेले वहाबी (1863-81)

*          सेल्युलर जेलमधील राजकीय बंदी (1932-38)

*          जपानी राजवटीतील राजबंदी (1943 -45)

*          स्वा. सावरकर यांचे समकालीन राजबंदी (1909-21)

*          सेल्युलर जेलमधील नामवंत क्रांतिकारी (1922 -31)

१ मे २०१६

सामान्य अध्ययन पेपर -१ : इतिहास

*          घटक (6) : गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ –

-           उपघटक (2) : गांधीजींच्या लोक चळवळी -असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, चलेजाव चळवळ

-           उपघटक (5) : हिंदू महासभेचे राजकारण

 

हेडगेवार आणि हर्डीकर

        महात्मा गांधींजींशी बरोबरी करून त्यांच्या नेतृत्वाला पर्याय देऊ शकणारा नेता टिळकांच्या अनुयायांमध्ये नसल्यामुळं काँग्रेसचं नेतृत्व तर त्यांच्या हातून निसटलंच; परंतु गांधीजींच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत आव्हान देत त्यांच्यावर दबाव आणून त्यांना आपल्या धोरणाप्रमाणं वागायला लावणाराही कुणी नव्हताच. याची चुणूक गांधीजींनी सुरू केलेल्या असहकारितेच्या आंदोलनातून लगेचच पाहायला मिळाली. गांधींजींच्या आदेशानुसार ज्या कार्यकर्त्यांनी असहकार आंदोलनात भाग घेतला, त्यात डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचाही सहभाग होता.

        हिंदुहिताचा विचार करीत तो हिंदू राष्ट्रवादाच्या सीमेपर्यंत पुढे नेणार्‍या संस्था-संघटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा क्रमांक सर्वांत वरचा म्हणावा लागतो. या प्रक्रियेची सुरवात अर्थातच स्वामी दयानंद यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजापासून झाली. आर्य समाज ही राजकीय संघटना नसून, धार्मिक संघटना होती. प्रचलित हिंदू धर्मावर चढलेली पुटे काढून त्याला मूळच्या वैदिक धर्माचे स्वरूप द्यायचे, असा आर्य समाजाचा कार्यक्रम होता. धर्माने ख्रिस्ती असलेल्या ब्रिटिशांचे राज्य आणि राज्य हातात नसले तरी वरचढ ठरणारे मुसलमान ही हिंदू धर्मावरील संकटे समजून त्यांचा मुकाबला करण्यासाठी हिंदू धर्मात सुधारणा तर झाली पाहिजे; परंतु ही सुधारणा ब्राम्हो समाजाच्या पद्धतीने होता कामा नये. मूळ वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन म्हणजेच सुधारणा, अशी भूमिका आर्य समाजाने घेतली. आर्य समाजामुळे भारतात जेथे-जेथे मुसलमान वरचढ होऊन हिंदूंवर डोळे वटारीत तेथे-तेथे हिंदूंना आत्मविश्‍वास आला आणि ते मुसलमानांच्या डोळ्यांत डोळे घालून त्यांना आव्हान देऊ लागले.

         हिंदुहिताचा कैवार घेत उदयाला आलेली दुसरी संघटना म्हणजे हिंदू महासभा. हिंदू महासभेची स्थापना मुस्लिम लीगची प्रतिक्रिया म्हणून झाली याची नोंद घ्यायला हवी. मात्र, एक स्वतंत्र राजकीय संघटना म्हणून हिंदू महासभेनं निदान सावरकरांनी तिचं अध्यक्षपद स्वीकारेपर्यंत कधीच बाळसं धरले नाही. काँग्रेसचा काहीही दावा असो, ब्रिटिश सरकार आणि मुस्लिम लीग  काँग्रेसला हिंदूंचाच पक्ष समजत होते. आता आपणच हिंदूंचा खरा पक्ष आहे, असे हिंदू महासभेला म्हणायचे असेल तर तिने काँग्रेसपेक्षा अधिक सामर्थ्यवान बनणे भाग होते आणि ते तर शक्य नव्हते. अशा वेळी हिंदू महासभेच्या नेत्यांनी काँग्रेसमध्येच वावरत काँग्रेसअंतर्गत दबावगट म्हणून काम करणे पसंत केले. काँग्रेसला हिंदू हिताकडे वळवायचं व मुसलमानांना फाजील सवलती देण्यापासून रोखायचं हे या दबावगटाचं दुहेरी उद्दिष्ट होतं.

        दुसरं असं, की आर्य समाज काय, महासभा काय शिस्तबद्ध व सुसंघटित संघटना नव्हत्या. त्यामुळं त्यांचा अपेक्षित प्रभाव पडत नव्हता. हिंदू समाजामधली ही उणीव भरून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला, असं म्हणण्यात काही अतिशयोक्ती नाही. या अर्थानं संघ हे काळाचं अपत्य होय. पण काळ म्हणजे एखादं झाड नसतं, की त्याला फळं लगडावीत आणि पिकून गळून पडावीत. मानवी हस्तक्षेपाशिवाय काळाच्या उदरातून काहीच जन्माला येत नसतं. संघाच्या बाबतीत हा हस्तक्षेप डॉ. हेडगेवार यांनी केला. ना. ल. पालकर आणि चं. प. भिशीकर यांची हेडगेवार चरित्रं, डॉ. वि. रा. करंदीकर लिखित ‘तीन सरसंघचालक’, दत्तोपंत ठेंगडींचं ‘संकेतरेखा’, गंगाधर इंदुरकर लिखित ‘संघ : काल, आज आणि उद्या’,  द. ना. गोखले कृत बाबाराव सावरकरांचं चरित्र, कु. ल. महाले लिखित ‘मनूचा मासा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, द. स. हर्षे कृत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ः एक चिकित्सक समालोचन’ इत्यादी पुस्तकांमधून हेडगेवारांनी संघाची स्थापना का व कशी केली याची कल्पना येऊ शकेल. संघसमर्थक, संघविरोधक, तटस्थ अभ्यासक किंवा सर्वसाधारण जिज्ञासू वाचक या सर्वांनी ही सर्वच पुस्तकं वाचलेली असतात असं नाही. त्यामुळं काही ना काही भाग त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी अज्ञातच राहिलेला असतो.

          स्थूलमानानं असंही विधान करता येतं, की त्या काळातील कोणत्याही प्रकारच्या हिंदुत्ववाद्याला लोकमान्य टिळकांविषयी आदर आणि विश्‍वास असे. काँग्रेसचं नेतृत्व जसं टिळकांच्या हाती गेलं तसं या मंडळींना काँग्रेस हा आपला पक्ष वाटू लागला आणि मुख्य म्हणजे टिळक हे हिंदुहिताचं रक्षण करतील ही तर त्यांची खात्री होती. त्यामुळं टिळकांनी लीगबरोबर केलेले लखनौ करार असो किंवा टिळकांनी खिलाफतीच्या मागणीला दिलेला पाठिंबा असो, सुरवातीला खळखळ करणं आणि नंतर गप्प राहून अनुमोदन देणं हेच या मंडळींचं धोरण राहिलेलं दिसतं. मग ते बा. शि. मुंजे असोत अथवा मदन मोहन मालवीय.

           1914 मध्ये मंडाले इथून कारागृहातून सुटून टिळक पुण्याला परतले आणि थोड्याच दिवसांनी (पहिल्या) महायुद्धाला तोंड फुटलं. त्यामुळं निर्माण झालेल्या देशांतर्गत आणि आंतरदेशीय परिस्थितीचा लाभ उठवीत परत एकदा आपल्या नेतृत्वाचं बस्तान बसवण्यात टिळकांनी यश मिळवलं व भारताच्या राजकारणाची सूत्रं हाती घेतली. हेडगेवार वैद्यकीची पदवी घेऊन नागपुरात परतले खरे; पण त्यांचं मन ‘प्रॅक्टिस’मध्ये लागणार नव्हतंच. टिळकांना त्यांनी नेते मानले असले, तरी त्यांचा कल सशस्त्र क्रांतीकडंच होता. त्यातल्या त्यात त्यांचे भाऊजी कावरे आणि डॉ. मुंजे यांच्याशी जमायचे. या सर्वच लोकांचे टिळकांवर नेता म्हणून प्रेम होते व टिळकांनी काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं, अशी सगळ्यांची इच्छाही होती. 1920 मधील अधिवेशन नागपुरात भरवून त्याचे अध्यक्षस्थान टिळकांना द्यायचं आणि 1907 च्या सुरत काँग्रेसमधून झालेल्या हकालपट्टीचा वचपा काढायचा, असा या मंडळींचा निश्‍चय होता. तथापि, मधल्या काळात काही घडामोडी वेगाने घडल्या व त्यांच्यामुळं इतिहासाला निर्णायक कलाटणीही मिळाली. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय. त्याची नोंद घेताना पालकर लिहितात, “त्या वर्षीच्या (1919) अमृतसर काँग्रेसलाही डॉक्टर गेले होते. अधिवेशन चालू असताना ते ‘जालियनवाला बाग’ही जाऊन पाहण्यास विसरले नाहीत. या अधिवेशनातील एकूण चर्चेवरून महात्माजींच्या विचाराला लोकांचा पाठिंबा मिळणार असा रंग दिसू लागला.” या अनुषंगानं दुसर्‍या एका गोष्टीची नोंद करायची गरज पालकरांना वाटल्याचं दिसत नाही; पण तो तर सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता. गांधींच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देऊ शकेल असा एकही नेता टिळकांच्या प्रभावळीत नव्हता!

          दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे खुद्द लोकमान्य टिळकांचाच मृत्यू! अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळं टिळकांना नागपूर काँग्रेसचा अध्यक्ष बनवण्याचा मनसुबा जागच्या जागीच विरून गेला. पण ही झाली तात्कालिक बाब. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधींजींशी बरोबरी करून त्यांच्या नेतृत्वाला पर्याय देऊ शकणारा नेता टिळकांच्या अनुयायांमध्ये नसल्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व तर त्यांच्या हातून निसटलेच; परंतु गांधींच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत आव्हान देत त्यांच्यावर दबाव आणून त्यांना आपल्या धोरणाप्रमाणे वागायला लावणाराही कोणी नव्हताच.

        याची चुणूक गांधींनी सुरू केलेल्या असहकारितेच्या आंदोलनातून लगेचच पाहायला मिळाली. रौलट यांचा कायदा व जालियनवाला बागेतील जनरल डायरचे अमानुष अत्याचार याचा निषेध म्हणून गांधींजींनी हे आंदोलन पुकारलं असतं तर ते एकवेळ समजून घेता आलं असतं व मनाविरुद्ध असला तरी शाळा-कॉलेज, निवडणुका आणि कोर्टकचेर्‍या यांवर बहिष्कार टाकताना देशभक्तीचं समाधान मानता आलं असतं; पण गांधींजींनी रौलट आणि जालियनवाला बागेतील गोळीबार यांच्या बरोबरीनं मुसलमानांच्या खिलाफतीच्या प्रश्‍नाचाही समावेश या चळवळीत केला. तो जास्त त्रासदायक ठरला. खरं तर खिलाफतीच्या आंदोलनाला टिळकांनीही पाठिंबा दिला होताच; पण त्यांच्या मृत्यूपर्यंत तरी तो केवळ शाब्दिक होता. गांधींजींनी त्याला कृतीशील बनवलं इतकेच नव्हे, तर त्याचा काँग्रेसच्या कार्यक्रमात अधिकृतपणे समावेश करून घेतला. आधी कलकत्त्याच्या विशेष अधिवेशनात आणि नंतर नागपूरच्या रीतसर नियमित अधिवेशनात! कलकत्त्याच्या अधिवेशनाच्या संदर्भात पालकर लिहितात, “या अधिवेशनाचा विशेष असा की, प्रतिसहकारवादी टिळकानुयायी यांना मागे टाकून असहकारवादी महात्मा गांधींजींचं प्रभुत्व काँग्रेसवर प्रस्थापित झालं.”

        नागपूरच्या अधिवेशनाबद्दल सांगायचं झाल्यास “बॅ. चित्तरंजन दास यांनी मांडलेला असहकाराचा नऊ परिच्छेदांचा ठराव महात्मा गांधींनी उचलून धरला व लाला लजपतराय, श्री शंकराचार्य (पुरी), स्वामी श्रद्धानंद, श्यामसुंदर चक्रवर्ती व जमनादास मेहता यांनी पुष्टी दिल्यावर संमत झाला. या ठरावानं खिलाफत समिती व काँग्रेस यांच्या युतीवर अधिकृतपणाची मुद्रा ठोकली गेली.” गांधींजींच्या आग्रहावरून आंदोलनात खिलाफतीच्या प्रश्‍नाचा समावेश इतकेच काय परंतु या आंदोलनाची कार्यपद्धती (असहकारिता) मनाला पटत नसली तरी (काँग्रेस) पक्षाचा आदेश म्हणून काही कार्यकर्त्यांनी त्यात उडी घेतली. डॉ. हेडगेवार हे त्यांच्यापैकी एक.

         1921 च्या पहिल्या दोन-तीन महिन्यांत डॉ. मुंजे व डॉ. हेडगेवार यांनी भंडारा, खापा, केलवर, काटोल, वळेगाव, दशसहसर, देवली, वर्धा, बोरी अशा अनेक गावी तसेच तालुका व जिल्हा परिषदांतून असहकारितेचा प्रचार करणारी भाषणे केली. त्याचा परिणाम म्हणून हेडगेवारांवर भाषणबंदी घालण्यात आली. तरीही त्यांनी भाषणांचा धडाका चालूच ठेवला.

         दरम्यान, त्यांनी काटोल व भरतवाडा येथे केलेल्या भाषणांवरून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. या खटल्यात हेडगेवार यांनी आपली बाजू आपणच मांडली. ती अत्यंत निर्भिडपणाने. मि. स्मेली या ब्रिटिश न्यायाधीशाला उद्देशून ते स्पष्टपणे म्हणाले, की “हिंदुस्थानात एखाद्या हिंदी माणसाच्या कृत्याचा न्यायनिवाडा करण्याचा आव एखाद्या परक्या राजसत्तेने आणावा, हा मी माझा नि माझ्या महान देशाचा अपमान समजतो.”

         राजद्रोही भाषणे न करण्याची हमी आणि त्यासाठी जामीन देण्याचं नाकारल्यानं न्यायाधीशांनी त्यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हेडगेवार यांचं बचावाचं भाषण हे मूळ भाषणापेक्षाही जास्त प्रक्षोभक असल्याची नोंद घ्यायला न्यायाधीश महोदय खटल्याच्या निकालपत्रात विसरले नाहीत.

         कारावासात असताना डॉ. हेडगेवार, गांधी आणि काँग्रेस यांच्या अपेक्षेप्रमाणे व आदेशानुसार सूतकताईसुद्धा करीत. सुटका होऊन बाहेर आल्यावरही ते खादीची पांढरी (म्हणजेच गांधी) टोपी व खादीचे उपरणे परिधान करीत असत. दरम्यान, त्यांची प्रांतिक काँग्रेसवर निवड झाली व प्रांताच्या संयुक्त कार्यवाह पदावर नियुक्तीही झाली.

        हेडगेवार यांचा काँग्रेसच्या चळवळीतील सहभाग आणि त्यांना झालेली ही शिक्षा संघाच्या स्थापनेच्या अगोदरच्या आहेत म्हणून त्यांचे महत्त्व यासाठी कमी होत नाही की अशाच प्रकारचा सहभाग आणि शिक्षण यांची पुनरावृत्ती संघाच्या स्थापनेनंतरही एकदा झाली आहे. पण तिकडं वळण्यापूर्वी आणखी एकदा संघाच्या निर्मितीची चर्चा करायला हवी.

         या संदर्भात आणखी एका महत्त्वाच्या नावाचा उल्लेख करायला हवा. ते म्हणजे डॉ. ना. सु. हर्डीकर. डॉ. हर्डीकर हे हेडगेवारांचे कोलकात्याला नॅशनल मेडिकल कॉलेजमधील सहाध्यायी. पदवी घेतल्यावर हर्डीकर अमेरिकेत गेले. तिथं त्यांनी लाला लजपतराय यांच्याबरोबर काम केले. हर्डीकरांचा व टिळकांचा पत्रव्यवहार असे.

        भारतात परत आल्यावर हर्डीकर नागपूर येथील काँग्रेसला उपस्थित राहिले. शारीरिक सामर्थ्य, शिस्त, संघटना या गोष्टींचे हर्डीकरांना  हेडगेवारांएवढेच प्रेम होते. नागपूरच्या अधिवेशनात हेडगेवारांप्रमाणे त्यांनीही स्वयंसेवकाचे काम केले.

         वस्तुतः देशासाठी आणि काँग्रेससाठी स्वयंसेवक हा एकदम नवखा प्रकार होता अशातला भाग नाही. नी बेझंट, टिळक, जीना यांनी होमरूल लीगची चळवळ चालवली तेव्हापासून सभांचे नियोजन, गर्दीला आळा घालणे, नेत्यांचं रक्षण करणं यासाठी स्वयंसेवकांची गरज होती. तेव्हाही या स्वयंसेवकांसाठी गणवेश वगैरे होताच; पण त्यांचे स्वतंत्र असे संघटन नव्हते व त्यांना गंभीरपणे घेतही नव्हते.

         हर्डीकर आणि हेडगेवार या दोघांनाही ही उणीव 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात जाणवली. 1923 सालच्या काकीनाडा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हर्डीकरांनी हिंदुस्थानी सेवादलाची स्थापना करून आघाडी मारली. हर्डीकर कडक शिस्तीचे असल्यामुळं हे सेवादल नावारूपाला येऊ लागलं. इतके, की ते पुढे काँग्रेसश्रेष्ठींच्याच डोळ्यांवर येऊ लागले. अहिंसेच्या तत्त्वावर विश्‍वास असणार्‍या काँग्रेसमध्ये अशा लष्करी बाण्याच्या संघटनेची गरजच काय, असे प्रश्‍न उपस्थित करण्यात येऊ लागले. यथावकाश हर्डीकर आणि त्यांचे दल या दोघांचे पंख छाटून काँग्रेसने आपलं नुकसान करून घेतलं. आज जर ते असतं तर पैसे देऊन सभांसाठी श्रोते गोळा करण्याची यातायात तरी करावी लागली नसती! मधल्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शह देण्यासाठी समाजवादी मंडळींनी राष्ट्र सेवादलाची स्थापना केली. नंतर त्याचं रूपांतर पुरोगामी विचारांच्या तरुण-तरुणींची लग्ने जमवणार्‍या अनौपचारिक विवाहमंडळात झाल्याची टीका सेवादलाचे टीकाकार करीत असतात!

        काकिनाडात 1923 मध्ये स्थापन झालेले हर्डीकरांचे सेवादल एकाच वर्षात इतकं प्रभावी ठरले, की पुढील वर्षी बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनावर त्याची छाप पडल्याशिवाय राहिली नाही. काहींच्या डोळ्यांत ते भरले, तर काहींच्या डोळ्यांत ते खुपले असे म्हणता येईल. सेवादलातील स्वयंसेवकांना देण्यात येणार्‍या आज्ञा हिंदी भाषेत हव्यात, त्यांना चांगली कवायत करता यावी यासाठी हर्डीकरांनी बडोद्याच्या सी. माणिकरावांच्या आखाड्यातील त्यांचेच शिष्य कृ. द. महाबळ यांना मुद्दाम निमंत्रित करून त्यांचा त्यासाठी उपयोग करून घेतला होता.

            संघामधील व्यायामाची व कसरतीची परंपरा पेशवेकालीन प्रसिद्ध व्यायामपटू बाळंभटदादा देवधर यांच्यापासून विकसित झाली. माणिकराव खरे तर जुम्मादादांच्या आखाड्यातले. पण यातील मौज अशी आहे, की बाळंभटदादांचे चिरंजीव नारायण हे बडोद्यातच होते त्यामुळे जुम्मादादांची परंपरा व बाळंभटांची परंपरा यांच्यात देवघेव होत होती. हर्डीकरांचे दल आणि हेडगेवारांचा संघ यातील एक भेद भाषिक होता. सेवादलातील आज्ञा हिंदी किंवा हिंदुस्थानी भाषेत तयार केल्या होत्या, तर संघात संस्कृत भाषेचा उपयोग करण्यात आला. हे काम अण्णा सोहोनी यांचं. अण्णा सोहोनी प्रसिद्ध क्रांतिकारक भिडे भटजी यांच्या तालमीत तयार झाले होते. भिडे बाळंभटदादांच्या परंपरेतील सैनिकी पद्धतीचे शिक्षण देणारे मार्तंड जोग हे तर सेवादलाचे!

         व्यावहारिक पातळीवर कोणतीही किंमत देऊन व अवाजवी अनुनय करीत मुसलमानांचा पाठिंबा घेऊन त्यांच्यासह स्वातंत्र्यलढा करायचा हे काँग्रेसचे धोरण न पटल्यानं हिंदूंनी आत्मनिर्भर होऊन त्यांच्या मदतीशिवाय म्हणजेच ऐक्याशिवाय लढा चालवायचा या निष्कर्षापर्यंत हेडगेवार आले व त्यासाठी संघटना स्थापन करण्याची गरजही त्यांच्या लक्षात आली. तथापि, या संघटनेसाठी तात्त्विक भूमिकेचीही तितकीच गरज होती. हे काम करण्यास मुंजे किंवा नागपुरातील इतर मंडळी सक्षम नव्हती. असे काही काम खुद्द टिळकांनीच करावे यासाठी मुंजे यांनी पाठपुरावा केला होता; पण टिळकच निजधामी गेल्यामुळं ती शक्यता केव्हाच संपुष्टात आली होती.

         योगायोगाने अशी एक व्यक्ती हेडगेवारांना उपलब्ध होती. बॅ. विनायक दामोदर सावरकर व त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर उपाख्य  बाबाराव सावरकर यांची सरकारनं अंदमानातल्या तुरुंगातून नुकतीच सुटका केली होती. विनायकराव तथा तात्या यांना राजकीय कृती वा विधान करण्यास मनाई करून त्यांना सरकारने रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. बाबारावांवर मात्र असे निर्बंध नव्हते. मुंजे - हेडगेवार प्रभृती नागपूरकर मंडळी बाबारावांच्या सहवासात आली व त्यांच्यामार्फत त्यांचा विनायकरावांशी संपर्क प्रस्थापित झाला.

        खरे तर सुरवातीच्या काळात स्वतः विनायकराव स्वातंत्र्यलढा हा हिंदू व मुसलमानांनी मिळून लढायचा आहे या मताचे होते. इतकेच नव्हे, तर 1857 मध्ये अशा प्रकारचा लढा लढला गेला होता अशा प्रकारचा इतिहासाचा अन्वयार्थ लावणारा ग्रंथही त्यांनी लिहिला होता. या ग्रंथापासून किती तरी स्वातंत्र्यसैनिकांनी प्रेरणा व स्फूर्ती घेतली होती. तथापि, अंदमान येथील कारावासाच्या काळात केलेल्या वाचनातून व आलेल्या अनुभवातून विनायकरावांचे मतपरिवर्तन होऊन ते पूर्णपणे हिंदू राष्ट्रवादी बनले.

         अंदमानातून सुटून रत्नागिरीत आल्यानंतर विनायकरावांनी ‘हिंदुत्व’ नावाचा प्रबंध लिहिला. त्यात हिंदू राष्ट्राचे सैद्धांतिक विवेचन असून, ‘हिंदू’ शब्दाची अभिनव व्याख्याही केली होती. याच ग्रंथात हेडगेवारांना आपल्या संघटनेसाठी तात्त्विक आधार सापडला. ‘हिंदुत्व’मधील भूमिका पायाभूत मानून हिंदूंचे शारीरिक, लष्करी व राजकीय अशा तीन प्रकारचे शिक्षण देणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही प्रभावी संस्था व संघटना ठरली.

       तरुणांच्या अशा प्रकारच्या संघटनांची आवश्यकता कम्युनिस्ट वगळता सर्वच राजकीय प्रवाहांना पटलेली दिसून येते. अर्थात, कम्युनिस्टांच्या कामगार संघटना तथा ट्रेड युनियन्स असल्यामुळे त्यांना अशा संघटनेची गरज वाटली नसणे शक्य आहे.

      बाकीच्यांचे सोडा; पण खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी 25 नोव्हेंबर 1926 या दिवशी ‘समता सैनिक दल’ या संघटनेची स्थापना केली. या दलातदेखील शारीरिक, बौद्धिक व लष्करी असे तिन्ही प्रकारचे शिक्षण देण्यात येत असे. बुधवार लष्करी कवायतीसाठी राखून ठेवलेला असे. पुढं महाराष्ट्रातल्या आंबेडकरवाद्यांचं या संघटनेकडं पूर्ण दुर्लक्ष झालं व तेही काँग्रेसवाल्यांप्रमाणं पूर्णपणे राजकारणात गुरफटून गेले! इतर संघटनांची वाताहत होत असताना संघ मात्र टिकून राहिला.

 - (डॉ. सदानंद मोरे)