Menu

Study Circle

२८ फेब्रुवारी २०१८

राशिद खान बनला क्रिकेट इतिहासातील सर्वांत युवा कर्णधार

       अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वांत युवा कर्णधार झाला आहे. राशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस आहे. असगर स्टॅनिकजईऐवजी राशिद खानकडे नेतृत्व दिले आहे. असगरला अपेंडिक्सवरील शस्त्रक्रियेसाठी सध्या झिम्बाब्वेतील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफगाणिस्तानने झिम्बाब्वेविरूद्धच्या टी-२० मलिकेत २-० ने विजय मिळवला आहे. या विजयी संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या राशिद खानने नुकताच आयसीसीच्या टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. यापूर्वी राशिदने एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहबरोबर संयुक्त स्थान प्राप्त केले होते.

      टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळल्या गेलेल्या तीन टी-२० सामन्यात शानदार कामगिरी करत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने २० स्थानांनी प्रगती करत १२ व्या क्रमांकावर उडी मारली. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहची क्रमवारीत घसरण झाली असून तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज ईश सोढी दुसऱ्या, वेस्ट इंडीजचा सॅम्युएल बद्री तिसऱ्या तर पाकिस्तानचा इमाद वसीम चौथ्या स्थानी आहे.

चंद्रावर राहण्यासाठी इस्त्रो बांधणार ‘इग्लू’ घरे

      अंतराळ क्षेत्रात एकापाठोपाठ एक यश मिळवणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने आता चंद्रावर घर बांधण्याची तयारी सुरु केली आहे. ‘इस्रो’ चंद्रावर ‘इग्लू’ प्रमाणे घर बांधणार आहे. यासाठी रोबोट्स आणि 3डी प्रिंटर्स पाठवले जाणार आहेत. विशेष म्हणजे चंद्रावरील माती आणि अन्य गोष्टींचा वापर करून ‘इग्लू’ तयार केला जाणार आहे. ‘इग्लू’ ही विशिष्ठ पद्धतीने बांधली जाणारी घरे आहेत. टुंड्रा प्रदेशात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी अशी बर्फाची घरे बांधली जातात. 

२७ फेब्रुवारी २०१८

मुंबईचा सुनित पाचव्यांदा ‘महाराष्ट्र श्री’

       महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनित जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणार्‍या महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनितने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला. फिजिक स्पोर्टस् प्रकारात पुणेकरांनी बाजी मारली. पुरुषांमध्ये रोहन पाटणकर, तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. मुंबईने सांघिक विजेतेपदावर, तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.

शार्कच्या नव्या प्रजातीचा शोध

       फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी शार्क माशांची नवी प्रजाती अटलांटिक महासागरात शोधली आहे. ही नवीच प्रजाती आहे हे तपासण्यासाठी जनुकीय चाचणीचाही आधार घेण्यात आला. संशोधकांनी या शार्कला ‘अटलांटिक सिक्सगिल शार्क’ असे नाव दिले आहे. हिंदी किंवा पॅसिफिक महासागरातील शार्कपेक्षा हा शार्क अनेक बाबतीत वेगळा असून त्याची लांबी सहा फूट इतकी आहे.

         टोबी डॅली या संशोधकाने सांगितले की, सकृतदर्शनी हे शार्क अन्य शार्कसारखेच दिसत असले तरी त्यांच्यामध्ये बरेच वेगळेपण आहे. हिंदी किंवा पॅसिफिक महासागरातील शार्क पंधरा फूट किंवा त्यापेक्षा अधिक लांब असू शकतात. मात्र, हे शार्क सहा फूट लांबीचेच असतात. एखाद्या करवतीसारखा खालचा जबडा आणि सहा गिल ही त्यांची अन्य काही वेगळी वैशिष्ट्ये. अन्य बहुतांश शार्कमध्ये पाच गिल असतात. हे शार्क पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहेत. त्यांचे पूर्वज 250 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. 

२६ फेब्रुवारी २०१८

जगातील सर्वात लहान आकाराची पेन्सिल

       जगभरातील काही सुक्ष्म कलाकृती बनवणारे कलाकार अत्यंत छोट्या आकाराच्या कलाकृती बनवत असतात. त्यांची दखल गिनिज बुककडूनही घेतली जात असते. आता उत्तराखंडमधील हलद्वानी जिल्ह्यातल्या एका कलाकाराने सर्वात लहान आकाराची पेन्सिल तयार केली आहे. लाकूड आणि एचबी लीडने तयार केलेल्या या पेन्सिलची लांबी अवघी 5 मिलीमीटर आणि रूंदी 0.5 मिलीमीटर इतकी आहे.

    ही पेन्सिल बनवण्यासाठी त्यांना तीन ते चार दिवस लागले. या कलाकाराचे नाव आहे प्रकाशचंद्र उपाध्याय. या पेन्सिलचा प्रोजेक्ट उपाध्याय यांनी ‘असिस्ट वर्ल्ड रिसर्च फाऊंडेशन’कडे पाठवला. या फाऊंडेशनने त्यांचा प्रोजेक्ट स्वीकारत विश्‍वविक्रमात त्याची नोंद केली. उपाध्याय यांच्या नावावर हा एकच विक्रम नसून यापूर्वी त्यांनी जगातील सर्वांत लहान आकाराची हनुमान चालीसा लिहिलेल्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. उपाध्याय यांच्याआधी उत्तर अमेरिकेच्या एका व्यक्‍तीने जगातील सर्वात लहान पेन्सिल तयार करण्याचा विक्रम रचला होता. ती पेन्सिल 17.5 मिलीमीटर आकाराची होती. त्यामुळे उपाध्याय यांनी हा विक्रम बर्‍याच फरकाने मोडला.

सापासारख्या सरपटणार्‍या रोबोची निर्मिती

       अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आता एका मऊ आणि सापासारखा सरपटणारा रोबो बनवला आहे. जपानमधील कागद कापून कलाकृती बनवण्याच्या प्राचीन ‘किरिगामी’ या पद्धतीचा यामध्ये वापर करण्यात आला. हा रोबो ताणला असता सपाट किरिगामी पृष्ठभाग ‘थ्रीडी-टेक्सचर्ड’ पृष्ठभागात रूपांतरीत होतो. सापाची त्वचा जशी त्याला सरपटण्यासाठी मदत करते, तसाच हा पृष्ठभागही या रोबोला सरपटण्यासाठी मदत करतो.

     अहमद रफसन्जानी या संशोधकाने याबाबतची माहिती दिली. अशा लवचिक, ताणता येणार्‍या रचना कशा निर्माण करायच्या, याबाबत अलीकडच्या काळात बरेच संशोधन झाले असून त्याचा रोबोटिक तंत्रज्ञानातही मोठा वापर केला जात आहे. किरिगामी तंत्राचा असे सॉफ्ट रोबो बनवण्यासाठी उपयोग होतो. सापाच्या त्वचेशी मिळते-जुळते काप काढून या रोबोची अशी ‘त्वचा’ बनवण्यात आली आहे. वेगवेगळ्या आकाराचे काप काढून याबाबतचे आधी प्रयोग करण्यात आले होते.

२४ फेब्रुवारी २०१८

शुक्राणूंच्या संरचनेबाबत नवे संशोधन

      पुरुषांच्या शरीरात हजारो शुक्राणू विकसित होत असतात. अशा अनेक शुक्राणूंपैकी केवळ एकच शुक्राणू बीजांडाला फलीत करीत असतो. त्यासाठी शुक्राणूंची गती प्रभाव टाकत असते. आता संशोधकांनी शुक्राणूंच्या गतीविषयी कार्य करणार्‍या त्याच्या संरचनेबाबत नवे संशोधन केले आहे. शुक्राणूच्या मागील भागातील अतिशय सुक्ष्म अशी नवी रचना त्यांनी शोधून काढली असून हाच भाग त्यांच्या गतीवर परिणाम करतो, असे त्यांचे म्हणणे आहे. या भागात अनोखे स्पेक्ट्रम असल्याचे दिसून आले आहे.

    शुक्राणूंचा प्रवाह आणि गर्भधारणेसाठी शुक्राणूचा मागचा भाग प्रभावी होणे गरजेचे असते. स्वीडनच्या गोथेनबर्ग युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी क्रायो-इलेक्ट्रॉन टोमोग्राफीच्या सहाय्याने या मागच्या भागातील ही सुक्ष्म संरचना शोधली आहे. या प्रक्रियेद्वारे पेशींच्या संरचनेची त्रिमितीय प्रतिमा मिळत असते. त्याच्या सहाय्याने सुक्ष्मातिसुक्ष्म भागांचीही ओळख करून त्यांची कार्यप्रणाली तपासता येते.

२३ फेब्रुवारी २०१८

आइस हॉकीमध्ये अमेरिकेला ऐतिहासिक सुवर्णपदक

     अमेरिकेच्या महिला संघाने हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आइस हॉकीमधील २० वर्षांचा दुष्काळ संपवणारे ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले आहे.

     आइस हॉकीमध्ये अमेरिकेने कट्टर प्रतिस्पर्धी कॅनडाचा पेनल्टीमध्ये ३-२ असा पराभव केला. कॅनडाच्या मेघान अ‍ॅगोस्टाचा निर्णायक प्रयत्न मैडी रुनीने हाणून पाडल्यानंतर अमेरिकेच्या महिला संघाने जल्लोष साजरा केला. या विजयासह अमेरिकेने सलग २४ ऑलिम्पिक विजयांची कॅनडाची मालिका खंडित केली. ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेतही कॅनडाची अमेरिकेविरुद्ध १२-११ अशी विजयी कामगिरी आहे.

कोरिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची निवड

      ३ ते १२ मार्चदरम्यान भारतीय महिला संघाच्या कोरिया दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने २० सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी भारताची अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. याचसोबत आघाडीच्या फळीतली खेळाडू पुनम राणीनेही संघात पुनरागमन केलं आहे.

   बचावपटू सुनीता लाक्रा ही या दौऱ्यात भारतीय संघाची उप-कर्णधार म्हणून काम पाहणार आहे. गोलकिपर सविताला मात्र या दौऱ्यात विश्रांती देऊन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे.

२२ फेब्रुवारी २०१८

फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी

     भारतीय हवाई दलातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी लढाऊ विमान उडवत भारतीय संरक्षण दलात एक नवा इतिहास रचला आहे. अवनी यांनी १९ फेब्रुवारी रोजी गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावरुन ‘फाइटर एअरक्राफ्ट मिग २१ बिसन’च्या साथीने आकाशात झेप घेतली.  अवनी यांच्या फायटर एअरक्राप्टने ३० मिनिटे आवकाशात भरारी मारली आणि त्‍यानंतर लँडिंग केले.

      अवनी चतुर्वेदी यांच्या या कामगिरीमुळे एकट्याने लढाऊ विमान उडवणाऱ्या त्‍या पहिल्‍या महिला वैमानिक ठरल्‍या आहेत. विमान उडविण्याअगोदर त्‍यांच्या प्रशिक्षकांनी मिग २१ या एअरक्राप्टची पाहणी केली. त्‍यानंतर उड्‍डानावेळीही अनुभवी वैमानिक आणि प्रशिक्षक उपस्‍थित होते. मिग २१ या विमानाचा जागातील सर्वात जास्‍त लँडिंग आणि उड्ड्णाचा वेग आहे. 

      अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना कंठ यांना १८ जून २०१६ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ स्क्वाड्रनमध्ये सहभागी करुन घेण्यात आले. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याद्वारे त्यांना कमिशनमध्ये नेमण्यात आले होते. 

     चतुर्वेदी यांच्या या कामगिरीबाबत बोलताना कमांडर प्रशांत दीक्षित म्हणाले की, ‘‘अवनी यांचे हे यश देशासाठी अभिमानाची गोष्‍ट आहे. ‘फ्लाइंग ऑफिसर चतुर्वेदी यांनी मिग २१च्या केलेल्या यशस्वी उड्ड्णाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. भारतीय हवाई दलात महिला ऑफिसर आणि पुरुष ऑफिसर दोघांनाही समान प्राधान्य दिले जाते.’’ 

         ब्रिटन, अमेरिका, इस्रायल आणि पाकिस्तान या देशांमध्येच स्त्रियांना वैमानिक होण्यासाठी परवानगी देली जाते. आता या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. भारतात ऑक्टोबर २०१५ मध्ये सरकारने महिलांसाठी लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.  

इराणमध्ये विमान अपघात ,६६ ठार

     रशियात झालेल्या भीषण विमान अपघाताची घटना ताजी असतानाच रविवारी इराणमध्ये विमान कोसळून 66 जणांना मृत्यू झाला आहे. इराणच्या असेमन एअरलाईन्सकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. अमेय एअरलाईन्सचे हे विमान राजधानी तेहरानहून यासूज येथे निघाले होते. विमान उड्डाणानंतर काही वेळातच इराणच्या दक्षिण भागात ते कोसळले. मात्र, या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.

    असेमन एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार या विमानामध्ये एका लहान मुलासह 60 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. दोन इंजिन असलेले हे विमान कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते. सध्या दक्षिण इराणमध्ये ढगाळ वातावरण आहे. विमान ज्या भागात कोसळले तो डोंगराळ परिसर आहे. विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी जलदगतीने मदतकार्य हाती घेण्यात आले. मात्र, खराब हवामान आणि डोंगराळ परिसर असल्याने येथे अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. 

    तेहरानहून निघालेल्या या विमानाचा काही क्षणातच रडारशी संबंध तुटला आहे. यानंतर विमान अपघाताची बातमी मिळाली. यडोंगराळ भागातच विमान कोसळल्याने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आपत्कालीन पथकाला मोठी कसरत करावी लागली.

२१ फेब्रुवारी २०१८

जुन्या सुपरनोव्हाचा शोध

      खगोल शास्त्रज्ञांनी आता आतापर्यंत शोधलेल्या सुपरनोव्हांपैकी सर्वात जुन्या ठरलेल्या सुपरनोव्हाचा शोध लावला आहे. एखाद्या तार्‍याचा मृत्यू होतो त्यावेळी त्याचा प्रचंड स्फोट होत असतो. या घटनेला सुपरनोव्हा असे म्हटले जाते. संशोधकांनी आता तब्बल 10.5 अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या अशा अवकाशीय स्फोटाचा शोध लावला आहे. 

    ‘डार्क एनर्जी सर्व्हे’च्या सहाय्याने ‘सुपरनोव्हा’ झालेल्या या तार्‍याचा शोध लावण्यात आला आहे. या तार्‍याला ‘डीईएस 162 एनएम’ असे नाव देण्यात आले आहे. या शोधासाठी चिलीमधील ‘व्हेरी लार्ज टेलिस्कोप’ आणि ‘द मॅगेलन’ या दोन दुर्बिणींचा तसेच हवाईतील ‘द केक ऑब्झर्व्हेटरी’चा उपयोग करण्यात आला. या स्फोट झालेल्या तार्‍याचे अंतर आणि तेज यांचे मोजमाप करण्यासाठी या दुर्बिणींचा वापर झाला. या स्फोटापासूनचा प्रकाशकिरण पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास तब्बल 10.5 अब्ज वर्षे लागली आहेत. त्यामुळे हा सर्वाधिक जुना सुपरनोव्हा ठरला आहे. हे ब्रह्मांडच 13.8 अब्ज वर्षांपूर्वी उदयास आले असे मानले जाते. त्यावरून हा सुपरनोव्हा किती जुना आहे याची कल्पना येऊ शकते. 

१७ फेब्रुवारी २०१८

दुसऱ्या सौरमालेतील १०० ग्रहांचा शोध

     आपल्या सौरमालेव्यतिरिक्त अवकाशात असलेल्या सौरमालांमधील ग्रहांचा शोध घेणासाठी अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने पाठवलेल्या (नासा) केप्लर अवकाशयानाला आणखी मोठे यश मिळाले आहे. के २ मोहिमेअंतर्गत गेलेल्या या यानाने दुसऱ्या सौरमालेतील नव्या १०० ग्रहांचा शोध लावला आहे. याबरोबरच के २ मोहिमेत शोधण्यात आलेल्या ग्रहांची संख्या ३०० वर पोहोचली आहे. डेन्मार्कमधील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्कमध्ये डॉक्टरेटचे शिक्षण घेणारे संशोधक अँड्र्यू मायो यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'आम्ही २७५ ग्रहांचा अभ्यास सुरू केला होता त्यापैकी १४९ खरे ग्रह असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यापैकी ९५ ग्रहांचा आम्ही नव्याने शोध लावल्याचे सिद्ध झाले आहे. पहिल्यांदा २०१४ मध्ये के २ने पहिल्यांदा डाटा पाठवला होता तेव्हापासून याबाबतचे संशोधन सुरू आहे.' खगोलशास्रांसंबंधीच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संधोधनाच्या लिखाणात मायो यांची प्रमुख भूमिका आहे.

ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. मनीषा दीक्षित यांचे निधन

     ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आणि मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

    मनीषा दीक्षित यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला. संस्कृत भाषा आणि साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक कै. गो. के. भट यांच्या त्या कन्या आहेत. गुजरातमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील फर्गसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, ललित कला केंद्र इत्यादी संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन केले होते. पुणे विद्यापीठाच्या इ एम आर सी विभागात निर्मात्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या. 

     नाटक, काव्य, चित्रपट, शास्त्रीय संगीत अश्या विविध क्षेत्रांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या 'रुजवण', 'निगराणी', 'पूल', 'डायरी', या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेला 'ओवी ते हायकू' हा मराठी काव्यविश्वाचा मागोवा घेणारा कार्यक्रम विशेष गाजला.

१६ फेब्रुवारी २०१८

नेपाळमध्ये नवे पंतप्रधान

     के. पी. शर्मा ओली यांची नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली. अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी ही नियुक्ती केली आहे. शर्मा ओली (वय ६५) नेपाळचे ४१वे पंतप्रधान असतील.ओली नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-यूएमएल आणि प्रचंड नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-माओइस्ट आघाडीने डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत संसदेतील २७५ पैकी १७४ जागा जिंकल्या. 
     राजकीय अस्थिरतेमुळे सात महिन्यातच शेर बहादूर देऊबा यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ते देशाचे ४०वे पंतप्रधान होते. नेपाळच्या संसदीय आणि स्थानिक निवडणुकीत देऊबा यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सीपीएनच्या पाठिंब्याने देऊबा नेपाळचे पंतप्रधान झाले होते. राजीनामा देण्यापूर्वी दूरचित्रवाणीवर केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली निवडणुका योग्यरित्या पार पडल्याचा दावा केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे डाव्या आघाडीचा नेपाळमध्ये सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. या आघाडीचे ओली दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. यापूर्वी ते ११ ऑक्टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २०१६ या कालावधीत पंतप्रधान होते. त्यांनी उपपंतप्रधान आणि गृहमंत्रालयाचा कार्यभारही यापूर्वी सांभाळला आहे. ते चीनचे समर्थक मानले जातात.

जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरं

     मायानगरी मुंबापुरीने जगातील सर्वात श्रीमंत १५ शहरांमध्ये १२वा क्रमांक पटकावला आहे. देशाची आर्थिक राजधानी हे बिरुद मिरवणाऱ्या मुंबईची एकूण श्रीमंती ९५० अब्ज अमेरिकी डॉलरवर गेली आहे. 'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत १५ शहरांमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचा प्रथम क्रमांक लागला आहे.

१५ फेब्रुवारी २०१८

विदेशातील सर्वात मोठे यश

     द. आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय हे टीम इंडियाचे सर्वात मोठे यश असल्याचे सलामीवीर रोहित शर्माने म्हटले आहे. ‘विदेशातील द्विपक्षीय वन-डे मालिकेतील हा सर्वात मोठा विजय असल्याचे मी मानतो. यापूर्वी 2007 साली आम्ही ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका जिंकली होती; मात्र त्यापेक्षाही ही मालिका कठीण होती, असे ‘मॅन ऑफ दी मॅच’ ठरलेल्या रोहितने म्हटले आहे. 

     ‘या मालिकेतून आम्ही खूप काही कमावले. कसोटी मालिका गमावल्यानंतर सगळ्यांनीच आमच्या विदेशातील क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले होते; मात्र चार वन-डे जिंकून आम्ही टीकाकारांची तोंंडे बंद केल्याचेही 115 धावांची खेळी करणारा रोहित म्हणाला. ‘द. आफ्रिकेत खेळणे वाटते तितके सोपे नाही. एक-दोन मॅच जिंकणे आणि संपूर्ण मालिका जिंकणे यात मोठा फरक असून विजयाचे श्रेय सगळ्यांनाच जाते,कसोटी मालिका आम्ही गमावली असली, तरी द. आफ्रिकेला चांगली झुंज दिली आणि एकतर्फी विजय मिळवू दिला नाही. आम्ही जे काही यश मिळवले त्याचा सगळ्यांनाच खूप अभिमान वाटत असल्याचेही रोहितने म्हटले आहे.

शॉन व्हाइटकडून अमेरिकेचे सुवर्णशतक

     शॉन व्हाइटने स्नोबोर्ड क्रीडा प्रकारात पुरुष गटामध्ये  सुवर्णपदक पटकावले आणि हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात अमेरिकेच्या ‘सुवर्णशतका’ची नोंद झाली. अमेरिकेच्या चार्ल्स जेवस्ट्रोवने  १९२४ मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमधील स्पीड स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक हे अमेरिकेचे पहिले सुवर्णपदक होते. दरम्यान, वादळी वाऱ्याचा तडाखा सलग पाचव्या दिवशी खेळाडूंना व संयोजकांनाही बसला.

     उत्कंठापूर्ण शर्यतीत ३१ वर्षीय व्हाइटने शेवटच्या फेरीत अप्रतिम कौशल्य दाखवत विजेतेपदावर मोहोर उमटवली. त्याने यापूर्वी २००६ व २०१० मध्ये अजिंक्यपद मिळवले. मात्र २०१४ मध्ये त्याला पदकापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळेच यंदा त्याने कसून तयारी केली होती. जपानच्या आयुमु हिरानोने रौप्यपदक मिळवले, तर ऑस्ट्रेलियाच्या लुकास क्लॅपरला कांस्यपदक मिळाले. ’

१४ फेब्रुवारी २०१८

सेनादलाला अजिंक्यपद

   अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या तिसर्‍या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत सेनादलाने पुरुष गटात, तर भारतीय रेल्वे संघाने महिला गटाचे अजिंक्यपद मिळवले. दोन्ही संघांनी अनुक्रमे कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश यांच्यावर मात केली. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश यांना उपविजेतिपदे मिळाली. विजेत्या संघांना फेडरेशन चषकासह प्रत्येकी दोन लाख, तर उपविजेत्यांना प्रत्येकी लाखाचे पारितोषिक देण्यात आले.
     पुरुषांच्या अंतिम सामन्यात सेनादलाने कर्नाटकचा संघर्ष 28-25 असा संपविला. सेनादलाने विजेत्यांच्या थाटातच खेळाला सुरुवात केली. सुकेश हेगडेची पकड करीत सेनादलाने गुणाचे खाते उघडले. 10 व्या मिनिटाला लोण देत सेनादलाने 11-02 अशी आघाडी घेतली. नितीन तोमरने एकाच चढाईत 3 गडी बाद केल्यामुळे हा लोण झटपट झाला. मध्यांतराला 15-09 अशी सेनादलाकडे आघाडी होती; पण विश्रांतीनंतर कर्नाटकच्या खेळाडूंनी टॉप गिअर टाकत खेळात जान आणली. त्यांनी सेनादलाच्या लोणची परतफेड करीत मध्यांतरानंतर 10 व्या मिनिटाला 18-18 अशी बरोबरी साधली. शेवटची 5 मिनिटे पुकारली तेव्हा 24-24 अशी बरोबरी होती. त्यावेळी मोनू गोयलने बोनस गुण घेत व बचावपटूंनी दोन चित्तथरारक पकडी करीत सेनादलाला हा सामना जिंकून दिला. सेनादलाकडून सुरजितने अष्टपैलू खेळ करीत दोन पकडी केल्या व चढाईत 4गुण टिपले. मोनू गोयलने 17 चढायांत 3 गुण व 4 बोनस असे 7 गुण मिळविले. कर्नाटकच्या सुकेश हेगडेने 17 चढायांत 7 गुण वसूल केले. प्रशांत रॉय थोडा कमी पडला. त्याला 17 चढायांत अवघे 3 गुण मिळविता आले. तर दोन वेळा त्याची पकड झाली.

रशियन विमान कोसळून ७१ मृत्यू

    ६५ प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे सारातोव्ह एअरलाइन्सचे अॅन्तोनोव्ह एएन-१४८ हे विमान रविवारी उड्डाणानंतरच लगेचच शहराबाहेर कोसळले. अपघातात सर्व ७१ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नव्हते. 

     मॉस्कोच्या दोमोदेदोव्हो विमानतळावरून उड्डाण केल्यानंतरच दोन मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाबरोबरचा संपर्क तुटला आणि ते मॉस्कोजवळ रॅमेन्स्की जिल्ह्याच्या हद्दीत कोसळले. विमान ओर्स्क शहराकडे निघाले होते. विमानाने हवेत पेट घेतल्याचे आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळल्याचे आर्गुनोव्हो गावातील काहीजणांनी पाहिल्याचे 'इंटरफॅक्स' वृत्तसंस्थेने सांगितले. विमान कोसळलेले ठिकाण दुर्गम असून, मदतकार्य करणाऱ्यांना तेथे पायी जावे लागले. अपघातास खराब हवामान किंवा मानवी चूक कारणीभूत असावी, असा प्राथमिक अंदाज रशियाच्या वाहतूक मंत्रालयाने व्यक्त केला आहे. 

१३ फेब्रुवारी २०१८

साहित्य अकादमी पुरस्कार श्रीकांत देशमुख यांना प्रदान

    प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या बोलावे ते आम्ही... या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष 2017 साठी मराठी  साहित्य अकादमी पुरस्कार सोमवारी प्रदान करण्यात आला.

      कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांचा शानदार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.  पुरस्कार वितरण सोहळयाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लेखक किरण नागरकर होते. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर खंबार, उपाध्यक्ष माधव कौशिक आणि सचिव डॉ. के. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते.  यावेळी देशभरातील 23 प्रादेशिक भाषांतील साहित्यकृती व लेखकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख  यांच्या   बोलावे ते आम्ही.. या काव्य संग्रहास मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे आहे.

      बोलावे ते आम्ही.. हा श्रीकांत देशमुखांचा जुन्या  पिढीतील नवा कवितासंग्रह आहे. गावगाडयाचा बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे. कृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था ही देखील या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा 
विषय आहे.

तैवानमध्ये भूकंपात ४ जणांचा बळी

    तैवानमध्ये आलेल्या 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे 4 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये 225 जण जखमी झाले असून, 145 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरे कोसळली असून, मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

   या भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलिएन शहराच्या पश्‍चिम-उत्तर भागात जमिनीत 9.5 कि.मी. वर नोंदविला गेला आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या हुआलिएन प्रांतातील अनेक भागात भूकंपग्रस्तांसाठी मदत केंद्रे उभारली गेली आहेत. या ठिकाणी हजारो नागरिकांनी आश्रय घेतला आहे.

    भूकंपग्रस्त भागात अनेक इमारतींची पडझड झाली आहे. या ठिकाणी मदतकार्य हाती घेण्यात आले असून, जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही उभारणी केली जात आहे. येथे प्राथमिक उपचार करून त्यांना नजीकच्या काही शहरांमधील रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. 

     या भूकंपामध्ये एका आलिशान हॉटेलची इमारत एका बाजूला झुकली आहे. मार्शल नामक या हॉटेलमध्ये 300 खोल्या आहेत. आपत्कालीन विभागाने मोठ्या शिताफीने या हॉटेलमधील नागरिकांना बाहेर काढले. यानंतर हॉटेलच्या परिसरातील सर्व रहिवासी भाग रिकामा करण्यात आला आहे. 

१२ फेब्रुवारी २०१८

‘पृथ्वी-2’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

     देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बकालपणावर एकीकडे चर्चा केली जात असतानाच ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालात मायानगरीने श्रीमंत शहराच्या यादीत 12 वे स्थान पटकावले आहे. मुंबईची एकूण संपत्ती 950 अब्ज डॉलरची असून येथे 28 अब्जाधीश राहतात.

    एकूण 15 श्रीमंत शहरांचा या पाहणीत समावेश आहे. मुंबईनंतर टोरांटो (944 अब्ज), फ्रँकफ्रूट (912 अब्ज) आणि पॅरिस (860 अब्ज) या शहरांचा नंबर लागतो. अब्जाधीशांच्या लोकसंख्येतही मुंबईने पहिल्या 10 शहरांमध्ये स्थान पटकावले आहे. एकूण 28 अब्जाधीश मुंबईत राहत असून त्यांच्याकडे एक अब्ज डॉलरची संपत्ती आहे. संपत्तीच्या वाढीबाबत पुढील दहा वर्षांत मुंबईचा वेगाने विकास होणार असून उद्योग, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि मीडिया या क्षेत्रांचे माहेरघर असल्याचे मुंबईबाबत अहवालात म्हटले आहे.

      या यादीत न्यूयॉर्कने जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून पहिले स्थान पटकावले असून येथील लोकांकडे तीन ट्रिलियन डॉलरची संपत्ती आहे. 2.7 ट्रिलियन डॉलरच्या संपत्तीसह लंडन दुसर्‍या, तर सॅनफ्रान्सिसको तिसर्‍या स्थानावर आहे. बीजिंग, शांघाय, सिडनी या शहरांचादेखील या यादीत समावेश आहे. मुंबईबरोबरच ही शहरेदेखील वेगवान विकसित होत असल्याचे म्हटले आहे.

मुंबई जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर

       भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (डीआरडीओ) ‘पृथ्वी-2’ अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्याचा मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. ओडिशा येथील किनारपट्टीवरून ही सराव चाचणी घेण्यात आली. 350 कि.मी. अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे.

      याशिवाय 500 ते 1 हजार किलोग्रॅम वजनाची वॉरहेड्स सामावून घेण्याची क्षमता यामध्ये आहे. 2003 साली पृथ्वी क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात दाखल करण्यात आले. दरम्यान, ‘अग्‍नी-5’ आणि ‘अग्‍नी-1’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. 

११ फेब्रुवारी २०१८

मोदी यांना पॅलेस्टिनचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान

     भारताचे पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टिन हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत आणि पॅलेस्टिन यांच्यातील संंबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबाबत हा सन्मान आहे. 

मराठमोळ्या भारतीयाने पटकावला ऑस्कर!

     मराठी सिनेमाला ऑस्कर मिळायला हवे, हे तमाम मराठी सिनेमाप्रेमींनी उराशी बाळगलेले स्वप्न आहे. ते पूर्ण होईल तेव्हा होईल, पण एका मराठी माणसाला ऑस्कर मिळणे हे आता स्वप्न राहिलेले नाही. विकास साठ्ये या मुंबईच्या अभियंत्याने तांत्रिक विभागांसाठी देण्यात येणाऱ्या 'ऑस्कर'वर आपले नाव कोरले आहे. 

     कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्स येथे सायंटिफिक अँड टेक्निकल ऑस्कर २०१८ ऑस्कर सोहळा रंगला. या देण्यात आलेल्या कॅमेरा तंत्र पुरस्कारांमध्ये चार जणांच्या चमूची निवड झाली. 'शॉटोव्हर K1 कॅमेरा सिस्टीम' तंत्राचा सिनेमात यशस्वी वापर केल्याबद्दल या चौघांना ऑस्कर मिळाले आहे. या चौघांपैकी एक असणाऱ्या विकास साठ्ये यांनी हे कॅमेरा तंत्र विकसित केले आहे. 

    साठ्येंनी आपलं मनोगत मांडताना म्हटलंय, '२००९ मध्ये मी न्यूझिलंडमधील क्वीनस्टोन भागातली शॉटोव्हर कॅमेरा सिस्टीम ही नवी कंपनी जॉइन केली. त्यात 'एरिअल माउंट' प्रकारावर काम केले. क्वीनस्टोनचं निसर्गसौंदर्य अनेक सिनेनिर्मात्यांना-दिग्दर्शकांना भुरळ पाडतं. हेही कारण ही कंपनी येथे सुरु करण्यामागे होतं. 

९ फेब्रुवारी २०१८

इंद्रा नूयी आयसीसीच्या पहिल्या महिला संचालक

       'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या (आयसीसी) पहिल्या महिला स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंद्रा नूयी या जून महिन्यापासून आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारतील. 

       आयसीसीने जून २०१७मध्ये स्वतंत्र संचालकपदाच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली होती. या प्रस्तावातील 'स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्यात यावा' ही अटही आयसीसीने मान्य केली होती. नूयी यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. असे असले तरी, त्यांची पुनर्नियुक्तीही केली जाऊ शकते. 

       इंद्रा नूयी या क्रिकेटप्रेमी म्हणून ओळखल्या जातात. 'मला क्रिकेट अतिशय आवडतो. मी माझ्या कॉलेज जीवनात क्रिकेट खेळलेली आहे. यातून मला बरेच काही शिकता आले आहे. आता आयसीसीसोबत काम करणारी पहिली महिला म्हणून माझी नियुक्ती झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. बोर्ड, आयसीसीचे सहकारी आणि खेळाडूंसोबत काम करण्यास मी खूपच उत्सुक आहे', अशा शब्दांत नूयी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

      'आणखी एक स्वतंत्र संचालक नियुक्त करणे आणि तेही या पदावर महिलेची नियुक्ती करणे म्हणजे उत्तम कारभार करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे' अशी प्रतिक्रिया आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिली आहे.

७ फेब्रुवारी २०१८

जगातिल सर्वात शक्तिशाली रॉकेटचे प्रक्षेपण

       केप कॅनाव्हेरल (अमेरिका) - येथे जगातिल सर्वात शक्तिशाली रॉकेटचे प्रक्षेपण झाले. अमेरिकेची खासगी रॉकेट कंपनी स्पेस एक्सने हे रॉकेट प्रक्षेपित केले. ही कंपनी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांची आहे. 'फाल्कन हेवी' असे या रॉकेटचे नाव आहे. ही या रॉकेटची प्रायोगिक चाचणी होती.  

       सुमारे 23 मजल उंच हे रॉकेट आहे. या रॉकेटमधून लाल रंगाची 'टेल्सा रोडस्टर' ही कार देखील अवकाशात झेपावली. या रॉकेटचे वजन सुमारे 63.8 टन इतकं आहे. या रॉकेटमध्ये 27 मर्लिन इंजिन असून याची लांबी 230 फूट आहे. 

        स्पेस एक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कॅलिफोर्नियातील हावथर्न येथील मुख्यालयातून या प्रक्षेपणाचे थेट लाइव्ह स्ट्रिमिंग पाहिले. स्पेस सेंटरपासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर विज्ञानप्रेमींनी हे लॉन्च पाहण्यासाठी एका बीचजवळ गर्दी केली होती.

फोर्ब्सच्या यादीत भारतीय खेळाडूंची युवागिरी

      ‘इंडिया ३० अंडर ३०’ या फोर्ब्सच्या यादीत जसप्रीत बुमराह, हरमनप्रीत कौर, सविता पुनिया आणि हीना सिद्धू या खेळाडूंची वर्णी लागली आहे. त्यामुळे या चारही खेळाडूंच्या युवागिरीने सर्वांचीच मनं जिंकली असेच म्हणावे लागेल. या यादीत निवड निवड करतेवेळी काही निकषांवर खेळाडूंची पारख करण्यात येते. इतरांवर प्रभाव पाडण्याची आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता, प्रदीर्घ काळासाठी खेळात सक्रिय राहण्यासाठीची त्यांची पात्रता या गोष्टींवर निवड प्रक्रियेदरम्यान भर दिला जातो. निवड प्रक्रियेमध्ये या निकषांच्या बळावर पात्र ठरणाऱ्या खेळाडूंचीच फोर्ब्सच्या यादीत वर्णी लागते. ज्यामध्ये यंदाच्या वर्षी या युवा खेळाडूंनी बाजी मारली आहे.

जसप्रीत बुमराह-
      कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेतून पदार्पण करणारा जसप्रीत बुमराह त्याच्या जलदगती गोलंदाजीमुळे प्रसिद्धीझोतात आला. गेल्या वर्षी २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३९ विकेट्स घेतले. गेल्या काही वर्षांमध्ये जसप्रीतने मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीने एक वेगळीच ओळख प्रस्थापित केली आहे.

हरमनप्रीत कौर-
       महिला क्रिकेट विश्वकप शृंखलेमध्ये उपांत्य सामन्यात १७१ धावांची धमाकेदार खेळी खेळणारी पंजाबी कुडी म्हणजे हरमनप्रीत कौर. इंग्लंडच्या संघाविरोधात भारतीय संघाची ही खेळी सर्वाधिक पाहिली गेलेली खेळी ठरली आहे. अर्जुन पुरस्कार विजेती हरमनप्रीत कौर फक्त क्रिकेट विश्वातच नव्हे तर संपूर्ण क्रिडा विश्वात तिने स्वत:चा दबदबा निर्माण केला.

हीना सिद्धू-
       गेल्या वर्षी नेमबाजी करतेवेळी बोटाला दुखापत झालेली असतानाही हीनाने मोठ्या जिद्दीने त्यावर मात केली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ब्रिस्बेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदकाची कमाई केली होती. अर्जुन पुरस्काराना गौरविण्यात आलेली ही खेळाडू तिच्या ठाम भूमिकांसाठीसुद्धा ओळखली जाते. २०१४ आणि २०१६ मध्ये तेहरनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एशिअयन गन चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यास तिने स्पष्ट नकार दिला होता. महिला स्पर्धकांवर इराणकडून हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे तिने हे पाऊल उचलले होते.

सविता पुनिया-
      भारतीय महिला हॉकी संघात आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधणारी खेळाडू म्हणजे सविता पुनिया. तरबेज आणि चपळ गोलकिपिंगसाठी ओळखली जाणारी सविता अनेकदा भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयासाठी कारणीभूत ठरली असून आपल्या कामगिरीमुळे नेहमीच चमकली आहे.

६ फेब्रुवारी २०१८

आण्विक क्षमतेच्या अग्नि -1 ची यशस्वी चाचणी

       बालासोर - अग्नि-1 या सातशे किमी पल्ला असलेल्या आण्विक क्षेपणास्त्राची भारताकडून   यशस्वी चाचणी करण्यात आली.

         जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे अग्नि हे क्षेपणास्त्र भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील एक अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते. ओडिशा किनारपट्टीजवळील अब्दुल कलाम बेटावरुन ही चाचणी घेण्यात आली. सुमारे 12 टन वजन व 15 मीटर लांबी असलेल्या अग्नि क्षेपणास्त्राची 1 हजार किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.

बालरंगभूमीच्या जन्मदात्या सुधा करमरकर यांचे निधन

      मराठी बालरंगभूमीच्या जन्मदात्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका सुधा करमरकर यांचे  हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. मिलिंद करमरकर आहे. 

     शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नी दिला. यावेळी जयंत सावरकर, विजय केंकरे, लीला हडप, विलास गुर्जर, संजय क्षेमकल्याणी, प्रवीण कारळे, अरविंद पिळगावकर, अरुण काकडे, श्रीनिवास नार्वेकर, सुचित्रा बांदेकर, मधुरा वेलणकर, तुषार दळवी, विनय येडेकर, अशोक समेळ, रमेश भाटकर आदी उपस्थित होते.  

    अखेरच्या श्‍वासापर्यंत सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीला वाहून घेतले होते. 2 ऑगस्ट 1969 रोजी केवळ बालनाट्याला वाहिलेली लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमीची स्थापना त्यांनी केली होती. या रंगभूमीसाठी त्यांनी आयुष्य वेचले. नाट्यशिक्षणासाठी करमरकर परदेशी गेल्या. त्यांनी अमेरिकेत बालरंगभूमी अभ्यासली. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली, आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले.

५ फेब्रुवारी २०१८

बजेट इफेक्ट!

      केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात सुरू झालेली पडझड थांबली नाही. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स ४५० अंकांनी कोसळला. तसंच सुरुवातीच्या सत्रातच निफ्टीनंही कच खाल्ली. निफ्टी १०,६०० अंकांवर पोहोचला. सेन्सेक्स आणि निफ्टीचे व्यवहार १.२५ टक्क्यांच्या घसरणीनं सुरू आहेत. 

    सेन्सेक्स आणि निफ्टीप्रमाणंच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. दरम्यान, मोदी सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराची सुरू झालेली घसरण अद्याप कायम आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स ५८.३६ अंकांनी घसरून ३५९०६ अंक, तर निफ्टी १० अंकांनी घसरून ११०१६ वर स्थिरावला होता. 

 

३ फेब्रुवारी २०१८

श्याम बेनेगल यांना ‘व्ही.शांताराम’ पुरस्कार

      यंदाचा ‘व्ही.शांताराम’ जीवनगौरव पुरस्कार सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जाहीर झाला. राज्यपाल सी.विद्यासागरराव यांच्या हस्ते मुंबई आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव-२०१८ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

      किरण शांताराम, राहुल रावल, प्रसून जोशी, भारती प्रधान आणि विनोद अनुपम यांच्या समितीने श्याम बेनेगल यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला. भारतीय सिनेसृष्टीतील कार्याची दखल घेऊन, त्यांना हा पुरस्कार जाहीर केला.

       श्याम बेनेगल २८ सिनेमांचे दिग्दर्शन केले असून त्यांनी ४१ माहितीपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी तब्बल नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले आहे.

 

U-19: भारत विश्वविजेता

      न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या अंडर-१९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या युवा संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. मनजोत कालराच्या दणकेबाज शतकी खेळीच्या जोरावर भारत विश्वविजेता ठरला असून या विजयाबरोबरच अंडर-१९चा विश्वचषक चौथ्यांदा जिंकण्याचा विक्रमही भारताने केला आहे. 

        सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतासमोर २१७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं या २ बळी गमावत हे लक्ष्य पार करून विश्वचषक खिशात घातला. कर्णधार पृथ्वी शॉसोबत शुबमन गिल ऐवजी मनजोत कालरा सलामीला आला. शॉ आणि मनजोत या जोडगळीने चांगली सुरुवात करत ७० धावांची भागिदारी केली. या जोडीचा मैदानावर जम बसलेला असतानाच पृथ्वी शॉ २९ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला शुभमन गिलही ३१ धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्विक देसाई आणि मनजोत कालरा दोघांनी जोरदार फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला. मनजोत कालराने दणकेबाज नाबाद १०१ धावा केल्या. ८ चौकार आणि ३ खणखणीत षटकार लगावत मनजोतने ही शतकी खेळी केली. तर हार्विकने त्याला जबरदस्त साथ देत पाच चौकाराच्या जोरावर ४७ धावा केल्या. भारताने आठ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

       विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी मोठी खेळी करू दिली नाही. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल सदरलँडला १९, परम उप्पलला ३४, कर्णधार जेसन सांघला १३, नाथन मॅक्स्वीनीला १९, जॅक एडवर्डस २८ आणि मॅक्स ब्रायंटला १४ धावांवर बाद केले. जोनाथन मेर्लोने सर्वाधिक ७६ धावा केल्या, त्याला अनुकूल रॉयने बाद केले. तर जोनाथन नंतर मैदानावर उतरलेला जॅक इवान्स अवघी एक धाव करून तंबूत परतला. भारताने ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या ३२ धावा असताना त्यांचा पहिला बळी घेतला. त्यानंतर ५२ धावा असताना ऑस्ट्रेलियाला दुसरा आणि ५९ धावा असताना तिसरा झटका दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सावध पवित्रा घेत खेळायला सुरुवात केली होती. मात्र भारतीय गोलंदाजी पुढे त्यांचा टीकाव लागला नाही. भारताकडून ईशान पोरेल, शिवा सिंह, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर शिवम मावीने एक बळी घेतला.

 

२ फेब्रुवारी २०१८

डॉ. चोपडे बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

      औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे यांची प्रसिद्ध बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चोपडे यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. 

       गेल्यावर्षी बीएचयूमध्ये मुलींची छेडछाड झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. ही परिस्थिती हाताळण्यात बीएचयूचे कुलगुरू प्रा. जी. एस. त्रिपाठी यांना अपयश आले होते. त्यामुळे त्यांना दीर्घकालीन सुट्टीवर पाठविण्यात आले आल्याने बीएचयूमधील कुलगुरुपद रिक्त होते. त्यानंतर हे पद भरण्याची प्रक्रिया राष्ट्रपतींनी सुरू केली होती. कोणतेही आरोप नसलेले आणि पदासाठी पात्र ठरणारे कुलगुरू शोधण्याचे काम सुरू होते. त्यात अनेक पेटंट नावावर असलेल्या डॉ. चोपडे यांनी बाजी मारली आहे. 

       बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ४ जून २०१४ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे.

 

पुण्याची श्रुती श्रीखंडे CDS परीक्षेत देशात प्रथम

      केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षेत पुण्याची श्रुती श्रीखंडे मुलींमध्ये देशात प्रथम आली आहे. श्रुती ही ब्रिगेडीअर विनोद श्रीखंडे यांची कन्या आहे. 

     संयुक्त सुरक्षा सेवा परिक्षेचा अंतिम निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणा्यात आला. या अंतिम परीक्षेसाठी २३२ जन पात्र झाले होते. या परीक्षेत निपुर्न दत्ता मुलांमध्ये प्रथम तर पुण्याची श्रुती श्रीखंडे मुलींमध्ये प्रथम आली आहे. 

       श्रुती श्रीखंडेने आयएलएस पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे तर तिने शालेय शिक्षण पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूल मधून झाले आहे.  

१ फेब्रुवारी २०१८

अर्थसंकल्प २०१८

  कर रचना 

* टॅक्स स्लॅबमध्ये यंदा कोणताही बदल नाही 

* ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यावर ५० हजारापर्यंतची करसवलत 
* २०१८-१९ आर्थिक वर्षात ३.३ टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य

* कृषी उत्पादक कंपन्या पहिल्या पाच वर्षांसाठी 100 टक्के करमुक्त 

गुंतवणूक 
* म्युच्युअल फंडातून मिळालेल्या उत्पन्नावर १० टक्के कर 
* क्रिप्टोकरन्सीसारख्या चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील 
* ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना स्टॅण्डर्ड डिडक्शनमुळे जवळपास २१०० रुपयांचा फायदा 

लोकप्रतिनिधींचे मानधन 

* एप्रिल २०१८ पासून खासदारांचा पगार वाढणार 
* राष्ट्रपतींना ५ लाख, उपराष्ट्रपतींना ४ लाख आणि राज्यपालांना ३ लाख रुपये वेतन मिळणार 

विमान सेवा 

* ५६ नवी विमानतळं जोडली जाणार 

* ९०० पेक्षा अधिक विमाने खरेदी करणार 
* विमानतळांची संख्या ५ टक्क्यांनी वाढवणार 

रेल्वे 


* सर्व रेल्वे स्टेशन, गाडीत वाय- फाय आणि सीसीटीव्ही सुविधा 
* देशभरात ६०० रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण 
* प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी 'राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष' योजना 
* रेल्वेच्या विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटी 

नोकरी 


* ५० लाख तरुणांना नोकरीसाठी प्रशिक्षण देणार 
वर्षभरात ७० लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती करणार 

* नव्या कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये सरकार १२ टक्के रक्कम देणार 

व्यापार 

* मुद्रा योजनेंतर्गत ३ लाख कोटींचे कर्ज वितरित करण्याचं लक्ष्य 
* नोटाबंदीनंतर नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांना ३७०० कोटी 
* टेक्ट्सटाईल उद्योगासाठी ७१४० कोटी 
आरोग्य 

* दवाखान्यातील खर्च कमी करण्यासाठी 'हेल्थ प्रोटेक्शन स्कीम' 
* टीबी रोखण्यासाठी ६०० कोटी

 *१० कोटी कुटुंबासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च करणार 
* ३ लोकसभा मतदारसंघामागे एक सरकारी वैद्यकीय रुग्णालय उभारणार 
* देशभरात २४ नवी वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार 
* आरोग्य सुविधांसाठी 'आयुषमान भारत' कार्यक्रम 
* आरोग्यासाठी १.५ लाख कोटीची तरतूद 
पाणी 

* स्वच्छ पाणी योजनेसाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद 
* अमृत योजनेअंतर्गत ५०० शहरांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणार 

नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत १८७ योजनांना मंजुरी 
घरे 

* ग्रामीण भागात घरे आणि पायाभूत सुविधांसाठी १४.३४ लाख कोटी 
* वर्षभरात ५१ लाख घरे बांधणार 
* २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न 
शिक्षण

* डिजिटल शिक्षणावर भर; १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार 
* अनुसुचित जातींच्या विकासासाठी ५६ हजार कोटी 
* आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी एकलव्य शाळा उभारणार 
* विद्यार्थ्यांसाठी 'पंतप्रधान रिसर्च फेलो स्कीम' 
* बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार 
* देशातील शिक्षणासाठी १ लाख कोटी 
* दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत 
महिला 

देशातील ८ कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन 
* सौभाग्य योजनेतून ४ कोटी गरीब घरांना वीज कनेक्शन 
* स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ६ कोटी शौचालयांची निर्मिती 
* शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून कुटुंबाना ठराविक निधी उपलब्ध करुन दिला जाणार 
शेती 

* शेतीच्या कर्जासाठी ११ लाख कोटींचा निधी राखीव 
* शेतीतील पायाभूत सुविधा, पशुपालन, मत्स्यपालनासाठी १० हजार कोटी 
* अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १४०० कोटी 
* पशूपालन करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडिट कार्ड 
* खरीप हंगामापासून हमीभावात दीडपट वाढ 
* २०२२ मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष्य 
*टीव्ही, मोबाइल महागणार 
* ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यावर ५० हजारापर्यंतची करसवलत 
* टॅक्स स्लॅबमध्ये यंदा कोणताही बदल नाही 
* २०१८-१९ आर्थिक वर्षात ३.३ टक्के वित्तीय तुटीचं लक्ष्य 
* एप्रिल २०१८ पासून खासदारांचा पगार वाढणार 
* राष्ट्रपतींना ५ लाख, उपराष्ट्रपतींना ४ लाख आणि राज्यपालांना ३ लाख रुपये वेतन मिळणार 
* दोन सरकारी विमा कंपन्या शेअर बाजारात येणार 
* विमानतळांची संख्या ५ टक्क्यांनी वाढवणार 
* सर्व रेल्वे स्टेशन, गाडीत वाय- फाय आणि सीसीटीव्ही सुविधा 
* देशभरात ६०० रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण 
* प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी 'राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष' योजना 
* रेल्वेच्या विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटी 
* कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये सरकार १२ टक्के रक्कम देणार 
* वर्षभरात ७० लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती करणार 
* स्वच्छ पाणी योजनेसाठी २६०० कोटी 
* मुद्रा योजनेअंतर्गत ३ लाख कोटी रुपये कर्ज 
* गंगा स्वच्छतेसाठी १८७ योजनांना मंजुरी 
* १० कोटी कुटुंबासाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य खर्च करणार 
* आरोग्य सुविधांसाठी 'आयुषमान भारत' कार्यक्रम 
* आरोग्यासाठी १.५ लाख कोटीची तरतूद 
* बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार 
* आरोग्य सुधारणा केंद्र उभारण्यासाठी १२०० कोटी 
* देशातील शिक्षणासाठी १ लाख कोटी 
* आदिवासी मुलांसाठी एकलव्य स्कूल उभारणार 
* १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार 
* 'ऑपरेशन फ्लड' प्रमाणेच 'ऑपरेशन ग्रीन' लाँच करणार 
* ८ कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देणार 
* ४ कोटी घरांना मोफत वीजजोडणी देणार 
* स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत ६ कोटी शौचालय बांधणार 
* शेतीच्या कर्जासाठी ११ लाख कोटींचा निधी राखीव 
* ऑपरेशन ग्रीनसाठी ५०० कोटींची तरतूद 
* पशूधन विकास आणि मत्स्योद्योगांसाठी १० हजार कोटी 
* राष्ट्रीय बांबू मिशनसाठी २९० कोटी