Menu

Study Circle

३१ ऑगस्ट २०१७

भेंडीबाजारामध्ये इमारत कोसळली!

     मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील जेजे मार्गावरील हुसैनीवाला ही 125 वर्षे जुनी तीन मजली रहिवाशी इमारत  सकाळी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 11 जणांचा मृत्यू झाला. तर, 14 जण जखमी असून, त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत दहा जणांना सुखरूप बाहेर काढले असून, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे.

    गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी घाटकोपरमध्ये साई दर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

बांगलादेशाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

     बांगलादेशाच्या फिरकी गोलंदाजीने अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा घात केला. अनुभवी शकीब अल हसनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर बांगलादेशाने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियावर २० धावांनी पहिला वहिला ऐतिहासिक विजय नोंदविला.

     ऑस्ट्रेलियाची मदर डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या उपकर्णधार-कर्णधारांच्या जोडीवरच होती. वॉर्नरने फिरकीवर हल्ला चढवत ११२ धावांची शतकी खेळी केली. स्मिथ बरोबर त्याने १३० धावांची भागीदारीदेखील केली; पण त्याचे प्रयत्न अन्य साथीदार अपयशी ठरल्याने फोल ठरले. बांगलादेशाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात ८४ धावांची खेळी करणारा आणि दोन्ही डावांत मिळून सामन्यात दहा गडी बाद करणारा अनुभवी शकीब अल हसन बांगलादेशाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 

      विजयासाठी २६५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेरीसच दोन गडी गमावून १०९ धावा केल्या होत्या. आज सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने झटपट पाच गडी गमावले. त्यानंतर उपाहारानंतरच्या पहिल्याच चेंडूवर शकीबने ग्लेन मॅक्‍सवेलला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सुरल्या आशांवरही पाणी फेरले. शेवटी पॅट कमिन्स याने नाबाद ३३ धावांची खेळी केली. पण, ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे नाट्य रंगवण्यासाठी त्याची खेळीदेखील तोडकी पडली. ऑस्ट्रेलियाचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. 

   शकीबने आपली ५०वी कसोटी संस्मरणीय ठरवताना दुसऱ्या डावात ८५ धावांत ५ गडी बाद केले. त्याने सामन्यात दहा गडी बाद करण्याची किमया साधली. तोच सामन्याचा मानकरी ठरला. या विजयाने उत्साहित झालेला बांगलादेशाचा कर्णधार मुशफिकूर रहिम म्हणाला, ‘‘संघातील प्रत्येक खेळाडूने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विशेषतः शकीब आणि तमिम इक्‍बाल यांची पहिल्या डावातील १५५ धावांची भागीदारी खऱ्या अर्थाने निर्णायक होती. त्यामुळे बांगलादेशाचा डाव भक्कम झाला.’’

       ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने बांगलादेशाच्या खेळाचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘पराभवाचे दुःख निश्‍चित आहे. पण, त्याही पेक्षा बांगलादेशाच्या खेळाडूंनी केलेला खेळ सर्वोत्तम होता. आम्ही पहिल्या डावात पिछाडीवर राहिलो तिथेच आम्ही अर्धा सामना गमावला होता. दुसऱ्या कसोटीत आम्हाला खेळ उंचवावा लागेल.’’

३० ऑगस्ट २०१७

मुंबई 'ओली'!

       मुंबईत  जोरदार पावसाने मंगळवारी पुन्हा 26 जुलै 2005च्या "महाप्रलया'च्या आठवणी जागवल्या. अनेक ठिकाणी पाणी साचू लागल्याने अवघे शहर जलमय झाले होते. दुपारनंतर, अधिकच रौद्ररूप धारण करणाऱ्या पावसाने देशाच्या आर्थिक राजधानीला जणू काही ओलीसच धरल्याचे चित्र होते. कितीही पाऊस पडला तरी मुंबईत पाणी साचणार नाही, या पालिकेचा दावाही या पावसात पुन्हा वाहून गेला.

        सोमवारी रात्रीपासून पडणारा मुसळधार पाऊस नागरिकांना जणू येणाऱ्या संकटाचा ट्रेलर दाखवत होता. सकाळपासूनच नागरिकांच्या हाल अपेष्टांना सुरवात झाली. दुपारनंतर पावसाने विलक्षण जोर धरला. त्यामुळे आधीच साचलेले पाणी वाढू लागले. काही ठिकाणी ते छातीएवढे वाढले. दुपारनंतर दक्षिण मुंबईत येणारी रस्ते वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे सकाळपासून मध्य, हार्बर तसेच पश्‍चिम रेल्वेची लोकलसेवाही रडतखडत सुरू होती. दुपारनंतर ती ठप्पच पडली. रात्री उशिरापर्यंत लोकल वाहतूक रुळावर आली नव्हती. त्यातच पावसाचा रागरंग पाहून सरकारी-खासगी कार्यालये दुपारनंतरच सोडण्यात आल्यामुळे साऱ्याच यंत्रणांवरील ताण वाढला. लोकल सेवा बंद पडल्याने नागरिकांनी मिळेल ते वाहन पकडून घर गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र जागोजागी पाणी तुंबल्याने रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला होता. संध्याकाळी पावसाचा जोर थोडासा ओसरला होता; मात्र रात्री तो पुन्हा वाढला.

2005 नंतरचा विक्रमी पाऊस
        सकाळी 8 वाजल्यापासून 12 तासांत सांताक्रूझ वेधशाळेत 297 मि.मी.; तर कुलाबा वेधशाळेत 65 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत 26 जुलै 2005 नंतर एका दिवसात झालेला हा विक्रमी पाऊस आहे. 26 जुलै 2005 ला मुंबईत दिवसभरात 900 मि.मी. पाऊस झाला होता.

शाळा, कॉलेजांना आज सुटी
     मुंबईत पुढील 48 तास अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

शारापोवाची सनसनाटी सलामी

       रशियाच्या मारिया शारापोवाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत सनसनाटी सलामी दिली. द्वितीय मानांकित रुमानियाच्या सिमोना हालेपला तिने ६-४, ४-६, ६-३ असे पराभूत केले. ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरल्यामुळे तिला बंदीला सामोरे जावे लागले. त्यानंतर ती पुनरागमन करीत आहे. ‘वाइल्ड कार्ड’च्या संधीचा तिने फायदा उठविला.

   शारापोवा ३० वर्षांची आहे. तिने दोन तास ४४ मिनिटांत चिवट विजय नोंदविला. १५ महिन्यांच्या बंदीनंतर ती ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत प्रथमच खेळत आहे. तिला विविध स्पर्धांत ‘वाइल्ड कार्ड’ मिळाले. त्यावरून वाद झाला. काही विद्यमान खेळाडूंनी शारापोवाला असे झुकते माप देण्यास विरोध दर्शविला होता. यात सिमोनाचाही समावेश होता. त्यामुळे फ्रेंच ओपनसाठी मात्र शारापोवाला वाइल्ड कार्डची संधी नाकारण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर हा विजय शारापोवासाठी महत्त्वपूर्ण ठरला. दुसऱ्या सेटमध्ये शारापोवाने ४-१ अशी आघाडी घेतली होती, पण सिमोनाने सलग पाच गेम जिंकत बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये शारापोवाची जिगर सरस ठरली.

व्हिनसचा विक्रमी सहभाग
     अमेरिकेची ३७ वर्षांची व्हिनस विल्यम्स १९व्या वेळी सहभागी झाली आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये हा सहभाग विक्रमी आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये पदार्पण करणाऱ्या  स्लोव्हाकियाच्या व्हिक्‍टोरिया कुझ्मोवाने तिला झुंजविले. व्हीनसने ६-३, ३-६, ६-२ असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला. कुझ्मोवा १३५व्या स्थानावर आहे.

 

२९ ऑगस्ट २०१७

ब्रिटनमध्ये भीषण अपघातात ८ भारतीय जागीच ठार

       ब्रिटनमध्ये एका रस्ता अपघातात आठ भारतीय जागीत ठार झाले आहेत. यात दोन महिलांचा समावेश आहे. हा अपघात गेल्या २४ वर्षातला ब्रिटनमधला सर्वात भीषण अपघात असल्याचे म्हटले जात आहे.

     बकिंगहॅमशायर मधील न्यूपोर्ट पॅगनेल येथे हा अपघात घडला. विप्रो कंपनीच्या आयटी प्रोफेशनल्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या एका मिनीबसची दोन लॉरींसोबत धडक झाली. यात विप्रोचे ३ कर्मचारी जागीच ठार झाले तर चौथा कर्मचारी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बसचालकही या अपघातात ठार झाला. तोही भारतीय होता.

       दोन्ही लॉरीचालकांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. 'कार्तिकेयन रामसुब्रमण्यम पुगलर, ऋषी राजीव कुमार आणि विवेक भास्करन अशी ठार झालेल्या आमच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत,' असे विप्रोचे युकेचे ऑपरेशन्स हेड रमेश फिलीप्स यांनी सांगितले.

सहाशे मीटरमध्ये शर्यतीत कॅस्टर सेमेन्याचा विश्‍वविक्रम

    जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत आपल्या नेहमीच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्या हिने मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने केली. जागतिक स्पर्धेनंतर विवाहबद्ध झालेल्या २६वर्षीय सेमेन्याने जर्मनीत बर्लिन येथे झालेल्या स्पर्धेत ६०० मीटर शर्यतीत १ मिनीट २१.७७ सेकंद अशी विश्‍वविक्रमी वेळ दिली. तिने १९९७ मध्ये क्‍युबाच्या ॲना फिडेलिया क्वीरॉट हिचा विक्रम शतांश ८६ सेकंदाने मोडला. सेमेन्याने जर्मनीत मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ‘‘आठ वर्षांपूर्वी येथेच मी आठशे मीटर शर्यतीत पहिले जागतिक सुवर्णपदक मिळविले होते. त्याच मैदानावर आज यंदाच्या मोसमाची अखेर विश्‍वविक्रमाने झाल्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झाला आहे.’’ या शर्यतीत तिने अमेरिकेच्या एजी विल्सन हिला शतांश ६२; तर बुरुंडीच्या फ्रान्सिन नियोन्साबा हिला १ मिनीट ४१ सेकंदांनी मागे टाकले.

२८ ऑगस्ट २०१७

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. दीपक मिश्रा शपथबद्ध

    भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदी म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी घेतली. भारताचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून ते शपथबद्ध झाले. 

      राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिश्रा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला उपस्थित होते. विधि मंत्रालयाच्या वतीने यापूर्वीच न्या. मिश्रा यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती. न्या. जे.एस. खेहर यांची जागा आता मिश्रा यांनी घेतली आहे. 

     सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश असलेले 63 वर्षीय मिश्रा यांचा कार्यकाल 14 महिन्यांचा असेल. ते ऑक्टोबर 2018 मध्ये निवृत्त होणार आहेत. मिश्रा यांनी 14 फेब्रुवारी 1977 रोजी वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. ओडिशा उच्च न्यायालयात त्यांनी घटनात्मक, दिवाणी, फौजदारी, महसूल, सेवा आणि विक्रीकर खटल्यांमध्ये त्यांनी वकिली केली.

विजेतेपदासह मेवेदरची निवृत्ती

    अव्वल बॉक्‍सर फ्लॉईड मेवेदर याने दहाव्या फेरीत कॉनर मॅकग्रेगॉर याला ‘नॉक आउट’ पंच देत ‘सुपर फाइट’ लढत जिंकली. त्याचा कारकिर्दीमधील सलग ५०वा विजय ठरला. या विशेष लढतीसाठी मेवेदरने दोन वर्षांपूर्वी घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. आयर्लंडच्या या मार्शल आर्टमधील स्टारविरुद्ध खेळताना मेवेदरला कुठलेच कष्ट पडले नाहीत. त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखले. दहाव्या फेरीत मेवेदरच्या डाव्या हाताच्या ‘हूक्‍स’च्या फटक्‍यांनी मॅकग्रेगॉर पुरता निष्प्रभ झाला आणि रिंगेच्या ‘रोप्स’वर पडला. त्या वेळी पंच रॉबर्ट बिर्ड यांनी हस्तक्षेप करून लढत थांबवली आणि मेवेदरला तांत्रिक गुणांवर विजयी घोषित केले. या लढतीनंतर मेवेदरने सलग ५०वा विजय मिळविल्यावर बॉक्‍सिंगमधून कायमस्वरूपी निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

२७ ऑगस्ट २०१७

साईनाचे ब्राँझवर समाधान

      भारताच्या साईना नेहवालला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझपदकावरच समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत साईनाने जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध पहिली गेम जिंकून चांगली सुरुवात केली होती. यानंतर मात्र तिला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. साईनाचे हे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील दुसरे पदक आहे. २०१५च्या जकार्तामधील स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले आहे. आता भारताच्या आशा पी. व्ही. सिंधूवर आहेत.

    महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत सातव्या मानांकित ओकुहाराने साईनाचे आव्हान १२-२१, २१-१७, २१-१० असे परतवून लावले. ही लढत एक तास अन् १४ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत साईना १६व्या, तर ओकुहारा १२व्या स्थानी आहे. यापूर्वी या दोघी सात वेळा आमनेसामने आल्या आहेत. यातील सहा लढती साईनाने जिंकल्या होत्या, तर एक लढत ओकुहाराने जिंकली होती. त्यामुळे उपांत्य लढतीत साईनाचे पारडे जड मानले जात होते. काहींना साईना नेहवाल- पी. व्ही. सिंधू अशी ‘ऑल इंडिया फायनल’ होईल, असेही वाटत होते.

     साईना-ओकुहारा यांच्यातील लढतीला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. साईनाला प्रोत्साहन देण्यासाठीही मोठ्या संख्येने चाहते आले होते. पहिल्या गेममध्ये साईनाने आक्रमक सुरुवात केली. तिने २-२ अशा बरोबरीनंतर सलग सहा गुण घेतले. यानंतर तिने १०-६ अशा आघाडीनंतर सलग पाच गुण घेत आघाडी वाढविली. ओकुहाराने काही गुण घेतले; पण साईनाला गाठण्यात तिला यश आले नाही. यानंतर १८-१२ अशा आघाडीनंतर साईनाने सलग तीन गुण घेत पहिली गेम जिंकली. साईनाची सर्व्हिस परतवून लावण्यात ओकुहाराला सुरुवातीला अडचण आली. साईनाच्या वेगाशी जुळवून घेताना तिला थोडे कष्ट पडले. पहिल्या गेममध्ये साईनाचे ‘बॉडी स्मॅश’ही जबरदस्त होते. दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराने सलग चार गुण घेत आक्रमक सुरुवात केली. साईनाने तिला ९-९ असे बरोबरीत गाठले. साईनाच्या नेटजवळ काही चुका झाल्या. त्यामुळे पुन्हा ओकुहाराने आघाडी मिळवली. पण, साईनाने तिला १५-१५ असे बरोबरीत गाठले. यानंतर दोघींमध्ये चुरस बघायला मिळाली. यात काही दीर्घ रॅलिजही रंगल्या. त्यामुळे गेम १७-१७ अशी बरोबरीत होती. पण ही संधी साईनाला साधता आली नाही. ओकुहाराने सलग चार गुण घेत गेम जिंकली आणि आपले आव्हान राखले.

२५ ऑगस्ट २०१७

द. आफ्रिकेचा डु प्लेसिस जागतिक संघाचा कर्णधार

    पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतण्याची खात्री गुरुवारी खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली. पाकिस्तानात होणाऱ्या टी- २० लढतीसाठी ‘आयसीसी’ने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिस याची कर्णधार म्हणून निवड केली.

     पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या या तीन टी- २० सामन्यांच्या मालिकेसाठी ‘आयसीसी’ने आज संघ जाहीर केला. झिंबाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. संघात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तानशी असलेले संबंध लक्षात घेता एकाही भारतीय खेळाडूला या संघात निवडण्यात आलेले नाही. 

      संघ : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हशिम आमला, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, इम्रान ताहिर (सर्व दक्षिण आफ्रिका), सॅम्युएल बद्री, डॅरेन सॅमी (वेस्ट इंडीज), जॉर्ज बेली, बेन कटिंग, टिम पेनी (सर्व ऑस्ट्रेलिया), पॉल कोलिंगवूड (इंग्लंड), ग्रॅंट एलियट (न्यूझीलंड), तामिम इक्‍बाल (बांगलादेश), थिसरा परेरा (श्रीलंका).

भारत नेपाळमध्ये आठ करार

     भारत आणि नेपाळमध्ये आज आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, यामध्ये उभय देशांतील अमली पदार्थ तस्करीविरोधातील सहकार्याचाही समावेश आहे. नेपाळचे पंतप्रधार शेरबहाद्दूर देऊबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

    देऊबा यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक होती, नेपाळच्या विकासासाठी आमचा देश कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. देऊबा यांनीही नेपाळ आपल्या भूमीवरून एकही भारतविरोधी कारवाई होऊ देणार नाही, असे सांगितले. या वेळी उभय नेत्यांच्या हस्ते "कटैय्या ते कुसाहा' आणि "रक्‍सौल ते परवानीपूर' विद्युतवाहिनींचे उद्‌घाटन करण्यात आले. उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये लष्करी सज्जता आणि सुरक्षितता हे दोन्ही घटक महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी नमूद केले. देऊबा हे सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

२४ ऑगस्ट २०१७

चीनचा मुकाबला करण्यासाठी IAF ची 'सी-130 जे हरक्युलिस' विमाने सज्ज

       चीनकडून वारंवार युद्धाची धमकी दिली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने पूर्वेकडचा पनागड येथील अर्जन सिंग हवाई तळ पूर्णपणे सज्ज ठेवला आहे. इथे भारतीय वायू दलाची सहा सी-130 जे सुपर हरक्यूलिस विमाने पूर्णपणे सज्ज आहेत. जून महिन्यात भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये संघर्ष सुरु झाला होता. जुलैच्या शेवटच्या आठवडयात अर्जन सिंह हवाई तळाला आपातकालीन परिस्थितीसाठी तयार करण्यात आले. 

      गाझियबाद येथील हिंडन तळानंतर पनागड हा सी-130 जे विमानांचा देशातील दुसरा तळ आहे. पनागडमध्ये मागच्या दोन वर्षांपासून लॉकहीड मार्टीनचे इंजिनिअर आणि टेक्निशिअन हँगर आणि अन्य सुविधांची उभारणी करत आहेत. 2011 सालापासून सी-130 जे विमाने भारतात यायला सुरुवात झाली. हिंडनमध्ये या विमानांचा पहिला तळ बनवण्यात आला. 

      सी-130 जे सुपर हरक्यूलिस हे फक्त मालवाहतुक विमान नसून, या विमानामध्ये  काही अन्य क्षमताही आहेत. ज्यामुळे युद्धकाळात हे विमान अत्यंत महत्वपूर्ण ठरु शकते. भारताच्या ईशान्येकडची सीमा चीनला लागून आहे. या ठिकाणी छोटया धावपट्ट्यांवरही हे विमान सहज लँडींग करु शकते. 

       चीनकडून सध्या वारंवार भारताला धमकी दिली जात आहे.  भारताच्या सीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्कमुळे आम्हाला धोका निर्माण होतोय असे कारण पुढे करुन उद्या आम्ही आमचे सैन्य घुसवले तर, खरोखरच भारतात अराजकता निर्माण होईल अशी धमकी चीनने दिली. 

        आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही. वरिष्ठ सरकारी पातळीवरील विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. डोकलामच्या चिघळत चाललेल्या संघर्षाचे उद्या युद्धात पर्यावसन झाले तर, चीनला प्रादेशिक आणि रणनितीक दोन्ही आघाडयांवर लाभ होणार नाही. फक्त दोन्ही बाजूला  रक्तपात होईल. या युद्धातून कोणीही विजेता किंवा पराभूत ठरणार नाही. उलट चीनला 1962 सारखा युद्धाचा निकाला लावता आला नाही तर, आशियातील चीनचे वर्चस्व संपून जाईल

भारताच्या संजीवनी जाधवला रौप्यपदक

       जागतिक पातळीवर पदक जिंकण्याचे नाशिकची धावपटू संजीवनी जाधवचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. तैवान येथे सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्‍समधील दहा हजार मीटर शर्यतीत २१ वर्षीय संजीवनीने रौप्यपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी धावपटू ठरली. 

   आंतर विद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संजीवनीला दोन वर्षांपूर्वी ग्वांग्झू (कोरिया) येथील स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

         दहा हजार मीटरची शर्यत अतिशय रंगतदार झाली. जपानच्या युकी मुनेहिसाने सुरवातीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती. शेवटच्या फेरीत मात्र आशियाई विजेत्या किर्गिझस्तानच्या दारिया मासलोवा, संजीवनी आणि जपानच्या अई मुनेहिसा यांनी वेग वाढविला. त्यात युकी मागे पडली. मात्र, विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीला दारियाला मागे टाकता आले नाही. दारियाने ३३ मिनिटे १९.२७ सेकंदात सुवर्णपदक जिंकले.

        दारियाने भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. दारियाने दोन्ही शर्यतीत संजीवनीवर मात केली होती. त्यापैकी पाच हजार मीटर शर्यतीत संजीवनीला ब्राँझपदक मिळाले होते. संजीवनीने ३३ मिनिटे २२.०० सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले. जपानच्या अई होसोदाला ब्राँझपदक मिळाले. 

      भारताची वादग्रस्त धावपटू द्युती चंदला शंभर मीटर शर्यतीत दुसऱ्या फेरीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. थाळीफेकीत कमलप्रीत कौरने ५५.९५ मीटर अशी कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली. चारशे मीटर शर्यतीत ट्विंकल चौधरीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 

जागतिक स्पर्धेत भारताला दुसरे यश
दारिया आणि संजीवनी यांच्यातील ही एकूण चौथी शर्यत होती. तीन वर्षांपूर्वी तैवान येथेच दारियाने आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तीन हजार मीटरमध्ये संजीवनीवर मात करीत सुवर्णपदक जिंकले होते, तर संजीवनीला ब्राँझपदक मिळाले होते. जागतिक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारताची दुसरी ॲथलिट ठरली. यापूर्वी २०१३ मध्ये कझान (रशिया) आणि २०१५ मध्ये ग्वांग्जू (कोरिया) येथे इंदरजित सिंगने गोळाफेकीत अनुक्रमे रौप्य व सुवर्णपदक जिंकले होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोहोर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत उमटली, याचा मनापासून आनंद आहे. जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाला मिळालेले हे पहिले पदक आहे. त्यामुळे संजीवनीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. खेळाडूंना विद्यापीठाकडून सर्वतोपरी मदत केली जाते. विद्यार्थीदेखील यश मिळवत त्याचे चीज करीत आहेत.

२३ ऑगस्ट २०१७

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सायना नेहवालचा दणदणीत विजय

      भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या सबरीना जॅक्वेटवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. तिने सबरीनावर 21-11, 21-12 असा विजय मिळवून उपउपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. यूकेमध्ये ग्लासगो येथे ही स्पर्धा सुरु आहे. सायनाने पहिला गेम अगदी सहज जिंकला. 

     सायनाने अवघ्या 14 मिनिटात पहिला गेम जिंकला. या विजयामुळे सायनाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. पुढच्या फेरीत सायनाचा सामना भारताची तन्वी लाड आणि कोरीयाच्या सुंग जी ह्युआन यांच्यातील विजेत्याशी होईल. सुंग जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर आहे. 

        जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली. काल पहिल्या दिवशी भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने एकतर्फी झालेल्या सामन्यात रशियाच्या सर्जी सिरांत याचा सरळ दोन गेममध्ये फडशा पाडून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर रिओ ऑलिम्पिकची रौप्यविजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधूने किम जोचा पराभव करत विजयी सुरुवात केली. 

       सिंधूने कोरियन प्रतिस्पर्धी किम ह्यो मिनचा 21-16 आणि 21-14 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.  पहिल्या सामन्यात सिंधूला बाय मिळाला होता. त्यामुळे सिंधूनं आता उपउपांत्यापूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  पुरुष खेळाडूंमध्ये साई प्रणीतने आपली विजयी सुरुवात केली आहे.

       श्रीकांतने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना सर्जीचा २१-१३, २१-१२ असा ३० मिनिटांहून कमी वेळेत धुव्वा उडवला. सर्वच क्षेत्रात वर्चस्व राखताना श्रीकांतने सर्जीला पुनरागमन करण्याची एकही संधी न देताना बाजी मारली. दुसºया फेरीत श्रीकांतचा सामना फ्रान्सचा लुकास कोर्वी विरुध्द होईल.

        स्पेनचा प्रतिस्पर्धी पाब्लो एबियान याने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने समीरची सहज आगेकूच झाली. ज्यावेळी पाब्लोने माघार घेतली तेव्हा समीर २१-८, १७-४ असा आघाडीवर होता. महिलांमध्ये तन्वीने झुंजार खेळ करताना इंग्लंडच्या क्लो बर्चला १७-२१, २१-१०, २१-१९ असे नमवले. मिश्र दुहेरी गटात सात्विकसैराज रंकिरेड्डी आणि मनीषा के. या जोडीने ताम चुन हेई - एनजी त्सझ याऊ या हाँगकाँगच्या जोडीचा २४-२२, २१-१७ असा पाडाव केला.

२२ ऑगस्ट २०१७

डोकलामप्रश्नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री

      भारत आणि चीनदरम्यान डोकलाममध्ये सुरू असलेल्या पेचावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चीन या संदर्भात सकारात्मक पावले उचलेल, अशी आशा व्यक्त केली. भारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) दलाच्या एका कार्यक्रमात बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की भारताला शांतता हवी असल्याचा संदेश सर्व शेजारी देशांना देण्याची आमची इच्छा आहे. भारतीय सुरक्षा दल देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की आमच्या सुरक्षा दलांकडे भारतीय सीमांचे संरक्षण करण्याची पूर्ण ताकद आहे. आयटीबीपी जम्मू-काश्मीरपासून अरूणाचल प्रदेशपर्यंतच्या 4,057 किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेचे संरक्षण करत आहे.

         भारतीय सुरक्षा दलांनी सिक्कीम सेक्टरच्या डोकलाम भागात चिनी लष्कराकडून सुरू असलेले रस्तेनिर्मितीचे काम थांबवले होते. तेव्हापासून भारत आणि चीनदरम्यान अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही आमच्या क्षेत्रात रस्त्यांची निर्मिती करत होतो, असा दावा चीनने केला आहे. त्याच वेळी ते वादग्रस्त डोकलाम भागातून भारतीय लष्कराला परत बोलविण्याची मागणीही करत आहेत. भूतानच्या म्हणण्यानुसार, डोकलाम त्यांचा भाग आहे. मात्र, चीन या भागावर आपला दावा सांगत आहे.

‘35-ए’ कलम ऐरणीवर

     काश्मिरात सततच्या घातपाताला मोडून काढण्यासाठी जी लष्करी मोहीम चालली आहे, तिला यश येत असतानाच आता भारतीय राज्यघटनेतील ‘35-ए’ कलमाचा विषय ऐरणीवर आलेला आहे. त्यावरून उठवण्यात आलेले वादळ सामान्य माणसाचा गोंधळ उडवून देणारे आहे. वास्तवात गोंधळून जाण्यासारखे त्यात काहीही नाही. मागल्या 70 वर्षांत काश्मीर समस्या संपवण्याचे कुठलेही गंभीर प्रयत्न झाले नाहीत, त्याला प्रथमच मोदी सरकारने हात घातला आहे. जितके जुने दुखणे असते तितका उपचार घाबरवणारा असतो, पण उपचार दुखणारा असला, तरी घातक नक्कीच नसतो. तशीच ही स्थिती आहे. प्रत्येकवेळी 370 कलमाचा आधार घेऊन काश्मिरियत किंवा आपल्या स्वतंत्र बाण्याचा काश्मिरी नेत्यांनी गदारोळ केलेला आहे. किंबहुना, ‘एनडीए’ची आघाडी बनवत असताना भाजपने 370 कलमाविषयीचा आग्रह सोडून देण्याचा पुरोगामी पक्षांनी आग्रह धरलेला होता. वास्तवात तिथेच तर खरी काश्मीर समस्या गुंतलेली आहे.

       ब्रिटिश भारत सोडून गेल्यावर त्यांच्या अधिपत्याखालचा प्रदेश स्वतंत्र भारत सरकारच्या अधिकाराखाली आपोआप आलेला होता, पण जिथे लहानसहान वा काही मोठी संस्थाने होती, त्यांना भारतात सहभागी करून घेण्याची कामगिरी नव्या सरकारला पूर्ण करावी लागली होती. काश्मीर हे तसे एकमेव संस्थान नव्हते, तर 500 हून अधिक संस्थाने तशी खालसा करण्यात आली व त्यांच्याशी भारत सरकारने करार केलेले होते. त्यामुळे 370 या कलमान्वये काश्मीरला वेगळा दर्जा मिळत नाही, पण त्याच्या अनुषंगाने अन्य तरतुदी आहेत, त्याचा गैरफायदा काश्मिरी नेते व फुटीरवादी नित्यनेमाने उठवत आलेले आहेत. त्यामध्ये सर्वात मोठी भानगड आहे, ती ‘35-ए’ या कलमाची.

         हे कलम भारतीय राज्यघटनेत असल्याचा दावा केला जातो, पण तसा उल्लेख कुठेही घटनेत आढळत नाही. हे कलम घटनेत नसून, घटनेच्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेले आहे. अधिक ते घटना समितीने संमत केलेले नसून, राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणूनच त्याला राज्यघटनेचा दर्जा असल्याचा दावा ही निव्वळ दिशाभूल आहे. 1928 व 1932 सालात जम्मू-काश्मीरच्या राजांनी काढलेल्या दोन अध्यादेशांच्या आधारे या कलमाची तरतूद करण्यात आलेली आहे, पण ती भारतीय संसद वा घटना समितीकडून संमत करून घेण्यात आलेली नसल्याने, त्याला घटनात्मक दर्जा असल्याचा दावा पोकळ आहे.

       राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने ते कलम परिशिष्टात घालण्यात आले असेल तर तसेच काढलेही जाऊ शकते. म्हणूनच तो विषय ऐरणीवर आलेला आहे. किंबहुना, तसे होण्यात कायदेशीर वा घटनात्मक अडचण नसल्यानेच बहुतांश काश्मिरी विभाजनवादी भयभीत झालेले आहेत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हे राज्य ब्रिटिश भारताचा हिस्सा नव्हते, तर ब्रिटिश सरकारच्या राखणदारीमध्ये होते. त्यामुळे तिथे राजाचा कारभार चालू होता आणि राजानेच बनवलेले कायदे चालत होते. त्या राजाने आपल्या प्रदेशात कोणाला नोकरी-धंदा मिळावा किंवा नागरिकत्व मिळू शकेल, याचा आदेश जारी केलेला होता. तेवढ्याचा आधार घेऊन हे कलम परिशिष्टात घालण्यात आलेले आहे. त्यामुळे फाळणीनंतर भारतात येऊन त्या राज्यात स्थायिक झालेल्या 3 लाखांहून अधिक लोकांना अजून काश्मीरचे व पर्यायाने भारताचे नागरिकत्व मिळू शकलेले नाही. स्वातंत्र्यानंतर पंजाबमधून सफाई कामगार म्हणून दोनशे वाल्मीकी परिवारांना काश्मिरात आणले गेले, पण तीन पिढ्या उलटून गेल्या, तरी त्यांना अजून तिथले नागरिक मानले जात नाही. असे लोक लोकसभेसाठी मतदान करू शकतात, पण विधानसभा वा स्थानिक संस्थांसाठी मतदान करू शकत नाहीत. त्यांना कुठे जमीन, स्थावर मालमत्ता खरेदी करता येत नाही. याच्या उलट कोणाही काश्मिरीला भारतात अन्यत्र नोकरी मिळते वा मालमत्ताही खरेदी करण्याची मुभा आहे. यामुळे काश्मिरात कोणी पैशांची गुंतवणूक करून उद्योग-व्यापारही करायला जात नाही. साहजिकच, विकास नाही की कामधंदा नाही. अशा बेरोजगारांसाठी पाकचा पैसा आणून दंगली माजवण्याची सोय आहे. आज ते कलम काढून टाकण्यासाठी जम्मूचे लोक उत्सुक आहेत आणि काश्मिरी नेतेच त्याला विरोध करत आहेत. वास्तविक, राजाने जम्मूच्या लोकांना काश्मिरी अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी हे अध्यादेश काढले होते, पण विलीनीकरण होताना ‘35-ए’ कलमाने तशी सुविधा एकूण राज्याला दिल्याने, त्याचा सर्वाधिक गैरफायदा काश्मिरी फुटीरवादी लोकांनी उठवला आहे. हे कलम रद्द झाले तर कुणाही भारतीयाला तिथे जाऊन वास्तव्य करता येईल. कामधंदा करता येईल आणि लोकसंख्येच्या बळावर जी मक्तेदारी चालू आहे, त्याला पायबंद घातला जाऊ शकेल.

       गेल्या 7 दशकांत काश्मिरी वेगळेपण जपण्याच्या नावाखाली पाकिस्तानी दलाल म्हणून गद्दारी करणार्यांना याच कलमाने संरक्षण मिळाले आहे आणि आता त्यालाच मोदी सरकारने नेमका हात घातल्याने त्यांची पाचावर धारण बसलेली आहे. 15 वर्षांपूर्वी तर काश्मिरी महिलेने बिगर काश्मिरीशी लग्न केल्यास तिचेही नागरिकत्व जाऊ शकते, असा कायदा केला होता. तो खूप गवगवा झाल्यावर मागे घेतला गेला होता. तेव्हा विरोधात असलेल्या भाजप वगळता अन्य कोणी त्या कायद्याला विरोध केला नव्हता, पण आता तोच विषय ऐरणीवर म्हणजे सुप्रीम कोर्टात आला असून, त्यामुळे आपले कायद्यापासूनचे सुरक्षा कवच गमावण्याच्या भयाने अतिरेकी फुटीरवादी गडबडून गेले आहेत. कारण, हे कलम सुप्रीम कोर्टात टिकणारे नाही, याची अशा बदमाशांना खात्री आहे. म्हणूनच राजकीय दबावाने ते कलम टिकवण्याची कसरत सुरू झाली आहे.

२१ ऑगस्ट २०१७

'इसिस' ठरली जगातील सर्वांत धोकादायक संघटना

   "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) या दहशतवादी संघटनेचा इराक व सीरियातून बीमोड झाला असला तरी जगातील सर्वांत धोकादायक संघटना म्हणून गेल्या वर्षापर्यंत तिची ओळख होती. मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालामध्ये याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

    विद्यापीठाने जागतिक दहशतवादासंबंधीच्या संकलित केलेल्या माहितीनुसार "इसिस' किंवा "इस्लामिक स्टेट'ने (आयएस) गेल्या वर्षी चौदाशे हल्ले केले. त्यात सात हजार नागरिकांचा बळी गेला. 2015च्या दहशतवादी कारवायांपेक्षा गेल्या वर्षीच्या हल्ल्यांमध्ये 20 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. जगाचा विचार करता 2016 मध्ये दहशतवादी हल्ले आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्‍क्‍याने वाढले होते. स्पेनमधील बार्सिलोनामध्ये गेल्या आठवड्यात लास रामब्लास येथे वर्दळीच्या ठिकाणी व्हॅन घुसवून हल्ला केल्याचा दावा "इसिस'ने केला आहे. या हल्ल्यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच रशियात सुरीच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात आठ जण जखमी झाले. या हल्ल्यांची जबाबदारी "इसिस'ने घेतली असली तरी त्याबद्दल शंका व्यक्त होत आहे. मात्र "इसिस'ने इराक व सीरियात ज्या प्रकारे हल्ले केले होते, त्याच्याशी या नव्या हल्ल्यांचे साधर्म्य असल्याचे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या संघटनेने इराक व सीरियाचा ताबा घेऊन 2014 मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. एखाद्या व्यक्तीचा व गटाचा वापर करून कोणत्याही पद्धतीने ते आत्मघाती हल्ले करतात. "इसिस'शिवाय इराक आणि सीरियात गेल्या वर्षी अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या 950 होती. यात तीन हजार नागरिक ठार झाले.

       बांगलादेश, येमेन, लीबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि फिलिपाईन्समध्ये "इसिस'च्या नेतृत्वाखाली अन्य दहशतवादी गट कार्यरत असून त्यांनी 2016 मध्ये सर्वाधिक हल्ले केले असून, त्यातील बळींची संख्याही पूर्वीपेक्षा मोठी होती, असे अहवालात म्हटले आहे. "इसिस'च्या छायेखाली येण्या आधीपासून हे गट विध्वंसक कारवाया करीत होते. "इसिस'ने त्यांचा कुशलतेने वापर केला, अशी माहिती अमेरिकेच्या गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. गेल्या काही वर्षांत ओरलॅंडो, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, लंडन, मॅंचेस्टर, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ज्या पद्धतीने हल्ले झाले तसे आत्मघातकी हल्ल्यांची संख्या वाढविण्याचा आदेश "इसिस'ने अन्य गटांना दिले होते. याच काळात वैयक्तिक हल्ल्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आल्याचे या अहवालाचे लेखक एरिन मिलर यांनी सांगितले.
     "इसिस'च्या विरोधात लढण्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त पथकाची स्थापना झाल्यानंतर या समितीत सहभागी झालेल्या राष्ट्रांवर मिळेल त्या शस्त्रांनिशी जास्तीत जास्त हल्ले करण्यास दहशतवादी गटांना प्रवृत्त करण्यात आले. जर विध्वंस घडवून आणण्यासाठी स्फोटके अथवा बंदुकीच्या गोळ्या उपलब्ध नसतील तर अमेरिका, फ्रान्स अथवा त्यांच्या मित्र राष्ट्रांतील नागरिक असला तरीही कोणाचीही मुलाहिजा न बाळगता त्याचे डोके दगडाने ठेचून किंवा त्याच्यावर चाकूने वार करून किंवा त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारा, असा आदेश "इसिस'चा प्रवक्ता अबू मुहमद अल अदनानी यांनी 2014मध्ये दहशतवाद्यांना दिला होता. अमेरिकेने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात केलेल्या हवाई हल्ल्यांत अदनानी ठार झाला, असेही मिलर यांनी सांगितले.

दहशतवाद्यांचे मासिक
       अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यास सुरवात केल्यानंतर जास्त हल्ले करण्याचे आवाहन "इसिस'च्या प्रसिद्धीपत्रकांमधून तसेच दहशतवाद्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून करण्यात येऊ लागले, असे "एसआयटीई' गुप्तचर संघटनेचे संचालक रिटा कॅट्‌स यांनी सांगितले. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांवर लक्ष ठवण्याचे काम "एसआयटीई' करते. "इसिस'तर्फे गेल्या वर्षीपासून "रुमिया' हे मासिक प्रसिद्ध केले जाते. त्यात हल्ल्यांसंदर्भात संपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले जाते. अगदी एखाद्याला कसे भोसकायचे, वाहनांमधून हल्ला कसा करायचा याची माहिती यात असते. तसेच आर्थिक व धार्मिक क्षेत्राला कसे लक्ष्य करायचे हेही याविषयी टिप्स यात दिल्या जातात.

१९ ऑगस्ट २०१७

शेअर बाजारातील तेजीने सेन्सेक्स, निफ्टीत वाढ

      सकाळच्या सत्रात तेजीने सुरवात करणारा ‘सेन्सेक्स’ दिवसअखेर 24.57 अंशांनी वधारून 31,795 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त 6.85 अंशांची किरकोळ वाढ झाली. तो 9,904 अंशांवर बंद झाला.

          रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या इतिवृत्तात चलनवाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्हच्या इतिवृत्तात व्याजदरवाढीबाबत अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदारांवर दबाव दिसून आला. यामुळे बँका, वित्तसेवा पुरवठादार कंपन्या, वाहन उत्पादक आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअरची गुंतवणूकदारांनी विक्री केली.

           संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र खरेदीचा पवित्रा कायम ठेवला. त्यांनी ‘इन्फोसिस’च्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यामुळे इन्फोसिसचा शेअर 4.54 टक्क्यांनी वधारला. त्याचबरोबर कोल इंडिया, एनटीपीसी, भारती एअरटेल आदी शेअर वधारले. ‘निफ्टी’ मंचावर सिप्ला, अदानी पोर्ट, एसीसी, मारुती आदी शेअरमध्ये घसरण झाली.

            पारसी नववर्षानिमित्त शेअर बाजारातील करन्सी डेरिव्हेटिव्हिज आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हिजचे व्यवहार बंद होते. मात्र बीएसई आणि एनएसईचे शेअर व्यवहार सुरू होते.

’कॉल ड्रॉप’ झाल्यास 10 लाखांपर्यंत दंड : ट्राय

        ’कॉल ड्रॉप’मुळे मोबाईल धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ’कॉल ड्रॉप’च्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी ‘ट्राय’ अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

         कॉल ड्रॉपच्या नियमांचा लागोपाठ 3 महिने भंग करणार्‍या कंपन्यांना 10 लाखांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली. नियमभंग करणार्‍या कंपन्यांकडून 1 ते 5 लाख रुपयांचा दंड आकारण्याचा सध्या प्रस्ताव आहे. त्यामुळे मोबाईल नेटवर्क पुरवणार्‍या कंपन्यांना कॉल ड्रॉप रोखण्यात अपयश आल्यास दंडाच्या रकमेत दीडपटीने वाढ करण्यात येणार आहे. सलग 3 महिने कॉल ड्रॉप झाल्यास दंडाची रक्कम तिसर्‍या महिन्यात दुपटीने वाढेल.

           कॉल ड्रॉप प्रकरणात सर्वाधिक दंड 10 लाख रुपयांचा असेल. कॉल ड्रॉप मोजण्याबद्दल अनेक मुद्दे आहेत. सरासरीमुळे अनेकदा यातील अनेक मुद्दे समोर येत नाहीत. मात्र नव्या नियमांच्या अंतर्गत अनेक मुद्दे विचारात घेतले जाणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.

’कॉल ड्रॉप’ म्हणजे काय?

कॅाल चालू असताना दोन व्यक्तींच्या संभाषणात नेटवर्कमुळे अडथळा येतो. उदा. कॅाल चालू असताना मध्येच आवाज ऐकू न येणे, खराब नेटवर्कमुळे कॉल आपोआप कट होणे, याप्रकारालाच ’कॉल ड्रॉप’ म्हटले जाते.    

नवे नियम -

*   कोणत्याही दूरसंचार सर्कलमध्ये एकूण कालावधीच्या 90 टक्के काळात 98 टक्के कॉल्स सुरळीत होणे आवश्यक.

*   एकूण कॉल्सपैकी 2 टक्क्यांहून अधिक कॉल्स ड्रॉप झाल्यास कंपनीकडून दंड आकारला जाऊ शकतो.

*   सर्वाधिक व्यस्त असलेल्या दिवसांमध्ये एका दूरसंचार सर्कलमधील 90 टक्के मोबाईल टॉवरवरील कॉल ड्रॉपचे प्रमाण 3 टक्क्यांहून अधिक असता कामा नये.

१८ ऑगस्ट २०१७

इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांचा राजीनामा

      इन्फोसिसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाकडून सिक्का यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला आहे. सिक्का यांनी आपण व्यक्तिगत कारणासाठी राजीनामा देता असल्याचे म्हटले आहे.

      विशाल सिक्का यांनी राजीनामा देताच इन्फोसिसच्या समभागात 7 टक्क्यांनी घसरण झाली आहे. यूबी प्रविण राव यांची अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

चित्रपटाच्या शीर्षक गीताने केला विश्वविक्रम

      जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. विराग वानखेडे यांनी हा चित्रपट बनवला असून ‘डॉ. तात्या लहाने, अंगार’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या शीर्षक गीताने नवा विश्वविक्रम केला असून, त्याची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे.

     तब्बल 327 गायकांनी एका वेळेस वेगवेगळे शब्द उच्चारत, गाणे गात हा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. नवी मुंबईतील गायक विराग वानखेडे यांनी 327 गायकांना एकत्र घेऊन हा विक्रम रचला. यापूर्वी 296 गायकांनी एकत्र गात रेकॉर्ड केला होता. एकाच वेळी सर्वांनी गाणे न गाता गाण्यातील एक एक शब्द प्रत्येकाने गायचा होता. गाण्यामध्ये 109 शब्द होते. हे आव्हान यशस्वीरीत्या गायकांनी पार पाडले. राज्याच्या कानाकोपर्‍यातून गायक या गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी निवडले होते. विराग वानखेडे यांच्या नावावर आधी तीन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्यामध्ये या विक्रमाची भर पडली आहे. तात्याराव लहाने हे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांनी 2 लाखांवर अधिक नेत्र शस्त्रक्रिया करून, अनेक गोरगरिबांना दृष्टी दिली आहे. त्यामुळेच तात्यांचे हे काम मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न विराग वानखेडे यांनी केला आहे.

भारताला पाठिंबा देऊन जपानची चीनला चपराक

      डोकलाम मुद्यावरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षात जपान भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. जपानने भारताला पाठिंबा देताना कुठल्याही देशाने जबरदस्ती, दडपशाहीच्या मार्गाने डोकलाममधील जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असे म्हटले आहे. जापानने जाहीरपणे पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिका म्हणजे चीनसाठी सणसणीत चपराक आहे. कोणीही जबरदस्तीने जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये. शांततेने तोडगा काढावा असे जपानचे राजदूत कीनजी हिरामाटसू यांनी सांगितले.

       जुलै महिन्यात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत बोलताना जगातील अनेक देशांचा भारताला पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्यावेळी लगेच दुसर्‍या दिवशी चीनच्या सरकारी वर्तमानपत्राने लेख लिहून भारताला कुठल्याही देशाचा पाठिंबा नसल्याचे म्हटले होते. भारत-तिबेट आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात तिथे चीनने रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे हा संघर्ष सुरु झाला आहे. मागच्या 2 महिन्यांपासून भारत आणि चीनचे लष्कर परस्परासमोर उभे ठाकले आहे.

     अमेरिकेनेसुद्धा भारत आणि चीनने चर्चा करुन प्रश्न सोडवावे असे म्हटले होते. अमेरिकेची ही भूमिका म्हणजे भारताला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. कारण युद्धाने नव्हे तर चर्चेने मार्ग निघेल ही भारताची पहिल्यापासूनची भूमिका आहे. चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात आहे. डोकलाममधून भारताने सैन्य मागे घेतले म्हणून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली समस्या लगेच मिटणार नाही. सैन्य मागे घेणे ही फक्त चीनकडून घातलेली एक पूर्वअट आहे. भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले तरी, चीन सहजासहजी हा विषय सोडणार नाही.

      भारताने जी काही आक्रमक, चिथावणीखोर कृती केली आहे त्याची किंमत भारताला चुकवावी लागेल असे यी हायलिन यांनी ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितले. ते चीनच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटजीचे संचालक आहेत. भारताने चीनच्या भूमीवरुन सैन्य मागे घेतले नाही तर, चीनचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय सप्टेंबरआधीच भारताला अल्टिमेटम देईल असे चिनी लष्कराशी संबंधित असलेल्या दुसर्‍या एका तज्ज्ञाने सांगितले.

      हे अल्टिमेटम म्हणजे भारत आणि जगासाठी स्पष्ट संदेश असेल. चीन भारताला सैन्य मागे घेण्यासाठी ठराविक दिवसांची मुदत देईल. ती डेडलाईन संपल्यानंतर भारतीय सैन्य चिनी भूमीवर कायम असेल तर जे होईल त्याची संपूर्ण जबाबदारी भारताची असेल असे या तज्ज्ञाने सांगितले. चीन शस्त्रसाठा आणि लष्करी तंत्रज्ञानात भारताला वरचढ आहे असे चिनी तज्ज्ञांचे मत आहे. भारताच्या मागच्या काहीवर्षात रशिया आणि अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे विकत घेतली आहेत.

१७ ऑगस्ट २०१७

एमा स्टोन ठरली जगात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

      सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिनेमा 'ला ला लॅंड'ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे. एमा स्टोन सर्वाधिक कमाई करणारी महिला असल्याचं फोर्ब्स मॅगझिनने घोषीत केलं आहे. 28 वर्षांच्या या अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात 2.6 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 166.4 कोटी रूपये कमावले आहेत.

       'ला ला लॅंड' या सिनेमात केलेल्या तगड्या अभिनयाचं बक्षीस म्हणून तिला ऑस्करकडून बेस्ट एक्ट्रेस या पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. यावर्षी लिंग समानतेसाठीही तिने आवाज उठवला होता. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे अशी मागणी तिने केली होती. 'ला ला लॅंड' सिनेमाने जगभरात जवळपास 445 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.  

       या यादीत दुस-या क्रमांकावर अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचा नंबर लागतो. जेनिफर एनिस्टनने गेल्या वर्षात 2.55 कोटी डॉलरची कमाई केली आहे. प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज फ्रेन्ड्समध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर एनिस्टनची ओळख आहे. ड्रामा फिल्म 'द येलो बर्ड' यामध्येही जेनिफर दिसली होती. याशिवाय ती अमिरात एअरलाइन्सची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर देखील आहे. या यादीत जेनिफर लॉरेन्स तिस-या क्रमांकावर आहे.    

      गेल्या दोन वर्षांपासून या यादीत जेनिफर लॉरेन्स अव्वल होती. लॉरेन्सने गेल्या वर्षभरात 2.4  कोटी डॉलरची कमाई केली आहे. गेल्या वर्षीची तुलना केली असता तिची कमाई निम्मी जाली आहे. कारण गेल्या वर्षी तिने 4.6 कोटी डॉलर कमावले होते.

कोरीनॲन्ड्रा इलिगन्स फूलझाडाचा शोध

      तालुक्‍यात डबक्‍यामध्ये पावसाळ्यात उगवणाऱ्या ‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स चांदोरे, यू. एस. यादव ॲन्ड एस. आर. यादव’ या नव्या फुलवनस्पतीचा शोध लावण्याची कामगिरी येथील डॉ. अरुण चांदोरे व डॉ. एस. आर. यादव, डॉ. उषा यादव या तिघांनी केली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमाने त्यांनी हा शोध लावला. साखरकोंबे परिसरामध्ये या वनस्पतीचा आढळ आहे. यामुळे कमी उंचीच्या कातळ परिसरामध्ये दुर्मीळ वनस्पतींचा खजिना असल्याचे अधोरेखित झाले आहे.

        ही वनस्पती राजापूर तालुक्‍यातील साखरकोंबे, जैतापूर, नाटे परिसरापासून ते थेट देवगड तालुक्‍यापर्यंत आढळली. रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. चांदोरे, शिवाजी विद्यापीठातील वनस्पती विभागातील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. श्री. यादव आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या सौ. यादव यांच्या नजरेला कातळावर ही वनस्पती पडली. त्याची माहिती न मिळाल्याने त्यामुळे त्याच्या संशोधनाचा ध्यास घेतला. 

असे झाले नामकरण
       वर्षभराच्या कालावधीमध्ये संशोधन आणि अभ्यास करून शोध लागलेल्या या वनस्पतीचे नामकरणही या संशोधक त्रयींनी केले. दिसायला आकर्षक आणि देखणे फूल पाहिल्यानंतर कोणाच्याही तोंडून ‘ब्युटीफूल’ असे शब्द बाहेर पडतात. हाच धागा पकडून या फुलाला ‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स’ हे नाव दिले, अशी माहिती प्रा. अरुण चांदोरे यांनी दिली. जागतिक स्तरावर प्रा. चांदोरे आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या नावानेच वनस्पती ओळखली जाते. 

‘कोरीनॲन्ड्रा इलिगन्स’चा जीवनक्रम
     मे महिन्यात जेथे वनस्पती रुजते, त्याची सविस्तर माहिती घेऊन अभ्यास करण्यात आला. पहिल्या पावसानंतर जमिनीमध्ये असलेल्या झाडांच्या मुळांची (रूट सकर) रुजवात होऊन जमिनीलगत पाने येतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडाला महिन्याभराच्या कालावधीमध्ये फुले येतात. १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये फुलाला बहर असतो. सर्वसाधारण सप्टेंबरमध्ये फळधारणा आणि नोव्हेंबरला हंगाम संपतो. जानेवारीत ही वनस्पती दिसेनाशी होते. फेब्रुवारी ते एप्रिल कालावधीमध्ये ही जागा पडिक दिसते. मात्र पावसाळ्यानंतर पुन्हा ती रुजते. 

संशोधित नवी वनस्पती अशी नोंद
     सदाबहार आणि लक्ष वेधून घेणाऱ्या ‘कोरीअनॲन्ड्रा इलिगन्स’(Corynandra elegans) या फुलवनस्पतीची संशोधित वनस्पती म्हणून जागतिक स्तरावर ९ मे, २०१६ रोजी न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्‍सा (PHYTOTAXA)’ या जागतिक दर्जाच्या नियतकालिकाने नोंद केली आहे.

१६ ऑगस्ट २०१७

नेपाळमध्ये पूर, भूस्खलनाचे १२० बळी

    नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनाने आतापर्यंत १२० लोक मृत्युमुखी पडले आहेत तर ३५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. या पुराचा फटका सुमारे ६० लाख नागरिकांना बसला आहे. नेपाळच्या गृहमंत्रालयाच्या हवाल्याने 'माय रिपब्लिका' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या नैसर्गिक आपत्तीत २,८०० घरांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, चितवन राष्ट्रीय उद्यानात अडकलेल्या ३५ भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
    पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नेपाळचे गृहमंत्री जनार्दन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. मुख्य सचिव आणि १२ सचिव या समितीचे सदस्य आहेत. देशाच्या विविध भागांना पुराचा फटका बसला आहे. पूर, भूस्खलन आणि वादळामुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकारने बचाव कार्याला गती दिली असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
   बचावकार्यासाठी २६,७०० सैनिकांची मदत घेण्यात आली आहे. लष्कराचे सात आणि अन्य मिळून एकूण १३ हेलिकॉप्टर्स, मोटरबोट, रबरी नावांच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.

बाऊंसर लागून पाकच्या क्रिकेटपटूचा मृत्यू

    पाकिस्तानच्या एका तरुण क्रिकेटपटूचा बॅटिंग करताना चेंडू लागून मृत्यू झाला आहे. बाऊंसर बॉल थेट डोक्यावर लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने टि्वट करून या खेळाडूच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फलंदाजांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुबेर अहमद (१४) असे या खेळाडूचे नाव आहे.
     पाकिस्तानच्या मीडिया वृत्तानुसार, 'जुबेर अहमद क्लब क्रिकेट मॅच खेळत होता. फलंदाजी करताना बॉल थेट जुबेरच्या डोक्यावर लागला आणि मैदानातच तो मृत्युमुखी पडला.' पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने टि्वट केलंय की जुबेर अहमदच्या दुर्दैवी मृत्युमुळे हे पुन्हा एकवार सिद्ध झालंय की खेळताना हेल्मेट घालणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जुबेरच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सामील आहोत.
   हा अपघात घडला तेव्हा जुबेर हेल्मेट घातलं नव्हतं. दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज डेव्हिड वॉर्नर बाऊंसर बॉलमुळे जखमी झाले होते. ऑस्ट्रेलियाच्याच तरुण फलंदाज ह्यूज यांचा डोक्यावर बॉल लागल्याने मृत्यू झाला आहे.

 

१५ ऑगस्ट २०१७

न्यू इंडियाच्या संकल्पनेनं देश प्रगतिपथावर न्यायचा आहे

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, काश्मीर वाद, भारत-चीन समस्या, धर्माच्या नावावर होत असलेली हिंसा, तिहेरी तलाख आणि गोरखपूरमध्ये घडलेल्या दुर्घटनेबद्दल भाष्य करताना भारत जोडोचा नारा दिला. तसेच त्यांनी न्यू इंडियाच्या संकल्पनेनं देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे असे आवाहन केले. 

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले :

काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहील 

 • तीन वर्षांत सव्वा लाख कोटी रुपयांचा काळा पैसा शोधण्यात आला आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले
 • आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतोय
 • गरिबांना लुटून तिजोरी भरणाऱ्यांना आजही सुखाची झोप येत नाही
 • बराच काळ मुख्यमंत्री राहिल्याने देशातील विकासात राज्यांचे महत्त्व माहिती आहे
 • तरुणांना नोकऱ्या मिळतील, तेव्हाच देशाची प्रगती होईल
 • गोळ्या किंवा शिव्यांनी नव्हे, तर काश्मिरींच्या गळाभेटीनेच जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन होईल
 • दहशतवादाविरोधात जगातील अनेक देशांची भारताला मदत
 • जम्मू-काश्मीरचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे
 • जीएसटीमुळे व्यापार क्षेत्र मजबूत झाले
 • गोरखपूरमधील मुलांच्या मृत्यूप्रकरणी दुःख आहे
 • प्रत्येक गावागावात वीज पोहोचवली आहे, देश प्रगती करतोय
 • जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले, त्यावेळी भारताची ताकद जगाला मान्य करावी लागली
 • देशातील अंतर्गत सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे
 • चालतंय ते चालू द्या, हा जमाना गेला, आता बदल होतोय, परिस्थिती बदलतेय
 • नैराश्याला मागे टाकून आत्मविश्वासानं देशाची प्रगती साधायची आहे
 • तरुणांना देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे भाग्य मिळत आहे, तरुणांना देशाच्या विकासासाठी पुढे येण्याचे मी आवाहन करतो
 • 21व्या शतकात जन्मलेल्या तरुणांसाठी हे वर्षं महत्त्वपूर्ण आहे
 • सुदर्शन चक्रधारी मोहनपासून चरखाधारी मोहन करमचंद गांधींपर्यंत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे
 • देशातील सामूहिक शक्तीच्या साहाय्यानं परिवर्तन आणणे शक्य
 • देशाच्या मागे सामूहिक शक्तीची ताकद आहे
 • देशातला बराच भाग आज नैसर्गिक आपत्तीशी लढतोय
 • चांगला पाऊस देशातील पिके फुलवण्यासाठी मदत करतो
 • 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाकडे पक्के घर आणि वीज असेल
 • प्राप्तीकर भरणाऱ्यांची संख्या यापूर्वी 22 लाख होती, आता ती 56 लाख झाली आहे
 • देशाच्या स्वातंत्र्य, गौरवासाठी ज्यांनी बलिदान दिले, अशा महानुभावांना शतशः नमन करतो
 

राज्यातील ५६ जणांना राष्ट्रपती पोलीस पदक

      पोलीस दलात गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय व शौर्यपूर्ण कामगिरी बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५६ अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक व शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. नागपूर परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, मुंबई गुन्हा अन्वेषण विभागातील अपर आयुक्त के.एम. प्रसन्ना, उपायुक्त निसार तांबोळी, दिलीप सावंत, एसीबीचे उपमहानिरीक्षक केशव पाटील आदींचा त्यामध्ये समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाकडून यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

     गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस नाईक दोगू अत्राम व कॉन्स्टेबल स्वरूप अमृतकर यांना मरणोत्तर पोलीस शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय यवतमाळ जिल्ह्याचे पोलीसप्रमुख एम. राजकुमार, साहाय्यक निरीक्षक नितीन माने, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, प्रफुल्ल कदम, विजय रत्नपारखी, हवालदार मोतीराम मडावी, मल्लेश केडमवार, नाईक जितेंद्र मारगये, गजेंद्र सौजल (सर्व गडचिरोली) व उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे (अहमदनगर) यांना शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

१४ ऑगस्ट २०१७

रॉजर फेडरर अंतिम फेरीत

    विंबल्डन विजेतेपदापासून लय गवसलेल्या रॉजर फेडररने शनिवारी मॅंट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेचीही अंतिम फेरी गाठली. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याने रॉबिन हास याचे आव्हान ६-३, ७-६(७-५) असे मोडून काढले. 

   वयाच्या ३६व्या वर्षी देखील सहज खेळणाऱ्या फेडररने हासविरुद्ध नऊ बिनतोड सर्व्हिस केल्या. पूर्ण लढतीत त्याने केवळ नऊ गुण गमावले. सलग १६ लढती जिंकताना गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठे सातत्य आपल्या कामगिरीत राखले. विजेतेपदासाठी त्याची गाठ आता जर्मनीच्या ॲलेक्‍झांडर झ्वेरेव याच्याशी पडणार आहे. फेडररने यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली असून, त्याने आतापर्यंत २७ मास्टर्स विजेतीपदे मिळविली आहेत. 

     दुसऱ्या उपांत्य लढतीत ॲलेक्‍झांडर झ्वेरेव याने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याचे आव्हान ६-४, ७-५ असे मोडून काढले.

शहरातही सुरू होणार ‘ई-चालान’

      ग्रामीण पोलिसांपाठोपाठ आता शहर पोलिसांनी ‘कॅशलेस’कडे वाटचाल सुरू केली आहे. येत्या आठवड्यात शहरातील विविध रस्त्यांवर उभा राहणार्‍या वाहतूक पोलिसांकडे तब्बल 200 ‘ई-चालान डिव्हाईस’ देण्यात येतील. वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिल्यानंतर हा उपक्रम सुरू होईल. यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांना ‘ई-चालान’ देऊनच दंड वसूल करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.

      जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी काही दिवसांपूर्वी ‘ई-चालान डिव्हाईस’ कार्यान्वित केले आहेत. त्यांनी 50 मशीन वाहतूक पोलिसांना दिले आहेत. आता शहर पोलिसांनीही ‘ई-चालान’ला प्राधान्य दिले आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी मनुष्यबळ कमी असल्याने आधुनिकीकरणाचा विडा उचलला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या स्पार्कन आयटी सोल्युशन कंपनीशी करार करून त्यांनी ‘ई-चालान’ प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

       त्यासाठीच आयुक्तालयातील सभागृहात वाहतूक पोलिस अधिकार्‍यांना स्पार्कन आयटी सोल्युशन कंपनीमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. पुढील 3 दिवस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर तब्बल 200 डिव्हाईस घेऊन हे कर्मचारी रस्त्यावर उतरतील. या डिव्हाईसच्या माध्यमातून वाहनधारकांची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणासाठी सहायक पोलिस आयुक्त चंपालाल शेवगण, पोलिस निरीक्षक हणमंत गिरमे, रोडगे यांच्यासह उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

वाहन, मालकाची संपूर्ण माहिती मिळणार...

      वाहतूक शाखेला दंडाची पावती फाडण्यासाठी पावतीबुक दिलेले आहे. दंड भरण्यासाठी चालकाकडे पैसे कमी असतील तर वाहन जप्त करण्यात येते. त्याशिवाय वाहनधारकाचा परवाना, गाडीची कागदपत्रे तपासण्यात पोलिसांचा वेळही खर्च होतो. त्यावर उपाय म्हणून स्पार्कन आयटी सोल्युशन कंपनीने ई-चालान डिव्हाईस तयार केले आहे. हे डिव्हाईस आरटीओ कार्यालयाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे वाहन हे चोरीचे आहे का?, वाहनधारकाने किती वेळा वाहतुकीचे नियम मोडले, दंडाच्या पावत्या कितीवेळा भरल्या, अनेकदा दंड भरला असेल तर त्याचा परवाना जप्त करावा का, ही संपूर्ण माहिती या उपक्रमाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांना मिळणार आहे. त्यासाठी इंटरनेटचा वापर करावा लागणार आहे.

दिवसभराच्या कारवाईची माहिती तत्काळ -

      या यंत्रामुळे पोलिसांनी दिवसभरातून किती रुपयांचा दंड वसूल केला, किती वाहनांवर कारवाई केली हे तत्काळ समजणार आहे. या डिव्हाईससोबतच प्रिंटरसुद्धा आहे. कॅशलेस व्यवहारासाठी कार्डरिडर असल्याने स्वाइप करणे आणि मशीनमध्ये कार्ड टाकण्याची सोयदेखील आहे.

दलाई लामा आणि चीन

        एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या विद्यमाने 9 ऑगस्ट रोजी झालेल्या समारभात राजेंद्र माथूर स्मृतिव्याख्यान देताना तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी डोकलममधील संघर्षग्रस्त परिस्थितीबाबत बोलताना हिंदी चीनी भाई भाईची पुनरावृत्ती करण्याशिवाय मार्ग नाही, तसेच, दोन्ही देश एकमेकांना नेस्तनाबूत करू शकणार नाही. असे सांगितले.

       बीजिंगमधून प्रसिद्ध होणारे इंग्रजी दैनिक ग्लोबल टाईम्स गेले अनेक दिवस भारतावर आग ओतत आहे. त्यातील संपादकीय, लेख व बातम्यातून डोकलम ट्रायजंक्शनबाबत भारतावर प्रक्षोभक टीका होतेय. तरी भारताने संयम व आशा सोडलेली नाही. शिष्टाचाराच्या मार्गातून प्रश्न सोडविला जाईल, असे वारंवार सरकारतर्फे सांगण्यात येते. सीमित युद्ध झाल्यास काय परिस्थिती असेल, कसा हल्ला होईल, पायदळ, वायुदल कसा हल्ला चढवू शकते, व चीन व भारत कोणकोणत्या परिसरात परस्परांच्या लष्कराची कोंडी करू शकतात, याचे विश्लेषण लष्करी तज्ञ खुलेपणे वेगवेगळ्या वाहिन्यांवर करीत आहेत. दरम्यान, शांघायमधील दैनिकाच्या प्रतिनिधीबरोबर काल भेट झाली. तेव्हा त्यानेही ग्लोबल टाईम्समधून होणार्‍या टीकेचा उल्लेख केला. तो म्हणाला, टॅब्लॉइड आकाराचे हे दैनिक इंग्रजी व चीनी भाषेतून प्रसिद्ध होते. त्यामुळे नोकरदार वर्ग व तरूणात भारताविषयी दुराग्रह निर्माण होतोय. विशेष म्हणजे, दोन्ही देशांनी एकमेकाबरोबर मैत्री वाढविण्याचा गेले 15 ते 20 वर्षे जाणीवपूर्वक प्रयत्न केला, तो डोकलमबाबत झालेल्या मतभेदांवरून संपुष्टात येणार काय,अशी शंका वाटू लागली आहे. पण, ग्लोबल टाईम्स चीनमधील सामान्य लोकांच्या वाचनात येत नाही, त्यामुळे चीनी जनतेत आजही भारताविषयी आत्मियता आहे. युद्ध दोन्ही देशांना परवडणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी चीनबरोबर मैत्री वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. तथापि, दलाई लामा यांची वक्तव्ये व हालचाली यामुळे चीनी नेत्यात अस्वस्थता आहे, हे खरे.

        आणखी एक माहिती देताना त्याने सांगितले, की काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाने परदेशी पत्रकारांना भारतातील प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यासाठी नेले होते. त्यात चीनच्या शिनहुआ या प्रमुख वृत्तसंस्थेच्या दोन महिला पत्रकार होत्या. दौर्‍या दरम्यान, पत्रकारांनी म्हैसूरला भेट दिली. तेथे प्रसिद्ध वृंदावन उद्यान, राजमहाल आदी पाहिले. म्हैसूर व बंगलोर नजिक तिबेटहून आलेल्या शरणार्थींच्या छावण्या आहेत. म्हैसूरमध्ये त्यांचे (तिबेटींचे) एक सुंदर देवालय आहे. ते पाहाण्यास पत्रकार गेले. तेथील छायाचित्रेही शिनहुआच्या महिला पत्रकारांनी टिपली. याची माहिती शिनहुआला कळताच, त्यांना भारतातून माघारी बोलाविण्यात आले. तिबेटी शरणार्थी ही चीनच्यादृष्टीने संवेदनशील बाब आहे. न जाणो, चीनी पत्रकार तिबेटी शरणार्थींच्या संपर्कात आले, तर त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडायचा. अथवा, शरणार्थींबाबत पत्रकारांच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावयाची. म्हणूनच, भारतातील चीनी पत्रकारांच्या हालचालींवर चीन नजर ठेवून असतो. चीनमधील वृत्तपत्रे, वृत्तसंस्था व रेडिओ यांचे मिळून भारतात दहा पत्रकार आहेत.

        या ठिकाणी आणखी एक गोष्ट आठवते. 1979 मध्ये पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत युनियनच्या सरकारने मला सांस्कृतिक संबंधांच्या अंतर्गत सोव्हिएत युनियनला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते. जुलै 1980 मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये ऑलिंपिक क्रीडास्पर्धा व्हावयाच्या होत्या. मी ऑक्टोबर 1979 मध्ये मॉस्कोला गेलो. त्या दिवसात सोव्हिएत सरकारने प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते व सरकारचे टीकाकार आंद्रे साखारोव व पत्नी येलेना बॉनर यांना त्यांच्याच निवासस्थानी स्थानबद्ध करून ठेवले होते. लिओनिड ब्रेझनेव्ह अध्यक्ष होते. साखारोव्ह यांच्या निवासस्थानावरून माझी ये-जा चालू असायची. परंतु, घराभोवती सशस्त्र सैनिकांचा पहारा असायचा. ऑलिम्पिकच्या निमित्ताने जगभरातील पत्रकार मॉस्कोत येणार व त्यापैकी काही साखारोव्ह यांना भेटण्याचा निश्चित प्रयत्न करणार. मुलाखत देण्यास मुभा दिली, तर ब्रेझनेव्ह सरकार, जाचक कम्युनिस्ट सत्ता, एकपक्षीय हुकूमशाही व सोव्हिएत युनियनमधील सामान्य लोकांची काय स्थिती आहे, हे साखारोव बोलणार व त्याचा बोभाटा जगभर होईल, याची कल्पना नेते व केजिबी या गुप्तचर संघटनेला असल्याने सरकारने साखारोव्ह कुणीही पाश्चात्य पत्रकार भेटू शकणार नाही, याची खबरदारी घेतली होती. बव्हंशी साम्यवादी व हुकूमशाही प्रणाली असलेल्या देशात पत्रकारितेच्या संदर्भात हीच स्थिती आहे. चीनमध्ये सारी वृत्तपत्रे व वृत्तसंस्था सरकारी मालकीची असल्याने त्यातील कामकाजाचे नियम ठरलेले असतात. काही वर्षांपूर्वी चीनला दिलेल्या भेटीत पीपल्स डेलीच्या संपादकांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी स्पष्ट सांगितले, की वृत्तपत्रात काय छापणार आहे व काय छापलेले आहे, याची माहिती सरकारला द्यावी लागते. धोरणाबाबत सरकारकडून मार्गदर्शन मिळते.

        एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या विद्यमाने 9 ऑगस्ट रोजी झालेल्या समारभात राजेंद्र माथूर स्मृतिव्याख्यान देताना तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी डोकलममधील संघर्षग्रस्त परिस्थितीबाबत बोलताना हिंदी चीनी भाई भाईची पुनरावृत्ती करण्याशिवाय मार्ग नाही, तसेच, दोन्ही देश एकमेकांना नेस्तनाबूत करू शकणार नाही. असे सांगितले. तथापि, लष्करी तज्ञांच्या मते, नजिकच्या भविष्यात संबंधांची वाटचाल त्याकडे होण्याची सुतराम शक्यता नाही. खुद्द दलाई लामा यांना आता ल्हासाला जावेसे वाटत नाही. विनोदाने ते म्हणाले, ल्हासाचं तापमान अतिंथंड. त्याचा डोक्यावर परिणाम होतो. त्यापेक्षा भारतातील उकाड्यात राहिलेले बरे. शिवाय, इथे स्वातंत्र्य आहे. भारतात येऊन अर्धशतक होतय, येथील हजारो वर्षांची परंपरा, नालंदा परंपरेचे मला अतिशय आकर्षण आहे. आय अ‍ॅम ए सन ऑफ इंडिया. स्मितहास्य करीत ते म्हणाले, की आम्ही लोकशाही अनुसरली आहे. त्यादृष्टीने आम्ही चीनपेक्षाही (प्रगतीशील) पुढे आहोत. काय सांगावे, चीन आमचे अनुकरण करील! सध्या सुमारे 10 हजार तिबेटी भिख्खू भारताचे प्राचीन ज्ञान व विज्ञान यांचे अध्ययन करीत असून, चीनमध्ये देखील चारशे दशलक्ष नागरीक बौद्धधर्मिय आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

        चीनमधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी बोलाविण्याचा सल्ला दिला. तसे केल्यास लोकशाहीचे महत्व त्यांना कळेल, असाही संकेत त्यांनी दिला. भगवान गौतमी बुद्धाशी संबंधित प्रार्थनास्थळांना भेट देण्यासाठी चिनी पर्यंटकांना प्रोत्साहन द्यावे, अशीही त्यांची सूचना. गेल्या काही वर्षात चीन बदललाय, असे सांगून दलाई लामा म्हणाले, की चीनमधील दुकाने, रेस्टॉरन्ट्समधून चीनी माणसं नेत्यांवर टीका करायलाही हल्ली धजावू लागलेत, ही समाधानाची बाब होय.

१३ ऑगस्ट २०१७

हिमालच प्रदेशात भूस्खलन 7 जणांचा मृत्यू

      हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात दोन बसवर झालेल्या भूस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण अद्याप बेपत्ता आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडी-पठाणकोट महामार्गावर शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. भूस्खलनामुळे मातीचा ढीगारा महामार्गावरून जात असलेल्या दोन बसवर कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन मदत करण्यात आली. पाच जणांना वाचविण्यात यश आले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे. तर, हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह दुर्घटनेच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. तसेच त्यांनी जखमींना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शिमल्यापासून 220 किमी अंतरावर असलेल्या कोटरुपी येथे हे भूस्खलन झाले. महामार्गावर दोन बस थांबल्या असताना ही घटना घडली. मातीच्या ढिगाऱ्यामुळे दोन्ही बस 800 फूट दरीत कोसळल्या.

रिले शर्यतीत उसैन बोल्टला अपयश, ग्रेट ब्रिटनने पटकावले सुवर्ण

     विश्व अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत ग्रेट ब्रिटनने सुवर्ण पदक पटकावले. या शर्यतीत जमैका संघाचा पराभव झाला. जमैका संघाचा स्टार उसैन बोल्टने आपल्या संघाला यश मिळवून ट्रॅकचा अखेरचा निरोप घेण्याचा निर्धार केला होता. मात्र, शर्यतीत धावताना त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला धावता आले नाही. 
      4 बाय 400 मीटरच्या शर्यतीत ब्रिटन संघातील चिजंडू उजाह, अॅडम जेमिली, डॅनियल टेल्बॉट आणि नथेनेल मिशेल-ब्लेक यांनी 37.47 सेकंद वेळ नोंदवित अव्वल स्थान पटकविले. तर, जस्टीन गट्लीनच्या नेवृत्वाखाली अमेरिकेने रौप्य पदक आणि जपानच्या संघाने कांस्य पदक मिळविले. 
        अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या कारकीर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी सुवर्ण पटकावण्याचा निर्धार उसैन बोल्टने केला होता. मात्र, त्याला अपयश आले. गेल्या आठवड्यात येथील विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीतील पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या जस्टीन गॅट्लीनने सुवर्ण पदाकावर कब्जा केला. त्यामळे उसैन बोल्टला कांस्य पदाकावर समाधान मानावे लागले. आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत उसैन बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्य पदक आहे, या आधीच्या प्रत्येक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे. 
      उसैन बोल्टने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्ण तर विश्व चॅम्पियनशिपमध्ये अकरा विजेतेपदांची कमाई केली आहे. 2012 च्या लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदके कमावली आहेत. 9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही उसैन बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. याचबरोबर 2008 च्या ऑलिम्पिकमधील चार बाय 100 मीटर रिले शर्यतीत त्याचा सहकारी नेस्ता कॅन्टर हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जमैकाचे हे विजेतेपद काढून घेण्यात आले होते.

१२ ऑगस्ट २०१७

जम्मू-काश्‍मीरमध्ये 132 दहशतवादी ठार

    जम्मू-काश्‍मीरमध्ये यावर्षी आतापर्यंत सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 132 दहशतवादी ठार झाले असून, यामध्ये लष्करे तैयबाचा अबू दुजाना आणि हिज्बुल मुजाहिदीनमधील बुऱ्हाण वणीचा वारसदार सबजार अहमद भट यांच्यासह 6 म्होरक्‍यांचा समावेश असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

     काश्‍मीरमध्ये दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दले आणि पोलिसांनी वेळोवेळी एकत्रितपणे शोधमोहीम राबवून या दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. यावर्षी मागील सात महिन्यांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या ही गेल्या सात वर्षांत याच कालावधीतील सर्वाधिक आहे, अशी माहिती एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिली.

    जुलैअखेर 115 दहशतवादी ठार झाले होते, तर तेव्हापासून 9 ऑगस्टअखेर आणखी 17 दहशतवादी ठार झाले असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. यामध्ये लष्करे तैयबाच्या 38, हिज्बुलच्या 37 आणि अल कायदाशी संबंधित झाकीर मुसा गटाच्या 3 दहशतवाद्यांचा समावेश असून, उर्वरित 58 अज्ञात दहशतवादी ठार झाले आहेत. प्रामुख्याने नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत अधिकांश दहशतवादी ठार झाले आहेत.

११ ऑगस्ट २०१७

अमेरिकेची ‘सुवर्ण’धाव कायम

      यंदाच्या जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या धावपटूंनी सनसनाटी निकाल नोंदविण्याचा जणू विडाच उचलला आहे. आधी ‘स्प्रिंट’ प्रकारात त्यांच्या धावपटूंनी केवळ ॲथलेटिक्‍स विश्‍वालाच धक्का दिला नाही, तर अवघ्या क्रीडाप्रेमी चाहत्यांना आपल्या कामगिरीने चक्रावून सोडले. आता महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत त्यांच्या फायलीस फ्रान्सिसने धक्कादायक कामगिरीची नोंद केली. पुरुषांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीतही नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने दिग्गजांना चकीत केले, तर महिला गोळाफेकीत गाँग लिजिओने प्रथमच जागतिक पातळीवर सुवर्णपदक जिंकले.  

     गेल्यावर्षी रिओ ऑलिंपिकमध्ये महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत अंतिम रेषेवर उडी मारून बहामाच्या शॉने मिलरने सुवर्णपदक जिंकले होते. या वेळी जागतिक ॲथलेटिक्‍समध्ये तिला फारसे काही करण्याची संधी मिळाली नाही. फायलीस हिने अगदी सहज ही शर्यत जिंकली. पावसामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर चांगलाच परिणाम झाला. शॉने मिलर युबोला हिलादेखील त्याचा फटका बसला. चारशे मीटरची शर्यत सुरू झाल्यावर शॉनने नेहमीप्रमाणे वेगवान प्रारंभ केला. शेवटचे तीस मीटर अंतर शिल्लक असताना पावसामुळे तिचे स्नायू जखडले. त्यामुळे उजवा पाय ट्रॅकला घासला. त्यातच तिची लय गेली आणि याचा फायदा घेत अमेरिकेच्या फायलीस व बहरिनच्या विश्‍व ज्युनिअर युवा विजेत्या १९ वर्षीय सल्वा नासेरने वेग वाढवून अनुक्रमे सुवर्ण (४९.९२ सेकंद), व रौप्य (५०.०६ सें) पदक जिंकले. अमेरिकेची ॲलीसन फेलीक्‍स ब्राँझपदकाची मानकरी ठरली. 

     पुरुषांच्या चारशे मीटरमध्ये नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहोमने दिग्गजांना चकीत करताना ४८.३५ सेकंदात सुवर्ण जिंकले. तुर्कीचा यास्मानी कोपेलो रौप्य (४८.४९ सेकंद) तर दोन वेळचा विश्‍वविजेता व ऑलिंपिक विजेता अमेरिकेचा केरॉन क्‍लेमेंट ब्राँझपदकाचा (४८.५२ से) मानकरी ठरला. महिला गोळाफेकीत चीनच्या गाँग लिजिओने अखेर जागतिक पातळीवर सुवर्णपदक (१९.९४ मीटर) जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. हंगेरीची अनिता मार्तोनने रौप्य (१९.४९ मीटर) तर रिओतील विजेती अमेरिकेची मिचेल कार्टरने ब्राँझपदक (१९.१४ मी.) जिंकले. 

पाकच्या "मदर तेरेसा' डॉ. रुथ फाऊ यांचे निधन

      पाकिस्तानमधून कुष्ठरोग दूर करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जर्मन डॉक्‍टर रुथ फाऊ (वय 85) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.

      डॉ. फाऊ या 1960 मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या हेलावून गेल्या आणि त्यांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. नन असलेल्या डॉ. फाऊ यांनी 1962 मध्ये कराचीमध्ये मारी ऍडलेड लेप्रसी सेंटर स्थापन केले आणि नंतरच्या काळात या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांवर उपचार केले आहेत. डॉ. फाऊ यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुष्ठरोगापासून मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने 1996 मध्ये जाहीर केले.

       डॉ. फाऊ यांनी सोसायटी ऑफ डॉटर्स ऑफ हार्ट ऑफ मेरी या संस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांना भारतात काम करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, व्हिसासंबंधी अडचण आल्याने त्या काही काळासाठी मध्येच कराचीत उतरल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांशी बोलताना त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्या कायमस्वरूपी येथेच थांबल्या. त्यांना पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला हिलाल ए इम्तियाज 1979 मध्ये आणि हिलाल ए पाकिस्तान हा पुरस्कार 1989 मध्ये प्राप्त झाला होता. त्यांना 2015 मध्ये स्टॉफलर मेडलही प्रदान करण्यात आले होते.

१० ऑगस्ट २०१७

सिंधू आता आंध्र प्रदेशात उपजिल्हाधिकारी

      ऑलिंपिक उपविजेती पी. व्ही. सिंधू हिने आंध्र प्रदेशातील गोल्लापडी येथील उपजिल्हाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली. तिने महसूल आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन नियुक्तीची औपचारिकता पूर्ण केली. सिंधूला उपजिल्हाधिकारी नियुक्त करणार असल्याचे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिने पदक जिंकल्यानंतर काही दिवसांतच जाहीर केले होते. त्यापूर्वी यासाठी आंध्र प्रदेश सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या कायद्यात बदल केला होता.

पीपली लाईव्ह अभिनेते सीताराम पांचाळ यांचे निधन

     पान सिंग तोमर आणि पीपली लाईव्ह सारख्या चित्रपटात काम केलेले अभिनेते सीताराम पांचाळ यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनी आणि कॅन्सरशी झुंज देत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी या पोस्टमध्ये उपचारांसाठी मदत मागितली होती. मला मदत करा मी कॅन्सरशी लढा देतो आहे माझी आर्थिक स्थिती फारच वाईट आहे. तुमचा सीताराम पांचाळ असे लिहित त्यांनी लोकांपुढे मदत मागितली होती. त्यांना मदत करण्यासाठी लोकांनी मदतीचा हातदेखील पुढे केला होता. 2014मध्ये त्यांना कॅन्सरचे झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ही त्यांनी हिम्मत न हारता जॉली एलएलबीमध्ये काम केले होते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यानचे काही फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये त्यांना ओळखणे ही अवघड झाले होते. 1994 साली आलेल्या बैंडेट क्वीन या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कॅन्सरशी लढताना त्यांनी आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली होती. काही दिवसांपासून आर्थिक अडचणींमुळे अॅलोपथिक औषध बंद करुन त्यांनी आयुर्वेदिक औषध घेणे सुरु केले होते.  शेवटच्या दिवसांत त्यांचे वजन 30 किलोवर आले होते.  पत्नी आणि 19 वर्षांच्या मुलासोबत ते मुंबईतल्या मीरारोड भागात राहत होते. घरी ते ऐकटेच कमावणारे होते. संजय मिश्रा, रोहिताश गौडं. आणि राकेश पासवान  या त्याच्या तीन मित्रांनी शेवटपर्यंत साथ दिली.त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि  त्यांची प्राणज्योत मालवली.

९ ऑगस्ट २०१७

मराठा क्रांती मोर्चा

    "मराठा समाज दुखावला; तर काय करेल याचा या सरकारला अंदाज नाही,' असा गर्भित इशारा मराठा मोर्चासमोर बोलणाऱ्या मुलींमधील पूजा मोरे या एका युवतीच्या भाषणामधून  देण्यात आला. "मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचंही केवळ गाजर दाखवलं. सरकारपुढे आम्ही आमच्या मागण्या ठेवल्या, परंतु सरकारला आमच्या समस्यांविषयी गांभीर्य नाही. आता आम्हाला दगा दिला; तर तलवारी काढून जागा दाखवू,' अशी संतप्त प्रतिक्रिया या मोर्च्यादरम्यान व्यक्त करण्यात आत आली.

 या भाषणामधील काही मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे -

 •       छत्रपतींच्या राज्यात मुलीचा जो सन्मान राखला तोच सन्मान हवा आहे. कोपर्डीच्या भगीनीचा काय दोष होता. न्याय मिळालाचं पाहिजे. शांतता भंग होवू नये असं वाटत असेल तर त्या नराधमांना लवकरात लवकर फाशी द्या. कसं जगायचं या जंगलात ? हाच का शिवरायांचा महाराष्ट्र ? मी साहेबांना नागपूरात विचारले तर त्यांनी जलदगतीचं आश्वासन दिले. काय झालं त्या आश्वासनाचे...?? आम्ही छत्रपतींचे वारस आहोत क्रांती घडवणारे आहोत. हातात नांगर घेवून चालण्याची संस्कृती आहे, पण अन्यायाच्या विरोधात तलवार घेवून लढण्याची धमक आहे. आमची माथी भडकावू नका     
 • जिस दिन मराठे सुरू करेंगे राडा... आमच्या पोरी पण म्हणतील चला रे तलवारी काढा... रक्षाबंधन झालं पण कोपर्डीच्या भगिनीला न्यायाची ओवाळणी पडली नाही.                            
 • आम्हाला ना डोक्यावर ताज पाहिजे, ना सत्ता पाहिजे... आम्हाला सगळा मराठा समाज एक पाहिजे. 
 • वाटलं नव्हतं हक्कासाठी लढावं लागेल, ज्यांना सत्तेत बसवलं त्यांच्याशीच भिडावं लागेल. 
 • राजकारण्यांनो मराठा अजून जातीवर आलेला नाही, जर ठरवलं तर मराठ्यांशिवाय कोणीच निवडून येणार नाही. मराठा नेत्यांनी गद्दारी केली तर त्यांची जागा दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. 147 मराठा आमदार हातावर हात ठेवून बसले आहेत.    
 • जसे जमलो एकीने पुन्हा पांगणार नाही. जिजाऊंची शपथ घेवून सांगते पुन्हा मराठा जात लावणार नाही. 
 • अॅट्रासिटीचा गैरवापर होत आहे. त्यात सुधारणा झालीच पाहिजे. 
 •  नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकीवर, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल मराठ्यांच्या एकीवर..!  
 • आरक्षण आम्हाला शिकू देत नाही, अन दुष्काळ बापाला पिकवू देत नाही. कसं करणार गरीब बाप आमचं शिक्षण?
 • हा मोर्चा कोणत्याही जाती विरोधात नाही. 
 • होऊन जावू दे पुन्हा एकदा तो रांगडा जोश, दाही दिशेनं घुमूदे छत्रपती 
 • जो मराठा हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा. 
 • मुख्यमंत्री तुम्ही आम्हाला कर्जमाफीचं गाजर दाखवलं. 
 • मराठ्यांसोबतच का राजकारण करता ? राजे छत्रपतींची जयंती सुध्दा एका दिवशी करत नाहीत ! आता एकाच दिवशी 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती.
 • मराठा समाज डाॅ. बाबासाहेब, गौतम बुध्दाच्या विचाराने चालणारे आहे. 
 • फडणवीस साहेब आम्ही 57 मोर्चे काढले, आता मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमच्या सरकारचेही 'चले जाव ' केले जाईल. 
 • छत्रपतींच्या नावाने मतं मागितली त्यांचीच भूमिका पायदळी तुडविली जात आहे. 
 • फडणवीस, तुमचा अभ्यास किती दिवस सुरू राहणार आहे? अभ्यास सुरू, अभ्यास सुरू, किती दिवस ऐकायचं, मला तर शंकाच आहे. फडणवीस साहेबांनी कोणत्या गुरूजींकडे क्लास लावला आहे. ही विनंती समजा, सूचना समजा, इशारा समजा किंवा धमकी समजा...!!!!!
 • या जिजाऊंच्या लेकींना साधं संरक्षण देता येत नाही तुम्हाला ? अहो एक वर्षानंतरही नराधम जिवंत आहेत ? अरे नेमकं मराठा लागतो तरी कोण तुमचे..?    
 • शिव स्मारकाचं अरबी समुद्रात भूमिपुजन केलं. पुढं काय केलं? आता मुंबई काबीज केली. आम्हाला दिल्लीला जायला वेळ लागणार नाही...! 
 • आमच्या भगिनीवर बलात्कार झाला, काय वेदना असतील ते विचारा फडणवीस आपल्या आई बहिणीला...! 
 • आम्ही दिल्लीत आता मौन नसू. तलवारी म्यानात आहेत; त्या बाहेर काढण्याची वेळ येवू देवू नका. 
 • यानंतर मराठ्यांच्या लेकीवर कोणी हात टाकायचा प्रयत्न केला तर मायबाप सरकारा कायदा बाजूला ठेवून तलवारी हातात घेवू. शपथ, आजपासून आम्ही कोणत्याही महिलेवर अत्याचार होवू देणार नाही.

मॅक्‍लोडच्या सुवर्णपदकाचा जमैकाला दिलासा

   जागतिक मैदानी स्पर्धेत शंभर मीटर शर्यतीतील अपयशाने जमैकाच्या क्रीडाप्रेमींमध्ये निराशा आली होती. मात्र ऑलिंपिक विजेत्या ओमर मॅक्‍लोडने ११० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपल्या देशवासीयांना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली. हातोडाफेकीतील विश्‍वविक्रमवीर पोलंडची अनिता व्लोडाझस्कीचे वाढदिवसाच्या एक दिवस आधी सुवर्णपदक, महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीत केनियाला मिळालेले यश आणि स्पर्धेच्या इतिहासात व्हेनेझुएलाने जिंकलेले पहिले सुवर्णपदक चौथ्या दिवसाची अन्य वैशिष्ट्ये ठरली.

        ओमर मॅक्‍लोडने भन्नाट प्रारंभ करताना १३.०४ सेकंदांत सुवर्णपदकाला गवसणी घातली. गतविजेता सर्गेई शुभेनकोव्हला १३.१४ सेकंदांत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तेजक सेवनामुळे रशियावर बंदी असल्याने सर्गेई येथे तटस्थ ॲथलिट्‌ म्हणून सहभागी झाला. त्यामुळे रौप्यपदक जिंकल्यानंतरही त्याला आपल्या देशाचा ध्वज घेऊन आनंद साजरा करता आला नाही.  हंगेरीच्या बलाझ बायीने माजी ऑलिंपिक विजेत्या एरियस मेरीटला मागे ढकलून ब्राँझपदक जिंकले. आता मॅक्‍लोड जमैकासाठी रिले धावण्याची शक्‍यता आहे. 

   पोलंडची विश्‍वविक्रमवीर, ऑलिंपिक विजेती अनिता व्लोडझस्की मंगळवारी ३२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सुवर्णपदकाच्या रूपाने तिला वाढदिवसाची उत्तम भेट मिळाली. यंदाच्या मोसमात विश्‍वविक्रम करणाऱ्या अनिताची सुरवात समाधानकारक नव्हती. मात्र तिने ७७.९० अंतरावर हातोडाफेकीत सुवर्णपदक जिंकलेच. चीनच्या झेंग वॅंगला (७५.९८ मी.) रौप्य आणि अनिताची सहकारी मालविना कोपर्नो हिला (७४.७६ मी.) ब्राँझपदक  मिळाले. महिलांच्या तिहेरी उडीतही बरीच चुरस पाहायला मिळाली. गतवर्षी रिओत कॅटरीन इबारगुनकडून पराभूत होणाऱ्या व्हेनेझुएलाच्या युलीमार रोजासने १४.९१ सेकंदांत सुवर्णपदक निश्‍चित केले. कॅटरीनला रौप्य (१४.८९ मी.) आणि माजी ऑलिंपिक विजेत्या कझाकिस्तानच्या ओल्गा रॅपकोव्हाला ब्राँझ (१४.७७ मी.) मिळाले. 

       पंधराशे मीटरची शर्यत भन्नाट झाली. सुरवातीपासून आघाडीवर असलेल्या यजमान ग्रेट ब्रिटनच्या लौरा मुईरला पदक जिंकता आले नाही. यंदाच्या मोसमात वेगवान वेळ देणाऱ्या नेदरलॅंडच्या सिफात हसनचे डावपेच फसले आणि तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. केनियाच्या रिओ ऑलिंपिक विजेत्या फेथ किपेगॉन हिने अखेर बाजी (४ मि.०२.५९ सेकंद) मारली. माजी विजेत्या अमेरिकेच्या जेनीफर सिम्पसनने (४ मि.०२.७६ सें.) रौप्य आणि दक्षिण आफ्रिकेची वादग्रस्त धावपटू कॅस्टर सेमेन्याने (४ मि.०२.९० सें.) ब्राँझपदक जिंकले.

दृष्टिक्षेपात दिवस चौथा
११० हर्डल्समध्ये ऑलिंपिकपाठोपाठ विश्‍व विजेतेपद मिळविण्याची ही दुसरी वेळ. 
यापूर्वी ॲलन जॉन्सनने १९९६ च्या ऑलिंपिक आणि १९९७ च्या विश्‍व स्पर्धेत ही कामगिरी केली होती. 
हंगेरीच्या बलाझ बायीला हर्डल्समध्ये ब्राँझपदक. ट्रॅकवरील शर्यतीत हंगेरीचे हे पहिलेच पदक. 
तिहेरी कोलंबियाच्या कॅथरिन इबारगुनची २०१४ पासूनची विजयी मालिका खंडित
महिलांच्या पंधराशे मीटरमध्ये विश्‍वविक्रमवीर इथिओपीयाची गेन्झेबे दिबाबाला शेवटचे (१२) स्थान
तिहेरी उडीत युलीमार रोजासच्या सुवर्णपदकाने व्हेनेझुएलाने स्पर्धेत प्रथमच सुवर्ण आणि एकूण दुसरे पदक जिंकले.

८ ऑगस्ट २०१७

आनंदचा कॅरुआनावर विजय

      भारताच्या ग्रॅंडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने सिंक्वेफिल्ड करंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत फॅबिआनो कॅरुआना याचा पराभव केला. पहिल्या चार फेरीत आनंदला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना आनंदने २९ चालीतच विजय मिळविला. या विजयाने आनंद संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आला आहे. मॅक्‍सिम लॅग्रेव ३.५ गुणांसह आघाडीवर असून, आनंद विश्‍वविजेता मॅग्नस कार्लसनसह तीन गुण मिळवून संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. मॅक्‍सिम लाग्रेवला आज लेवॉन अरोनियनने बरोबरीत रोखले, तर कार्लसन याने वेस्ली सो याच्यावर मात केली.

उत्तर प्रदेशमध्ये 17 पासून कर्जमाफी योजना कार्यान्वित

       उत्तर प्रदेशातील बहुप्रतीक्षित कर्जमाफी योजना 17 ऑगस्टपासून मूर्त स्वरूपात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत लखनौ जिल्ह्यातील सुमारे 9,500 कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही योजना सुरवातीला लखनौत राबवण्यात येणार असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी राबवण्यात येणार आहे.

       येत्या 17 ऑगस्टला लखनौतील स्मृती उपवन येथे कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात अन्य जिल्ह्यातील शेतकरी तसेच मंत्री, खासदार, आमदारदेखील उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकर्‍यांकडे आधारकार्ड आहे, त्यांना लाभ दिला जाणार जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही परंतु जमिनीबाबत कोणताही वाद नाही अशा शेतकर्‍यांना माफी दिली जाणार आहे आणि तिसर्‍या टप्प्यात जमिनीच्या वाद असणार्‍या शेतकर्‍यांसंबंधी अडचणी निकालात काढून कर्जमाफी दिली जाणार आहे.

       17 ऑगस्ट रोजी आधारकार्ड असणार्‍या 9,500 शेतकर्‍यांचे आधार लिंक बँक खात्याशी केले जाणार असून कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात जमा होणार असल्याचे अधिकार्‍याने सांगितले. या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारने 75 जिल्ह्यासाठी जिल्हाधिकार्‍याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यूपी सरकारने कर्जमाफीची संपूर्ण तयारी केली असून, त्या संदर्भात बँक अधिकार्‍यांना निर्देश दिल्याचे उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही यांनी सांगितले.

कर्जमाफी योजनाचा लाभ -

*   17 ऑगस्टपासून कार्यान्वित

*   1 सप्टेंबरपासून राज्यात टप्प्याटप्प्याने लागू

*   राज्यातील 86 लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता

*   शेतकर्‍यांचे 1 लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार

*   सरकारकडून 34,000 कोटींची तरतूद

७ ऑगस्ट २०१७

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला चौथे मानांकन

      रिओ ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत चौथे मानांकन देण्यात आले आहे; तर दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेला किदांबी श्रीकांत आठवा मानांकित आहे. ही स्पर्धा ग्लासगो येथे २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. जागतिक स्पर्धेची मानांकन क्रमवारी निश्‍चित करताना ऑगस्टच्या सुरवातीस म्हणजेच ३ ऑगस्टला असलेले जागतिक मानांकन लक्षात घेण्यात आले.

       या क्रमवारीनुसार दक्षिण कोरियाचा सॉन वॅन हो व जपानची अकेन यामागुची यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. त्यामुळे पाच वेळा जागतिक स्पर्धा जिंकलेल्या लीन दान याला सातवे मानांकन लाभले आहे. भारतीयांत महिला एकेरीत अपेक्षेप्रमाणे सिंधू व साईना मानांकन क्रमवारीत आहेत; पण अव्वल १० मध्ये केवळ सिंधू व श्रीकांतच आहेत.

’काँग्निझंट’मध्ये घेतली 400 वरिष्ठांनी निवृत्ती

      माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील ’काँग्निझंट’ कंपनीने वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिल्यानंतर कंपनीच्या 400 वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. ’आयटी’ क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ’काँग्निझंट’ने मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

       अमेरिकेच्या ’नॅस्डॅक’मध्ये नोंदणीकृत असलेल्या कॉग्निझंट कंपनीचे बहुतांश कामकाज तमिळनाडू राज्यातून चालते. ’कॉग्निझंट’कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने संचालक पातळीपासून ते वरिष्ठ उपाध्यक्षपदी असलेल्या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचार्‍यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय खुला ठेवला होता. वरिष्ठ स्तरावरील ज्या कर्मचार्‍यांचे वार्षिक वेतन 40 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशांसाठी देखील हा पर्याय खुला होता, असे सूत्रांनी सांगितले.

       भरपाई म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेणार्‍या कर्मचार्‍यांना किमान 9 महिन्यांचा पगार देण्याचा पर्याय दिला होता. त्यामुळे आता काही कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारल्याने कंपनीची दरवर्षी 6 कोटी डॉलरची बचत होणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र भारतातील किती कर्मचार्‍यांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय स्वीकारला त्याबाबत माहिती देण्यात आली नाही.

      31 डिसेंबर 2016 च्या प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, ’कॉग्निझंट’मध्ये जगभरात 2 लाख 60 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी 1 लाख 88 हजार, म्हणजेच एकूण मनुष्यबळाच्या 72 टक्के कर्मचारी भारतात काम करतात.

६ ऑगस्ट २०१७

बॉक्‍सर विजेंदर डबल चॅंपियन

    भारताचा स्टार व्यावसायिक बॉक्‍सर विजेंदर सिंगने चीनच्या झुल्पिकर मैमैतिआलीचा चुरशीच्या लढतीत ९६-९६, ९५-९४, ९५-९४ असा पराभव करून दुहेरी चॅंपियनचा बहुमान मिळवला. आशिया पॅसेपिकचा तो विजेता होताच. आज त्याने प्रतिष्ठेचा ओरिएंटल सुपर मिडलवेटचेही अजिंक्‍यपद मिळवले.

       वरळीच्या एनएससीआय संकुलात झालेल्या या लढतीकडे भारत वि. चीन असेही पाहिले जात होते. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यासह रामदेवबाबाही विजेंदरला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. विजेंदर आणि झुल्पिकर हे दोघेही अपराजित होते. त्यामुळे लढत चुरशीची होणार हे अपेक्षित होते. प्रत्येकी तीन मिनिटांच्या दहा फेऱ्यांमध्ये विजेंदरने सावध सुरवात केली होती. मध्यावर तो काहीसा पिछाडीवर पडला; परंतु अखेरच्या फेरीत त्याने जबरदस्त पंच देत झुल्पिकरवर मात केली.

निती आयोगावर राजीवकुमार यांची नियुक्ती

    निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ राजीवकुमार यांची नियुक्ती झाली आहे. अरविंद पंगारिया यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.

    राजीवकुमार यांच्याबरोबरच ’एम्स’मधील बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख विनोद पॉल यांचीही निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड केली आहे. राजीवकुमार हे धोरण आणि संशोधन विभागाचे वरिष्ठ फेलो होते.

     कुमार यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी.फिल आणि लखनौ विद्यापीठातून पी.एच.डी. प्राप्त केली आहे. ते 2006 ते 2008 या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचेही सदस्य होते. याशिवाय, विविध वित्तसंस्थांमध्ये त्यांनी वरीष्ठ पदांवर काम केले आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

४ ऑगस्ट २०१७

मंजू कुमारीला जागतिक ब्राँझ

       जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेतील भारताचे दुसरे पदक जिंकण्याचा पराक्रम मंजू कुमारीने केला. तिने मुलींच्या ५९ किलो गटात ही कामगिरी केली. भारताचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. 

       राष्ट्रकुल विजेती मंजू अंतिम फेरीत जाईल, अशी आशा होती; पण उपांत्यपूर्व फेरीतच तिला हार पत्करावी लागली. त्यानंतर रिपेचेजद्वारे तिला संधी मिळाली आणि तिने ती सोडली नाही. तिने युक्रेनच्या इलोना प्रॉकोपेवनिउक हिच्याविरुद्धच्या लढतीत पहिल्या काही सेकंदांतच २-० आघाडी घेतली. त्यानंतर तिने चांगला बचाव केला. मंजूला गुण मिळाले नसले, तरी तिने प्रतिस्पर्धीस एकही गुण मिळू दिला नाही. त्यामुळे तिचे पदक निश्‍चित झाले. पहिल्या दिवशी वीरदेव गुलियाने ब्राँझपदक जिंकले होते.

      राष्ट्रकुल विजेत्या मंजू कुमारीने रीपेचेजद्वारे ब्राँझ पदकाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. कलाजंग डाव करण्यात वाकबगार असलेल्या मंजूने उपांत्यपूर्व फेरीत याचाच हुशारीने वापर केला; तसेच प्रतिस्पर्धीची दमछाक केली. त्यामुळे तिने कॅनडाच्या तिआना ग्रेस केनेट हिला ४-० असे हरवून ब्राँझपदकाच्या लढतीत प्रवेश केला. 

      सलामीला बल्गेरियाच्या निकोलाएवा कॅशिनोवा हिला ५-१ असे पराजित केल्यावर मंजू उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कुमानो युझुरू हिच्या आक्रमकतेस रोखू शकली नाही. मंजूला या लढतीत ०-१० अशी हार पत्करावी लागली होती. 

    दिव्या तोमर काहीशी दुर्दैवी ठरली. ४४ किलो गटातील रेपिचेज लढतीत तिने बल्गेरियाच्या मॅंदेवा फातमे इब्रामोवा हिच्याविरुद्ध आघाडी घेतली, पण काही सेकंद असताना मॅंदेवाने गुण मिळविला. लढत बरोबरी सुटल्यामुळे मॅंदेवाची सरशी झाली. नंदिनी साळोखे हिला उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या बोलोर एर्दाने बॅत हिच्याविरुद्ध ४-१० अशा एकतर्फी पराभवास सामोरे जावे लागले. पूजा देवी ६७ किलो गटात थेरेसा एलिसा फेल्डरविरुद्ध ३-६ अशी हरली.

हरीनाम सप्ताहाची झाली गिनीज बुकमध्ये नोंद

     गंगापूर तालुक्यातील आरापूर शिवारात सुरु असलेल्या योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या १७० व्या अखंड हरिनाम सप्ताहाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी एकाच ठिकाणी १० लाख भाविकांनी एकत्रित सत्संगात सहभागी होणे आणि त्यांना ८ मिनिटात  प्रसादाच्या लाडूचे वाटप करणे असे दोन जागतिक विक्रम  घडले.

      या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना प्रदान करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी सोळंकी, सप्ताह समितीचे अध्यक्ष आ. प्रशांत बंब, खा. चंद्रकांत खैरे, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

३ ऑगस्ट २०१७

केगन यांची महावाणिज्यदूत पदावरती नियुक्ती

      अमेरिकेच्या मुंबईतील दुतावासात कॉन्सुल जनरलपदी एडगर्ड डी केगन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी एडगर्ड डी केगन कौलालंपूर (मलेशिया) येथील दूतावासात २०१४-१७ या दरम्यान उपप्रमुख या पदावर काम करत होते. त्याआधी सप्टेंबर २०१३ ते जुलै २०१४ दरम्यान ते वॉशिंग्टनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या यु एस मिशनचे उपसंचालक होते. तेथे त्यांनी यु एस पर्मनंट रेप्रेझेंटिव्ह टू यु एन समान्था पॉवर यांच्या  बरोबर विशेष काम केले व नॅशनल सिक्युरिटी कॉउंसिल डेप्युटीस कमिटीमध्ये आपले  योगदान दिले. जुलै २०१२ ते ऑगस्ट २०१३मध्ये त्यांनी ब्युरो ऑफ ईस्ट एशियन अँड पॅसिफिक अफैअर्स तर्फे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड व पॅसिफिक आईलॅन्ड्स बरोबरच्या संबंधांवर विशेष लक्ष दिले.

        केगन १९९१ मध्ये परदेश सेवेत रुजू झाले व त्यांनी सुरुवातीला डिरेक्टर ऑफ कोरियन अफेअर्स हे पद सांभाळले.  
        एडगर्ड केगन कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) येथे अर्थ व राजकारण विषयक सल्लागार होते, व  त्याआधी बीजिंग, टेल ऍव्हिव्ह, बुडापेस्ट व अन्य ठिकाणी त्यांनी काम केले आहे.  केगन  (१९८९) येल विद्यापीठातील स्नातक पदवीधारक आहेत. त्यांनी (१९८९-९१) न्यू यॉर्क ब्युरो ऑफ ब्रिजेस मध्ये उच्च पदावर काम केले आहे.

      त्यांना मँडारिन, स्पॅनिश, फ्रेंच व हंगेरीअन भाषा अवगत आहेत. त्यांचा जन्म शिकागोला झाला असून, त्यांचे बालपण विलमेट (इलिनॉय) येथे गेले आहे. केगन यांच्या मुंबईतील वास्तव्यामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी व तीन  मुलं आहेत. "पश्चिम भारतात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना मला आणि माझ्या परिवाराला अत्यंत आनंद होत आहे, येथील सर्व लोकांना भेटण्याची संधी मला मिळणार आहे व भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेताना मला फार आवडेल," अशा शब्दांमध्ये केगन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२ ऑगस्ट २०१७

जम्मू-काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पांस जागतिक बँकेची मान्यता

      भारतास काही बंधने पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी असल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले.

       सिंधु नदीच्या या उपनद्यांवर भारताकडून किशनगंगा (क्षमता 330 मेगावॅट) व रतल (क्षमता 850 मेगावॅट) हे जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहेत. मात्र पाकिस्तानचा या प्रकल्पांस विरोध आहे. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानला मिळणार्‍या पाण्यावर परिणाम होण्याची भीती या देशास आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक बँकेकडून या प्रकल्पांसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

         या प्रकल्पांच्या तांत्रिक रचनांसंदर्भात असलेल्या आक्षेपांच्या सुनावणीसाठी एक न्यायालयीन लवाद नेमण्यासंदर्भातील पूर्वतयारी पाकिस्तानने करावी, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. भारताने यासंदर्भातील आक्षेपांची छाननी करण्यासाठी एका अलिप्त तज्ज्ञ नेमण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सिंधु पाणी वाटप करारांमधील कलमांचे उल्लंघन न करता या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी भारतास असल्याचे जागतिक बँकेने या निवेदनामध्ये स्पष्ट केले आहे. भारतासाठी हे मोठे राजनैतिक यश मानले जात आहे.

भारत-अमेरिका मजबूत संबंधासाठी ‘यूएसआयएसपीएफ’ची स्थापना

        भारत-अमेरिका संबंध अधिक भक्कम करण्यासाठी अमेरिका-भारत रणनीतीक भागिदारी मंच (यूएसआयएसपीएफ) स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून दोन्ही देशातील व्यापारी संबंधांना प्रोत्साहन दिला जाईल. तसेच नागरिकांच्या आर्थिक जीवनाचा स्थर उंचावणे, हा यामागील उद्देश असल्याचे यूएसआयएसपीएफकडून सांगण्यात आले आहे.

         या मंचच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे जॉर्ज चैंबर्स, उपाध्यक्षपदी पुतीन रंजन आदींची निवड करण्यात आले आहेत. तसेच या मंचमध्ये अन्य 8 सदस्यांचाही समावेश आहे.

१ ऑगस्ट २०१७

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांचा राजीनामा

      नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी 31 ऑगस्ट रोजी नीती आयोगाचे उपाध्यक्षपद सोडणार आहेत. त्यांनी 1 सप्टेंबरपर्यंत पद सोडण्याची नोटीस सरकारला दिली आहे. अरविंद पनगढिया पुन्हा शिक्षण क्षेत्रात परत येणार आहेत.

      नियोजन आयोग गुंडाळून त्या जागी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया-एनआयटीआय) अर्थात नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अरविंद पनगढिया यांची 2015 मध्ये नेमणूक केली होती.

      65 वर्षांचे अरविंद पनगढिया अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रोफेसर होते. तसेच, आशियाई विकास बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि कॉलेज पार्क मेरीलँडच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र केंद्रात अर्थशास्त्राचे प्रोफेसर व सहसंचालकपद त्यांनी भूषविले आहे. याचबरोबर प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविणार्‍या अरविंद पनगढिया यांनी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक व्यापार संघटना आणि व्यापार व विकासावरील संयुक्त राष्ट्र संमेलनात विविध पदांवर काम केले आहे.

चीनची घुसखोरी

       चिनी सैनिकांनी गेल्या आठवड्यात उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात 1 किलोमीटर आत घुसखोरी करत मेंढपाळांना धमकावल्याचे उघड झाले आहे. 25 जुलैला बारहोती भागात ही घटना घडली. डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर या घटनेला महत्त्व आले आहे.

       एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी 25 जुलैला सकाळी घुसखोरी करत मेंढपाळांना जागा सोडून जाण्यास धमकावले. बारहोती हा 80 किमीचा उताराचा पट्टा असून उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून 140 किमी अंतरावर आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांचा समावेश असलेल्या या मध्य भागात (मिडल सेक्टर) बारहोती हे सीमेवरील ठाणे आहे.

       हा लष्करमुक्त भाग असून, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) जवानांना येथे शस्त्रे घेऊन येण्याची परवानगी नाही. 1958 मध्ये भारत आणि चीनने चर्चा करून बारहोती हा वादग्रस्त भाग म्हणून मान्य करत येथे सैन्य न पाठविण्याचे मान्य केले होते. 1962 च्या युद्धातही चीनने मध्य भागात सैन्य घुसविले नव्हते, तर पूर्व भाग (अरुणाचल प्रदेश) आणि पश्‍चिम भागामध्ये (लडाख) कारवाया केल्या होत्या.

      सीमावादाबाबत जून 2000 मध्ये झालेल्या चर्चेवेळी, बारहोती, कौरील आणि शिपकी या तीन भागांमध्ये आयटीबीपीचे जवान शस्त्रे घेऊन जाणार नाहीत, असे भारताने मान्य केले होते. त्यामुळे जवान येथे नागरी वेशात गस्त घालत असतात. या भागात भारतीय मेंढपाळ आणि तिबेटमधील लोक त्यांचे याक चरण्यासाठी घेऊन येतात.