Menu

Study Circle

  १८ एप्रिल २०१८

जगातील पहिला इलेक्ट्रिक रस्ता!

     स्विडनमध्ये जगातील पहिला इलेक्ट्रिक रोड तयार करण्यात आला आहे. या रोडवर इलेक्ट्रिक रूळ टाकले असून त्यावरून जाणार्‍या इलेक्ट्रिक कार आणि ट्रकची बॅटरी चार्ज करता येऊ शकते. स्टॉकहोमजवळ हा रस्ता खुला करण्यात आला आहे. 

       हा रस्ता म्हणजे तेथील एका सरकारी योजनेचा भाग आहे. सध्या प्रायोगिक स्तरावर हा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. भविष्यात त्याचा अधिक विस्तार केला जाईल. हवेच्या प्रदूषणावर उपाय म्हणून तसेच पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनांचे दर गगनाला भिडले असल्याने वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रिक वाहने विकसित केली जात आहेत. त्यांच्या सोयीसाठी हा रस्ता आहे. पुढे स्विडनमध्ये देशभरात सुमारे वीस हजार किलोमीटरचे असे रस्ते आणि हायवे बनवले जाणार आहेत. हे रस्ते एका एम्बडेड इलेक्ट्रिक रेलच्या माध्यमातून गाड्यांना चार्ज करते. या रस्त्याचा उपयोग करण्यासाठी इलेक्ट्रिक कार किंवा ट्रकांना एक मुव्हेबल आर्मला इन्स्टॉल करण्याची गरज असते. हा आर्म रूळाला जोडून राहतो आणि त्यावरून जाणार्‍या वाहनांच्या बॅटरींना चार्ज करतो. या यंत्रणेला प्रतिकिलोमीटर 1.2 दशलक्ष डॉलर्सचा खर्च येतो.

हवेत उडणारी बाईक!

     भविष्यात आकाशात उडणारी अनेक वाहने पाहायला मिळू शकतात आणि त्याची झलक हल्ली अनेक प्रकारे दिसून येत आहे. ड्रोनचेच सुधारित रूप असलेली तर बरीच वाहने आता बनवली जात आहेत. आता एक अशीच उडणारी बाईक आली आहे. तिचे नाव ‘स्कॉर्पियन 3 हॉव्हर’ असे आहे. जमिनीशी समांतर रितीने ही बाईक अतिशय सफाईदारपणे बाईकचालकाला घेऊन उडते व पुढे जाते.

        ही बाईक सिंगल सीटची असून, तिच्या अनेक चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. अमेरिकन कंपनी ‘हॉव्हरसर्फ’ने ही बाईक तयार केली आहे. या बाईकवर 115 किलोचे वजन ठेवून चालक ही बाईक उडवू शकतो, हे विशेष! ही पूर्णपणे विजेवर चालणारी म्हणजेच इलेक्ट्रिक बाईक आहे. त्यामध्ये तीन बॅटरी असून, तीन तासांमध्ये त्या संपूर्णपणे चार्ज होतात. ही बाईक सध्या 21 किलोमीटर अंतरापर्यंत आणि वीस मिनिटे उडू शकते. भविष्यात तिची क्षमता 40 मिनिटांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

        तिचा कमाल वेग ताशी 70 किलोमीटर आहे. बाईकची बॅटरी वेगळी काढूनही चार्ज करता येऊ शकते. ही बॅटरी बाईकमध्ये बसवण्यास केवळ एक मिनिट लागतो! केवळ दोन बॅटरींच्या सहाय्यानेही ही बाईक उडवता येऊ शकते. विजेवर चालणारी असल्याने या बाईकमुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. दुबईमध्ये अशी बाईक पोलिस दलाकडून वापरली जाणार आहे. या बाईकसाठी तिकडे बुकिंगही सुरू झाले आहे. ही बाईक सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. अशी बाईक भारतात येण्यास अद्याप बराच अवकाश आहे. तिची किंमत 39 लाख रुपये आहे.

  १६ एप्रिल २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्य

     राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर, पी. व्हि. सिंधू रौप्य पदकाची मानकरी ठरली आहे. सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात  सामना झाला.

      खेळाला सुरुवात झाल्‍यापासूनच सायना नेहवालने आक्रमक खेळी करत दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सायना नेहवालने पी. व्ही. सिंधूचा  21-18, 23-21 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. 

या सामन्यात सायना नेहवालला  पी. व्ही. सिंधूने कडवी झुंज दिली. मात्र, सायनाच्या आक्रमक खेळीने सिंधूला पराभव पत्‍करावा लागला. 

      दोघींच्या या कामगिरीमुळे सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके भारताच्या खात्यात आली आहेत. सायनाच्या या सुवर्णपदकासह राष्‍ट्रकुल स्‍पेर्धेत आतापर्यंत भारताला एकूण २६ सुवर्णपदके मिळाली आहेत.

 

  १५ एप्रिल २०१८

रशिया चंद्रावर पाठवणार अंतराळवीर

     अमेरिकेच्या ‘नासा’चा अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग याने 21 जुलै 1969 या दिवशी चांद्रभूमीवर पाऊल ठेवले. त्यावेळी त्याने ‘हे एका माणसाचे छोटे पाऊल असले तरी संपूर्ण मानवजातीची उत्तुंग झेप आहे’ असे उद्गार काढले होते. ‘नासा’च्या अपोलो मोहिमेत त्यानंतरही अनेक वेळा अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. 1972 पर्यंत अकरा अंतराळवीरांनी चांद्रभूमीवर पाऊल ठेवले. युजीन सर्नन हा शेवटचा चांद्रवीर होता. रशियाचा युरी गागरिन हा अंतराळात जाणारा पहिला अंतराळवीर असला आणि स्पुटनिक हे पहिले कृत्रिम उपग्रह सोडून रशियाने अंतराळ संशोधन क्षेत्रात झेप घेतली असली तरी चांद्रमोहिमांबाबत रशिया नेहमीच अमेरिकेच्या मागे राहिला. आता मात्र 2030 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची तयारी रशियाने केली आहे.

 

  १४ एप्रिल २०१८

भारताची सुवर्णपदकाची हॅटट्रीक, संजीव राजपूतला रायफल नेमबाजीत सुवर्णपदक

     राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सलग दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सोनेरी कामगिरी करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. मेरी कोम व गौरव सोळंकीपाठोपाठ भारताच्या संजीव राजपूतने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

      ५० मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात अंतिम फेरीत ४५४.५ गुणांची कमाई करत संजीवने हे सोनेरी यश संपादन केलं आहे.

       याच प्रकारात भारताच्या चैन सिंहला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. २०१४ साली ग्लास्गो राष्ट्रकुल खेळांमधे संजीव राजपूतला कांस्यपदक मिळालं होतं. त्यामुळे संजीवने आपल्या कामगिरीत सुधारणा करत भारताला सोनेरी यश मिळवून दिलं आहे

बॉक्सिंगमध्ये भारताचा ‘गौरव’!!

     राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय बॉक्सरची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. ५२ किलो वजनी गटात भारताच्या गौरव सोळंकीने सुवर्णपदकाची कमाई केली.

     बॉक्सिंगमध्ये भारताचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. नेमबाज, वेटलिफ्टर्स पाठोपाठ बॉक्सर्सकडूनही पदकांची लयलूट सुरु आहे. बॉक्सिंगमधे भारताचं हे सहावं पदक ठरलं आहे.

       याआधी सकाळच्या सत्रात भारताला मेरी कोम ने सुवर्णपदकाची कमाई करुन दिली होती.
       बॉक्सिंगमधलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.मेरीचं राष्ट्रकुल स्पर्धांमधलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. काल भारतीय बॉक्सर्सनी कांस्यपदकाची कमाई केल्यानंतर मेरी कोमने सुवर्णपदक मिळवत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक टाकलं आहे.

  १२ एप्रिल २०१८

इस्‍त्रोच्या आईआरएनएसएस-१ चे यशस्‍वी प्रक्षेपण

     भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (दि. १२ एप्रिल) पहाटे नव्या उपग्रहाचे यशस्‍वी प्रक्षेपण केले. इस्‍त्रोच्या श्रीहरिकोटा येथील अंतराळ सेशोधन केंद्रातून आईआरएनएसएस-१ या सॅटॅलाइटचे यशस्‍वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपण करण्यात आलेल्‍या उपग्रहाचे वजन एक हजार ४२५ किलोग्रॅम असून, समुद्रातील दिशा कळण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे. 

     आईआरएनएसएस-1 चा भारतीय नौदलासह समुद्रात मासेमारी कणाऱ्या मच्छीमारांना फायदा होणार आहे. हे सॅटॅलाइट नकाशा तयार करण्याचे काम करेल, त्‍यातून निश्चित वेळ आणि समुद्रातील दिशा समजण्यास मदत होईल. हे सॅटॅलाइट दिशा आणि वेळ सांगण्यासाठी मेसेज पाठवेल. या सेवेचा सर्वांना लाभ घेता येणार असून, हा लाभ घेण्यासाठी खास ॲप डाउनलोड करावे लागणार आहे.  

     विशेष करून या उपग्रहाचा फायदा मच्छीमारांना होणार आहे. मच्छीमारांना जास्‍त मासे असणाऱ्या परिसराची माहिती, खराब हवामान तसेच आंतरराष्‍ट्रीय सीमा रेषेच्या जवळ पोहचण्याची माहिती मिळणार आहे. तसेच किनाऱ्यापासून दूर गेलेल्‍या बोटी आणि जहाजांना ट्रॅक करण्यास मदत होणार आहे.

किदांबी श्रीकांत बडमिंटनमध्ये अव्वल

     भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. आज बॅडमिंटनची जागतिक क्रमवारी जाहीर झाली. डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सलसनला पराभूत करत श्रीकांतने पहिला क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे श्रीकांतला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 

      जागतिक क्रमवारीत श्रीकांत ७६८९५ गुणांनी पहिल्या स्थानावर आहे. तर डेन्मार्कचा वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर एक्सलसन ७५४७० गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोरियाचा सोन वेन हू हा आहे. त्याला ७४६७० गुण आहेत. 

     जागतिक क्रमवारीत महिला गटात भारताची पी. व्ही. सिंधू ७८८२४ गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चीनची ताइ जू इंग ही ९०२५९ गुणांनी अव्वल स्थानावर आहे.

  ११ एप्रिल २०१८

पंकज मिश्रांना पुरस्कार

     'एज ऑफ अँगर : अ हिस्टरी ऑफ दि प्रेझेन्ट' या पुस्तकासाठी लेखक पंकज मिश्रा यांना ब्रिटनचा मानाचा समजला जाणारा ओरवेल पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन हजार पौंड रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
     जॉर्ज ओरवेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. ओरवेल यांना राजकीय लिखाणही कलात्मकरीत्या केलं जातं असं वाटायचं. या विचाराशी जुळणारे लिखाण मिश्रा यांचं असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

  १० एप्रिल २०१८

हिना सिद्धूचा सुवर्णवेध

      राष्ट्रकुल स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारताची पदकाची प्रतीक्षा नेमबाज हिना सिद्धू हिनं संपवली आहे. २५ मीटर रॅपिड पिस्तूल प्रकारात तिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. गोल्ड कोस्ट स्पर्धेतील हिनाचं हे दुसरं पदक आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कालच हिनानं रौप्य पदक मिळवलं होतं. त्या यशावर आज तिनं 'सोनेरी' कळस चढवला. 

    'टॉयसा शूटर ऑफ द इयर-२०१७' या पुरस्कारानं गौरविण्यात आलेल्या हिनाचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे पहिलं वैयक्तिक 'सुवर्ण' आहे, तर कारकिर्दीतील दुसरं सुवर्ण पदक आहे. यापूर्वी, २०१०मध्ये सांघिक खेळात तिनं सुवर्णपदक मिळवलं होतं. तिच्या आजच्या कामगिरीमुळं भारताच्या खात्यातील सुवर्ण पदकांची संख्या ११ झाली असून एकूण पदकांचा आकडा २०वर पोहोचला आहे. त्यातील आठ पदकं केवळ भारतीय नेमबाजांनीच आणली आहेत. 

     हिनाची भारतीय सहकारी अन्नू राज सिंह हिला मात्र पदकानं हुलकावणी दिली. अंतिम फेरीत तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

पीटर ग्रुएनबर्ग यांचे निधन

      भौतिक शास्रातील नोबेल मिळवणारे जर्मन भौतिकशास्रज्ञ पीटर ग्रुएनबर्ग यांचे नुकतेच निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 

        डिजिटल डेटाची साठवणूक करण्यामध्ये त्यांचे बहुमोल योगदान होते. २००७ मध्ये त्यांना फ्रेंच शास्रज्ञ अल्बर्ट फेर्ट यांच्यासोबत भौतिक शास्राचे विभागून नोबेल मिळाले होते. गिगाबाईट हार्ड डिस्कचा विकासासाठी आवश्यक अशा जीएमआरचा त्यांनी शोध लावला होता. ग्रुएनबर्ग यांना याआधी २००६ मध्ये युरोपीय युनियनचा पुरस्कार मिळाला होता. तसेच इस्रायल, जपान आणि तुर्कस्ताननेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते. १९८९ मध्ये त्यांना जर्मन अध्यक्षांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

  ९ एप्रिल २०१८

ध्वनीपेक्षाही वेगवान बूम सुपरसॉनिक प्लेन

      सुपरसॉनिक हवाई प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण या विमानासाठीचे ‘बेबी बूम’ नावाच्या ‘मिनी कॉनकॉर्ड’ साठीचे नवे इंजिन तयार करण्यात आले आहे. याच इंजिनच्या जोरावर नवे ‘बेबी बूम’ टेस्ट प्लेन हवेत उड्डाण करणार आहे. विशेष म्हणजे या विमानाचा वेग सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का देणारा असेल. 

    नव्या इंजिनच्या मदतीने बेबी बूम विमान ताशी 1687  मैल वेगाने म्हणजे ध्वनीपेक्षाही जास्त वेगाने उड्डाण करणार आहे. म्हणजेच ते लंडन ते न्यूयॉर्क हे अंतर केवळ तीन ते चार तासांत पूर्ण करेल. या इंजिनला ‘एक्सबी-1’ असे नाव देण्यात आले आहे. हे ‘टेस्ट प्लेन’ येत्या काही वर्षांत ‘सुपरसॉनिक कॉनकार्ड’ विमानाची जागा घेईल.

     नवे सुपरसॉनिक विमान तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘बूम सुपरसॉनिक कंपनी’चे सीईओ ब्लॅक शॉल यांनी सांगितले की, ‘एक्सबी-1’ हे इंजिन  लवकरच विमानात बसवण्यात येईल तेव्हा या क्षेत्रातील ते एक मैलाचा दगड ठरेल. या विमानाच्या बिझनेस क्‍लासच्या दोन्ही भागाला प्रवाशांसाठी जागा उपलब्ध असतील. तसेच ते 30 हजार किंवा त्याहून जास्त उंचीवरून उड्डाण करू शकणार आहे. नवे सुपरसॉनिक विमान कॉनकार्डच्या 90 च्या तुलनेत केवळ 65 डेसिबल इतका आवाज करणार आहे. म्हणजेच त्याचा आवाजही कमी असेल

टेबल टेनिस सांघिकमध्ये भारताने सुवर्ण पदक पटकावले

      भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण धडाका पाचव्या दिवशीही कायम ठेवला आहे. भारतीय महिलांनी टेबल टेनिस संघाने गोल्ड जिंकत आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यातच आता पुरषांच्या संघाने नायजेरियाचा ३-० असा पराभव करत दुसरे गोल्ड जिंकून दिले.

 ८ एप्रिल २०१८

मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

      राष्‍ट्रकुल स्‍पर्धेतील पाचवा दिवस भारीय खेळाडूंसाठी खूपच लकी ठरला आहे. आज भारताला सहा पदके मिळाली आहेत. यात दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. नुकत्‍याच झालेल्‍या मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे. या स्‍पर्धेत अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रंकीरेड्डी यांनी चमकदार कामगिरी करत भारताला ९ वं सुवर्ण पदक मिळवून दिले. 

 ७ एप्रिल २०१८

भारतीय वायूदल करणार जगातील सर्वात मोठी विमान खरेदी

      भारतीय वायूदल जवळपास शंभरपेक्षा जास्त लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. भारतीय वायूदलाने जगभारतील विविध विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून याबाबतची माहिती मागवली आहे. जर ही खरेदी झाली तर ती जवळपास एक लाख करोडची खरेदी असेल. विमन खेरदीत हा जगातील सर्वात मोठा सौदा असण्याची शक्यता आहे.

    भारतीय वायूदल जगभारतील विविध विमान निर्मिती कंपन्यांकडून याबाबात माहिती मागवत आहे. ही डील मिळवण्यात स्विडनची सॅब (SAAB), अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन आणि बॉईंग, फ्रान्सची दासॉल्ट आणि रशियातील मिग या प्रमुख कंपन्यांमध्ये स्पर्धा असणार आहे.

    या बाबत भारतीय वायूसेनेने काही अटी घातल्या आहेत. यामध्ये जवळपास ८५ टक्के विमानांची निर्मिती भारतीय कंपनीसोबत भारतात करायची आहे. याचबरोबर पहिले विमान करार झाल्यावर तीन वर्षाच्या आत देणे बंधनकारक आहे. या बाबतची माहिती जुलै अखेर पर्यंत द्यायची आहे. 

जगातील सर्वात महागडा परफ्युम

      जगातील सर्वात महागडा परफ्युम म्हणून क्‍लाईव्ह क्रिस्टियनच्या परफ्युमची ओळख आहे. हा परफ्युम तयार करण्याची पद्धत वेगळी असून, त्याची गुणवत्ताही उच्च दर्जाची असते. अर्थातच त्यासाठी उच्च दर्जाच्याच सामग्रीचा वापर करण्यात येतो. ‘नंबर 1’ला अधिकृतपणे जगातील सर्वात महागडा परफ्युम म्हटले जाते. 

    हा परफ्युम एका विशेष बाटलीत भरून दिला जातो. ही बाटलीही अतिशय सुंदर असते. क्‍लाईव्हने या क्रिस्टल बॉटलवर 24 कॅरेट सोन्याची जाळी बनवली असून, त्यावर हिरेही जडवलेले आहेत. एखादे सुंदर रत्न तितक्याच सुंदर आणि महागड्या कोंदणात बसवून त्याची शोभा वाढवावी, अशा पद्धतीनेच हे परफ्युम सुंदर व सोन्याच्या बाटलीतून दिले जाते. अशा केवळ दोन हजार बाटल्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यावर सिंहाच्या डोळ्यांमध्ये दोन पिवळ्या रंगाचे हिरे जडवलेले आहेत. एक गुलाबी हिरा त्याच्या जीभेवर बसवलेला आहे. ही तीस मिलिलिटरची ‘नंबर 1’ बाटली एक लाख 43 हजार पौंड म्हणजेच सुमारे एक कोटी 30 लाख 47 हजार रुपयांची आहे.

 ६ एप्रिल २०१८

‘हबल’ने शोधला सर्वाधिक अंतरावरील तारा

      ‘नासा’च्या हबल दुर्बिणीने आतापर्यंतचा सर्वाधिक लांब अंतरावरील तारा शोधून काढला आहे. ब्रह्मांडात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नीळसर रंगाच्या तार्‍याला ‘इकारस’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 9 अब्ज वर्षे लागली. त्यावरून त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती दीर्घ आहे हे लक्षात येऊ शकते.

    जगातील सर्वात मोठ्या अंतराळ दुर्बिणीलाही हा तारा अतिशय अंधुक दिसतो. ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग नावाची एक प्रक्रिया असते, जी तार्‍यांच्या अंधुक तेजाला वाढवते. 

      त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ असे दूरवरचे तारेही सहज पाहू शकतात. बर्कलेमध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील पॅट्रिक केली यांनी सांगितले की आम्ही प्रथमच एखादा  विशाल आणि एकमेवाद्वितीय असा तारा पाहिला आहे. आपण त्या ठिकाणी अनेक आकाशगंगा पाहू शकतो; पण हा तारा सर्वांपासून वेगळा आणि एकाकीच आहे. त्याबाबत आता अधिक संशोधन सुरू आहे.

दीपक चमकला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य

      राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर दीपक लाथेर चमकला असून, त्यानं देशाला चौथं पदक मिळवून दिलं आहे. विशेष म्हणजे हे चारही पदक भारताला वेटलिफ्टिंगमध्येच मिळाले आहेत. दीपकनं पुरुषांच्या ६९ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. पदार्पणातच त्यानं ही कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्या प्रयत्नात १३६ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५९ किलो वजन उचलून पदकाला गवसणी घातली आहे. १८ वर्षीय दीपक हरयाणातील शादीपूरचा रहिवासी असून, त्याचे वडील शेतकरी आहेत. 

      दीपकनं स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात १३२ किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात १३६ किलो वजन उचललं. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात मात्र तो १३८ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरल्यानं पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. क्लीन अँड जर्क प्रकारात त्याच्या पुढे ६ वेटलिफ्टर होते. या प्रकारात त्यानं १५९ किलो वजन उचलून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पदकाची आशा संपुष्टात आली असताना, समोआचा वायपोव्हा अपयशी ठरला. त्यामुळं दीपकचं पदक पक्कं झालं. दीपकची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. वेल्सच्या गॅरेथ इव्हान्सनं या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. त्यानं एकूण २९९ किलो वजन उचललं. तर श्रीलंकेच्या इंडिका दिसानायकेनं २९७ किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलं.

 ५ एप्रिल २०१८

भारताची मीराबाई चानू ठरली सुवर्णकन्या!

      ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे २१ व्या राष्ट्रकुल खेळांना सुरुवात झालेली आहे.  या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे. 

 • टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांची वेल्सवर ३-१ ने मात
 • पी. व्ही. सिंधू पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळणार नाही
 • टेबल टेनिस सामन्यात भारतीय महिलांचा संघ आघाडीवर
 • आतापर्यंत पदकतालिकेत भारत १ सुवर्ण, १ रौप्य, ० कांस्य
 • मीराबाईने तब्बल १९६ किलो वजन उचलत संपूर्ण स्पर्धेवर आपला दबदबा कायम राखला
 • मीराबाईने आपल्या नावावर असलेला राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम मोडीत काढला
 • पहिल्या दिवशीच्या खेळात भारताला सुवर्णपदक, ४८ किलो वजनीगटात मीराबाईने पटकावलं सुवर्णपदक
 • हरिंदरपाल सिंह विजयी, ११-३, ११-१३, ११-६, ११-८ च्या फरकाने कॅमरुन स्टॅफर्डवर मात
 • स्क्वॅश – भारताच्या हरिंदरपाल सिंह संधूची आपल्या प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज
 • त्रिनिनाद टोबॅगोच्या प्रतिस्पर्ध्यांवर केली मात
 • टेबल टेनिस भारताच्या सत्यन गणशेखरन आणि हरमीत देसाईचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
 • महाराष्ट्राचा वीरधवल खाडे राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मी. बटरफ्लाय प्रकारात उपांत्य फेरीत दाखल
 • सांघिक प्रकारात भारतीय महिलांकडून श्रीलंकेचा धुव्वा, लंकेवर ५-० ने केली मात
 • १०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात पहिल्या फेरीत पाचव्या स्थानावर
 • ५० मी. बटरफ्लाय प्रकारात भारताच्या वीरधवल खाडे आणि सजन प्रकाश अनुक्रमे पाचव्या व सातव्या स्थानावर
 • पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात पहिलं पदक, गुरुराजाने वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक
 • बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाकडून श्रीलंकेचा धुव्वा, ३-० ने भारतीय महिलांचा विजय
 • ५६ किलो वजनी गटात वेटलिफ्टींग प्रकारात भारताच्या गुरुराजाकडून चांगली लढत
 • वेल्सच्या महिला संघाने भारतीय महिलांना ३-२ च्या फरकाने हरवलं

डार्क मॅटर नसलेल्या आकाशगंगेचा शोध

     ‘मिल्की वे’ नावाच्या आपल्या आकाशगंगेपासून दूरवर असलेल्या एका नव्या आकाशगंगेचा शोध लावण्यात आला आहे. या आकाशगंगेत एकही डार्क मॅटर नसल्याने खगोलशास्त्रज्ञ चकीत झाले आहेत. ब्रह्मांडातील ही सर्वात अनोखी बाब आहे.

 •       प्रत्येक आकाशगंगेत अदृश्य आणि रहस्यमय असे डार्क मॅटर असते. त्याच्याविषयी अद्यापही संशोधन सुरू आहे. त्याची रचना अद्याप सुस्पष्ट नसली तरी त्यामध्ये एक मजबूत गुरुत्वाकर्षण प्रभाव असतो, जो आपल्या ‘मिल्की वे’सह अनेक आकाशगंगांमध्ये पाहायला मिळतो. एखाद्या आकाशगंगेच्या निर्मितीसाठी या डार्क मॅटरची गरज असते असे आतापर्यंत मानले जात होते. आकाशगंगेचे हे एका अर्थाने बीजच असल्याचेही म्हटले जात होते. त्याच्यामुळे नॉर्मल मॅटर जमा होऊन त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे तार्‍यांचा जन्म होतो. मात्र, एकही डार्क मॅटर नसताना या आकाशगंगेची निर्मिती कशी झाली हे कोडे संशोधकांना पडले आहे. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील मुख्य संशोधक पीटर व्हॅन डॉक्कुम यांनी याबाबतची माहिती दिली. ‘घोस्ट गॅलेक्सी’ म्हटल्या जाणार्‍या या आकाशगंगेला त्यांनी ‘जीसी1052-डीएफ2’ किंवा ‘डीएफ2’ असे नाव दिले आहे. ती 6.5 कोटी प्रकाशवर्ष दूर आहे. याचा अर्थ प्रकाशाच्या वेगाने गेल्यास तिथेपर्यंत पोहोचण्यास 6.5 कोटी वर्षे लागतील!

 ४ एप्रिल २०१८

यू-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, ४ जण जखमी

       अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या यू-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार करण्यात आला असून त्यात 4 जण जखमी झाले आहेत. एका महिलेने हा गोळीबार केला. गोळीबारानंतर त्या महिलेने स्व:तवर गोळी झाडून घेतली आहे.

       पोलिस अधिकारी बारबेरिनी यांनी सांगितले की, स्व:तवर गोळी झाडून घेतल्याने ती महिला ठार झाली होती. गोळीबारानंतर मुख्यालयात सर्वत्र गोंधळ उडाला होता. कर्मचाऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत तेथील लोकांना घटनास्थळापासून दूर केले. त्यानंतर यू-ट्यूबचे ऑफिसही बंद करण्यात आले. 

        4 पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाची गोळीबार करणारी महिला प्रेयसी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गोळीबाराचे अद्याप खरे कारण समजू शकलेले नाही. कर्मचाऱ्यांच्या घरगुती वादातून हा प्रकार झाला असावा असाही पोलिसांचा कयास आहे.

विनी मंडेला यांचे निधन

       दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या विभक्त पत्नी यांचे  दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. विनी यांच्या खासगी सचिवाने त्यांच्या निधनाचे वृत्त 'बीबीसी' या ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिले. विनी यांचा १९५८ मध्ये नेल्सन मंडेलांशी विवाह झाला. मात्र, बहुतांश काळ नेल्सन मंडेला तुरुंगात होते. याच काळात विनी स्वत:ही वर्णद्वेषाविरोधात लढा देत होत्या. या काळात त्यांना तुरुंगवास तसेच, काही काळ नजरकैदेतही घालवावा लागला. तुरुंगातून हातात हात घालून बाहेर पडतानाचा या दोघांचा फोटो त्या काळी गाजला होता. सुमारे तीन दशके हे दाम्पत्य वर्णद्वेषविरोधी लढ्याचे प्रतीक बनून राहिले. मात्र, अखेरच्या काळात विनी यांच्यावर काही आरोपही झाले होते. 

     १९९६मध्ये विनी यांनी नेल्सन मंडेलांपासून घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोटानंतरही त्यांनी मंडेला आडनाव वापरणे, तसेच नेल्सन मंडेलांबरोबरचा स्नेह कायम ठेवला होता. 

 

३ एप्रिल २०१८

अभिनेते मनोज जोशी, दिग्दर्शक मिश्रा यांना ‘पद्म’ प्रदान

       महाराष्ट्रातून उद्योजक रामेश्‍वरलाल काबरा, प्रसिद्ध कलावंत मनोज जोशी आणि चित्रपट दिग्दर्शक सिसीर मिश्रा यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातून तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

      पद्म पुरस्कार वितरणाच्या दुसर्‍या व अंतिम टप्प्यात देशातील विविध मान्यवरांना सोमवारी प्रदान करण्यात आले. व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी श्री रामेश्‍वरलाल काबरा यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. काबरा यांनी ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी ‘फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी’च्या माध्यमातून 30 हजार एकल विद्यालये स्थापित करून आठ लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले आहे.

धोनीने स्वीकारला पद्मभूषण

   टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा विकेटकिपर फलंदाज महेंद्रसिंग धोनीने आपले वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध करताना लेफ्टनंट कर्नलच्या गणवेशात पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते  स्वीकारला. 2011 साली धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2 एप्रिल रोजीच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वन-डे वर्ल्डकप जिंकला होता. दुसर्‍या विश्‍वविजयाच्या सातव्या वर्धापनदिनी धोनीला हा पुरस्कार मिळणे योगायोग ठरला.

 

२ एप्रिल २०१८

असा होता जगातील पहिला स्मार्टफोन..!

       जगातील पहिला स्मार्टफोन बनवण्याचे श्रेय जाते ते आयबीएम कंपनीला. 1994 साली त्यांनी टच स्क्रीन असलेला पहिला फोन बाजारात आणला होता. यात ई-मेल करण्याची सोय होती, शिवाय कॅलक्युलेटर, स्केच पॅड असे ‘अ‍ॅप’ ही होते. ‘सिमोन’ असे या स्मार्टफोनचे नाव. मात्र, याची बॅटरी फक्‍त एक तास चालत असे..! त्यामुळे हा फोन फक्‍त सहा महिने बाजारात टिकू शकला. पण, त्यादरम्यानही 50 हजार फोनची विक्री झाली. त्यानंतर नोकियाच्या फोनचे बाजारात पदार्पण झाले आणि हळूहळू सिमोन मागे पडत गेला. नोकियाच्या फोनची चलती असताना टच स्क्रीन फोनचा विचार फारसा कुणी केला नव्हता. त्यानंतर तंत्रज्ञान प्रचंड वेगने बदलले आणि स्मार्टफोन हा आधुनिक जगाचा श्‍वास बनला. आज 2.5 अब्ज स्मार्ट फोन आहेत.जगातील पहिला स्मार्टफोन बनवण्याचे श्रेय जाते ते आयबीएम कंपनीला. 1994 साली त्यांनी टच स्क्रीन असलेला पहिला फोन बाजारात आणला होता. यात ई-मेल करण्याची सोय होती, शिवाय कॅलक्युलेटर, स्केच पॅड असे ‘अ‍ॅप’ ही होते. ‘सिमोन’ असे या स्मार्टफोनचे नाव. मात्र, याची बॅटरी फक्‍त एक तास चालत असे..! त्यामुळे हा फोन फक्‍त सहा महिने बाजारात टिकू शकला. पण, त्यादरम्यानही 50 हजार फोनची विक्री झाली. त्यानंतर नोकियाच्या फोनचे बाजारात पदार्पण झाले आणि हळूहळू सिमोन मागे पडत गेला. नोकियाच्या फोनची चलती असताना टच स्क्रीन फोनचा विचार फारसा कुणी केला नव्हता. त्यानंतर तंत्रज्ञान प्रचंड वेगने बदलले आणि स्मार्टफोन हा आधुनिक जगाचा श्‍वास बनला. आज 2.5 अब्ज स्मार्ट फोन आहेत.